स्वरचित आरत्या

Submitted by संयोजक on 20 August, 2009 - 15:46

"आरं ए जीवा .. कुटं चाल्लास रं येवड्या बिगी बिगी ?"

"आरं शिवा आपल्या गनपतीच्या आरतीची येळ झाली न्हवं .. आजची येकदम पेशल आरती हाय बग!"

"आन् ती कशी रं?"

"आरं आजच्या आरतीला येक नविन आरती म्हनायची बग .. म्या रचलेली .. त्ये काय म्हनतात त्यो येकदम 'पर्सनल टच' हाय बग यंदाच्या गनपतीला माजा .."

"व्वा! माला येकदम छान वाटली बग ही आयडियेची कल्पना .. आता म्या बी रचतो एक आरती आनी माजा बी 'पर्सनल टच' देऊन टाकतो बाप्पाला .."

तर काय म्हणता मंडळी? ह्या जीवा-शिवाप्रमाणे तुम्हीही देणार ना यंदाच्या गणेशोत्सवाला तुमचा 'पर्सनल टच'? आपल्या स्वरचित आरत्या इथे लिहा आणि करून टाका हा गणेशोत्सव एकदम 'स्पेशल'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपतीची आरती

सुखकारक, दुखहारक, सन्मतिदायक, गणपती मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

प्राक्तनातले अरिष्ट नुरवी
प्रेमकृपेची धारा झरवी
वात्सल्याची वर्षा पुरवी
तू गणनायक, सिध्दिविनायक, सुबुध्दिदायक मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

राग लोभ अज्ञान काननी
गुरफटलो मज तार यांतुनी
अनन्य भावे शरण तुला मी
दे मज स्फूर्ती आणि सन्मती, अंति सद्गती मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

सर्वसाक्षि तू, तू वरदाता
तुजवाचुनि मज कुणी न त्राता
क्लेशांमधुनि सोडवि आता
मी नतमस्तक करित प्रार्थना हे गजवदना मोरया
जय गणपती, जय मोरया, मंगलमूर्ती मोरया

स्फूर्ती देवीची आरती

स्फूर्ते अवघड भारी, तुजविण संसारी ।
अज्ञानी वत्सांच्या, ज्ञाना विस्तारी ॥
वारी वारी मजला, अकर्मण्याद्वारी ।
कृतीच्या स्फूर्ती ने, आम्हा निवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी, जय स्फूर्ती देवी ।
निष्चळ मन हो सत्वर, वर दे संजीवनी ॥ धृ ॥

त्रिभुवनी भुवनी पाहता, तुलना तुज नाही ।
तव किमयेचे कौतुक, कळते लवलाही ॥
अगणित मनुजा प्रेरक, कमालीची ठरशी ।
ती शक्ती तू मज दे, गाईन तव कीर्ती ॥ २ ॥

उत्स्फूर्त वदने स्फूर्ती, देशी निजदासा ।
आळसापासुनी सोडवी, वाढवी जीवनाशा ॥
स्फूर्ते तुज वाचून, कोण वाढवी यशा ।
'नरेंद्र' तल्लीन झाला, तव धरी जिज्ञासा ॥ ३ ॥

नरेंद्र गोळे २००४१०२०

(ही आरती मायबोलीच्याच पूर्वीच्या एका गणेशोत्सवात प्रसिद्ध झालेली आहे. )

गणपती बाप्पा मोरया !

अवनिशा.., अलंपता
बुद्धीनाथ तू बुद्धीदाता
धार्मिका गौरीसुता
बुद्धी दे विनायका !

गजवक्त्रा.., एकदंता
चतुर्भुज तू देवव्रता
सिद्धीपती विघ्नहर्त्या
सौख्य दे गणनायका !

धुम्रवर्णा.., एकद्रिष्टा
मंगलमुर्ति गजानना
महाबळा मुक्तिदात्या
सन्मति दे सिद्धीनाथा !

शुभगुणांकना सिद्धीप्रिया
शुभानन तू वक्रतुंडा
स्कंदपुर्वजा सिद्धीदायका
सामर्थ्य दे तू विघ्नेश्वरा !

अल्पमति मी भक्त तुझा
तु समृद्धी दे गणराया
विघ्न हरो चराचराचे
दे पसायदान वरदेश्वरा !

विशाल.

सकल कलांचा उद्गाता
गुणेश गजानन भाग्यविधाता

प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत
गणनायक शुभदायक दैवत
या विश्वाचा त्राता विनायक
या विश्वाचा त्राता

आदिदेव ओंकार शुभंकर
मी नतमस्तक या चरणांवर
तू विद्येचा दाता गजमुखा
तू विद्येचा दाता

उठ उठ रे उठ गणराया
तुज आवडता, मोदक घे खाया

पुर्वेस तिष्ठली सूर्याची किरणे
दव ओली झाली दुर्वांची कुरणे
तुझविन जास्वंदी रुसली रे फुलाया
उठ उठ रे उठ गणराया

बघ आकाशी चंद्र गेला विलयाला
तुझ ओवाळीत ये रवी उदयाला
उठ उठ रे उठ जगाचे तम साराया
उठ उठ रे उठ गणराया

तुज संगे खेळाया जमले बघ रे गण
भावे आनंदे उत्सवती तुझाच रे सण
ह्या भक्तांची दु:खे ने विलयाला
उठ उठ रे उठ गणराया

!!! ॐ श्री गणेशाय नमः !!!

कर्णिकांची आरती पाहून मी माझी टाकली.

मग, विशाल, क्रांती आणि सत्यजीत यांनी सुंदर सुंदर आरत्या टाकल्या.

मात्र, फक्त गणपतीच्याच आरत्या इथे टाकायच्या हे माझ्या लक्षातच आले नाही. असो.

रॉबिनहुडा, इथे गुरूजी फक्त एकच आहेत "झक्की नागपुरी".

मी सन्यास घेतलेला नाही. हल्ली कमी असतो एवढेच.

हल्ली मी http://nvgole.blogspot.com/ इथेही असतो. त्यामुळे वेळ वाटला जातो.

(गणपतीच्या आरतीनंतर आपण शंकराची आरती देखील म्हणतो. त्यासाठी ही माझी रचना अर्पण.)

शंकराची आरती
जटा धारिल्या शीर्षावरती झेलियली गंगाधारा
आणि खोविला आभूषणात्मक शीतल शशि कचसंभारा
भालावरल्या नेत्रामधुनी बरसवुनी खदिरांगारा
मदनदहन करूनिया शमविला क्रोध तुवा अतिबलेश्वरा
जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा

विश्वाचा समतोल राखण्या अवलंबिशी तू संहारा
कठोर जितुका तितुका भोळा असशी तू तारणहारा
कर्पुरगोर्‍या अंगांगावर भस्म लेपिशी उग्रतरा
व्याघ्रांबरधारका महेशा, मम वंदन तुज हरेश्वरा
जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा

कंठ तुझा जाहला निळा जधि प्राशन केले हलाहला
दाह तयाचा शमवायाला नाग धारिला जशि माला
तांडवप्रिया, रूद्रनायका, कैलाशपती, त्रिशुलधरा
अर्पण ही आरती चरणि तव नीलग्रीवा पशुपतेश्वरा
जय शंकर, जय महेश्वरा, जय उमापती, हर शिवेश्वरा

(आणि त्यानंतर दुर्गेची आरतीही म्हणतो. तीदेखील इथे अर्पण.)

जगदंबेची आरती
जय अंबे, जगदंबे, दुर्गे, भवानी
हिमनगदुहिते, माते, गिरिजा, ईशानी … जय देवी जय देवी

षडाननाने वधिले तारकासुराला
तू कोलासुर अन महिषासुराला
पति समवेता तू अन तव पुत्रांनी
रक्षियले विश्वाला खलविनाश करुनी,
जय अंबे, जगदंबे, दुर्गे, भवानी
हिमनगदुहिते, माते, गिरिजा, ईशानी … जय देवी जय देवी

कालीच्या रूपामधि तू क्रोधित दिसशी
रूपामधि अंबेच्या वत्सलमूर्त जशी
आदिमाये डंका तव त्रैलोक्यामधुनी
नाना नामे दिधली तुजला भक्तानी
जय अंबे, जगदंबे, दुर्गे, भवानी
हिमनगदुहिते, माते, गिरिजा, ईशानी … जय देवी जय देवी

य:कश्चित मानव मी तुज वंदन करतो
संकटमोचन करशिल ही इच्छा धरतो
मातेच्या ममतेने घे मज सावरुनी
परिवारावर छाया मायेची धरुनी
जय अंबे, जगदंबे, दुर्गे, भवानी
हिमनगदुहिते, माते, गिरिजा, ईशानी … जय देवी जय देवी

-मुकुंद कर्णिक

हेरंबा... आरंभा... वंदन विघ्नेशा
शिवसुता मज तुझी कृपाभिलाषा
अष्टौप्रहरी चित्ती तव नामघोषा
नतमस्तक श्रीचरणी भक्त सर्वेशा
जय देव जय देव जय बुद्धीदाता
ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||

साजिरी गोजिरी मोहक मुर्ती
चराचराची चैतन्यस्फुर्ती
गजमुख ज्ञानेश्वरा तू इच्छापुर्ती
अंतरी उधाण मांगल्यभरती
जय देव जय देव जय बुद्धीदाता
ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||

विराजे मंचकी आदी अंतिमा
चतुर्भुज सुशोभित प्रतिमा
तेजाने ओजाने दग्ध काळिमा
दिव्यप्रभांकीत मुखचंद्रमा
जय देव जय देव जय बुद्धीदाता
ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||

वक्रतुंडाहाती मोदक ज्ञानाचा
परशू करी नाश अवघ्या विघ्नांचा
हर्ता अंकुश धारी षडरिपूंचा
शुभाय आशिष देई सौख्याचा
जय देव जय देव जय बुद्धीदाता
ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

लंबोदर सुंदर पाषंकुशधारी
वरदहस्ते मुर्ती मुषकाची स्वारी
नागेन्द्राचा विळखा धारूनिया उदरी
रत्नजडीत मुकुट शोभतो शिरी ||१||

सर्वांग सुंदर देवा गणराया
आदिशक्तीशाली गौरीच्या तनया
भक्तांची दु:खे नेशी तु विलया
तारिशी सारी विघ्ने करूनी तू किमया ||२||

कार्यारंभी पूजन तुझे करावे
निर्विध्न तू कार्य सिद्धीस न्यावे
संकट येता देवा मज तू तारावे
अनंतरूपे दर्शन आम्हा तू द्यावे ||३||

त्रैलोक्याचा देव देवांचा त्राता
दीनांचा उद्धार, ज्ञानाचा दाता
बुद्धीचा तू देव विद्यागणनाथा
सद्भावे ठेवितो तव चरणी माथा ||४||

तू कोटी सूर्य तेज निर्गुण आकार
ज्ञानियांचा राजा सद्गुण साकार
जय जय श्री गणराज मज तू पावावे
मानून घे ही सेवा केली मनोभावे ||५||

आनंदे उत्सवे राहिलासी देवा
पुढच्यावर्षी लवकर येशील ना देवा
काही झाले अनुचित देवा क्षमा असावी
तुझी सतकृपा सदैव आम्हावरी व्हावी || ६||