मी एकटा आहेच कुठे ? ('खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात नमूद केलेला लेख)

Submitted by स्वीटर टॉकर on 19 October, 2015 - 04:25

'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः

माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच!

अनेक वेळा खूप वैताग येई. ‘देवानं मला आता किती आयुष्य बाकी ठेवलं आहे? ते कमीत कमी असेल तर बरं होईल’ असे विचार प्रकर्षाने मनांत येत. पण ते जे असेल ते असेल. त्यात काही फरक पडणार नाही आणि माझं त्यावर काही नियंत्रणदेखील नाही. मग ते मी चांगलं आणि आनंदात का घालवू नये?

माझा ‘आत्मा’ किंवा ‘पुनर्जन्म’ इत्यादि गोष्टींवर विश्वास नाही. त्यामुळे माझी पत्नी स्वर्गात आहे आणि ती माझ्याकडे पहात आहे किंवा माझी वाट पहात आहे असा विचार मी करीत नाही. तिचं आयुष्य संपलं. तिचा या जगातला मुक्काम संपला. आणि तिचा माझा सहवासही संपला.

माझा आणि तिचा एकसष्ट वर्षांचा सहवास झाला. दृष्ट लागावी इतका तो चांगला झाला. त्याच्या आठवणी अत्यंत हृद्य आहेत. मी त्या आठवणी कवटाळून बसंत नाही.

त्या हृद्य आठवणींना पुन्हा उजाळा देऊन त्यांतला आनंद पुनह्पुन्हा लुटायचा - का ‘आता तिचा सहवास होणे नाही’ या विचारानी दुःखी व्हायचं हा निर्णय आपल्यालाच करायचा असतो.

आता माझं जे उर्वरित जीवन आहे ते स्वतःकरिता आणि इतरांकरिता आनंदी कसं करीन इकडे मला लक्ष द्यायचे आहे. मला तसे खास छंद नाहीत. संगीत वगैरेसारख्या कलाही माझं मन आकर्षित करंत नाहीत. पण मला लेखनाची आणि वाचनाची जी आवड आहे ती मी उर्वरित आयुष्यात जोपासीन. त्यांचा आनंद मला भरपूर घेता येईल.

त्याचबरोबर माझं मित्रमंडळ आहे त्यांचीही या कामात मला भरपूर मदत होणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, त्यांचे उपगट या सर्वांचा मला उपयोग होणार. मुळात आपल्याला स्नेही मिळावेत म्हणूनच ना आम्ही दोघांनी या संघात प्रवेश घेतला? आणि आमचं ते उद्दिष्ट आमच्या कल्पनेपेक्षा उत्तम साध्य झालं. हा स्नेह वास्तविक फक्त गेल्या दहा बारा वर्षांचा. पण तो आयुष्यभराचा आहे असं वाटावं इतका तो दृढ आहे. त्यातून मी भरपूर आनंद घेतो आणि देतोही. माझ्या दुःखाचे मी चुकूनही प्रदर्शन मांडून बसत नाही. कारण तसं करणं हा स्वतःविरुद्ध तर अपराध आहेच, पण तो इतरांच्या विरुद्ध जास्त अपराध आहे. एक दुःखी माणूस इतर चार माणसांना दुःखी करीत रहातो.

स्नेह्यांप्रमाणेच माझे जवळचे नातेवाईकही माझं जीवन आनंदी रहायला मदत करीत असतात. माझी मुलं, माझे भाऊ, बहीण, पुतणे, पुतण्या, भाचे, या सर्वांची मदत असते. आमचं कुटुंब मोठं आणि संबंध खूप जवळचे अशी स्थिती असल्यामुळे माझं जीवन आनंदी रहिलेलं आहे.

मात्र एक गोष्ट लक्षातंच ठेवायला हवी की प्रत्येक मनुष्य एकटाच असतो. तो एकटाच येतो आणि एकटाच जातो. इतकंच नव्हे तर तो एकटाच जीवन जगतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं आरोग्य आणि त्याचं आयुष्य हे त्याचं त्यालाच भोगायचं अथवा उपभोगायचं असतं. इतर त्याला मदत जरूर करतील पण ते त्याचा भाग बनू शकत नाहीत.

या सर्व गोष्टींची पुरेपूर जाणीव ठेवून मी माझं जीवन जगतो. एकटेपणाची एकदा सवय झाली की त्याचा त्रास तर होत नाहीच, पण त्यातली गोडी देखील समजते. एकांतात मनुष्य पुष्कळ विचार करतो. बुद्धासारखा माणूस जेव्हां विचार करतो तेव्हां त्याला मानवाच्या सुखदुःखाचं रहस्य सापडतं आणि जगाला ते सांगतो. जेव्हां आपल्यासारखा सामान्य माणूस विचार करतो तेव्हां आपल्याला स्वतःच्या सुखदुःखांचं रहस्य सापडतं. इतर आपल्याशी किती प्रेमाने वागतात, आपल्याकरिता किती करतात याची जाणीव या विचारातूनच होते आणि आता रहिलेलं जीवन मी आनंदात घालवीन आणि त्यायोगे इतरांचं जीवनही आनंदी करीन, निदान दुःखी करणार नाही असा विचार करतो आणि स्वतःचं दुःख विसरतो.

आप्पा गोडबोले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सकारात्मक दृष्टिकोन, आणि सुंदर विचार.

>>>>माझ्या दुःखाचे मी चुकूनही प्रदर्शन मांडून बसत नाही. कारण तसं करणं हा स्वतःविरुद्ध तर अपराध आहेच, पण तो इतरांच्या विरुद्ध जास्त अपराध आहे. एक दुःखी माणूस इतर चार माणसांना दुःखी करीत रहातो.<<<<

खुप छान विचार तर आहेतच, पण हे ज्यांना जमलं त्यांनी जिंकलं.
आप्पांना शि.सा.नं.

Chhaan preraNadayee lekh.. Yaa vaaTevar sagaLyaanaach, kadhteetaree jaave laagatech.

मात्र एक गोष्ट लक्षातंच ठेवायला हवी की प्रत्येक मनुष्य एकटाच असतो. तो एकटाच येतो आणि एकटाच जातो. इतकंच नव्हे तर तो एकटाच जीवन जगतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं आरोग्य आणि त्याचं आयुष्य हे त्याचं त्यालाच भोगायचं अथवा उपभोगायचं असतं. इतर त्याला मदत जरूर करतील पण ते त्याचा भाग बनू शकत नाहीत.>>>>

हेच अंतिम सत्य.

किती सकारात्मक लिहिलंय ! सगळ्यांनी आवर्जून वाचावा आणि सतत स्मरणात ठेवावा असा लेख आहे.

आप्पांना मनःपूर्वक नमस्कार __/\__ !

लेख खूप आवडला. आप्पांना सादर प्रणाम. आपला पेला अर्धा पाण्याने आणि अर्धा हवेने भरलेला आहे, असा सकारात्मक विचार करणारी आणि अमलातही आणणारी माणसं, खरच विरळा. लेख इथे दिल्याबद्दल तुमचेही आभार!

मात्र एक गोष्ट लक्षातंच ठेवायला हवी की प्रत्येक मनुष्य एकटाच असतो. तो एकटाच येतो आणि एकटाच जातो. इतकंच नव्हे तर तो एकटाच जीवन जगतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं आरोग्य आणि त्याचं आयुष्य हे त्याचं त्यालाच भोगायचं अथवा उपभोगायचं असतं. इतर त्याला मदत जरूर करतील पण ते त्याचा भाग बनू शकत नाहीत.>>>>

हेच अंतिम सत्य. +१००००

अतिशय सुरेख लिहिलंय. किती सकारात्मक विचार!!
आप्पांना सा. न. आणि शुभेच्छा.
स्वीटर टॉकर, तुमचा मूळ लेखही खूप छान आहे. Happy

जीवनाचं तत्व इतक्या साध्या सोप्या शब्दात मांडणारे आणी अंमलात आणणारे आप्पा, खरोखरंच आदर्श आहेत.

___/\___

मात्र एक गोष्ट लक्षातंच ठेवायला हवी की प्रत्येक मनुष्य एकटाच असतो. तो एकटाच येतो आणि एकटाच जातो. इतकंच नव्हे तर तो एकटाच जीवन जगतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं आरोग्य आणि त्याचं आयुष्य हे>>>>>>सुरेख.Everybody has to carry his cross on his shoulder.याची आठवण झाली.

ती. आप्पांतर्फे तुम्हा सर्वांचे आभार !

त्यांचे विचार जसे आहेत तसेच आचारही. म्हणतात ना, 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले .'

आम्ही उगीच नाही त्यांना सुपरमॅन म्हणत.

कित्ती सुरेख लिहिलयं. आप्पाना माझा सां न. कायमचं लक्षात रहाण्यासारखं.
भारतातून यायला निघालं कि पाय उचलत नाहीत. माझे वडिल,तेव्हा नेहमी म्हणतात, "माणुस एकटाच येतो. एकटाच असतो गं नेहमी. सगळेजणं तात्पुरते सोबती. कुणी कुणाला पुरत नाही . "ते आठवलं.

खूप छान विचार.
एकटं असणं फार त्रासदायक असतं. पण अप्पांनी ज्या सकारात्मकतेने स्विकारलय आणि शब्द रुपात मांडलयं.. खरचं Hats off.!
हा लेख इथे टाकल्याबद्दल तुम्हाला ही धन्यवाद.

>>>>माझ्या दुःखाचे मी चुकूनही प्रदर्शन मांडून बसत नाही. कारण तसं करणं हा स्वतःविरुद्ध तर अपराध आहेच, पण तो इतरांच्या विरुद्ध जास्त अपराध आहे. एक दुःखी माणूस इतर चार माणसांना दुःखी करीत रहातो.<<<< +१

मात्र एक गोष्ट लक्षातंच ठेवायला हवी की प्रत्येक मनुष्य एकटाच असतो. तो एकटाच येतो आणि एकटाच जातो. इतकंच नव्हे तर तो एकटाच जीवन जगतो. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं आरोग्य आणि त्याचं आयुष्य हे त्याचं त्यालाच भोगायचं अथवा उपभोगायचं असतं. इतर त्याला मदत जरूर करतील पण ते त्याचा भाग बनू शकत नाहीत.>>>> +१

सुपरमॅन हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांना सा.न. _/\_

खूप छान लेख.

वाचायला छान वाटतं पण अंगिकारायची वेळ आली की जमण्यास कठीण, मात्र ते एकदा जमलं की सगळंच सोपं होऊन जाईल.