निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...

Submitted by मार्गी on 18 August, 2015 - 21:53

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती...

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...


घरूड़ी गावातले हसरे चेहरे


येताना हीच 'पुलिया' बघता बघता पार झाली!!


गोरी गंगा नदी आणि तिचे रौद्र ताण्डव

... घरूडी़मध्ये आपदाग्रस्त गावांची स्थिती आतून बघता आली. पहाडी जीवन किती कठोर असतं, ह्याची झलक मिळाली. मनामध्ये परतीच्या मार्गात असलेल्या त्या धबधब्याची अणि नदीच्या वरून जाणा-या वाटेची भिती आहे. पण एक गोष्ट नक्की केली की, परत जाताना तिथे विचारच करायचा नाही. जशी‌ वाट असेल, चालत जायचं आहे. एक रात्र घरूड़ीमध्ये थांबल्यामुळे तिथल्या पुष्करजी‌ आणि गंभीरजींसोबत चांगली ओळख झाली.. ३० जुलैच्या सकाळी गावामध्ये काही ग्रामस्थ येऊन सरांना भेटले. काही तक्रारी सांगितल्या. काही लोक अशा वेळी आक्रमक प्रकारे बोलतात. मनकोटचेही एक ग्रामस्थ आले आणि त्यांनीही अडचणी‌ सांगितल्या व अनेक सल्ले दिले- गावात मीटिंग घ्यायला पाहिजे; सगळ्यांना विचारायला पाहिजे इ. इ. घरूड़ीचे ग्रामस्थही होते. पुढच्या कामाबद्दल चर्चा झाली. मैत्री अणि अर्पणच्या सदस्यांनी पुढचा कार्यक्रम सांगितला- इथे काही‌ दिवसांमध्ये रेशन वाटप करायचं आहे. डॉक्टर तर आजच येत आहेत. नदीवर छोटा पूल बनवण्याविषयीही चर्चा झाली. पण ते खूप कठिण आहे. चर्चेमध्ये हेसुद्धा कळालं की, घरूड़ी व मनकोटमध्ये पुलिया तुटल्यामुळे वरच्या वर्गातली मुलं शाळेत जाऊ शकत नाही आहेत. त्यामुळे काही मुलं भाड्याने लुमतीमध्ये राहून शाळेत जात आहेत. एक पुलिया तुटल्यामुळे इतका त्रास होतोय. छोट्या गावांमध्ये मुलांना भाड्याने राहायची वेळ येते, ह्याचं आश्चर्य वाटलं. हेसुद्धा कळालं की, घरूड़ी गावामध्ये विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यामध्येही ग्रामस्थांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी स्वत: त्यासाठी मेहनत केली‌ आहे.

सकाळी निघताना कळालं की, पावसामुळे पायवाट ओली झाली आहे. तरी निघालो आणि न थांबता जात राहिलो. फक्त प्रत्येक पाऊल टाकण्याआधी काळजीपूर्वक बघावं लागत होतं. ज्या प्रकारे आपण मोठ्या रस्त्यावर वाहन चालवताना सतत रस्त्यावर डोळे स्थिर ठेवतो, त्याच प्रकारे एक एक पाऊल बघून टाकावं लागत आहे. एक गमतीची गोष्ट अशी वाटली, की ह्या पायवाटेवर कोणतंही वाहन चालू शकत नाही. कितीही मोठं व शक्तीशाली असलं तरी इथे पायी पायीच जावं लागेल. आपली मोठी मोठी वाहनं सोडूनच इथे यावं लागेल. म्हणतात ना, ‘यहाँ न हाथी न घोडा है, बस पैदल ही जाना है!’ दुसरी गोष्ट म्हणजे जे आधुनिक तंत्रज्ञानाने बनवले गेलेले रस्ते होते- पक्के रस्ते आणि लोखंडी पूल इत्यादी- ते तुटले. पण त्याच्या आधीपासून जे प्रचलित होते- पायवाटा व दगडी पाय-यांच्या वाटा- ते अजूनही टिकून राहिले. किंबहुना अशा वाटाच आता बहुमोल सिद्ध होत आहेत. . .

येताना लाकडी पुलिया तर सहज पार झालीच; इतरही अवघड जागी विशेष अडचण आली नाही. एक तर सोबत बरेच स्थानिक लोक होते आणि शिवाय ठरवलं होतं की, विचार करणं थोडा वेळ बंद ठेवायचं. दिड तासामध्ये हुड़की गावामध्ये पोहचलो. हुड़कीला पोहचल्यावर एकदम बरं वाटलं. आता इथून पुढची वाट धरणीमातेसोबत! काही ग्रामस्थांशी पुन: चर्चा झाली. पीडित लोकांची माहिती घेतली. रेशनबद्दल चौकशी केली. नंतर हुड़कीचा लोखंडी पूल ओलांडला. तो अजूनही ठीक आहे. पुढचा वाळुतील वाट मात्र थोडा खराब झाली आहे. जौलजिबी- मुन्सियारी रोडपर्यंत जाणारी पायवाट मात्र जास्त बिघडली आहे. तिचा काही भाग तुटला आहे. ही वाट कधीही बंद होऊ शकते..


हुड़कीला लागून असलेला कालिका (चामी) लोखंडी पूल


पायवाटेची दशा!

रोडला पोहचताच डॉक्टरांची टीम भेटली. एक क्षण संभ्रम वाटला की, त्यांना ह्या वाटेविषयीचा खरा अनुभव सांगून सावध करू की जाण्यासाठी फक्त प्रोत्साहन देऊ? थोडक्यात त्यांना सगळी कहाणी सांगितली. शब्दांपेक्षा चेहरा जास्त बोलून गेला! त्यांनी सांगितलं की, त्यांचीही कालची वाट दुर्गमच होती. पहाडामध्ये गावाचे दोन भाग असतात- तल्ला आणि मल्ला. तल्ला भाग खाली असतो (तळाप्रमाणे) आणि मल्ला वर असतो. डॉक्टर आणि त्यांचे साथीदार काल चामी व लुमती परिसरातल्या गावांच्या 'मल्ल्यामध्ये' गेले होते. तल्लातर रोडला लागून असतो. पण मल्लावर जाण्यासाठी वर चालत जावं लागतं. डॉक्टर व अन्य मित्र तर आरोग्य शिबिरासाठी काही‌ सामान आणि औषधे घेऊनही गेले होते. आजही त्यांना अशाच दुर्गम वाटेवर जायचं आहे. त्यांच्या सोबतीला अर्पण सदस्य आणि काही ग्रामस्थ आहेत. थोडा वेळ बोलून त्यांचा निरोप घेतला.

त्याच ठिकाणी रोडवर अर्पणच्या सदस्यांनी कपडे वाटप केलं. अर्पणच्या दिदींची ग्रामस्थांशी चांगली ओळख आहे. प्रत्येकाची आवश्यकता लक्षात ठेवून त्या सर्व प्रकारचे कपडे देत होत्या. योग्य माहिती मिळावी म्हणून त्यांनी मिनी अंगणवाडी आणि एएनएमशी संपर्क केला होता. कपडे घेणा-यांमध्ये जास्त घरूड़ी, हुड़की आणि मनकोटचेच लोक आहेत. काही लोक तथाकथित उच्च जातीमुळे कपडे घेतही नाही आहेत. टीममधले काही सदस्य कपडे वाटपात मदत करत आहेत तर काही सदस्य ग्रामस्थांशी बोलत आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. अडचणींनुसार कामाचा प्राधान्यक्रम ठरत आहे. अर्थात् अर्पण आणि मैत्री टीमचा प्राधान्यक्रम वैद्यकीय सेवा आणि रेशन आहे. तरीही काही ठिकाणी लोकांना टर्पोलिन व टेंटस दिले गेले आहेत व पुढेही दिले जातील. इतरही अनेक जणांशी बोलणं सुरू आहे. होईल तितकी मदत दिली जाईल व तीसुद्धा थेट ग्रामस्थांनाच दिली जाईल.


कपडे वाटप सुरू आहे


नदीचा कहर

दुपारी चामीच्या पुढे लुमतीला गेलो. तिथे गंभीरजींनी एक जागा दाखवली- तिथे नदीचं पात्र थोडं अरुंद आहे. तिथे दोरखंड लावण्याविषयी चर्चा झाली. इथे विद्युत विभागाने लावलेली एक तारसुद्धा दिसते आहे. काल घरूड़ीमधून दिसणारा रस्ता हाच... इथेसुद्धा रोडचं खूप नुकसान झालं आहे. थोड्या थोड्या अंतराने बी.आर.ओ. काम करते आहे. त्यामुळे मध्ये मध्ये थांबत पुढे जावं लागत आहे. मुन्सियारी मार्ग ह्या बाजूने फक्त लुमतीपर्यंतच सुरू झाला आहे. पुढचा रस्ता अजून तुटलेलाच आहे. मुन्सियारीकडूनही ह्या बाजूचा रस्ता तुटलेला आहे. मुन्सियारी आता फक्त थल गावाच्या रस्त्याने पिथौरागढ़ला जोडलेलं आहे. हा रस्ता पुन: तयार व्हायला खूप वेळ लागेल...

जेव्हा लुमतीमध्ये थांबलो होतो, तेव्हा तिथली शाळा सुटली. कपडे वाटपामध्ये एका कुटुंबाच्या नात्यातला एक अनाथ मुलगा ह्या शाळेच्या वर्गात आहे. दिदींनी हे लक्षात ठेवलं आणि त्याला शाळा सुटल्यावर लगेच चांगले कपडे दिले. हे सगळे कपडे वापरण्याजोगे आहेत, हे आधीच तपासलं गेलं होतं. लुमतीमध्ये चहा पिताना शाळेतली मुलं परत जात आहेत. एका छोट्या परीचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. निसर्गाच्या जितकं जवळ जाऊ, तितकी निसर्गाची कृपा वाढत जाते. सौंदर्य निसर्गाचीच देणगी आहे. इथे एक गोष्ट हीसुद्धा बघितली की, कितीही लहान मूल असेल, ते स्वत:च आपल्या रस्त्यावर चालतं. शाळेतून घरी जाणारा मुलगा बहुतेक पहिलीतच असेल. पण तो एकटाच दूरवर असलेल्या घरी जातोय. अंतर एक- दोन किलोमीटर नक्कीच असेल. आणि घर शक्यतो डोंगरातच असणार. पण कोणालाही अडचण नाहीय. त्याच्या आई- वडिलांनाही काळजी नाही आणि त्यालाही. पहाडी मातीच अशी आहे...


एक तार पलीकडे गेलेली दिसते आहे.


लहानशी परी और पहाडचा राजकुमार

अनेक गोष्टी हळु हळु स्पष्ट होत आहेत... जमिनीवरच्या स्थितीचा थोडा थोडा अंदाज येतोय. अर्थात् अजून हा आपत्तीचा 'तल्ला' आहे; समोरून दिसणारा भाग. आपत्तीचा 'मल्ला' अर्थात् आतल्या गोष्टी तर बी.आर.ओ. आणि आर्मीच्या धुरंधरांना माहिती असणार.. रस्ता बनला तरी समस्यांचा अंत होणार नाही. रस्ता कधीही तुटू शकतो. किंबहुना तुटणारच. ग्रामस्थांनाही हे माहिती आहे.

त्यांना हेसुद्धा माहिती आहे की, भविष्यात त्यांना नदीलगतचं आपलं गाव- शेत- घरसुद्धा सोडावं लागणार आहे. पण उत्तर किंवा पर्याय कोणाकडेही नाही. देऊसुद्धा कोण शकतं? रस्त्यांचं ठीक आहे. रस्ते थोड्याच दिवसात सुरू होतील. पूलसुद्धा बनेल. पण जी शेती नष्ट झाली, जे लोक गेले, त्यांना कसं परत आणणार? पहाडामध्ये तशीही उपजीविकेची साधनं कमीच असतात. आता तर ती अजूनही कमी झालेली आहेत. आता जास्त रोजगार बांधकामाच्या कार्यातूनच तयार होणार. यात्रा व पर्यटन खूप प्रभावित झालं आहे. बांधकाम हाच एक सशक्त पर्याय आहे. त्यासाठीसुद्धा सरकारची इच्छा शक्ती हवी. पण एक मोठा प्रश्न हा आहे- बांधण्यात येणा-या इमारती, रस्ते व घरं टिकतील का? खरा प्रश्न हाच आहे की, ते किती दिवस टिकतील. आणि पहाड फोडून जो रस्ता बनवला जातोय, तो तर बनवता बनवताच त्याच्या कोसळण्याचाही पाया जणू घातला जातोय. कारण रस्ता बनवण्यासाठीसुद्धा पहाड तोडावा लागतो व तोडल्यामुळे तो अस्थिर होतो. त्याची स्थिरता जाते... अनेक ठिकाणी लँड स्लाईडची शक्यता दिसते आहे... त्या अर्थाने ही आपत्ती एक माध्यम आहे, ज्याद्वारे निसर्ग आपल्याला धोक्याचे इशारे देतोय की, आता तरी जागा हो! शुद्धीवर ये.


आपत्तीच्या मधोमध निसर्ग सौंदर्य


नदीचा बदलणारा प्रवाह आणि नदीने कापलेली जमीन


पहाडाचे भविष्य

... परतताना काही वेळ जौलजिबीमध्ये थांबलो. इथे कालीगंगेच्या पलीकडे सरळ नेपाळ दिसतोय. सीमा- मग त्या जिल्ह्याच्या, राज्याच्या किंवा देशांमधल्या असतील- फक्त कागदी रेषा आहेत हे जाणवत आहे. बघताना फरकच करता येत नाहीय की, भारत कुठे व नेपाळ कुठे. सगळं एक सारखं. तोच पहाड, तशीच झाडं व तोच निसर्ग.

प्रवासात अर्पणच्या दिदींशी गप्पा सुरू आहेत. आता त्यांच्याशी चांगली मैत्री झाली आहे. दुर्गम आडवाटेमध्ये त्यांनीच तर मदत केली ना! आमचे टीम लीडर जोशी सर त्यांचं वय, अनुभव आणि मोठेपणा बजूला ठेवून सगळ्यांसोबत हास्य- विनोद करत आहेत. अशा वातावरणातच टीम वर्क चांगलं होतं. सगळ्यांचा प्रयत्न एकरूप होतो. कोणी वेगळं राहात नाही. अर्पणच्या सगळ्या दिदी ह्या भागामध्ये काही वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचं कार्य खरं तर महिला सक्षमीकरण आहे, पण इतर विषयांचीही त्यांची समज मोठी आहे. त्यांचा लोकसंपर्क जोरदार आहे. सर्व दिदी पहाडाशी जोडलेल्या आणि पहाडासारख्याच कणखर आहेत.

हेल्पियाला पोहचल्यानंतर अर्पणच्या कार्यालयातले अन्य सदस्य भेटले. 'मैत्री' संस्था आणि आम्ही त्यांच्यापासून वेगळे वाटलोच नाही. सगळे चांगले मिसळून गेले आहेत. थोडा वेळ तिथे थांबून ओगलामार्गे मेर्थीला गेलो. मेर्थीमध्ये आय.टी.बी.पी. चं एक प्रशिक्षण केंद्र आहे आणि म्हणून तिथे एटीम मशीन सुरू मिळेल असं वाटलं होतं. जौलजिबी आणि अस्कोटमध्ये मशीन बंद होतं. मेर्थीमध्ये संध्याकाळच्या वेळेत तरुण मुलं रस्त्यावर पळताना दिसली. सुदैवाने अजून ह्या भागामध्ये टिव्ही आणि अन्य शहरी मायाजाल कमी असल्यामुळे लोक जुन्याच पद्धतीने विचार करतात आणि जगतात. लोकांना मिलिटरीचं मोठं आकर्षण आहे. इथल्या गावांमध्येही एक्स- सर्विसमेन बरेच आहेत. कदाचित त्यामुळेच ज्या ग्रामस्थांना भेटलो; त्यांची विचारकक्षा व्यापक होती.

मेर्थीमध्येसुद्धा एटीएम मशीन बंद आहे. आता तर डीडीहाट किंवा पिथौरागढ़ला जावं लागेल. कदाचित तिथे एटीएम सुरू तर असेल, पण ह्या कामासाठी जितके पैसे काढायचे आहेत, तितके उपलब्ध नसतील. कारण पहाड अगदी ग्रामीण पद्धतीने चालतो. इथले लोक एटीएममधून फार पैसे काढत नसणार. म्हणून कदाचित एटीएम बंद असावेत व त्यात पैसेही फार नसावेत. ह्यासाठी सरांनी एक उपाय शोधला. अस्कोटमध्ये एसबीआयमध्येच एक अकाउंट उघडायचं ठरलं. त्यातून पैसे काढता येतील. आपत्तीग्रस्त भागात मदत करताना येणारी हीसुद्धा एक समस्या.

... गावांमध्ये वाटपासाठी सुमारे तेरा टन रेशन पुण्यातून ट्रकने पाठवलं गेलं आहे. आता इथे काही खरेदी करायची आहे. त्यासाठीच बोलणं सुरू आहे. वेगवेगळ्या लोकांना रेटस विचारले जात आहेत. चांगल्या गुणवत्तेचं‌ रेशन कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायचं आहे. अस्कोट, पिथौरागढ़ आणि अन्य ठिकाणी भाव विचारले जात आहेत. काही लोकांनी सांगितलं की, टनकपूरसारख्या मैदानी भागातून स्वस्त रेशन मिळू शकेल, कारण इथे येणारं बहुतांश रेशन तिथूनच येतं व तिथेच मोठ्या मिल्स आहेत. सर्व पर्याय बघितले जात आहेत.

स्थानिक साथीदार त्यामध्ये मोठी मदत करत आहेत. ह्यामध्येही पहाडाची एक खास गोष्ट दिसते आहे. आम्ही जिथे जिथे जात आहोत- अस्कोट, जौलजिबी, बरम, ओगला, मेर्थी आणि आता मेर्थीनंतर सिंगाली- तिथे तिथे आमच्या ड्रायव्हर आणि अर्पणच्या अन्य सदस्यांच्या ओळखीचे लोक आवर्जून भेटतच आहेत. पहाडाची वृत्तीच एका छोट्या गावासारखी आहे. प्रत्येकाची नाळ दुस-यासोबत चांगली जुळलेली आहे. सिंगालीमध्ये रेशनचे दर विचारले. दुकानाचे मालक अनेक टन घेऊनही रेट कमी करायला तयार नव्हते. बहुतेक आपत्तीमुळे बाजारात तेजी आहे आणि त्यांना त्याचा फायदा करून घ्यायचा असेल. असो. अनेक लोकांकडून रेशनविषयी चौकशी सुरू आहे. लवकरच योग्य रेट व चांगल्या गुणवत्तेचं रेशन मिळेल. हे सर्व ठीक आहे. पण खरा प्रश्न हा आहे की, पहाड आणि तिथल्या लोक तिथे‌ टिकून कसे राहतील...


आशेचा किरण- झाडे आणि हिरवाई

 मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net maitri1997@gmail.com.

पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप माहितीपूर्ण लेख ,हा सुद्धा!!

खरोखरच पहाडी जीवन अत्यंत कठीण आहे हे हिमाचलात दोन महिन्यांच्या वास्तव्यात पुरेपूर जाणवले..

वीज, रस्ते इ. बेसिक सुविधा ही तिथे सहज मिळणं मुश्किलीचंच.. हेच आपलं प्रारब्धं म्हणून हे सत्य पहाडी लोकांनी

स्वीकारलेलं दिसतं.

बाकी ए टी एम बद्दल अगदी खरं म्हटलंयस.. मंडी सारख्या मोठ्या शहरातही एटीएम्स मधे खडखडाट्च होता.

खूप माहितीपूर्ण लेख ,हा सुद्धा!! >>>>+१०००

कपडे वाटप - या फोटोत पाठमोरे, जमिनीवर बसलेले श्री. शिरीश जोशीच दिसताहेत .... Happy

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! Happy

@ शशांक पुरंदरे- हो सर, ते शिरीष जोशी सरच आहेत. त्यांनी टीमला खूप जबरदस्त लीड केलं. तुमच्या ओळखीचे आहेत का? Happy धन्यवाद.

ते शिरीष जोशी सरच आहेत. त्यांनी टीमला खूप जबरदस्त लीड केलं. तुमच्या ओळखीचे आहेत का? >>>> हो, खूप वर्षांपासून आम्ही मित्र आहोत - पण पहिल्यापासूनच जोशींना ट्रेकिंग, समाजकार्य यातच रुची असल्याने वर्षा-वर्षात गाठ पडत नाही ..... Happy
नुकतीच या महिन्यात त्यांची गाठ पडली होती त्यावेळेस ते या मैत्री ग्रूप संबंधी सांगत होते ... Happy फारच उमदे व्यक्तिमत्व आहे जोशींचे - जगमित्र, सदैव हसतमुख, परोपकारी, व्यायामपटू, गिर्यारोहणाची आवड, अनेक खेळात उत्तम गती असे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे हे - असा मित्र लाभला याचा मला खूपच अभिमान आहे .. Happy