ब्येनं

Submitted by जव्हेरगंज on 22 October, 2015 - 13:25

तोंडात माणिकचंद रिकामा करुन बब्यानं गस्टेल नेम धरुन रिंगणात फेकला. तशी आदीली रिंगणाभाईर आली. पण गस्टेल थोडा रिंगणात लायनीला शिवत पडला.
"बल्ल्या " उड्या हाणत संत्या, राम्या, आन राजा किंचाळली.
बब्यानं पळतच जाऊन गस्टेल नीट बघितला.
" ये आरं आतच हाय की " चवड्यांवर बसुन बब्या पोरांकडं बघत म्हणाला.
मग संत्यानं एक बारकिशी काटकी घीऊन रिंगणाच्या लायनीवर हळुहळु फिरवली. बाकीची पोरं नीट नजर लावुन बघाय लागली. गस्टेल थोडासा हलला.
"बल्ल्या " पुन्हा एकदा पोरं ऊसळली.
"ये बल्ल्याच झालाय, टाक आजुन येक आदीली" संत्या सुड ऊगवत म्हणाला.
माणिकचंदची पिचकारी मारत बब्यानं खिशात हात घातला. त्याच्या खिशात शंभर गोष्टी. माणिकचंदची आख्खी माळ त्याच्या दोन्ही खिशात भरुन मावायची. बराच वेळ खुसपुस करुन घोळुन घोळुन त्यानं एक आदीली भाईर काढली. ऊभ्या ऊभ्याच त्यानं ती रिंगणात फेकली. सगळं पैसं पुन्हा रिंगणात ठिवुन नवा डाव सुरु झाला.

आता संत्यानं गस्टेल हातात धरला. पोरांनी श्वास रोखुन धरला. संत्याचा गस्टेल एकदम कारी. सप्पय. नेम धरुन त्यानं आज्जाद गस्टेल रिंगणात सोडला. बरोब्बर रुपायावर पडला. त्ये पण रिंगणाच्या आत.
"ठोचळाच मारला की लगा त्वा" राजा हाताची घडी घालत कपाळावर आठ्या पाडत हासतच म्हणाला.
बब्यानं तोंडावर बोटं ठिवुन आजुन एक पिचकारी मारली.
" आपला गस्टेल हाय भाव्वं त्वो" मांडीवर थाप टाकत संत्यानं रुपाया ऊचलला.
"पाच कमी चाळीस, आज वीस रुपय गेलं" विचार करत बब्या मनाशीच म्हणाला. काल तिरट खेळताना तो सत्तर रुपय हारला होता. आन आजच्या रिंगाटात बी त्याला नशीब साथ देत नव्हतं.
डाव संपत आला तरी बब्याला टाकलेली मोज बी परत मिळाली न्हाय.
"चलै आजुन एक डाव खीळु" बब्यानं आजुन एक माणिकचंदची पुडी फोडली.
"बास करय आता, संध्याकाळी यं, घरामागं खीळु" संत्या खिशातला खुर्दा वाजवत म्हणाला.
" आसं कसं?, माझं पैशं गेल्यात, आजुन एक डाव तुला खेळायच लागल " बब्या भाया वर सारत म्हणाला.
"निघ आता" राजानं त्येला बाजुला सारलं. पोरं समदी घराकडं निघुन गेली.

बब्या हिरमुसला. जरा वेळ बसुन गावात निघुन गेला. आजपण त्यानं शाळेला दांडी मारली हुती. चौथीच्या वर्गात नापास होत होत त्याला मिसरुडं फुटली हुती.
चौकात त्याला मन्या दिसला. दोघं जिगरी दोस्त. हाणमाच्या हाटीलात भजीपाव हाणुन रॉयल थेटरात दोघबी पिक्चर बघाय गेली. थेटर कसलं पत्र्याची खोलीच ती. मधोमध टिवी ठेऊन व्हि सी आर वर पिक्चर दाखवायचे. सगळेच मिथुनचे. पाच रुपायामध्ये. माणिकचंदच्या पुड्याच्या पुड्या फोडुन दोघबी पिचकाऱ्या मारत सिनेमा बघत बसले. कटाळा आल्यावर मधनचं ऊठुन दोघबी चौकात आली.

" घारापुरीला जायचं कारं जत्रला? यीव तमाशा बघुन" मन्या कॉलर मोकळी सोडत अॅक्शन घेत म्हणाला.
"बापाला कळलं तर गुरावाणी बदडलं, जाऊ आता घरीच" बब्याला त्याचा खवीस बाप आठवला.
" कुंचा पीच्चर बघितला रं फोपलीच्या ?" बाप त्येच्या मागचं ऊभा होता.
बापाला बघुन बब्या घाबरला. मन्या धुम ठोकून कुठं गायब झाला त्याला कळलं पण न्हाय.
पळतच बब्या घरी सुटला.
बापानं बी एम ऐटी काढुन त्याचा पाठलाग सुरु केला. बाप जवळ आला तसा माळ्याच्या शेतात ऊडी घेऊन तो ऊसात पसार झाला.
गाडी वाटला लावुन त्याच्या बापाने दोनचार दगड ऊसात भिरकावले.
" रातच्याला यी घरी, कापुनच टाकतू तुला" रागारागानं दम देऊन बब्याचा बाप पुन्हा गावात गेला.

ढेकळं आणि चिखलात बब्याला काय चालनं हुईना. रडतच तो कसाबसा चालत राहिला. फडातनं भाईर यीवुन पांदीचा रस्ता पकडला. मग पुन्हा वगळीतनं चालत तुकाच्या शेतात शिरला.
मागल्या वेळी जवा बापानं बब्याला तंबाखू खाताना पकडलं तवा त्याला दिवसभर झाडाला बांधुन ठिवलं हुतं. तिरट न रिंगाट खेळताना दिसला तर हाताला घावल ती वस्तु बब्याचा बाप त्याला फेकुन मारायचा. आजतर बापानं थेटरातनं भाईर येताना बघितलं हुतं. बब्या थराथरा कापत चालत राहिला.

हिकडं घरामागं रिंगाट आखुन पोरांचा नवा डाव सुरु झाला.
गस्टेल हातात घीऊन राजानं नेम धरला. सगळ्या पोरांनी श्वास रोखुन धरले. राजानं जसा गस्टेल फेकला तसा भेलकांडत तो पार रिंगणाच्या भाईर जाऊन पडला.
"बल्ल्या" चप्पल हातात घीऊन आन खालुन पॅन्ट दुमडलेला बब्या ऊसाच्या बांधावरनं वरडतचं खाली आला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
जव्हेरगंज... तुमची भाषा सोलापुरी-नगरी वाटती. खरंय का? छोट्या छोट्या गोष्टी मस्त रंगवताय तुम्ही. आवडतंय वाचायला.

आता लिखाणाची शैली लक्षात येते आहे त्यामुळे अर्धवट वाटली नाही.
हे लिखाण म्हणजे रंगीबिरंगी काचा लावून बनवलेल्या खिडकीच्या तावदानासारखे आहे.
तावदान एकसंध असले तरी रंग निरनिराळे.

त्यातही इतक्या कमी शब्दात खुप काही सांगता तुम्ही.
चप्पल हातात घीऊन आन खालुन पॅन्ट दुमडलेला बब्या ऊसाच्या बांधावरनं वरडतचं खाली आला.
चित्रदर्शी वाक्ये आहेत.
गझलेचा जसा अगदी किमान शब्दात बांधलेला छोटा बहर असतो तसा तुमचा कथेचा छोटा बहर आहे असे वाटले.

आवडले आहे हे वेगळे सांगायला नकोच! Happy

बब्याला आई नाही काय?>>>>>>>>
आहे की, पण त्याचा उल्लेख करायची आवश्यकता नाही वाटली. Happy

मस्त लिहिलंय.

असं खरच घडतं.
'लाथा घातल्या शिवाय पोरं येत नाही वळणार' हेच मानसशास्त्र जाणणारे बाप आणि येवढा मार खाउन करायचं तेच करणारी पोरं .. अशी बरीच उदाहरणं होती गावात.
दृष्य डोळ्यापुढे उभं राहिलं

तसं नाही हो .. बब्याबद्दल वाईट वाटलं म्हणून जीव लावणारं कोणीच नाही का अशा अर्थाने विचारलं .. स्वगत Happy

चप्पल हातात घीऊन आन खालुन पॅन्ट दुमडलेला बब्या ऊसाच्या बांधावरनं वरडतचं खाली आला. >>>>>>>>>>> Happy खरंच ब्येनं. Happy
छान लिहिता तुम्ही.

असे लई बब्ये आणि संत्ये, मन्ये आजूबाजूला होते. किंबहुना त्यांच्यातच वाढलो. गस्टील म्हणायचो आम्ही त्याला. चिंचोकेही असत. मात्र पैसे त्यावेळेला हाताळायला मिळायचे नाहीत . बापांनाच नाहीत तर पोरास्नी कुठून? नुसत्या बार्टरवर चालायचे. संध्याकाळी शक्य असते तर क्रिकेटसारखा 'लाईट मीटरही 'वापरला असता Proud

उत्कृष्ट !!!

छानच लिहिलंय.. पैश्याच्या बाबतीत रॉबीन म्हणतोय तेच. माझ्या लहानपणी काजूच्या बिया, बिटक्या यांचे बार्टर चालायचे ( अर्थात आजोळी, मुंबईचे खेळ वेगळे )

पैसे हातात असणं हे मध्यमवर्गयांपेक्षा, गरीब पोरांच्यात असणं जास्त होतं, आमच्यावेळी.
पोरं रडली तर हातात काही नाणे टिकवून जा खाऊ घे, असं गरिब पोरांच्यात जास्त.
शाळेत जाताना रस्त्यावरच्या गाड्या: चिकी, रेवडी, बोरकुट, बिस्किट विकत घेणारे आणि पिच्चरला जाणारे गरीब पोरंच जास्त असत.
मध्यमवर्गीय लोक पोरं बिघडतील म्हणुन मुलांच्या हाती पैसे कधी देत नसत.
दिलेच कधी (शक्याता कमी) तर नक्की काय केलं त्याचं याचा हिशेब द्यावा लागे. उरलेले पैसे दाखवावे लागत.
गरिबांच्या वस्तीत पैसे लावुन खेळणारी पोरं सर्रास दिसत.
पण पाच पैसे / दहा पैसे. चाराणे म्हणजे मोठं नाण. एका कडे साधारण दोन तीन रुपये.

हे साधारण कुठल्या काळातले वर्णन आहे?
>>
टी व्ही व व्हीसी आर चे वर्णन आहे म्हणजे १९८५ते २००० मधले असावे.अखेड्यात आता बहुधा क्रिकेट भयंकर बोकाळले आहे आगदी आदिवासी भागातही डोंगर दर्‍यातही खेड्यात मुले क्रिकेट खेळताना दिसतात कारण डिश टीव्ही. ( देऊळ आठवा) मुलानी लहानपणापासून पाहून पाहून क्रिकेट वगळता काही खेळत नाहीत असे दिसते.

बरोबर , साधारण १९९५ च्या आसपासचे वर्णन आहे. नव्वदीचे दशक हा म्हणजे सुवर्णकाळ होता माझ्यासाठी तरी. कळत्या वयातल्या ठळक आठवणी याच काळातल्या. आमच्या वाडीवर आधुनिकतेची झालर खुप ऊशीरा आली.

गरीबड्या बब्याकडे एवढे पैसे कुठुन यायचे हा आमच्यासाठी कुतुहलाचा विषय होता. ते कोडं अजुनही आहे.

भिडू बदलले तरी असे खेळ अजुन चालुच आहेत. प्रमाण मात्र कमी झालयं हे खरं. बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन आलेत. डांबरी, स्लॅप, डिश, बाईक आल्या तरी भिडुंचा बेलगाम दिलदार छछोरपणा कायम आहे.
आमचं गाव फारसं बदललय असं मला अजुनतरी वाटत नाही.

सर्वांचे आभार Happy

बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन आलेत. डांबरी, स्लॅप, डिश, बाईक आल्या तरी भिडुंचा बेलगाम दिलदार छछोरपणा कायम आहे. आमचं गाव फारसं बदललय असं मला अजुनतरी वाटत नाही. >> अगदी असंच वाटलं यावेळेस गणपतीत संध्याकाळी चौकात मांडवाजवळ उभे राहताना.

त्यावेळेस आम्ही स्लो सायकलींग रेस ला उभे असायचो आता आमचे सवंगडी त्या भरवतात आणि इतर चिल्ली-पिल्ली येतात आपापल्या सायकली घेऊन.