सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

Submitted by मार्गी on 16 November, 2015 - 07:02

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

२. पहिलं शतक

सायकलीवर पहिलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शतकासाठी जास्त वेळ थांबावं लागलं. सुरुवातीच्या राईडसनंतर काही आठवडे कामानिमित्त प्रवास करावा लागला. त्यामुळे एक महिना सायकलिंगमध्ये गॅप पडली. जुलैनंतर एकदम सप्टेंबरमध्येच सायकल चालवण्याची संधी मिळाली. इतके दिवस सायकल चालवण्याबद्दल दिवास्वप्न बघत होतो. आता खरोखर तसं चालवता येतं का, हे बघेन.

पेट्रोलचे भाव हिमालयाच्या उंचीपर्यंत गेले आहेत. अशा वेळेस सायकल अगदी सशक्त पर्याय आहे. सायकल अनेक अर्थांनी उपयोगी आहे. पहिली गोष्ट म्हणजे इंधनाच्या खर्चाची बचत. शिवाय तो चांगला व्यायामही आहे. तसंच आपल्या जीवनात सर्व काही ठरवणा-या तथा कथित आधुनिक जीवनशैलीच्या अनियंत्रित वेगाला नियंत्रणात आणण्यासाठी सायकल उत्तम आहे. गंतव्यापेक्षा प्रवासामध्ये जास्त मजा अनुभवता येते. असं असेल तर मग का नेहमीच छोट्या- मोठ्या फायद्याच्या मागे भेडचाल प्रमाणे पळायचं? चला, एक सायकल घेऊ आणि निघूया.

२ सप्टेंबर २०१३. दुपारी अचानक सायकल घेऊन निघावसं वाटलं आणि निघालो. परभणीमध्ये घरातून निघालो व वसमत रोडवर सायकल सुरू केली. इथून वसमत ४४ किलोमीटर दूर आहे. निघालो तेव्हा दुपारचा एक वाजतोय. जितकं जमेल तितकं जाईन. खूप दिवसांच्या गॅपनंतर चालवत असूनही काही त्रास झाला नाही. दिड तासांमध्ये २० किलोमीटर पूर्ण झाले आणि वसमत फक्त २४ किलोमीटर राहिलं. तेव्हा विचार केला, की अजून थोडं पुढे जातो. असं करत करत वसमतपर्यंत पोहचलो! पूर्वी वसमत वसुमती नगरी म्हणून ओळखलं जायचं. पोहचल्यावर भरपेट नाश्ता केला. साडेतीन तास लागले पोहचायला.

आपली विचार पद्धती अत्यंत स्थितीशील आहे. आपण कितीही म्हणत असलो की, आता सर्व बदललं आहे, तरी वास्तवात काहीच बदललेलं नाही, असं दिसतं. सगळं तसंच आहे. रस्त्यावर सायकल- तीसुद्धा गेअरची सायकल बघितली की मुलं ओरडतात, 'ते पाहा, गेअरवाली सायकल!' काही मुलं तर सायकल घेऊन चक्कर मारतात. शहरापासून जितकं दूर जावं, तितकं लोकांचं आश्चर्य वाढतं. त्यांना ते वेगळंच वाटतं. इतकं दूर (अर्थात् अंतर फक्त वीस- पंचवीस किलोमीटर असतं) सायकलीवर? आणि मग त्यांच्या कुतुहलाला तेच उत्तर देतात- नक्कीच गेअरची असल्यामुळे ही एकदम पळत असणार. काही लोक तर नवीन वस्तु बघून जास्तच उत्साहित होतात. एका ग्रामस्थाने तर म्हंटलं, ही तर मोटरसायकलवानी पळती ना? नवीन वस्तु बघून अशी प्रतिक्रिया! कदाचित सर्व निराशा, सर्व ताण- तणाव ते अशा वस्तुद्वारे अप्रत्यक्ष व्यक्त करत असावेत. जी गोष्ट त्यांना आधार देईल, अशा कशाची तरी त्यांना खूप तीव्र ओढ असावी. त्यामुळेच ते साध्या पण नवीन वस्तुला बघून असा विचार करत असावेत. ह्यामध्ये त्यांची प्रतिक्रिया सायकलीपेक्षा त्यांच्या विचारांबद्दलच अधिक भाष्य करते. असो.

आता परत निघेन. साडेपाच वाजले आहेत. कमीत कमी सव्वासातपर्यंत प्रकाश राहील. पण त्यानंतर तास- दिड तास अंधारात जावं लागेल. आणि माझ्यासोबत एका मोबाईलच्या छोट्या फ्लॅश लाईटशिवाय प्रकाश नाहीय! बघूया. निघताना सूर्यास्ताची वेळ जवळ येते आहे. संध्याकाळचा लाल- पिवळ्या रंगाचा नजारा आणि रस्त्यात लागणारी हिरवीगार झाडं! असा अनुभव सांगता येत नाही, तो प्रत्यक्ष घ्यावा लागतो. एखाद्या फूलपाखराचा स्पर्श, जवळच्या शेतामधल्या झाडांची सळसळ, गावातल्या लोकांचे चेहरे; सतत विचारपूस करणारी शाळेतली मुलं. . . असे अनेक अविस्मरणीय अनुभव. येताना एका हॉटेलात चहा घेतला होता. आत्ताही तिथे चहा घेतला. त्या ताईंनी विझवलेली चूल परत पेटवली. थोड्या गप्पा झाल्या. अशा प्रवासात कुठेही न भेटणा-या लोकांसोबत भेट होते. .

ह्या प्रवासातला कठिण टप्पा सव्वा सातनंतर सुरू झाला. घर अजूनही २५ किलोमीटर दूर आहे आणि पूर्ण अंधार झाला आहे. एका छोट्या फ्लॅश लाईटच्या प्रकाशात जातोय. अर्थात् रस्त्यावर वाहतूक अधून- मधून सुरूच आहे. त्या वाहनांचा प्रकाश आहेच. आणि सूर्य मावळल्यापासून समोर शुक्र तळपतोय. त्याने दिड तास सोबत दिली. त्याच्याशिवाय ज्येष्ठा, अनुराधा, धनु आणि मूळ तारकासमूहसुद्धा नॉन स्ट्राईकर एंडवरून सोबतीला आहेत. मध्ये मध्ये लागणा-या गावांमध्ये दोन मिनिट थांबून प्रवास सुरू ठेवला. शेवटचे दहा किलोमीटर प्रचंड त्रासदायक गेले. घरी पोहचेपर्यंत नऊ वाजले. अर्थात् एकूण आठ तास सायकल चालवली. एक तास वसमतमध्ये थांबलो होतो. म्हणजे सात तासांमध्ये ८८ किलोमीटर. नवशिक्या सायकलिस्टसाठी प्रोत्साहन देणारी राईड!

आता शतकाची इच्छा आहे. पण थोडं थांबावं लागेल. दोन दिवस पाय जड झाले. त्या वेळेत बाकीची कामं उरकली. ५ सप्टेंबर २०१३ ला मोठ्या राईडसाठी जिंतूरजवळच्या येलदरी धरण व नेमगिरीची योजना आखली. एकूण राईड १२१ किलोमीटरची होईल. त्यासाठी सकाळी साडेपाचला बाहेर पडलो. सकाळी शरीर कडक असलं तरी एका तासात चौदा किलोमीटर पार झाले. पुढेही अडचण न येता नऊ वाजता ४४ किलोमीटरवरच्या जिंतूरला पोहचलो. इथे मोठा नाश्ता केला. थोडा वेळ थांबून पुढे निघालो.

जिंतूरनंतर आसमंत बदलला. गावातली गर्दी संपल्यानंतर चढ सुरू झाला. मध्ये मध्ये काही शैक्षणिक संस्था आणि प्रवाशांनी गच्च भरलेले रिक्षा! काही सायकलवर जाणारी मुलं भेटली. आता रस्ता खूप खराब झाला. अनेक ठिकाणी तुटलेला आहे. रस्त्यावर एक वाट डावीकडे वळाली- ती नेमगिरीला जाते. परत येताना मी तिकडे जाईन. शाळेत जाणा-या एका मुलाने जवळ सायकल आणली व गप्पा सुरू झाल्या. तो दहावीत आहे, पण दिसतो सहावीतला. आता चढ अवघड वाटतोय. लोअर गेअर्सवर चालवण्याचा प्रयत्न केला. पण पुढे पायी पायीच चालावं लागलं. आता अकरा वाजले आहेत. ऊन कडक आहे. चढ संपला की परत सायकल सुरू केली. पण थोड्या वेळात परत चढ आणि मग परत पायी पायी. दोनदा असंच झालं. एका पॉइंटनंतर सरळ उतार मिळाला. इथे रस्ताही चांगला आहे. म्हणून सायकल जोरदार पळवली. परत थोडा चढ आला. असं करत करत येलदरीला पोहचलो. जिंतूरपासून अंतर फक्त १४ किलोमीटर असूनही दीड तास लागला.

येलदरी कँप गाव धरणाजवळच आहे. पूर्णा नदीवरच्या ह्या धरणात छान पाणी आहे. गेटवर सरकारी लोकांनी फोटो घेण्यास मनाई केली. तरीपण फोटो घेतले. लगेच परत फिरलो. आज पोळा असल्यामुळे अनेक सजवलेले बैल दिसत आहेत. परिसर अगदी मस्त आहे. मध्ये मध्ये फुलांची शेती. परत चढ- उतार करत नेमगिरीकडे जाणा-या रस्त्याला लागलो. हा रस्ताही कच्चाच आहे! इथे आणखीन मोठा चढ मिळाला. कशीबशी सायकल चालवतोय. शेवटचा एक किलोमीटर तर पायी पायी जावं लागलं. इथे थोडा वेळ थांबून दर्शन घेतलं. हे श्री दिगम्बर जैन अतिशय क्षेत्र आहे. इथे शांतीनाथ, पार्श्वनाथ, नेमिनाथ, आदिनाथ, महावीर आदिंचे पुतळे गुहेत आहेत. जेव्हा रस्ते नव्हते, तेव्हा ही जागा नक्कीच दुर्गम असणार. इथे छोटे डोंगर आहेत. जवळच चंद्रगिरी नावाची एक गुहा आहे. आधी बघितली असल्यामुळे आणि मुख्य भाग सायकलिंग असल्यामुळे तिथे गेलो नाही आणि लगेच निघालो.

परतताना जिंतूरपर्यंत उतार आहे. जिंतूरमध्ये मोठा नाश्ता केला. सायकलिंग करताना जेवणाच्या ऐवजी थोड्या थोड्या वेळाने नाश्ताच करतो. पुढेही किंचित उतार होता, त्यामुळे पन्नासम् इनिटात पंधरा किलोमीटर गेलो. त्यानंतर एका गावात परत चहा- बिस्किटांचा छोटा ब्रेक घेतला व निघालो. दुपारचं कडक ऊन असल्यामुळे सारखं थांबावं लागत आहे. त्यानंतर चढ नसूनही जास्त थांबावं लागलं. शेवटचे वीस किलोमीटर खूप अवघड गेले. सगळी ताकत लावावी लागली. पण तोपर्यंत शतक पूर्ण झालं आहे! परभणीत घरी पोहचेपर्यंत संध्याकाळाचे साडेसहा वाजले आहेत. . . दिवसभरात एकूण १२१ किलोमीटर सायकल चालवली. शतक करण्याची मजा पुरेपूर लुटली! खंत एकच की, हे शतक सिक्स मारून पूर्ण करता आलं नाही, किंबहुना सर्व रन्स सिंगल्सनेच झाले!

प्रवासात असं जाणवलं की, सायकलिंग शरीराचं काम तर होतंच, पण मनाचंही होतं. शरीराइतकाच मनाचाही सहभाग त्यात होता. आणि मन तर चंचल असतं. ते अस्वस्थ होत असतं. त्यासाठी त्याला काही उद्योग हवा. म्हणून सोबत गाणी ठेवली होती. गाण्यांमुळे प्रवासाची रंगत अजून वाढली. लक्ष्य आणि स्वदेसची गाणी. जेव्हा शरीर थकतं, गती कमी होते, चालवणं अवघड जातं, तेव्हा हा शरीरापेक्षाही जास्त माइंड गेम बनतो. कारण मनाचीही सोबत तितकीच हवी. म्हणून तर त्याला बिझी ठेवावं लागतं.

. . . संध्याकाळी खूप जास्त थकल्यासारखं वाटलं. तीन दिवसांपूर्वी ८८ किलोमीटर चालवले असले तरी आज थकवा वाटला. कडक ऊन आणि चढ असलेल्या रस्त्यामुळे जास्त ऊर्जा खर्च झाली. नाही तर कदाचित त्याच वेळेत जास्त अंतर जाऊ शकलो असतो. आता आणखी पुढे जायचं आहे. पण त्याआधी शरीराला अशा राईडची सवय करण्यासाठी वेळ द्यावा लागेल.

तीन दिवसांपूर्वी ८८ किलोमीटर प्रवास केल्यामुळे शरीरासोबत मनाचीही तयारी झाली होती. ८८ किलोमीटर केल्यामुळे शतकाविषयी मनात काहीच संशय राहिला नाही. आता तसंच दिडशे किलोमीटरबद्दल वाटत आहे. त्यात अवघड काहीच नाही. हा तर सृष्टीचा नियमच आहे की, आपण एका वेळी एकच काम करू शकतो. म्हणून जर आपण दहा कामं थोडे दूर ठेवून एकाच कामावर लक्ष दिलं, तर ते होणारच. मल्टी टास्किंगच्या युगामध्ये एक अडचण ही आहे की, आपली एकाग्रता कमी होत आहे. म्हणतात ना, ९९ गोष्टींवरून लक्ष विचलित केलं तर ते आपोआप एका गोष्टीवर केंद्रित होतं. त्यात विशेष काहीच नाही. गरज फक्त ९९ गोष्टींपासून डिस्कनेक्ट करण्याची असते. तेरा तास एकच गोष्ट केली. अर्थात् ऑफिसचं काम, घरातलं काम, स्वयंपाक, अन्य रूटीन इत्यादी एक तर आधी केलं किंवा नंतर केलं. बाकी काही नाही.

एक व्हिडिओ: सायकलीसंगे युंही चला चल राही


परभणी- जिंतूर- येलदरी


अनुभवी सायकलस्वारांसाठी सहज; पण नवख्यांना 'अवघड' चढ!

प्रवास अजून सुरू आहे. . मुक्कामाचं ठिकाण आलेलं नाहीय. .

पुढील भाग: सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

हा लेख हिंदीमध्ये वाचण्यासाठी आणि इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन आणि फोटो... छान वाटले वाचताना. Happy
ही वाक्ये महत्वाची.... मूलभुत गरजांचे विचार
>>>> जी गोष्ट त्यांना आधार देईल, अशा कशाची तरी त्यांना खूप तीव्र ओढ असावी <<<<<
>>>> गरज फक्त ९९ गोष्टींपासून डिस्कनेक्ट करण्याची असते. <<<<

मस्तच ! येऊदेत अजून !

तुमचा स्व संवाद नेहमीच आवडतो.

लाँग राईड्सला मी अनेक गोष्टी व्हिज्वलाईज करत असतो. त्यामुळे मन ताळ्यात राहते. उदा खंबाटकी चढायचा असला तर मागे आपण, मुठा, लवासा सहज चढला, असे किंवा परत येताना मुठा असेल तर जातानाच तर चढला की. असे

ते (जी) सोडा बॉ. काल नांदेड पुणे येताना परभनीहून इकडे आलो, सकाळची वेळ होती. म्हणलं तुम्ही दिसाल सायकलीवर तर हॅलो म्हणू. Happy

वाचायला मजा येते.

चालवणं अवघड जातं, तेव्हा हा शरीरापेक्षाही जास्त माइंड गेम बनतो.>>> +१

केदार, भारीच की.... Happy मी तिथे १९७०-१९७२ दरम्यान होतो. Happy
बालपणीच्या अनेक "रम्य" आठवणी नांदेडच्याच. त्यावर आख्खा एक लेख होईल. Happy
आम्हि वजिराबादमधिल डालमिलजवळीस देवगिरीकरांच्या (का देगलुरकर? तपासले पाहिजे) वाड्यात रहायचो.
रेल्वे स्टेशन पलिकडिल पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत जायचो. तेव्हा आम्हाला एक केडी जोशी नावाचे सर होते. खूप छान शिकवायचे तसेच मातीविना शेती या प्रकल्पात आम्ही एकत्र काम करायचो.
फार थोडे पण अतिशय छान दिवस होते ते.. Happy

वाचनाबद्दल व प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!

@ लिंबूटिंबू जी आणि केदार- माझंही लहानपण थोडं नांदेडला गेलं आहे. भाग्यनगर, वर्कशॉप कॉर्नर ह्या भागांशी परिचित. Happy केदार, मलाही तुम्हांला भेटायचं आहे. एखाद्या राईडलाच भेटूया. Happy

ही मालिका वाचायला आजच सुरूवात केली. अनुदिनी लिहिल्यासारखी तुमची शैली आवडली. अजून बरेच भाग वाचायचे असल्यानं रोजच्या लंचब्रेअकची उत्तम सोय झाली Happy