निवले तुफान आता

Submitted by अभय आर्वीकर on 13 December, 2015 - 05:53

निवले तुफान आता

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही

कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही

तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही

घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही

उत्थानना बळीच्या लढले जरी ’अभय’ ते
नियतीसमोर अंती हरले तुफान आता

काळासमोर हतबल झाले तुफ़ान अंती
हळुवारशा हवेने विझले तुफान आता

बेफ़ाम झुंजणारे, निवले तुफान आता
निवले तुफान आता, निवले तुफान आता

- गंगाधर मुटे 'अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेतकरी संघटनेचे प्रणेते आदरणीय शरद जोशी साहेबांचे आज (१२-१२-२०१५) सकाळी 9 वाजता पुणे येथे दुखद निधन....
मा. शरद जोशी साहेबांना विनम्र श्रद्धांजली
मा. शरद जोशी यांचा जीवनपरिचय
अधिक माहिती http://www.sharadjoshi.in/jivanpat

: शोकसंदेश :

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्त झालेले बघितल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, अशी दृढ प्रतिज्ञा करून संपूर्ण देशातील शेतीच्या कर्जमुक्तीची स्वप्न बघणारा एक युगपुरूष आज आपल्यापासून काळाने हिरावून घेतला आहे. देशातले संपूर्ण शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त न होताच शेतकरी संघटनेच्या प्रणेत्याला डोळे मिटून घ्यावे लागले, ही बाब अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

"शेतकरी तितुका एक एक" अशी शिकवण देणार्‍या या शेतकरी नेत्याने शेतकर्‍यांच्या मनात स्वाभिमानाने जगण्याचे बीजारोपण केले. ताठ मानेने व मूठ आवळून जगायचा मूलमंत्र दिला आणि शेतकर्‍यांच्या मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करून त्याग करायलाही शिकवले. देशातील इतर नागरिकांसारखे सन्मानाने व सुखाने जगता यावे म्हणून रस्त्यावर उतरून लढण्याची प्रेरणा दिली. शेतकर्‍यांच्या मनातील राजसत्तेची व तुरुंगाची भीती घालवली. त्याचबरोबर प्रचलित अर्थवादाला कलाटणी देऊन शेतीच्या अर्थवादाच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यात शरद जोशी शतप्रतिशत यशस्वी झालेले आहेत. महामानव, महात्मा किंवा युगपुरुष ही विशेषणेही थिटी पडावीत, एवढे त्यांचे कार्य महान आणि विचार उत्तुंग आहेत. शरद जोशी यांनी “शेतकर्‍यांचा सूर्य” बनून पिढ्यानपिढ्या दारिद्र्याच्या अंधार्‍या खाईत चाचपडणार्‍या शेतकर्‍यांचा मुक्तीचा मार्ग प्रकाशमय करून ठेवला आहे. या प्रकाशवाटेवर वाटचाल करून त्यांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी आता शेतकर्‍यांनी कटीबद्ध झाले पाहिजे. हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

अंत्यसंस्कार : दिनांक १५/१२/२०१५ मंगळवारला त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या अंतिम इच्छेचा सन्मान राखून पुणे येथेच “वैकुठ” मध्ये त्यांची प्दिवंगत पत्नी आणि दिवंगत आईच्या स्थळाशेजारीच अंतिम संस्कार करण्यात येतील आणि त्याच दिवशी दर्शनासाठी ठेवला जाईल. दर्शनाचे स्थळ नक्की झाल्याबरोबर कळवण्यात येईल.

तरी पाईकांनी मंगळवारी सकाळपर्यंत पुण्याला पोचावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

- गंगाधर मुटे
महासचिव, स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र प्रदेश
जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, वर्धा

मुटे, तुमच्याकडून एका दीर्घ लेखाची अपेक्षा आहे. तुम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या शेतकरी समाजाच्या दृष्टीकोनातून त्यांना दिसलेल्या शरद जोशी या नेत्याबद्दल.

प्रतिसादाबद्द्ल सर्वांना धन्यवाद.

वरदा, सध्या तरी काही लिहिणे झाले नाही. त्यांच्या जन्मदिवशी ३/९/१५ ला लिहिलेला लेख लवकरच टाकतो.

नेमके वर्णन केलंत मुटेजी .... 'अंगारमळा' वाचतो आहे - त्यातून जोशीसाहेबांचे व्यक्तिमत्व उलगडते आहे....

शरदराव जोशींना आदरांजलि ..... __/\___

<<मुटे, तुमच्याकडून एका दीर्घ लेखाची अपेक्षा आहे. >>
---- सहमत.... लेखाच्या प्रतिक्षेत.

एक झुन्जार नेतृत्व हरपले... Sad गन्गाधरजी तुमची आणि तुमच्या सहकार्‍यान्ची जबाबदारी आता अजुनच वाढली आहे हे जाणतो...