श्रीमती रोहिणी हट्टंगडी - 'मित्राची गोष्ट'

Submitted by चिनूक्स on 20 August, 2009 - 03:00

तेंडुलकर एका साप्ताहिकात कार्यकारी संपादक होते तेव्हाची गोष्ट. पुलं त्याच साप्ताहिकात एक सदर लिहीत असत. एकदा ते आपल्या एका मित्राला घेऊन तेंडुलकरांच्या कचेरीत गेले. मित्राची ओळख करून दिली - हा वसंता सबनीस. कविता करतो. पण मर्ढेकरांसारखा कवडा नव्हे, कवी आहे. तेंडुलकरांना मर्ढेकरांबद्दलचे हे अपशब्द खटकले नाहीत. पुढे पुलं आणि सुनीताबाईंनी मर्ढेकरांच्या कवितांचं जाहीर वाचन केलं. काव्यवाचनाचा हा कार्यक्रम बराच गाजला. तेंडुलकरांनीही पुलंच्या या कार्यक्रमाबद्दल लिहिलं. मर्ढेकरांच्या कवितांबद्दल लिहिलं. तेंडुलकर लिहितात - मर्ढेकर तेच होते. त्यांच्या कविताही त्याच होत्या. काळातल्या अंतराने आम्ही बदललो होतो.

गेल्या वर्षी डॉ. श्रीराम लागूंनी मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी मर्ढेकरांच्या कवितांचं वाचन केलं होतं. इंदिराबाई संत, पु. शि. रेगे, आणि मर्ढेकरांच्या त्यांना आवडलेल्या कविता वाचायच्या असं ठरलं होतं. हे तिन्ही कवी डॉक्टरांचे अतिशय लाडके. फार पूर्वी डॉक्टर, शांताबाई शेळके आणि मंगेश पाडगावकर काव्यवाचनाचा एक कार्यक्रम करीत. डॉक्टरांच्या आवडत्या कविता ते वाचत, आणि शांताबाई, पाडगावकर त्या कवितांचं रसग्रहण करीत. हे खाजगी कार्यक्रम बरेच गाजले होते. पण दुर्दैवानं या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण केलं गेलं नव्हतं. दिवाळी अंकाच्या निमितानं या कविता परत भेटतील, आणि त्यांचं ध्वनिमुद्रण करता येईल, असं डॉक्टरांना वाटलं, आणि ते अतिशय उत्साहानं तयारीला लागले. कविता निवडल्या, आणि जवळजवळ पंधरा दिवस रीतसर तालीमही केली. प्रकृतीचा त्रास विसरून डॉक्टर रोज आवाजाचे व्यायाम करत. रोज दुपारी चार वाजता मी डॉक्टरांकडे जात असे. त्या दिवसासाठी ठरवलेल्या कविता काढून डॉक्टर त्या कवितांबद्दल बोलत. आवाजात थरथर जाणवू नये, म्हणून डॉक्टर प्रत्येक कविता मोठ्याने दोनदोनदा वाचत. 'तुझं समाधान होतंय का? आवाज व्यवस्थित वाटतोय का?' असं विचारून मला ओशाळं करत. ते तीन आठवडे माझे मोठे मजेत गेले. डॉक्टरांकडून त्यांच्या आवडत्या कवींबद्दल, कवितांबद्दल भरपूर ऐकायला मिळालं. विशेषतः मर्ढेकरांबद्दल. तेंडुलकरांनी 'तें दिवस' या पुस्तकात लिहिलेला हा पुलंचा किस्साही डॉक्टरांकडूनच मी ऐकला होता. महाराष्ट्रीय वाचक, राजकारणी व साहित्यिकांमुळे विकल झालेल्या मर्ढेकरांबद्दल बोलताना डॉक्टर विद्ध होत. त्यांच्या कवितांचं ते बारकं पुस्तक हाती घेऊन म्हणत, 'याची किंमत आपल्या लोकांना फार उशीरा कळली.. असं नको होतं व्हायला..'

मर्ढेकरांनी आयुष्यात भरपूर सोसलं. त्यांच्यावर खटले भरले गेले. त्यांच्याविरुद्ध ठराव मांडले गेले. मोर्चे काढले गेले. बहुतेक सर्व साहित्यिक त्यांच्या नालस्तीत सामील झाले. १९४९ साली पुण्याला साहित्य संमेलन भरलं होतं. आचार्य जावडेकर अध्यक्ष होते. मर्ढेकर आणि त्यांच्या कविता हाच विषय संमेलनात चघळला जात होता. अत्रे, वि. द. घाटे यांसह तमाम साहित्यिकांनी मर्ढेकरांवर अतिशय औचित्यहीन, निरर्गल अशी टीका केली. मर्ढेकर त्या संमेलनाला उपस्थित होते, आणि त्यांच्या उपस्थितीतच हा बीभत्स प्रकार सुरू होता. ते कमालीचे दुखावले गेले होते.

मात्र, या संमेलनात आचार्य भागवतांनी मर्ढेकरांच्या नवकवितेचं समर्थन केलं. या ज्येष्ठ गांधीवाद्यानं केलेलं दहा मिनिटांचं भाषण बरंच गाजलं. आचार्य आपल्या भाषणात म्हणाले, 'तुम्ही जे लिहिता आहात ते फार मोलाचं आहे. मानवी जीवनाचा अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेला अतिशय अर्थपूर्ण अनुभव व्यक्त करणारं आहे. जीवनाचा जो अनुभव तुम्ही घेतला असेल किंवा आत्मसात केला असेल तो व्यक्त करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हांला आहे आणि तुम्ही ते घेतलं पाहिजे. तुमचं ते कर्तव्यच आहे. तुमच्या अंतःकरणाला सत्य जसं प्रतीत होत असेल तसं तुम्ही व्यक्त करा. त्याला जी भाषा आणि जे रूप स्वाभाविक आणि अपरिहार्य वाटेल, ती भाषा व ते रूप आपल्या लेखनात वापरा. मग कोणी काहीही म्हणो. माणसांना सत्य निडर डोळ्यांनी पाहवत नाही. विशेषतः ते जर आपल्या आत्म्याच्या विरूपाचं दर्शन घडवीत असेल तर माणसं दचकतात, हादरून जातात, क्रुद्ध होतात, आणि त्या सत्याचा नाश करू पाहतात; निदान त्या सत्याचं दर्शन घडवू पाहणार्‍या द्रष्ट्याला नष्ट करू जातात. त्यांच्या क्रोधाला न घाबरता आणि सत्यदर्शनाची पडेल ती किंमत देऊन तुम्ही आपली जाणीव प्रामाणिकपणे व्यक्त केली पाहिजे. बाह्यतः विद्रूप व विदारक भासणारं सत्याचं रूप अंतिमतः सुंदर व मंगलच असेल.'

दोन महिन्यांपूर्वी डॉक्टरांशी तेंडुलकरांबद्दल बोलताना आचार्य भागवतांचं हे भाषण आठवलं. मर्ढेकरांप्रमाणेच तेंडुलकरांनाही आपल्याला लेखनाची किंमत चुकवावी लागली. लोकांनी मोर्चे काढले, शिव्या दिल्या. कर्तारसिंग थत्त्यांनी त्यांना काठीनं झोडपलं. मर्ढेकरांपेक्षा तेंडुलकर तसे भाग्यवान. तेंडुलकरांच्या नाटकांच्या मागे कमलाकर सारंग, डॉक्टर लागू, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, डॉ. जब्बार पटेल ठामपणे उभे राहिले. शांताबाई शेळके, सरोजिनी बाबर सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या असूनही तेंडुलकरांच्या बाजूने उभ्या राहिल्या. सेन्सॉर बोर्डाविरुद्धच्या मोर्च्यांत, आंदोलनांत दुर्गाबाई हिरीरीने सामील झाल्या. पण तरी, मर्ढेकरांच्या कवितांचा नंतर झालेला गौरव तेंडुलकरांच्या नाटकांच्या वाट्याला फारसा आला नाही.

मर्ढेकरांवर दाखल केला गेलेला खटला, साहित्यिकांनी, समाजाने घेतलेली भूमिका आणि आचार्य भागवतांचं भाषण या तिन्ही गोष्टी तेंडुलकरांच्या नाटकांचा विचार करताना फार महत्त्वाच्या ठरतात. मर्ढेकरांनी, तेंडुलकरांनी दाखवलेलं सत्य समाजाच्या पचनी पडण्यासारखं नव्हतं. किंबहुना, गैरसोयीचं असलेलं सत्य हे नाकारलं जातंच. समाजमन बोथट झालं की मग उलट ते सत्य समोर आणणार्‍यालाच फटके देता येतात.

तेंडुलकरांची नाटकं पाहून समाज चिडला तो म्हणूनच. 'घाशीराम कोतवाल', 'सखाराम बाइंडर', 'गिधाडे' या नाटकांवर याच कारणास्तव प्रचंड टीका केली गेली. 'बेबी' आणि 'मित्राची गोष्ट' ही तेंडुलकरांची दोन नाटकं मात्र या समाजक्षोभातून कशी वाचली, याचं कधीकधी आश्चर्य वाटतं.

'मित्राची गोष्ट' हे नाटक म्हणजे दोन मैत्रिणींच्या समलिंगी अनुभवांची कहाणी. समलिंगी सहवास आणि त्यातून निर्माण होणारी भयाण शोकांतिका मराठीत प्रथमच इतक्या विस्ताराने आली. हा वेगळा असलेला नाट्यविषय तेंडुलकरांनी अतिशय गांभीर्याने हाताळला. सुमित्रा, म्हणजे मित्रा आणि नमा या मैत्रिणी. एका पुरुषाला स्त्रीबद्दल जे जे काही वाटू शकतं, म्हणजे संरक्षण करण्यापासून ते शरीरसुखाच्या ओढीपर्यंत, ते सारं मित्राला नमाबद्दल वाटू लागतं. दोघी जवळ येतात. पण समाजाची अशा संबंधांना मान्यता नव्हती, नाही. मित्राची प्रचंड घुसमट होते, आणि शेवटी सर्व संपवण्यावाचून तिच्यासमोर अन्य कुठला पर्याय उरत नाही.

'मित्राची गोष्ट' तेंडुलकरांनी ७४-७५ साली लिहीलं असावं. समलिंगी संबंधांबद्दल उघड बोलणं तेव्हा शिष्टसंमत नव्हतं. 'असल्या घाणेरड्या सवयी' असलेली लोकं गपगुमान घुसमटत राहत. समाजात सर्वत्र केवळ मंगल, उदात्त तेच असल्यामुळे आपण समलिंगी संबंध ठेवतो, हे कोणाला आणि कसं सांगणार? अशा परिस्थितीत तेंडुलकरांनी हे नाटक लिहीलं, आणि १९८१ साली शिवाजी मंदिरात नाटकाचे पंचवीसेक प्रयोगही झाले. नाटकावर टीका झाली नाही, तरी ते कुणी उचलूनही धरलं नाही. या विषयाबद्दल बोलायचं कसं, असा प्रश्न कदाचित लोकांना पडला असावा.

काही दिवसांपूर्वी कोर्टाने समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता दिली, आणि तेंडुलकरांनी नाटक लिहिल्यानंतरच्या काळात समाज अजूनही सद्गुणी, निरलस, निष्पाप इत्यादी राहिला असल्याची खात्री पटली. 'घाणेरड्या सवयी' असलेल्या लोकांना झोडपून काढण्याची, बहिष्कृत करण्याची भाषा केली गेली. मध्यमवर्गीयांच्या लाडक्या वृत्तपत्रांनी भंपक, बिनडोक लेख छापून आणले. तेंडुलकर काळाच्या खूप पुढे होते, हे पुन्हा एकवार लख्खकन जाणवून गेलं.

अर्थात, तेंडुलकरांनंतर समलिंगी संबंध कथा, कादंबर्‍या, नाटक-सिनेमांत अधूनमधून डोकावले. सचिन कुंडलकर यांची 'कोबाल्ट ब्लू' ही कादंबरी, 'द बाथ' हा लघुपट, आणि 'छोट्याशा सुट्टीत' हे नाटक समलिंगी संबंधांबाबत अतिशय जबाबदारीनं भाष्य करण्यात यशस्वी ठरले. काही वर्षांपूर्वी आयएनटीच्या नाट्यस्पर्धेत सादर झालेलं 'अर्धूक' ही एकांकिकाही समीक्षकांनी उचलून धरली होती. आर. राज राव यांच्या कथाही त्यादृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या होत्या. एरवी बहुसंख्य भारतीय नाटकांत, चित्रपटांत समलैंगिक व्यक्तींचं अतिशय एकांगी व अनेकदा विकृत चित्रण केलं गेलं.

वेगळी कृती करणार्‍यांना, वेगळा विचार करणार्‍यांना आजही समाजात जागा नाही. एखादी व्यक्ती जानवं घालते की तिची सुंता केली आहे, ती शय्यागृहात स्त्रीबरोबर झोपते की पुरुषाबरोबर या अतिशय खाजगी बाबींत समाज हस्तक्षेप करतो. माणसाचं माणूसपणच समाज नाकारतो. त्याला माणूस म्हणून त्याचं जीवन त्याच्या पद्धतीनं जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे समाज लक्षातच घेत नाही. वेगळे विचार ऐकून घेण्याचीच मुळी समाजाची तयारी नसते. मग ते समजून घेण्याची बातच सोडा. फारसं इतर काही कर्तृत्व नसल्यामुळे धर्म, जात, प्रांत यांचा अभिमान बाळगतो. आपण मोर्चे काढून पुस्तकं जाळतो, सभा-संमेलनं उधळतो, विचार आवडले नाहीत तर सरळ तोडफोड करतो. यामुळे होतं काय की, वेगळा विचार, वेगळी कृती करू पाहणारेही झुंडशाहीच्या भयानं तोंड उघडू धजावत नाहीत. परकीयांविरुद्ध लढणं सोपं, स्वकीयांविरुद्धचा लढा कठीण असतो.

मर्ढेकर, तेंडुलकर यांनी दाखवलेलं वास्तव स्वीकारण्याची आजही समाजाची फारशी तयारी नाही. काळाच्या अंतरानं समाज अजूनही बदललेला नाही.

rohini.jpg

श्रीमती रोहिणी व श्री. जयदेव हट्टंगडी यांनी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. काबुकी, यक्षगान यांचं सादरीकरण करणार्‍या रोहिणीताई पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या. 'अपराजिता' 'हिंदुस्तानी' , 'रथचक्र', 'होरी, 'कोहरा', 'कुत्ते', 'कमला' यांसारख्या हिंदी, मराठी भाषांतील असंख्य नाटकांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षक व समीक्षकांनी वाखाणल्या. रोहिणीताईंची चित्रपटक्षेत्रातली कारकीर्दही लक्षणीय आहे. 'गांधी' चित्रपटांत त्यांनी साकारलेली कस्तुरबांची भूमिका जगभरात गाजली. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा 'बाफ्ता' पुरस्कार मिळाला. 'पार्टी' चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'अर्थ', 'सारांश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'प्रतिघात', 'अग्नीपथ' इत्यादी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

या ज्येष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्रीनं 'मित्राची गोष्ट' या नाटकात मित्राची भूमिका साकारली होती. या नाटकाबद्दल व मित्राच्या भूमिकेबद्दल बोलत आहेत श्रीमती रोहिणी हट्टंगडी...

------------------------------------------------------------------------------------

pages 085.jpg

'मित्राची गोष्ट' - श्री. मंगेश कुलकर्णी व श्रीमती रोहिणी हट्टंगडी

खूप वर्षांपासूनची इच्छा होती... अगदी कॉलेजात असल्यापासूनची.. श्रीमंत, रात्रसारखी तेंडुलकरांची नाटकं केल्यापासूनची.. की तेंडुलकरांचं नवीन, इतर कोणीही न केलेलं नाटक करावं. आणि सत्तावीस वर्षांपूर्वी तसा योग आला. विनय आपटे मित्राची गोष्ट नावाचं नाटक घेऊन आला, करायचंय म्हणून. नाटक वाचलं. खूप आवडलं. विषय नवा आणि वेगळा - सहज पचनी न पडण्यासारखा. मध्यवर्ती व्यक्तिरेखा सुमित्रा लेस्बियन आहे. ही भूमिका म्हणजे माझ्यासाठी एक आव्हान आणि संधी.

सुमित्राचं, म्हणजे मित्राचं, वेगळेपण हाच या नाटकाचा गाभा. तिच्या अवतीभवती असणारे, वावरणारे लोक यांच्या तिच्याबद्दलच्या प्रतिक्रिया. तिचा दोस्त, तिची प्रेयसी, त्या प्रेयसीचा मित्र- अर्थात 'मित्रा'चा rival, मित्रावर जीव टाकणारा एक मुलगा अशा प्रातिनिधिक व्यक्तिरेखांमधून एकूण समाजाची प्रतिक्रिया दाखवली आहे आणि त्यातून शेवट - जो अटळ आहे.

विनयनं कामं करायला मंगेश कुलकर्णी, उज्ज्वला जोग, सतीश पुळेकर, तो स्वत: आणि मी - मित्रा, अशी निवड केली होती. टीम तर छान जमली होती. पण आम्ही सर्व जणच तशी नवीन नसलो तरी...नवीनच. खूप थोडा अनुभव गाठीशी असलेली. विनयनं सांगितलं, पहिला अंक बसल्यावर तेंडुलकरांची तो पाहायची इच्छा आहे. मगच पुढचं नाटक बसवायचं! थोडं विचित्र वाटलं - इतका आमच्यावर विश्वास नाही का, असंही वाटलं. आता लक्षात येतं की, अशा वेगळ्या धाडसी विषयावरचं नाटक वाईट किंवा misinterpret होऊन चालणार नव्हतं, म्हणून ती सावधगिरी होती. पहिला अंक बसल्यानंतर तेंडुलकरांना बोलावलं. आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिला.

खरं म्हणजे नाटकामध्येच तेंडुलकरांनी मित्राला इतकं छान रंगवलंय की आणखी अभ्यासाची गरजच नव्हती. परंतु तरी आणखीही काही उकल होईल म्हणून lesbianism वाचन केलं. फारसे संदर्भ जरी उपलब्ध नसले, तरी मी विज्ञानाची विद्यार्थिनी होते, आणि समलिंगी संबंधांबद्दल बर्‍यापैकी वाचन केलं होतं. मानसोपचारतज्ज्ञांना भेटले होते. तेंडुलकरांनी नाटक लिहिण्यापूर्वी संशोधन केलंच असणार. नाटकाच्या सुरुवातीला मित्राच्या तोंडी एक मोठा परिच्छेद आहे, तिला ती समलैंगिक आहे, हे कसं व कधी लक्षात येतं याविषयीचा. या स्वगतावरून तिची मानसिक अवस्था, तिनं स्वत:ला स्वीकारणं हे सगळं लगेच लक्षात येतं. आणि तेंडुलकरांना मित्रा किती खोलवर कळली आहे, हेही लक्षात येतं. नाटककाराला नक्की काय सांगायचं आहे, हे कळल्यावर अनेक गोष्टी सोप्या होतात. मग इतर काही अभ्यास करावा लागत नाही. नाटककारानं नाटकात काय सांगितलं आहे, हे पुरेसं असतं. नाटककारानं नाटकात त्याला काय सांगायचं आहे ते लिहिलेलं असतं, आणि अभिनेत्यानं ते समजून घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असतं. त्यामुळे नाटककाराला अभिप्रेत असलेली व्यक्तिरेखा नेमकी कशी असेल, हे अगोदर अभ्यासावं लागतं. ती व्यक्तिरेखा कशीही बरीवाईट असली, तरी अभिनेत्यानं बाजू घ्यायची नसते. मी खलनायिका जरी साकार करत असले, तरी ती बाई खलनायिका का झाली, हा माझा पहिला प्रश्न असतो. त्यामुळे कदाचित मी मित्राच्या भूमिकेला न्याय देऊ शकले असेन.

या समलिंगी आकर्षणाचे प्रकार दोन - एक परिस्थितीमुळे निर्माण झालेलं आणि एक शारीरिक hormonal imbalanceमुळे निर्माण झालेलं. मित्रा दुसर्‍या वर्गात मोडते. आजूबाजूला पाहत मोठी होत असताना स्वत:चं वेगळेपण तिला जाणवतं. एका मर्यादेपर्यंत ती ते स्वीकारते. परंतु नंतर मात्र त्याच्या काहीशी आहारी जाते. कारणं अनेक -तिचा स्वभाव हट्टी, मनात आलं की ते करून दाखवणारी, समाजाचा विरोध आणि त्याविरुद्धचं बंड. तिला समजून घेणारा, आवडत नसूनही तिला मदत करणारा बापू मात्र सतत आजूबाजूला असतो.

बापू आणि मित्रा या दोघांचं नातं विलक्षण आहे. अगदी त्यांच्या पहिल्या भेटीपासून त्यांच्यामध्ये नातं जडल्यासारखं होतं. बापूचा साधासरळ स्वभाव आणि मित्राला जवळून पाहिल्यानंतर तिच्याबद्दलचं बापूचं मत, या दोन्ही गोष्टी तेंडुलकरांनी फ़ार सुरेख रेखाटल्या आहेत. नंतरच्या घटनांमधून हे नातं इतकं दृढ होत जातं की बापूशिवाय मित्रा आणि मित्राशिवाय बापू अपूर्ण राहिले असते, असं वाटतं. मित्रासाठी बापू हा एकच आधार असतो सर्व बाबतींत. ती त्याला आपलं वेगळेपण सांगते. बापू समजावून घेतो, घेण्याचा प्रयत्न करतो. ती त्याला नमाविषयीच्या आकर्षणाबद्दल मोकळेपणाने सांगते. नमाशी भेट घालून देण्यासाठी गळ घालते, खोली द्यायला सांगते. आणि अजिबात इच्छा नसूनही बापू मित्राला आपली खोली वापरायला देतो. बापूवर विसंबता येईल याची मित्राला खात्री आहे आणि मित्राला समजावलं तरी मित्रा ऐकणार्‍यांतली नाही, हे बापूला माहीत आहे. तिच्या मोठ्याने हसण्यामागे, प्रत्येक गोष्ट उडवून लावण्यामागे प्रचंड अस्वस्थता दडली आहे, हे तो जाणतो. मित्राच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर बापूही चारचौघांसारखा त्यामागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारण्यामागची काळजी, जवळीक ती जाणते आणि त्याला कारण सांगतेही.

तेंडुलकरांच्या बर्‍याच व्यक्तिरेखा - रात्रमधली 'ती', शांततामधली बेणारेबाई, गिधाडेमधली माणिक - एक प्रकारचं आवरण घेऊन वावरत असतात. हळूहळू हे आवरण उसनं आहे हे उकलत जातं, आणि ती व्यक्तिरेखा उकलत जाताना बघणं आणि साकारणं ही तेंडुलकरांच्या नाटकांमधली मजा आहे. इट इज अ ट्रीट.

मित्रा आणि बापूमध्ये भांडणं बरीच होतात. दिवसचे दिवस मित्रा भेटत नाही. बोलत नाही. परंतु शेवटी बापूकडेच येते, पैसे मागायला, काही अडचण असल्यामुळे. पण अडचण काय ते सांगत नाही. आणि बापूही मनात काही न धरता पैसे देतो. शेवटी नमाला तिच्या घरची मणसं लग्न करून देण्यासाठी कलकत्त्याला पाठवतात. नमाला वचन दिलं असूनही बापूला मित्राकडे ते बोलल्याशिवाय राहवत नाही. अगदी ती काय करेल हे जाणूनसुद्धा. आणि मित्रा कलकत्त्याहून परत आल्यावर त्यांची वादावादी होते आणि वरवर हे नातं तुटतं. पण संपूर्णपणे संपत नाही. नंतरच्या मित्राच्या स्वगतामध्ये असं लक्षात येतं की, मित्रा बापूला पूर्णपणे तोडू शकलीच नाही. तसं ती करू शकणारच नव्हती. कारण बापू तिची आई होता. मित्रा आईशी खोटं बोलली पण बापूशी ती खोटं बोललई नाही. मित्राबद्दल तिच्याचकडून खरं काय ते ऐकल्यावर बापूची अस्वस्थता वाढते, आणि एक दिवस तिच्या आत्महत्येची बातमी बापूला कळते तेव्हा तो अचानक गप्प होतो. उरते फ़क्त शांतता, आणि बापूचे हुंदके.

मित्रानं आत्महत्या करणं, हा शेवट आम्हांला फारसा पटला नव्हता. पण मित्राचा तसा शेवट होणं अपरिहार्य होतं. कारण परिस्थितीच तशी असते. समाजात समलैंगिक संबंधांना मान्यता नव्हती (अजूनही नाही), आणि त्यामुळे मित्रासमोर दुसरा पर्यायच उरत नाही. तरीही ती परिस्थितीशी जुळवून घेण्याचा एक क्षीणसा प्रयत्न करते. पांडेबरोबर ती फिरायला जाते. फुलाफुलांची साडी नेसते. ती एक 'उत्तम स्त्री' होण्याचा प्रयत्न करते. पण तिला अपयश येतं, कारण ती मुळात तशी नाहीच.

मन्या दळवी हा नमाचा प्रियकर. नमा आणि मित्रा एकत्र असताना तो अचानक येतो आणि अरेरावी करून, मित्राला घाणेरड्या शिव्या देऊन नमाला घेऊन जातो. या शिव्यांमुळे नव्हे, तर तो नमाला घेऊन गेला आणि ती गोगलगाईसारखी त्याच्या मागून गेली याचा मित्राला मनस्ताप होतो आणि ती हिंस्त्र बनते. शेवटी डोकं आपटून राग काढते स्वत:वरच. मन्या दळवीचं तिच्या मागे हात धुऊन लागणं, ती जाईल तिथे पत्र पाठवून किंवा स्वत:च जाऊन बभ्रा करीन म्हणून सांगणं, एका आसुरी आनंदात तिच्या निलंबनाची बातमी देणं, या सर्वांतून मन्या हा समाजाचा प्रतिनिधी वाटतो मला.

नमा प्रत्यक्षात मित्रात अडकलेली. सुरुवातीला मित्राचा सहवास आवडणारी, पण नंतर डोईजड होतेय, असं सांगणारी. मित्रा वाईट आहे, असंही तिला म्हणता येत नाही. कलकत्त्याला कायमची जाताना बापूला सांगायला येणारी बिच्चारी नमा!

मित्रा वेगळी असली तरी विकृत नाही. आणि तिचं वेगळेपण तिच्याकडे पाहून कसं कळणार? तिच्या मर्दानी रूपावर फिदा झालेला पांडे. मित्राशिवाय जगू शकत नाही, असं म्हणणारा. मित्रा 'तशी' आहे, हे कळल्यावर तडकाफडकी शहर सोडून थेट सैन्यात जातो, 'जगलो वाचलो तर भेटू' असा जीवावर उदार होऊन. परत आल्यावर मग तो अळवाच्या पानासारखा..

मित्रा मध्यमवर्गीय घरातली. तिच्या जीवनात वादळ येतं जेव्हा तिला आपण 'वेगळ्या' आहोत याची जाणीव होते तेव्हा. मग कॉलेजच्या नाटकाच्या निमित्तानं नमाशी भेट होते तेव्हा तिला नमाबद्दलच्या शारीरिक आकर्षणाची जाणीव होते. नमाला मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार असते. स्वत:ला मन्या दळवीपेक्षा कमी समजत नाही ती. नमा आयुष्यातून कायमची गेल्यानंतर शेवटी बापूशीही भांडण झाल्यानंतरची पोकळी ती सहन करू शकत नाही. आणि एखाद्या 'बाई'प्रमाणं आज हा पुरुष, तर उद्या तो, अशी वागायला लागते. नमाचं आयुष्यातून जाणं एकवेळ मित्रा सहन करू शकली असती, पण तिचा एकमेव आधार असलेला बापू गेल्यानंतर मात्र ती सैरभैर होते. आणि या एकटेपणातच आत्महत्या करते. आयुष्याशी तडजोड तिला करताच येत नाही.

कोणतीही व्यक्तिरेखा 'दिसते' कशी ते खूप महत्त्वाचं. मित्राची वेषभूषा ठरवताना तिनं साडी नेसावी की पँट-शर्ट असा उगाचंच एक विचार मनात आला. सबंध नाटकात स्थळाचा आणि काळाचा अतिशय ओझरता उल्लेख आहे. तशी सायकल स्टॆंड, टेकडी, कॅण्टीन, मैदान वगैरे स्थळं असली, तरी नाटक कोणत्या गावी घडतं याचा उल्लेख नाही. तशी फारशी गरजही नाही. परंतु एकदा बापूच्या बोलण्यात काळाचा उल्लेख येतो. 'पांडे गेला, युरोप इटलेला कुठेतरी. लढाई चालली होती तिकडे. कमिशन घेऊन गेला.'- असा. याचा अर्थ दुसर्‍या महायुद्धाच्या आसपासचा काळ असावा. आत्ताच्या काळातली गोष्ट असती तर पँट-शर्ट निश्चित होता. परंतु हा आहे दुसर्‍या महायुद्धाचा काळ, म्हणून साडी. तेंडुलकरांनाही साडीच अभिप्रेत होती, असं त्यांनी सांगितलं. आता ती नेसायची पद्धत थोडी पुरुषी वाटावी म्हणून संपूर्ण पदर कंबरेला खोचलेला ठेवला. ब्लाऊज स्टँड-कॉलरचे आणि लांब. खांद्याला शबनम, घट्ट एक वेणी, कुंकू नाही, दागिने नाहीत. हाताला फक्त घड्याळ. नमाशी भेट झाल्यावर साडीचा रंग गुलाबी. नाहीतर क्रीम कलर. आणि मधूनमधून सिगरेट ओढणं.

सिगरेट ओढण्यावरून आठवलं. या नाटकाच्या आधी मी कधी सिगरेट ओढली नव्हती आणि मित्राला तर सिगरेट ओढण्याची सवय होती. माझ्या अनुभवाप्रमाणे रंगमंचावर सिगरेट ओढणं एरवी सिगरेट न ओढणार्‍या कलावंताला जड जातं. त्यासाठी तालमीच्या पहिल्या दिवसापासून मी सिगरेट ओढण्याचा सराव करत असे. सुरुवातीला सिगरेट ओढणं म्हणजे नुसता धुरांड्यासारखा धूर सोडणं असे. काही दिवसांनी विनयने मला सांगितलं की, नाटकाच्या सुरुवातीला मित्राचं बापूबरोबरचं जे संभाषण आहे त्याच्या आधी तू सिगरेट ओढ आणि धूर तसाच तोंडात ठेवून बापूबरोबर बोलता बोलता आपोआप तोंडावाटे बाहेर येऊ दे. आणि त्याचा परिणाम अचूक झाला. पहिल्या प्रवेशापासून मित्राच्या सिगरेट ओढण्याच्या सवयीचा परिणाम मी देऊ शकले. पण त्यासाठी जवळजवळ महिनाभर मला दररोज एक याप्रमाणे सिगरेट ओढावी लागली!

मित्राचं अ‍ॅबनॉर्मल असणं, मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही की संतापणं, अस्वस्थ होणं या अवस्था दाखवण्यासाठी मी माझ्या हातांचा अधिक वापर केला. हाताची घडी घालून उभं राहणं अधिक पुरुषी वाटलं. अस्वस्थता दाखवण्यासाठी मी एका तळहातानं दुसरं कोपर सतत चोळत असे. अस्वस्थतेतली तीव्रता वाढली की त्यानुसार ही हालचाल अधिक ठसठशीतपणे होत असे. थोडी जास्त धारदार.

मित्राची गोष्टच्या तालमी चालू असताना एक अनुभव आला. तालमी पार्ल्याला असायच्या आणि मी दादरहून ट्रेननं पार्ल्याला जायची. मला दारात उभं राहायला खूप आवडतं - वारा अंगावर घेत. माहीमला बायकांच्या डब्यात एक हिजडा चढला. माझ्याच समोर दारात उभा राहिला. अगदी नेहमीचीच गोष्ट होती, परंतु खारला बायका चढता-उतरताना त्याच्याकडे अशा काही विचित्र नजरेनं पाहत चढल्या-उतरल्या! ती विचित्र नजर, त्यातला तो भाव मी त्रयस्थासारखी पाहू शकले. त्या भावानं मला मित्राबद्दल बरंच काही सांगितलं. मित्राही सगळ्यांपेक्षा वेगळीच ना? त्या दिवसापासून मित्रा माझ्या आणखी जवळ आली.

आजही मित्राची गोष्ट परत वाचताना असं जाणवतं की, काळाचे उल्लेख कमी केले तरी नाटक आजचं आहे. आजही समाजाची 'वेगळ्या' व्यक्तीबद्दल प्रतिक्रिया बदललेली नाही. असं ऐकलं होतं की, आम्ही हे नाटक ८१ साली करण्याआधी सात-आठ वर्षं लिहून पडलं होतं तेंडुलकरांकडे. त्यावेळी अशा गोष्टींबद्दल चारचौघात उल्लेख करणंही शिष्टसंमत नव्हतं, मग नाटकाची बातच सोडा. जेव्हा आम्ही केलं तेव्हाही 'असला कसला विषय?' किंवा 'फारच बोल्ड नाटक बुवा!' अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शिवाजी मंदिरात नाटकाचे पंचवीस प्रयोग केले, म्हणजे नाटक 'चाललं' नाही. 'प्रयोग मात्र उत्कृष्ट होतो', असं ज्यांनी बघितलं त्यांचं मत.

आज कदाचित हे नाटक लोकांच्या पचनी पडेल. कदाचितच. तेंडुलकरांची नाटकं नेहमीच काळाच्या पुढं धावणारी असतात...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्मय,
मुलाखत उत्कृष्टच.. त्या व्यक्तीमत्वाच्या छटा दाखवायचा प्रयत्न रोहिणी हट्टंगडींनी खूप पटेल असा मांडला आहे.

पण मला तुझं प्रास्ताविक भावलं रे!

*****
वेगळी कृती करणार्‍यांना, वेगळा विचार करणार्‍यांना आजही समाजात जागा नाही. एखादी व्यक्ती जानवं घालते की तिची सुंता केली आहे, ती शय्यागृहात स्त्रीबरोबर झोपते की पुरुषाबरोबर या अतिशय खाजगी बाबींत समाज हस्तक्षेप करतो. माणसाचं माणूसपणच समाज नाकारतो. त्याला माणूस म्हणून त्याचं जीवन त्याच्या पद्धतीनं जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे समाज लक्षातच घेत नाही. वेगळे विचार ऐकून घेण्याचीच मुळी समाजाची तयारी नसते. मग ते समजून घेण्याची बातच सोडा. फारसं इतर काही कर्तृत्व नसल्यामुळे धर्म, जात, प्रांत यांचा अभिमान बाळगतो. आपण मोर्चे काढून पुस्तकं जाळतो, सभा-संमेलनं उधळतो, विचार आवडले नाहीत तर सरळ तोडफोड करतो. यामुळे होतं काय की, वेगळा विचार, वेगळी कृती करू पाहणारेही झुंडशाहीच्या भयानं तोंड उघडू धजावत नाहीत. परकीयांविरुद्ध लढणं सोपं, स्वकीयांविरुद्धचा लढा कठीण असतो.
****
ब्राव्हो!

मायबोली जॉईन केल्याचं सार्थक वाटते जेव्हा असे लेख वाचण्याची सुसंधी मिळते. खुप खुप आभार चिनुक्स... लेख नेहमीप्रमाणेच खुप आवडला.

नाटककाराला नक्की काय सांगायचं आहे, हे कळल्यावर अनेक गोष्टी सोप्या होतात. मग इतर काही अभ्यास करावा लागत नाही. नाटककारानं नाटकात काय सांगितलं आहे, हे पुरेसं असतं>>> This is Tendulkar! Happy पुन्हा एकदा सलाम त्यांना!
धन्स चिनूक्सा..

चिनुक्स पुन्हा एकदा अप्रतिम.
प्रास्ताविक आणि रोहिणीताईंचे विचारही. (आताशा त्यांना, विनय आपटे, सतीश पुळेकर वगैरेंना टी.व्हीवर कधीमधी पाहून मात्र... असो. कृपया गैरसमज नसावा. त्यांचा लढा आम्ही दिला नाही. आम्हाला फुकटात बसून यांनी असे रोल्स का करावेत असं वाटायला काही जात नाही याचीही मला नम्र जाणीव आहे. तरीपण ४ बेक्कार रोल्समागे त्यांना त्यांच्या तोलामोलाचा एकतरी मिळावा अशी मनोमन सुप्त इच्छा आहे.)
ह्या नाटकाचं नावही ऐकलं नव्ह्तं आधी, हे कबूल करायलाच हवं.

मर्ढेकरांच्या कवितांचा नंतर झालेला गौरव तेंडुलकरांच्या नाटकांच्या वाट्याला फारसा आला नाही>>
मला वाटतं उलट तेंडुलकरांना मराठीच नाही तर भारतीय साहित्यात स्थान मिळालं. सगळे बिनीचे कलाकार, लेखक, नाटककार त्यांना गुरुस्थानी मानतात आणि त्यांच्या हयातीत त्यांना हा मान मिळाला- देरसेही सही पण दुरुस्त.

चिनूक्स प्रास्ताविक आवडलं. एकुणच ही पुर्ण सिरीज अतिशय दर्जेदार झाली आहे. तसच हे ईतर कुठल्याही साप्ताहिकात, वर्तमानपत्रात नसून मायबोलीवर वाचायला मिळतय याचे यावेळी समाधान वाटले.

खरच ही तेंडुलकर लेखमाला खूप सरस आहे. प्रस्तावना आणि हट्टंगडींचे भाष्य सुंदर.
असे काही नाटक लिहीले गेलय ते पण आपल्या जन्माच्याही आधी हे माहित नव्हते, आणि अजूनही जनमाणसात,परिस्थितीत फारसा खर तर काहीच फरक पडलेला नाही हे कश्याच द्योतक.

मस्त झालीय मुलाखत ! 'मित्राची गोष्ट' 'तेंडुलकरांच्या निवडक कथा' या पुस्तकात वाचलीय. नंतर या कथेचं नाटकात रुपांतर केलं का त्यांनी ? कथा तीच आहे पण कथेत मित्रा आत्महत्या करते असा शेवट नाहीये. kind of open ended शेवट आहे त्यात.

खूप छान आणि विचारप्रवण करणारी मुलाखत ! सर्वांनीच वाचावी अशी. ’ती’चं नाव ’मित्रा’ असणं ह्यातही तेंडूलकरांना काही सुचवायचं असेल का ??

बाप रे! तेंडुलकरांनी त्या काळात असल्या विषयावरचं नाटक लिहिलं होतं ?!

प्रास्ताविक आणि नंतरचा लेख दोन्ही छान.
(या मालिकेतला सखाराम बाईंडर वरचा लेख वाचताना(ही) ते नाटक अंगावर आलं होतं. या लेखाच्या आणि 'मित्राची गोष्ट'च्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. )

बाप रे!! काळाच्या किती पुढे होते तेंडुलकर!!
अत्ताच्या काळात असं नाटक आलं तरी समज रक्षक तुटून पडतील त्यच्यावर!!
रोहिणी हट्टंगडीना या भूमिकेत खरंच बघावंसं वाटतय.

सही लेख! धन्य्वाद चिन्मय.

Pages