"सूर निरागस हो"

Submitted by सखा on 15 December, 2015 - 23:14

मित्रहो एखाद्या अवार्ड विनिंग "टीअर जर्कर" (जर्कर ला मराठीत काय म्हणतात? काढ्या की ओढ्या? असो) चित्रपटा प्रमाणे परदेशीभूमी वर घडलेली ही ओरिजिनल सुरस कथा अर्थातच भारतात सुरु होत नाही हे मान्य.
मात्र ज्याने ज्याने ती ऐकली त्याला त्याला ती नुकतीच कुठे तरी पहिली आहे आहे असे का वाटावे? इतकी का ती युनिव्हर्सल आहे? हेच का माझ्या लेखनाचे यश?
"तुमची ही कथा एखाद्या कट्यारीने काळजात घुसावे तशी घुसते" हा जगभरच्या काही प्रेमळ वाचकांचा अभिप्राय वाचून माझ्यातल्या ओरिजिनलच काय पण कुठल्याही लेखकाला आश्चर्य वाटेल.

तर रसिकहो ती कथा अशी:

शिकागोच्या "डॅगर हार्ट पेनीट्रेशन" सोफ्टवेअर कंपनीत आधीच्या भारतीय कंपनीने ग्रीनकार्ड करण्याच्या थापा मारून न केल्याने नाराज झालेला बेताचा बुद्धीचा प्रोग्रामर झंकार चूडामणी इथेच आनंदाने जॉईन झाला होता. चूडामणी हा एकमेव प्रोग्रामर. (प्रोग्रामर - जो कोड लिहितो. टेस्टर- जो प्रोग्रामर चे काम तपासतो. थोडक्यात हे नाते सासू सुने सारखे ज्याला जो अर्थ घ्यायचा त्याने तो घ्यावा ).

चूडामणी तसा आनंदी. प्रोजेक्टचे काम सध्या अजिबातच नव्हते हे देखील त्याच्या आनंदाचे आणखी एक कारण. सध्या काम नसल्याने झंकारचे अंगभूत कला गुण उफाळून न आल्यास नवल . कुणी आजूबाजूला नसल्याने काचेच्या प्रशस्त आणि बंदिस्त सर्व्हर रूम मध्ये चूडामणी तासं तास मनसोक्त गावून घेत असे.
कॉम्पुटरला खुनशी भावना नसतात हे उत्तमच. त्याचा आवाज छान आहे असं त्याला त्याच्या आईच्या मावशींच्या मिस्टरानी लहानपणी सांगितल्याच तो आजही विसरला नव्हता.
रिसेप्शनिस्ट निकोलला (जणू काही किडमनच) मात्र काचेतून एक दाढीवाला फाटका मनुष्य दिवसभर विचित्र हातवारे करताना दिसत असे.
"झक्की इज अ स्ट्रेंज गाय" असं ती एकदा तिची मैत्रीण पेनीला म्हणाली होती त्यावर "या स्ट्रेस मेक्स मेन डू फनी थिंगस" असं पेनी म्हणाली.
योग कसे असतात पहा, काही दिवसापूर्वी झंकारनी आपले वापरलेले शेव्हिंग कीट सुलेखा डॉट कॉम वर विकायला टाकले होते तेव्हा भाव पाडून आलेल्या हजारो देशी बीड्स पैकी एकट्या सूर खानने अजिबात भाव न करता एक डॉलर कॅश मोजून ते विकत घेतले होते.
सूरखानच्या दिलदारी वर फिदा होवून झंकारने सावधपणे त्याची अधिक चौकशी केली तेव्हा तो देखील एक आय टी वाला असल्याचे त्याला कळाले. ज्या प्रमाणे आडवळणावर भेटलेले दोन पांथस्थ सहज तंबाखूची देवाण घेवाण करतात त्या प्रमाणे दोन आय टी चे परदेशस्थ लोक एकमेकांना आपले रीझुमे इमेल करत असावेत.
कारण एकच - न जाणो कधी डाऊन साईजची कट्यार नौकरीच्या काळजात घुसेल? त्यात पुन्हा झंकारच्या तर कंपनीच्या नावातच साक्षात "डॅगर" होती. असो.
अशाच एकदा उनाड दुपारी जेवण झाल्यावर सुस्तीत गाणे गुणगुणताना चुकून आपल्या मित्राचा रेझुमे फोरवर्ड करण्याच्या ऐवजी झंकारने सूर खानचा resume HR ला पाठवून दिला. यथासावकाश परस्पर मुलाखती वगैरे होवून एके दिवशी सूर खान कंपनीत दत्त म्हणून जॉईन झाला. त्याला पाहून झंकार इतका द्न्न दचकला कि त्याचा तो आंतरिक थरकाप सूर ने दिलेल्या कृतन्यता पार्टीत शेवटचा कबाब चापतानाच कमी झाला.
आडून आडून केलेल्या चौकशीत आपल्या नौकरीला काहीही धोका नाहीये कारण हा गृहस्थ मुख्यत्वे टेस्टिंगचे काम करणार आहे म्हणजेच त्याची गायकी वेगळी आहे आणि पगारही जरा कमी आहे हे कळल्यावर झंकारच्या मनावरील दडपण गेले आणि त्याने उरलेली शाही लस्सी एका दमात गडप केली .
लौकरच झंकारला वारंवार गुणगुणताना पाहून सूर खान ला ही हुरूप आला त्यानेही एक दिवस बेछुट गळा काढला बघता बघता त्यांचे एक अधिक एक असे 'बे' सूर मिळाले आणि दोघेही लौकरच दिवसभर मोठ मोठ्यांनी एक मेकांना गाणी म्हणू दाखवू लागले. निर्गुणी भजना पासून ते वक्का वक्का पर्यंत सारे काही.
दोघेही गाण्याच्या बाबतीत ठोंबे असल्याने कुणालाच एकमेकांच्या गाण्याच्या भेसूरते किवा बेसुरते बद्दल काहीच प्रोबलेम नव्हता. उलट दोघेही एकमेकांना अगदी खानदानी गायका प्रमाणे अत्यंत सन्मान्यतेने पेश येत.
आता तुम्हाला मी हे सांगीतले की नाही आठवत नाहीये पण "डॅगर हार्ट पेनीट्रेशन" कंपनी ची स्थापना दिल्लीचा दुर्गेश डागर - आडनावाचे सोयीस्कर अमेरिकीकरण डॅगर, हार्टफोर्डचे जोनाथन हार्ट आणि पिओरियाची पेनी ट्रे. शन; स्पेलिंग shunn ; ट्रे फॉर ट्रेसी आईचे नाव; या तीन द्रष्ट्या लोकानी योगायोगाने शिकागोत एकत्र येवून सुरु केली होती.
पुढच्याच वन ऑन वन मिटिंग मध्ये झंकारने मालक दुर्गेशला सूर खान बद्दल पॉझीटिव्ह फीड बॅक दिला.
दुर्गेश, जोनाथन आणि पेनी ने सूर ला पहिल्याच फीड बॅक मध्ये हे सांगितल्यावर त्याचा गळा भरून आला आणि त्याने सर्व्हर रूम मध्ये येताच "मेरे भाई एक प्रोग्रामर कोही एक टेस्टर की कदर होती है" असे म्हणत चक्क झंकारचा हात चुमला. भारतात हे ठीक होते परंतु काचेतून चोरून पाहणाऱ्या अमेरिकन निकोलला ही कृती कशी समजावणार?
त्या दिवसा पासून ती बिचारी या 'गे'-य कपलला शक्यतो प्रायव्हसी मिळेल याचाच प्रयत्न करू लागली. इतकेच नव्हे तर valentine डे ला दोघांना मिळून एकच कार्ड दिले.
अर्थात पुरेसा कालावधी अमेरिकेत न राहिल्याने झंकार आणि सुरला हा प्रोजेक्ट नसल्याने गरीबीचे दिवस असून हा कॉस्ट सेव्हिंगचा प्रकार वाटला हे बरेच झाले.
सुबक निकोलला आता या दोन पुरुषाकडून काहीच धोका नसल्याने ती त्यांच्याशी खूपच हसून खेळून वागू लागली. झंकार सुट्टीवर असेल तेव्हा सूर बरोबर आणि सूर सुट्टी वर असताना झंकार बरोबर लंचला बिनधास्त जावू लागली. तुमच्यात नेमके कसे असते ह्या प्रश्नाला दोघेजण आपल्या धर्मात कसे असते असा अर्थ घेवून निरागसपणे सविस्तर उत्तरे देवू लागली आणि उत्तरे ऐकून बुचकळ्यात पडलेली निकोल किती सुंदर दिसते असे मनात म्हणू लागले. बघता बघता निकोल आपल्या आपल्या घरी शिरा/शिरखुर्मा करताना आपल्याला कशी दिसेल यांची चविष्ट स्वप्नं झंकार चूडामणी/सूर खानला पडू लागली हे चाणाक्ष वाचकांना विस्ताराने सांगायलाच हवे का? पुढे मागे आत्मचरित्रात ते दिवस मोठे सुखाचे होते असे झंकार आणि सूर लिहिल्या शिवाय राहिले नसते.

मग एक दिवस कुठल्याही उत्कृष्ट कथे प्रमाणे हटके वळण देणारा तो दिवस आलाच.

तत्पूर्वी नाही म्हणायला एक सांगायचे राहिलेच ते असे की गेल्या काही दिवसा पासून सूर आणि झंकार यांची वारंवार भांडणे होऊ लागली. एकमेकांच्या गाण्यातील चुका ते तोंडावर काढू लागले. कारण अर्थात निकोल वरील परस्पर मालकी हक्क.
मुळात आपले या कंपनीतील रोल काय? आपण काय करतो आहोत याचा दोघानाही विसर पडला.
प्रेम आणि गाणे या दोन्ही नशिल्या गोष्टी मुळे ते स्टीव्ही वन्डर आणि ध्रुतराष्ट्रा पेक्षाही ठार आंधळे झाले. एकमेकावर आज काय कुरघोडी करायची या कपटी विचारातच दोघेही सी टी ए च्या रेड लाईनला रागात चढून ब्लू लाईनला थंडीने ब्लू होत उतरू लागले.

(काही दिवसा नंतरचा तो दिवस)

आज कंपनीचा तिसरा वाढदिवस याने के वर्धापन दिन. पाच पंचवीस विविध रंगाचे आणि आकाराचे क्लाएंट कंपनीत आलेले. तितकेच विविध फुगे लटकलेले. मोठा केक आणलेला. कंपनीचे वय कळू नये किवा तत्सम कारणाने म्हणून एक इवलीशी केवीलवाणी गुलाबी मेणबत्ती आणलेली. झंकार आणि सूर यांचा साधारण पणे मेणचट या वर्गीकरणात बसणारा चेहरा आज पेटलेल्या मेणबत्ती पेक्षा देखील उजळून दिसत होता.
आज दोघांनी हि मनोमन ठरवले होते की "हैप्पी बर्थ डे" सॉंग असे काही म्हणायचे की आपले गोरे आणि ब्राउन मालकच नाही तर आपली कोकेशिअन प्रिया देखील इम्प्रेस होईल.
नाही आज दिवसा ऑफिसात काजवे चमकवले तर नावाचे आपण गायक नाही. असा दरबार अशी नजाकत असा माहोल पुन्हा नाही. आपण गात राहावे आणि तिने हसत राहावे. आपण गात राहावे आणि तिने हसत राहावे. आपण गात राहावे आणि तिने हसत राहावे.
(रसिकहो हा दक्षिण सिनेमातील तीन मार इफेक्ट होता जो कि या लेखकाने मराठी लेखनात प्रथमच वापरला आहे.)
झंकार आणि सूर खान या दोघांनी देखील आलटून पालटून बाथरूमला जावून गाणे म्हणून घेतले होते. अर्थात "हैप्पी बर्थ डे" हे समूह गीत असल्याने आपला स्वर लक्षात येण्या साठी बाकी समूह थंड होताच आपण ग्र्यांड फिनालीला अमळ थोडे जास्त गायला हवे हे अजिबात न कळण्या इतके दुध खुळे कुणीच नव्हते.
दुपारचे तीन वाजले कंपनीच्या कॉन्फरन्स रूम मध्ये सारे जमा झाले केक वर मेणबत्ती लावण्यात आली. सारे लोक "हैप्पी" चा "हा" लावणार एव्हढ्यात जोनाथन म्हणाले अरेच्या दुर्गेश कुठे आहे? मालकच नाही म्हटल्यावर सगळे जण स्तब्ध झाले आणि पुन्हा गप्पा मारू लागले आणि मग अचानक दुर्गेश धावत रूम मध्ये आला आणि म्हणाला सॉरी फोक्स जरा अर्जंट काम होते. लेट अस स्टार्ट. निळ्या डोळ्याच्या निकोलने मेणबत्ती लावून सुबक फुंकताच.
सर्वांनी आपल्या परीने उत्तम गाणे गायले. झंकार आणि सूर मनात ठरवल्या प्रमाणे शेवटी "…. टु यु…टु यु…टु यु… " असं बराच वेळ वेगवेगळ्या पद्धतीने म्हणत राहिले. जेव्हा शेवटी एकदाचे दोघे थांबले तेव्हा सर्वांनाच हायसे वाटले. निकोल दोघाकडेही पाहून "ग्रेट इम्प्रोवायझेशन" म्हणाल्याने दोघानाही ती आपल्यालाच म्हणाली असे वाटून खूप खूप बरे वाटले. आता मात्र जीत आपलीच झाली आणि सुरांनी मोहिनी केली. हरलास रे तू मित्रा अशा नजरेनी दोघेही सुंद उपसुंद एकमेका कडे पहात असतानाच दुर्गेश जोरात म्हणाला
"अटेन्शन अटेन्शन.. प्लीज लिसन मला काही फार महत्वाचे बोलायचे आहे"
असे म्हणत त्याने त्याची बोगेटाची शाही ब्रीफकेस उघडली आणि काय विचारता एकदम वीज चमकावी तशी त्यातून एक अत्यंत देखणी आणि दुर्मिळ कट्यार काढली. त्या रत्न जडित कट्यारिची कारागिरी काय वर्णावी महाराजा! हीरे माणके जड़वलेले सोन्याची नक्षी केलेले ते म्यान, जणू काही अलीबाबाच्या गुहेतून आणलेली. मग तो हलकेच निकोल कडे वळून तिला म्हणाला "डियर कम हिअर अँड ओपन इट" सारेच आश्चर्याने पाहू लागले.
इकडे झंकार आणि सूर यांच्या आशा पल्लवित झाल्या. आशा प्रकारच्या दुर्मिळ भेटी गायकाना मिळतात हे त्याना ऐकून माहिती होते. कुठल्या तरी सिनेमातही त्यांनी ते पहिले होते. आपल्या गायनाची अमेरिकेत ही कदर? ती पण सोफ्टवेर कंपनीत?? चक्क कट्यार बक्षीस ती पण निकोलच्या कोमल हस्ते वा मालक असावा तर असा. देशबंधू दुर्गेश कि जय हो! त्यांनी मनोमन दुर्गेशच्या रसिकतेला सलाम केला आणि ग्रीनकार्ड मिळे पर्यंत पगार वाढीचे दुख्ख करायचे नाही असे ठरवले.
निकोलने हळूवारपणे कट्यार म्याना वेगळी केली. झंकार आणि सूर एक एक पावूल पुढे आले. बाकीच्यानि श्वास रोखून धरले. त्या कट्यारीच्या चमकदार पात्यावर काही तरी अक्षरे कोरली होती. दुर्गेश तिला म्हणाला "वाच निकोल". निकोल म्हणाली वाचते. मित्रहो त्या वर लिहिले होते
"निकोल विल यू मॅरी मी?".

पुढचे दृश्य स्लो मोशन मध्ये असे दिसले:
खोली बंद असूनही वारा वाहू लागला. विजयी नरेश दुर्गेश आपले बाहू हवेत पसरून आपल्या गुडघ्या वर बसला होता. निकोल वेड्या सारखे लाजून यस यस यस म्हणत होती. लोक टाळ्या वाजवीत होते. झंकार आणि सूर सिरिअल मधल्या कपटी बायका सारखे डोळे फिरवीत होते. फुगे मस्त डुलत होते. वीजलेल्या मेणबत्ती मधून धूर येत होता. .
(end स्लो मो)
साऱ्यानी शुभेच्छा देवून काही सेटल होताच लाजुन लाल झालेली निकोल आपल्या मनोगतात म्हणाली कि आमच्या ऑफिस चे लव्ह बर्डस झक्की आणि सूर आमच्या लग्नात आमचे बेस्ट मेन असतील. सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. हाऊ स्वीट वगैरे उद्गार आणि आपण वेगळ्याच बर्डोबाचे चे लव्ह आहोत या अदभूत माहितीने आश्चर्यचकित झाल्या मुळे कि काय पण झक्की आणि सूर अप्रतिम आ वासून उभे राहिले. कौतुकाने सांगतो उपस्थित गोऱ्या पेक्षाही जास्त गोरा मोरा त्यांचा चेहरा झाला.
दुर्गेश ने आपला मुर्गेश केला की निकोल ने असा प्रश्न त्यांच्या बुचकळ्यात पडलेल्या मनाला पडला नसेल तरच नवल.
त्या संध्याकाळी दुर्गेश आणि निकोल जेव्हा ऑफिसातून निघाले तेव्हा पडक्या चेहऱ्यांनी पाय ओढीत घरी निघालेल्या झक्की आणि सूर या कपलला त्यांनी आग्रहाने स्टेशन पर्यंत लिफ्ट दिली. ते गाडीत बसल्यावर निकोल म्हणाली डार्लिंग पुट ऑन सम ईंडीअन म्युझिक. दुर्गेश ने सी डी ऑन केली. पिवळ्या धमक क्लासी लोम्बिर्गिनीच्या आत "सूर निरागस हो" हे माझ्या आवडत्या सिनेमातील गाणे दरवळू लागले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर दोस्तानातले जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियांका चोप्रा त्यात्या वेशभूषेत दिसूही लागले.
मजा आली.

Happy

पिवळ्या धमक क्लासी लोम्बिर्गिनीच्या आत "सूर निरागस हो" हे माझ्या आवडत्या सिनेमातील गाणे दरवळू लागले. >> तुम्ही नक्की कोण, झंकार आणि सूर? कारण "हे माझ्या आवडत्या सिनेमातील गाणे दरवळू लागले."

मस्त कथा!
@नरेन : तू सूर खान सारखा टेस्टर दिसतोस? मित्रा तू फुल टू माती खाल्ली आहेस. इट्स narrative स्टोरी!

गप्पांचं पान का केलंय? अ‍ॅडमिन यांना विनंती करून बांध घाला या पानाला. प्रतिसाद लवकरच वाहून जातील.

विरंगुळा , चित्रपट,
कॅलिफॉर्निया ,
इलिनॉय, गुलमोहर - कथा/कादंबरी ,
गुलमोहर - ललितलेखन, गुलमोहर - विनोदी लेखन>>>>>>>

अरे हो, संपादीत करून 'विरंगुळा' कॅलिफॉर्निया' वगैरे काढून टाका!
प्रतिसाद वाहून जातील!

चिमण यांच्या लेखनाची आठवण झाली.>> +१
निखळ हसवणारं लेखन म्हणून त्यांचच लेखन पटकन आठवतं.. हे पण तसंच.

मस्तच!

मला तर दोस्तानातले जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियांका चोप्रा त्यात्या वेशभूषेत दिसूही लागले.
>>>
हा हा अगदी अगदी .. ते पण स्लो मोशन इफेक्ट मध्ये.. अभिषेक एक नंबर