बाप्पासाठी आगळा वेगळा नैवेद्य

Submitted by संयोजक on 20 August, 2009 - 15:51

गणपती बाप्पाच्या प्रसादाची एक आगळीच मजा असते. विशेषत: मंडळाचा अथवा सोसायटीचा गणपती असेल तर रोजचा प्रसाद म्हणजे उत्सुकतेचा विषय. एखाद्या सुगरण काकू असतात ज्या अगदी कल्पकतेने दरवर्षी नवनवा नैवेद्य बनवतात. त्यांच्या हातच्या प्रसादाची गोडी काय वर्णावी असेच सर्वांना वाटते. एखादे आजोबा असतात जे हौसेने गावातल्या प्रसिद्ध हलवायाकडचे चांगले तळहाता एव्हढे पेढे प्रसादाला आणतात. हे पेढे एरवी कितीही खाल्ले तरी गणपतीच्या दहा दिवसात प्रसाद म्हणून हातावर टेकलेला एकच पेढा किती गोड लागतो. एखाद्या जुन्याजाणत्या आजी, "काय गं तुम्ही आजकालच्या मुली..." म्हणत का होइना पण पातळ पारी, नाजूक एकसारख्या कळ्या असलेले उकडीचे मोदक थरथरत्या हातांनी मेहनत घेऊन बनवतात. ह्या प्रसादाची पण एक गम्मतच आहे, तो बनवण्यात, देण्यात आणि घेण्यात जो आनंद आहे त्याची सर कश्शाला म्हणून येणार नाही. तर मंडळी आपण स्वत:, ओळखीत, नात्यात, घरी, शेजारी कुणी ना कुणी निग्रहाने बनवलेला, आग्रहाने वाटलेला आणि समाधानाने चाखलेला असा एखादा खास प्रसाद आपल्या मायबोलीच्या गणपतीबाप्पाला नैवेद्य दाखवणार ना ? तसेच ह्या प्रसादाविषयी एखादी आख्यायिका, घटना, आठवण दिलीत तर स्वागतच आहे. प्रकाशचित्र दिल्यास उत्तम. बाप्पासाठी आगळा वेगळा नैवेद्य देण्यासाठी आहे हे खास दालन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे नैवेद्याला काय करायचे याचे काही संकेत आहेत. आपण गणपतीसाठी परंपरेने जरी उकडीचे मोदक करत असलो तरी, ते तसे या संकेतात बसत नाहीत. या संकेताप्रमाणे, पदार्थात पाणी वापरणे निषिद्ध असते. पाण्याच्या जागी दूध वापरतात. सत्यनारायणाचा प्रसाद, दूधात बेसन भिजवून केलेले बूंदीचे लाडू, या संकेतात बसतात. या संकेताप्रमाणे केलेला हा प्रसाद.

साहित्य : दोन राजेळी केळी, सव्वा वाटी साखर, पाव वाटी भाजलेला रवा, दोन वाट्या कणीक, दोन मोठे चमचे तूप, लागेल तसे दूध, स्वादासाठी वेलची पुड.

कृति : राजेळी केळी सालासकट मायक्रोवेव्ह मधे भाजून घ्या. (ही जरी केळी असली, तरी साध्या केळ्यांपेक्षा ही वेगळी जात आहे. शक्यतो शिजवूनच खावी लागतात. वरच्या साली बर्‍याच काळ्या झाल्या की शिजवतात. साली पिवळ्या असताना, ती थोडी आंबट लागतात. या केळ्याच्या गराला नैसर्गिक सोनेरी पिवळा रंग येतो. केरळमधल्या बनाना चिप्स याच केळ्यांचा असतात. गोव्याला त्याना रसबाळी म्हणतात तर इंग्रजीमधे प्लांटेन म्हणतात. ही केळी आफ्रिकेत व आशियाई देशात, बालाहार म्हणून वापरतात.
टोमॅटो केचप मधे पण याचा गर दाटपणासाठी वापरतात.) भाजल्यावर सोलून घ्या. कुस्करून यात साखर मिसळा व आटवत ठेवा. सतत ढवळावे लागेल, पाणी बरेचसे आटले कि रवा मिसळा. घट्ट शिजवून घ्या. वेलची पुड घालून थंड करत ठेवा. कणकेला तूप चोळून घ्या. दूध घालून पुरीसाठी भिजवतो तशी कणीक मळून घ्या. अर्धा तास तसेच ठेवून, त्याचे गोळे करा. हाताने खोलगट पारी किंवा लाटून पुरी करुन त्यात,
चमच्याने सारण भरा. शक्यतो गोड सारण चमच्यानेच भरावे, हात चिकट झाले तर मोदक नीट वळता येत नाहीत. (सारणाचेही आधी गोळे करुन ठेवले तर छान ) मग पुरीला वा पारीला सारख्या अंतरावर चिमटे घ्या. (पाच, सात, नऊ अश्या संख्येत ) मग हे चिमटे अंगठा व पहिले बोट यानी दाबत, वर ओढा. इंग्रजी सातप्रमाणे हे दिसतील. मग अंगठा व पहिले बोट यांचा गोलाकार करुन या सर्व मुखऱ्या, एका दिशेने फिरवून आवळून घ्या. मग आणखी घट्ट करुन, वर टोक काढा. (या फोटोतले मोदक, मी माझ्या मित्रांकडून करवून घेतले आहेत. म्हणून घटाघटाचे रुप वेगळे आहे.) मग हे मोदक, एका तूप
लावलेल्या डिशमधे रचून, १५ ते २० मिनिटे, १८० तपमानावर बेक करा. बेक करताना लक्ष ठेवा, हे साध्याच ओव्हममधे करावे लागेल, मायक्रोवेव्हमधे आतले सारण जळण्याची शक्यता आहे. हे मोदक चाळणीवर ठेवून वाफवूही शकता (पण पाणी वापरावे लागेल). संकेताप्रमाणे मोदक केले की एक करंजी करायची आणि करंज्या केल्या की एक मोदक करायचा असतो. हे दोघे बहीण भाऊ, म्हणून त्याना एकमेकांची सोबत आवडते. बाप्पाला नैवेद्य दाखवा. हे मोदक तीनचार दिवस टिकतील.

modak_0.jpg

छान आहे सारण. Happy करुन पहाणार नक्की.
खवा, गाजर हलवा, खजूर, आंबा शिरा हे सारण म्हणून वापरुन झाले आहे.

शिर लाडु:
साहित्यः
२ वाटी कणिक, तेल, १ वाटी दुध, १ वाटी साखर.
कृती:
दुधात साखर मिसळुन घ्यायची. कणकेत तेल घालुन मिसळुन घ्यावी (मुठ बसेल इतके तेल घालावे ). नंतर ह्या मिश्रणात दुधाचे मिश्रण घालुन मळुन घ्यावे. चकली सारखा आकार करुन तळुन घ्यावे.
DSC_0272.JPG

दिनेश, आमच्या कडेही शेवटच्या म्हणजे पाचव्या दिवशी नेवेद्याला राजेळी केळ्यांचाच गोड शिरा/हलवा नामक प्रकार करतात. फोटो नाहिये (गेल्या वर्षीचा). ह्यावर्षीचा फोटो गुरुवारी/शुक्रवारी टाकु शकेन

साहित्यः
२ पिकलेली राजेळी केळी
साखर (अंदाजे)
तूप (अंदाजे)
ओला नारळ अर्धा
वेलची पावडर (स्वादासाठी)
बदाम, काजु (पातळ काप) हवे असल्यास घालु शकता

केळी सोलुन गोल काप करुन घ्यावेत. ते तुपावर परतुन घ्यायचे. थोडे परतले की त्यात नारळ घालुन परतायच. नारळ खमंग परतला तर हा पदार्थ २-३ दिवस आरामात टिकतो. परतताना थोडी काळजी घ्यायची नाहीतर केळ्याच्या कापांचा पुर्ण लगदा होईल. परतुन झाली की त्यात साखर, वेलची पावडर घालुन साखर विरघळु द्यावी. मधुन मधुन हलवत रहावे नाहितर केळी, नारळ पातेल्याला खाली लागतात. साखर विरघळुन मिश्रण एकजीव (तरीही केळी फार कुस्करली जाता कामा नयेत) झाल की झाला तय्यार
ह्यात बदाम काजुचे काप घालु शकता साखर घातल्यावर किंवा मुद पाडताना वाटित आधी हे पातळ काप फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे लावायचे त्यावर हा शिरा/हलवा घालुन त्याची मुद पाडायची

हा आगळा वेगळा नेवेद्य नसला तरी मस्त लागतो. रवाही टाकू शकतो ह्या बर्फीत.

१ वाटी दूध पॉवडर त्यात १ चमचा तूप व दूध टाकून खरपूस भाजावी(ह्याने टिकते). तो पर्यन्त रत्नाचा एक वाटी मँगो पल्प स्लो कूकर मध्ये टेम्प अ‍ॅडज्ट्(हे तुमच्याकडे कुठला आहे त्यावर अवलंबून आहे, फक्त कमीत कमी टेम्प असावे) करून आटवावा. अजिबात लक्ष द्यावा लागत नाही एक तासातच मस्त आटतो. पुर्ण आटवू नये. तो काढून भाजलेला खवा चक्क चपातीच्या पिठासारखा रसात मळून वेलची,केसर टाकून पोळी लाटून थापावी तूप लावलेल्या थाळीवर. ही थाळी फॉइलने कवर करून ओवन मध्ये १२५ वर १५ मिनीटे ठेवावी , असे केल्याने खूप ड्राय होत नाही व टिकते. ही झाली बर्फी. ह्यात हवाच असेल तर रवा भाजावा. नाहीतर गोळा मळल्यावर सच्यात मोदक करावे नाहितर हातानेच वळून वरील प्रमाणेच झाकून ओवन मध्ये जरासे कोरडे करावे. मध्ये चेक करावे. हे ओवन सेटींग वर आहे. कधी कधी काळे पडतील लगेच.
aambabarfi.jpg

श्रीगणेशाच्या प्रसादासाठी म्हणून आज पहिलूनच हा प्रयोग करून बघितला आणि चक्क यशस्वी झाला! बाप्पाची कृपा!

सफरचंदाचे वडे :
१ सफरचंद
दोन मोठे चमचे साखर. (मी घरात होती म्हणून जाडी ब्राउन शुगर वापरली.)
जायफळाची पूड, चिमूटभर.
चार वेलदोडे कुटून.
४-५ काड्या केशर
मूठभर बदामांचा कूट (ओबडधोबड)
८-१० बेदाणे (किसमिस)
आणि पाऊण वाटी खमंग भाजलेली कणिक
चमचाभर तेल

कृती :
*कणीक भाजून, बदाम आणि वेलदोडे कुटून, जायफळ किसून झालं की मगच सफरचंद किसायला घ्यावं.
*किसल्यावर त्यात लागलीच साखर मिसळावी. बाकीचे घटक घालावे. मिश्रण बर्‍यापैकी घट्ट होईल.सफरचंदाला साखरेमुळे पाणी सुटेल तेव्हा मळायला वरून काही दूध/पाणी काही घालावं लागणार नाही.
*ह्या मिश्रणाचे तळहातावर चपटे वडे करून गरम (नॉनस्टिक) तव्यावर चमचाभर तेल घालून दोन्ही बाजूंनी खमंग परतावे, भर तेलात तळावे लागत नाहीत. (व्यवस्थीत शिजतात.)
(वडे साजुक तुपात भाजले तर कदाचित आणखी छान लागतील.)

MB-GU-prasad.JPGMB-GU-prasad-sideview.JPG

म्रू! एकदम मस्त आलाय फोटो!
मने भाजलेला खवा म्हणजे सुरवातिला दुध पावडरच बनवलय ते का?

आमच्याकडे विसर्जनाच्या दिवशी वाटली डाळ करतात. माझ्या सासुबाईंच्या हातच्या वाटलीडाळीची अजुनही विसर्जनाला येणारी मंडळी आठवण काढतात. विसर्जनाला जाताना डब्यात भरुन नेलेली डाळ सगळी संपुनच डबा घरी येतो.

वाटलीडाळ कशी करतात हे सगळ्यांना माहित असेलच पण तरीही ... Happy

साहित्यः
चणाडाळ ४वाट्या
२ बटाटे (काचर्‍या करुन)
ओल खोबर
मिठ, साखर चवीनुसार
कोथिंबीर, लिंबु
फोडणीच साहित्य

चण्याची डाळ छान धूउन ५,६ तास भिजत घालावी. नंतर डाळ चाळणीत टाकुन त्यातल पाणी पुर्णपणे निथळु द्याव. पाणी निथळल्यानंतर जमल्यास डाळ खलबत्यात कुटावी किंवा मग मिक्सर आहेच.
कढईत भरपुर तेलाची फोडणी करुन मस्त कडिलींब टाकावा. मग बटाट्याच्या काचर्‍या टाकाव्यात. थोड मिठ टाकाव. बटाट्यामुळे डाळ खुप कोरडी होत नाही. बटाटे शिजले कि वाटलेली डाळ टाकावी. डाळिसाठी मिठ व थोडी साखर टाकावी. भरपूर वेळ परतवे. डाळ मस्त शिजुन कोरडी झाली पाहिजे. २ वाफा द्याव्या. खोबर टाकवे. थोड्यावेळ परतुन उतरवावी.
लिंबु पिळुन व कोथिंबीर बारीक चिरुन टाकावी.

दर वर्षी ठरवतो कि मधे कधीतरी वाटली डाळ बनवुया पण ती हमखास विसर्जनाच्या दिवशीच बनते आणि खूप खास लागते. Happy

शनिवारी बाप्पाच विसर्जन असल्याने फोटो शनिवार नंतर टाकेन.

प्राजे, अग नुसती कुठलीही फॅट फ्री दूध पॉवडर घे एक वाटी. त्यात एक चमचा तूप व दूध एक चमचा. मग मायक्रोवेव मध्ये थोडे शिजवून मग लालसर करायला ओवन मध्ये ठेवायचा.(मला तर ह्या स्टेप ने कंदी चव लागते.)

हा माझ्यातर्फे बाप्पासाठी नैवेद्य. ह्याला दह्याच्या किंवा श्रीखंडाच्या वड्या म्हणतात. ह्याआधी मायबोलीवर ही कृती आली आहे की नाही माहिती नाही. माझी आई नेहेमी करते. आंबट गोड चवीच्या ह्या वड्या फार छान लागतात.

साहित्य: १ वाटी डाळीचे पीठ, १ वाटी चांगले आंबट घट्ट दही, १/२ वाटी तूप, २.५ वाट्या साखर.
कृती: सर्व साहित्य नीट एकत्र करुन कढईत मंद आचेवर ठेवावे. एकसारखे हलवत रहावे अथवा मिश्रण तळास लागण्याचा संभव आहे. थोड्या वेळाने मिश्रणात पांढरे बुडबुडे येतील तसेच कडेला साखर जमा व्हायला लागेल. तुपाचा हात लावलेल्या ट्रेवर मिश्रण एकसारखे पसरावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

काजू मोदक:
१ वाटी सुके काजूची पॉवडर करायची. त्यात चवीप्रमाणे साखर,३ चमचे दूध व १/४ चमचा तूप टाकून गॅसवर जरासेच परतून घ्यायचे मग मळून घ्यायचे कणी बनेल ती मळून पिठ करायचे.( एकही गूठळी होवु द्यायची). लगेच मोदक वळायचे,हा झाला बप्पाचा प्रसाद. आरती झाली की प्रसाद वाटायचा.
(हे मोदक टिकत नाहीत बाहेर, फ्रीजमध्ये पण २ दिवस ठेवणे ठिक कारण कडक गोळा होतो थंड होवून म्हणून आरतेच्या १ तास वगैरे ठिक आहे. वेळ पण कमी लागतो.)

कोणाला शेवकांडाची कॄती माहित आहे का?कणकेची असतात,गूळ घातलेली .आजी गणेश चतुर्थीला करते पण कधी बघितलंच नाही तिला करताना.

शेवखण्ड : कणकेत मीठ ,तेल गरम करुन घालायचे.घट्ट कणीक भिजवुन १५ मिनिटानी लांब कडबोळीसारखे वळून मण्द आचेवर तळून तुकडे करायचे.गूळाचा / साखरेचा प़क्का पाक करुन त्यात तुकडे घालुन कोरडे होईपर्यन्त परतावे.

माझ्या सासरकडचा नैवेद्याचा एक प्रकार : आरिधी

तांदळाचे पीठ उकळत्या पाण्यात टाकून त्याची उकड काढायची. मग चांगलं मळून घेऊन त्याच्या अर्ध्या सेमी जाडीच्या शेवया कराव्यात. दुधाला उकळी आली की त्यात साखर घालून ढवळून घ्यावे व त्यात हलक्या हाताने या शेवया सोडाव्यात. चार पाच मिनिटात शिजतात. मग वेलची केशर घालून नैवद्य दाखवावा.