गुंफण

Submitted by सुपरमॉम on 24 August, 2009 - 00:18

विमानाची चाकं जमिनीला टेकली नि धावपट्टीवरून वेगानं सरकत, शेवटी सरपटत ते थांबलं तसा इतका वेळ आळसावून बसलेला शंतनू पूर्ण जागा झाला. दोन्ही हात सरळ करून, मानेच्या मागे नेत त्यानं मरगळलेलं शरीर ताठ केलं नि कपडे त्यातल्यात्यात नीट करत तो उभा झाला. आजूबाजूचे लोकही उठायला सुरुवात झाली होतीच. लहान मुलांचं कुरकुरणं, आयांचे समजुतीचे आवाज, एकमेकाला मराठी, हिंदी, गुजरातीतून मारलेल्या हाका या सार्‍यानं भारताच्या भूमीवर पाय ठेवल्याची सुखद जाणीव मनात आणखीच घट्ट झाली तसं त्याच्या ओठांवर हलकेच हसू उमललं.

वरची बॅग जपून काढून हातात घेतली नि गर्दीतून वाट काढत तो दाराशी आला. हवाईसुंदरीच्या नमस्तेला किंचित मान झुकवून प्रतिसाद देत तो विमानातून बाहेर पडला. सामान घ्यायची तशी त्याला घाई नव्हती. एकच तर सूटकेस....त्यात आपले कपडे, सामान फारच कमी. मागच्या वेळी जाताना वापरायचा कंटाळा आलेले, तिथेच ठेवलेले कपडे घरी कपाटात असतीलच. आईनं ते परत धुवून, इस्त्री करून सुबक घड्या घालून ठेवले असतील. आईसाठी आणलेलं बाकी सामान, चॉकलेट्स, पर्फ्यूम्स, शलाकासाठी घेतलेलं घड्याळ, मखमली चपला नि अशीच इतर सटरफटर खरेदी.

कस्टम्समधून व्यवस्थित बाहेर पडून तो घरी जाण्यासाठी टॅक्सीत बसला तेव्हा समोरच्या फूटपाथवर, दिव्याच्या उजेडाखाली उभ्या असलेल्या एका कुटुंबाकडे त्याचं लक्ष गेलं. वडील टॅक्सीवाल्याला सामान भरायला मदत करत होते. बाजूलाच निळसर जॉर्जेटची साडी नेसलेली, गळ्यात मोठ्ठं मंगळसूत्र घातलेली त्याची बायको हसत उभी होती. दहा- बारा वर्षाचा एक उंचनिंच मुलगा खाली वाकून आपल्या आईच्या कानात काहीतरी सांगत होता. एखादं मोठं गुपित ऐकल्यासारखे तिच्या चेहर्‍यावरचे भाव सतत बदलत होते.

ते विलोभनीय चित्र बघितलं नि शंतनूला आपल्या लहानपणची, आईची एकदम विलक्षण आठवण येऊ लागली.

'या चित्रातले बाबा मात्र हिरावून नेले विधात्यानं आपल्या बाबतीत....' त्याच्या मनात आलं.

'अर्थात आईनं कधी याची फारशी जाणीव होऊ दिली नाही आपल्याला. आपल्यासाठी आई नि बाबा दोन्ही तीच होती. सगळे लाड पुरवून, वेळी कठोर होऊन वाढवलं तिनं आपल्याला. सासर-माहेरचा कुठलाही भक्कम पाठिंबा नसताना....'

मनातली भूतकाळातली सगळी जळमटं झटकून टाकत त्यानं डोकं मागे टेकलं. ही शिकवणही आईचीच. आला क्षण आनंदात जगायचा, आसुसून जगायचा. गेल्या क्षणाची खंत, नि येणार्‍या क्षणाची काळजी... दोन्ही करत बसायचं नाही. बाबा गेले तेव्हा एकदाच आजीच्या कुशीत शिरून मुसमुसून रडताना बघितलं होतं त्यानं आईला. नंतर मात्र एकेक दिवस शंतनूसाठी आनंदात साजरा केला होता तिनं. फार कशाला..त्याला आईनं जरीची साडी नेसलेली मनापासून आवडायची म्हणून सणासुदीला नवी भरजरी साडी सुद्धा नेसायची ती. नातेवाईक, शेजारीपाजारी, यांच्या कुत्सित नजरांना तोंड देताना, त्यांचे मनावर उठलेले ओरखडे सहन करताना किती त्रास झाला असेल तिला.. शेजार्‍यांपैकी एकट्या तनूकाकूंचा आधार असायचा तिला तेव्हा..

तनूकाकूंच्या आठवणीबरोबरच शंतनूच्या मनात एखाद्या फुलपाखरासारखी शलाकाची आठवण अलगद येऊन विसावली. अमेरिकेला जाताना विमानतळावर त्याला निरोप द्यायला आलेली, फिक्या अबोली रंगाच्या सलवार कमीजमधली शलाका...तिची ती मनातली लोभस प्रतिमा नि आईला वरचेवर होणारे फोन या दोन्हींनी अमेरिकेच्या तीन वर्षांच्या वास्तव्यात एकटेपण कधी जाणवलंच नव्हतं. लहानपणी त्याच्याशी भांडणारी, वेळी त्याच्या पाठीत बुक्के घालणारी, नि त्यानं जोरात केस ओढले की कळवळून रडणारी शलाका बघता बघता त्याच्या मानसपटलावर प्रियतमेच्या भूमिकेत कधी अवतरली ते त्या दोघांनाही कळलं नव्हतं. तो परदेशी जायला निघाला तेव्हा तिला एकटी बघून आदल्या दिवशी त्यानं हळूच तिला विचारलं होतं...

'एक फोटो देशील शलू तुझा? खोलीत ठेवायला?'

दुसर्‍या दिवशी कोणाच्या नकळत विमानतळावर तिनं त्याच्या हातात एक पाकीट ठेवलं होतं.
'आत्ता नको हं, नंतर उघडशील...' ती कुजबुजली होती.

विमानात बसल्यावर, सारं स्थिरस्थावर झाल्यावर शंतनूनं पाकीट उघडलं तर आत शलाकाचा तान्हेपणीचा फोटो. मोठाले डोळे काजळानं तुडुंब भरलेले नि त्यात तो नेहमीचाच खट्याळ भाव. जाम वैतागला होता तो.

शलाकासाठी काहीतरी अजून महागडी वस्तू घ्यायचं मनात होतं त्याच्या. पण या भारतवारीत आईच्या कानावर सारं घालायचं नि त्या दोघांमधल्या विलक्षण गोड नि तरल नात्याला काहीतरी नाव द्यायचं ठरवून आला होता तो. मग काय, एक नाजुकशी अंगठीच घेऊन टाकूया...

त्या विचारानं तो मनातल्या मनात हसला. दोन्हीकडून विरोध व्हायची शक्यता नव्हतीच. एक नंदाआत्याच काय ती आक्षेप घेणार. पण ती तशीही कधी आईशी धड वागलीये? शलाकाचं तनूकाकूची दत्तक मुलगी असणं खटकणार तिला. हॅ... पण तिला कोण विचारतंय? हा निर्णय फक्त आईचा नि आपला. विचारांच्या नादात घर कधी आलं ते शंतनूला कळलंच नव्हतं. घाईघाईनं टॅक्सीचे पैसे चुकते करून, बॅगा सावरत तो धावतपळतच लिफ्टमधे चढला. दारासमोर आल्यावर नेहमीचीच ओळखीची बेल दोनदा वाजवली त्यानं.

हसर्‍या चेहर्‍याची, जरीची बारीक किनार असलेली चंदेरी साडी नेसलेली, गळ्यात ठसठशीत गोफ घातलेली नि कपाळावर छोटीशी टिकली लावलेली आई तबक घेऊन दारातच उभी होती.
सवयीप्रमाणे न बोलताच तिनं आधी त्याला ओवाळलं. ही ओवाळण्याची पद्धतही शंतनू अठरा एकोणीस वर्षांचा झाल्यावर सुरू झालेली. त्याला समजत नव्हतं तेव्हा वाढदिवस, सण अशा दिवशी नंदाआत्याच यायची ओवाळायला. एकदा आईच्या लक्षात न राहून तिनं तबक हातात घेतलं तेव्हा ' वहिनी......' म्हणून केवढ्यानं ओरडली होती नंदाआत्या. दचकून, गोरीमोरी होऊन आई मागे वळणार तोच शंतनूनं तिला थांबायची खूण केली.

'आत्या, ओवाळायचं कशासाठी असतं गं?'

'अरे, आयुष्य वाढावं, सगळं शुभ व्हावं यासाठी असतं ते. म्हणून सुवासिनीच्या हातून...' नंदाआत्याचं बोलणं पुरं होऊच दिलं नव्हतं शंतनूनं.

'मग तर आईनंच आधी ओवाळायला हवं मला आत्या. कारण या जगात तिच्याइतकं माझं शुभ चिंतणारी दुसरी कोण व्यक्ती असेल? नाही का? ये गं आई तू....'

नंदाआत्याच्या डोळ्यातल्या जळजळीत भावाकडे पार दुर्लक्ष करून शंतनूनं आईकडूनच ओवाळून घेतलं होतं. नि मग नेहमीच आई ओवाळत आली होती त्याला.

औक्षण झाल्यावर नेहमीसारखीच त्यानं आईला घट्ट मिठी मारली.

आंघोळ उरकून तो पानावर येऊन बसला. बेतही त्याच्या आवडीचाच नि ठरलेलाच होता. पुरणपोळी, कटाची आमटी, तोंडल्याची मसालेदार भाजी, खमंग काकडी नि मसालेभात, सोबत कढी.
सँडविच नि टॅकोला कंटाळलेली शंतनूची रसना भलतीच जागृत झाली. उभाआडवा ताव मारत, आईशी मनसोक्त गप्पा करत तो जेवत होता. 'मग काय, शेजारी पाजारी सगळे ठीक ना?'

'सगळे म्हणजे शलाकाच ना? ती मामाकडे गेलीय. उद्या यायचीये.'

हसू दाबत आईनं दिलेल्या उत्तरानं शंतनूच्या कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या.

'आई, तू पण ना... कसं तुला समजतं ग सगळं?' कसाबसा तो पुटपुटला.
' मी आई आहे ना, म्हणून. तू गेल्यानंतर आठवडाभर भानावर नव्हत्या बाईसाहेब. केसात गजरा विसरलेला, मॅचिंगचा पत्ता नाही... तेव्हाच लक्षात आलं माझ्या सगळं...'

'चला, मग आता तुला सांगत बसायला नको. नाहीतरी मी विचारच करत होतो तुला कसं सांगायचं ते...'
यावर आई खळखळून हसली.

आई मागचं आवरत होती तोवर समोरच्या खोलीत दिवाणावर सहज म्हणून आडव्या झालेल्या शंतनूच्या पापण्या केव्हा जडावल्या ते त्यालाही कळलं नाही. आईच्या हातची पुरणपोळी, जेटलॅग, सगळं कसं सुरेख मिसळून गेलं एकातएक.... नि गाढ झोप लागली त्याला.

दारवरची बेल जोरानं खणखणली तसा तो खडबडून जागा झाला. आजूबाजूला कानोसा घेतला..तर नळाच्या आवाजावरून आई बाथरूममधे असल्याचं कळलं...तेव्हा नाईलाजानं तो दार उघडायला गेला.

'आलास का रे?'

शेजारच्या भामाकाकू दारात उभ्या होत्या. कमालीची भोचक नि खाष्ट बाई. कपाळावरच्या आठ्या लपवत शंतनू 'या ना आत..' म्हणाला खरा... पण सुदैवानं त्या भाजीला निघाल्या होत्या.

चार शब्द दारातच त्यांच्याशी बोलून शंतनूनं त्यांना वाटेला लावलं. जाताना त्या कुत्सितपणानं का हसल्या ते मात्र कळलं नाही त्याला.

दार बंद करून तो पुन्हा दिवाणावर लोळला. पण पाचच मिनिटं झाली असतील नसतील तोच पुन्हा बेल खणखणली.
चरफडतच शंतनूनं दार उघडलं.
दारात एक पन्नास पंचावन्नच्या आसपासचे गृहस्थ उभे होते. गोरापान वर्ण, डोक्यावरचे केस पांढुरके होऊ लागलेले, नीटनेटके कपडे नि हातात ब्रीफकेस..

शंतनू किंचित गोंधळात पडला तसे प्रसन्न हसून ते म्हणाले,
'तू शंतनू ना? मी दिनकर. आहे का कविता घरात?'
तेवढ्यात मागून आईच समोर आली.
'या ना.. आत या. ऑफिसातून इकडेच आलात का? मला वाटलं घरी जाऊन याल..'
'जाणार होतो आधी... पण इतकं वर्णन ऐकलंय शंतनूचं... की त्याला भेटायची खूप उत्सुकता होती मनात......'
हातातली ब्रीफकेस खाली ठेवत ते आत येऊन सोफ्यावर बसले. आईनं त्यांना पाणी आणून दिलं.
शंतनू अजूनही काही न समजल्यासारखा त्या गृहस्थांकडेच बघत होता.

'कोण हे? बाबांचे कोणी मित्र? पण आपण याआधी कधीच कसे भेटलो नाही यांना? नि आई इतकी मोकळेपणी कशी बोलतेय यांच्याशी?'

'शंतनू, अरे हे दिनकर पंडित. आपल्या नंदामावशीच्या शेजारी राहतात....'
पोह्यांच्या बशा बाहेर आणून ठेवत आई म्हणाली.

शंतनूनं वाकून नमस्कार केला तसे ते किंचितसे हसले.
'असू दे बाळ. प्रवास कसा झाला?'

'यांची मुलगी पण अमेरिकेत असते. लग्न झालंय तिचं. एकच मुलगी आहे. '
'असेना का... हे सारं मला का सांगतेय आई?' शंतनूच्या मनात आलं.

थोडा वेळ इकडतिकडच्या गप्पा झाल्या. नि मग नेहमीच्याच निश्चयी, शांत सुरात आई म्हणाली,
'आज मी मुद्दाम बोलावून घेतलंय यांना. आम्ही दोघं लग्न करायचा विचार करतोय. तुला सांगायला म्हणून.....'

पुढचं काही शंतनूला ऐकून येईनासं झालं.

आकाशातून विजेचा लखलखता लोळ आवाज न करता अंगावर कोसळावा तशी शंतनूची अवस्था झाली होती. भामाकाकूंच्या खवचट हसण्याचा आता त्याला उलगडा झाला.

'हे काय नवीनच काढलं आईनं? आता या वयात लग्न? आपला जराही विचार करवला नाही हिला? आपल्या विश्वात फक्त आई आहे... नि तिच्या विश्वातही फक्त आपण आहोत असं वाटायचं आपल्याला.
किती किती आनंदात होतो आपण. आपल्या नि शलाकाच्या लग्नाची स्वप्नं बघत होतो. नि आता काय सांगायचं सगळ्या मित्रांना अमेरिकेत? आईच लग्नाची तयारी करतेय म्हणून? उद्या शलू आली की तिलाही कुठल्या तोंडानं हे सांगायचं हे? बाबांच्या जागी दुसर्‍या कोणाची कल्पना आपणच करू शकत नाही....अन या वयात आई त्या जागेवर दुसर्‍या कुणाला कशी आणू शकतेय?'

शंतनूच्या मनस्थितीची कल्पना दिनकररावांना आल्याशिवाय राहिली नाही. दोनचार जुजबी गप्पा मारून ते उठलेच.

जाताना फक्त शंतनूला एवढंच म्हणाले....'शंतनू, तुझ्या मनाला बसलेला धक्का मी समजू शकतो. पण कविता नि मी तुझ्या इच्छेविरुद्ध काही करणार नाही. पूर्ण विचार करून निर्णय घे मात्र...'

आई मात्र शांत होती. दिनकरराव गेल्यावर दार लावून ती आत आली. तिच्या शांतपणानं त्याच्या रागाचा आणखीनच उद्रेक झाला.

'इतके वेळा फोनवर बोलत होतो आपण. तेव्हा तू कधीच हे बोलली नाहीस. माझ्यापासून कधीच काही लपवत नव्हतीस तू.. नि आता....'

'शंतनू, या गोष्टी फोनवर बोलण्यासारख्या नसतात. एकतर दिनकर मला भेटले त्याला एक वर्षंच होतंय....तू अमेरिकेला गेलास त्यानंतरच्या दोन वर्षात आमची ओळखही नव्हती. नंदाच्या घराच्या वास्तूला भेटलो आम्ही.... नि त्यानंतर ओळख वाढत गेली. त्यांची बायकोही मुलीच्या वेळच्या बाळंतपणातच गेली. मुलीचा सांभाळ त्यांनी एकट्यानेच केला. मागच्या वर्षी मुलगी लग्न होऊन अमेरिकेत गेली त्यांची....'

'आई, तुला एकटेपणा जाणवत असेल तर तू अमेरिकेला का येत नाहीस माझ्याबरोबर? मी तसाही तुला म्हणणार होतोच या वेळी..पण बाबांच्या जागी कोणाला आणून बसवणं.... आई, मला ही कल्पनाच सहन होत नाहीय गं...'

शंतनूनं दोन्ही हातात डोकं गच्च धरलं.

'शंतनू, तुझ्या बाबांचं माझ्या मनातलं स्थान अढळ आहे. दिनकर आणि मी विवाहबद्ध झाल्यानं त्याला कुठलाही धक्का लागणार नाहीये. अन तसंही गेलेल्या माणसाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. कारण प्रत्येक माणूस सर्वार्थानं वेगळं असतं आपापल्या परीनं. पण म्हणून ती जागा रिकामी ठेवल्यानं ते माणूस परत येणार नसतं कधीच..... नुसत्या आठवणीच्या मोरपिसांवर हात फिरवत बसल्यानं एक जीवघेणी हुरहूरच येते नशीबी. त्यापेक्षा त्या हाताला दुसर्‍या हाताची सोबत मिळाली ना...तर आयुष्याच्या वळणावरचे चढ-उतार थोडे तरी सुसह्य होतात रे....'

' तू समजून घ्यावंस ही इच्छा असली, तरी अपेक्षा मुळीच नाही माझी. तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. तुला नाराज करून मी माझा संसार नाही उभारणार. पण हे देखील प्रामाणिकपणे सांगतेय की हा निर्णय मी मनाविरुद्ध घेतलेला असेल... तू विचार कर. कुठलीही सक्ती नाहीय तुझ्यावर.'

झालं... बोलणं संपलं. नव्हे आईनं संपवलंच.

आत जाऊन आईनं देवाजवळ दिवा लावला. रोजच्यासारखी संथ, गोड आवाजात ती प्रार्थना म्हणू लागली. आवाजाला जराही कंप नव्हता.

जेवणं उरकली तसा शंतनू खोलीत निघून गेला. आईशी बोलायची खूप इच्छा होती... इतक्या दिवसांच्या साठलेल्या गप्पा होत्याच. पण काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं.

थकलेल्या मनानं नि शरीरानं तो अंथरुणावर पडला. बेडरूममधल्या बाबांच्या फोटोकडे बघत.
किती दिलखुलास, खेळकर होते आपले बाबा. जेमतेम तेरा-चौदा वर्षंच आपल्याला सहवास मिळाला त्यांचा.पण किती आठवणी आहेत मनाच्या कुपीत.
उन्हाळ्याच्या सुट्टीत बाबांबरोबर खेळलेले कॅरम्, बुद्धीबळाचे खेळ... त्यांच्या बरोबर नि आईबरोबर केलेली खरेदी..शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहणारे बाबा.... गल्लीतल्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळणारे बाबा...

बाबांनी सगळ्या मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करायला शिकवला आपल्याला....पण त्यांच्या पाया पडायला गेलो प्रसंगानं, की पटकन छातीशी धरायचे आपल्याला.... घट्ट मिठी मारायचे..' यू आर माय बडी..' म्हणत.

या सगळ्या आठवणी विसरून जायच्या? त्याजागी दुसरी व्यक्ती बघायची? बाबांच्या जागी? छे, कसं शक्य आहे?
रात्री केव्हातरी खूप उशीरा शंतनूला झोप लागली. सकाळी उठला तेव्हा चक्क दहा वाजून गेले होते. आई बाजारात गेली होती. तशी चिट्ठी फ्रीजवर लावलेली होती. टेबलावर त्याच्या आवडीची साबुदाणा खिचडी नि थर्मासमधला चहा त्याची वाटच बघत होता.

आंघोळ, खाणंपिणं उरकून तो खिडकीजवळ नुसताच बसून होता... तोच बेल वाजली.
कोण असेल बरं? दिनकरराव?......'
कपाळाला आठ्या घालतच त्यानं दार उघडलं.

निळ्या सलवार कमीजमधली, केसात मोगर्‍याचा गजरा माळलेली सलज्ज शलाका दारात उभी होती.
कालपासूनचा सगळा गेलेला मूड परत आल्यागत झालं शंतनूला.

'केव्हा आलास? फ्लाईट लेट नाही ना झाली?'

'माझी फ्लाईट वेळेवर आलीय. एका माणसाची मात्र लेट होती. काय हे? मला वाटलं कालच होईल तुझी भेट...'

' मी आत येऊ की नको? की दारातच उभं करणार आहेस मला?'

नेहमीच्या खट्याळपणाने शलाकाचे डोळे चमकत होते.

'ये की... आई बाजारात गेलीये.. '

शलाका आत येऊन बसली नि शंतनूचं मन परत द्विधा झालं.

या ट्रीपमधे शलाकाला मागणी घालायचा विचार होता आपल्या डोक्यात. पण हे काहीतरीच होऊन बसलंय. आता काय करावं? हे कळल्यावर ती काय म्हणेल? तिचा काय समज होईल?

काहीही असो. पुन्हा आपण येणार दोन तीन वर्षांनी...तितकं थांबायचा धीर नाही माझ्यात. काय तो सोक्षमोक्ष लावलेला बरा. आजच तिला विचारूया. जे होईल ते होईल. आईचा विचारही कानावर घालूया तिच्या. नाहीतरी आपली बालमैत्रिण आहे ती. कोणाजवळ तरी हा कोंडमारा उघड करावाच लागेल मनातला. डोकं फुटायची पाळी आलीय कालपासून...'

'चल, जरा पाय मोकळे करून येऊ.. कालपासून घरातच बसलोय...'

चेहर्‍यावरचे भाव शक्य तितके निर्विकार ठेवत तो म्हणाला.

ती हसून हो म्हणाली तसा पटकन तो कपडे बदलून आला. कोपर्‍यावरच्या बागेत जाऊन दोघं एका बाकावर बसले. सकाळची वेळ असल्यानं बागेत कोणी फारसं नव्हतंच.

'शलाका, तुला काही सांगायचंय मला ... ऐकून तुझा गैरसमज....'

'दिनकररावांबद्दल बोलतोयस का?..'

तो आ वासून तिच्या चेहर्‍याकडे बघतच राहिला. ही आई नि शलाका... दोघी अगदी सारख्याच. मनातलं अगदी प्रांजळपणे बोलून टाकतात. लपवाछपवी कशी ती नाहीच.

'म्हणजे...तुलाही माहीत आहे? फक्त मीच अनभिज्ञ होतो तर..'

'मलाही नाही शंतनू, फक्त मला नि आईलाच माहीत आहे, त्या दोघांचा लग्नाचा विचार. दिनकरराव येतात तुमच्याकडे म्हणून बिल्डिंगमधले सगळे कितीही वेडवाकडं बोलत असले तरी आईबद्दल त्यांच्या मनात किती चांगले विचार आहेत हे आम्ही दोघीही जाणून आहोत. तुझी आई....'

तिचं वाक्य अर्ध्यावरच तोडलं शंतनूनं.

'आई किती चांगली आहे ते मला कोणी सांगायला नकोय शलू. अन दिनकरराव.....ते सुद्धा सज्जन असतीलही... पण आत्ता या वयात लग्न? आईचं? अग मी आपल्या दोघांच्या लग्नाची स्वप्नं बघतोय... नि.."

मनातलं गुपित असं त्राग्यापोटी तोंडून निघून गेलं तसा शंतनू जरासा दचकलाच. चटकन त्यानं शलाकाकडे बघितलं... पण ती गंभीर होती.

' मग त्या स्वप्नांमधे आईंच्या लग्नानं काय फरक पडतोय शंतनू? गेली बारा तेरा वर्षं फक्त तुझ्यासाठीच जगल्या त्या. आज तू मार्गी लागलास... तरीही त्यांना स्वतःचं सुख बघायचा अधिकार नाही असं म्हणायचंय का तुला? नि लोक काय म्हणतील हा विचार तुझ्या डोक्यात असेल, तर तो केव्हाच झटकून टाक तू.... लोकांचा विचार करून सुखी झालेली एकतरी व्यक्ती तू बघितली आहेस का आयुष्यात?'

'लोकांचं नाही ग... मलाच खूप त्रास होतोय शलू कालपासून. बाबांच्या जागी दुसरं कोणी आणून बसवण्याची कल्पनाच असह्य वाटतेय मला...' किंचित वरमून जात शंतनू म्हणाला.

'बाबांची जागा कोणी घेऊ शकत नाही शंतनू. माहित्येय मला. तुझ्या मायेच्या माणसांचा परीघ आणखी रुंदावतोय.... अजून भर पडतेय त्यात- असा विचार का करता येत नाहीय तुला? अरे माझ्याकडेच बघ.... माझ्या खर्‍या आईबाबांनी वार्‍यावर सोडली मला...पण मला दत्तक घेतलेल्यांनी कधी जाणीव होऊ दिली का त्याची? अगदी भरभरून माया दिली मला त्यांनी. रक्ताची नाती कधी मृत्यू, तर कधी परिस्थितीनं हिरावून घेतल्या जातात,.....पण ही जी हळूवार जोडलेली नाती असतात ना.... ती देखील खूप खूप सुख देऊन जातात रे आयुष्यात.......फक्त त्यांच्याकडे बघायची नजर हवी आपल्याजवळ....'

'दिनकरराव फार मृदू, फार सरळ साधे आहेत रे शंतनू. गेलं वर्षभर बघतेय मी. खूप काळजी घेतील आईंची....'

'अग, पण मी सुद्धा खूप विचार करून ठेवला होता ग शलू. आपलं दोघांचं लग्न झालं की आईला मी कायमचं अमेरिकेला न्यायची स्वप्न बघत होतो. त्यासाठी तिथलं नागरिकत्व घ्यायचाही विचार होता माझ्या डोक्यात...' शंतनू म्हणाला.

' ही तुझी स्वप्नं झाली शंतनू... त्यांचीही काही स्वप्नं असतील हा विचार केलास का तू? इतकी वर्षं तुझ्यासाठी त्या एखाद्या योगिनीसारखं जीवन जगल्या, त्यात बहर आला तर आनंद नाही का होणार तुला? नात्यांची ही गुंफण.... मग ती कुठल्याही नात्यांची का असेना, याची एकेक कडी वाढत असली, गुंफली जात असली.... तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच...'

'तू नाही म्हणालास तर त्या हे लग्न करणार नाहीतच. पण आयुष्याच्या मध्यावर का होईना...त्यांच्या पुढे आलेली सुखाची ओंजळ केवळ तुझ्यामुळे रिती झालेली चालेल का तुला? विचार करून सांग....'

इतका वेळ मन लावून ऐकणार्‍या शंतनूनं शलाकाचा हात हलकेच हातात घेतला नि तो प्रसन्न हसला.

'खरंच...मनात तशीही आधी शंका नव्हतीच माझ्या.. पण आता मात्र खात्री झाली...' तो म्हणाला.

'म्हणजे?पटलं तुला माझं बोलणं...?' आनंदातिशयानं शलाकानं विचारलं.

'ते तर पटलंच ग. पण माझी निवड किती बरोब्बर होती याची जाणीव परत नव्यानंच होतेय मला. ए शलू, देशील न अशी साथ मला नेहमीच?'

तिच्या डोळ्यात खोलवर बुडून जात त्यानं विचारलं....तशी इतका वेळ बडबडणारी शलाका एकदम मिटूनच गेली. अगदी झक्कास लाजली.

शंतनूनं मग वेळ न दवडता पुढाकार घेऊन रजिस्टर लग्नाची नोटीस द्यायला लावली आईला नि दिनकररावांना.

दोन महिन्यांनी शंतनूला निरोप द्यायला विमानतळावर आई, दिनकरराव नि शलाका तिघंही आले होते.
निघायची वेळ झाली तसा शंतनू झटकन पायाशी वाकला आईच्या.... नि दिनकररावांकडे वळला तोच....त्यांनी घट्ट मिठी मारली त्याला.

शलाकाच्या डोळ्यांच्या ओलसर कडा बघून तिच्या डोक्यात एक टपली मारायचा झालेला अनिवार मोह टाळून तो झपाझप आत निघाला.

गालांवर ओघळलेल्या पाण्यानं त्याच्याही डोळ्यांपुढे धूसर पडदा दाटत होता.

-समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमॉ,
सुरेख , आणि हो मंजुडि, सिंड्रेला ला अनुमोदन, खास सुमॉ टच , समजुतदार पात्रे Happy .
आजचा दिवस एकदम मस्त जाईल.
धनु.

>>>नात्यांची ही गुंफण.... मग ती कुठल्याही नात्यांची का असेना, याची एकेक कडी वाढत असली, गुंफली जात असली.... तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच..>>>सुरेखच.
कथा मस्त गुंफलीय. एक वेगळी कल्पना सुंदर शब्दात मांडली आहे. शीर्षकही मस्त...

गुंतागुंतीच्या जीवनप्रवासात संस्कारमालेतल्या कथांप्रमाणे तुमच्या 'पॉझिटिव' विचारसरणीच्या कथा वाचल्या की मनात आशावाद पुन्हा पालवू लागतो! तुम्हाला शुभेच्छा!

सुमॉ, गणपती बाप्पा मोरया!
सुर्रेख कथा. तुझ्या कथेतली सिंडी म्हणतेय तशी तुझी गुणी पात्रं मला खूप आवडतात. त्यांना तू जसं मांडतेस तशीच ती स्वीकारायला जराही मन कचरत नाही... अगदी रोजच्या आयुष्यात नेमके उलटे-पालटे अनुभव असूनही.
(आणि... किती दिवसांनी लिहितेयस? गणपती निमित्तं शुभरंभ असूदे तुझ्या कथौघाचा)

सुपरमॉम छानच कथा.. Happy
फक्त नजर मारू म्हणून उघडली पण संपूर्ण वाचल्याशिवाय पुढे जाताच आलं नाही.
देव करो आणि प्रत्येक माणसात अशी दुसर्‍याची वेदना समजून घेण्याची प्रवृती जागो,
कुणालाही एकटं जगावं लागणार नाही मग. Happy

Pages