अनुभूती

Submitted by सखा on 16 December, 2015 - 11:03

माझ्या ओळखीने ती सिनेमाची ऑडीशन चालू होती. नटी माझ्या जुजबी ओळखीची. प्रोडुसर माझा घट्ट मित्र.
ती नटी मूलत: स्वभावाने जरी अजिबातच मृदू नसली तरी फॉर प्रायव्हसी सेक, लेट अस कॉल हर "मृदू बाला" आणि हीम ऐज "भक्कम" कारण तो मनाने सरळ असला तरी शरीराने चांगलाच भक्कम होता .
ऑडिशन साठी "मृदू बालाने" विचारपूर्वक "घोड्या घोड्या दार उघड" नाटकातील शेवटचे चार पानी स्वगत ज्यात व्याकुळ भामिनी त्या विदेशी घोडेस्वाराने परत यावे म्हणनू बॉलीवूड डान्स करत प्राण त्याग करते तो सीन केला. जाता जाता हे सांगावे वाटते की या मूळ नाटकाला त्याच्या नावातील "प्राणी" प्रेक्षकांनी लावले असे इतिहासकार सांगतात.
दहा मिनिटे जेव्हा अशक्य अभिनय करून स्टेजवर लोळण घेत मृदू बालाने एकदाचा प्राण सोडला तेव्हा माझ्या आणि भक्कुच्या डोळ्यातून एकदमच घळा घळा अश्रू आले.
खूप बोर होऊन जांभई दिल्यावर मनुष्याच्या डोळ्यात नेहमीच पाणी येते.
मी कधीच कुणाला दुखवत नाही. कशाला कुणाला उगाच दुखवा? माझ्या या चांगुलपणा मुळे मला व काही दुसर्या सद्गुणी मित्रांना बऱ्याचदा फक्त पार्टीच्या दुसऱ्या दिवशी जेवायला बोलावले जाते.कुठल्याही गृहिणीला अन्न वाया घालवत नाही हेच खरे. त्यात मृदू बाला तर चतुरच. अशाच एक डे-टू पार्टीत मृदू बालाने स्वतः केलेली परंतु माझ्या दातात अडकलेली वात्तड पोळी सोडवीत असताना बेसावध क्षणी ती मला म्हणाली भावू मला तुमच्या प्रोडूसर मित्राला भेटवाना, अजून एक कालची पोळी वाढू का?
वात्तड का असेना पण अडकल्या पोळीला जागून मी प्रोडुसर मित्राला शब्द टाकला. त्यांनी पण बिचार्यांनी वेळ दिली. त्याचे पण दिवस तसे वाईट चालू होते दोन सिनेमांनी आपटी खाल्ल्याने आता विकायला सासऱ्याची फारशी जमीनही उरली नव्हती. त्या मुळे आता extra लो बजेट फिल्म आणि हिरोईन शिवाय पर्याय ही नव्हता. असो.
आज या नटीचा मामला आज काही एवढा जमला नाही हे जरी मला कळले तरी "सारी देवाची रे बाळे कुणी रताळे कुणी शिंगोळे" या मनोवृत्तीने मी खूप टाळ्या वाजवल्या.
होऊ शकते कदाचित मला अभिनयातले समजत नसेल परंतु भक्कमला उमजले असेल असा समजूतदार विचार करून मी सावध आवाजात बाजूला निपचित पडलेल्या प्रोडुसर मित्राला म्हणालो.
भक्कू हौ वॉझ इट? मस्त ना?
स्तंभित झालेला भक्कम बराच वेळ काहीच बोलेना तेव्हा मला काळजात चर्र झाले. झाले आपल्या कृती मूळे अजून एक चांगला आणि वात्रट बोलणारा मित्र कायमचा कमी झाला की काय याची मला काळजी वाटू लागली.
तुझा निर्णय ते नंतर सांगतील तुझ्या प्रभावी अभिनयाने ते सुन्न झाले आहेत असे काहीसे सांगून मी नटीची बोळवण केली आणि भक्कम च्या बाजूला येवून बसलो. भकास झालेला भक्कू हलकेच म्हणाला
"मित्रा तुझे उपकार मी कसे फेडू?"
मी म्हणालो "तिरकस बोलायची काहीच गरज नाही भक्कू आणि फेडायचेच असतील तर आपण सातवीत असताना सात जानेवारी १९८१ ला मी तुला कुल्फी खायला उधार दिलेले दोन रुपये परत दे."
"मला तुझ्या स्मरण शक्ती आणि चेंगट पणाचे मनो-भावे कौतुक वाटते पण विषय तो नाही"
"मग थ्यांकू कशा साठी?"
"तू मला आज मार्ग दाखवलास"
"कसा?"
"काय वाटले तुला ही ऑडीशन बघून"
"मेल्या वरही तिचे ढेरपोट हलत होते"
"बरोबर पण त्याही पलीकडे डीप"
"मला तेव्हढेच दिसले"
"या बाईला लाख वाटते की आपण अभिनय सम्राद्नि आहोत पण तो तिचा पिंडच नाही. प्रत्येकाला आपण अमुक एका गोष्टी मध्ये फार ग्रेट आहोत असा तुफान गैर समज असण्याची शक्यता आहे पण त्यांना कुणी तरी ते स्पष्ट सांगायला हवे असते नाही तर जीवन वाया जाते. आज तू मला दाखवून दिलेस की मी चित्रपट निर्मितीत या नटी सारखा आहे. मला त्यात गती नाही. हे तू आयडिया ने मला हे सुचविलेस धन्यवाद!"
हा सगळा प्रकार अशी काही गंमतशीर कलाटणी घेईल अशी मला काही कल्पना नव्हती पण आता पुरस्कार मिळतोच आहे तर कशाला सोडा म्हणून "अरे त्यात काय विशेष" मुद्रा करून बसलो.
चार वर्ष झाली या घटनेला भक्कम आता बिल्डर झाला आहे आणि पुन्हा एकदा सिनेमा काढायचा विचार करतो आहे. मृदू बाला मात्र अजूनही कामाच्या शोधत आहे. (संपूर्णत: काल्पंनिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users