गणपतीबाप्पा आणि मी!

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 14:18

नमस्कार!

गणपती बाप्पा मोरया!


Moortee.jpg

गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं की आपल्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. आपल्या आवडत्या गणरायाचं स्वागत, पूजा-अर्चा, आरत्या, प्रसाद आणि शेवटी निरोप असं सगळं आपण दरवर्षी करीत असतो. त्या गणोबाचं आणि आपलं अगदी अतूट नातं असतं. त्याच्या संदर्भात आपल्या कितीतरी आठवणी निगडीत असतात. आठवतं का, किती लहानपणापासून गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण कसे रंगून-दंगून जात होतो? त्या आठवणींना उजाळा देण्याकरीता हा उपक्रम. तुमची गणेशोत्सवातली एखादी जुनी खास आठवण किंवा कुठल्या गणेशमंडळांवर काम करताना घडलेल्या काही गंमतीशीर गोष्टी आमच्यासोबत शेअर करणार? चला तर करा सुरुवात.

खास आठवणी किंवा गंमती इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१५' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केपी, हर्पेन अन नीधप. पेठेतले गणपती हे जास्त अ‍ॅप्ट झालं असतं, हे नंतरच्या हास्यफवार्‍यांवरून समजलं, पण केपींच्याच भाषेत सांगायचं, तर

कायेना.. जौदे

अवघड आहे.

माझ्या आठवणी पेठांमधल्याच आहेत आणि त्याबद्दल मला लाज बिज काही वाटत नाही तस्मात गणेशोत्सव आणि विविध गुणदर्शन या संदर्भातल्या काही आठवणी नंतर टाकते.

लिहिणार. रात्री परत आले की.
एक आठवण मुंबई-शास्त्री हॉल वगैरे अशी पण आहे. रस्ते चुकण्याची खास.

पुण्यातले गणपती बघताना, विशेषतः दगडूशेट्चा गणपती बघून झाला की रस्ता चुकल्यास काय घडते / घडू शकते त्याबाबत अनेक सु आणि च कथा माझ्या शाळकरी वयात बर्‍याच प्रसिद्ध होत्या.

पण त्या अर्थात इथे सांगण्याजोग्या आणि डायरेक्ट बाप्पाशी निगडीत नाही त्यामुळे

कायेना.. जौदे :P:

पुण्यातले गणपती बघताना, विशेषतः दगडूशेट्चा गणपती बघून झाला की रस्ता चुकल्यास काय घडते / घडू शकते त्याबाबत अनेक सु आणि च कथा माझ्या शाळकरी वयात बर्‍याच प्रसिद्ध होत्या. <<
कहाण्यांचा आत्मा समजला. Proud

कायेना... जौदे हे करेक्ट आहे त्यासाठी. Wink

इन्ना, भारी! दल घेणारे ताई दादा एकदम आदर्श असायचे शाळेत असताना!
शब्दाली, खरंच काढूया असा एखादा धागा..मला आवडेल प्रबोधिनीच्या आठवणी लिहायला Happy
नुकतंच पु.लं.चं गणगोत पुन्हा वाचताना त्यातल्या हिराबाई बडोदेकरांच्या लेखात त्यावेळेच्या मुंबईच्या गणेशोत्सवाचं वर्णन वाचलं! फार हेवा वाटला! पूर्वी दगडूशेठ गणपतीसमोर अशा मैफिलीला एकदोनदा गेल्याचं आठवतंय.
सगळ्यांच्याच आठवणी वाचायला मजा येत्येय! लहान गावांमधून गणपतीच्या दिवसांत एकमेकांच्या घरी दर्शनाला जाणे होत असते. शिवाय गौरींचे हळदीकुंकू असतेच..त्यामुळे हे दिवस super socialization चे असतात! एकदा आम्ही बच्चे कंपनीने प्रतिष्ठापनेच्या दिवशी २१ गणपती करायचे असं ठरवलं! गावभर हिंडत होतो..शेवटचे २ गणपती पूर्ण करायला दोन अनोळखी घरांत घुसलो होतो असं आठवतंय! त्या काकूंनी पण प्रेमाने प्रसाद दिला होता Happy

माझा हा किस्सा आहे कोकणातला...
कोकणात सार्वजनिक गणपतींचं प्रमाण एकदम नगण्य, कारण बहुतेक प्रत्येक घरात श्री गणेशाचं आगमन झालेलं असतं. आणि श्री गणेशाचा मुक्काम चाली-रिती-प्रथेप्रमाणे बहुतेक घरांत वेगवेगळा असतो. बर्‍याच घरांत हा मुक्काम ५ किंवा ७ दिवसांचा असतो. गणपती विसर्जना दिवशी घरांत अगदी विशेष 'मेन्यू' बनवला जातो; थोडक्यात श्रीगणपती बाप्पाला Farewell-Treat म्हणा... या दुपारच्या जेवणाला जवळचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र-मंडळी, शेजारी-पाजारी, नोकर-चाकर... अशा सर्वांना अगदी आग्रहाचं निमंत्रण असतं. या जेवणाला 'म्हामदं (कोकणी अपभ्रंश - म्हामनं)' म्हणतात

मी कुडाळ (जि. सिंधुदूर्ग) मधे असताना एका वर्षी कॉलेज मधल्या वर्गमित्राच्या आग्रहा वरुन त्याच्या घरी या 'म्हामद्या'ला गेलेलो. मित्राचं घराणं हे पंचक्रोशी मधलं एक वजनदार घराणं. त्यामुळे या 'म्हामद्या'ला बरेच लोक आमंत्रीत होते. दुपारी योग्यवेळी श्री गणेशाला, घरातल्या देवांना, ग्रामदैवताला व इतर देवतांना नैवेद्य दाखवून आलेल्यां पैकी पुरूष मंडळी श्री गणरायाच्या आरतीला उभी राहीली. माझ्या मित्राचे मोठे चुलते त्या पंचक्रोशी मधले नावाजलेले 'भजनी-बुवा'. त्यांनी मस्तपैकी 'सूर' लावून, प्रथेप्रमाणे श्रीगणेशाच्या 'सुखकर्ता-दु:खहर्ता...' या प्रचलीत आरतीने सुरुवात केली (कोकणातल्या आरत्या आणि त्यांचे सादरीकरण हा एक वेगळाच विषय आहे). श्रीगणेशाच्या या आरतीमधे 'रत्नखचीत फरा...' आणि 'लंबोदर पीतांबर...' या दोन कडव्यांच्या मधे एक कडवं आहे,
जे कडवं आरतीच्या कुठल्याच पुस्तकात मला आज पर्यन्त सापडलेलं नाही; पण हे कडवं कोकणातल्या बर्‍याच घरांत आरतीच्या वेळी आवर्जून म्हटलं जातं (आमचे वडील, चुलते, चुलत भावंडं हे कडवं तोंडपाठ म्हणायचे, आणि अजुनही म्हणतात...). या कडव्याची सुरुवात 'चतुर्भूज गणराज...' अशी होते, आणि यामधे एक ओळ येते तिचे शब्द आहेत 'खादयाचे लाडू करुनी गोमटे...' ...

... तर माझ्या मित्राच्या चुलत्यांनी आरती सुरु केल्यावर, वर उल्लेख केलेलं कडवं म्हणायला सुरुवात केली. गावकर्‍यांनी त्यांना Follow करायला सुरुवात केली. आणि नेमक्या 'खादयाचे लाडू....' या ओळीला मित्राच्या चुलत्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने एकदम अकल्पीत Substitute वापरुन पुढच्या ओळीवर पोचले देखिल. आरतीला हजर असलेल्या कुणाच्याही लक्षात 'मूळ शब्दांपासुन घेतलेली फारकत' लक्षात आली नाही. पण मी मात्र पोट्दुखे पर्यन्त हसून अक्षरशः हैराण झालो... ओळीतले मूळ शब्द आहेत 'खादयाचे लाडू करुनी गोमटे...' मित्राच्या चुलत्यांनी वापरलेले Substitutes असे होते - 'खादयाचे लाडू करंजी टमाटे...'

Proud Lol

रंगासेठ लै भारी. तुम्ही विद्यामंदीर का?

समर्थ चौक (ब्राह्मणपुरीत वेणाबाईच्या मठासमोर) मंडळाचे हलते देखावे खूप भारी असत. ते सामाजिक प्रकरणांवर असत. रिंकु पाटील प्रकरण (अ‍ॅसिड फेकणे), हुंडा बळी वगैरे वरचे देखावे अजून लक्षात आहेत. उदगाव वेशीत, नदीवेशीतली मंडळे पण दणकून खर्च करत. ब्राह्मणपुरीत त्यामानाने गरीब मंड्ळे. वर्गणी द्यायची खळखळ मोठी.

खरं तर मिरजेचा आकार केव्हडा. पण त्यातसुद्धा मिरवणूक एह्वडी लांब लांब फिरवायचे की ती रात्रभर चालायची. सांगलीतले सर्व सार्वजनिक गणपती पाचव्या दिवशी विसर्जन होतात (कारण राजे सरकारांचा गणपती ५ दिवसाचा असे बहुतेक). त्यामुळे सांगलीतले लोक पण ११व्या दिवशीच्या मिरजेच्या विसर्जनाला येत असत. मिरजेतले बँडवाले फेमस असल्याने ते विरुद्ध बाहेरनं आलेले बँडवाले/बँजोवाले अशी चुरस पण असायची. बाई आणि पुरुषाच्या आवाजात गाणारा गायक असलाच पाहिजे. त्या बिचार्‍यांचा आवाज पार बसायचा सकाळपर्यंत. पण हाच एक कमाईचा दिवस असतो.

गणपती मंडळातून टेम्पो/ट्रक/ट्रॅक्टरवर स्वार व्हायला निघाला की गणपतीची जोरात आरती होते. त्यावेळे बँडवाले अंगात संचारल्याप्रमाणे झांजा, क्लॅरेनेट, ती वेगवेगळ्या आकाराची ट्रम्पेटं आणि हॉर्न ढ्यांढ्यां करत टिपेला नेत. मग क्लॅरिनेटवाला बँडमास्तर सुखकर्ता ची ट्युन सुरू करत असे.

सव्वाशे ब्रदर्स ची स्पीकर/माइक/साउन्ड सिस्टम आणि लायटिंगवर ऑल्मोस्ट मोनोपॉली होती. इतकी की पुण्यात मी पहिल्यांदा माइकवर सव्वाशे ब्रदर्स ऐवजी दुसरे नाव वाचले होते एका व्याख्यानाला तेव्हा मला रिअलाइज झाले की अज्जूनही कुणी असू शकतो या धंद्यात.

मी पाचवी ते सातवी या काळात किरकोळ गणपती मंडळात जादुचे प्रयोग करत असे. माझ्याकडे जादुगार रघुवीर जादू किट होते Proud आणि पत्त्यांच्या काही जादू. त्याच्या मजा वेगळ्याच. जादुगाराचा ड्रेस नसल्याने हाफ चड्डी-टीशर्ट आणि मागे केप म्हणुन आईची ओढणी असा गेट-अप असायचा. एकदा एका जादूत चड्डीच्या पट्ट्यात एक नाणं का काहीतरी लपवून ठेवले होते व ते हातचलाखीने खेचायचे असा प्रयोग होता. ते नाणं पट्ट्यात खोचण्याऐवजी कंबर आणि चड्डी यात खोचले (कारण पट्टाच बांधायचा विसरलो). आणि प्रयोग करता करता ते जरा आत घसरले. मग हातचलाखी जरा अधिक 'विज्युअल' झाली होती Proud

सगळ्यांच्या आठवणी खूप छान! हा बाफ मस्त आहे!!
माझी आठवण औरंगाबादची होती :). अजून एक आहे ती थोडा वेळ झाला की लिहिते.

मग हातचलाखी जरा अधिक 'विज्युअल' झाली होती >> Wink Biggrin

माझं आजोळ मुंबईला शिवडीच. घरी दीड दिवसाची गणपतीची पुजा झाली की आम्ही सगळी भावंडे आजीकडे जायचो. आजोबा लालबाग, परळ गिरणगावातले गणपती बघायला न्यायचे. पण आजोबा गर्दी, रांगा टाळायला दुपारी गणपती दाखवायला न्यायचे. ना रोषणाई, ना हलते देखावे. मग सगळी भावंडे काही ना काही कारण सांगून टाळाटाळ करायचो. पण आजोबा मात्र मला आणि माझ्या मावसबहीणीला घेऊन गणपती बघायला जायचेच.

असे दुपारचे गणपती बघुन झाले की संध्याकाळी मामाबरोबर तेच गणपती पुन्हा बघायला जायचो. Happy

महान किस्से आहेत!

केश्वाक्कांचा भांगडा भारी. Lol

जादुगार टण्या अल्टिमेट!! Rofl

जादुगार ट्ण्या Lol
पुण्याच्या/पेठेतल्या गणपतीचं वर्णन मस्त. मला बघायचेत हे गणपती.

मुंबईत शिवडीला २ गणपती प्रसिद्ध होते. एक प्रबोधनकार ठाकरे उद्यानातला आणि दुसरा स्टेशनजवळचा बीडीडी चाळीतला.

बीडीडी चाळीतला गणपती म्हणजे आमच्या आजोळच्या अंगणातलाच! त्यामुळे यावर्षी काय डेकोरेशन असेल याची खुप उत्सुकता असायची. मामा जरी संयोजक मंडळात असला तरी काय डेकोरेशन आहे हे कधीच सांगायचा नाही.

एका वर्षी अष्टविनायकांचे डेकोरेशन होते. आठ शिंपले आणि प्रत्येकात एक गणपती. हे शिंपले मग ऑटोमॅटिकली उघडणार आणि मग अष्टविनायकांचे दर्शन होणार अशी थीम होती.
सगळी तयारी झाली होती, पण गणपती येण्याच्या आदल्या रात्रीच मंडपाला आग लागली. लोकांनी, कार्यकर्त्यांनी पळापळ करुन आग विझवायला सुरुवात केली.

पेटत्या मांडवात जाउन कार्यकर्त्यांनी अष्टविनायकांचे आठ शिंपले आणि पुजेच्या गणपतीची लहान मुर्ती बाहेर आणली. मोठी गणेशमुर्ती मात्र आत मंडपातच राहिली होती. संपुर्ण मंडप, डेकोरेशन जळून खाक झाले होते, पण आतल्या मोठ्या मुर्तीला जास्त काही झाले नव्हते, एक दोन जागी जळके डाग लागले होते.

दुसरा दिवस उजाडला तो गणेश चतुर्थीचा. हा अघटित प्रकार झाल्याने सगळ्या बीडीडी चाळींवर शोककळा पसरली होती. पण तरीही मंडळाचे कार्यकर्ते नेटाने कामाला लागले. जवळ असतील तेवढे पैसे घेऊन, पुन्हा एकदा वर्गणी गोळा करुन मंडप उभारला. जुन्या मुर्तीचे विसर्जन करुन नवीन मुर्ती (मोठी), आगीतुन वाचवलेले अष्टविनायकांचे ८ शिंपले आणि पुजेची लहान मुर्ती पुन्हा जागच्या जागी बसवली. रात्री उशीरा प्राणप्रतिष्ठा आणि आरती झाली तेव्हा सर्वांनी नैवेद्य दाखवून उपास सोडला.
रात्रभर जागुन पुन्हा नव्याने आरास केली नि दुसर्या दिवसापासुन डेकोरेशन सुरुही झाले.

आता विचार केला तर वाटतं, ज्या उत्सवाची, मंडप्/डेकोरेशनची तयारी जवळ जवळ एक महिना आधीपासुन होते, ते सगळे एका रात्रीत नष्ट झाल्यावर, सर्वांनी मिळून एका दिवसात पुन्हा नव्याने कसे काय उभे केले असेल, कुठुन त्यांना एवढे बळ मिळाले असेल.

गमभन, नेस्तनाबून करणाऱ्या घटनांतूनही अल्पकाळात पुन्हा उभं राहण्याचं बळ कामावरची आणि ईश्वरावरची श्रद्धा देते. तुम्ही लिहिलेला प्रसंग वाचून मला शास्त्रज्ञ निकोला टेस्ला ह्यांची आठवण झाली.

टण्या, हो, विद्यामंदिर Happy
पुण्याच्या गणपतीच्या आठवणी म्हणजे विसर्जनाची मिरवणूक. मानाच्या पाच गणपतीची मिरवणुक पहिल्यांदा पाहिली तेव्हापासून या विसर्जनाची मोहिनीच झाली आहे. दगडूशेठची मिरवणूक एकदाच पाहिली आहे. Sad
संपूर्ण लक्ष्मी रोडवर रांगोळ्या काढलेल्या आणि अलका चौकामधील भव्य रांगोळी पहिल्यांदाच पाहिली होती.
अप्रूप वाटलं. रात्री देखावे बघायला एक्-दोनदाच गेलो.

>>गमभन, नेस्तनाबून करणाऱ्या घटनांतूनही अल्पकाळात पुन्हा उभं राहण्याचं बळ कामावरची आणि ईश्वरावरची श्रद्धा देते. तुम्ही लिहिलेला प्रसंग वाचून मला शास्त्रज्ञ निकोला टेस्ला ह्यांची आठवण झाली. <<
+१

हिंजवडीमध्ये १० व्या दिवशी विसर्जन करतात. त्यावेळी पूर्ण फेज१-३ जाम करतात. मोठ्ठ्या अशा नसतात मिरवणुका. २०१२ ला त्यादिवशी बाकीच्या कंपनींनी शाळा लवकर सोडली होती, पण आमच्या कंपनीने नियमाला धरुन ६ला सोडली शाळा.. हिंजवडीतील एवढ्याशा रस्त्यावर आणि हजारो वाहने आणि या मिरवणुका आणि त्यात पाऊस... जे अंतर काटायला अर्धा तास लागायचा तेव्हा ३ तास लागले.
बसेस्-गाड्यांमध्ये बसून लोकांची हालत खराब झाली होती.

विशेषतः दगडूशेट्चा गणपती बघून झाला की रस्ता चुकल्यास काय घडते / घडू शकते त्याबाबत अनेक सु आणि च कथा माझ्या शाळकरी वयात बर्‍याच प्रसिद्ध होत्या.
>>

माझ्यासोबत तर हे घडलं आहे. जाम वाईट वाटले होते मला तेंव्हा. तेंव्हा मी कॉलेजला होतो. फ्रेश ऑन बोट असा पुण्यात होतो.

ढोल ताशा विना गणपती ही कल्पना म्हणूनही सहन होऊ शकत नाही. मी एकदा मिरवणूकीत ढोल फोडला होता. कसा फुटला काय माहित, पण फुटला. Proud अन नंतर मग ढोलवाल्याशी भांडणं. मग मांडवली, मग तू हा नविन ढोल वाजवू नको, ताशा वाजव ही सुचना, अन ताशा काही मला वाजवता येत नाही. (खरचं शिकायला हवा.) मग परत ढोलच वाजवला. आणि तो काही फोडला नाही. Happy

इन्ना, जिज्ञासा भारीच की.

ज्ञान प्रबोधिनी आणि विमला बाईच्या पथकाबद्दल मला जामआदर वाटतो. कर्वे रोड वरून प्रभात कडे जाताना विमलाबाईच्या पथकाचा सरावाचा आवाज घुमत राहायचा, (अर्थात रमनबाग वगैरेचां सुद्धा पण तरी ह्यांचा जास्त.) मग आता तर काय किती तरी खास पथकं आली आहेत, पण शाळेतल्या पथकांची मजा काही और असते.

गणपती म्हटल की अजून एक आठवण आहे.
रास्ता पेठेच्या मस्त्यकन्येच्या पुतळ्याजवळ बाबांचे एक मुर्तिकार मित्र रहायचे, धोंडफळे नावाचे . घराच्या मागे स्टुडिओ होता त्यांचा. अगदी शाडूच्या माती चे पॉझीटेव्ह्स बनवणे मग त्यावर प्लस्टिक लाउन पी ओपी च्या मुर्तींसाठी साचा बनवणे. हे पहायला एक चक्कर व्हायची . त्यानंतर एक चक्कर रंगकामाच्या वेळी. मुर्तींच सोवळ, सिंहासन , मुकुटाचा सोनेरी वगैरे रंगवायला मिळायच. मग, 'काका हा वाला कोणत्या मंडळाचा' वगैरे विचारून , तो गणापती पहाताना देखाव्यासकट पाहून याचा मुकुट मी रंगवला वगैरे भारी फीलिंग यायच. Happy मुर्तिंचे डोळे रंगवणे , खरतर काकांनी रंगवताना पहाणे , हा एक मस्त अनुभव असायचा . किंचितसं तोंड उघड टाकून , काका तल्लीन होउन , सुपर एकाग्रतेनी बारिक ब्रश नी हे काम करायचे. जरास थांबून मागे रेलून मान वाकडी करून डोळे बारीक करून अंदाज घ्यायचे , फिनिशिंग झाल की एका क्षणाला अचानक मुर्ती त जिवंत पणा आल्याचा भास व्हायचा. अन तो क्षण मिळावा म्हणून किंचीतही आवाज न करता काकांच्या मागे कीतीही वेळ उभ रहाण्याची तयारी असायची. मस्तच Happy

ते नाणं पट्ट्यात खोचण्याऐवजी कंबर आणि चड्डी यात खोचले (कारण पट्टाच बांधायचा विसरलो). आणि प्रयोग करता करता ते जरा आत घसरले. मग हातचलाखी जरा अधिक 'विज्युअल' झाली होती

>>>>> श्या: काय हसलेय मी!!!! Rofl

कोकणातले मूर्तिकार गणपतीच्या मूर्ती एकदम भाविकतेने बनवतात. जागोजाग चित्रशाळा बनलेल्या असतात.
गणपती रंगवणे हे खास स्पेशल काम. विशेषतः डोळे आणि चेहरा. त्यासाठी स्पेशल स्किल्स असलेला माणूस असतो. डोळे, चेहरा वगैरे रंगवणे सुरू करताना अतिशय एकाग्रतेने वगैरे सुरू करतात.

सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 'डोळे रंगवणे' असे म्हणत नाहीत. मूर्तीचे 'डोळे उघडणे' असे म्हणतात.

लहानपणी आमच्या शेजारी दातार काका रहायचे, एकदम हरहुन्नरी माणूस...
ते काही वर्ष हे गणपती बनवण्याचे काम करायचे, कुठलेही पार्श्वभुमी नसताना
त्यांना मदत म्हणून लुडबूड करताना मातीत खेळण्याचा खूप आनंद घेतला. लहान पुर्णतः साच्यातून बनवायचे गणपती आम्हा लहान मुलांना मिळायचे बनवायला आणि त्या बद्दल एक लहान गणपती बक्षीस म्हणून देखिल मिळालेला. जो विसर्जन न करता अनेक वर्षे घरात ठेवलेला होता.

तसेच टिळक रस्त्यावर सुरुवातीस थोरात म्हणून मुर्तीकार होते महाराष्ट्र मंडळात जाता येताना त्यांच्या इथे थांबून मगच पुढे जायचे आणि घरी परतायला उशीर झाला की ओरडा खायचा

मुर्ती रंगवताना फक्त आणि फक्त डोळे रंगवल्यानंतर लगेच अशी काय जादू होते कोणास ठाऊक पण जीवंत पणाचा प्रत्यय येतो अगदी.

खरं सांगायचं तर माझ्याकरता हा डोळे रंगवण्याचा भाग म्हणजे खरी प्राणप्रतिष्ठा !

सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 'डोळे रंगवणे' असे म्हणत नाहीत. मूर्तीचे 'डोळे उघडणे' असे म्हणतात.> +१

Pages