सार्थ गणपत्यथर्वशीर्ष

Submitted by झक्की on 25 August, 2009 - 23:53

असे म्हणतात की श्रीगणेशाने दृष्टांत दिल्यानंतर अथर्व ऋषींनी अथर्वशीर्ष लिहिले. संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्षाची एक हजार (सहस्त्रावर्तन), एकशे आठ अथवा एकवीस आवर्तने करतात. उपनिषदाने आवर्तनाची सुरुवात होते आणि श्रीगणेशाची आठ नावे घेऊन ते संपते.

अथर्वशीर्षाची नियमीत आवर्तने करणारे आपल्यात अनेक असतील. बर्‍याचदा असे होते की धार्मिक विधी अथवा परंपरा पाळत असताना आपल्याला त्याचा अर्थ ठाऊक नसतो, फलश्रुति ठाऊक नसते. ह्यासाठीच यंदाच्या गणेशोत्सवात खास मायबोलीकरांसाठी संपूर्ण अथर्वशीर्षाचा मराठीत अनुवाद केला आहे. तर समजावून घेऊयात अथर्वशीर्षाचा अर्थ आणि उद्देश !!!

| श्रीगणेशाय नम: |
शांतिमंत्र
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: | भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: | व्यशेम देवहितं यदायु: ||१||

ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: | स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: |
स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: | स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||

ॐ शांति: शांति: शांति: ||

ॐ तन्मामवतु तद्वक्तारमवतु
अवतु माम् अवतु वक्तारम्
ॐ शांति: शांति: शांति: ||

हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी कल्याणमय वचने ऐकावीत, आम्ही आमच्या डोळ्यांनी शुभ दृष्ये पहावीत (कल्याणमय वचने कानावर पडावी, शुभ दृष्ये डोळ्यांना दिसावीत). तुम्ही पूजनीय आहात. आम्हांला दिलेले आयुष्य उत्तम प्रकृतीने भोगून आमच्याकडून तुमची स्तुती होवो. भाग्यवान इंद्र आमचे पोषण करो. सर्व जाणणारा पूषा आमचे पोषण करो. ज्याला कोणी अडवत नाही असा तार्क्ष्य आमचे पोषण करो. बृहस्पती आमचे पोषण करो. तो माझे रक्षण करो, तो बोलणार्‍याचे रक्षण करो.

उपनिषद
ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि |
त्वमेव केवलं कर्ताऽसि | त्वमेव केवलं धर्ताऽसि |
त्वमेव केवलं हर्ताऽसि | त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि |
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ||१||

गणपतीला नमन. तूच वेदातील तत्त्वज्ञान आहेस, तू कर्ता आहेस, रक्षणकर्ता आहेस, आणि जग नष्ट करणारा आहेस. तूच हे सर्व ब्रह्म आहेस. तूच परमात्मा आहेस.

स्वरूप तत्त्व
ऋतं वच्मि | सत्यं वच्मि || २||

अव त्वं माम् | अव वक्तारम् | अव श्रोतारम् | अव दातारम् |
अव धातारम् | अवानूचानमव शिष्यम् | अव पश्चात्तात् | अव पुरस्तात् |
अवोत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् | अव चोर्ध्वात्तात् | अवाधरात्तात् |
सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् || ३ ||

मी योग्य व सत्य वचन करीन. तू माझे रक्षण कर. तू बोलणार्‍याचे रक्षण कर. तू ऐकणार्‍याचे रक्षण कर. तू देणार्‍याचे रक्षण कर. तू घेणार्‍याचे रक्षण कर. तू गुरूंचे रक्षण कर, तू शिष्यांचे रक्षण कर. तू माझे पश्चिमेकडून (येणार्‍या संकटांपासून) रक्षण कर. पूर्वेकडून रक्षण कर. उत्तरेकडून रक्षण कर. दक्षिणेकडून रक्षण कर. उर्ध्व दिशेकडून रक्षण कर नि अधर (म्हणजे खालील) दिशेकडून रक्षण कर. माझे सर्व बाजूंनी रक्षण कर.

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: | त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः ||
त्व सच्चिदानंदाद्द्वितीयोऽसि | त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि || ४||

तू सर्व शब्द, मन, आहेस. तू सत्यमय, आनंदमय व ब्रह्यमय आहेस. तू अद्वैत जगाचे सार आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस.

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति |
सर्वं जगदिद त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: | त्वं चत्वारि वाक्पदानि || ५ ||

हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण झाले. हे सर्व जग तुझ्यामुळे चालते, हे सर्व जग तुझ्यातच नष्ट होते. हे सर्व जग सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू भूमी, जल, अग्नी, वायू व आकाश आहेस.

त्वं गुणत्रयातीत: | त्वं देहत्रयातीत: |
त्वं कालत्रयातीत: | त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ||
त्वं शक्तित्रयात्मक: | त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् |
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ||

तू तीन गुणांच्या (सत्त्व, रज, तम) पलीकडील आहेस. थोडक्यात, तुझे वर्णन करणे देह, काल, अवस्था (जागृती, निद्रा, स्वप्न) यांच्यापलीकडे आहे. योगी लोक सतत तुझेच ध्यान करतात. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र व भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत. (मनुष्य प्रथम भूमीवर जगतो. मृत्यूनंतर आत्मा भुवः लोकात जातो, तिथून जसजसा तो पवित्र होत जातो, तसतसा तो स्वः मः जनः तपः लोकांतून शेवटी सत्य लोकात जातो. पैकी पहिल्या तीन लोकात श्रीगणेशाचे वर्चस्व आत्म्यावर असते.)

गणेश मंत्र
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम् |
अनुस्वार: परतर: |
अर्धेंदुलसितम् | तारेण ऋद्धम् |
एतत्तव मनुस्वरूपम् | गकार: पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् |
अनुस्वारश्चान्त्यरूपम् | बिंदुरुत्तररूपम् | नाद: संधानम् | संहिता संधि: | सैषा गणेशविद्या |
गणकऋषि: | निचृद्गायत्रीच्छंद: | गणपतिर्देवता | ॐ गँ गणपतये नम: ||७||

गं या अक्षरात व ॐ या अक्षरात श्रीगणेश सामावलेले आहेत. सर्व विद्यांचे मूळ तेच आहे. या मंत्राचा कर्ता गणक ऋषी, छंद ( काव्यातील meter) 'निचृद्गायत्री', देवता गणपती. गं अक्षराला वंदन करून मी गणपतीला वंदन करतो. (ॐ नि गं ही गणेशविद्येची वैदिक रूपे आहेत.)

गणेश गायत्री
एकदंताय विद्महे | वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् || ८ ||

श्रीगणेश हा एकद राक्षसाचा अंत करणारा तसेच वाईट लोकांचा नाश करणारा आहे. तो आम्हाला उत्साहवर्धक असो.

गणेश रूप
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् |
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ||
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् |
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् ||

हे आपल्या माहितीचे श्रीगणेशाचे रूप - एक दात, चार हात, हातात पाश व अंकुश, सोंड, आशीर्वाद देणारा हात, उंदीर हे वाहन, लाल रंग, मोठे पोट, सुपासारखे कान, लाल वस्त्रे नेसलेला, लाल रंगाचे गंध लावलेला, लाल फुलांनी ज्याची पूजा केली आहे असे हे श्रीगणेशाचे स्वरूप आहे.

भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् |
आविर्भूतं च सृष्ट्यादौ | प्रकृते: पुरुषात्परम् ||
एवं ध्यायति यो नित्यं | स योगीं योगिनां वर: || ९ ||

तो भक्तांवर दया करतो, सर्व जगाचे निर्माण त्याने केले आहे, तो आपल्या मार्गावर स्थिर आहे. सृष्टीच्या सुरुवातीला प्रकृती व पुरुष त्यानेच निर्माण केले. असे चिंतन जो नेहेमी करतो, तो सर्व योग्यांपेक्षा श्रेष्ठ
आहे.

अष्ट नाम गणपती
नमो व्रातपतये | नमो गणपतये | नम: प्रमथपतये | नमस्तेSस्तु लंबोदरायैकदंताय |
विघ्ननाशिने शिवसुताय | श्रीवरदमूर्तये नमो नम: || १० ||

ही गणपतीची आठ नावे: व्रातपती, गणपती, प्रथमपती, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशिन, शिवसूत, वरदमूर्ती.
यांना पुनः पुनः नमस्कार असो.

काही लोक इथेच पाठ संपवतात. यानंतर हे अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे (फलश्रुति) वर्णन केले आहेत.

फलश्रुति
एतदर्थवशीर्षं योSधीते | स ब्रह्मभूयाय कल्पते | स सर्वत: सुखमेधते |
ससर्वविघ्नैर्न बाध्यते | स पंञ्चमहापापात्प्रमुच्यते | सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति |
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति | सायंप्रात: प्रयुञ्जानो अपापो भवति |
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति | धर्मार्थकाममोक्षं च विंदति ||

या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो (वाचन, मनन, चिंतन) तो ब्रह्माच्या योग्यतेचा होतो. त्याला सर्व बाजूंनी सुख मिळते. त्याला विघ्नांची बाधा होत नाही, पाच महापापांपासून त्याची सुटका होते. जो संध्याकाळी अध्ययन करतो, त्याने दिवसा केलेली पापे नाहीशी होतात. जो सकाळी अध्ययन करतो, त्याने रात्री केलेली पापे नाहीशी होतात. सकाळ संध्याकाळ अध्ययन करणारा निष्पाप होतो. सर्व ठिकाणी जप करणार्‍याची सर्व विघ्ने नाहीशी होतात. त्याला धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे सर्व प्राप्त होतात.

इदमथर्वशीर्षंमशिष्याय न देयम् | यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति |
सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् || ११ ||

हे अथर्वशीर्ष 'अशिष्याला' देऊ नये. अशिष्य म्हणजे ज्याची योग्यता नाही असा (ज्याची श्रद्धा नाही असे लोक). जर कुणी मोहामुळे (पैशासाठी) देईल, तो महापापी होईल. एक हजार वेळा जो याचे अध्ययन करेल त्याची जी जी इच्छा असेल ती ती यामुळे पूर्ण होईल.

अनेन गणपतिमभिषिंचति | स वाग्मी भवती |
चतुर्थ्यामनश्नन् जपति | स विद्यावान भवति |
इत्यथर्वणवाक्यम् |
ब्रह्माद्याचरणं विद्यात् | न बिभेति कदाचनेति || १२ ||

या मंत्राने जो गणपतीवर अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो. जो चतुर्थीच्या दिवशी उपाशी पोटी जप करतो तो विद्यावान होईल. तो यशस्वी होईल. असे अथर्वऋषींनी सांगितले आहे. त्याचे नेहेमी चांगले आचरण होईल, व तो कधीही कशालाही घाबरणार नाही.

यो दुर्वांकुरैर्यजति | स वैश्रवणोपमो भवति |
यो लाजैर्यजति स यशोवान् भवति | स मेधावान् भवति |
यो मोदकसह्स्रेण यजति | स वाञ्छितफलमवाप्नोति |
यः साज्यसमिद्भिर्यजति | स सर्वं लभते स सर्वं लभते || १३ ||

जो दूर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासारखा (श्रीमंत) होतो. जो (भाताच्या) लाह्यांनी हवन करतो तो यशस्वी (व) बुद्धिमान होतो. जो एक हजार मोदकांचा नैवेद्य दाखवेल त्याला इच्छित फळ मिळेल. जो तूप व समिधा यांनी हवन करेल त्याला सर्व काही मिळेल. त्याला सर्व काही मिळेल.

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति |
सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति |
महाविघ्नात्प्रमुच्यते | महादोषात्प्रमुच्यते |
महापापात्प्रमुच्यते | स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति |
य एवं वेद इत्युपनिषद् || १४ ||

जर आठ योग्य शिष्यांना हे कुणी शिकवले तर तो सूर्याहून श्रेष्ठ होतो. सूर्यग्रहणात, महानदीत (म्हणजे गंगा वगैरेसारखी नदी) किंवा मूर्तीजवळ जर याचा जप केला तर या मंत्राचे सर्व फायदे मिळतील. मोठ्या संकटांतून, मोठ्या दोषांपासून, मोठ्या पापांपासून सुटका होईल. अशा तर्‍हेने हे रहस्य जो चांगल्या रीतीने जाणतो तो सर्वज्ञ होतो.

शांतिमंत्र
ॐ सहनाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै |
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ||

आपल्या दोघांचे (गुरू व शिष्य) रक्षण होवो. आपण एकत्र याचे सेवन (वाचन, श्रवण, मनन) करू. आपल्या दोघांच्या प्रयत्नांनी आपले अध्ययन अधिक तेजस्वी (प्रभावी) होवो. आपल्याला कुणाबद्दलही द्वेष असू नये.

शांतिमंत्र
ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: | भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: | व्यशेम देवहितं यदायु: ||१||

ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: | स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: |
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: | स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||

ॐ शांति: शांति: शांति: ||

ॐ तन्मा अवतु
तद्वक्तारमवतु
अवतु माम्
अवतु वक्तारम्
ॐ शांति: शांति: शांति: ||

|| श्रीगणेशार्पणमस्तु ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा, छानच काम केल हो झक्की Happy मस्त

(त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || >>> हा श्लोक सलग आहे का? जसे की
त्वं ब्रह्मा: त्वं विष्णु: स्त्वंरूद्र: स्त्वंइंद्र: स्त्वंअग्नि: स्त्वंवायु: स्त्वंसूर्यं: स्त्वंचंद्रमा: स्त्वंब्रह्मभूर्भुवः स्वरोम् || ?????? मी एकदा घरी जाऊन तपासुन घेतो, नि नेमके बघतो काय आहे ते, तुम्ही पण बघा बर!)

आता हे मी मोठ्या अक्षरात छापुन घेऊन ल्यामिनेट करुन लावणार Happy
झक्की, तुम्हाला या कामाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद Happy

चिनुक्स, सन्स्कृतमधील मला समजत नाही काही, माझि विचारणा चूकीची असू शकते
फक्त कधीकाळि केलेल्या पाठान्तरातील उच्चार जसे आठवले तसे "लिहीले" अन विचारलय की हे बरोबर का! Happy खात्रीशीर विधान करत नाहीये, कारण आत्ता लगेच इथे पुस्तक वा इतर काही सन्दर्भासाठी उपलब्ध नाहीये! अन झक्कीन्चा अभ्यास दान्डगा आहे! बाकी कुठेही शोधूनही एकाही कानामात्रेचा फरक आढळला नाहीये, अगदी टायपो देखिल नाही Happy फक्त ह्याच एका श्लोकाबद्दल शन्का आलि आहे

सध्या रोज सन्ध्याकाळी मी एकविस आवर्तने मोठ्या आवाजात उच्चारत करतो शेवटच्या वेळेस फलश्रुति म्हणतो Happy साधारणतः पस्तीस मिनिटे लागतात
सहज प्रयत्न केला की किती श्वासात एक आवर्तन मला म्हणता येतय Happy
तर असे कळले की सात श्वासात (खरे तर सव्वासहा श्वासात) एक आवर्तन पुर्ण करता येतय
मी फार पूर्वी ऐकले/बघितले होते की कित्येकजण पाच श्वासान्च्या आत, मोठ्या आवाजात, एक आवर्तन म्हणू शकतात! याबद्दल कोणी काही सान्गू शकेल का?
आवर्तने करतानाचे अनुभव भन्नात असतात
सुरवातीस, पाठान्तर असल्याने म्हणत असताना देखिल मनामध्ये दिवसभरातील घटना घोळत असतात, पाच दहा वेळा म्हणून पूर्ण होत आले की मग मात्र पूर्वायुष्यातील घटना आठवू लागतात, सुरवातीचे दोनतिन दिवस असे होत होते, नन्तरच्या दिवसात मात्र मनात विचार येणे हळू हळू बन्द व्हायला लागले, तसे ते बन्द व्हावे म्हणून माझ्यापुरता मी मनातल्या मनात न म्हणता मोठ्याने म्हणायचा उपाय केला जेणेकरुन अन्य आवाजान्चा त्रास होत नाही. मोठ्याने म्हणत असताना, नन्तर नन्तर आपलाच आवाज आपल्या आत घुमतोय असे वाटू लागते, जर त्यावर लक्ष केन्द्रीत केले तर बरेचसे बाह्य विचार थाम्बतात असा अनुभव आहे!
तर, आवर्तने (वा जपजाप्य) करत असताना, मन पूर्ण एकाग्र व्हावे याकरता काय काय उपाय असू शकतात? खास करुन मजसारख्या अर्धवट अश्रद्ध वा अर्धवट श्रद्धावान माणसाकरता?
साबणाच्या फेसाप्रमाणे मनात उत्पन्न होणारे नानाविध विचार तत्काळ थाम्बविणे हे अनेक बाबतीत हुकमी अस्त्र ठरते, खास करुन व्यक्ति तापट असेल तर राग शमविण्याकरता, उताविळ असेल तर निर्णय लाम्बणीवर टाकण्यास वगैरे! अन याचा उपयोग दैनन्दिन जीवनात अनेकानेकान्शी सम्बन्ध येताना होतोच होतो! तर याबद्दल काही प्रकाश टाकता येईल काय?

त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ||>>>

झक्की, ह्यातले मधले दंड काढले तर छान..
म्हणजे असं..
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम् ||६||

बरं,माझी एक शंका आहे. मी दोन तीन महिन्यांपासूनच अथर्वशीर्ष म्हणतोय रोज, आता पाठ झाले आहे.पण शांतिमंत्र म्हणत नाही,उपनिषदा पासून गणपती अष्टनामापर्यंतच पुढे फल्श्रुती पण नाही म्हणत्.तर ती योग्य पद्धत आहे का? म्हणजे जर आवर्तनं करायची असतील तर शांतिमंत्रापासून सुरु करुन मग उपनिषदाचे आवर्तन करायचे अन शेवट झाल्यावर फलश्रुती करायची, असच आहे ना ? अन रोज पठण करताना मात्र फक्त उपनिषद.

झक्कीदादा... त्वं ग्रेटं अससी! (त्या संधीची चिंधी फाडली मी बहुतेक....)
अर्थासकट अथर्वशीर्ष म्हणजे साजुक तूप घालून उकडीचे मोदक... ते ही मायबोलीवर म्हणजे हळदीच्या पानावर उकडलेले Happy

दिपुर्झा, निश्चित केलेल्या आवर्तनान्चा शेवट झाल्यावर फलश्रुती म्हणावी हे योग्यच.

पण माझ्या अल्पमाहितीनुसार, यजमान स्वतःच स्वतःकरिता आवर्तन करत असेल, तर ज्या त्या दिवशीचे आवर्तन थाम्बविताना, सर्वात शेवटी फलश्रुती म्हणणे केव्हाही इष्ट! Happy
फार मोठ्या सन्ख्येचा जसे की लक्ष वगैरे सन्कल्प मनाशी धरला असल्यासही, रोज किमान अकरा, एकवीस, वा एकशे आठ अशा सन्ख्येत आवर्तने करुन त्या त्या दिवशीच फलश्रुतीही म्हणावी असे मला वाटते

जर, भटजीन्मार्फत यजमानासाठि काही एक आवर्तने (मग ती अथर्वशीर्षाची वा सप्तशती वा रुद्राचि) करुन घेत असल्यास, त्या प्रत्येक भटजीने मात्र केवळ आवर्तने करुन, कोणा एकाने फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणलेली चालते. मी मुद्दामहून सप्तशतीचे उदाहरण दिले कारण नवचण्डी यागाकरता, बरेच वेळा एका दिवसात सप्तशतीचे पाठ करणे शक्य होत नाही व एकुण कार्यक्रम दोन तिन दिवस चालत रहातो, तेव्हा शेवटच्या पाठास हवन करुन यजमानाकरता फलश्रुतीदेखिल म्हणली जाते, ही झाली प्रॅक्टिस!

नेमके काय शास्त्र त्याचा कृपया जाणकारान्नि खुलासा करावा

नन्तरच्या दिवसात मात्र मनात विचार येणे हळू हळू बन्द व्हायला लागले, तसे ते बन्द व्हावे म्हणून माझ्यापुरता मी मनातल्या मनात न म्हणता मोठ्याने म्हणायचा उपाय केला जेणेकरुन अन्य आवाजान्चा त्रास होत नाही.
>>>
लिम्ब्या तू म्हणतो आहेस त्याला ध्यानाच्या पद्धतीत आलंबन म्हणतात (शब्द चुकीचा असल्यास जाणकारांनी दुरुस्त करावा). जसे काही पद्धतीत ३-४ दीर्घ श्वास घ्यायला सांगतात व श्वास घेताना एखादा गुरुने सांगितलेला मंत्र (जो बरेचदा ॐ चे वेरिअन्ट असते) म्हणतात. विपश्यनेमध्ये अंगावर (सुरुवातीस बाह्यांगावरील व नंतर आतील) उमटणार्‍या संवेदनांवर लक्ष केंद्रीत करायला सांगतात (त्याला ते लोक संखारा म्हणतात). पण माझ्या अल्पमतीनुसार जे पुढे गेलेले (पोचलेले) लोक असतात ते आलंबनाशिवाय ध्यानावस्थेत शिरतात वगैरे वगैरे.

पुर्वी संकष्टीला अथर्वशीर्षाची आवर्तने केली आहेत काही वर्षे. तेव्हा जर उच्चार चुकले तर आजोबा लै रागवायचे. आज परत वरचा लेख वाचताना कैक वर्षांनी आपोआप मनात अथर्वशीर्ष म्हटले.

जर भटजी लोक आवर्तने करत असतील तर बरेचदा शेवटी एखादा भटजी फलश्रुती म्हणतो (माझ्या बघण्यात आल्यानुसार)

आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे यात शंकाच नाही. मला खटकलेल्या काही गोष्टी लिहित आहे - गैरसमज नसावा ही विनंती.

खालील ओळीत काहीतरी गडबड वाटते:
(१)
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: | त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः ||
त्व सच्चिदानंदाद्द्वितीयोऽसि | त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि |
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि || ४||

हे असे आहे का?

सच्चिदानंदाद्वितीयोऽसि

(२)
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति |
सर्वं जगदिद त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: | त्वं चत्वारि वाक्पदानि || ५ ||
हे असे आहे का?
"त्वत्तस्तिष्ठति"

अर्थः
हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण झाले. हे सर्व जग तुझ्यामुळे चालते, हे सर्व जग तुझ्यातच नष्ट होते. हे सर्व जग सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तू भूमी, जल, अग्नी, वायू व आकाश आहेस.

अर्था मध्ये शेवटी असे जोडले पाहिजे का?
"(परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हीं) चार वाणींची स्थानेहि तूंच आहेस.

(३) सहाव्या श्लोकाचा अर्थ, (माझ्या मते हा खुप महत्वाचा व अर्थपुर्ण असा श्लोक असलयाने) जास्त विस्तृत करुन सांगणे आवश्यक आहे.
माझ्या मते अर्थ असा आहे:
"तूं सत्व, रज आणि तम या त्रिगुणांपलीकडील आहेस.(तूं जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तीन अवस्थांपलीकडील आहेस.) तूं स्थूल, सूक्ष्म व आनंदमय अशा तीन देहांपलीकडिल आहेस. तूं उत्पत्ति, स्थिति, लय किंवा वर्तमान, भूत व भविष्य या तीनही कालांच्या पलीकडिल आहेस. तूं शरीरातील मूलाधार चक्राच्या ठिकाणी नित्य राहतोस. तूं जगताची उत्पत्ति, स्थिति व लय करणाऱ्या त्रिविधशक्ति तस्वरुपी आहेस. जीवन्मुक्त योगी निरंतर तुझे ध्यान करीत असतात. तूं ब्रम्हदेव (सृष्टिकर्ता), तूं विष्णु (सृष्टिपालक), तूं शंकर (सृष्टिसंहारक), तूं इंद्र (त्रिभुवनैश्वर्याचा उपभोग घेणारा), तूं वायु (सर्व जीवांना प्राण देणारा), तूं सुर्य (सर्वांना प्रकाश देऊन कार्याची प्रेरणा देणारा), तूं चंद्र (सर्व वनस्पतींना जीवन देणारा), तूं ब्रम्ह (प्राणीमात्रांतील जीवनरुपी) आणि पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार हे सर्व तूंच आहेस."

(४) गणेश मंत्रा मध्ये "निचृद्गायत्रीच्छंद:" च्या ऐवजी "निचॄद्‍गायत्रीछंदः" असे लिहिणे उच्चारनुसार होईल असे वाटते.

(५) फलश्रुती मध्ये "इदमथर्वशीर्षंमशिष्या न देयम् " ह्याचा विग्रह
"इदम् अथर्वशीर्ष‍ं अशिष्याय न देयं"
असा करुन अर्थ (जो तुम्ही बरोबर लिहिला आहे) सांगणे नवख्यांसाठी जरूरीचे आहे असे वाटते.

चू भू द्या घ्या

ravinsk,

सच्चिदानंदाद्वितीयोऽसि , निचृद्गायत्रीच्छंद:

हे योग्यच आहे.

हिम्या,
मूळ अथर्वशीर्षानुसार वर दंडासहित लिहिलेलेच योग्य आहे, आपण सलग उच्चार करत असलो तरी.

संयोजक,
आपण शीर्षकात 'अथर्वशिर्ष' असं लिहिलं आहे. ते 'अथर्वशीर्ष' असं हवं.

उच्चारा पेक्षा अर्थ बघितला तर सलग लिहिलेले जास्त योग्य वाटते... अन्यथा चवथ्या खंडाचा अर्थ नुसताच ब्रह्म, पृथ्वी, अंतरिक्ष, ओंकार असा होईल.. ह्यात तू ह्या अर्थाचा त्वं हा शब्दच नाही आहे..
पण जर सलग असेल तर तो अर्थ बरोबर लागतो.. त्यामुळे ते सलग असलेले जास्त संयुक्तिक वाटते..
आणि माझ्याकडे असलेल्या ४ पुस्तकांमध्ये असेच सलग लिहिलेले आहे..

ॐ ॐ ॐ... जमलं... आमच्यात आधी व नन्तर शान्तिमन्त्र म्हणत नाहीत... ओम नमस्ते गणपतये ... पासून........... तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै . ओम शान्ति शान्ति शान्ति ..... एवढेच म्हणतात.... शान्तिमन्त्र हे ऋग्वेदातले आहेत.... हे अथर्ववेदातले..... मिसळामिसळी सगळीकडे वेगळी वेगळी असणार... मधले मात्र सारखेच आहे... त्वं बह्मा... हे सर्व सलग आहे... मध्ये दन्ड नाहीत...

हिम्या, आता मला असे वाटू लागले आहे की वर लिहीलेलेच बरोबर आहे, खर तर तो श्लोक उच्चारण्यातच माझि चूक होत होती!
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं | रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं |
वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं | ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ||
यातिल पहिला भाग म्हणल्यावर शेवटचा स्त्वं चा उच्चार वर खेचून, थोडा पॉझ घेऊन, पुढील वाक्य म्हणून, पुन्हा शेवटचा स्त्वं चा उच्चार वर खेचून पॉझ घेऊन, पुढे वाचित गेल्यावर नेमक जमतय, अन हेच कधीकाळी "एक्स्पर्ट भटजीच्या तोन्डून" ऐकलेले पुसटसे आठवतय देखिल Happy ही बहुधा सन्स्कृतचीच खासियत असावी

सबब, मी माझी आधीची शन्का दूर झाली असे जाहीर करतो Happy

रविने सान्गितलेले टायपो बरोबर आहेत Happy झक्की आत्ता रात्रीचे झोपले अस्तिल, उठले की करतीलच दुरुस्त Happy मग घेतो कॉपी करुन Happy
झक्कीन्ना पुनःश्च धन्यवाद

झक्कीकाका, खुपच छान!

ravinsk, आपणदेखील काही राहिलेले अर्थ व्यवस्थित समजाविल्या बद्दल धन्यवाद! Happy

दादना अनुमोदन..
>> अर्थासकट अथर्वशीर्ष म्हणजे साजुक तूप घालून उकडीचे मोदक... ते ही मायबोलीवर म्हणजे हळदीच्या पानावर उकडलेले ..
अगदी अगदी.. नुसते साजूक तूपच नाही तर त्याच्यावर दाटसर अंगरस सुद्धा.. Happy

ravinsk मलासुद्धा याच गोष्टी खटकल्या होत्या. शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद..

कोणाला श्रीसूक्ताचा अर्थ / मराठी अनुवाद माहीत आहे का?

हिम्या,
तुझं बरोबर आहे. मध्ये दंड नकोत. मात्र, रविन यांनी सांगितलेले टायपो नाहीत. वर लिहिलेलेच योग्य आहे.

भाषांतरात 'यजति' म्हणजे पूजा करणे असे आले आहे. ते बरोबर नाही. यजति = हवन करणे.
तसंच, 'जो करेल' हे योग्य नाही.. जो करतो, असं हवं.

लोकहो धन्यवाद.

अभ्यासापेक्षा आवड व श्रद्धा जास्त. त्यामुळेच हे लिहीले.
<<सच्चिदानंदाद्वितीयोऽसि , निचृद्गायत्रीच्छंद:, ॐ , तत्वमसि>> हे मला लिहीता आले नाही, म्हणून चुकीचे लिहीले गेले. अशिष्याय मधला य खाल्ला!!
'अथर्वशिर्ष' हे पण चुकीनेच लिहीले. संस्कृत लिहीताना र्‍हस्व दीर्घाची चूक! कुठे लपवू हे काळे तोंड!! जाउ दे झाले. आपले देव क्षमा करणारे आहेत! चुका दाखवल्या म्हणजे लोकांनी हे वाचले. यातच मला जास्त आनंद झाला.

आता यात मधेच उपनिषद् नि वेद कुठून आले?
अहो, सर्व ज्ञान जर त्यातच भरले आहे, तर नवीन ज्ञान कुठून आणणार? लोकांना समजेल किंवा लोकांचे कल्याण व्हावे, अर्थ जास्त सुस्पष्ट करावा म्हणून निरनिराळ्या महात्म्यांनी त्यावरूनच इतर श्लोक, मंत्र इ. तयार केले.

खुद्द श्रीमद्भगवद्गीता हे उपनिषदांचे सार आहे. त्यातले दुसर्‍या अध्यायातले श्लोक १९ व २० हे जसेच्या तसे कठोपनिषदातल्या अनुक्रमे मंत्र २० व १९ वरून घेतलेले दिसतात. भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा क्रम त्यांच्या सोयीनुसार बदलला. आणखी किती श्लोक कुठून आले असतील. म्हणून काय झाले, सगळे उपनिषद वाचण्या ऐवजी त्याचे "गाईड'' मिळाले तर बरेच ना!

खुपच छान!

एक शंका....अर्थामधे 'प्रथमपती' च्या जागी 'प्रमथपती'' हवे का? कारण श्लोकात तसे आहे म्हणुन विचार्ले.

वृशाला अनुमोदन. अष्टनाम गणपती-मध्ये चुकून प्रथमपती झाले वाटते.

झक्कीकाका खूप छान काम केलतं. मनापासून धन्यवाद.

झक्कीकाका धन्यवाद. माझ्या मुलाला अथर्वशीर्ष म्हणता येते पण त्याचा अर्थ आम्हा आईबाबांनाच माहित नव्हता. आता त्याला प्रिंट काढून देइन.

ही तर नुसती सुरुवात आहे. आता हे वाचून इतर लोक त्यांना जे काय माहित आहे ते सांगतील. उदा. कमीत कमी श्वासात हे आवर्तन करायचे. त्याच प्रयत्नात अनेक शब्द चुकीचे लक्षात राहिले. शिवाय माझ्याजवळ हे कुठे लिहीलेले नाही. वेबवर पाहिले, पण अधिकृततेची खात्री कोण देणार?

तरीपण लिहीले! असा उद्योग केला त्याला कालीदासाने एक सुंदर उपमा दिली आहे. ज्ञानेश्वरांनी पण. तशीच कुणा जैन साधूने पण. अर्थात् इथे त्याचा संबंध नाही.

Pages