मायबोली गणेशोत्सव २०१५ - समारोप

Submitted by संयोजक on 30 September, 2015 - 00:01

नमस्कार!

यंदा मायबोली गणेशोत्सवाचे सोळावे वर्षं! सालाबादप्रमाणे यंदाही हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. प्रत्यक्ष विघ्नहर्त्याचाच उत्सव म्हटल्यावर यशस्वी होणारच! महाराष्ट्र दणाणून सोडणारा हा उत्सव आता देशाच्या सीमा पार करून जगभर साजरा केला जातो. मायबोलीवरचा गणेशोत्सव तर अगदी आतुरतेने वाट बघावी असाच असतो. आभासी जगाच्या मर्यादा ओलांडून हा गणेशोत्सव आपल्या प्रत्यक्ष जीवनात अगदी बेमालूमपणे समाविष्ट होतो. फक्त मायबोलीकरच नाहीत, तर त्यांचे कुटुंबीय, पुढची पिढीही याची साक्षीदार आहे!

जेमतेम पंधरा दिवस हातात असताना संयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून साकारलेला गणेशोत्सव यांबद्दल आम्हीच काय लिहिणार? परंतु, एक परंपरा किंवा प्रघात म्हणून नाही, तर खरोखरीच आमचं मनोगत तुमच्यापर्यंत पोचवायचा हा छोटासा प्रयत्न. कधीकधी एखाद्या कार्यक्रमाची एक विशिष्ट संकल्पना ठरवली जाते आणि त्यानुसार त्याची आखणी केली जाते. हातात असलेला वेळ बघता एवढं साचेबद्ध नियोजन करणं अवघडच होतं. संयोजक मंडळाची घोषणा झाली, पडद्यामागे ग्रूप जमला आणि बघता बघता एक रंगमंच तयार होऊ लागला. शंकराचा गाभारा दुधानं भरण्यासाठी प्रत्येकानं आपापला वाटा त्यात ओतला. अगदी तसंच, प्रत्येकानं कल्पनाशक्ती, विचारशक्ती आणि आपल्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा थोडा वेळ काढत हा गाभारा भरायचा ठरवलं. चर्चा, गप्पा, चेष्टामस्करी यांतून एक नवं रूपडं बाळसं धरत होतं. काही कल्पना आवडल्या, काही नाकारल्या, काही बदलल्या. अमूर्ताला छिन्नीनं मूर्त रूप येत होतं. एकेका कार्यक्रमाची जाहिरात मायबोलीवर फिरायला लागली आणि लोकांच्या उत्सुक प्रश्नांनी आम्हांला आणखी हुरूप आला! कवी,चित्रकार, लेखक, प्रकाशचित्रांचा छंद जपणारे, पाकशास्त्र पारंगत अशा प्रत्येकासाठी काही ना काही कार्यक्रम तयार झाले.

मायबोलीकरांच्या प्रतिसादरूपी खुलभर दुधाशिवाय हा गाभारा रिताच राहणार, याची आम्हांला पूर्ण जाणीव होती. पाककला स्पर्धा, झब्बू, कथासाखळी, चित्र रंगवा हे नेहमीचे यशस्वी उपक्रम घेऊन आणखी नवीन काय देता येईल या चर्चेतून 'आरोग्याचा श्रीगणेशा', 'चित्रचारोळी' यांची कल्पना सुचली. मोठ्यांसाठी चित्रं आणि 'देई मातीला आकार' हे कलाकार मंडळींसाठी खास आकर्षण होते. अवघड प्रश्नांची उकल करत आपली बुद्धी सदैव तल्लख राखणार्‍यांसाठी गणितातील कूटप्रश्न उपयोगी पडले. या उपक्रमात खरंतर मुलांकडून सहभागाची अपेक्षा होती, पण कदाचित उत्सवी वातावरणात अभ्यासाला सुटी मिळाली असेल! 'तीट कवितेला' हा उपक्रम मायबोलीवरच्या सुप्त आणि गुप्त कवींना खुलं निमंत्रण होतं! आणि तसेच प्रतिसाद देऊन या शीघ्रकवींनी मायबोलीकरांना मोठाच काव्यानंद दिला. पाककला स्पर्धा हे संयोजकांसाठीच मोठं आव्हान असतं जणू! नियम फाईन ट्यून करत करत संयोजक दोन पावलं मागे काय गेले, पाकशास्त्रपारंगत मायबोलीकरांनी प्रवेशिकांचा पाऊस पाडला! कथासाखळीची गोष्टच वेगळी. लेखकांच्या प्रतिभेला धुमारे फुटल्यावर काय काय गंमत येते ते आपण सर्वांनीच अनुभवलं. 'उंदीरमामांची टोपी हरवली' हा एक नवा खेळ यंदा मायबोलीवर सादर झाला. विस्मृतीत गेलेल्या काही लेखांची उजळणी त्यानिमित्ताने झाली. हे विखुरलेले मोती शोधताना खरोखर खजिन्याचा शोध लागल्याचा आनंद सर्वांना झाला, हे पाहून कार्यक्रम यशस्वी झाल्याची पावतीच मिळाली. लहान मुलांसाठी तर यावर्षी उपक्रमांची रेलचेल होती. प्रत्येक उपक्रमाला मुलांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. सोशल नेटवर्किंग हा जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग झालेले मायबोलीकर कल्पनाविश्वातल्या 'तेचबुक'वर मनमुराद पोस्ट करत राहिले. प्रकाशचित्रांच्या झब्बूवरही दिलेल्या प्रत्येक विषयावर उदंड प्रतिसाद मिळाला. 'नैवेद्यम समर्पयामि', 'आमच्या घरचा गणपती' या धाग्यांवरचे फोटो पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. 'गणपतीबाप्पा आणि मी'वर लोकांनी समरसून लिहिलेल्या आठवणींनी कधी मनसोक्त हसवलं तर कधी डोळ्यांत पाणी उभं राहिलं. सांस्कृतिक कार्यक्रमात यंदा प्रथमच गणेशवंदना नृत्याविष्कारातून दाखवली गेली. पहिल्या दिवशीचं सुरेल बासरीवादन, सॅटिनचा गणेश आणि 'गणिताच्या जंगलात' हा लेख हे अगदी वेगवेगळ्या प्रकारातले कार्यक्रम सादर झाले.असा हा वेगवेगळ्या कलागुणांनी आणि भावभावनांनी नटलेला सोहळा आपल्या सर्वांना अनेक प्रकारे समृद्ध करून गेला.

यावर्षी संयोजनात काम करताना ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे लोकांकडून मिळालेलं अमाप सहकार्य! कितीतरी नवे कार्यक्रम सादर करण्याची कल्पना केवळ एक मनीषाच ठरली असती, जर त्यासाठी आवश्यक ती मदत वेळेवर उपलब्ध झाली नसती. सांगताना खरंच मनस्वी आनंद होतो की, आम्ही मदतीसाठी मारलेल्या प्रत्येक हाकेला पलीकडून तोंडभरून होकार आला! विनंतीचा एकही शब्द मायबोलीकरांनी खाली पडू दिला नाही! अर्धी लढाई तिथेच जिंकल्यासारखी वाटू लागली. संयोजक मंडळासोबत तितकेच किंवा त्याहीपेक्षा अधिक संख्येने हात जेव्हा मदतीसाठी पुढे येतात तेव्हाच एखादा उत्सव अशा जल्लोषात साजरा होऊ शकतो! त्या सर्व मित्रमंडळाचे संयोजक मंडळाच्या दृष्टीने वेगळं, अधिक मानाचं स्थान असल्याने त्यांचे मन:पूर्वक आभार आणि मायबोलीकरांकडून होणारं कौतुक एका स्वतंत्र श्रेयनामावलीत करणं आम्ही पसंत केलं. या मंडळींच्या सहभागाशिवाय इतका सुंदर उपक्रम साकारणं शक्य नव्हतं.

गेली सोळा वर्षं ही गणेशाची पालखी मायबोलीवर अशाच जल्लोषात वाहिली जात आहे. उत्स्फूर्ततेने काही लोक पुढाकार घेतात आणि मायबोलीवरचे हे अखंड दहा दिवसरात्र अक्षरश: मंतरलेले होतात. थट्टामस्करी, हास्यविनोद, चढाओढ यांना अगदी उधाण येतं. बाफांच्या सीमा ओलांडून लोक एकमेकांना दाद देतात. रोजच्या बघण्यातल्या माणसाची नवीच ओळख व्हावी तसंही अनेकदा होतं. एखादा दडलेला कलावंत अचानक या उत्सवात प्रसिद्धीच्या झोतात येतो. मायबोलीकरच नाही, तर त्यांची मुलंही हक्कानं ही शाबासकीची थाप मिळवतात. गेल्या पंधरा वर्षांत या उत्सवाचं स्वरूप बदलत गेलं. प्रत्यक्ष जीवनात सार्वजनिक गणेशोत्सवाचं रूप, जसं ढोलताशांच्या जागी कर्कश डीजे आले, तसं विद्रूप न होता ते अधिकाधिक सुंदर, समर्पक होत गेलं. खरंतर हा उत्सव सार्वजनिक न राहता जास्तीत जास्त वैयक्तिक होत गेला.आज इथल्या प्रत्येकाकडे मायबोलीवरच्या गणेशोत्सवाती एकतरी खास आठवण नक्की असेल. हा सोहळा मायबोलीकरांच्या जिव्हाळ्याचा, अभिमानाचा, आपुलकीचा विषय बनला आहे. आजच्या यशाचं श्रेय आजवर या उत्सवासाठी झटलेल्या तमाम मायबोलीकरांचं आहे. त्या सर्व संयोजक मंडळ, सल्लागार व मदतनीस यांना 'मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळ २०१५' अत्यंत अभिनव पद्धतीने मानाचा मुजरा करत आहे! यावर्षी संयोजक-दिंडीत सामील होऊन ही गणेशपालखी पुढे वाहता आली, हे आमचं सद्भाग्य! त्यासाठी आभार मानण्यापेक्षा वरदात्याचा आशीर्वाद म्हणून त्या आठवणी या अशा गोफात गुंफणंच श्रेयस्कर! अशी पालखी वाहणारे हात यापुढेही मायबोलीला सदोदित मिळत राहोत, हीच गणरायाकडे प्रार्थना!

मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळात सामील करून घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार!

मतदान दुवे:
१. तेचबुक!
अशी ही अदलाबदली' - पाककृती स्पर्धा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर उपक्रमाचा सुंदर समारोप!
सगळ्या संयोजक चमूचे आणि बाकी मायबोलीकरांचेही अभिनंदन!
यावेळी गणेशोत्सवात खूप धमाल केली.

ती वरची फित मस्त आहे. खूप दिवसानंतर परत एकदा हे गाणे ऐकायला मिळाले.

समारोप खूपच छान जमला आहे.

ह्यावेळी खूप छान छान कार्यक्रम झालेत.

संपुर्ण संयोजक वर्गांचे - आशूडी, आत्मधून, स्वरुप, प्राजक्ता_शिरीन, अमितव, रायगड, चनस - ह्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार. आता आराम करा Happy

सुंदर समारोप. व्हीडीओ फारच आवडला. अति नॉस्टॅल्जिक केलं त्या व्हीडीओनं.

यंदाच गणेशोत्सव दृष्ट लागण्याइतका सुंदर झाला. मंडळ जाहीर झालं तेव्हा म्हटलं होतं की सर्वांनीच सांभाळून घ्या, वेळ थोडा आहे. पण मज्जा म्हणजे कुठंही सांभाळून घ्यावं लागलं नाही. संयोजकांनी कामच इतकं अस्सल केलंय.

माझ्यातर्फे सर्व संयोजक मंडळाला मानाचा मुजरा!

अत्यंत थोडक्या वेळात एकसे एक उपक्रम आखून अतिशय भरगच्च गणेशोत्सव उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल सर्व संयोजक मंडळाचं कौतुक!

असा हा सुंदर गणेशोत्सव आणि त्यावर कडी म्हणजे हा आठवणींचा विणलेला गोफ .... संयोजकांकरता standing ovation !!!!

चित्रफीत बघताना पार्श्वभूमीवर मायबोली शीर्षकगीत .... अहाहा! एकदम मस्त अनुभव.

हे शीर्षकगीत २०११ च्या गणेशोत्सवातील - ज्या संयोजन टीममधे मी ही होते. हे शीर्षकगीत ही लाजोची संकल्पना होती आणि तिला त्याबद्दल धन्यवाद द्यायला हवेत.

उल्हास भिड्यांनी मायबोलीचं वर्णन आणि मायबोलीचं व्यक्तीमत्त्व नेमकं साकारलंय या गाण्यात. गाण्याला ही अप्रतिम चाल दिली श्री. योगेश जोशी (योग) यांनी. आणि जगभर विखुरलेल्या गात्या गळ्याच्या उत्साही मायबोलीकर गायक- गायिकांनी योग यांच्या मनातलं गीत सुरेख साकार केलं.

संयोजक आणि त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

खरोखर अतिशय उत्तम संयोजन केलेत, तुम्ही!

सुंदर मनोगत..... यंदाचा उत्सव सुध्दा दरवर्षीप्रमाणे दणक्यात साजरा झाला. सर्व संयोजकांचे आणि त्यांना सहकार्य करणार्‍या सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार!!!

चित्रफीत बघताना पार्श्वभूमीवर मायबोली शीर्षकगीत .... अहाहा! एकदम मस्त अनुभव. >>++

यंदाचा उत्सव सुध्दा दरवर्षीप्रमाणे दणक्यात साजरा झाला. सर्व संयोजकांचे आणि त्यांना सहकार्य करणार्‍या सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार!!! >>++

अगदी मोजका वेळ हाताशी असूनही संयोजकांनी अतिशय उत्कृष्ट गणेशोत्सव सादर केला. सर्व संयोजक आणि मदतनीसांचे मनःपूर्वक अभिनंदन!!

समारोप छान लिहीलाय. आवडला. संपुर्ण गणेशोत्सवाचे चित्र थोडक्यात नजरेसमोर उभे राहिले.

सर्व संयोजकांचे अभिनंदन. अतिशय कमी वेळात फार सुंदर आयोजन केले तुम्ही लोकांनी. पडद्यामागच्या कलाकारांचे आभार व गणेशोत्सवात सहभागी सर्व उत्साही मायबोलीकरांचेही अभिनंदन.
असाच लोभ असुद्यावा ही विनंती.

संयोजक आणी,सहाय्यक टीम चे आभार मानावे तेव्हढे थोडेच !!! गणपती उत्सव सोहळा खूप सुंदर रीतीने आखण्यात आला होता. माबोकरांनी उत्साहाने प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतला ,इतकच नव्हे तर जूनियर माबोकरांनी ही बाप्पा रंगवण्यात हिरीरीने आघाडी घेऊन सोहळ्याला चार चाँद कि काय ना, ते लावले..

गणपती विसर्जनाबरोबरच या सोहळ्याची ही सांगता झालीये म्हणून चुटपुट वाटतीये.. पण पुढच्या वर्षी लौकर येणार्‍या बाप्पांबरोबर माबो उत्सवाची ही वाट पाहणे सुरु झालेच आहे!!!

आमच्या घरी गणपती नसतो, तो असतो गावाला पण गावाला जाणे दरवर्षी शक्य होतेच असे नाही. माबोवरचा गणेसोत्सव ती गावाला न जाण्याची उणीव भरुन काढतो. माबो वरचा गणेशोत्सव घरचाच वाटतो. वेगवेगळ्या उपक्रमात आणि स्पर्धेत वेळ छान जातो. अगदी भारलेले असतात हे दिवस माबो वर.

या वर्षीचा गणेशोत्सव ही अगदी दणक्यात साजरा झाला. त्यासाठी संयोजकांचे आणि माबोकरांचे मनापासून आभार. बाकीची सगळी व्यवधानं संभाळून ही संयोजकांनी सुंदर केलं संयोजन.

अतिशय उत्तम संयोजन झाले.

सगळ्या ज्यूनियर मायबोलीकरांची चित्रे एकाच बीबीवर संकलित केली, तर फार छान होईल.

संयोजक मंडळाचं जोरदार अभिनंदन ! मस्त आणि भरगच्च झाला यंदाचा उत्सव. सगळं वाचण्याइतका वेळ मिळाला नाही, आता सावकाशीने वाचून काढणार.
पुन्हा एकदा अभिनंदन. थ्री चिअर्स !!!

छान झाला गणेशोत्सव यंदाचा पण. जाहिराती, उपक्रम, संयोजकांचा वावर आणि हे मनोगत सगळंच आवडलं. धन्यवाद मंडळी Happy

तुमच्यासाठी खास

00tea.jpg

खरंच हातात फार कमी वेळ असूनही कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडला. तेचबुकची कल्पना खूपच नाविन्यपूर्ण वाटली. संयोजकांचे आभार आणि कौतुक.

एव्हढ्या कमी वेळात ठरवून कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडला हि कौतुकास्पद गोष्ट आहे. तेचबुकची कल्पना मस्त होती.

या वर्षीचे उपक्रम फारच सुंदर होते नेहमीप्रमाणेच .. दरवर्षी उत्सुकता असतेच काय नवीन असेल याची ..इतक्या सुंदर उपक्रमासाठी संयोजकांचे आणि पडद्यामागे असलेल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन !!!
वरची चित्रफित पाहतांना फार आनंद झाला..आठवणींचा गोफ फार सुरेख विणला आहे..

Pages