वावराकडं चाल,...

Submitted by vishal maske on 27 June, 2015 - 03:48

~!!! वावराकडं चाल !!!~

फाटक्या-तुटक्या संसाराची,तुच गड्या ढाल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...
हर्ष दाटला मनात-थेंब पडल्यातं रानात
काल भरलीया टिफणं-आज पेरूया रं रानं
पेरणीसाठी आज गड्या,होऊया बेताल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...
आज वावरातं कसंन-बीज आणंल उसणं
तुझ्या शेणाचं रे खात-देई मला साथं
आरं पिकु लागेल तुझ्यामुळं-शेतामधी रं माल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...
पेंडी-पेंडीचा हिसाब-आज दाण्यात भरला
अन् सुखा हा घास-आज वावरातं पेरला
लेकरा-बाळांचे रं माझ्या,नको करू हाल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...
कर्ज डोई घेऊनिया-बिंधास्त होऊनिया
आज पेरीतो हे रानं-तुझं गाऊनिया गाणं
माझ्या विघ्नहर्त्या-माझ्या जीवाचा तु लाल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...
जरी आली महागाई-पर तुझी साथ हाई
हा तुझा रे जिव्हाळा-धीर देतो या जीवाला
आरं तुझ्याविना राजा,मी झालोया कंगाल
वावराकडं चाल आता वावराकडं चाल,...
ऊन्हा-पावसात राजा-राब-राब राबलास
तुझा राखीनं मी मानं-नको ढाळूस अवसानं
खोल-खोल गेले राजा,तुझे दोन्ही गाल
वावराकडं चाल आता,वावराकडं चाल,...

विशाल मस्के,
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.9730573783

सदरील कविता ऑडीओ स्वरूपात मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर : 9730573783

कविता आवडल्यास जरूर शेअर करा,परंतु कवितेखालुन नाव न काढता,...

Group content visibility: 
Public - accessible to all site users