निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर...

Submitted by मार्गी on 20 August, 2015 - 22:03

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर...

...आज सगळीकडे पूर, भूकंप, लँड स्लाईडस, ढगफूटी, कोरडा दुष्काळ अशा बातम्या आहेत. निसर्ग सतत धोक्याचे इशारे देतो आहे. किंबहुना हे इशारे आता जास्त गंभीर होत आहेत. २०१३ मधल्या अनुभवांना सविस्तर सादर करण्याचं प्रयोजन हेच आहे की, त्यावेळी बघण्यात आलेल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी समोर ठेवाव्यात. तिथे मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणामुळे किती बदल होत आहेत, हे प्रकर्षाने कळालं. हे लेखन त्या वेळी लिहिलेल्या हिंदी ब्लॉगवर आधारित आहे. हे फक्त चौथ्या टीममधल्या एका गटाच्या अनुभवांचं वर्णन आहे. मैत्रीने नंतरही अनेक महिने तिथे सक्रिय काम केलं. आधी तीन टीम गेल्या होत्या; नंतरही सतत व्हॉलंटीअर्स बदलून जात राहिले. पुढच्या काळात पिंडर व्हॅलीमध्येही मैत्रीने मदत केली. सरांनी उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये जाऊन असेसमेंट केली. नंतरही मैत्री फॉलो अप करत राहिली. इथे सांगतोय ते कार्य मैत्रीच्या संपूर्ण मदतकार्याच्या केवळ एका छोट्या भागाविषयीचं आहे.


आंतरराष्ट्रीय सीमा!

... ३१ जुलैची रात्र धारचुलामध्ये काली गंगेच्या गर्जनेसह गेली. त्या दिवशी डॉक्टरांची टीम मनकोट व घरूड़ीवरून परतली होती. आज १ ऑगस्टच्या सकाळी ते आम्हांला इथेच भेटतील आणि सगळे मिळून तवाघाट व पुढे जाऊ. त्यामुळे मनामध्ये थोडी भितीसुद्धा आहे! घरूड़ीकडे जाताना होती तशाच स्वरूपाची वाट इथे असणार आहे. आणि भितीबरोबरच कुतूहलही आहे. आजचा मार्ग मानस सरोवर मार्ग आहे.

सकाळी साथीदारांना यायला थोडा वेळ होता. त्यामुळे नेपाळ जाण्याची संधी मिळाली. नेपाळ जाण्यासाठी दोन मिनीटं पुरेशी आहेत. समोर गर्जना करत असलेल्या काली गंगेवरचा पूल तर पार करायचा आहे. दोन मिनिट चाललो आणि पहिली विदेश यात्रा सुरू झाली! तांत्रिक दृष्टीने हा एक विदेश व वेगळा देश आहे. पण तसं कुठेच जाणवलं नाही. आंतरराष्ट्रीय सीमा एक रेषा आहे फक्त. नेपाळमध्ये पाच मिनिटांसाठीच गेलो. पण दिदींनी दारचुला दाखवलं. सकाळी दुकाने उघडलेली आहेत. अनेक लोक विदेशात आले आहेत आणि विदेशातून स्वदेशी जात आहेत! फक्त भाषा किंचित वेगळी दिसते आहे. एका जागी लिहीलं आहे- म्हारो अस्तित्व खतरामां छ। त्यावर एका वाघाचं चित्र आहे. वन्य संरक्षण प्रकल्प आहे. ते बघितल्यावर एक क्षण मनात भिती वाटली की, तवाघाटकडे जाताना नदी ओलांडताना माझीही ‘मेरो अस्तित्व खतरामा छ’ सारखी स्थिती तर नाही होणार! नेपाळी चहा आणि आतिथ्याचा आनंद घेऊन स्वदेशी परतलो. पहिली विदेश यात्रा संपन्न झाली!!


नेपाळ!

. . . तवा घाट! नकाशात दिसणारं छोटसं गाव. धारचुलावरून तवा घाट फक्त १९ किलोमीटर दूर आहे. पण आता रस्ता अनेक जागी तुटलेला आहे. म्हणून मध्ये मध्ये पायी पायी चालावं लागत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जीप चालवणारे लोक प्रत्येक तुकड्यामध्ये सेवा देत आहेत. धारचुलापासून थोड्याच अंतरावर जीपमधून उतरावं लागलं. रस्त्यावर बी.आर.ओ.चं काम सुरू आहे. मोठे मशीन्स रस्ते साफ करत आहेत. त्या वीरांना मनोमन प्रणाम करून पुढे पायी पायी निघालो. ही वाट सामान्यच होती. एक- दोन जागी मात्र अडचण झाली. परत रस्ता आला आअणि दुसरी जीप मिळाली. आता ही जीप दोबाटला सोडेल. आमची आजची संख्या अकरा आहे. त्यात अर्पणचे तीन सदस्य आणि गरगुवा गावाच्या सरपंच दिदीसुद्धा सोबत आहेत. सगळे लगेच जीपमध्ये बसलो. आज मित्र परत एकत्र असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. नदीसुद्धा खालून गर्जना करून सोबत देते आहे. आणि अशा वेळी जीपमध्ये गाणं!

खुलती फ़िजाएँ .. खुलती घटाएँ ..
सर पे नया है आसमाँ...
चारो दिशाएँ .. हंस के बुलाएँ ..
वो सब हुए हैं मेहेरबाँ..

आणि बरोब्बर हे गाणं संपल्यानंतर जीपसुद्धा थांबली. आता इथून पायी पायी जावं लागेल. इथे नजारा थोडा वेगळा आहे. एका छोट्या नदीच्या वरचा रस्ता पूर्ण तुटला आहे. त्यामुळे एका ठिकाणी त्या नदीला पायी पायी ओलांडावं लागेल. इथे बरीच अडचण आली. पण अनेक लोक पार करत आहेत. अनेक जण तर पाठीवर मोठं सामान वाहून नेत आहेत. सैनिकसुद्धा मदतीला आहेत. ह्या छोट्या नदीचा प्रवाह एका जागी अगदी अरुंद आहे. तिथे त्यावर लोखंडाची छोटी पुलिया दिसते आहे. तिथूनच जायचं आहे. आधीच्या अनुभवावरून शहाणं होऊन ह्या वेळी विचार बंद केले. जे आहे, ते आहे! विचार करण्यासारखं काही नाही. फक्त पुढे जायचं आहे. पण कसं जाणार? उतरताना पाय ठेवायलाही जागा नाही... पण साथीदारांच्या मदतीमुळे पाय चालत गेले. अर्पणच्या एका दादाची मदत घेतली आणि ती पुलिया ओलांडली. इथे पुलियावर हाताने धरण्यासाठी रेलिंग होतं. आणि ती पुलिया घरूड़ीच्या पुलियापेक्षा जास्त सुरक्षित होती. पुलिया ओलांडल्यानंतर थोडा सरळ चढ होता. तोसुद्धा पार झाला आणि परत पक्का रस्ता आला. आता परत जीप. तेवढ्यात कोणी तरी सांगीतलं की, धारचुलामध्ये मैत्री आणि गिरीप्रेमी संस्थांनी बनवलेला पूल तो हाच. स्थानिक लोकांचीसुद्धा ह्या पुलियामुळे बरीच सोय झाली.


मैत्री- गिरीप्रेमीने बनवलेली पुलिया

जीप चालवणारे लोक इंधनाचा काही जुगाड करत असले पाहिजेत. आणि ज्या परिस्थितीत ते जीप चालवत आहेत, ते बघता भाडं कमीच आहे. परत काही वेळ जीप. पण हा शेवटचा जीप टप्पा. आता जीप जिथे थांबेल, तिथून पायी पायीच जायचं आहे. तवाघाट फक्त दोन किलोमीटर आहे. तुटलेल्या रस्त्यावर जमेल तसं चालत राहिलो. पायवाट सोयीसाठी आहे; सुविधेसाठी नाही. आता तवा घाट येतं आहे. बी.आर.ओ. च्या तवाघाट केंद्रामध्ये झालेली हानी स्पष्ट दिसते आहे. आणि हा तवा घाट बोर्ड. बोर्ड तुटला आहे, पण अजून दिसतोय. पण फक्त बोर्डच दिसतोय. तवा घाट तर दिसतच नाही आहे. नकाशामध्ये तर इथे चांगलं गाव दिलेलं आहे... अजून पुढे गेलो. इथेसुद्धा एक धौली गंगा आहे. ही धौली गंगा आणि काली गंगाचा तवाघाटमध्ये संगम आहे. पण आता सर्व विनाशाच्या खुणा आहेत. काहीही वाचलेलं दिसत नाहीय. एक हिंमतवाले पहाडी चाचा दुर्गम जागेत एक धाबा चालवत आहेत. जवळच आणखी एक दृश्य आहे. सेनेचे जवान नदीवर ट्रॉली चालवत आहेत. संगम ओलांडून पुढे जाण्यासाठी ही ट्रॉली आहे. एका वेळी दोन लोक बसून जात आहेत आणि त्याला दो-यांनी ओढलं जात आहे.

तवा घाटच्या त्या ग्राउंड झिरोवर धाब्यापाशी सगळे जण एकत जमले. इथेच तवा घाटमधलं आरोग्य शिबिर सुरू झालं! रुग्णही येऊ लागले. बघता बघता पंचवीस रुग्ण तपासून झाले. तोपर्यंत बाकीच्या लोकांशी बोलणं झालं. अर्पणच्या दिदी डॉक्टरांना महिलांशी बोलताना मदत करत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे इथे महिला डॉक्टरांशी सहज बोलू शकतात. क्वचितच एखादी महिला बोलत नाही. तरीही महिला डॉक्टरांची अत्यंत आवश्यकता आहे. पुढच्या टीममध्ये महिला डॉक्टर असेल, असा प्रयत्न सुरू आहे. सुमारे दिड तास हे शिबिर चाललं.


उद्ध्वस्त तवा घाट


ट्रॉली. तवाघाटचा संगम


तांडव


आरोग्य शिबिर


खेलाकडे जाणारी वाट

आता इथून खेला नावाच्या गावात जायचं आहे. रस्ता विचारत विचारत जावं लागेल. आम्हाला डावीकडे वळून वर डोंगरावर जायचं आहे. त्यामुळे ट्रॉलीत बसण्याची संधी मिळाली नाही. संगमाच्या पलीकडे एक रस्ता वर जाताना दिसतोय. तो नारायण आश्रमाकडे जातो. पण आम्ही आता खेलासाठी डोंगराच्या पायवाटेने जातो आहोत. नदीची गर्जना ऐकू येतेय; पण ती आता थोडी दूर जाते आहे. थोडसं बरं वाटलं! पण ही वाटही कमी अवघड नाही. त्यावरही बरंच नुक्सान झालं आहे. थोड्या वेळाने पाय-यांची एक 'पगडण्डी' मिळाली. ही सरळ वर जाते आहे. इथे तीव्र चढाशिवाय अन्य कोणतीही अडचण नाही. मध्ये मध्ये एक- दोन जण भेटत आहेत. आता कडक ऊन सुरू झालं आहे.

ही वाट सतत वर चढते आहे. मध्ये मध्ये थोडा उतार मिळतो. मध्ये मध्ये थांबून पुढे निघतो. असे दोन तास चालत राहिल्यानंतर खेला गांव जवळ आलं. पण हा तर त्याचा तल्ला (खालचा भाग)! मल्ला खेला तर अजून पुढे आहे. सुदैवाने शिबिर इथेच घ्यायचं आहे. खेला गावामध्ये एका इंटर कॉलेजामध्ये शिबिराची तयारी सुरू केली. छोटसं आणि दुर्गम गाव असूनही इथे इंटर कॉलेज आहे. ग्रामस्थांना येतानाच शिबिराच्या आयोजनाची माहिती दिली होती. सर्व साथीदार चालून चालून थकले आहेत. एक- दोन जण सोडून! पण थोडा वेळ ब्रेक घेऊन शिबिर सुरू झालं. लोकही यायला लागले. इथे हिंदी सर्वांना चांगली येते. त्यामुळे भाषेची काहीच अडचण नाही. दोन्ही डॉक्टर रुग्णांची तपासणी करत राहिले. इतर सदस्य त्यांना मदत करत आहेत. पन्नासपेक्षा जास्त लोक आले. बाजूच्याच एका घरामध्ये सोबत घेतलेल्या मॅगीचा नाश्ता केला.

शिबिर संपण्याआधी काही जण पुढे निघाले. एका ग्रामस्थांच्या घरी बरीच चर्चा झाली. रेशनच्या स्थितीविषयी बोलणं झालं. तवा घाटमधून अशा गावांमध्ये रेशन कसं आणता येईल, ह्यावर बोलणं झालं. इथे खेलामध्ये रस्ता तुटल्यामुळे लोकांची अडचण झाली आहे. हे पाण्यापासून खूप वर असलेलं गाव आहे. पुढच्या काही गावांमध्ये लँड स्लाईडमुळे काही नुकसान झालं आहे. इथे सरकारी डॉक्टर क्वचितच येतो. आमच्या डॉक्टरांनी नंतर सांगीतलं की, एक डॉक्टर आलाही होता आणि तो शिबिर चालू असतानाच निघून गेला. असो. खेला गावामध्ये सगळे मुक्काम करणार नाहीत. एका गावावर ताण नको, म्हणून काही जण पुढच्या गरगुवा गावी जाऊ. गरगुवाच्या सरपंच आम्हांला वाट दाखवत आहेत. त्यांनी हे सांगीतलं की, ही वाट वळून वळून जाणारी आहे; त्यामुळे चढाची नाही.


खेलामधील शिबिर

संध्याकाळ होताना खेलामधून निघालो. तवा घाट सुमारे ९०० मीटर उंचीचं खेडं आहे. तिथून आम्ही दोन- अडीच तास सरळ वर चढत आलो. म्हणजेच खेलाची उंची‌ सुमारे २२०० मीटर असावी. नंतर ते कन्फर्म झालं. इथे हिवाळ्यात बर्फ पडतो. इथून आता ४००० मीटर उंचं‌ बर्फाच्छादित पर्वत दूर नाहीत. पण अजूनही ते ढगांआड लपलेले आहेत. खेलापासून पुढची वाट तिरपी तिरपी जाणारी होती. मध्ये मध्ये थोडा चढ आणि उतार. पुढे गेल्यावर परत नदीचा निनाद सुरू झाला. धौली गंगा! खाली एनएचपीसीचं युनिट आणि दूरवर धरणही दिसतं आहे. ही वाट कठिन नाही. वाटेत थोडेसे विद्यार्थी दिसतात. छोट्या छोट्या वस्त्या लागतात. रात्र सुरू होताना गरगुवामध्ये पोहचलो. इथेही एक प्रपात पार केला. त्यावर लाकडी पुलिया आहे. आता त्याची अजिबात भिती वाटली नाही. शरीर, डोळे आणि मनालाही सवय झाली आहे. आता पुढे इतकी अडचण शक्यतो येऊ नये. जसे गावात पोहचलो, तसा पाऊस सुरू झाला. ह्या कामामध्ये पाऊस मोठी मदत करतोय. बरोब्बर रात्री मोठा पाऊस येतो आणि सकाळी थांबतो.

गरगुवामध्ये सरपंच ताईंच्या घरी थोडा वेळ आराम केला. ह्या गावाच्या स्थितीची माहिती घेतली. लोकांनी याची देही याची डोळा बघितलेले अनुभव सांगितले. १६ जून ची ती काळरात्र... प्रचंड विनाशाच्या तांडवात ह्या धरणाचा पाया पक्का राहिला. सर म्हणाले की, जर तो पाया तुटला असता तर जौलजिबीसुद्धा वाचलं नसतं. रेशनाबद्दल चर्चा झाली. हेलिकॉप्टरमधूनही रेशन आणता येऊ शकतं. मनकोटच्या जवळ बंगापानीमध्ये हेलिकॉप्टरमधून रेशन दिलं जात आहे; इथेही काही गावांमध्ये दिलं जात आहे. हेलिकॉप्टरसाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. सरपंचांची एक वीरांगना संस्था आहे. कदाचित ते हे काम करू शकतील. सर्व पर्यायांवर चर्चा झाली. गावातल्या राजकारणाची झलकही बघायला मिळाली. लोकांना सगळं हवं आहे, पण स्वत: प्रयत्न करण्यासाठी कोणी तयार नाही. काही लोक तर संस्थेच्या कामाबद्दलही शंका घेत आहेत. अनेक वेळेस हेच दिसतं‌ ना की, कितीही काम करा, शेवटी लोक आपलंच खरं करतात. त्या वेळी सरांनी पहिल्या टीमने केलेलं काम सांगितलं. गरगुवा गावाच्या काही घरांमध्ये मैत्रीच्या पहिल्या टीमचे डॉक्टर आले होते. अर्पणच्या दिदींनीही काम कसं केलं आहे, हे लोकांना सांगितलं. ती रात्र गरगुवामध्ये गेली. जोरदार पाऊस चालू आहे. खेलामध्ये कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नाही. काही लोकांजवळ नेपाळी सिम आहेत. आणि इथून दूरवर नारायण आश्रमाकडे जाणारा रस्ताही दिसतोय. जर ढग नसते तर दृश्य आणखी अद्भुत दिसलं असतं. डॉक्टर आणि दोन साथीदार खेलामध्येच मुक्कामी आहेत.


स्वत:ची धुन गुणगुणणारा निसर्ग

 अधिक फोटोज आणि व्हिडिओज

मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net maitri1997@gmail.com.

पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users