गणपतीबाप्पा आणि मी!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:18

नमस्कार!

गणपती बाप्पा मोरया!


Moortee.jpg

गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की आपल्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या आवडत्या गणरायाचं स्वागत, पूजा-अर्चा, आरत्या, प्रसाद आणि शेवटी निरोप असं सगळं आपण दरवर्षी करीत असतो. त्या गणोबाचं आणि आपलं अगदी अतूट नातं असतं. त्याच्या संदर्भात आपल्या कितीतरी आठवणी निगडीत असतात. आठवतं का, किती लहानपणापासून गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण कसे रंगून-दंगून जात होतो? त्या आठवणींना उजाळा देण्याकरीता हा उपक्रम. तुमची गणेशोत्सवातली एखादी जुनी खास आठवण किंवा कुठल्या गणेशमंडळांवर काम करताना घडलेल्या काही गंमतीशीर गोष्टी आमच्यासोबत शेअर करणार? चला तर करा सुरुवात.

खास आठवणी किंवा गंमती इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, उघडा आपल्या आठवणींचे कप्पे आणि सांगा त्या गंमतीजमती सर्वांना! Happy इथल्या संयोजक मंडळातल्या गंमतीजंमती वाचायला सगळे उत्सुक आहेत! Happy

मी साधारण ७वीत असेन. घरी १० दिवस गणपती बसायचा. डेकोरेशन करायला मी अगदी झपाटून जायचे.
टिव्हीवर पाहीलेले नवीन काही तिथे मांडायचे. एका वर्षी दोर्‍याला लटकलेला जोकर मस्त रंगवून बाकीच्या घंटा, लोलकांसोबत टांगला.
थोड्याच वेळात वडीलांनी हाक मारली. 'हा जोकर तू टांगलास?"
'हो. छान दिसतोय ना!"
"कशाचा आहे तो?'
'ते नाही का, टिव्हीवर दाखवलेले, रिकाम्या अंड्याच्या कवचाचा.....'
'मग ते इथे...??'
मी ब्लँक...वडीलांनी डोक्यात टपली मारली. आणि तो काढून हातात दिला.....:हाहा:

'शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको' ही माझ्या आजीची आवडती आरती, त्यामुळे ती लहानपणापासून आमच्याकडे म्हटलेली ऐकली आहे. आजी-आजोबा गणपतीला आमच्याकडे असले तर तर खासच म्हटली जायची. त्या आरतीमध्ये 'गोसावी नंदन निषदिन गुण गावे' अशी एक ओळ आहे. ती म्हणताना मला, दादाला आणी ताईला हमखास अनकन्ट्रोलेबल हसू यायचं. कसं आणि कधी सुरु झालं हे आता आठवतही नाही, पण दादाचा एक गोसावी आडनावाचा मित्र होता आणि त्याच्यावरुन ही ओळ आली की नेत्रपल्लवी होऊन आम्हाला हसू यायचं. ये येऊ नये म्हणून आम्ही एकमेकांकडे बघायचोही नाही, पण इतकं यायचं की ते कंट्रोल न झाल्यामुळे आम्ही खोलीतून हसू दाबत बाहेर पळायचो आणि बाहेर हास्याचा फवारा उडायचा. आता सगळं एकदम वेड्यासारखं वाटतं आणि एकत्र आरतीला कधी असलो तर असं हसूही येणार नाही, पण त्यावेळी जाम हसवणूक व्हायची. बाळपणीचा काळ सुखाचा.... Happy

विनिता, मो ... मस्त.

हो, हे असं येडचाप हसू हे बाळपणाचं व्यवच्छेदक लक्षणच! मला जनगणमन म्हणताना इतरांचे गंभीर चेहरे बघून हसू यायचं.

माझा वाढदिवस सप्टेंबरमध्ये आणि बहुतांश वेळा गणेश उत्सव झाल्यावर येत असल्याने, लहानपणी आमच्या हॉलमध्ये गणपतीत केलेले डेकोरेशन माझा वाढदिवस होईपर्यंत तसेच ठेवायचो... त्यामुळे माझी वाढदिवस पार्टी अगदी फुल्ल माहोलमध्ये व्हायची..... खोलीभर पताका, झिरमिळ्या, लाईटच्या माळा आणि उघडमिट करणारे शोचे दिवे..... मज्जाच मज्जा!

विनिता, मो भारी किस्से..
स्वरूप नशीबवान आहेस. एक तास बेंजो पण असायचा का Wink

मो, त्याच आरतीतील 'हाथ लिये गुडलड्डू' ला मी व भाऊ हमखास हसायचो. अजूनही हसतो. आमच्याकडेही ती नेहमी म्हंटली जाते.

... आरती संपली आणि प्रसाद वगैरे सुरू होणार म्हणून आम्ही पुन्हा टीव्हीकडे बघितले, आणि मनोज प्रभाकर ने स्टीव वॉ ची कांडी उडवली! ही एक आठवण कायमची डोक्यात बसली आहे. आधी दुपारी सचिन चे वन डे मधले पहिले शतक झालेले पाहिले होते. पण तरीही भारत जिंकतो का नाही याची शंका होती. पण या विकेट ने मॅच फिरली. हे रॅण्डम लक्षात होते. आता आर्काइव्ह्ज मधून ती मॅचही काढली Happy
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65977.html

मला जनगणमन म्हणताना इतरांचे गंभीर चेहरे बघून हसू यायचं.>>>
मला कळतच नाही की जन गन मन म्हणतांना चेहरा मयताला गेल्यासारखा का करतात लोक्स???

९ वी / १० वीत असतांना मी गणपती घरीच बनवायला सुरुवात केली.
एका वर्षी बनवला आणि बघत राहीले....काहीतरी चुकलेय नक्क्की!
शेवटी उठून फोटो पाहीला....कानच बनवले नव्हते :ड

अन एका वर्षी ......सोंड राहून गेली होती Happy

आम्ही नेहमी मोदक बनवताना त्यातला एक तिखटाचा बनवायचो..
तो ज्याला येईल तो लक्की अस म्हणायचो पन आपल्याला नको ते लक अस म्हणत प्रसाद घेताना खाताना जाम देव देव करत तोंडात टाकायचो Lol
मी ५वीत वगैरे असेल असच घरची आरती झाली आणि कॉलनीतले सगळे आम्ही जमलो .. आता त्या मोदकात एक तिखटाचा आहे हे आम्हा सर्वांनाच माहिती होत.. मनाचा हिय्या करुन सर्वांनी एका दमात मोदक तोडांत टाकले आणि कोण तो भाग्यवान अस म्हणत एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो तर तो भाग्यवान बिचारा डोळ्यातुन पाणी काढत मोदक संपवून पाणी म्हणत किचनमधे पळाला.. खतरनाक हसलो.. बेचारा..
प्रसाद आहे म्हणुन फेकता येत नाही आणि तिखटामुळे खाता येत नै अशी परिस्थिती झाली होती Lol
तेव्हापासुन मोदक अर्धा तोडून मग खायची सर्वांना सवय लागली Wink Biggrin

एकदा आम्ही सजावटीत रथ बनविला होता. पाच घोड्यांचा सारथी उंदिरमामा होता आणि मागे गणपतीबाप्पा विराजमान झाले होते. टेबलावर रथ असल्यामुळे अंमळ उंचच दिसत होता.
तर, असेच दर्शनाला येणार्‍यांपैकी एक काकु नमस्कार करुन बसल्या. प्रसाद वैगरे घेऊन त्या नाश्ता करत होत्या तेव्हढ्यात दुसरे कुणीतरी दर्शनाला आले आणि ते बाप्पाला नमस्कार करत असताना या काकु जोरात ओरडल्या, 'अय्या ! गणपती इथे आहे मला दिसलाच नाही मी तर घोड्याच्याच पाया पडले' Lol सगळ्यांची हसुन हसुन मुरकुंडी वळली. त्यानंतर दरवर्षी गणपतीत हा विषय निघतोच आणि आत्येभाऊ सेम अ‍ॅक्टिंग करुन परत परत मजा आणतो.

आरतीत येडचाप हसु तर आमच्याकडेही असायचं. आरती सप्रेम मधे 'परशुराम प्रगटला' ही ओळ शेजारच्या 'परशुराम बांगर' कडे बघुन जोरात म्हणणे. Biggrin
काही वात्रट मुले 'मातला रावण सर्व उपद्रव केला' ही ओळ 'पादला रावण सिता उडाली लंकेला' अशी म्हणत. त्यामुळे जरी आरती सुरु असताना तसे नाही म्हणाले तरी ते आठवुन हसु येत असे म्हणुन आम्हीपण एकमेकांकडे न बघताच आरती म्हणत असु.

मो म्हणते तसम बाळपणीचा काळ सुखाचा ...खरंच!
आमच्या अंगणात ३/४ सिताफळाची झाडं होती. आणि माझी मुलं लहान होती तेव्हा पायरीवर बसून सिताफळं खाऊन मजेत बीया समोरच्या अंगणात फेकायची. मग त्याचीही रोपं यायची.
सिताफळं खाण्यात माझ्या मुलीचा नं पहिला. तिला अतीशय आवडतात सिताफळं(अजूनही)
तर ती अगदी लहान असताना गणपतीची आरती म्हणताना "कंठी झळके माळ मुक्ताफळाची" ऐवजी "कंठी झळके माळ सीताफळंची" असं म्हणायची.

परवा टीव्ही वर होंठोंपे ऐसी बात आणि पग घुंगरू ही दोन गाणी ऐकल्याने गणपतीउत्सव चालू असल्याचे फीलिंग आले आणि जीवन सार्थक झाले. (ही दोन व इतर अशीच काही सार्वकालिक यशस्वी आणि यात दर पाच मिंटांनी त्यावर्षीचं यशस्वी गाणं - उदा: ओये ओये, ये अख्खा इंडिया जानता है, एक दो तीन, इ.... - असा लूप संध्याकाळी चार ते पहाटे चार अखंड चालायचा.)
आमचं हे मंडळ सलग काही वर्षे पुण्यात सगळ्यात जास्त ध्वनीप्रदूषण करणारं मंडळ होतं. आवाज कुणाचा... हे बोधवाक्य अगदी शोभून दिसलं असतं Wink

परवा टीव्ही वर होंठोंपे ऐसी बात आणि पग घुंगरू ही दोन गाणी ऐकल्याने गणपतीउत्सव चालू असल्याचे फीलिंग आले आणि जीवन सार्थक झाले. (ही दोन व इतर अशीच काही सार्वकालिक यशस्वी आणि यात दर पाच मिंटांनी त्यावर्षीचं यशस्वी गाणं - उदा: ओये ओये, ये अख्खा इंडिया जानता है, एक दो तीन, इ.... - असा लूप संध्याकाळी चार ते पहाटे चार अखंड चालायचा.)
आमचं हे मंडळ सलग काही वर्षे पुण्यात सगळ्यात जास्त ध्वनीप्रदूषण करणारं मंडळ होतं. आवाज कुणाचा... हे बोधवाक्य अगदी शोभून दिसलं असतं Wink

गणपती उत्सव म्हणले की अनेक आठवणी जागृत होतात. आम्ही रहात होतो नातुबाग गणपतीच्या गदी जवळ. घरापासुन एक चक्कर मारली तरी सहज महत्वाचे सर्व गणपती बघुन होत असत. आमच्या लेखी मुख्य गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, जिलब्या मारुती, बाबुगेनु चौक (याला आता नवसाचा गणपती असे नामकरण मंडळानेच करुन टाकले आहे. Lol बाबुगेनुच्या गणपतीपक्षा दहिहंडी जबरदस्त असायची) अखिल मंडई मंडळ, दगडुशेठ हलवाई, निंबाळकर तालीम, हत्ती गणपती, केसरीवाडा, नातुवाडा, हिराबाग, खजिना विहीर व शिवाजी रोडवरील खडकमाळ आळी.

यापैकी सगळ्याच मुर्ती जबरदस्त आहेत पण तरी जिलब्या मारुतीच्या बाप्पाकडे दिवसातुन ४-५ वेळा फक्त दर्शनासाठी चक्कर टाकली नाही तर फाऊल धरला जात होता.

याच काळात चित्रपटांचे वेड लागले व १० दिवसाचा चित्रपटमहोत्सवच साजरा होत असे. १०-१५ जणांचा ग्रुप गठ्ठ्याने, गणपती बघायला जातो असे घरी सांगुन, रोज एक चित्रपट बघत होतो. यात अमिताभचे चित्रपट जास्ती बघीतले गेले. चित्रपटगृहाकडुन परत येताना दिसतील ते गणपती बघत परत यायचे.

गणपती मंडळे अनेक वर्ष आपली कॅटेगरी संभाळुन आहेत. देखाव्याचे गणपती, लाईटचे गणपती, नुसती प्रसन्न मुर्तींचे गणपती वगैरे.

लाईटच्या गणपतीत नातुबाग म्हणजे एक नं. तिथे नेहेमी लागणारी ठराविक गाणी होती. होंठोंपे ऐसी बात, ग घुंगरू, मुंगळा मुंगला ही दोन/तीन गाणी व इतर अशीच काही सार्वकालिक यशस्वी गाणी व त्यावर नाचणारे लाईट बघणे म्हणजे सुख होते. दर पाच/दहा मिनीटांनी त्यावर्षीचं यशस्वी गाणं लागत असे. होठोपे ऐसी बात चालु झाले की आम्ही मित्र असेल तिथुन धूम ठोकुन संगम साडी सेंटरच्या कॉर्नरला जाऊन उभे रहात असु. त्यातले 'टांगडांग तडांग डांग खुळ' लागले की तो लाईट नाचवणारा असे काही गोल लाईट फिरवायचा की बास. गाण्यातल्या हमखास एखाद्या म्युझिक पीसला दोन्हीकडुन खालुन वर जाऊन एकमेकांचे चुंबन घेणारे बाण ही तर नातुबागेची खासीयत. त्यानंतर अनेक मंडळांनी त्याचे कॉपी केली पण नातुबाग वॉज ऑस्स्स्म. त्यांनी त्यांची अजस्त्र मुर्ती बदलुन लहान मुर्ती केली वर मंडळाची शानच गेली. नातुबागेची गर्दी पार शनिपारापर्यंत जात असेल. या मंडळाचा लाईट फिरवणारा माणुस हे आमच्याकरता एक गौडबंगाल होते. ते गुपित जाणुन घेण्याकरता खास एक दिवस त्याची ओळख करुन घेतली व पियानोसारखी त्याची पटी बघुन आलो होतो.त्या त्या ठेक्याला अंगावर येणारे लाईट, वर खाली जाणारे बाण, घुंगरासारखी फिरणारे दिवे, आतुन बाहेर व बाहेरुन आत जाणारीए रोषणाई फक्त एका बटणात सेट केलेली बघुन मज्जा आली होती.

गणपतीतलाले दोन किस्से अजुनही आठवतात. एक म्हणजे माझ्या आइला सकाळी कधीही जाग येत असे. आळीतल्या मंडळाच्या मांडावात रात्ररात्र कार्टी गप्पा मारत बसत. एकदा सकाळी ३.३० वाजता आइला जाग आली व ती केराची टोपली घेऊन कचरापेटीत टाकायला निघाली.मांडावातली पोरे चकित झाली होती. नंतर सगळ्याची हहपुवा झाली.

दुसरा किस्सा म्हणजे विसर्जनाच्या दिवशी आम्ही मित्राकडे व्हीसीआर आणुन कार्यक्रम करत होतो. सोबतीला बॅकपची पडोसनची कॅसेट होतीच. ती पण बघुन झाली आणी प्रचंड मोठा भुकंप झाला. तोच तो किल्लारीचा भुकंप. भयानक अनुभव होता तो. तेव्हा आत्तासारखा क्रेझीमेडीया नसल्याने नीट कळेपर्यंत दगडुशेट, मंडईचे गणपती लक्ष्मीरोडवरुन अलका चौकात पोचलेही होते.

हो, तिकडे नातूबागेचं होटोंपे ऐसी.. संपलं की आमच्या कोपर्‍यावर सुरू व्हायचं Proud

आमच्याकडची इतर नेहेमीची यशस्वी गाणी म्हणजे मुंगळा, बांगो बांगो बांगो, ताकि ओ ताकि.. पण त्यात टॉपला होटोंपे ऐसी च...

एकच वर्ष एक कुठलातरी काल्पनिक/मायथॉलॉजिकल व्याल (कॉम्पोझिट अ‍ॅनिमल अशी संकल्पना आहे मूळ आपल्या प्राचीन शिल्प परंपशिल्प) केला होता. त्याला ते वियाळ म्हणत होते. त्यावर्ष १२ तास अव्याहत गाणी नाहीत या सुखद भावनेने आम्ही सगळे अतीव आनंदात होतो. पण.. त्या देखाव्याला भयाण अशुद्ध मराठीत (ज्यातल्या वाक्यांचे कर्ता कर्म क्रियापद सगळे रानोमाळ हरवले होते - जत्रेत मुलेमाणसे हरवतात तसे) दोन मिन्टांची किंचाळून म्हणलेली कॉमेन्टरी होती. आणि ती दर दोन मिनिटांनी लागायची. अखंड १२ तास.
गाणी हजारपटीने परवडली. निदान लता, किशोर, गेलाबाजार तो बेसुरा महम्मद अझीझ आणि कोणकोण गायचे...
अक्षरश: दहा दिवसातला प्रत्येक क्षण मोजून काढला

कोणत्याही शहरात, गावात, कोपर्‍यात असो, सार्वजनिक गणपतीची एक खासियत म्हणजे आरत्या सुरू असताना माईकवर आरती म्हणणारा हा बेसुरा आणि आरत्यांचे शब्द अजिबात माहित नसलेलाच हवा. नाहीतर फाऊल धरतात. ओळ मधेच कुठेही तोडणे, दम लागल्यावर मध्येच 'हाँSSS' श्वास घेणे आणि इतर भक्तजनांच्या कोरसपासून फटकून स्वतंत्र बाण्याने चुकीचे गाणे ही क्वालिफिकेशन्स ज्यांच्या अर्जात असतात त्यांनाच माईकवर आरती म्हणण्याचा मान मिळतो.

गणपतीसाठी एक ठरलेली जागा एखादे टेबल, त्यावर घालायची आसन अस ब-याच जणांकडे ठरलेले असत. आमच्या बाप्पाच मात्र वेगळ असतंय. बाप्पा कधी जागा बदलतो कधी घर बदलतो आणि कधी देशच बदलतो Happy

तर बाहारेनला असताना गणपती करायचा का नाही या द्विधेमध्ये असताना, तिथे गणपतीच्या मूर्ती मिळतात आणि विसर्जनासाठी सुद्धा जागा आहे असे समजले. मग सुरु केली तयारी. गणपती बसवायचा म्हणजे पाच दिवस पूजा नैवेद्य आरती करायची एवढच मला माहित होत. पण इकडे बाहारेन मध्ये आम्ही गणपती बसवणार म्हंटल्यावर शेजार्यानमध्ये एवढा उत्साह संचारला कि " अभी पाचवे दिन महाप्रशाद करेंगे" म्हणून मंडळी तयारीला लागली सुद्धा. महाप्रशाद म्हंटल्यावर मी गारठले होते Uhoh एवढ्या लोकांचा स्वयंपाक बाप रे !!!

पण हि हिंदी भाषिक मंडळी भारी हौशी, आमच्या बिल्डींग मध्ये राहणारी जवळ जवळ पंधरा कुटुंबे त्यांच्या ओळखीची अजून काही कुटुंबे अशी शे दीडशे मंडळी आरती ला आणि जेवायला असणार होती. त्यात परत तो नैवेद्याचा स्वयंपाक म्हणजे कांदा लसून नसणार. पण पटापट प्रत्येक चार चार जणांनी मिळून मेन्यू वाटून घेतला.
आणि झालासुद्धा महाप्रशाद. मराठी आरत्या हिंदी आरत्या अगदी कन्नड ,तमिळ, तेलुगु आरत्याही व्हायच्या.
विसर्जनालासुद्धा सगळी पलटण हजार असायची. मुले पण खुश असायची या दिवसात. खरा खुरा गणेशोत्सव साजरा व्हायचा आमच्याकडे. Happy

तेव्हापासून गणपती आणि महाप्रशाद के समीकरण ठरूनच गेले होते. इकडे दुबई ला आल्यावरही आम्ही ही पद्धत चालू ठेवली होती. तीन वर्षांपूर्वी पुण्याला शिफ्ट झालो. आणि हे सगळ दुरावल गेल.

Pages