संदीप खरे

Submitted by क्षिप्रा on 24 May, 2006 - 01:46

‘मौनाची भाषांतरे’ करुन कवितेचे ‘खरे’ दिवस परत आणणारे कवी संदीप खरे. ‘अरे, आपल्याला सुध्दा असंच वाटतं कधी कधी’ असा जवळकीचा सुगंध जाणवून देणा~या त्यांच्या कविता. एकही कवितासंग्रह प्रसिध्द न होता ‘दिवस असे की’ ह्या cassette च्या माध्यमातून त्यांना आधी प्रसिध्दी मिळाली. सोपे पण अर्थपूर्ण शब्द, सहज गुणगुणता येतील अश्या चाली आणि मोजके संगीत ह्या वैशिष्ट्यामुळे त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय ठरल्या.
पहिल्यांदा जाहीर कवितावाचन करण्याची संधी त्यांना संजीवनी बोकील ह्यांच्यामुळे मिळाली. नंतर kaleidoscope हया कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या पुढील वाटचालीची पहिली पायरी ठरली.
कविता लिहिणं वेगळं आणि ती सादर करणं वेगळं. कवीला जे म्हणायच आहे ते शब्दातून प्रभावीपणे सादर केलं की त्याचा परिणाम दुप्पट होतो. त्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला.
Cassette मधून कविता लोकांपर्यत पोहचू शकते हे ‘दिवस असे की’ ने दाखवून दिले. त्यावेळी mouth publicity चा खूप उपयोग झाला.
मुळात इंजिनियरींगची आवड नसताना त्यांनी घरच्यांच्या आग्रहाखातर डिप्लोमा पूर्ण केला. १० ते ६ अशी ताबेदारी आपल्याला जमणार नाही हे तेव्हा त्यांना स्पष्ट झाले होते. वेगळे क्षेत्र म्हणून त्यांही ad agency त काम करायला सुरुवात केली. पैसा, सुखसोई ह्यात तडजोड करावी लागली तरी चालेल पण आवडीच्या क्षेत्रात काम करता आले पाहिजे हा त्यांचा पहिल्यापासून आग्रह होता. पण सुदैवाने आवडीच्या दोन्ही क्षेत्रात (जाहिरात आणि कविता) ते प्रसिध्द झाले.
अमृत पुरंदरे आणि माधुरी पुरंदरे ह्यांच्याबरोबर त्यांनी ‘कधी हे… कधी ते’ ही पहिली CD केली तसेच ह्याच नावाचे पुस्तक काढले. त्यांच्या प्रारंभापासूनच्या सगळ्या कविता ह्या कवितासंग्रहात आहेत.
नंतर डॉ.सलील कुलकर्णींची गाठ पडली. सलील कुलकर्णी देखील कवितेतील शब्द रसिकांपर्यत पोहचविण्याबाबत आग्रही दिसले आणि त्यांची जोडी जमली. त्यातूनच ‘ आयुष्यावर बोलू काही’ ह्या कार्यक्रमाची निर्मिती झाली.
कायम अस्वस्थ असणारा एक चांगला माणूस आणि त्याचवेळी एक कवी, अशी दुहेरी ओळख असलेल्या संदीप खरे ह्यांच्याशी केलेली ही बातचीत. ..
SandeepKhare.jpgक्षिप्रा: आजच्या यशस्वी संदीप खरेंना जुना संदीप खरे आठवतो का?

संदीप: यशस्वितेचे माझे निकष थोडे वेगळे आहेत. कार्यक्रम लोकप्रिय होणे किंवा गर्दी होणे हा माझा यशस्वी होण्याचा निकष नाही. त्यामुळे मी यशस्वी झालो आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे सगळे जे म्हणतात की मी “यशस्वी” आहे ते मला व्यक्तिश: पटत नाही. माझा कन्सर्न आहे तो कवितेशी. लिहिण्याशी. माझी कविता लोकांना आवडते हा सुदैवाचा भाग आहे असे मला वाटते. जुन्या संदीप खरेमध्ये आणि आताच्या संदीप खरेमध्ये वयाने जो फरक पडत जातो तो आहेच. तसेच अनुभवाने संवेदनांचा स्तर बदलल्यामुळे जो काही फरक पडला असेल तो!बाकी माझा मूळ पिंड कायम आहे. पैसा आणि प्रसिध्दी गौण आहेत. मी कविता यश मिळवण्यासाठी कधीच लिहिली नाही. तिच्याकडे asset म्हणून पाहीले नाही. कविता लहानपणापासून बरोबर आहे. माझं व्यक्त होण्यांच माध्यम किंवा बोलण्याचं माध्यम म्हणून.! ती अजूनही तशीच आहे. ती लोकांना आवडते तेव्हा छान वाटतं इतकं्च!

क्षिप्रा: लिहिता तसं जगायला आवडतं का?
संदीप: जगण्यातूनच येतं लिहिणं ,त्यामुळे आवडत तसं जगायला !

क्षिप्रा: पण मग ‘जपत किनारा शीड सोडणे नामंजूर’ ही एक वृत्ती आणि ‘मी मोर्चा नेला नाही’ ही एक वृत्ती हे कसं?

संदीप: हम्म्म! बरोबर आहे पण मुळात जगण्यात विसंगती आहे. आपण सुसंगत जगत नाही. (जसे आपण कधी कधी उदार होऊन भिका~याला भीक घालतो तर कधी त्याला भीक घालणे आपल्याला पटत नाही) शेवटी कविता त्या त्या वेळच्या mood चे reflection आहे असं मला वाटतं. कविता हे आत्मचरित्र नसून एका साध्या सरळ आयुष्याचं प्रतिक आहे जे विसंगतीने भरलेलं आहे. ती प्रचारासाठी वापरायचे साधन नाही. माझ्यासाठी ते व्यक्त होण्याचे माध्यम आहे. कविता ही कवीची कधीच नसते. ती त्याला मिळालेल्या, भिडलेल्या अनुभवाची असते. त्यामुळे ह्या दोन्ही प्रवृत्ती एकाच माणसात असू शकतात नव्हे असतातच!
(मध्येच त्यांचा मोबाईल वाजतो)

क्षिप्रा: मिळालेल्या प्रसिध्दीचा तुमच्यावर कसा परिणाम झाला?

संदीप: खरंतर कधी कधी प्रसिध्दीचा निगेटिव्ह इफेक्ट सुध्दा होतो. पण माझं तसं झालं नाही कारण मला पायरीपायरीने यश मिळत गेलं. आधी College मध्ये काव्यवाचन मग kaleidoscope मध्ये सहभाग मग cassette; ह्यामुळे ह्या स्तुतिच्या विषाचा हळूहळू डोस मिळाल्याने स्वत:विषयी खूप solid असं काही वाटलं नाही. Cassette काढण्याआधीपासून लोकांना मी थोड्या प्रमाणावर माहीत होतो. टेप केलेल्या कविता लोकांकडे तेव्हाही फिरत होत्या. सुचत राहणं जास्त महत्त्वाचं वाटतं मला कारण कविता लिहिण्यातला आनंद हा ती लोकांना आवडण्यापेक्षा जास्त आहे. एखादी गोष्ट आवडल्यावर, पटल्यावर ती लोकांना आवडो वा न आवडो ती करणे हा माझा पिंडाचा भाग आहे.

क्षिप्रा: जोपर्यंत तुम्हांला सुचत नाही तोपर्यंत तुम्ही लिहित नाही की mind training वर तुमचा विश्वास आहे?

संदीप: तश्या अर्थाने विश्वास नाही. कारण कवितेचा अमुक एक average पडलाच पाहीजे असं माझं नाही. कधी एका दिवसात तीन तीन कविता लिहून होतात तर कधी दोन तीन महिने काही सुचत नाही. Mind training मला वेगळ्या प्रकारे अभिप्रेत आहे. जेव्हा काही सुचत नाही तेव्हा अस्वस्थ राहणं, आजूबाजूला घडणा~या गोष्टींचा आणि इतर कलाकृतींचा आस्वाद घेत राहणं ह्या साठी mind training आवश्यक आहे. जेव्हा सुचेल तेव्हाच लिहावं नाहीतर कविता लिहिणे म्हणजे copywriting होईल जे मी आता (जाहिरातक्षेत्रात ) करतो. लहानपणापासून कविता करीत असल्याने मला शब्दांची आणि मीटरची सवय झाली आहे. पण त्यात दुहेरी धोका आहे. जे सुचलेलं आहे ती कविताच आहे किंवा एखादी ओळ सुचली म्हणजे त्याची पुढे कविता होईल असेही नाही. ह्यात सावध रहावं लागत. कारण मी (जाहिरातक्षेत्रात असल्याने) बसल्या बसल्या ओळी जुळवू शकतो म्हणून मी तसं करावं असं नाही मला वाटतं. हुकमी सुचणं आणि आतून सुचणं ह्यामध्ये गल्लत होऊ नये हया दृष्टीने मला mind training महत्त्वाचं वाटत.

क्षिप्रा: जी कविता लिहितो ती आवडतेच असं नाही पण १० वाईट कविता लिहू म्हणजे ११ वी कदाचित चांगली होईल असं कधी झालं का ?

संदीप: नाही. एखादी कविता चांगली किंवा वाईट असं म्हणता येत नाही. कुणी मला तुमची आवडती कविता कोणती असं विचारलं तर मला Top 10 काढता येत नाही तसंच ‘आईला सगळी मुलं सारखीच’ इतकंही ते सरळ नाही.
कविता चांगली किंवा वाईट अशी नसून मला जे म्हणायचं आहे ते म्हटलं गेलं आहे का हे महत्वाचं!
तुम्ही जिराफ़ बनवायला गेलात आणि त्याचा घोडा होतोय तर साचा बदलण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा ते तसंच ठेवून द्यावं. कधी कधी नाही का ३०-४० वर्षं रियाज़ केलेली माणसं…... नाही लागत त्यांचा कधी कधी सूर!

क्षिप्रा: यालाच जोडून पुढचा प्रश्न म्हणजे, कविता लिहून झाल्यावर त्यात अपुरेपणा जाणवला किंवा कुणी बदल सुचवल्यास तुम्ही तो बदल करतात का?

संदीप: अपुरेपणाला इलाज नाही. शेवटी त्यानेच तुम्हाला काही सुचवलेलं असतं. कधी लिहून झाल्यावर कळतं की हे, ते नाही जे मला वाटत होतं. त्यावेळी त्यावर विचार करण्यात अर्थ नसतो. ते तसंच ठेवून द्यायचं असतं. बदलाबद्दल म्हणायचं, तर आपल्याकडे तशी परंपराही नाही की उस्तादांकडून शायरी दुरुस्त करून घ्यायची. ते गज़लच्या (वृत्तातील बदलाच्या) बाबतीत असेल पण कवितेच्या बाबतीत होऊ शकत नाही. काव्यवाचनाबद्द्ल सूचना असू शकतात पण कविता लिहिण्याबद्दल नाही!

क्षिप्रा: ’दिवस असे की..’ आणि ‘एव्हढंच ना..’ या कविता कश्या सुचल्या?

संदीप: या दोन्ही कविता साधारणतः १९ ते २१ या वयात त्या लिहिलेल्या आहेत.
दिवस असे की च्या बाबतीत मी सांगू शकीन. एका मित्राचा फोन आला होता की ह्या शनिवारी आपण भेटू. माझ्यासाठी पूर्ण दिवस काढ. आम्हांला भेटून बरेच महिने झाले होते. तेव्हा सायकलवरुन जाताना मी अगदी सहज गुणगुणू लागलो ‘ह्या शनिवारी कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही!’ आणि पुढे त्यातूनच कविता तयार झाली.
एकतर त्या वयात आपली मनःस्थिति थोडी अस्थिर असते. डोक्यात नाना विचार असतात. भविष्य माहीत नसतं. आजूबाजूला प्रश्न असतात, स्पर्धा असते, survival चा प्रश्न असतो. अश्याच मन:स्थितीत सुचलेल्या आहेत. बाकी जास्त काही सुचण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगणं तसं अवघड आहे !

क्षिप्रा: साधारणपणे पहिल्यांदा कवितेचे पुस्तक काढले जाते पण त्याऐवजी ध्वनिफ़ित काढून लोकांपर्यंत पोचण्याची कल्पना कशी सुचली?

संदीप: खर्ं तर जाहिरातक्षेत्रात असूनही स्वतःच्या product साठी मला कल्पना सुचत नाहीत. Kaleidoscope मध्ये या कविता मी अगदी कुठल्याही साथीशिवाय गात होतो. अश्याच एका कार्यक्रमात ‘Music Byte’ चे रवि वेदांत भेटले. ते म्हणाले की interesting आहे. मग मंदार आगाशेने ही गाणी ऐकली आणि त्यानेच ही ध्वनिफ़ितीची कल्पना सुचवली. (तेव्हा तो अगदी ‘नको काढायला’ असे जरी म्हणाला असता तर शांतपणे मी तसाच बाहेर पडलो असतो.) कवितांच्या बाबतीत नक्की काय करायचं ते ठरलेलं नव्हतं. त्याचवेळी विवेक परांजपे भेटले. मी त्यांना आधीच सांगून ठेवले की वाटेल ते करा पण ह्यातल्या कविता हरवू देऊ नका. ह्या कवितांची ‘गाणी’ करू नका आणि त्यांनी ती गंमत केली! (प्रसन्न हसतात!) तस्ं मराठी ध्वनिफ़ितीच्या बाबतित मार्केटींग करुयात म्हटलं तरी तितकं शक्य नव्हतं. त्यावेळी mouth publicity फ़ार महत्वाची ठरली. आता मात्र एक विशिष्ट वर्ग मिळालेला असल्याने तसा सेफ़ गेम झालाय. त्यावेळी रसिक हे स्विकारतील की नाही? हा प्रश्न होता म्हणून एका अर्थाने याचं खरं श्रेय मंदार आगाशेचं म्हणता येईल.

क्षिप्रा: कवि असल्याने वेगवेगळे टप्पे जाणवतात का?

संदीप: वाढत्या वयानुसार आपण त्या-त्या वयाप्रमाणे वागायला लागतो. प्रगल्भतेच्या एका टप्प्यावर आपण सिद्धतेला जाऊन पोचलो तर अभिव्यक्तिची गरजही उरणार नाही. मी तिथपर्यंत पोचणारही नाही कदाचित! त्यामुळे प्रगल्भ कविता म्हणण्यापेक्षा प्रत्येक टप्प्याची मजा वेगळीच आहे. ते सुचत रहावं हे महत्वाचं.
म्हणून ‘एव्हढंच ना....’ लिहिल्यावर ‘देवा मला रोज एक अपघात कर....’ हे सुचत नाही असं होऊ नये. तोही एक form आहे. तसाही form बाबतित मी कधी आग्रही नव्हतोच. त्यामुळे कुणी मला ‘मी अमुक एक शैलीत लिहितो’ असं म्हणू नाही शकत.

क्षिप्रा: चांगलं सुचण्यासाठी जाणूनबुजून काही प्रयत्न केले की ही दैवी देणगी म्हणावी?

संदीप: जाणूनबुजूनच्या आधीपासूनच हे चालू झालं, म्हणून हे आजही चालूच आहे. समजायला लागल्यापासून मी खूप वाचलंय! आईने कधी खेळणी आणून दिली नाहीत मला आणि मी मागितलीही नाहीत. रद्दीतून पुस्तकं आणायची किलोवर, अगदी ‘ही हवी,ती नको’ असंही करायचं नाही. मग घरी येऊन त्यांचं sorting करत बसायचं. त्यामुळे काय वाट्टेल ते वाचलं. त्यात सुसूत्रता अशी नव्हतीच. घरातही कुणी academic type चं नव्हतं की ज्यामुळे ‘हा लेखक झाला आता तो घेऊयात’ असं काही झालं ! आणि जेव्हा काय वाचायच ते कळलं, पुस्तकं विकत घेणं शक्य झालं तेव्हा एक विशिष्ट लेखक आवडला तर पाठपुरावा करून मी वाचलाही आहे. पण वाचन हा मुख्यतः माझ्या आनंदाचा भाग असल्याने ‘चांगलं वाचणारा’ (असं म्हणून ओळखण्यासाठी) मी वाचलं अस्ं कधी झालं नाही. वाचनासाठी वाचन असल्याने वेगवेगळ्या शैलीतलं वाचलं गेलं. या सगळ्यातून शब्दांची समृद्धी येते असं मला वाटतं. त्यामुळेच नेहमी काही सुचत राहतं.

क्षिप्रा: जुन्या कवींपैकी कोण कोण आवडतं?

संदीप: विंदा आवडतात. मर्ढेकर आवडतात. नव्या पिढीतले हेमंत जोगळेकर आवडतात. तसे खूप नव्या पिढीतले नाही म्हणता येणार त्यांना! पण तरी नवेच वाटतात ते प्रकाश संतांप्रमाणे!

क्षिप्रा: लेखकांमध्ये आवर्जून उल्लेख करावा असे कोण आवडतात?

संदीप: नेमाडे, श्याम मनोहर आवडतात. प्रकाश संत खूप आवडतात. बाकी आपले ठरलेले गड-किल्ले आहेतच म्हणजे पुलं, गोनीदां, श्री.ना.पेंडसे हे (नेहमीचे यशस्वी) ! (प्रसन्न हसतात!)

क्षिप्रा: सध्या जे कवितालेखन करत आहात ते काही विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर ठेवून आहे का?

संदीप: मी सध्या जे लिहितोय त्यात performance च्या कविता दहापैकी दोन-तीन असतात त्या लोकांसमोर वाचता येतात. पण बाकीच्या (कविता) सगळ्याच लोकांना अपिल होतील अश्या नसतात त्यामुळे त्या कार्यक्रमात येत नाहीत. विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर ठेवून लिहायचं म्हटलं तर ते जाहिरातक्षेत्रात होतं. कवितेच्या बाबतीत नाही.

क्षिप्रा: काही विशिष्ट कविता ज्या लोकांना आवडतात त्या (कार्यक्रमात) घ्यायलाच लागतात, त्यामुळे मला जे सांगायचं आहे, माझी जी अभिव्यक्ती आहे ती मागेच राहते, असं कधी होतं का?
असं कधी झालं तर त्याचा काही ताण येतो का?

संदीप: एक आहे जेव्हा तुम्ही performance ला लोकांसमोर उभे राहतात तेव्हा performance ची जी चौकट आहे, ज्या मर्यादा आहेत त्या तुम्हाला पाळाव्याच लागतात. ती तुमची जबाबदारी असते. तुम्हाला मनस्वीपणा करायचा आहे, कलंदरपणा करायचा आहे तर तो स्टेजवर नाही करू शकत तुम्ही! तसा मनस्वीपणा केला तर लोक तुम्हाला स्टेजवर येऊ न देण्याची काळजी घेतात! शिवाय ‘मी कसा कलंदर आहे’ हे स्टेजवर जाऊन सांगण्यात काही गंमत नाही. तुमच्याकडे जे आहे ते लोकांना ऐकवायच आहे ना, मग त्यातलं काही त्यांना आवडेल काही आवडणार नाहीत. पण सुवर्ण मध्य साधून त्यांना जे आवडत्ं ते तुम्ही ऐकवायला पाहिजे. तुम्ही दोनदा ‘वन्स मोअर’ घ्याल, तीनदा फ़र्माईश घ्याल पण हा कार्यक्रम फ़र्माईश चा नाही हे तुम्हाला सांगता यायला हवं. ही खरं तर Give & Take process आहे. तुम्ही लोकांचं ऐकता म्हणून ते तुमचंही ऐकतात. मग जेव्हां पडदा पडतो तेव्हा तुम्ही मनस्वीपणा करायला मोकळे असतात. हे सगळं स्पष्ट असल्याने तसा काही त्रास झाला नाही किंवा नव्या कविता समोर आणायच्या राहून गेल्या असंही कधी वाटल्ं नाही.

क्षिप्रा:तरीही एखादी कविता स्वतःला खूप आवडते पण ती लोकांना आवडणार नाही अश्या जाणिवेतून ती लोकांसमोर सादर करायची राहून गेली असं कधी झालंय का?

संदीप: आता हा माझा अंदाज़ असतो एक performer म्हणून की लोकांना कुठली कविता कळेल आणि कुठली कळणार नाही. इथे मी आवडेल असं म्हणणार नाही. जेव्हा मी कविता वाचतो तेव्हा त्या कवितेची जी भाषा आहे ती समोरच्याला कळली पाहिजे. जेव्हा लोकं तिकिट काढून या कार्यक्रमाला नाटकासारखीच येतात तेव्हा त्यांचा कवितेचा एक IQ ठरलेला असतो. ती काही त्यात पारंगत नसतात किंवा कवितेच्या भाषेशी तितकी परिचित नसतात. (हसून सांगतात) माझ्या कार्यक्रमाला convent मधली खूप मुलेमुली येतात की मुळात ज्यांना शब्द कळायचीही मारामार असते. त्यामुळे मी हे सगळं गृहीत धरून कार्यक्रम करतो तेव्हा त्यांचा कवितेचा IQ माझ्या मनात set झालेला असतो. मला त्या IQ चा आदर करावाच लागतो. हं, हळूहळू मी त्यांना एकेक चमचा डोस वाढवत नेला तर ती भाषा त्यांना कळायला लागतेही. अगदी पहिल्याच दिवशी ग्रेस ऐकवले तर ते कठीण जाईल. त्यात कवितेचा दोष आहे असे नाही किंवा ऐकणा~याचा दोष असेही नाही. दोघांची या आधी कधी ओळखच नसते हे त्यामागचं खर्ं कारण!
म्हणून कार्यक्रमाचं स्वरुप तसंच ठेवलं आहे. First half हा खरंतर warmup असतो. जरा लोकांनी हाताची घडी सोडून मोकळं बसावं अशी अपेक्षा असते. त्यामुळे ह्या भागातील कविता देखील लाईट मूडच्या आहेत. मग second half मध्ये नवीन कविता जी मला खरंच ऐकवायची आहे ती मी ऐकवतो त्यामुळे एखादी कविता मला आवडली आहे आणि ती ऐकवायची राहीली असे नाही होतं.

क्षिप्रा: ‘आयुष्यावर बोलू काही’ बद्दल म्हणायचं झाल्ं तर पुर्वार्ध तरुणाईला आवडतो आणि उत्तरार्ध इतरांना भावतो, असं काही वाटतं का?

संदीप: नाही… नाही. मा्झ्यापर्यंत अगदी उलट प्रतिक्रिया पोचल्या आहेत. माझ्याकडे college मधली आणि अगदी convent मधली मुलंमुली प्रतिक्रिया सांगायला येतात, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दुसरा भाग त्यांना ‘जास्त catchy’ वाटतो. उत्तरार्ध हा content च्या दृष्टीने अधिक समृद्ध आहे. मला व्यक्तिशः तो खूपच आवडतो. म्हणून मला असं वाटतं की आपण विशिष्ट वयाला काही गोष्टी चिकटवून दिल्या आहेत. त्या खर्ं तर तश्या नसतात. आपण judge करायला चुकतो त्यामुळेच!

क्षिप्रा: मायबोलीविषयी काही ऐकलं आहे का? संकेतस्थळ पाहिलं आहे का?

संदीप: हो. Site बघितली आहे ना! त्यावर ज्या चर्चा चालतात त्या वाचलेल्या आहेत.

क्षिप्रा: आता शेवटचा प्रश्न…… माणूस म्हणून जी सामाजिक बंधनं आहेत ती पाळता की नाही? की ही बंधनं फ़क्त कल्पनेतच तोडायला आवडतात?

संदीप: संधी मिळेल तेव्हा तुम्ही बंधनं तोडायला बघतात! तुम्ही समाजासाठी काही करताय असं काही नसतं तर तुमच्याकडून ते करवून घेतलं जात असतं, नाहीतर तुम्ही चौकटीबाहेर फेकले जाता! जशी चाकोरीत राहण्याची एक किंमत आहे तशीच ती तोडण्याचीही आहे. मला स्वतःला चाको्रीत जगायला कधी आवडलं नाही. पण त्याचवेळी मी माझ्या जबाबदा~या झटकून रानावनात नाही निघून जाऊ शकत! मी कलाकार आहे म्हणून माझ्या जबाबदा~या मी टाळत नाही. पण त्या पुर्ण करुन मी माझं माझं स्वातंत्र्य जपू शकतो.

समारोप:– २४ मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रिडा मंचावर सादर होणा~या ‘आयुष्यावर बोलू काही’ ह्या कार्यक्रमाच्या २०० व्या प्रयोगासाठी त्यांना शुभेच्छा देऊन, मायबोली तर्फे त्यांचे आभार मानून ही बातचीत संपली.

आभार - मायबोलीच्या ‘संवाद’ ह्या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल Admin आणि संवादचे सभासद ह्यांचे आभार. मुलाखतीची कल्पना सुचवल्याबद्दल आणि मुलाखत एडिट करताना गिरीची मदत झाली त्याबद्दल त्याचे आभार. प्रश्न विचारण्याचा sequence आणि बोलतं करण्याच्या काही सूचना दिल्याबद्दल मुक्त पत्रकार नीला शर्मा ह्याचेंदेखील आभार.

Taxonomy upgrade extras: 

Shyamli

Wednesday, May 24, 2006 - 1:04 am:

wow
मजा आली....
मस्तच ग क्षिप्रा....

मनातल्य बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळाली....धन्यवाद

Rajkumar

Wednesday, May 24, 2006 - 1:49 am:

व्वा क्षिप्रा.. छान मुलाखत घेतलीये. अगदी सगळ्यांच्या मनातले प्रश्न विचारलेस.

Bee

Wednesday, May 24, 2006 - 1:48 am:

छान घेतली आहे मुलाखत, आवडली.

मुलाखतीला सुरवात करण्यापूर्वी जर त्यांच्याशी आपली भेट कशी झाली.. त्यांनी मुलाखतीला मंजूरी कशी दिली हे लिहिले असते तर आणखी छान झाले असते.

Devdattag

Wednesday, May 24, 2006 - 2:10 am:

अतिशय सुंदर मुलाखत..
क्षिप्रा अभिनंदन

Psg

Wednesday, May 24, 2006 - 2:16 am:

छान झालीये मुलाखत! हाडाचे कलाकार आहेत!

Limbutimbu

Wednesday, May 24, 2006 - 2:33 am:

क्षिप्रा, प्रश्ण आणि उत्तरे, दोन्हीतली आशयघनता लाजवाब! विचार करायला लावणारे!
(आशयघनता हा शब्द चुकीचा तर नाही ना?)

Kmayuresh2002

Wednesday, May 24, 2006 - 2:44 am:

क्षिप्रा, सहीच गं.. मस्त झालीये मुलखत.. प्रत्यक्ष डोळ्यांसमोर संवाद चालु अआहेत असं वाटलं

Meenu

Wednesday, May 24, 2006 - 2:54 am:

छानच आहे मुलाखत.. ...

Milindaa

Wednesday, May 24, 2006 - 4:58 am:

चांगली झालीये मुलाखत

Sakheepriya

Wednesday, May 24, 2006 - 6:14 am:

क्षिप्रा, छानच झालीये मुलाखत. सगळ्या प्रश्नांना अगदी सविस्तर उत्तरं दिली आहेत त्यांनी!

पण एकूणच सगळी मुलाखत फक्त त्यांच्या कवितांवर focus करणारी आहे. तसाच उद्देश असेल मुलाखत घेताना तर प्रश्नच नाही...

पण आपल्या लाडक्या कवीची / लेखकाची मुलाखत वाचताना काही personal उल्लेख आले तर त्या व्यक्तीची जडणघडण कशी झाली हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं काही सनसनाटी आपल्याला कळावं असं नव्हे... पण हे celebrities प्रत्यक्ष आयुष्य जगताना कसे असतात, त्यांना काय आवडतं, आवडत नाही, त्यांची श्रद्धास्थानं कोणती, जिव्हाळ्याची स्थानं कोणती, ते कशाने सुखावतात / दुखावतात हे वाचायला मिळालं तर एक ' व्यक्ती ' म्हणून ते कसे आहेत, हे लक्षात येतं.

तसंच एक गायक व संगीतकार म्हणुन त्यांनी केलेल्या कामगिरीविषयी पण थोडी चर्चा झाली असती तर वाचायला आवडलं असतं. ' आयुष्यावर... ' चे कार्यक्रम करताना सलिल कुलकर्णींबरोबरचं त्यांचं tuning , चित्रपटांकरता गीतलेखनाचा अनुभव, तसंच त्यांच्या जाहिरात क्षेत्रातल्या कारकिर्दीबद्दल थोडं वाचायला मिळालं असतं तरी आवडलं असतं....

Bee

Wednesday, May 24, 2006 - 7:20 am:

पण आपल्या लाडक्या कवीची / लेखकाची मुलाखत वाचताना काही personal उल्लेख आले तर त्या व्यक्तीची जडणघडण कशी झाली हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं काही सनसनाटी आपल्याला कळावं असं नव्हे... पण हे celebrities प्रत्यक्ष आयुष्य जगताना कसे असतात, त्यांना काय आवडतं, आवडत नाही, त्यांची श्रद्धास्थानं कोणती, जिव्हाळ्याची स्थानं कोणती, ते कशाने सुखावतात / दुखावतात हे वाचायला मिळालं तर एक ' व्यक्ती ' म्हणून ते कसे आहेत, हे लक्षात येतं.

>>सखीप्रिया, हे आल आहे एका प्रश्नाच्या उत्तरात. कविवर्य सांगतात की त्यांना वाचनाची आवडत होती, घरी खूप शिक्षकी वातावरण नव्हत.. मग रद्दीतून पुस्तके घरी येत.. असे आहे ना मुलाखतीत.

Lopamudraa

Wednesday, May 24, 2006 - 7:32 am:

क्षिप्रा... छान झालीये मुलाखत... .. .. .... thanks !!!.. .. .. .. .. ..

Aj_onnet

Wednesday, May 24, 2006 - 8:26 am:

क्षिप्रा, फारच सुंदर अन मनमोकळी झाली आहे मुलाखत!
आपल्या आवडत्या ह्या कवीचा, कविता निर्मीतीमागचा विचार अन ती प्रक्रिया जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती. ती बरीचशी पूर्ण झाली!
तू विचारलेले प्रश्न अन त्यांचा क्रम एखाद्या कसलेल्या मुलाखतकाराला साजेसा आहे!

Jayavi

Wednesday, May 24, 2006 - 8:33 am:

क्षिप्रा,मस्त मस्त! छान मोकळी उत्तरं दिली आहेत संदीपने. तुझे प्रश्नंही अतिशय नेमके आहेत, अर्थात तूही एक उत्कृष्ठ कवयित्री असल्यामुळे तुला तसेच अगदी मनातले प्रश्न विचारता आले.
मायबोलीने हा अतिशय चांगला उपक्रम सुरु केलाय. हा असाच पुढे चालू रहावा यासाठी मनापासून शुभेच्छा!

Maitreyee

Wednesday, May 24, 2006 - 9:50 am:

वा! मस्त झालीय मुलाखत! क्षिप्रा आणि जे कोणी यात काम केलेय त्यांचेही अभिनन्दन! प्रश्न अतिशय नेमके आणि अभ्यास्पूर्ण वाटले.

Moodi

Wednesday, May 24, 2006 - 10:28 am:

क्षिप्रा छान घेतलीस मुलाखत. तुझे अन गिरीचे पण अभिनंदन एवढे सगळे नेटकेपणाने मांडल्याबद्दल. खरेंच्या बाकी आवडीनिवडीबद्दल पण ही मुलाखत बारकाईने वाचली गेलेली दिसतेय.

Ashwini

Wednesday, May 24, 2006 - 11:14 am:

क्षिप्रा, छान आहे ग मुलाखत. मागच्या वेळेस संदीपचा कार्यक्रम पाहीला पण आत जाऊन न भेटल्याची चुटपूट होती. ती दूर झाली हे वाचून.

Ninavi

Wednesday, May 24, 2006 - 11:23 am:

क्षिप्रा, नेटकी झाल्ये मुलाखत.

Dineshvs

Wednesday, May 24, 2006 - 11:38 am:

क्षिप्रा, छान झालीय मुलाखत. पण तुच आता आम्हाला दुर्मिळ होत चालली आहेस.

Yog

Wednesday, May 24, 2006 - 1:04 pm:

वाह छान झाला संवाद... अजून थोडा personal touch आवडला असता. पण अशा पहिल्याच मुलाखतीत personal बाबतीत बोलक करण सोप नाही हेही खरे.
so good job, turned out quite professional !

Maitri

Wednesday, May 24, 2006 - 1:32 pm:

क्षिप्रा छानच झालीय मुलाखत!!
अगदी मनमोकळी मित्र मैत्रिणीच्या गप्पाच जणू काहि!!
तुझं अभिनंदन!!

Chinnu

Wednesday, May 24, 2006 - 9:35 pm:

क्षिप्रा, गिरी आणि सर्व पडद्यामागच्या लोकांना ह्या मुलाखतीबद्दल धन्यवाद!
ही कवीला कवीने दिलेली दादच वाटली..

Vaibhav_joshi

Thursday, May 25, 2006 - 6:55 am:

क्षिप्रा ... छानच गं ...
काही काही प्रश्न फारच छान आहेत

Neelu_n

Thursday, May 25, 2006 - 7:13 am:

क्षिप्रा, छान झाली ग मुलाखत..
संदीपच्या कविता वाचणं आणि एकणं हा एक सुंदर अनुभव असतो... ह्या अश्या समस्त तरुणाइला वेड लावणार्‍या कवीची आपल्या मायबोलीसाठी घेतली गेलेली मुलाखत पाहुन खुप आनंद झाला. तोही मायबोलीचा एक सदस्य आहे असे क्षणभर वाटुन गेलं.

Jyotip

Thursday, May 25, 2006 - 8:08 am:

मला कोणी सांगेल का हि मुलाख़त कोणत्य font मधे आहे?

Vinaydesai

Thursday, May 25, 2006 - 10:37 am:

क्षिप्रा, मुलाखत आवडली Keep it up

Kandapohe

Thursday, May 25, 2006 - 11:53 pm:

क्षिप्रा, मुलाखत आवडली !!

Giriraj

Friday, May 26, 2006 - 5:34 am:

jyotip ,ही मुलाखत गार्गी ( gargi )या font मध्ये आहे.
तुझ्यकडे Arial unicode MS असेल तरी दिसाय्ला हवी तुला मुलाखत!

Sumati_wankhede

Friday, May 26, 2006 - 6:35 am:

क्षिप्रा,
मुलाखत खूप छान झालीये.
तुझे प्रश्न लाजवाब आणि संदीपची उत्तरेही झकास...

Shriramb

Saturday, May 27, 2006 - 2:00 am:

क्षिप्रा, छानच झालीय मुलाखत!

Jyotip

Saturday, May 27, 2006 - 3:35 am:

धन्स गिरि
क्षिप्रा,
मुलाखत खूप मस्त

Arch

Saturday, May 27, 2006 - 7:48 pm:

क्षिप्रा, फ़ारच सुंदर मुलाखत. प्रश्ण अगदी वेचक. संदीपची उत्तर आवडलीच तुझे प्रश्ण जास्त आवडले.

Sunilsavan

Sunday, May 28, 2006 - 9:16 am:

मुलाखत अप्रतिम. मुलखत दिसते, पण छापायला लागलो तर अग्यम्य किडेमकोडे छापले जातात. असे का?

Giriraj

Monday, May 29, 2006 - 1:15 am:

क्षिप्रा,सांगायचंच राहिलं.... मुलाखत अगदी छान झालिये!

खरंच... एका कविच्या अगदी मनात जाऊन भटकून आल्यासारखं वाटलं!
संदीप बोलतांनाच इतका गप्पा मारल्यासारखा बोलला की ते कागदावर येतांना तसंच आलंय!मी आधीपासूनच त्याच्या काही उच्चारांचा फ़ॅन आहे त्याचा 'ण' चा उच्चार तर मला जाम आवडतो. मध्येच मोबाईल वाजणं त्यामुळे प्रश्नच विसरणं.. असल्या गंमतिंमुळे मित्राशीच गप्पा मारल्यासारखं वाटलं... आणि या सर्वांत क्षिप्राने ज्या पद्धतिने बोलकं केलय महाराजांना.. अगदी दाद द्यावी अशीच मुलाखत!

Kshipra

Monday, May 29, 2006 - 10:15 am:

गिरी,ठीक आहेस ना? मिळुनच काम केलय आपण तुला "पुस्तक"सारख दरवेळी वाचताना नवीन कळत की काय? दिवा घे.

Santoshg

Wednesday, June 14, 2006 - 12:58 pm:

छान झलिये मुलाखत. डिसेबर मधे भारतात गेलो होतो तेव्हा पहिल्यान्दा ऐकल दिवस असे की आणि तेव्हापासून अनेकदा ....Sandip cha Fan zalo.Keep it up.

Paragkan

Monday, June 19, 2006 - 11:35 pm:

waah !!!

Sanskruti

Wednesday, July 26, 2006 - 1:25 pm:

क्षिप्रा, छान झाली मुलाखत,आवड्ली, तिसरा प्रश्न्न,उत्तर जास्त आवडले,

Nileshkunjir

Friday, August 18, 2006 - 1:45 pm:

क्षिप्रा, छान झाली मुलाखत,आवड्ली, u hav u r email address???......

Shar_jo2709

Tuesday, December 12, 2006 - 5:14 am:

kk mala nahi vachta ali fotach kalat nahiye nehmisarkhe ushir jhala pan tarihi vachayla mile apeksha.

K_mahendra

Tuesday, February 06, 2007 - 7:41 am:

फारचं छान! अप्रतिम झालिये मुलाखत.

Ultima

Wednesday, March 14, 2007 - 6:29 am:

Kharach ekadam zakkas ahe...

Kshipra

Thursday, May 25, 2006 - 1:13 am:

सर्वांचे आभार. प्रिया, खुपच अपेक्षाभंग झाला का ग? कदचित माझ्या पर्सनल इंटरेस्ट मुळे असेल पर्सनल गोष्टी जास्त न येता कविता हा फ़ोकस आला असावा. तु आणि योग चा मुद्दा पटला. ह्या गोष्टी आल्या असत्या तर मुलाखत अजुन रंगली असती.

समीर आणि गिरीचे परत एकदा आभार.

आम्हि जो प्रतिसाद देतो तो सन्दिप पर्यन्त पोहोचेल का?

मुलाखत एकदम मस्तच वाटली. टि.व्हि वर चालू असल्यासारख वाटल.

काय गोंधळ आहे नक्की? मी ही इतकी अप्रतिम मुलाखत कशी काय मिसली?
क्षिप्रा, मुलाखत खरच झक्कास.

हा प्राणी हाडाचा कलाकार आहे... स्वतःला ओळखून आहे.... सच्चा माणूस आहे,

उत्तम पॅरॅग्राफ!

आता हा माझा अंदाज़ असतो एक performer म्हणून की लोकांना कुठली कविता कळेल आणि कुठली कळणार नाही. इथे मी आवडेल असं म्हणणार नाही. जेव्हा मी कविता वाचतो तेव्हा त्या कवितेची जी भाषा आहे ती समोरच्याला कळली पाहिजे. जेव्हा लोकं तिकिट काढून या कार्यक्रमाला नाटकासारखीच येतात तेव्हा त्यांचा कवितेचा एक IQ ठरलेला असतो. ती काही त्यात पारंगत नसतात किंवा कवितेच्या भाषेशी तितकी परिचित नसतात. (हसून सांगतात) माझ्या कार्यक्रमाला convent मधली खूप मुलेमुली येतात की मुळात ज्यांना शब्द कळायचीही मारामार असते. त्यामुळे मी हे सगळं गृहीत धरून कार्यक्रम करतो तेव्हा त्यांचा कवितेचा IQ माझ्या मनात set झालेला असतो. मला त्या IQ चा आदर करावाच लागतो

======================================================

कवीच्या कविता वाचून अस वाटल की मेन्दु विसाव्या वर्शात फ्रीझ झाला आहे. किती दिवस प्रेम कविता आनि तत्सम लिहिणर?