दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं !

Submitted by रसप on 16 November, 2015 - 01:19

तलत आणि किशोर मला प्रचंड जवळचे वाटतात. रफी, मन्नाही खूप आवडतात, पण अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचं तर जेव्हा मी स्वत:ला पडद्यावर इमॅजिन करतो तेव्हा मला तलत किंवा किशोर हेच माझे आवाज वाटतात. हे बोलणं आगाऊ आहे, पण खरं तेच.
किशोरशी माझी ओळख खूपच पूर्वीपासूनची. 'ओडलाई युडलाई' करत तो मला भेटला. नंतर त्याच्या गायकीतला ठहराव मला अनेकदा स्तिमित करत राहिला आणि आजही तो अधूनमधून नव्याने भेटत राहतो 'चेएची जा रे आमी..' सारख्या गाण्यांतून. तर तलतशी ओळख मात्र गेल्या काही वर्षांतलीच. तलतचं पहिलं ऐकलेलं गाणं होतं 'जिंदगी देनेवाले सुन..' आणि मग इतरही काही. पण ज्या गाण्याने अगदी आतपासून हलवलं ते 'फिर वोही शाम..' कॉलेजच्या दिवसांत पुरेसे पैसे साठले की एचएमव्हीच्या रिवायवल सिरिजमधल्या कॅसेट्स मी जेव्हा चर्चगेटच्या 'ग्रूव्ह'मध्ये जाऊन रँडम सिलेक्शन करुन घेऊन यायचो, तेव्हा एका कॅसेटमध्ये हे गाणं होतं. तो हळवा कापरा आवाज व्याकुळ करुन गेला. पहिल्यांदा ऐकताना हे तालाशी खेळणारं गाणं मला गायला जमणं तर सोडाच, गुणगुणायलाही जमेल असं अजिबात वाटलं नव्हतं. पोर्शेच्या शोरुममधली चकाचक लाल रंगाची जबरांडुस कार आपण रस्त्यावरुनच डोळे भरुन पाहून घ्यावी, तसं मी हे गाणं निरपेक्ष हव्यासाने ऐकत असे. (निरपेक्ष हव्यास - ही कन्सेप्ट मी एक्स्प्लेन करु शकणार नाही.) मला हे गाणं ऐकताना एका पसंगावर पाय खाली सोडून शांत बसलेला मीच दिसत असे आणि मी ते संपूर्ण गाणं त्याच पोझिशनमध्ये, मानही न हलवता गातोय असं वाटे. (शेकडो वेळा ऐकल्यावर आता कुठे गुणगुणण्याचा कॉन्फिडन्स आलाय.)
तलत ह्या गाण्यातून मला कडकडून भेटला, भेटायला लागला. मग त्याची सगळीच गाणी अशीच अतिशय संयतपणे आपली आर्तता मांडणारी वाटायला लागली. नव्हे. ती आहेतच तशी. कुठलाही आक्रोश, आक्रस्ताळेपणा, चडफडाट करणं त्या आवाजाच्या स्वभावातच नव्हतं. त्यात होती ती फक्त एक प्रकारची स्थितप्रज्ञता. त्या व्याकूळतेतही एक आत्मभान होतं. त्या उत्कटतेतही एक संयम होता.

एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे साहिर आणि राजेन्द्र क्रिशन अनेक गाण्यांद्वारे मला झपाटत होते. हे गाणं राजेन्द्र क्रिशनचं.

जाने अब तुझसे मुलाक़ात कभी हो के न हो
जो अधूरी रही वो बात कभी हो के न हो
मेरी मंज़िल तेरी मंज़िल से बिछड़ आयी हैं

हे असं कुणी लिहावं आजच्या जगात? कुणातच ही सफाई आणि साधेपणा राहिलेला नाही. जो उठतो तो गुलज़ार बनायला पाहतोय आणि बस्स मोकाट सुटतोय. पण असे शब्द उतरायला प्रतिभेवरही एक संस्कार असायला हवा तो क्वचितच जाणवतो. साधेपणा आणि शिस्तीचा संस्कार. स्वत:च स्वत:वर केलेला. ह्या शिस्तबद्ध साधेपणामुळेच लिहिलं जातं की -

फिर वोही शाम, वोही ग़म, वोही तनहाई हैं
दिल को समझाने तेरी याद चली आयी हैं

इथल्या 'फिर' ला किती महत्व आहे, हे त्या शब्दावर रेंगाळल्यावर समजेल.
ही कहाणी आजची नाही. रोजची आहे, कित्येक दिवसांपासूनची आहे. रोज असंच सगळं अंगावर येतं आणि रोज तुझी आठवण दिलासा द्यायला येते ! इथे तलतच्या 'फिर वोही' म्हणण्यामध्ये एक हळवी तक्रार आहे. तो हे 'फिर वोही' एक प्रकारच्या उद्गारवाचक सुरात म्हणतो. दोन शब्दांत हे तक्रारयुक्त आर्जव तलत करतोय. हे दोन शब्द जर जसेच्या तसे जमले नाहीत, तर बाकीचं गाणं गाऊच नये. कारण सगळी 'जान' इथे आहे.

फिर तसव्वुर तेरे पहलू में बिठा जाएगा
फिर गया वक़्त घड़ीभर को पलट आएगा
दिल बहल जाएगा आखिर को तो सौदाई हैं

आता परत एकदा माझ्मा भावविश्व तुझ्या जवळ येऊन बसेल अन् जुन्या दिवसांना उजाळा मिळेल आणि ह्या सगळ्या स्वप्नरंजनातच भोळसट मन खूष होईल !
- हे सगळं फक्त कथन आहे. पण त्यातलं जे चित्रण आहे ते पुन्हा एकदा एक तटस्थ, आर्जवी तक्रार करतंय. ही व्यथा जितक्या साधेपणाने एक कवी मांडतोय, तितक्याच साधेपणाने एक गायक गातोय आणि दोघांमधला पूल आहे अजून एक अफलातून माणूस. 'मदन मोहन'. हा तर सगळ्यांचा बाप होता, बाप.

मदन मोहनला 'गझल किंग' म्हटलं जातं. हे गाणं 'गझल' नाही. मात्र त्याचा बाज तसाच आहे. स्वत: मदन मोहन किती आर्त आवाजाचा धनी होता, हे जाणण्यासाठी यूट्यूबवर त्याच्या आवाजातलं 'नैना बरसे रिमझिम रिमझिम..' ऐका किंवा 'दस्तक' चित्रपटातलं 'माई री, मैं कासे कहूँ..' ऐका.
मदन मोहनची गाणी ऐकताना मी त्या त्या गाण्याच्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. हार्मोनियम घेऊन बसलेला मदन मोहन, अधूनमधून सिगरेटचे झुरके मारत लता बाई, तलत, रफी ह्यांना गाण्याची चाल सांगतोय. मग त्यावर बहुतेक काम ते लोक स्वत:चं स्वत: करत असतील. ते लोक गात असताना मध्येच एखादी जागा 'अंहं.. यह सुनो..' म्हणून तो स्वत: गाऊन दाखवत असेल. मग एक 'वाहवा' ची देवाणघेवाण ! सोबत राजेंद्र क्रिशनसुद्धा असेल. तो सांगत असेल, 'अमुक शब्दाचा, अक्षराचा उच्चार असा असा हवा'. हे गाणंही मदन मोहनने आधी स्वत: गायलं असेल.. 'फिर वोही शाम..' हात वरुन खाली गोलाकार आणत. सगळंच अफाट. इथे माझा 'तसव्वुर' त्यांच्या 'पहलू'त जाऊन बसतो आणि 'दिल बहल जाता हैं आखिर को तो सौदाई हैं' !

यथावकाश जसजसं हे गाणं खूप भिनलं तसतसा मी ते गुणगुणायला लागलो आणि एक दिवस एका लाईव्ह कार्यक्रमात एका गायकाने हे गाणं सादर करताना सांगितलं की, 'हे तलतचं शेवटचं गाणं होतं. 'जहाँ आरा' नंतर, 'फिर वोही शाम..' नंतर तलत कुठल्याच सिनेमासाठी गायलाच नाही !'
शिखरावर पोहोचून निवृत्ती घेणं, आजपर्यंत सचिनपासून लता बाईंपर्यंत कुणाला जमलेलं नाही. प्रत्येकाने घसरगुंडी झाल्यावरच विश्राम घेतलाय. एक तलतच जो जितक्या शांतपणे काळीज चिरणारी व्यथा गायचा, तितक्याच शांतपणे 'आपलं काम संपलं आहे' हे मान्य करणारा ! खरा स्थितप्रज्ञ !

जाता जाता, ह्या गाण्याचं तिसरं कडवं. जे सहसा ऐकायला मिळत नाही -

फिर तेरे ज़ुल्फ़ की, रुखसार की बातें होंगी
हिज्र की रात हैं मगर प्यार की बातें होंगी
फिर मुहब्बत में तड़पने की क़सम खायी हैं !

__/\__

- रणजित

http://www.ranjeetparadkar.com/2015/11/blog-post_16.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडतं गाणं मऊ शार आवाज. विरहाची गीते अशी एकत्र जमवायची होती.

१) सीने में सुलगते है अरमां.
२) मुझे तेरी मुहब्बत का सहारा मिल गया होता. प्रथमदर्शनी पीळ वाट्तं पण सुरेख आहे.

सुंदर लिहिलंय.

मदनमोहन खरेच तसेच करत असे ( असे लताने, लता इन हर ओन व्हॉईस मधे सांगितलेय ) म्हणजे तो अनेक आलाप आणि हरकती गायकांना ऐकवत असे आणि त्यातले काहीतरी निवडा असे सांगत असे.

सुरेख लिहलय..... तलत माझाही आवडता!
तलत, मदन मोहन.... मस्त ओव्हरनाइट ड्राइव्ह आणि जोडीला त्या दर्द ला दाद देणारी अशी कंपनी.... अहाहा!