सॅन फ्रॅन्सिस्कोच्या 'मुनी'

Submitted by रायगड on 31 August, 2015 - 12:35

आमच्या कॅलिफोर्निया ट्रीपचा शेवटचा टप्पा म्हणजे सॅन-फ्रॅन्सिस्को शहर! आधीचे दोन आठवडे एल.ए. व बे एरिया मध्ये साथ देणारी वॅन सॅन फ्रॅन ला गेल्यावर परत करायची हे आधीच ठरलं होतं. तशी बोलीच केली होती मामीशी की ड्रायव्हर म्हणून फक्स्त २ आठवडे काम करणार नंतरचा आठवडा पूर्ण पगारी सुट्टी पायजेल. मला आणि दोन प्वारांना खायला-प्यायला, डोसक्यावर छप्पर पाहिजे. हे वदवूनच नोकरी घेतलेली...तरी दोन पोरांकडून मामी आणि मामांनी पुरेपूर करमणूक करून घेतली आणि त्या करमणूकीवर काही टॅक्स दिलेला नाहीच! तो मागावा म्हणते...असो!

तर सॅन- फ्रॅनमधील ट्राफिक, वर-खाली जाणारे - अति चढ-उताराचे रस्ते, पार्किंगचा प्रॉब्लेम हा सर्व विचार करता सिटीमध्ये बसने फिरणं योग्य ठरेल असा विचार केला. सिटीतला पब्लिक ट्रान्सपोर्टवर भिस्त ठेवायची ठरवली. आणि पुढे ५-६ दिवस रोज एकेक नवनविन अनुभव या बशींनी आमच्या पदरात घातले.

muni.jpg

तर लॉस अल्टोसहून निघून सॅन-फ्रॅनच्या डिपार्टमेंट मध्ये जाण्यापूर्वी आम्ही जगप्रसिद्ध गोल्डन गेट बघून मग सामान डिपार्ट्मेंटमध्ये टाकून गाडी तत्परतेने परत करून आलो. सॅन फ्रॅन्सिस्को म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (ज्याला प्रेमाने मुनी म्हणतात) च्या ७ दिवस अनलिमिटेड राईडस आणि सॅन फ्रॅन्सिस्कोतील ४ आकर्षणं असा एकत्रित पास घेणं ईकॉनॉमिकल ठरणार होतं. त्यामुळे गाडी सॅन फ्रॅन्सिस्को विमानतळावर परत करून येताना विमानतळावरच हा एकत्रित पास घेऊन टाकू असं आम्ही ठरवलं. जेणेकरून विमानतळावरून घरी येतानापण मुनी वापरता आली असती. इथूनच या मुनीबाईंनी त्यांची झलक दाखवायला सुरुवात केली. आता हा पास मिळण्याची अत्यंत लॉजिकल जागा विमानतळ - जेथे प्रवासी उतरले की त्यांना सोयीस्कररित्या हा पास घेता येईल. असा विचार आम्ही जनसामान्यांनी केला. पण इतकं सोयीचं केलं तर प्रवासी फारच सोकावतील अशी मुनी प्रशासनाची धारणा असावी. त्यामुळे तिथे नुसता ७-दिवसांचा मुनी पास होता पण हा सर्वसमावेशक पास नाही. तो म्हणे त्यात समाविष्ठ असलेल्या आकर्षणापैकी कुठेही अथवा डाऊन-टाऊन मध्ये एका ठिकाणीच मिळणार. म्हणजे त्या जागांपर्यंत पोहोचण्यासाठी मुनी घ्यायची तर वेगळे तिकीट काढावे लागणार होतेच.

मग त्या दिवशी मुनीची तिकीटे काढून 'डिपार्टमेंटला' (अपार्टमेंटाला) परत आलो. मामांनी दुसर्‍या दिवशी डाऊन-टाऊन मध्ये जाऊन सर्वांकरीता ते मुनी+ सिटी पासेस आणले. आणि आम्हाला त्यावेळी कल्पना नसलेल्या मुनीच्या अजब दुनियेत आमचा प्रवेश झाला.

मुनीचे मुख्य वैशिठ्य म्ह्णजे त्याचे चालक. ग्राहकांशी अदबीने बोलावं हा सर्वसामान्यपणे अमेरिकेत मान्य असलेला संकेत या सारथ्यांनी पार उधळून लावला आहे. त्याखेरीज, त्यांना अत्यंत सार्वभौमत्व असून त्याआधारे बसचा शेवटचा थांबा आज कोठे ठेवावा, एखाद्या थांब्यावर बस किती वेळ थांबवावी अश्या शुल्लक निर्णयांकरीता त्यांना वरच्या कोणाच्या मर्जीची गरज नसावी अशी शंका येण्यास पूर्ण वाव आहे. २-३ वेळा चालकांनी मध्येच कोठेतरी बस थांबवून हाच शेवटचा थांबा असा त्यांचा अंतिम निर्णय जाहिर केला. का बुवा, हा कसा काय अंतिम थांबा, अशी फालतु चौकशी केल्यास अत्यंत तु.क. देण्यात आले. चेहेर्‍यावर भाव असे की "कहाँ कहाँ से आते है!! घर ही क्यों नही बैठते?"

एकदा बच्चेकंपनीला घेऊन मी आणि मामी बाहेर पडलो. मामांनी पागलखान्यातून सुटका हवी म्हणून दुसरा काहीतरी प्लॅन आखला. निघालो आणि कॅलिफोर्निया अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सला गेलो. ते बघून परतताना नक्की कुठच्या दिशेने जाणारी बस घ्यायची ह्यावर बराच काळ चर्चा झाली. जाताना आम्ही वेगळ्या थांब्यावर उतरलो होतो आणि आता दुसर्‍या बाजूने बाहेर पडून दुसर्‍या थांब्यावर आलो होतो. त्यामुळे डिपार्टमेंटच्या दिशेने जाणारी बस आम्ही उभे होतो त्याच बाजूला येणार की रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असा प्रश्न होता. यावर उपाय म्हणून मी दुसर्‍या बाजूला उलट दिशेने जाणारी बस आल्यावर घाई-घाईने पळत रस्ता क्रॉस करून त्या ड्रायव्हरकाकांना आमच्या स्टॉपला जायला ही बस घ्यायची की विरूद्ध दिशेने जाणारी असं विचारून आले. त्यावर विरूद्ध दिशेची असं उत्तर कानात साठवून आले.
बच्चे कंपनीला सायन्स म्युझिअम सारख्या फालतू ठिकाणी नेल्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त करणं - आपल्या दिवसाच्या वेळेतला अमूल्य वेळ आपल्याला माईन्क्राफ्ट खेळण्यात वा पॉलिमर क्ले वळण्यात न घालवता आल्याने कुरबुरी - असं सर्व चालू होतं! "when will we reach home"?" या आवडत्या प्रश्नाचा जयघोष चालू होता. त्यामुळे आता पटकन बस पकडून घरी पोहोचू या विचारात आम्ही! बस आली आणि त्यात चढून आम्ही स्थानपन्न झालो. निवांत होत आजूबाजूचे नमुने बघण्यात दंग झालो. पुढे-पुढे बसमध्ये गर्दीही बरीच वाढली. पण ही बस डिपार्टमेंटच्या अगदीच खाली असलेल्या स्टॉपवर जाणार असल्याने - आपला स्टॉप कळेलच की आपल्याला ह्या भ्रमात आम्ही बराच काळ बसून होतो. "Its taking so long" - या मुलांच्या तक्रारीवर आता येईलच आपला स्टॉप वगैरे समजावत होतो. अनंत काळ स्टॉप येईना आणि बघतो तर काय, बस Fisherman's wharf च्या रस्त्याला लागलेली. Fisherman's wharf तर उलट्या दिशेला यायला हवा. म्हणजे एवढी चौकशी करून आत्मविश्वासाने बसमध्ये बसलो तरी ती चुकीची निघाली? मग त्या दुसर्‍या बस ड्रायव्हरने आम्हाला चुकीची माहिती देऊन उलटीकडे जाणार्‍या बसमध्ये धाडलं का? नक्की काय चुकलं असा विचार करत आम्ही पुढील स्टॉपवर उअतरलो. उतरण्याआधी ड्रायव्हरकडे परत एकदा चौकशी की हा-हा आमचा स्टॉप - ही बस तिथे जातच नाही का? काकांनी शांतपणे बाहेरचा रस्ता दाखवला. खाली उतरा - दुसर्‍या बाजूच्या स्टॉपवरून ७७ पकडा हे माफक, तुटक-तुटक उत्तर दिले. आम्ही आपले मुकाट्याने तसं केलं. आम्ही मुळातच बस चुकीची पकडली होती का वगैरे गोष्टी समजणं शक्य नव्हतं...मुलांचा पेशन्स एव्हाना संपुष्टात आलेला. आता उतरून परत एक बस पकडायची आहे याविचाराने त्यांनी भयंकरच निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली.. सरळ टॅक्सी पकडून घरी जाऊया असा विचार आम्हा दोघींच्या मनात चमकून गेलाच. पण आता आम्ही इरेला पेटलेलो. काही करून बसनेच घरी जाणार असा काहीसा विचार होता!

मग दुसर्‍या दिशेने जाणारी बस पकडली. त्यात यथास्तित गर्दी होती. त्या धक्का-बुक्कीत कसे-बसे उभे रहात, यावेळी एक डोळा नीट बाहेर ठेवत अखेर आमच्या स्टॉपवर पोहोचलो. तोपर्यंंत चांगला दीड तास उलटून गेलेला. अर्थात ७७ घरापासून सुमारे ५ ब्लॉक्सवर असलेल्या मेन बसस्टेशन वर जाणारी होती. आधी घेतलेली घराच्या समोर जाणं अपेक्षित होती. मग अर्थातच ५ ब्लॉक्स तंगडतोड करत - आता आलोच घरी असा तोंडाने जयघोष करत दमून- भागून पोहोचलो एकदाचे.

आदल्या दिवशी आम्ही केलेल्या अत्याचाराला उत्तर म्हणून समस्त बच्चे कंपनीने दुसर्‍या दिवशी सकाळी उठून आज आम्ही कुठेही येणार नाही असा ठाम पवित्रा घेतला. मग काय आम्हीही आदल्या दिवशीचं उट्टं काढायचं म्हणून मामांनी समस्त बालगोपाळांसोबत घरी थांबावं असा फतवा काढला. अर्थात घरी बसण्याच्या जंगी प्लॅनला मामांची कधी ना नसतेच. फक्त समस्त मंडळींची दुपारच्या जेवणाची सोय करा नी तुम्ही दोघी उधळा कुठे उधळायचंय ते...असा त्यांनीही निर्वाळा दिला. सर्वांच्या जेवणाकरीता काही-बाही सोय करून आम्ही दोघीच बाहेर पडलो....१५ ऑगस्टच आमचा! "Are we there yet?","When are we going to go back home?" - हा घरातून बाहेर पडल्याच्या १५ व्या मिनीटाला विचारण्यात येणारा प्रश्न, "We are bored" असे कुठलेही वार परतवावे लागणार नाहीत याचा अतीव आनंद मनात होता.

आदल्या दिवशी गेलेलो ते कॅलिफोर्निया अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स गोल्डन गेट पार्कच्या अत्यंत सुंदर परिसरात वसलेलं आहे. तो गार्डनचा परिसर रमत-गमत पायी फिरण्याकरीता ही योग्य संधी होती. आदल्या दिवशीचीच बस घेऊन गोल्डन गेट पार्कला पोहोचलो. तिथे ४-५ तास मनसोक्त भटकलो. अतिशय सुंदर परिसर आहे तो! संपूर्ण दिवस काय, दोन दिवस सहज जातील नीट बघायचा तर!
परत येण्याकरीता निघालो. परत त्या दुसर्‍या बाजूनेच बाहेर आलो. आज मात्र आम्ही confident की काल आपण घेतलेली बस उलट्या दिशेने गेली तर आज विरुद्ध दिशेने जाणारीच बस घ्यायची! वास्तविक काल त्या विरुद्ध दिशेने जाणार्‍या बस ड्रायव्हरकडे चौकशी करून ही बस नाही घ्यायची ह्याची खात्री करून घेतलेली पण ती बस भलतीकडेच गेल्याने आम्ही विचार केला की बहुदा बस ड्रायव्हरने आम्हाला कुठे जायचंय नीट ऐकलं नसावं आणि चुकून दुसर्‍या बाजूच्या बसमध्ये आम्हाला धाडलं असावं. बस आली आणि आम्ही चढून बसलो. बसचे मार्गक्रमण सुरु झाले आणि काहीतरी चुकतय असं वाटू लागलं...बाहेरचा परिसर काही ओळखीचा वाटेना. परत कसे काय चुकलो, काय चाल्लय नक्की अशी आमची चर्चाच चालू होती तेवढ्यातच ड्रायव्हर साहेबांची आकाशवाणी झाली - "This is my last stop!" आँ! आम्ही आपले अवाक!काका शांतपणे बसमधून खाली उतरून वरचे इलेक्ट्रीक पोल्स खाली उतरवण्याच्या मागे लागले. आम्ही दोघी आपल्या उतरून नम्रपणे चौकशी चालू केली की बुवा - what just happened!! काका परत तेच वाक्य उदधृत करते झाले - "This is my last stop!". "अहो, तुमचा लास्ट स्टॉप हा आहे, पण बसचा कुठला आहे?" हा आमचा प्रश्न मनातच ठेऊन आम्ही आपले आदबीने आता आम्हाला घरी जाण्याकरीता काय पर्याय उपलब्ध आहेत याची चौकशी चालू केली. आमची बस थांबली त्याच्या मागे एक बस अगोदरच उभी होती. त्याचा ड्रायव्हर खाली उतरून इलेक्ट्रीक पोल्स उतरवून इथे-तिथे रेंगाळत होता. हे आमचे ड्रायव्हरकाका त्या काकांशी काहीतरी गुफ्तगू करून आले आणि आम्हाला माहिती पुरवली की थोड्याच वेळात ती बस निघेल. ती बस तुमच्या स्टॉपला नेणार. बरं...चला मग त्या बसमध्ये चढून बसावं असं म्हणून आम्ही तिथे मोर्चा वळवला तर आमच्या ड्रायव्हरकाकांनी फर्मान सोडलं - आत्ता नाय! अजून येळ आलेली नाय...येळ येताच तो डायवर तुम्हाला सांगेल - मग चढायचं. आता आधी आत बसलो तर काय होईल हा प्रश्न परत एकदा मनात दाबत मुंड्या हो म्हणून हलवण्याखेरीज दुसरा पर्याय दिसत नव्हता. आम्ही आपल्या तिथेच काही-बाही बोलत रेंगाळलो. आणि सुमारे ३ मिनीटांत तो बससारथी त्याच्या बशीत आरूढ झाला आणि सुमडीत बस चालू करून गेलाच. आम्हाला कळेपर्यंत तो पुढल्या कोपर्‍यापर्यंत पोहोचलादेखील. धन्य! आम्ही आमच्या ड्रायव्हर साहेबांकडे चौकशी केली की बुवा हा का पळाला आम्हाला न घेता, तर तो म्हणे मी तर त्याला सांगून आलेलो की these two ladies are waiting for you. भयंकर चीडचीड. तर तोपर्यंत ते आहेब म्हणाले - अजूनही तुम्ही धावत एक ब्लॉक खालच्या दिशेला गेलात तर ती बस पुढे जाऊन वळून, या रस्त्याला समांतर खालच्या रस्त्याला येणार. मिळेल तुम्हाला. बहुदा आमच्या आगामी शिव्यांना टाळण्यासाठी त्याने हा ऊपाय शोधला असावा अशी शंका येण्यास बराच वाव होता पण त्यावेळी त्याला शिव्या घालत थांबण्यापेक्षा आम्ही पळत जाऊन ती बस गाठून त्या ड्रायव्हरलाच शिव्या घालू असा या मनीचा त्या मनी संदेश पाठवून धावत सुटलो. धावत असतानाच बस येताना दिसलीच...जेमतेमच पोहोचलो. चढून बस वाल्याला आम्हाला न घेता बस का पळवलीस असं विचारलं तर तो एक रँडम बडबडत बसला - तो तुमचा बसड्रायव्हर म्हणजे माझा supervisor blah blah blah....एव्हाना कुठेही डोकं लढवण्याचा कंटाळा आल्याने आम्ही आपलं - बाबारे, या-या स्टॉपवर तू जाणार का असं परत confirm करून आम्ही परत एकदा आसनस्थ झालो. म्हणजे ही आदल्या दिवशी घेतलेली, त्याच दिशेला जाणारीच बस होती तर... म्हणजे आदल्या दिवशी आम्ही आमचा स्टॉप आम्ही मिस करून भलतेच पुढे गेलेलो की. आज मात्र नीट लक्ष ठेऊन आम्ही अखेरीस घरासमोरच्या स्टॉपवर यशस्वीरित्या ऊतरलो!

पण म्हणजे आदल्या दिवशीच्या चालकाला जेव्हा विचारले होते की आमच्या स्टॉपला ही बस जातच नाही का तेव्हा त्या साहेबांनी - तुम्ही लई पुढे आलात स्टॉप कवाच मागे गेला - हे ज्ञानामृत पाजलं असतं तर काय चूक झाली हे कळलं तरी असतं ना! पण नाही, जर माहिती दिली तर तो फाऊल! त्यामुळे जणूकाही आम्ही बसच चुकीची घेतली असा आव आणून त्याने पलिकडून ७७ घ्या एवढेच ऐकून आम्हाला पिटाळल्याने काही सुगावा लागला नाही!

आता आदल्या दिवशी आमचा थांबा मिस झाला याचं कारण बसमध्ये असलेली गर्दी हे होतंच पण बाहेर आपला थांबा गेला याकडे कसं लक्ष ठेवावं सांगा, जर बसमध्येच अत्यंत अत्रंगी व्यक्तीमत्वं आपलं लक्ष वेधून घेत असतील तर!
एकदा बस मध्ये एक सद्गृहस्थ एक मोठी पोतडी घेऊन चढले. दुसर्‍या हातात एक बीअरची बाटली. चढून स्थानपन्न होत त्यांनी आजूबाजूला नजर टाकून बीअरची बाटली हवेत फिरवत "कोणाकडे बॉटल ओपनर आहे का?" असे विचारते झाले. आता बसमधून प्रवास करताना सामान्य लोकं बहुतेक बॉटल ओपनर हा प्रकार घेऊन फिरत नसल्याने आजूबाजूच्या जनतेकडून उत्तर अर्थातच नाही असे आले. गृहस्थ डगमगले नाहीत. त्यांनी बाटली बाजूला ठेऊन त्यांच्या पोतडीत हात घालून २-३ टी शर्टस बाहेर काढले. $३ ला एक टी-शर्ट असे म्हणत त्यांनी त्यांच्यावर रोखलेल्या नजरांसमोर ते शर्टस फिरवले. आणि आपला बिझनेस चालवायला सुरुवात केली. आजू-बाजूची मंडळीनी देखील त्या शर्टमध्ये रस दाखवून प्रश्न विचारायला सुरूवात केली. एका ताईंनी विचारलं - "कुठून आणता हे शर्टस?" यावर गृहस्थांनी गूढगर्भित असे हास्य करून "हा! हा! हा! I have a buddy in the store who gets these for me" असे उत्तर दिले. आजूबाजूच्या मंडळींमध्ये खसखस पिकली. बहुदा तो माल हा सेकंडचा अथवा ढापलेला असा काहीतरी गडबडीचा माल होता असा आम्ही अंदाज लावला. गृहस्थांचा बिझनेस सेन्स बघून अचंबित तर झालोच होतो. म्हणजे - पिचींग/ आईस ब्रेकर म्हणून करीता बॉटल ओपनर आहे का असा प्रश्न विचारून ४ नजरा स्वतःवर वळवून घेऊन पुढच्या क्षणी त्या प्रश्नाचा logical sequence म्हणून शर्टस विकायला काढणे!! व्वा! थक्क झालो आम्ही! आजूबाजूची लोकंही ह्या फाटक्या दिसणार्‍या इसमाकडे आत्मियतेने शर्टची चौकशी का करत होते देव जाणे! त्याला प्रश्न विचारणार्‍या ताईंना तर तो तीन शर्टस घ्याच असा आग्रह करत होता. त्या मात्र दोनच शर्टस हवेत यावर अडून बसलेल्या. त्यांच्या व्यवहार काही जमला नाही आणि ताई पुढील थांब्यावर उतरून गेल्या. पण हे गृहस्थ डगमगले नव्हते. त्यांच्याकडे बिझनेसच्या बर्‍याच tactics दिसत होत्या. पुढील प्रत्येक थांब्यावर कोणी चढलं की हे काका त्यांची मोठ्याने आत्मियतेने चौकशी करत होते. "hi boss how are you doing?", "hello captain, how is it going?", "Hello ma'am are you a teacher in a school?" चालू होतं आपलं....आम्ही आपले तोंड दाबून हसत होतो. मोठ्याने हसण्याची पण चोरी - हो! काका त्यांचा बिझीनेस घेऊन आमच्याकडे मोर्चा वळवायचे आणि ते टी-शर्टस आमच्या गळ्यात मारायचे!

एक दिवस बसमध्ये एक ताई कानाला हेडफोन लावून त्या म्युझिक वर तल्लीन होऊन बेभान नाचत होत्या. म्हणजे कानाला हेडफोन लावून त्यावर हलणारे-डुलणारे, हातवारे करणारे नमुने बघितलेत पण ह्या बाई म्हणजे गणपती विसर्जनाला नाचतात ना, तश्या नाचत होत्या...तेवढ्यात त्यांचा स्टॉप आला आणि खालती उतरून त्यांचा झिम्मा घालतच त्या चालायला लागल्या. त्यातून त्यांची वेशभुषा, केशरचना - सर्वच दिव्य!

अजून एकदा आम्ही असाच स्वातंत्र्य दिने साजरा करायला बाहेर पडलो. योग्य बस प़कडून (आमच्या मते! :biggrin: ) आम्ही निघालो. भर रस्त्यात यथास्थितपणे ड्रायव्हरीण ताईंनी पुकारा केला - this is my last stop! एव्हाना ह्या सर्व प्रकाराला आम्ही इतक्या सरावलो होतो की विशेष काही न वाटता आम्ही मुकाटपणे खाली उतरलो....ताईंना माफक पणे विचारलं की आता काय करावं, कुठली बस, कुठून पकडावी वगैरे वगैरे! ताईंना फारच काव झालेला वाटला. ताईंनी जमेल तेवढं दुर्लक्ष करत - समोरच्या बाजूला जा आणि दुसरी बस घ्या - असं एक उत्तर देऊन, यापुढे एकाही प्रश्नाचं उत्तर देण्यात येणार नाही हे तत्काळ जाणवून दिलं...आम्ही आपल्या दैने-बाये करत समोरच्या बाजूच्या बस थांब्यावर जाऊन थडकलो!! गिर्‍हाईक ही सर्वांत दुर्लक्ष करण्याची गोष्ट ह्या उक्तीवर ताईंचा पूर्ण विश्वास असावा! असतं एकेकाचं!

एकदा Fisherman's wharf वरून Giradelli Square ला जाण्याकरीता बराच खल करून आम्ही एका मुनीत चढलो. ड्रायव्हर काकू होत्या....बर्‍या दिसत होत्या - म्हणजे चेहेर्‍यावर "फ्रान्सिस्को माज" फारसा दिसत नव्हता. (त्याचं कारण पुढे समजले) काकूंनी बस चालू केली आणि पुढील वळणावर ज्या दिशेला Giradelli Square आहे असं आमचं मत होतं त्याच्या बर्रोबर उलट्या दिशेला बस वळवली. अरे देवा! आता ही बस कुठे आणि किती फिरवत जाणार असा विचार मनात येतच होता, तेवढ्यात काकूंनी अनाऊंसमेंट केली - त्यांनी चुकीचे, उलट्या दिशेचे वळण घेतले होते. "आँ!" तर काकूंनी पुढे आकाशवाणी केली की त्या नविनच बसचालक असून आज त्यां पहिल्यांदाच ह्या राऊटवर आल्या आहेत. तर प्रवाश्यांनी समजून घ्यावे. लवकरच योग्य राऊटला बस नेण्यात येईल. आमचा वासलेला आँ तसाच! "अहो काकू, मग मॅप, राऊट डिटेल्स असं काही बघत नाही का हो तुम्ही?" हे आमचे विचार मनात! पुढील वळण घेऊन त्या परत सुरुवातीच्या बस थांब्याशी येऊन थडकल्या. पुनश्च हरीओम! असे म्हणत बस निघाली...पोहोचवलं बाई काकूंनी निर्धारीत ठिकाणी! पण काकूंची प्रवाशांना confidence मध्ये घेण्याची वृत्ती बघून डोळे पाणवलेच. हे चित्र विरळाच!

ह्या मुनींच्या वेगाच्या काय कथा वर्णाव्या? हातात मुबलक वेळ आणि सोबत भरपूर पेशन्स हे बाळगावेच लागतात मुनीतून प्रवास करायचा म्हटल्यावर! शांतपणे डकाँव-डकाँव करत ह्या मुन्या साधारण बसने लागेल त्याच्या दुप्पट वेळ तरी लावतात. त्यांचा वेग तर एक गोष्ट - थांब्यावर थांबणे, रस्त्यातल्या सिग्नलला थांबणे, कधी-कधी वरचे electrical poles चुकीचे ट्रॅक्स गाठतात मग खाली उतरून त्यांना योग्य त्या ट्रॅक्सवर आणणे, याखेरीज चालकांच्या मनात आलं तर कोणाशी गप्पा मारत ते थांबू शकतात ( सार्वभौमत्व !)

एकदा आम्ही fisherman's wharf जवळ घरी नेणार्‍या मुनीची वाट पहात उभे होतो. येणार्‍या सर्व मुनी टुरिस्टसनी भरभरून येत होत्या. त्यामुळे त्या आमच्या थांब्यावर थांबत पण नव्हत्या. १-२ मुन्या अश्या गेल्या. तिसर्‍या मुनीच्या ड्रायव्हरने पण आमच्या थांब्यावर येऊन "too crowded, won't stop here" अशी घोषणा करत गाडी पुढे काढली. आमच्या थांब्यावर एक handicapped access भागात व्हीलचेअर वर बसलेल्या एक बाई बस करीता थांबलेल्या. handicapped access platform दुसर्‍या टोकाला असल्याने आमचं तिथे लक्ष नव्हतं. त्या बाईंनी हात दाखवून मुनी तिथे थांबवून घेतली. आणि त्यानंतर सुमारे ५-७ मिनीटं तिथे ती मुनी उभी! त्या बाई काहीतरी वाद घालतायत एव्हढं कळत होतं. थोड्या वेळाने त्या बसमधून एक बाप-लेकांची जोडी उतरून आली. त्यांना विचारले - काय झाले, कसले वाद चालू आहेत? तर म्हणे - त्या बाई वाद घालतायत की त्यांना बसमध्ये घेतलेच पाहिजे आणि तो चालक सांगत होता की जागाच नाहीये - व्हीलचेअरला. पण बाई ईरेस पेटलेल्या की नाही ह्या बसमध्ये चढायचंच! शेवटी बसचालकाने घोषणा करून कोणीतरी voluntarily उतरावे असं आवाहन केलं. ते हे बाप-लेक अखेरीस उतरले. मग ती व्हीलचेअर त्या बशीत घुसवली. आणि मग निघाली पुढे. १० मिनीटं हे प्रकरण चालू होतं!

अश्या ह्या मुनी! सॅन-फ्रॅनच्या जीवनातील आवश्यक भाग! सॅन-फ्रॅन्सिस्को भेटीत मुनीतून प्रवास केल्याखेरीज सॅन-फ्रॅन ट्रीप पूर्ण सुफळ-संपुर्ण होऊच शकत नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा एकदम बरोब्बर वर्णन आहे मुनीचं Lol Fisherman wharf वरून निघणाऱ्या मुनीचाच अनुभव! मला चांगला बस ड्रायव्हर भेटला नशिबाने पण बसमधलं पब्लिक फुल अंतरंगी होतं! त्यातून आमच्या मुनी समोर नेमका एक होमलेस माणूस आला..त्याचा आमच्या मुनी वर इतका राग की तब्बल तीन वेळा तो आमच्या मुनीच्या बरोब्बर समोर येऊन उभा राही आणि मग मुनीचे ब्रेक कचकावून दाबण्याशिवाय काही पर्याय ठेवलाच नाही आमच्या डॅशिंग ड्रायव्हरला..मग पु.लं.च्या म्हैस मधल्या सारखी तीनही वेळा बसमधल्या यच्चयावत गोष्टींनी जागा सोडली! माझ्या स्टॉपवर उतरल्यावर मी हात जोडले देवाचे आभार मानायला!

आवडला लेख. शेवटचा पॅरा तर आमच्या बरोबर पण घडला होता. २ - ३ मुनी जागा नाही म्हणत निघूनच गेल्या. त्यापेक्षा त्या केबलकार आवडल्या पण.

मुनी द ग्रेट!
अमेरीकेचा वारीत असे अनुभव मी पण घेतले आहेत. न्यूयॉर्क-न्यूजर्सीची पाथ आणि सॅन फ्रान्सिस्कोची बार्ट हे आणखीन वेगळंच रसायन आहे!

ह्या मुनींचा आणि त्यांच्या चालकांच्या सार्वभौमत्वाचा जन्म पुण्यातला आहे का ? आपल्या इथे पी. एम. पी. एम. एल मधला थाट असात असतो की... Wink बाकी तुम्ही लिहिता भारी खुसखुशीत !!!

पी. एम. पी. एम. एल च्या चालकांना इंपोर्ट केले वाटतं सॅन-फ्रॅनात

ह्या मुनींचा आणि त्यांच्या चालकांच्या सार्वभौमत्वाचा जन्म पुण्यातला आहे का ?

Lol

न्यूयॉर्क-न्यूजर्सीची पाथ आणि सॅन फ्रान्सिस्कोची बार्ट हे आणखीन वेगळंच रसायन आहे! >>> अनुभव शेअर करा ना प्लीज. न्युयॉर्कला जाताना मनाची तयारी करून जाऊ.

"कोणाकडे बॉटल ओपनर आहे का?"

डकाँव-डकाँव करत
हा हा हा

मस्त खुसखुशीत लेखन.
आवडले.
अगदी अनुभव घ्यावासा वाततोय याचा Lol