अविश्वसनीय लडाख ! .... भाग २

Submitted by सव्यसाची on 18 September, 2015 - 10:42

अधिक आषाढ शुद्ध विनायक चतुर्थी (२० जून)

निलेश कळव्याहून टक्सी घेऊन आला, त्याने अक्षयला ठाणे स्थानकाबाहेर उचलले, मग मला आणि मग आम्ही मुंबई विमानतळावर पोचलो. उतरल्या उतरल्या मी ढकलगाडीसाठी धावलो आणि जाकीट टक्सीत विसरलो. मग चालकाला फोन. नशीबाने लगेचच लक्षात आल होत त्यामूळे तो लगेच परत आला. तिथे अजय आलेलाच होता. त्याने तात्काळ करता येणारी खायची पाकिटे आणली होती सगळ्यांसाठी. ती १० १० आमच्या पोत्यांमधे भरली. ही पाकिटे म्हणजे एक मोठा विनोदाचा आणि चिंतेचा विषय झाली पुढील सगळी वारी. आता अजून वजनाची चिंता. पण काही त्रास झाला नाही. अक्षयचा हा पहीलाच विमान प्रवास. मग त्याला चलती गाडी के बाहर भुकना खतरनाक है वगैरे सांगून झाल. उलटीसाठी मात्र चालेल हा देखील उपदेश केला. पण तशी वेळ आली नाही.
मधे जम्मूला थांबलो तेंव्हा सगळ विमान रिकाम झाल. म्हटल आता आपणच. पण नाही, जवळपास सगळ विमान परत भरल. थोड्याच वेळात श्रिनगरला पोचत आलो व खिडकितून मस्त हिमालयाच दर्शन घडू लागल. खाली हिरवी हिरवी शेते व त्याला लागून हिरवे डोंगर, त्यातलेच लांबचे डोंगर खूप ऊंच ऊंच जात वरती बर्फ़ाने मढलेले. खलास दृश्य होते. हेच आता आम्ही पुढे बरेच दिवस अनुभवणार होतो. उत्सुकता ताणली गेली होती. श्रिनगरला पोचलो आणि सामानासाठी थांबलो होतो. तिथे असलेला एक रक्षक अजय वर एकदम फ़िदा होता. क्या हाइट है, क्या बॉडी है ! त्याला अजयच्याबरोबर एक फोटो पाहीजे होता. मला शंका आली की याला अजय कोणी अतिरेकी तर वाटत नाही ना, एवढी चौकशी करतोय तर, कोण जाणे. तो म्हणालापण की त्याला वाटल हा अफगाणी पठाण आहे की काय. मग त्याच्या बरोबर एक फोटो काढला खरा टक्सिपाशी, पण त्याच नाव गाव माहीत नाही त्यामूळे तो विषय तिथेच संपला. श्रिनगर मधे चक्क उकडत होत. ही म्हणजे कमाल झाली. चक्क घाम येत होता. पण हॉटेलवर खोलीत उकडत नव्हत. म्हणजे महाबळेश्वर सारख. वारा थंड आहे पण उन्हात उकडत व सावलीत गार. हॉटेल मस्त दल सरोवरासमोर होत. उत्तमपैकी जेवण केल, थोडी झोप काढली, आणि दल वर गेलो. एक साधी शिकारा फेरी असते आणि एक फ़िरंग्यांसाठीची, अशी माहिती निलेशने पुरवली. मग आम्ही चौघे फ़िरंग्यांच्या फेरीवर निघालो. ही दल सरोवराच्या अंतर्गत भागाची फेरी आहे जिथे साधे प्रवासी येत नाहीत. अर्थातच महाग आहे पण फारच अप्रतीम आहे. त्या संधिप्रकाशातील फेरीमुळे तूफान धमाल आली. २ तासांची मोठी फेरी होती. मधे त्यांचा चहा, म्हणजे कावा प्यायला. चांगला असतो. सुका मेवा घातलेला बिनदुधाचा चहा. तळ्यातल्याच बाजारामधून पण गेलो पण काही घेतले नाही. परतताना अंधारात चमकणारे पाणी, तळ्याच्या आजूबाजूच्या आता प्रकाशित असलेल्या हाऊसबोटी, नावाडी एकमेकांना घालत असलेली हाळी किंवा शिव्या, यामुळे मला चिंगारी कोई भडके.... गाण्याची आठवण आली. अस वाटल ही नाव अशीच जात रहावी. अर्थात लवकरच फेरी संपली. मग फारशी भूक नव्हती. थोडफार खाऊन झोपून गेलो. मी अक्षय एका खोलीत व अजय निलेश दुसऱ्या. दुसऱ्या दिवशी अतुल येणार होता आमच्या खोलीत. अक्षयने मगाशी पोचल्या पोचल्या टिव्ही लावला होता पण त्याला म्हणालो नको लावूस मला वैताग येतो अशा ठिकाणी टिव्हीचा. कारण आपण निसर्गसौंदर्य बघायला आलो आहोत. त्याने मग वारीभर टिव्ही अजिबात लावला नाही. खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. नाहीतर बरीच लोक कासावीस होतात टिव्ही लावला नाही तर. कहर म्हणजे, सगळ्या वारीभर प्रत्येक हॉटेलमधे केबल टिव्ही होता. अगदी नुब्राच्या तंबूमधे पण टिव्ही बघून मी गारच पडलो. फक्त एकाच ठिकाणी नव्हता ते सरचूला.

अधिक आषाढ शुद्ध पंचमी दक्षिणायनारंभ (२१ जून)

आज निलेश सोडून आम्ही ३ जण पहाटेच उठून साडे सातला टक्सी करून गुलमर्गला निघालो. रस्ता एकदम निसर्गरम्य हिरव्या दाट झाडीचा होता. चालकाशी बोलता बोलता अर्थातच दहशतवाद, अतिरेकी वगैरे गोष्टींवर तो आला. आम्ही विचारले होते की इथे काय काय शेती करतात. त्यावर तो म्हणाला अमूक अमूक शेती, पण तरूण बरेचसे काही करत नाहीत. मग म्हटल काम कोण करत, तर म्हणाला बाहेरून आलेले बिहारी लोक. मग त्याने भैय्यांच्या नावाने बोटे मोडली. स्थानीक तरूण दिवसभर नशा करतात किंवा अतिरेकी बनतात. अर्थात हे जरा टोकाचे विधान असले तरी इथेही भैया लोकांशी वाद आहे हे पाहून अचंबा जाहला. राज्याराज्यात मातीच्या चुली. गुलमर्गला पोचल्यावर जय जय शिव शंकर या गाण्याच जिथे चित्रण झाल त्या देवळापाशी थांबलो. इथून चौफेर फार मस्त पर्वतराजी दिसते. तिथे जाताना जवळपास शे दिडशे मेंढ्यांनी आमचा रस्ता अडवला होता काही काळ. मग त्यांना आधी जाउ दिले. हा प्रकार नंतर बरेच वेळा अनुभवायला मिळाला प्रवासात. नंतर गोंडोला फेरीसाठी तिकिटे काढायला २ किलोमीटर चालत गेलो. आणि अतोनात वैतागाचा फेरा सुरू झाला. तिथे वाटाड्यांचे एवढे प्रस्थ आहे की दिड तास रांगेत पाचवा क्रमांक असूनही तिकिट मिळाले नव्हते. शेवटी मी आणि अजयने अक्षरश: मारामारी केली. त्यानंतर पोलीस आले. पण तेही फारसे काही करेनात. त्यतला एक तर स्वत:च एका वाटाड्याला पैसे देऊन तिकिट काढून घेत होता. कहर म्हणजे खुद्द तिकिटे देणाराच आतल्याआत स्वत: पण तिकिटे देत होता मागच्या दाराने येणाऱ्यांना. मग परत बाचाबाची. मग त्या वाटाड्यांचाच म्होरक्या आला, त्याने शब्दश: लाथा घालून त्यांना पळवले आणि मग तिकिट मिळाले. मधे मधे घोडेवाले येऊन विचारत होते येणार का, कशाला गोंडोल्याच्या रांगेत उभे रहाता. पण गेलो नाही, आणि तेच बरे झाले. वर जायला २ गोंडोला फेऱ्या आहेत. गोंडोला म्हणजे केबिन कार. घोडेवाले फक्त पहिल्या टप्प्यापर्यंत जातात. आणि त्यापुढे दुसरा टप्पा गोंडोलाने जाउ म्हटले तर तिथे तिकिट काढता येत नाही. म्हणजे खालीच तुम्ही ठरवायचे की फक्त पहिला टप्पा करायचा आहे की दोन्ही. तसेच तिकिट काढायचे. त्यामूळे घोड्याने येणारे नंतर अगदी वर जाउच शकत नाहीत. अगदी वर पोचेपर्यंत नाकी नऊ आले रांगांमूळे. पण वरती मात्र तूफान दृश्य होते सगळीकडे. चौफेर हिमाच्छादीत शिखरे, हिरवे जांभळे पर्वत, अप्रतीम निळे आकाश, मस्त थंडी, दुरवर दिसणारे काही धबधबे, बर्फ़ात खेळणे, घसरगुंडी वगैरे. इतकी मजा की ते प्रसिद्ध उद्गार सहज तोंडात आले. ..

गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त हमीं अस्तो हमीं अस्तो हमीं अस्त !

वर टोकाला गेलो तर पलिकडे पाकव्याप्त काश्मीर दिसते अस कळल म्हणून निघालो खरे. पण १४००० फ़ुटांवर असल्याने धाप लवकर लागत होती आणि जवळ जवळ तुंग चढावा लागल असता. मी आणि अजयने तो नाद सोडून दिला. अक्षय जात रहिला वर वर. तरी मी नंतर पाऊण वाटेपर्यंत गेलो. तिथे मगाशी ज्याच्याशी जोरदार बाचाबाची केली तो वाटाड्या फ़िरंग्यांना घेऊन आला होता. त्याने आपणहून माझा फोटो काढून दिला. झाले गेले गंगेला मिळाले. अक्षय मात्र पार वर पर्यंत गेला आणि तिथे असलेल्या सैनिकांना भेटला. त्याने घरून निघतानाच ठरवले होते की पाकव्याप्त प्रदेश बघायचाच. मी खाली गोंडोलापाशी आलो. तिथे अजय भेटला तो म्हणाला खालीच जाउ. मग खाली येऊन कावा पीत बसलो मगाचच्या तिकिट खिडकीपाशी. तासाभराने अक्षय आला आणि निघालो. मी म्हणेन गुलमर्गला जायची अजिबात गरज नव्हती. कारण वरून जे पाहीले ते आम्ही नंतर पुढे १४ दिवस पहाणारच होतो. त्यासाठी ते तिकिट काढायचा भीषण त्रास सहन करणे मुर्खपणा आहे. त्यापेक्षा पहेलगामला जा. अर्थात, आम्हाला वेळ कमी होता त्यामूळे ते शक्य नव्हत. पहेलगामला जाऊन रहायला पाहीजे. आम्हाला संध्याकाळी परत यायच होत. हॉटेलवर आलो तर इतर लोक आले होते. आमच्या गाड्या पण आल्या होत्या. फक्त अक्षयची नव्हती आली. मग गाडीची बांधाबांध सोडवणे, डागडुजी आणि पेट्रोल भरण्याचा कार्यक्रम झाला. माझी नंबर प्लेट तुटली होती. थोडे टाकीला खरचटले होते. बाकी काही त्रास नव्हता. अतुलची बाईक उत्तम स्थितीत होती. आज संध्याकाळी पहिली सभा झाली सगळ्या संघाची. नमस्कार चमत्कार नाव गाव झाल. मग जेवण. ते भयानक होत. काय करणार, सवय करावी लागेल.

अधिक आषाढ शुद्ध षष्ठी (२२ जून)

आजचा दिवस पण श्रिनगरमधेच होता. सकाळी अक्षय अजय कुठेतरी गेले गाडीचे काम करायला. मी अतुल आणि निधी असे शंकराचार्य मंदीराला गेलो. बरच ऊंचावर आहे ते. त्या घाटाच्या सुरवातिलाच एक चौकी होती तिथे आपले नाव, गाव, गाडीचा क्रमांक आणि अनुज्ञप्तिचा क्रमांक अशी माहिती नोंदवायची होती. तिथे जाऊन रांग लावली तर आजुबाजूनी सतत स्थानीक लोक पुढे घुसून माहिती देत होते व तो मुर्दाड हवालदार त्यांचीच माहिती घेत होता. एकूण इथे काश्मीरमधेतरी शिस्त वगैरे प्रकार दिसत नव्हता. वर मी हवालदाराला खडसावले तर ते लोक मलाच ओरडायला लागले. मी ऐकत नाही बघून मग हवालदाराला सांगतात की चलो इनका पहीले काम कर लो इनको बहोत जल्दी है. अरे? चोर तो चोर वर शिरजोर ?! वर देवळापाशी मोबाईल, कातडी पट्टे अस काही नेउ देत नाहीत. तिथे हे सगळ ठेवायची पण सोय नाही. तेंव्हा सगळ हॉटेलवरच ठेवणे योग्य, किंवा गाडीत. आमच्याकडे बाईक असल्याने ठेवायला खण नव्हता. त्यामूळे आधी अतुल व निधी, नंतर मी, असे देवळात जाऊन आलो. वर देवळात मोठी रांग असते व बराच वेळ मोडतो. त्यामूळे मी बराच वेळ टुकत बसलो होतो खाली जवळपास पाऊण तास. वर जायला एक पायऱ्यांची वाट आहे व एक खुष्कीची. म्हणजे पायवाट. या खुष्कीच्या वाटेने जवळ आणि सोपे पडते. शिवाय, या वाटेने खालचे शहर विना अडथळा दिसते. वरून श्रिनगरचे दृश्य अप्रतीम दिसते. एका बाजूला झेलम नदी व दुसऱ्या बाजूला दल सरोवर. अतुलने भरपूर फोटो काढले... स्वत:चेच ! या कोनातून त्या कोनातून. एकूण त्याला भरपूरच वेड आहे फोटो काढायचे. पुढेही प्रवासभर तो दर ५ मिनिटाला थांबत होता. इथे माझा असा फोटो काढ तसा काढ. आणि प्रत्येक पक्षी, फूल, प्राणी याचा फोटो घेतलाच पाहीजे असापण पण त्याने केला होता. त्यामूळे भरपूरच वेळ मोडायचा नंतर प्रवासात. मंदिरापाशी भारतीय सैनिक प्रसाद वाटत होते. तिथेच रोट्या बनवल्या जात होत्या व भाजी. बहुतेक छोले होते. पुऱ्या पण होत्या. सगळ सैनिक बनवत होते. भांडी घासणे पण तेच करत होते. मग भाविक पण त्यांना अधून मधून मदत करत होते. मंदीर पाहून हॉटेलवर परतलो. अजय अक्षय आले होते. मग सगळेच तिथल्या बागा पहायला बाहेर पडलो. २ ३ पाहील्या. फक्त चश्मेशाही बाग अप्रतीम आहे. खरी मुघल राजाची वाटते. वेळ फारसा नसेल तर फक्त हीच एक बाग पहावी. आम्ही जिथे जेवण केले त्या ठिकाणी लाल चेरी, पिवळी चेरी, जर्दाळू यांची झाडे होती. मग झाडावरून ती फळे काढून खाल्ली. पिवळी चेरी फारच अप्रतीम होती. बागा पाहून झाल्यावर अक्षय निधी जेट स्कीला गेले. आम्ही हॉटेलवर येऊन आराम केला. बाकिची मंडळी पहेलगामला गेली होती. काही शिकारा फेरीला. सगळी रात्री जेवायला भेटली. उद्यापासून खरी बाईक फेरी सुरू. एकूण १९ बाईक, ५ मागे बसणारे, आणि १५ १६ लोक चारचाकीमधे. उद्या पहाटे उठून निघायचे होते. पुढचे सगळे दिवस आम्हाला आदल्या रात्री ३ वेळा सांगीतल्या जायच्या. उद्या ५ ६ ७ अस सांगीतल असेल तर म्हणजे ५ ला उठण्यासाठीची हाक, ६ वाजता नाष्टा तयार असेल, ७ वाजता निघायचे. साधारणपणे अर्धा तास उशीर होत होता पण ते ठीक आहे. माझी युनिकॉर्न, २ यामाहा, एक हल्क आणि बाकिच्या बुलेट होत्या. इथून निघायच्या आधी इथला हिशोब पूर्ण करायचा आपापसातला अस आम्ही चौघांनी ठरवल होत. त्यामूळे रात्री तासभर आकडेमोड करत बसलो. मी पुर्वी तयार केलेले अप्लिकेशन फक्त विंडोजवर चालणारे होते. इथे संगणक नव्हता. मग तस अप्लिकेशन अण्ड्रोईडवर चालवायची काही सोपी युक्ती आहे का ते पहात होतो. पण मिळाली नाही. मग एकदा भाचीने सांगीतलेल स्प्लिटवाईज नावाचे अप्लिकेशन घ्यायला झटू लागलो. पण खराब नेटमूळे ते होईना. मग हातानेच वहीत हिशोब केला. फारच शीण आला. पण बरेचसे पैसे इकडून तिकडे देऊन झाले झोपायच्या आधी.

अधिक आषाढ शुद्ध सप्तमी (२3 जून)

सकाळी पहाटे उठून तयार व्हायला सुरवात केली आणि अतुलची धमाल सुरू झाली. माझे हे सापडत नाहीये माझे ते सापडत नाहीये. खोळ आणि खोगीराची पूर्ण उचकपचक. त्यात सगळ सामान प्लास्टीक पिशव्यांमधे. त्यामूळे नुसता चर चर आवाज. मला एका मित्राची आठवण झाली. एकदा राजमाचीला गेलो असता मी आणि विनायकने टायमर लाऊन वेळ मोजला होता त्या मित्राला स्थिरस्थावर व्हायला लागणारा. त्याने ४५ मिनिटे घेतली होती. असो. कहर म्हणजे, अतुल खोळीच्या एका खिशातून एक गोष्ट काढायचा आणि दुसऱ्या खिशात भरायचा. मग शोधत बसायचा तीच गोष्ट. पुढचे सगळे दिवस दिनरात ह्योच धुमाकूळ. आधीच रोज लवकर उठावे लागायचे, त्यात हा त्याच्याबरोबरच आम्हाला पण उठवून ठेवायचा. अतुलची सकाळची अवस्था मुरारबाजी सारखी असायची. केस पिंजारलेले, डोळे लाल, आणि लवकर आवरायची घाई. त्यात त्याला रोज अंघोळ करायचीच असायची. त्यामूळे गरम पाणी येतय की नाही, पंचा साबण दिलाय की नाही इथपासून सुरवात. बहूतेक हे सगळ लक्षात घेउनच तो आमच्या बराच आधी उठत असे. त्यामूळे आम्ही कधी सगळ्यात शेवटी नाही आलो नाश्ट्याला हे मात्र खरे.

नाष्टा झाला आणि रायडिंग गिअर चढवायच भयप्रद काम सुरू झाल. बाईक रायडिंगचा हा एक मोठा त्रास आहे अस म्हणता येईल. साधारणपणे आमचा पोषाख असा होता. एकावर एक २ पूर्ण बाह्यांचे टीशर्ट्स, वर रायडिंग जाकीट. ज्यांनी थर्मल आणले होते ते थर्मल घालायचे. खाली मी एक खेळाची विजार आणि वर कार्गो विजार. मग हातापायाचे संरक्षक. डोक्यावर कानटोपी मग हेल्मेट. मग गॉगल चढवणे. पायात अर्थातच बूट जाड मोज्यांसहीत. असा सगळा सरंजाम झाला की मग तो मधे कधी उतरवायचा म्हणजे महाकठीण काम. पण ते फारसे करावे लागले नाही. आज कारगिलला पोचायचे होते. बऱ्याच सुचना दिल्या गेल्या होत्या कसे चालवा, संघ सोडू नका, नेहमी आपल्या ३ गाड्या आरशात दिसल्याच पाहीजेत वगैरे. ते फक्त जेवायला जिथे थांबलो तिथपर्यंतच पाळले गेले. मग सगळे आपापला संच धरून चालवत राहीले. मी अक्षय आणि अतुल एकत्र असायचो. अजय भलताच बहीर्मुखी असल्याने त्याचा वेगळा संच जमला होता. तो नंतर वारीभर आम्हाला फारसा दृष्टीस पडत नसे. जेवायला सोनमर्गला थांबलो होतो. फारच रम्य जागा होती. आता पर्वताला एकदम भिडलो होतो. जेवण ठीक होते. पण माझ पोट श्रिनगरलाच बिघडल होत. ते मसालेदार जेवण झेपत नव्हत. जेवणानंतर लगेच पाऊस पडायला लागला आणि मला उतरून पावसाळी सूट चढवायला लागला. आणि लक्षात आल हिवाळी जाकीटावरून तो चढवण शक्य नाहीये. म्हणजे पाऊस पडायला लागला तर उबेसाठी ते जाकीट नसणार. असो. आत्तातरी फारसा पाऊस नव्हता पण त्या बर्फाळ पाण्याने भिजलो तर अती थंडी वाजेल या कल्पनेने घाबरलो होतो.

आता सुरू झाला झोझिला. सगळ रस्ता फक्त धूळ भरलेला. डांबरी रस्ता वगैरे मागे सोनमर्गलाच राहीला. पुढचे सगळे दिवस बऱ्याचदा पुढील स्थिति असायची. एकदा बिनडांबरी वाईट रस्ता सुरू झाला की २५ २५ किलोमीटरभर तसच. इथे आपण राजमाचीला वगैरे जातो तेंव्हा २ ३ किलोमीटर फारतर वाईट रस्ता असतो. तिथे २५ २५ किलोमीटर तसेच चालवायचे होते. हे नक्कीच आव्हानात्मक होते. पण जवळपास सगळे दिवस आम्हाला हवामानाने खूपच साथ दिली. कधीच खूप बर्फ़ाचे, गारांचे वादळ झालय, फार पाऊस पडलाय अस झाल नाही. त्यामूळे प्रवास एकदम मस्त झाला. पण भिती मात्र २ ३ वेळा दाखवली निसर्गाने वादळाची. ते येईलच पूढे.

झोझिलामधे धुळीने माखत प्रवास चालू होता. आता ते स्वच्छ जाकीट जे खराब झाले ते तसेच पूढे १५ दिवस. झोझिलामधे अगदी वर टोकावर बर्फ होता. शिखर गाठले तेंव्हा थंडी प्रचंड होती. त्यामूळे झटपट फोटो काढून पूढे निघालो. वर पोचल्यावर विचार केला की जर पाऊस पडला असता तर रस्त्यावर चिखलच चिखल झाला असता. मग पार वाट लागली असती. कारण रस्त्याखाली डांबर कुठे नव्हतेच. प्रत्येक घाटाच्या शिखरावर एक मोठा दगडी फलक असतो. नाव आणि ऊंची सांगणारा. त्या प्रत्येक दगडाबरोबर फोटो काढायचा अस ठरवल होत. रोहतांग पास वगळता सगळ्याच घाटावर ते जमवल. रोहतांगला तसा फलकच नव्हता आणि त्या ठिकाणी उत्सुकता पण नव्हती.

झोझिला झाल्यावर द्रासला पोचलो. तिथे कारगिल युद्धाचे मस्त स्मारक आहे. एका सैनिकने ५ मिनिटे माहीती दिली, टायगर हील, टोलोलिंग वगैरे दाखवले. लोकांनी उत्स्फ़ूर्तेने भारत माता की जय वगैरे आरोळ्या ठोकल्या. तिथल संग्रहालय फारस पहाता आल नाही कारण अंधार पडू लागला होता आणि आतमधे दिवेच नव्हते. मग कारगिल शहराकडे कूच केले. आता रस्ता उत्तम डांबरी होता. हॉटेलही एकदमच मस्त होते. मी आज रात्री अनशन केले. त्याचा आणि थंड हवेत आल्याचा फायदा झाला आणि माझे पोट दुसऱ्या दिवशीपासून उत्तम झाले. मला थंड हवा नेहमीच आवडते आणि मानवते उकाड्यापेक्षा. इथेही वायफाय वाईट होते त्यामूळे ते अप्लिकेशन नाही मिळाले. श्रिनगर सोडल्यापासून मला वोडाफोनला संपर्क नव्हता. फक्त पूढे प्रत्येक हॉटेलमधे कायम वायफाय होते.

अधिक आषाढ शुद्ध सप्तमी (२४ जून)

आज कारगिल ते लेह प्रवास होता. रस्ता बराच चांगला होता. मधे नमीकला आणि फोटूला केले. लमायुरू गुंफा पाहिली पण त्यात काहीच खास नव्हते. तिथून ती चांद्रजमीन मात्र उत्तम दिसते. त्यासाठी तिथे जावे. आता एका ठिकाणी जेवायला थांबलो. ३ वाजून गेले होते. मी आणि निधी शाकाहार घेणार असल्याने वेगळ्या हॉटेलमधे गेलो आणि बाकीचे सगळे दुसऱ्या. अतुल कुठे गायब होता कळले नाही. मग कळले की तो मांसाहारींबरोबर होता पण मग त्याने तिसऱ्याच हॉटेलमधे जेवण घेतले. आमचे जेवण मात्र फार म्हणजे फारच उत्तम होते. थुक्पा म्हणजे सूप आणि मोमो. शिवाय वेगळे सूप पण होते मोमोबरोबर ते पण भारी होते. सगळच भन्नाट ! बेदम जेवलो. मग आमच्या वाटाड्याने सांगितले की आता लगेच निघा तरच अल्ची गुंफा पहायला मिळेल. आधी म्हटले गुंफेत काही नसते. पण तो म्हणाला नाही लडाखमधे २ गुंफा जरूर पहाव्यात, अल्ची आणि हेमिस. मग मी आणि निधी अक्षयपाशी गेलो, त्याला सांगितले. त्याचे जेवण झाले होते. पण अतुलला निघता येत नव्हते कारण त्याच्या बरोबर आज स्वप्नील होता आणि त्याचे जेवण चालू होते. मग आम्ही तिघेच एकदम सुसाटलो. ५ वाजले होते. काहितरी ४० किलोमीटर अंतर जायचे होते. रस्ता अगदी डांबरी आणि बिनखड्ड्यांचा. फारच उत्तम होता. त्यामूळे वेगात पळवत आम्ही चाळीस मिनिटात तिथे पोचलो. धावत धावतच गुंफेत शिरलो. आम्हाला सगळी देवळ बघायला मिळाली. मागून जे पोचले त्यांना फक्त एकच देऊळ मिळाल उघड. अल्ची खरच मस्त आहे. नक्की बघावी अशी गुंफा.

आता मी घरून निघताना जे करायचे ठरवले होते तो सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम गाठायचा होता प्रकाश फार जाण्याआधी. परत एकदा तूफान गाडी पळवली. शेवटी त्या संगमाला घाटातून पाहीले. तिथे फक्त आमचे टेंपो प्रवासी पोचले होते. बाईकवाले मी अक्षय आणि अजय फक्त. २ ३ मिनिटे फोटो काढून झाले आणि मी म्हटले चला अजून प्रकाश आहे तर खाली जाऊन येउ. अजय नको म्हणत होता पण आला लगेच आणि आम्ही १० मिनिटात परत गाडी पळवत खाली संगमावर पोचलो. मी मस्त सिंधूच पाणी प्यायलो. इतरांनिही तेच केल. काही फोटो काढता आले आणि अंधार झाला. आम्ही जातोय बघून आमचे अजून २ बाईकर्स पण आले आमच्या मागे पण संगमावर न वळता चुकून पूढेच गेले. त्या नंतर १५ २० मिनिटांनी परत आले ते आम्ही घाटातून पाहील. संगम एकदमच अफलातून आहे. सिंधूच हिरव निळ पाणी आणि झंस्कारच गढूळ पांढर. उद्या काही आम्ही लेह मधून इथे परत येणार नव्हतो. त्यामूळे आज गाडी पळवली त्याच सार्थक झाल. आता घाटात सगळे पोचले होते. मग निलेश मागोमाग सगळी वरात लेह मधे पोचली. शेवटी एकदाचे आम्ही लेहवासी झालो. < I AM LEH'D ! > गंमत म्हणजे, मला आत्तापर्यंत हे आठवले नव्हते की मी लहानपणी मनात धरलेले लेह गाव ते हेच आणि मी तिथे पोचलो आहे. दुसऱ्या दिवशी एकदम लक्षात आले. फारच मस्त वाटले. गिलगिट काही पहाता येणार नाही कारण ते पाकव्याप्त काश्मीर मधे आहे. असो. हॉटेल शोधून स्थिरस्थावर व्हायला वेळ गेला. आता वायफाय बरच चांगल होत. मला वोडाफोनला मात्र अजूनही सर्वीस नव्हती. आणि एअरटेल, एअरसेलने सर्वीस नाकारली. आज काही केल नाही फारस. थोडसच बाजारात फ़िरून आलो.

---

सर्व भाग
http://www.maayboli.com/node/55605 --- सुरवात
http://www.maayboli.com/node/55634 --- भाग २
http://www.maayboli.com/node/55652 --- भाग ३
http://www.maayboli.com/node/55678 --- भाग ४
http://www.maayboli.com/node/55692 --- समारोप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users