नमस्कार!
यंदा मायबोली गणेशोत्सवाचे सोळावे वर्षं! सालाबादप्रमाणे यंदाही हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. प्रत्यक्ष विघ्नहर्त्याचाच उत्सव म्हटल्यावर यशस्वी होणारच! महाराष्ट्र दणाणून सोडणारा हा उत्सव आता देशाच्या सीमा पार करून जगभर साजरा केला जातो. मायबोलीवरचा गणेशोत्सव तर अगदी आतुरतेने वाट बघावी असाच असतो. आभासी जगाच्या मर्यादा ओलांडून हा गणेशोत्सव आपल्या प्रत्यक्ष जीवनात अगदी बेमालूमपणे समाविष्ट होतो. फक्त मायबोलीकरच नाहीत, तर त्यांचे कुटुंबीय, पुढची पिढीही याची साक्षीदार आहे!
जेमतेम पंधरा दिवस हातात असताना संयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून साकारलेला गणेशोत्सव यांबद्दल आम्हीच काय लिहिणार? परंतु, एक परंपरा किंवा प्रघात म्हणून नाही, तर खरोखरीच आमचं मनोगत तुमच्यापर्यंत पोचवायचा हा छोटासा प्रयत्न. कधीकधी एखाद्या कार्यक्रमाची एक विशिष्ट संकल्पना ठरवली जाते आणि त्यानुसार त्याची आखणी केली जाते. हातात असलेला वेळ बघता एवढं साचेबद्ध नियोजन करणं अवघडच होतं. संयोजक मंडळाची घोषणा झाली, पडद्यामागे ग्रूप जमला आणि बघता बघता एक रंगमंच तयार होऊ लागला. शंकराचा गाभारा दुधानं भरण्यासाठी प्रत्येकानं आपापला वाटा त्यात ओतला. अगदी तसंच, प्रत्येकानं कल्पनाशक्ती, विचारशक्ती आणि आपल्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा थोडा वेळ काढत हा गाभारा भरायचा ठरवलं. चर्चा, गप्पा, चेष्टामस्करी यांतून एक नवं रूपडं बाळसं धरत होतं. काही कल्पना आवडल्या, काही नाकारल्या, काही बदलल्या. अमूर्ताला छिन्नीनं मूर्त रूप येत होतं. एकेका कार्यक्रमाची जाहिरात मायबोलीवर फिरायला लागली आणि लोकांच्या उत्सुक प्रश्नांनी आम्हांला आणखी हुरूप आला! कवी,चित्रकार, लेखक, प्रकाशचित्रांचा छंद जपणारे, पाकशास्त्र पारंगत अशा प्रत्येकासाठी काही ना काही कार्यक्रम तयार झाले.
मायबोलीकरांच्या प्रतिसादरूपी खुलभर दुधाशिवाय हा गाभारा रिताच राहणार, याची आम्हांला पूर्ण जाणीव होती. पाककला स्पर्धा, झब्बू, कथासाखळी, चित्र रंगवा हे नेहमीचे यशस्वी उपक्रम घेऊन आणखी नवीन काय देता येईल या चर्चेतून 'आरोग्याचा श्रीगणेशा', 'चित्रचारोळी' यांची कल्पना सुचली. मोठ्यांसाठी चित्रं आणि 'देई मातीला आकार' हे कलाकार मंडळींसाठी खास आकर्षण होते. अवघड प्रश्नांची उकल करत आपली बुद्धी सदैव तल्लख राखणार्यांसाठी गणितातील कूटप्रश्न उपयोगी पडले. या उपक्रमात खरंतर मुलांकडून सहभागाची अपेक्षा होती, पण कदाचित उत्सवी वातावरणात अभ्यासाला सुटी मिळाली असेल! 'तीट कवितेला' हा उपक्रम मायबोलीवरच्या सुप्त आणि गुप्त कवींना खुलं निमंत्रण होतं! आणि तसेच प्रतिसाद देऊन या शीघ्रकवींनी मायबोलीकरांना मोठाच काव्यानंद दिला. पाककला स्पर्धा हे संयोजकांसाठीच मोठं आव्हान असतं जणू! नियम फाईन ट्यून करत करत संयोजक दोन पावलं मागे काय गेले, पाकशास्त्रपारंगत मायबोलीकरांनी प्रवेशिकांचा पाऊस पाडला! कथासाखळीची गोष्टच वेगळी. लेखकांच्या प्रतिभेला धुमारे फुटल्यावर काय काय गंमत येते ते आपण सर्वांनीच अनुभवलं. 'उंदीरमामांची टोपी हरवली' हा एक नवा खेळ यंदा मायबोलीवर सादर झाला. विस्मृतीत गेलेल्या काही लेखांची उजळणी त्यानिमित्ताने झाली. हे विखुरलेले मोती शोधताना खरोखर खजिन्याचा शोध लागल्याचा आनंद सर्वांना झाला, हे पाहून कार्यक्रम यशस्वी झाल्याची पावतीच मिळाली. लहान मुलांसाठी तर यावर्षी उपक्रमांची रेलचेल होती. प्रत्येक उपक्रमाला मुलांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला. सोशल नेटवर्किंग हा जणू आयुष्याचाच अविभाज्य भाग झालेले मायबोलीकर कल्पनाविश्वातल्या 'तेचबुक'वर मनमुराद पोस्ट करत राहिले. प्रकाशचित्रांच्या झब्बूवरही दिलेल्या प्रत्येक विषयावर उदंड प्रतिसाद मिळाला. 'नैवेद्यम समर्पयामि', 'आमच्या घरचा गणपती' या धाग्यांवरचे फोटो पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. 'गणपतीबाप्पा आणि मी'वर लोकांनी समरसून लिहिलेल्या आठवणींनी कधी मनसोक्त हसवलं तर कधी डोळ्यांत पाणी उभं राहिलं. सांस्कृतिक कार्यक्रमात यंदा प्रथमच गणेशवंदना नृत्याविष्कारातून दाखवली गेली. पहिल्या दिवशीचं सुरेल बासरीवादन, सॅटिनचा गणेश आणि 'गणिताच्या जंगलात' हा लेख हे अगदी वेगवेगळ्या प्रकारातले कार्यक्रम सादर झाले.असा हा वेगवेगळ्या कलागुणांनी आणि भावभावनांनी नटलेला सोहळा आपल्या सर्वांना अनेक प्रकारे समृद्ध करून गेला.
यावर्षी संयोजनात काम करताना ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे लोकांकडून मिळालेलं अमाप सहकार्य! कितीतरी नवे कार्यक्रम सादर करण्याची कल्पना केवळ एक मनीषाच ठरली असती, जर त्यासाठी आवश्यक ती मदत वेळेवर उपलब्ध झाली नसती. सांगताना खरंच मनस्वी आनंद होतो की, आम्ही मदतीसाठी मारलेल्या प्रत्येक हाकेला पलीकडून तोंडभरून होकार आला! विनंतीचा एकही शब्द मायबोलीकरांनी खाली पडू दिला नाही! अर्धी लढाई तिथेच जिंकल्यासारखी वाटू लागली. संयोजक मंडळासोबत तितकेच किंवा त्याहीपेक्षा अधिक संख्येने हात जेव्हा मदतीसाठी पुढे येतात तेव्हाच एखादा उत्सव अशा जल्लोषात साजरा होऊ शकतो! त्या सर्व मित्रमंडळाचे संयोजक मंडळाच्या दृष्टीने वेगळं, अधिक मानाचं स्थान असल्याने त्यांचे मन:पूर्वक आभार आणि मायबोलीकरांकडून होणारं कौतुक एका स्वतंत्र श्रेयनामावलीत करणं आम्ही पसंत केलं. या मंडळींच्या सहभागाशिवाय इतका सुंदर उपक्रम साकारणं शक्य नव्हतं.
गेली सोळा वर्षं ही गणेशाची पालखी मायबोलीवर अशाच जल्लोषात वाहिली जात आहे. उत्स्फूर्ततेने काही लोक पुढाकार घेतात आणि मायबोलीवरचे हे अखंड दहा दिवसरात्र अक्षरश: मंतरलेले होतात. थट्टामस्करी, हास्यविनोद, चढाओढ यांना अगदी उधाण येतं. बाफांच्या सीमा ओलांडून लोक एकमेकांना दाद देतात. रोजच्या बघण्यातल्या माणसाची नवीच ओळख व्हावी तसंही अनेकदा होतं. एखादा दडलेला कलावंत अचानक या उत्सवात प्रसिद्धीच्या झोतात येतो. मायबोलीकरच नाही, तर त्यांची मुलंही हक्कानं ही शाबासकीची थाप मिळवतात. गेल्या पंधरा वर्षांत या उत्सवाचं स्वरूप बदलत गेलं. प्रत्यक्ष जीवनात सार्वजनिक गणेशोत्सवाचं रूप, जसं ढोलताशांच्या जागी कर्कश डीजे आले, तसं विद्रूप न होता ते अधिकाधिक सुंदर, समर्पक होत गेलं. खरंतर हा उत्सव सार्वजनिक न राहता जास्तीत जास्त वैयक्तिक होत गेला.आज इथल्या प्रत्येकाकडे मायबोलीवरच्या गणेशोत्सवाती एकतरी खास आठवण नक्की असेल. हा सोहळा मायबोलीकरांच्या जिव्हाळ्याचा, अभिमानाचा, आपुलकीचा विषय बनला आहे. आजच्या यशाचं श्रेय आजवर या उत्सवासाठी झटलेल्या तमाम मायबोलीकरांचं आहे. त्या सर्व संयोजक मंडळ, सल्लागार व मदतनीस यांना 'मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळ २०१५' अत्यंत अभिनव पद्धतीने मानाचा मुजरा करत आहे! यावर्षी संयोजक-दिंडीत सामील होऊन ही गणेशपालखी पुढे वाहता आली, हे आमचं सद्भाग्य! त्यासाठी आभार मानण्यापेक्षा वरदात्याचा आशीर्वाद म्हणून त्या आठवणी या अशा गोफात गुंफणंच श्रेयस्कर! अशी पालखी वाहणारे हात यापुढेही मायबोलीला सदोदित मिळत राहोत, हीच गणरायाकडे प्रार्थना!
मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळात सामील करून घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार!
मतदान दुवे:
१. तेचबुक!
अशी ही अदलाबदली' - पाककृती स्पर्धा
कमी वेळात उत्तम नियोजन
कमी वेळात उत्तम नियोजन केल्याबद्दल संयोजकांचे आभार आणि खूप कौतुक!!
यंदाही हा सोहळा अगदी दिमाखात
यंदाही हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला.>>>अगदी अगदी.
सर्व संयोजकांस धन्यवाद.
संयोजकांचे अभिनंदन आणि
संयोजकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा
संयोजकांचे अभिनंदन आणि
संयोजकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. तेचबुकची कल्पना मस्त होती.
समारोपातला आठवणींच गोफ खूप
समारोपातला आठवणींच गोफ खूप आवडला.
गणेशोत्सव खूप दणक्यात झाला यावर्षीही. इतक्या कमी वेळात नवनविन कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल संयोजकांचं अभिनंदन!!
बाकीचे उपक्रम अजून बघायचेत, पण ते सुद्ध इतकेच चांगले असणार याची खात्रू आहे.
गणिताच्या कुटप्रश्नाचा धागा (आमच्या घरातले लहान मेंबर वयोगटात यायला अजून खूप अवकाश असल्याने मी तिथे प्रतिसाद लिहिला नव्हता), तेचबुकची आयडीया, मोठ्यांसाठीचा चित्र काढा /रंगवा उपक्रम, दरवर्षीप्रमाणे लहानांसाठीच्या चित्र रंगवा/चित्र काढा आणि गणेश मुर्ती बनवण्याचा उपक्रम, आरोग्याचा श्रीगणेशा आणि उंदीरमामांची टोपी हरवली इ. कार्यक्रम खूप आवडले.
पाककृतीची स्पर्धा आधी जरा अवघड वाटत होती, पण कोणती पाकृ कोणी केलीये हे शोधण्यात खूप मजा आली.
वेल डन संयोजक!!
इतक्या कमी वेळात नवनविन
इतक्या कमी वेळात नवनविन कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल संयोजकांचं अभिनंदन!!>> +१
गोफ आवडला.
संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद.
संयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद. आवडला यावेळचाही कार्यक्रम. हातात कमी वेळ असूनही जोरदार झाला.
फारेंड + १ गणेशोत्सव खूप छान
फारेंड + १
गणेशोत्सव खूप छान झाला.
कमी वेळात फारच सुंदर पार
कमी वेळात फारच सुंदर पार पाडलात गणेशोत्सव तुम्ही.
सर्व संयोजकांचे मनापासून अभिनंदन आणि आभार!
बाप्पा मोरया !
चांगला झाला कार्यक्रम. यंदा
चांगला झाला कार्यक्रम. यंदा रंगकामात घरच्या कलाकारांनी भाग घेतल्यामुळॅ त्यांना थोडे दिवस गुंतवायचं एक काम पण झाल
जमेल तसं सहभागी होता आलं.
खूपच छान झाला गणेशोत्सव! सर्व
खूपच छान झाला गणेशोत्सव! सर्व संयोजकांचे मनापासून अभिनंदन आणि आभार
सर्वच सदरे चांगली होती. कूटप्रश्न माझ्या विशेष आवडीचे असल्याने तो विभागही खूप आवडला. शेवटच्या प्रश्नाच्या उत्तराविषयी काही शंका मी व्यक्त केल्या आहेत त्याच धाग्यावर, जमल्यास त्याचे निरसन झाल्यास आनंद होईल
ह्यावर्षी संयोजन अतिशय उत्तम
ह्यावर्षी संयोजन अतिशय उत्तम झाले. बराचसा बॅकलॉग बाकी आहे, परंतु संयोजकांशी माझा झालेला संवाद इ. सर्व फार स्मूथ होते. आशूडी आणि अमितव ह्यांनी बहुधा मला हँडल करायची जबाबदारी घेतली असावी.
त्यामुळे त्यांचे विशेष आभार! सर्वच संयोजकांचे इतक्या सुंदर संयोजनाबद्दल अभिनंदन आणि आभार! 
आज खूप दिवसांनी आले आपल्या
आज खूप दिवसांनी आले आपल्या मायबोलीवर.

गणेशोत्सवाचा समारोप फार सुरेख.
चित्रफित तर खासच.
सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या
संयोजकांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन
Pages