शिंदळ

Submitted by जव्हेरगंज on 16 September, 2015 - 09:31

यल्लमाच्या पायऱ्यावर सुनी संध्याकाळपर्यंत बसुन होती.
दिवसभर देवळात भक्तांची रेलचेल होती.
त्यांनी देवीपुढं ठेवलेले पुरणपोळी, शिकरण, नैवैद्य तिनं एका आडबाजुला साठवले होते.
आज दिवसभरं ती तेच खात होती.
अंधारायला आल्यावर सगळा प्रसाद फडक्यात बांधुन घराकडे चालु लागली.

यलम्माच देऊळ अगदीच लहान, एकाच खोलीचं.
पण इथे गुरव नव्हता म्हणुन सुनीनं बस्तानं बसवलेलं.
गुरवं सगळी तिकडे मोठ्या देवळाकडं, तिकडं ती कधीच जायची नाही.
नैवैद्य चोरणाऱ्या गावातल्या पोराठोरांना गुरवं हुसकावुन लावायची.
पण या 'मोठया' देवळाकडं जाणारा प्रत्येक भक्त यल्लम्माकडं यायचाच, एखादातरी नैवैद्य आणि थोडीफार चिल्लर देवीला ओवाळायचा.
देवीची ही ओवाळणी लुटायला गावातली पोरठोरं टपुन बसलेली असायची.
त्यातलीच एक सुनी, या लुटापुटीच्या खेळात सराईत झालेली.
सुनी असेल दहा-बारा वर्षांची, काळीभोर, चुणचुणीत.
तिच्याचसारख्या लहानग्या चोरांशी मात्र जोरदार भांडायची.
ते लहानगे चोर पण काही कमी नव्हते, गटागटाने येऊन तिचे आडबाजुला ठेवलेले नैवैद्य चोरून पराक्रम गाजवायचे.
खरतरं सुनीला हा खेळ मनापासुन आवडायचा.
घनघोर लढाया व्हायच्या, आक्रमणांचे नवे डावपेच आखले जायचे, तटबंद्या ऊधळुन दिल्या जायच्या, ईवल्यांचे युद्धच जणु. रोजचेच.
पण सुनी सगळ्यांना पुरून उरायची.
ती अजुन तरी अपराजित होती, यल्लम्मावरची तिची अलिखित सत्ता बिनघोर बजावत होती.

नैवैद्याचं फडकं घेऊन सुनी घरी आली.
आई कधीच अंथरूणाला खिळलेली, बाप अस्सल दारूडा, पिटुकला भाऊ मात्र तिच्या मागे मागे करायचा.
वनी, तिची मोठी बहीन वनिता, मुंबईला लग्न होऊन गेलेली. झोपडपट्टीत.
कधीमधी यायची, मुंबईच्या मोठमोठ्ठाल्या बाता सांगायची.
पण तिच्या एकंदर दशेवरुन सुनीला मुंबई कधीच आवडली नाही.
नकळत्या वयापासुन तिला यल्लम्माआईच जवळची वाटत आलेली.
दिवसभराच्या धावपळीने सुनी कंटाळली होती.
पिटुकल्या भावापाशी जाऊन सताड उघड्या डोळ्यांनी झोपली.
आधी ती देवळातच झोपायची, पण वासनांध टग्यांच्या भिरभिरत्या नजरांना घाबरून ती रात्रीचं घरीच यायला लागली.

सकाळ झाली. सुनी गावविहीरी कडं आंघोळीला निघाली.
पोहण्यात तिला अपरिणीत आनंद भेटायचा.
सकाळचा हा क्षण खास तिच्या आवडीचा.
बायका दंडावर धुणं धुत असताना हि मात्र कठड्यावरून मोठमोठाल्या खुपश्या टाकायची.
बायका नाकं मुरडायच्या, पोरीच्या जातीला हे बरं दिसत नाही म्हणायच्या.
तशी ती गावभवानीच होती, बायका तिला तुसड्यावानी वागवायच्या.
एखादी डांबरट बाई तिच्या झिपऱ्या धरून घरापर्यंत जायची. सुनी तेव्हा अगदीच बापुडी वाटायची.
या सगळ्याला ती आता सरावली होती.
आपली अवखळ नजर बायकांवर फेकुन रोजचा पोहण्याचा कार्यक्रम चालु ठेवायची.

मनसोक्त डुंबल्यावर सुनी पुन्हा घराकडं निघाली.
आईनं केलेलं चहा-पाव खाऊन तिला यल्लम्माकडं धावायचं होतं.
पण घरी वेगळीच गडबड चालु होती.
सुनीला उजवण्यासाठी गावातला बामन आला होता. मुंबईचा वनीचा नवराही हजर होता.
नात्यागोत्यातल्या चार टाळक्यांच्या साक्षीनं सुनी सौभाग्याच्या पवित्र बंधनात अडकली.
वनीचा उष्टा नवरा तिचा जन्मोजन्मीचा साथीदार झाला.
कोवळ्या वयातली सुनी आता 'बायली' झाली होती.
थोरामोठ्यांचा आशिर्वाद घेऊन ती जोडीनं मुंबईला निघाली.

यल्लम्माच्या देऊळापाशी येताच तिची पाऊले थबकली.
भक्तिभावाने हात जोडत जराशी गहिवरली, जडभरल्या डोळ्यांनी अश्रुंची फुले वाहली.
गावकऱ्यांनी वाऱ्यावर सोडलेली ही 'शिंदळ' आज यल्लम्माला पोरकं करून चालली होती.
यल्लम्माचं देऊळ तिच्याकडं बघत विषण्ण हसलं.

ते लहानगे चोर कुतुहलाने तिच्याकडे पहात होते.
आत्ता यल्लम्मावर त्यांची अनिर्बंध सत्ता असणार होती. म्होरक्याच्या निवडीसाठी नवनव्या आघाड्या, डावपेच, कुटनीती ठरल्या जाणार होत्या.
हा खेळ अनादिकाळापर्यंत असाच खेळला जाणार होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह!