'हायवे' - एक सेल्फि आरपार!

Submitted by मुग्धमानसी on 31 August, 2015 - 03:20

कधी कधी आपण एकटेच घराबाहेर पडतो फ़िरायला. मॉर्निंग वॉक म्हणा किंवा पायी नुस्तीच चक्कर मारायला. एखाद्या निवांत शांत ठिकाणी! तिथे आपल्यासारखेच अनेक जण पाय मोकळे करत असतात. आपण फ़िरत असताना आपल्या पुढून येऊन मागे जाणारे किंवा मागून येऊन पुढे जाणारे अनेक जण आपण तिथे नसल्याचप्रमाणे आपापल्या सोबत्यांशी चाललेल्या गप्पांमध्ये रंगून गेलेले असतात. आपल्याला चालता चालता अश्या आत्ममग्न गप्पांचे अनेक छोटे-मोठे तुकडे ऐकू येतात. मुद्दाम कान देऊन ऐकलं नाही तरी काही वाक्यं, काही शब्द, काही प्रश्न, काही उसासे... आपसुक येऊन कानावर पडतात. कधी आपल्याला खुद्कन् हसू येतं तर कधी अगदिच "कैच्याकै" वाटतं. कधी आश्चर्य वाटतं तर कधी वाईटही वाटतं. अश्या त्या त्या वेळेपुरत्या वाटण्याला खरंतर काहीच अर्थ नसतो. पण तरिही मनातल्या मनात काही क्षणांसाठी का होईना, आपण त्या अनोळखी आयुष्यांसंबंधीचे अंदाज बांधायला जातो. काही आडाखे करतो. काही कल्पना रचतो. उगाच मनाचा खेळ असतो तो नुसता! अजून काय?
पण अश्या तुकड्या तुकड्यांची एकसंध गोधडी विणायचा प्रयत्न केलाय कधी? असे सगळे निरनिराळे रंगिबेरंगी नवे-जुने, फाटके, मळके, काही विरलेले तर काही जरतारी आयुष्यांचे तुकडे एकसंध एखाद्या जीग्-सॉ पझलसारखे तंतोतंत एकमेकांशी जुळले गेले तर? वरवर चित्रविचित्र अनाकार, अकारण दिसणार्‍या या गोधडीच्या दुसर्‍या बाजूला आपोआप तयार झालेलं दिसेल एक अखंड मानवी वेदनेचं, दु:खाचं, ठसठसणार्‍या जखमांचं प्रस्तल! माणूस म्हणून जगणार्‍या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक खरंखुरं प्रामाणिक चित्र!

’हायवे- एक सेल्फ़ी आरपार’ हा चित्रपट पाहताना मला असेच एक जीग्-सॉ पझल जुळल्यासारखा अस्वस्थ करणारा, तरिही आनंद देणारा अनुभव आला! एका नकळत हळू-हळू आकार घेत गेलेल्या माणसाच्या अनादी, अथांग पण नितांत सुंदर आणि प्रामाणिक वेदनेच्या चित्राच्या साक्षात्काराने भारावून गेल्यासारखं झालं. नकळत मीही त्या पझलमधला एक तुकडा बनून गेले. माझे दु:ख, माझी वेदना त्या अखंड चित्रात सहजपणे विरून गेली. ती वेदना माझी झाली. आणि मला ठाऊक आहे की हा चित्रपट बघणार्‍या प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला ती वेदना त्याची वाटेल. तुकड्या-तुकड्यांनी बनलेल्या त्या अखंड गोधडीचा आपणही एक क्षुल्लकच... पण महत्त्वाचा भाग आहोत ही जाणिव आपल्याला अंतर्मुख करते. आपल्याला आपल्या दु:खाच्या आणखिन जवळ घेऊन जाते. हे या सिनेमाचं, आणि या सिनेमासाठी कष्ट घेतलेल्या प्रत्येकाचं यश आहे असे मला वाटतं.

****

तसं पाहिलं तर आपण सर्वजण सतत धावतच असतो की! आपल्या सगळ्यांनाच लवकरात लवकर कुठेना कुठे पोचायचं असते सतत. का, कुठे, कशासाठी? - हे प्रश्न क्षणभर थांबुन स्वत:ला विचारावेत इतकाही वेळ आपल्याला नसतो. अत्यंत आत्मकेंद्री असलेला या सततचा प्रवास खरंतर आपल्याला आपल्यापासून खूप दूर नेत असतो. बर्‍याचदा असंही असतं की आपण नकळत आपल्यालाच टाळत असतो. स्वत:पासून दूर पळत असतो. अनेक मुखवटे आपण आपल्या चेहर्‍यावर दिवसभर वागवतो. अनेक भुमिका लीलया पार पाडतो. या भुमिकांमध्ये स्वत: इतके समरसून जातो की आपण मुळात आहोत कसे हेच विसरायला व्हावे! कदाचित... तेच आणि तसेच व्हायला हवे असते आपल्याला.
पण मग अचानक असं काहितरी घडतं की आयुष्य अनपेक्षितरित्या आपल्या सगळ्या धावधावीला, पळापळीला, व्यस्त दिनक्रमाला ’स्टॅच्यु’ केल्याप्रमाणे धांबवून टाकतं आणि अचानक सामोर्‍या आलेल्या आणि टाळता न येणार्‍या या निवांत वेळाचे आता काय करावे या विचाराने आपण भांबावून जातो. आपण स्वत: स्वत:ला इतक्या निवांत कधी भेटलेलेच नसतो ना! स्वत:पासून दूर पळू पाहणारे आपण मग अचानक स्वत:च्या दिशेनं नकळत उलटा प्रवास सुरू करतो. स्वत:ला सामोरं जाण्याची ही अपरिहार्यता आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला भाग पाडते. आणि अत्यंत आश्चर्यकारकरित्या ती मिळतातही! मग आधीच का नाही आपण असे गेलो स्वत:ला निर्धोकपणे सामोरे? - असा आपल्याला प्रश्न पडतो.

मुंबई- पुणे या एक्स्प्रेस हायवेवर धावणारी निरनिराळी वाहनं आणि त्यातून प्रवास करणारी निरनिराळ्या पार्श्वभुमिची, मानसिकतेची, रंगाढंगाची माणसं! प्रत्येकाच्या आयुष्याचे निरनिराळ्या धाटाचे, निरनिराळ्या जातकुळीचे निरनिराळे तुकडे. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या, प्रत्येकाच्या जखमा वेगळ्या, प्रत्येकाचे आयुष्य वेगळे! हा प्रत्येकाचा स्वतंत्र असलेला प्रवास अचानक एकाच ठिकाणी येऊन ’वाहतूक कोंडी’चे निमित्त्य होऊन मुळे थप्प होतो आणि मग या अचानकपणे लाभलेल्या निवांतपणात प्रत्येकाचा एक निराळाच स्वतंत्र प्रवास सुरू होतो. स्वत:पासून स्वत:कडे असलेला हा प्रवास! नकळत ही सगळी स्वतंत्र आयुष्य एकमेकांच्या प्रवासात आपापली जागा शोधत एकमेकांच्या प्रवासात भागिदार होतात आणि अनेक असे छोटेमोठे तुकडे सांधले जाऊन एक विलक्षण सुंदर आणि प्रामाणिक वेदनेचे अस्तर असलेली गोधडी विणली जाते! ही गोधडी पडद्यावरच्या कलाकारांसोबतच आपल्यालाही तिच्या आत सामावून घेते, एका विलक्षण शांततेची उब देते... आणि ’आपल्यातल्या प्रामाणिक वेदनेइतकं सुंदर या जगात काहीच नाही’ याची नितांतसुंदर अनुभुतीसुद्धा देते. आणि हेही सांगते की आपल्या अस्वस्थतेला सामोरं गेल्याशिवाय शांततेचा शोध घेणं आणि ती लाभणं निव्वळ अशक्य आहे! हे आपल्यातल्या आपल्याला निर्धोकपणे सामोरं जाणं... म्हणजेच स्वत:ला आरशात पहाणं... म्हणजेच ’एक सेल्फी आरपार’!

****

बास! सांगता यावी अशी एवढीच कथा आहे या चित्रपटाची. पण या एवढ्याश्या कथेत अनेक स्वतंत्र महाकाव्ये म्हणता येतील अशा लाखमोलाच्या आयुष्यकथा गुंफलेल्या आहेत ज्या ज्याने-त्यानेच अनुभवायला हव्यात. चित्रपटाच्या शेवटी कॅमेरा प्रत्येक पात्राच्या चेहर्‍यावर काही क्षण स्थिरावतो तेंव्हा आपण ते चेहरे वाचण्याचा आटोकाट प्रयत्न आपल्याही नकळत करतो. काहीतरी आपल्या अत्यंत ओळखिचं, जवळचं सापडतंच त्या प्रत्येक चेहर्‍यावर! सरतेशेवटी चेहर्‍यावरची रंगरंगोटी उतरवली जात असते. मुखवटे गळून जाऊन कुण्या ’तसल्या’ बाईतली ’आई’ उघडी पडते तर कुण्या पापभिरू पांढरपेशा पुरुषाचं तान्हं बाळ होतं. कुणी स्वत:च्या भितीला सामोरं जातं तर कुणी स्वत:च्या वैफल्याला. कुणाला उत्तरे सापडतात तर कुणी निर्णयही घेऊन मोकळे होतात!

चित्रपटाच्या शेवटी निरनिराळ्या पातळ्यांवर स्वत:चा स्वतंत्र प्रवास करणारे सगळेजण एकाच बिंदूवर एकत्र येतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जखमांना सांधणारी एकच सामाईक वेदना आपल्यालाही नकळत वेढून घेते. काही प्रश्न आपल्यासाठीही शेवटपर्यंत अनुत्तरीत राहतात. काही कहाण्या अधुर्‍या वाटतात. थोडी हुरहुर मागे ठेऊनच चित्रपट संपतो. आणि ती अस्वस्थता मग कित्येक दिवस आपला पिछा करत राहते. भा. रा. तांबेंची अजरामर कविता आपल्याही मनात चित्रपट संपून गेल्यावरही घोळत राहते.

"घन तमी... शुक्र बघ राज्य करी...." - या ओळींत आणि पं. हदयनाथ मंगेशकरांच्या संगितात माणसाला विलक्षणरित्या अस्वस्थ करण्याची ताकद आहे असं मला दरवेळी हे गाणं ऐकताना वाटतं. मुळ कवितेतल्या शब्दांना जरी आश्वासक सकारात्मकता असली तरी ही संगितबद्ध केलेली कविता ऐकताना काळजात काहितरी हलल्याशिवाय राहत नाही. या चित्रपटात हे गाणं कुठल्याही संगितवाद्यांशिवाय सहज गुणगुणल्यासारखे रेणुका शहाणेच्या आवाजात ऐकणं आणि या गुणगुणण्याच्या पार्श्वभुमिवर संपूर्ण चित्रपटाचा सार शोधत प्रत्येक पात्राच्या चेहर्‍यावर काही क्षण स्थिरावणारा कॅमेरा... हा या चित्रपटाचा सर्वोत्कट बिंदू आहे!

****

स्वत:च्या अस्तित्वाचा अर्थ समजावा इतकी काही मी विद्वान नाही! आणि ही गणितं इतक्या सहज सुटतही नसतात. मात्र प्रत्येक जगण्याच्या मुळाशी एक भगभगणारे जळते दु:ख असते जे आपल्या अखंड आयुष्याला उर्जा देते - हे सत्य समजणं तितकेसे अवघड नाही. हे दुं:ख, जे बुद्धाला उमगले होते! त्यामुळेच त्याच्या चेहर्‍यावर कायम विलसत असते एक भव्य आश्वासक शांतता आणि निर्भेळ, सुंदर प्रामाणिक स्मित! अशी शांतता अनुभवायची असेल तर असा स्वत:चा एक आरपार सेल्फी घेता यायलाच हवा. त्यासाठी क्षणभर कुठेतरी थांबायला हवं. आपण सतत अव्हेरलेल्या आपल्या दु:खालाही कधीतरी जवळ करायला हवं! - हे इतकं जाणवलं तरी माझ्यापुरतं पुष्कळ आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

आज पाहिला एकदम मस्त. . . . . परफेक्ट कास्टिंग ही या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू आहे. सर्वाच्या भुमिका सहज आहेत पण नंबर एक मुक्ता व तिच्या सोबतची आक्का. नागराज सुद्धा भाव खाऊन जातो. . . . तर पु.ल.नी म्हटल्या प्रमाणे मला माणसे वाचायला आवडतात तसा हा ' हायवे ' आहे.
पुन्हा एकदा पाहणार. ...