ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2015 - 06:14

ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले .. ५ रुपये मे, १० रुपये मे .. गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

श्रावणातल्या एका शुक्रवारची रम्य दुपार. पावसाचे दाटून आलेले ढग, आणि मुंबई लोकल ट्रेनचा मोकळाढाकळा जनरल डबा.

आमच्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही फक्त तिघेच होतो.. मी, तो, आणि ती.. तिघेही एकेकटे.

ट्रेन सुटायला अजून अवकाश होता. म्हणून तो सावकाश पेपर वाचत होता, ती खिडकीबाहेर बघत होती, आणि मी कानाला हेडफोन लावून मोबाईलवरची गाणी ऐकत होतो.
फलाटावरचे कर्कश्य फेरीवाले आणि लाऊडस्पीकरमधून निघणार्‍या खणखणीत घोषणा, यापासून सुटका मिळवायला माझ्या हेडफोनचा वोल्यूम अंमळ जास्तच होता.

तो मनातल्या मनात पेपर वाचत असल्याने शांत. ती खिडकीबाहेर बघत कुठलेसे गाणे तोंडातल्या तोंडात, शेजारच्यालाही ऐकू जावू नये या आवाजात पुटपुटत असल्याने, थिएरीटकली ती देखील शांतच. एकंदरीत आसपासचे वातावरण शांतच.

अश्यातच तो आवाज, माझ्या हेडफोनच्या आवाजावर मात करत, कानात शिरला. कारण ते शब्दच असे होते की मी ऐकत असलेल्या गाण्याच्या लिरिक्समधूनही आपली जागा बनवत त्यांनी आत शिरकाव केला..

ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले .. ५ रुपये मे, १० रुपये मे .. गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

मी कानावरचा हेडफोन खेचूनच काढला आणि पुन्हा तो आवाज ऐकायला कान टवकारले.. अन लगेचच पुन्हा..
ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले .. ५ रुपये मे, १० रुपये मे .. गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

मी अविश्वासाने किंचाळलोच.. गर्लफ्रेंड !!

"हो, ना .. ते देखील ५ ते १० रुपयांत" समोरचा उत्तरला.

ही मध्यमवर्गीय माणसे देखील कमाल असतात. कुठलीही नवीन गोष्ट पाहिली की सर्वात आधी पैसे काय किती हेच यांच्या डोक्यात येते. पाच-दहाच्या जागी पाचशे-हजार असते तरी काही फरक पडणार होता का? असेही माझे पाच-दहा हजार रुपये आहे त्या गर्लफ्रेंडवरच दर महिन्याला खर्च होतात.

"ते ठिक आहे हो, पण गर्लफ्रेंड?? आय मीन बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडवाली गर्लफ्रेंड?? अशी ट्रेनमध्ये विकायला??"

... आम्ही दोघांनीही जे ऐकले ते बरोबरच होते हे कन्फर्म करायला वरच्या वाक्याचा शेवट त्या मुलीकडे एक नजर टाकत केला. तर तिच्या चेहर्‍यावरचे अनाकलनीय भाव बघून मला किमान याचे तरी आकलन झाले की आपण तिच्याकडे बघून चूक केलीय. घाईघाईत मी सारवासारव केली, "नाही नाही, म्हणजे मला नाही विकत घ्यायचीय, माझ्याकडे आहे एक गर्लफ्रेंड.." ईतक्यात आठवले, अरे गाढवा, एका मुलीला काय सांगतोयस हे.. अन लगेच बदल केला, "म्हणजे आधी होती एखादी, आता नाहीये, पण सहज असेच कुतूहल म्हणून..." ती ते न ऐकता पुन्हा खिडकीबाहेर बघायला लागली. तिचे पुटपुटणारे ओठ आता आणखी जोरात हलू लागले. कदाचित तिने गाणे चेंज केले असावे, आणि कुठलेतरी ईंग्लिश गाणे गायला लागली असावी, अशी मी स्वत:ची समजूत काढली.

ईतक्यात पुन्हा तोच आवाज,
"देख लो भाई, देखने का पैसा नही .. देखने का पैसा नही .."

आईच्या गावात! आता तर माझा संयमही सुटला .. मी तडक माझ्या सीटवरून उठलो आणि त्या आवाजाचा मागोवा घेऊ लागलो. आता तो आवाज शेजारच्या डब्यामध्ये पोहोचला होता. ट्रेन सुटायला किती वेळ शिल्लक आहे हे न पाहता आणि माझी बॅग आधीच्या डब्यातच राहिली याची पर्वा न करता मी शेजारच्या डब्यात धाव घेतली. इथेतिथे शोधू लागलो. डोळ्यासमोर एव्हाना कायच्या काय चित्रे उभी राहू लागली होती. पण ती प्रत्यक्षात आसपास अजूनपर्यंत तरी कुठेच दिसत नव्हती, अन ईतक्यात पुन्हा तोच आवाज... ए गर्लफ्रेंड ले ले.. गर्लफ्रेंड ले ले ..

वळून पाहिले तर एक पोरसवदा मुलगा.. शॉकिंग!
हा चिरकूट ?? वय काय याचे, आणि हा विकतोय गर्लफ्रेंड!! हातातल्या पिशवीत काय आहे त्याच्या.. फोटो अल्बम ??

एव्हाना त्यानेही माझ्याकडे पाहिले होते. आपले गिर्हाईक बरोबर ओळखल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर दिसत होता. पिशवीतली वस्तू बाहेर काढत त्याने माझ्यासमोर धरली, "गर्लफ्रेंड ले लो साहब.. वापर के देख लो.." असे म्हणत त्याने एक रफ नोटपॅड माझ्या हातात सरकावले. ते घ्यावे आणि त्याच्याच डोक्यात हाणावे असेच त्या क्षणाला मला वाटत होते. ईडियट्स, जेलपेन विकत होता..

- रुनम्या

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Lol Lol

रुण्मया भारी लिवलास रे...झक्कास जमलेय

फुकाचे नाही ते धागे काढण्यापेक्षा असे काही का लिहीत नाहीस.....

मस्त!

अहो प्रसाद, कल्पना नाही की तो फेरीवाला विक्रेता बोबडा होता, की त्याचा तो खास ठेवणीतील आवाज होता, की त्याला नेमका उच्चार माहीत नव्हता, की माझ्याच डोक्यात सारखे गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड चालू असल्याने माझेच कान जरा ईकडचे तिकडे वाजले.. पण आईशप्पथ ऐकू तेच येत होते. समोरच्या माणसाशी कन्फर्मही केले होते. ही निन्याण्णवे टक्के सत्यघटना आहे. श्रावण चालू आहे, हातात उदबत्ती घेऊन टाईप करतोय, खोटे नाही बोलणार Happy

की माझ्याच डोक्यात सारखे गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड चालू असल्याने माझेच कान जरा ईकडचे तिकडे वाजले
<<

चालायचेच, असुद्या. Happy

श्रावण चालू आहे, हातात उदबत्ती घेऊन टाईप करतोय, खोटे नाही बोलणार.
<<
खरं बोलाल हो. टायपिंगचं काय? Wink

मस्तं आहे.
उदबत्तीचं काय, मी तर ऋन्मेषचा धागा आला की आधी दिवे ओवाळते आणि मग वाचायला घेते.
त्यामुळे तेलातूपाचा खर्च वाढलाय आमच्याकडचा.
Happy

कप्पाळ! एकही नाही. मी बॉयफ्रेंड वापरतो ... आयमीन बॉलपेन वापरतो >>> हा हा हा!
मस्त हलकं फुलकं आहे...:) आवडलं

हाहाहा असं होऊ शकतं!
मी एकदा लोकलमध्ये स्वतः एका बाईला "नवरा" विकताना ऐकलंय आणि पाहिलंय! अर्थात चाणाक्षांनी ओळखलं असेलच की ती बाई नक्की काय विकत होती ते Wink

कप्पाळ! एकही नाही. मी बॉयफ्रेंड वापरतो ... आयमीन बॉलपेन वापरतो>> हा हा Happy

मला तर प्रसाद नंतरचे अभिप्राय वाचेपर्यंत कळले नाही की शेवट काय आहे तो.. Happy

मला तर कित्येक गाण्याचे शब्दच ऐकायला येत नाही Happy

मी एकदा लोकलमध्ये स्वतः एका बाईला "नवरा" विकताना ऐकलंय आणि पाहिलंय!
>>>
कही वो म्हावरा तर नाही विकत होती.
चुकूही शकते, कारण मी चाणाक्ष असलो तरी लेडीज डब्ब्यांचा अनुभव नाही Happy

बी,
तश्या चुकीच्या ऐकलेल्या गाण्यांचा वेगळा धागा आहे, आणि ते सर्वांचेच होत असावे.
पण हे चुकीचे गर्लफ्रेंड बोलणे वा ऐकणे नेमके माझ्याच बाबतीत घडावे यावे या कमाल योगायोगाने मला थक्क केले Happy

चांगलाय

पण ह्या वाक्याचा अर्थ नाही लक्षात आला 'एका मुलीला काय सांगतोयस हे.. अन लगेच बदल केला, "म्हणजे आधी होती एखादी, आता नाहीये, पण सहज असेच कुतूहल म्हणून..."

>>>>>पाच-दहा हजार रुपये आहे त्या गर्लफ्रेंडवरच दर महिन्याला खर्च होतात.<<

ऋन्मेष, एखादा मुलगा ( खास मुलगी मित्र असलेला) हे वाक्य वाचून जळेल, म्हणेल साल्याला फक्त इतकाच खर्च येतो?

तर ती 'खास मुलगी मित्र', सर्वांना आपल्यावरचा खर्च सांगत सुटलेला मुलगा पाहून फोडून काढावासं वाटेल.

Proud

>>>एका मुलीला काय सांगतोयस हे.. अन लगेच बदल केला, "म्हणजे आधी होती एखादी, आता नाहीये, पण सहज असेच कुतूहल म्हणून..."<<

हे मुलांच्या भाषेत, चान्स मारने के लिये क्या? :रागः

बाकी लेख बोरींग.... नुसता किस्स्यात टाकायचे ना इतकी राम कथा लिहिण्यापेक्षा.(त्यात गर्लफ्रेंडचा खर्च, ट्रेनमधली मुलगी तिचे कटाक्ष...) Proud

मनरंग धन्यवाद, झंपी यांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे.
पण झंपी चान्स वान्स कसला, माझी एकच ग’फ्रेंड आहे आणि मी तिच्याशीच प्रामाणिक आहे हे सर्वांना माहीत आहे इथे. त्यामुळे ते men will be men टाईपच्या विनोदातच घ्या. तसेही काल्पनिकच आहे तो भाग.

आणि तो खर्च खरा नाहीये. पाच-दहा, पाचशे-हजारला यमक जुळवत पाच-दहा हजार केले आहे. प्रेमात कसला पैश्याचा हिशोब. जेव्हा बॅलन्स झिरो होऊ लागतो तेव्हा मी तिला वॉर्निंग देतो ईतकेच Happy

बादवे, नुसता किस्स्यात टाकला असता तर नवीन धागा कसा निघाला असता, माझा आठवड्याचा/महिन्याचा कोटा असतो.
आणि तेवढाच किस्सा लिहत धागा काढला असता तरी वर तुम्हीच म्हणाला असता की चार ओळींचा किस्सा टाकून नवीन धागा काढला.
ईकडे आडोसा तिकडे विहीर, माणसाने करावे तरी काय..

ओह्ह .. ते नवरा होय .. हा हा .. हे ऐकलेय मी ऑफिसमध्ये बायकांच्या गप्पांत.. टिकली कोणाची हललेली असली की तुझा नवरा सरकलाय बघ Happy

फक्त जेलपेन च्या जागी गर्लफ्रेंड ऐकू आल ह्यावर एवढा मोठा काल्पनिक किस्सा
कहर आहे ……काम बीम करता का दिवसरात्र फक्त कोटा पूर्ण करायचा विचार

Pages