एका मंदिरात...

Submitted by जव्हेरगंज on 2 October, 2015 - 08:57

मी राहतो त्याठिकाणी एक अवजड बोजड मंदिर आहे. पण मी तिकडे फारसा जात नाही. रात्रीचं हे मंदिर मला भेसुर वाटते. कलुळात 'कवशी' दिसते असं मला एकजण म्हणाला होता. बऱ्याच वर्षापुर्वी कुण्या 'कौशल्या'ने ईथेच ऊडी मारली मारली होती. तिचं भेसुर भुत ईथंच वावरतयं असा माझा समज झालाय. रात्रीचं मी तिकडं कधीच फिरकत नाही.

भल्या सकाळी उठुन मी मंदिरात जातो.
गाभाऱ्यातल्या अनाम परड्या मला जोगवा मागतात. पाट्यावरचा लालबुंद गंध माझ्या कपाळावर अलगद जाऊन बसतो. चाफ्याची सुगंधी फुले माझ्या हाताकडे झेपावत येतात. मी त्यांना देवीकडे फेकतो. आतल्या काळोखात मला फारसं दिसत नाही. गावशिवारातली कोणी शिणलेली बाई जन्मोजन्मीचा दंडवत घालत वाजत गाजत तिथे येते. या बाईची दु:खे जाणण्यात मी रस दाखवतो. पण सकाळच्यापारी तिची दु:खेही मला प्रसन्न वाटतात. तिच्या यातना मला सोसवत नाहीत. मी प्रसाद खाऊन बाहेर पडतो.

काळवंडलेल्या भिंती मला जवळ बोलवतात. मी तठस्थ त्यांच्याकडे पाहतो. आषाढात हरीरामचे लग्न झाले तेव्हा मंडपाला याच भिंतींनी आधार दिला. गरीबड्या सुखदेवने पोराच्या लग्नात गावजेवण घातले होते. मीही होतो पंगतीत. ढेरपोट्या गणपतीच्या कट्टयाला टेकुन. ईथेच.
चार दिवसात लग्न मोडले होते. नवरीचा म्हातारा बाप दिवसभर व्याह्याच्या वट्यावर बसुन राहीला होता म्हणे. हरीराम घरातुन पळाला तो पुन्हा कधीच न परतण्यासाठी. नवरीचं पुढे काय झालं याची माहीती तर या भिंतींनाही नसावी.

मंदिराच्या समोरचा विशाल वटवृक्ष आता केवळ आपली लाकडं दाखवत उन्हापावसात चिवट ऊभा आहे. कित्येक भक्तगणांना आपली सावली देऊन त्यांचे हजारो सुखाशीर्वाद यानं झेलले आहेत. या वटवृक्षाचं बोडकं रुप आता या मंदिराला बाधा आणतयं. मी त्याला विचारतो, तु पडत का नाहीस? वैरान माळावर भणंग खोपट्यात राहणारी एकटी सिंधुबाई याच झाडाखाली जोगतीण झाली. मी तिच्या घरी चहा पिलो होतो. जळता कापूर तोंडात टाकताना मी तिला पाहीलं होतं. मी पाहतोय या वटवृक्षाच्या शेंड्यावर, एक जीर्ण भगवं कापड. वाऱ्यावर फडफडतना. या झाडाच्या जिवंतपणाला ही एक सलामी आहे.

दुपारी मंदिर एकट असतं. आणि मला ते आवडतं. ईथल्या काळवंडलेल्या भिंती मला थंडगार वाटतात. बाहेरचा ऊष्ण परीसर माझ्या डोळ्यांत आग ओततो. ऊन्हाच्या झळयात कित्येक चिमण्या मातीतले कण टिपताना मी पाहील्या आहेत. ही पाखरे रानभैरवी गात मंदिराच्या शिखरावरुन आभाळाकडे पाहतात. उंच भराऱ्या घेऊन त्याला धडकायला बघतात. दुरवरचा त्यांचा ठिपक्याएवढा आकार मला दिसेनासा होतो. ऐन दुपारी मी गच्च ताणुन देतो. या गारठ्यात मला स्वर्गसुखाचा आनंद भेटतो.

संध्याकाळी हे मंदिर मला विषण्ण वाटते. तांबुस किरणे झाडाभिंतींवर दाटीवाटीने गर्दी करतात. या भिंतीही मला उदास वाटतात. सुर्यनारायणासारख्या त्याही थकुनभागुन आळस देतात. याचे मला दु:ख होते. हे दु:ख मला टोचत राहते. रात्रभर.

या दु:खाच्या परीछायेत मला अर्वाचीन युगाचे सापळे दिसतात. रात्री हिंस्त्र श्वापदं मंदिराच्या भिंतींवर घिरट्या घालतात. मी अनामिक होऊन त्यांच्यात मिसळून जातो. खोल काळोखात मला कवशी दिसते. कलुळात तिच्या भेसुर हसण्याचे आवाज घुमत राहतात. भयानक.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users