पायथागोरसचे अदभूत प्रकरण

Submitted by सखा on 24 December, 2015 - 03:20

बाहुबली धीवराने मृगनयनीचे अधीर अधर आपल्या तर्जनीने स्पर्शताच लाख लाख गुलाब उमलले…….
वगैरे झकास रोमांटिक सुरवात असलेली कथा लिहायला मला पण आवडले असते पण आमच्या बोकलवाडीच्या सेंट परषु महाविद्यालयात असं काही वरणभात वातावरण नव्हतेच. त्यातच पुन्हा आमच्या घरचं पोलिटिकल वातावरण. माझे धाकटे काका ज्यांना आम्ही बापू काका म्हणतो ते "राष्ट्रीय दणदणीत पार्टीचे" नुकतेच महाराष्ट्र प्रमुख का काय ते झालेले. बापू काकाला लोक इशू सम्राट म्हणून मानतात. कुठल्याही गोष्टीचा पोलिटिकल इशु बनवून बंद घडवून आणणे वगैरे गोष्टी मुळे त्यांना आख्या महाराष्ट्रात मोठे स्थान होते. मोठे मोठे सिनेमा प्रोडुसर रिलीजच्या आधी बापू काका काही करा पण आमच्या सिनेमाचा काही तरी इशु करा म्हणून नोटांची बंडले घेवून येत.
अशा आमच्या थोर बापू काकाचा अर्थातच शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टी वर काहीही विश्वास नव्हता. कालच ते आमच्या नुकत्याच दहा वर्षांनी जेल मधून सुटून आलेल्या पूजनिय आजोबाना भेटायला घरी आले तेव्हा म्हणाले "पक्ष फोफावतोय, गोपूला (म्हणजे मला) आता शाळेतून पक्ष कार्यासाठी काढला पाहिजे. राजकारणात घरच माणूस हाताशी असलेले बरे"
त्या वर माझी आई म्हणाली "अव भावूजी दहावी तर पास करुदे की याला आता ह्यो यंदा तिसर्यांदा आठवीला हाय"
"काय करायचय शिकून वैनी? कोण मोठा शिकेल राजकारणी विधानसभेत हाय? तुम्हीच सांगा? मुख्यमंत्री का शिक्षणमंत्री का कोण आमदार?"
मग मला प्रेमाने जवळ घेत काका म्हणाले "शिकून आमदार खासदार होत नसतंय वैनी. बघाच दहा वर्षात गोपुला मुख्यमंत्री करतो का नाय"
ऐकून माझ्या अंगावर मूठभर मास चढलं. मी आणि मुख्यमंत्री वा वा! आईनी पण माझ्याकडे फार फार कौतुकानी बघितलं आणि नजरेनच खुणावलं. मी पटकन काकाच्या पाया पडलो. वेळप्रसंगी कधी कधी असे पाया पडले तर दहापाच रुपये सज्जन लोक हाती ठेवतात हे मलाही सवयीने माहिती होतेच की.
"बघा आता बापावीन पोर हाय ते तुंम्हीच काका लोकं हाये त्याचे बाप"
काका कडून पाया पडूनही काहीच न मिळाल्याने खट्टू होत आपल्या जागी परत बसताना आई म्हणाल्याचे मी ऐकले.
"वैनी उगाच कैलासवासी करडू भाऊची आठवण करून रडवू नका. अहो गोप्याचा हा काका जित्ता हाये म्हटलं अजून"
"आन हंग्या हांग्या प्रेर" - असे काहीसं पूजनीय आजोबा म्हणाले तेव्हा सारेच दचकले. त्यांना पण बहुदा मी पण जित्ता आहे असे म्हणायचे असावे पण दारू पिलेल्या मनुष्यास स्पष्ट बोलता येत नाही म्हणतात.
"तू गप की रे बुंगाऱ्या" अस काका वसकल्यावर
"हिजा बा नाका कूSSSS टी" असे काहीसे म्हणत आजोबा हळूच परसात लुंडकले.
त्यांच्याकडे आम्ही सर्वानीच दुर्लक्ष केले आणि मग चहा पिऊन
"येतो वैनी, येतो मुख्यमंत्री साहेब वळख राहू द्या"
असं म्हणून बापूकाका मिशीला पीळ देवून कार्यकर्त्या सोबत धुरळा उडवीत जीप मधून निघून गेला. त्या वेळी पूजनीय आजोबा अभिमानाने झोपेत हसत आहेत असाच मला भास झाला.

दुपारचे वर्ग आणि त्यातल्या त्यात भूमितीचा तास म्हणजे फारच अवघड प्रकरण. भरपूर जेवण झाल्याने खिडकीतून येणारी हवा अशी काय जादू करते कि मस्त झोपच येते. "उठा कुंभकर्ण" असं कुणी तरी ओरडतय असा भास झाल्याने डोळे किलकिले करून पाहतो तो काय? एक हुप्प्या माकडा सारखा चेहरा मला दिसला. अरेच्या या हुप्प्याला हिटलर छाप मिशा कशा काय बरं? नंतर मग हळू हळू प्रकाश पडला अरे हे तर आपले बोकडे मास्तर मग मी झोपेतच एक गोड जांभई देवून त्यांना विनम्रपणे म्हंटले "काय मास्तर आज इकडे कुठं?" मास्तर उडालेच.
"इकडं कुठं? मी इकडं कुठं?" मास्तर म्हणाले "गोपेशकुमार हा वर्ग आहे आणि आणि आपण सेंट परषु विद्यालयात भर वर्गात निद्रा घेत आहात"
पोरांचा हशा ऐकू आला तसा मग मला जरा जाग येवून अजून उमजू लागलं. अरेच्या आपण वर्गात आहोत आणि झोपी गेलो होतो.
"तसं नाय मास्तर लक्ष हुतं माझं" मी सावरून घेत म्हणालो. काय आहे की शाळेतील दांडगट आणि डांबरट विद्यार्थी अशी माझी ख्याती असल्याने मला जरा या पहिल्यांदाच आठवीत आलेल्या पोरांसोबत आब राखूनच वागावे लागत असे.
"लक्ष होतं? बरं काय लक्ष होतं? सांग बरे मी काय शिकवीत होतो"
"भूमिती" मी बाणेदारपणे म्हणालो
"आणी भूमितीत काय?"
"ते आपल हे …." मी घोटाळू लागलो
"सांगा सांगा … आपले हे काय?" मास्तर
"पायथागोरस चे प्रमेय" माझा बाक बंधू आणि सच्चा मित्र ढोरे पाटील कुजबुजला.
"डायनासोरेस चे प्रमेय " मला जसं ऐकू आलं तसं मी म्हटल
"डायनासोरेस चे प्रमेय?? भूमितीच्या तासाला डायनासोरेस चे प्रमेय?? वा गोपेशकुमार वा! धन्य आहात तुम्ही! "
विनोद न कळल्या वर हुशार लोक करतात तसा 'म्हटलो तर हसला नाही तर नाही' असा पोलिटिकल चेहरा करून उभा राहिलो.
"ढोरे पाटील उठा आणि तिकडे अंगठे धरून उभे राहा" बिचारा ढोर्या मुकाट्याने ढोरा प्रमाणे भिंतीशी अंगठे धरून उभा राहिला.
"सर मी पण जाऊ?"
"कुठे?"
"अंगठे धरायला"? आपला पण शेवट असाच होणार आहे तर मग उशीर कशाला या अट्टल गुन्हेगाराच्या समजूतदारपणे मी म्हणालो.
"नाही तू वहीत दोनशे वेळा लिही"
"काय?"
"पायथागोरस चे प्रमेय, हीच तुला शिक्षा"
"नको सर त्या पेक्षा अंगठे धरतो की"
"नाही नो नेव्हर चल लिहायला सुरुवात कर"
योग कसा असतो बघा थंडगार पाण्यात पोह्ल्याने म्हणा नाही तर चिंचा बोरं खाल्ल्याने म्हणा नेमका रात्री नेमका मला एकशे दोन ताप आला आणि झोपेत मी सारखा "पायथागोरस पायथागोरस" असे बरळत रडू कण्हू लागलो. आता तुम्ही सांगा दोनशे वेळा पायथागोरस हे नाव घोकल्यावर झोपेत 'पायथागोरस' नाही तर काय माणूस 'झिंगा लाला हुर्र हुर्र म्हणणार?' आईने घाबरून पहाटे पहाटे बापू काकाला बोलावून घेतले. त्यांना पण हा पायथागोरस कोण कळेना.
मांत्रिक बोलवावा की वैद्य अशी चर्चा होवून शेवटी वैद्य बुवांना पाचारण करण्यात आले. मला झोपेत एक कडू चाटण देवून वैद्य बुवां म्हणाले कि हे काही साधे सुधे प्रकरण नाहीये कशाने तरी याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. बघा ही पायथा गोरस कोण व्यक्ती आहे. जर सकाळीपण हा अशीच बडबड करीत राहिला तर मात्र मांत्रिकाला बोलवा. आता मात्र बापूकाकाला परिस्थितीतील गांभीर्य कळले आणि ते पहाटेच बुलेटवर गावा बाहेर मास्तरच्या घराकडे निघाले. त्या वेळी नेहमी प्रमाणे बोकडे मास्तर एखाद्या मुंगळ्या सारखे तुरु तुरु शेताच्या दिशेने निघालेले. हातातील लोटीला बारीक भोक असल्याने वेळ अत्यंत महत्वाचा होता. सकाळी सकाळी बोकडे मास्तर शक्यतो असंबध्दच बोलतात हे गावातील बहुतेक सर्वाना ठावूक होतं. बापू काकाला सुध्धा हे जर ठावूक असते तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाने वेगळे वळण घेतले असते. बोकडे मास्तरला बापू काकांनी अशा महत्वाच्या वेळी थांबवावे हे अजिबात आवडले नाही. बापू काकानी मास्तरला जेव्हा मी तापीत बरळतो आहे आणि हा लहान मुलांना त्रास देणारा पायथागोरस कोण आहे असे विचारले तेव्हा बोकडे मास्तर अनपेक्षितरित्या भडकलेच ते म्हणाले:
"अहो मला काय विचारताय पायथागोरस कोण म्हणून?? हिम्मत असेल तर तुमच्या त्या शिक्षणमंत्र्यांना विचारांना. त्यांनीच मारलाय हा नवा अभ्यासक्रम आमच्या बोडक्यावर? आम्हाला काय आनंद आहे हे असलं भलतं सलतं शिकवायला? मी तर म्हणतो घाला हे सगळे पायथा गोरस फिरस चुलीत. अपुऱ्या पगारात किती अन्याय सहन करणार आम्ही? लक्षात ठेवा वेड लागेल सगळ्यांना. आज गोप्याला लागले उद्या दुसऱ्या मुलांना लागेल आणि आम्ही तर काय आधीच वेडे झालो आहोत"
एव्हढे बोलून मास्तर विद्युतगतीने बाजूच्या मळ्यात गडप झाले आणि बापूकाका डोके खाजवीत बसला.
चाणाक्ष बापूकाकाला फारसे शिक्षण नसले तरी हे ध्यानात आले की नव्या अभ्यासक्रमात काही तरी घोळ आहे आणि हा पायथागोरस का काय जो कोण आहे त्यांच्या शिकवणूकी मुळे मुलांना आणि मास्तरांना वेड लागत चालले आहे.
विचार करता करता अचानकच बापूकाकाला हर्षानंद झाला. समजा आपण या पायथागोरसचाच इशु केला तर? त्याच्यावरच बंदी घातली तर? विरोधीपक्ष अभ्यासक्रमात बदल करून जो पर्यंत पायथागोरसला अभ्यासक्रमातून हद्द पार करत नाही तो पर्यंत आंदोलन करायचे. दुकाने - शाळा बंद करायच्या, वाहने जाळपोळ आणि विधानसभेत गदारोळ वगैरे करण्याची सुसंधीच की ही. गेला बाजार शिक्षणमंत्र्याचा राजीनामापण मागता येईल. त्याना योगायोगानेच एक नवा अप्रतिम इशू मिळाला होता. झालं ठरलं हा जो कोण पायथागोरस असेल त्याच्यावर महाराष्ट्रात बंदी आणायची. ढेन टे ढेन!
झालं पुढच्या चोवीस तासात जी काही चक्र फिरली म्हणता महाराजा! बापूसाहेबाच्या दणदणीत पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिकडे तिकडे गोंधळ घातला. पुणे,मुंबई,नाशिक,औरंगाबाद,नागपूर येथे वाहने काय आडवली. टोल नाके काय लुटले. बसेस काय जाळल्या. सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली. सत्ताधारी पक्षाला काय होते आहे हेच कळेना. अमेरिकेच्या दौऱ्यावर निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई विमानतळावरच शिक्षणमंत्र्या बरोबर तातडीची मिटिंग घेतली. शिक्षणमंत्र्यांना पण नेमकं काही सांगता आलं नाही तेव्हा ते मी सम्बन्धित अधिकाऱ्यां कडून अहवाल मिळाला की आपल्याला कळवतो असे म्हणून कसेबसे सटकले.
आता आम्हाला पण शाळेला सुट्टी मिळाल्याने घरी बसून टी व्ही बघण्या शिवाय पर्याय नव्हता. टीव्ही वर जोरदार चर्चा चालू होती गम्मत म्हणजे बापू काका आणि शिक्षण मंत्री दोघेही चर्चेला आपापल्या पक्ष कार्यालयातून उपस्थित होते.
पत्रकार: मला बापुसाहेबना विचारायचे आहे कि आपल्या काय मागण्या आहेत?
बापू: सर्व प्रथम माननीय शिक्षणमंत्र्यांनी आमच्या धार्मिक भावनाना दुखवल्या बद्दल जाहीर माफी मागून मग राजीनामा द्यावा. तसेच महाराष्ट्रात गोरसा वर बंदी आणावी.
पत्रकार: गोरस? म्हणजे गोहत्ये प्रमाणे म्हणताय तुम्ही?
बापू: नाही नाही मी श्री. पायथा गोरस यांच्या बद्दल बोलत आहे. गोरस हे आडनाव आहे. त्यांना आम्ही महाराष्ट्रात येवू देणार नाही.
पत्रकार: मला अजूनही नीट उमजत नाहीये. मला शिक्षणमंत्र्यांना विचारायचे आहे की तुमची काय भूमिका आहे?
शिक्षणमंत्री: माझे म्हणणे असे आहे कि बापूनी आता जातीचे राजकारण बंद करून सक्रिय राजकारण करावे.
बापू: आम्ही अजिबात जातीचे राजकारण करत नाही ते काम तुमचे.
शिक्षणमंत्री: करत कसे नाही? हे पहा मराठवाडा ही संतांची भूमी आहे. संत पायथा गोरस यांची फार मोठी शिष्य परंपरा इथे आहे. आता ते केवळ मराठवाड्यातील म्हणून त्यांना विरोध करणे जातीचे राजकारण नाही तर याला दुसरे काय म्हणणार?
पत्रकार: संत? मला वाटले ते गणितज्ञ होते.
शिक्षणमंत्री:(आधी दचकल्यावर सराईतपणे) काय नीटसे ऐकू येत नाहीये … हेलो हेलो
पत्रकार: बापूसाहेब आपलापण विरोध गणितज्ञ पायथागोरस यांच्या प्रमेया बद्दलच आहे ना?
बापू: (तीतक्याच सराईतपणे) काय नीटसे ऐकू येत नाहीये … हेलो हेलो
पत्रकार: माफ करा satelite लिंक गेल्याने दोघांशी संपर्क तुटला आहे. नुकत्याच आलेल्या बातमी नुसार जगभरातून अनेक राष्ट्रांनी पायथागोरस यांच्यावर बंदी आणण्याच्या विचित्र मागणी बद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. आता आपण थेट जावूया बोकलवाडीला जिथून या सर्व प्रकाराची सुरुवात झाली.
आता टीव्ही वर मीच दिसू लागलो आणि सोबत होते बोकडे मास्तर.
पत्रकार: हीच ती बोकलवाडीची सेंट परषु महाविद्यालय शाळा जिथून या सर्व प्रकाराला सुरवात झाली. आज माझ्या सोबत एक विद्यार्थी आणि भूमितीचे शिक्षक श्री बोकडे इथे आहेत.
पत्रकार: सध्या महाराष्ट्रात मुलांच्या डोक्यावर परिणाम होतो म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावर बंदी आणावी अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केलेली आहे या बद्दल आपले काय म्हणणे आहे?
बोकडे: अजिबात बंदी आणण्याचे कारण नाहीये. अजिबात कुणाच्या डोक्यावर काहीही परिणाम होत नाहीये. मी आपल्या माध्यमातून आपले सनमाननीय शिक्षणमंत्र्यांचे नवीन अभ्यासक्रमा बद्दल अभिनंदन करू इच्छितो. मी अजून हेडमास्तर नसलो तरी एक हाडाचा शिक्षक असल्याने मी मुलांना हा विषय अतिशय सोपा करून सांगत असतो आणि हे सिद्ध करण्या साठी मी आज माझ्या सोबत वर्गातील अत्यंत "ढ" विद्यार्थी आणला आहे. आपण खुशाल त्याला विचारावे.
पत्रकार: बाळ काय नाव तुझे.
मी: गोपेश कुमार.
पत्रकार: बाळ तुझा आवडता विषय कुठला
मी: भूमिती
पत्रकार: आणि तुला पायथागोरसचे प्रमेय आवडते?
मी: हो फार फार आवडते म्हणून दाखवू?
पत्रकार: म्हणून दाखव बरे
मी: काटकोन त्रिकोणाचा कर्ण वर्ग= काटकोन त्रिकोणाची एक बाजु वर्ग + काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजु वर्ग.
पत्रकार: शाब्बास! आणि हे तुला कुणी शिकवले
मी बत्तीशी काढून हसणाऱ्या आमच्या बोकडे मास्तर कडे बोट केले आणि तिकडे आमच्या बापुकाकाचे पोलिटिकल करिअर कायमचे संपले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"डायनासोरेस चे प्रमेय?"
>>
मस्त !!

मी बत्तीशी काढून हसणाऱ्या आमच्या बोकडे मास्तर कडे बोट केले आणि तिकडे आमच्या बापुकाकाचे पोलिटिकल करिअर कायमचे संपले.

>>

Biggrin

एण्ड जरा गुंडाळल्यासारखा वाटला पण बाकी सगळा माहौल Lol

अवांतर - मला हे वाचताना तो पोस्टर बॉईज चित्रपट आठवत होता.. मस्त शैलीय आपली.. आन दो और Happy

:G:-G:खोखो:

ऋन्मेऽऽष आपल्या कॉमेंट बद्दल धन्यवाद गमतशीर योगायोग म्हणा पण पोस्टर बॉईज चित्रपटाच्या निर्मिती प्रवासात माझा लेखक दिग्दर्शकाचा मित्र या नात्याने फार जवळचा संबंध होता.

धन्य! Biggrin

पोस्टर बॉईज चित्रपटाच्या निर्मितीप्रवासात माझा लेखक-दिग्दर्शकाचा मित्र या नात्याने फार जवळचा संबंध होता. >>> अरे वा!

श्री. पायथा गोरस यांच्या बद्दल बोलत आहे. गोरस हे आडनाव आहे. त्यांना आम्ही महाराष्ट्रात येवू देणार नाही.>>>>> Lol
मस्तच.

गमतशीर योगायोग म्हणा पण पोस्टर बॉईज चित्रपटाच्या निर्मिती प्रवासात माझा लेखक दिग्दर्शकाचा मित्र या नात्याने फार जवळचा संबंध होता.
>>>>
योगायोग नाही सर, याला ऋन्मेषची पारखी नजर बोलतात Wink

पोस्टर गर्लही बहुतेक येतोय ना..

योगायोग नाही सर, याला ऋन्मेषची पारखी नजर बोलतात>>>
मान गये उस्ताद! हो फेब्रुवारी मध्ये

"काय मास्तर आज इकडे कुठं?" >>> Rofl
हातातील लोटीला बारीक भोक असल्याने वेळ अत्यंत महत्वाचा होता >>> Lol
संत पायथा गोरस यांची फार मोठी शिष्य परंपरा >>> Rofl

फटाके फुटलेत ! Lol

हाहाहा! जमलाय हा ही लेख!
सखा, तुम्हाला इशारा वजा धमकी देण्यात येत आहे की तुम्ही तुमचे लेख सार्वजनिक न करून मायबोलीच्या रोमातील वाचकांना ह्या वाचनानंदापासून वंचित ठेवत आहात. आपण जलद योग्य ती कार्यवाही न केल्यास admin च्या विपुत आपली तक्रार करण्यात येईल Light 1

सखा, तुम्हाला इशारा वजा धमकी देण्यात येत आहे की तुम्ही तुमचे लेख सार्वजनिक न करून मायबोलीच्या रोमातील वाचकांना ह्या वाचनानंदापासून वंचित ठेवत आहात. आपण जलद योग्य ती कार्यवाही न केल्यास admin च्या विपुत आपली तक्रार करण्यात येईल +१

Pages