गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लार्जेस्ट ब्लँकेट, मदर इंडियाज क्रोकेट क्विन, पुणे मीट

Submitted by अवल on 5 September, 2015 - 13:12

चेन्नईच्या सुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.

आता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.

भारतातील अनेक शहरांतील, जगातील अनेक देशांतील भारतीय स्त्रिया ऑगस्टपासून ही ब्लँकेट्स विणत आहेत. प्रत्येकजण एक,एक स्क्वेअर मीटरचे ब्लँकेट विणताहेत.प्रत्येक स्त्री सदस्य किमान दोन वा त्याहून जास्त ब्लँकेट्स विणत आहेत. प्रत्येक शहरातील ब्लँकेट्स जोडली जातील. अन शेवटी ही सगळी ब्लँकेट्स चेन्नईत सोडली जातील. अशा रितीने हजारो हातांनी विणलेले वर्ल्डस लार्जेस्ट ब्लँकेट 26जानेवारी 2016ला तयार होईल. गिनीजचे तज्ज्ञ येतील अन हे रेकॉर्ड तपासले आणि जाहीर केले जाईल.

हे प्रोजेक्ट इथेच संपणार नाही. यामागे एक मोठी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. एकदा हे रेकॉर्ड मान्य आणि जाहीर झाले की त्या नंतर हे मोठे ब्लँकेट पुन्हा छोट्या ब्लँकेट्स मधे रुपांतरीत केले जाईल. आणि अनाथ, गरजू लोकांना ही ब्लँकेट्स पुरवली जातील. हजारो हात हजारो गरजुंना पांघरूण घालतील.

या प्रचंड मोठ्या प्रोजेक्टमधे माझाही खारीचा वाटा आहे हे मला खूप अभिमानाचे आणि आनंदाचेही Happy माझी 82वर्षाची आईही यात सहभागी आहे. या प्रोजेक्ट मधे अगदी 8वर्षापासून 82 वर्षापर्यंतच्या स्त्रियांचा अतिशय उत्साही सहभाग आहे.

आज पुण्यातील काही जणी एकत्र आल्या. त्यातील अनेकजणी प्रथमच एकमेकींना भेटत होत्या. पण त्यांच्यातला ब्लँकेटचा समान धागा त्यांच्यातले नाते उबदार करायला पुरेसा होता Happy

या भेटीचे काही फोटो :

IMG_20150905_220849.jpgIMG_20150905_220906.jpgIMG_20150905_220833.jpg

या प्रोजेक्ट साठी ज्यांना विणकाम करायचे आहे, अथवा आर्थिक सहाय्य द्यायचे आहे त्यांनी कृपया फेसबुक वरील MOTHER INDIA'S CROCHET QUEENS या गृपवरती संपर्क साधावा.

सध्या प्रत्येक विणणारी ब्लँकेटचा खर्च स्वत:च करते आहे. मात्र 26जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी (गिनीजच्या तज्ज्ञांना बोलावणे, तेथील स्टिडियम भाड्याने घेणे, त्या दिवशीचा इतर खर्च वगैरे साठी)स्पॉन्सरर लागणार आहेत.
आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि प्रोत्साहनही लागेल Happy आशा आहे गिनिज वर्ड रेकॉर्ड बरोबरच अनेक गरजुंपर्यंत आपल्या शुभेच्छा पोहचतील. धन्यवाद !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय ....आम्ही कुवेत कर पण ह्यात सहभागी झालो आहोत .....आमचा इथे एक ग्रुप केला आहे ...
मी स्वत : आयुश्यात पहिल्यानदाच क्रोशे सुई हातात धरली ... आणी मला चक्क जमतय ... Happy .... क्या बात है खुप खुप मजा येतिये ...खुप उत्साह आहे .. ह्याचे सपुर्ण श्रेय माझी मैत्रीण दीपिका ( माबॉ कर -- जु-ई-ली) ची आहे Happy

२६ जाने च्या कार्यक्रमा साठी काही मोठे डोनर पुढे आले आहेत असे समजते..तरीही गरज हि लागणारच आहे.
माझा आपला खारिचा वाटा ...

अवल.... वर अजुन एक लिहा की ---- ह्यात ज्यानी सहभाग घेतला आहे त्याना गिनिज वर्ड रेकॉर्ड कडुन स्वत : च्या नावाचे सर्टीफीकेट $ १५ भरले की मीळु शकते ....त्याचे डीटेल्स काही दिवसात कळतिल.

ग्रेट! छान उपक्रम आहे.
पहिल्या ओळीत वाटले की उगाचच आपले काहीतरी,
पण वाचून पुर्ण होईस्तो मत बदलले होते
अभिनंदन आणि शुभेच्छा Happy

धन्यवाद सर्वांना ___/\___
सुहास्य, मस्तच Happy
ऋन्मेश, किमान लेखकाचे नाव तरी बघत जा, म्हणजे असे वाटणार नाही Lol

गिनिज वर्ड रेकॉर्ड कडुन स्वत : च्या नावाचे सर्टीफीकेट $ १५ भरले की मीळु शकते
<<
हाय्ला! लय भारी धंदा आहे की गिनीज बुक वाल्यांचा!
२ हजार बायका सहभागी झाल्या, तरी फक्त सर्टिफिकेट (छापण्याचा खर्च मॅक्स ३ रुपये प्रति कागद.) ९०० रुपयांना x २००० = १८,००,०००!!!
बाकी त्यांना बोलवायचा यायचा जायचा खर्चहि आपणच, अन ५००० स्क्वेअर मिटरच्या ब्लँकेटचा उपयोग काय म्हणे?

असो. दुनिया झुकती है... येडा बनानेवाला चाहिये

अन ५००० स्क्वेअर मिटरच्या ब्लँकेटचा उपयोग काय म्हणे?
>>
हा राजकीय धागा नव्हता त्यामुळे कमीतकमी हा तरी आधी नीट वाचुन / समजुन घेउन प्रतिक्रिया देणे अपेक्षीत आहे!

हे प्रोजेक्ट इथेच संपणार नाही. यामागे एक मोठी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. एकदा हे रेकॉर्ड मान्य आणि जाहीर झाले की त्या नंतर हे मोठे ब्लँकेट पुन्हा छोट्या ब्लँकेट्स मधे रुपांतरीत केले जाईल. आणि अनाथ, गरजू लोकांना ही ब्लँकेट्स पुरवली जातील. हजारो हात हजारो गरजुंना पांघरूण घालतील.

असे आधीच लेखात लिहिलेले आहे.
Light 1

त्याचं काये स्पॉक, यातून गिनेस वाले किती पैसे कमावताहेत ते बघतोय मी.
अन ब्लँकेट्स???
ते जे काय फोटोत दिसतंय क्रोशाचं, १x१ मीटर (३ बाय ३ फूट रफली) ते गरीबांना पांघरूण म्हणूण पुरवणार आहात तुम्ही? एल ओ एल.
हसू का?

संपादनः
अरे हो! नमाज पढायची चटई म्हणून नक्कीच कामी येईल बरं का ते बस्कर. बायकांच्या समोर मांडली आहेत ती बस्करं, तिथे बरोब्बर साईजचा अंदाज येतोय बघा.

प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवणं सोपं असतच.
आधी नीट माहिती वाचाल का?
हे रेकॉर्ड एकच असल्याने एक सर्टिफिकेट गिनिज कडून मिळणारच आहे, जे गृपचे म्हणून असेल. कारण हा इव्हेंट गृपचाच आहे.
परंतु कोणाला पार्टिसिपेशनचे स्वतंत्र सर्टिफिकेट हवे असेल तर तशी सोयही आहे. अर्थातच ती सशुल्क असेल. आणि अर्थातच हे ऑप्शनल आहे.
आणि नंतर त्या ब्लँकेचटचे काय करणार याचे उत्तर, मूळ लेखात वर दिलेच आहे. आता त्याचा आकार किती असेल? एक मीटर बाय एक मीटरचे चौकोनी ब्लँकेट दिले जाईल हा अर्थ तुम्ही काढलात. त्यातून नमाज वगैरे कारण नसलेले रिमार्क्स दिलेत. असंही होऊ शकतं ना की दोन बाय एक मीटरचे एक ब्लँकेट सुटे केले जाऊ शकते.
पण हल्ली मायबोलीवरती ही पद्धतच झाली आहे, दिसलं कोणी काही चांगलं करतय, झोडून काढा.
मी नतमस्तकच अशा लोकांसमोर ___/\___
ही माझी या संदर्भात शेवटची पोस्ट. झोपलेल्या सोंगांना उठवण्यापेक्षा चार टाके विणेन म्हणते Lol

Happy

मस्तं दिसताहेत ब्लँकेटस!

वर्ल्ड रेकॉर्डकरिता शुभेच्छा.
आता मला वेळ असता तर तूच शिकवलेले काही टाके घालून एक ब्लँकेट नक्की विणून पाठवलं असतं.

शुभेच्छा!!
तुम्हा सगळ्यांवरुन प्रेरणा घेऊन बर्‍याच मंडळांनी असे उपक्रम राबवले तर फारच चांगले!!
(क्रोशा विणकाम आता नीट येत नाही, खूप गच्च होतं आणी वाकतं पण आणि काही सोपे करण्यासारखे असले तर नक्की इंटरेस्टेड आहे.)

तुमच्या विणकामाची किंवा रेकॉर्ड बनवायच्या इच्छेची खिल्ली नाही. गिनिजवाल्यांच्या पैसे कमवायच्या आयडियेबद्दल आहे हे स्पष्ट लिहिले आहे माझ्या पहिल्याच प्रतिसादात.

गिनिजबुक वा लिम्का बुक मधे नाव यावं म्हणून किती व कोणकोणत्या हास्यास्पद व धोकादायकही गोष्टी लोक करतात, हे तुम्हाला मी वेगळे सांगायला हवेच असे नाही. असली बुकं काढून दुकानदारी चालते, हे म्हटले, की लगेच मला 'राजकीय' धाग्यांबद्दल सांगणारे टोचत नाहीत तुम्हाला Happy

असो. असेही भारतात आजकाल उन्हाळा हा एकच ऋतू शिल्लक उरतोय. तेव्हा ते ब्लँकेट नक्कीच उबदार होईल हे नक्की.

वर्ल्ड रेकॉर्डकरिता शुभेच्छा
याला ब्लँकेटस का म्हटल जातय?.ब्लँकेटस म्हणजे थंडिच्या दिवसात पांघरायची रग(रजाई) याला म्हणतात ना?

अवांतर:

आता मला वेळ असता
तर तूच शिकवलेले
काही टाके घालून
एक ब्लँकेट नक्की विणून पाठवले असते...

असे कवितेच्या चालीत फिट बसते आहे! एक उदास / विरह कविता नक्की होईल हेमावैम!

फोटो न पाहता लेख आणि हेतू उदात्त वाटतो.फोटोतले टेबलक्लॅाथस पाहून आणि ते गरिबांसाठी वगैरे --------

भारतातल्या गरिबांना असली ब्लँकेटस हवी आहेत वगैरे कशाला ?त्यांना हव्यात निरनिराळ्या सबशिड्या.
साइकल चालवतच भारतपर्यटन करायचे असेल तर करा की त्यासाठी कसलातरी संदेश घेऊनच फिरायचे कशाला.

अवल,

उत्तम व अभिनव उपक्रम! आपणांस शुभेच्छा!

एक विचारू शकतो का? आधीच माफी मागून ठेवतो काही चुकत असल्यास.

फोटो पाहिले. त्या फोटोतील ते एक गुलाबी विणकाम पाहून मला आठवले की माझ्या आईने असे काहीकाही बरेच केलेले आहे. ते घरात अजूनही तसेच आहे. आई जाऊन तर आता चार वर्षे होत आली.

मी ते ह्या उपक्रमासाठी देऊ शकतो का? की मृत व्यक्तीचे नाही स्वीकारता येणार? परवा तीन सप्तेंबरलाच तिचा वाढदिवस असतो म्हणून तिने केलेली अशी काही बस्करे काही देवळांना देऊन आलो अजून थोडी आहेत बहुधा!

धन्यवाद सर्वांना.
बेफिकीर, मी विचारते संबंधिताना. जमल्यास त्या विणकामांचे फोटो इथे टाकाल का? म्हणजे मला विचारणे सोईचे जाईल. आणि या विचारण्यात काहीच राग येण्यासारखे नाही हो Happy धन्यवाद

हे फार लहानसे आहे. गोधडीसारखी मोठी होती ती गेल्या चार दिवसांत काही देवळांमध्ये दिली. आता अजून आहेत का बघतो. तुम्हाला विचारले खरे, पण नेमकी मोठीच दिली गेली असे वाटत आहे सध्या. असो! धन्यवाद! Happy

IMG_1579.JPG

मस्त आहे हे! शुभेच्छा! मूळ हेतू एक सोशल इव्हेण्ट असाच दिसतोय. त्यात वापरल्या जाणार्‍या गोष्टी कोणाच्यातरी उपयोगी येतीलच थंडीत.

बेफि विपु टाकते.
फारएण्ड, अगदी बरोबर. त्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रदेशातील, वेगवेगळ्या भाषांतील कितीतरी जणी जोडल्या जाताहेत. विविधतेतून एकतेचा छोटासा प्रयत्न!

वॉव!! काय सॉलिड उपक्रम आहे हा...

अवल आणि या उपक्रमात सहभागी झालेले, होणारे मायबोलीकर, सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!

Pages