निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरी गंगेच्या काठावरती...

Submitted by मार्गी on 18 August, 2015 - 01:09

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!


अस्कोटमधला अर्पण संस्थेचा रमणीय परिसर


पावसाळ्यातला पहाडी राष्ट्रीय महामार्ग

२९ जुलैला सकाळी हेल्पियामधून निघालो. अस्कोटमार्गे जौलजिबीजवळच्या पूलापर्यंत पोहचलो. पावसामुळे रस्त्याची स्थिती खराब झालेली आहे. अनेक जागी दगड आणि लँडस्लाईडमुळे रस्ता तुटलेला आहे आणि तिथे बी.आर.ओ.ने कच्चा रस्ता बनवला आहे. जौलजिबीच्या ब्रिजजवळ थोडा वेळ थांबलो. इथे काली गंगा आणि धौली गंगा (जिला बोलीभाषेत गोरी गंगा म्हंटले जाते) ह्यांचा संगम आहे. जौलजिबी गावातही पूरामुळे नुकसान झालं आहे, असं कळालं. आजचं आमचं काम जौलजिबी- मुन्सियारी रोडला लागून असलेल्या व संपर्क तुटलेल्या गावांमध्ये नुकसान किती झालं आहे, हे बघणं आहे. डॉक्टरांची टीम अशाच गावांमध्ये जाण्यासाठी तयार आहे.


जौलजिबीवरचा गोरी‌ गंगेवरचा पूल


इंग्रजी ग्रीफ (वेदना) दूर करणारी ग्रीफ!


ह्या आपत्तीमध्ये रक्षण करणारे महारथी

जसे जौलजिबीपासून पुढे निघालो, गोरी गंगेचं रौद्र रूप समोर आलं. नदीमध्ये प्रचंड पाणी आहे. नदीच्या किना-यालगत असलेल्या जमिनीवर नदीच्या पूराच्या खुणा स्पष्ट आहेत. लगतच्या जमिनीला नदीने पूर्ण उद्ध्वस्त केलं आहे. रस्ताही त्यातून वाचलेला नाही. रस्त्याचं‌ प्रचंड नुकसान झालेलं आहे. अनेक ठिकाणी बी.आर.ओ. चे युनिटस कार्यरत आहे. वाटेत घट्टाबगड़ नावाचं गाव पूर्ण उद्ध्वस्त झालेलं दिसलं. आता त्या गावातले सर्व कुटुंब एक तर टेंटमध्ये राहात आहेत किंवा नातेवाईकांकडे गेले आहेत. त्या गावात काही वेळ थांबलो. अर्पण संस्थेचे सदस्य सोबत आहेत. त्यांच्या ओळखीने काही लोकांशी बोलणं झालं. टेंटमध्ये राहायला लागले असले तरी लोक रिकामे बसलेले नसावेत, हे आतमधलं शिवणयंत्र बघून जाणवलं. लोकांनी सोबत पशुधनसुद्धा ठेवलेलं आहे. ह्या आपत्तीमध्ये पशुधनाचंही मोठं नुकसान झालं. लोकांनी कुटुंबाचा घटक म्हणून त्यांनाही सोबत ठेवलेलं आहे. लोक दिवसा मोठी जोखीम घेऊन नदीच्या जवळ वाचलेल्या घरांच्या अवशेषांमध्ये जातात आणि आवश्यक वस्तु शोधतात, असं ऐकण्यात आलं.


बी.आर.ओ. ला नमन!


नदीने अक्षरश: कापलेले क्षेत्र

पुढे जाताना रस्ता अजून जास्त खराब झाला आहे. आता क्वचितच पक्का रस्ता लागतोय. रस्त्यावर मध्ये मध्ये पर्वतातून तीव्र गतीने येणारे छोटे जल प्रपातसुद्धा आहेत. अनेक ठिकाणी असं पाणी खूप वेगवान आहे. बरम गावामध्ये मिलिटरीचं एक युनिट आहे. तिथून काही किलोमीटर अंतर रस्ता पूर्णत: तुटलेला आहे व त्यामुळे डोंगर तोडून पर्यायी कच्चा रस्ता बनवला गेला आहे.. मध्ये मध्ये सारखं थांबावं लागत आहे. कारण सतत पडणा-या दगडांना बी.आर.ओ. दूर करत आहे. बरममध्ये एक मोठा दोरखंड घ्यायचा होता, पण कुठे मिळाला नाही. तो न घेताच पुढे जावं लागलं. पुढे जाताना दोरखंडाची गरज पडू शकते.

बरमपासून पुढे एका जागी बराच वेळ थांबावं लागलं. बी.आर.ओ. रस्ता मोकळा करत आहे. मोठे जे.सी.बी. आणि अन्य साधने रस्त्यावर पडलेला मलबा हलवत आहेत. त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतरच वाहतुक सुरू झाली. चामी गांवाच्या आधी कालिका नावाच्या जागी थांबलो. इथे दोन टीम्स करण्यात आल्या. एक डॉक्टरांची टीम आहे- त्यामध्ये दोन डॉक्टर आणि दोन अन्य सदस्य जीपमधून पुढे गेले. ते पुढच्या गावांमध्ये शिबिर घेतील. त्यांच्यासोबत अर्पणचेही दोन सदस्य आहेत. आम्ही बाकी जण सरांसोबत नदी पार करण्यासाठी निघालो. ह्या टीममध्येही अर्पणचे सदस्य आणि स्थानिक लोकही‌ आहेत. चामी गांवाच्या आधी कालिकाजवळ गोरी गंगा नदीवर एक लोखंडी पूल आहे आणि तो अद्यापही सुरक्षित आहे! त्यावरून नदी ओलांडली. पक्का रस्ता सोडला. आता गोरी गंगेच्या गर्जनेसोबत पायी पायीच जायचं आहे. ह्या पूलाच्या आधी धारचुला तालुका होता आणि आता पूल ओलांडल्यानंतर डीडीहाट तालुका सुरू झाला. पुढचं गाव ओलांडल्यानंतर मुन्सियारी तालुका सुरू होईल. तीन तालुकांच्या काठावरच्या ह्या गावांमध्ये सरकारी कामामध्ये तांत्रिक अडचणी नक्की येत असणार. पायवाट वाळूतून जाते आहे. नदीचं पाणी लागूनच आहे. जेव्हा पाण्याची पातळी सर्वाधिक होती, तेव्हा नक्कीच ही पायवाटही नदीमध्येच गेली असणार. नदीच्या प्रवाहाजवळून पुढे जात राहिलो.

पहलं गाव- हुडकी आलं. इथे अनेक घरं कोसळली. अनेक लोकांची शेती उद्ध्वस्त झाली. ज्या लोकांची घरं नदीपासून वरच्या बाजूला होती; ती वाचली. नदीच्या किना-यापासून जवळ जी घरं होती, त्यांचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. अशाच एका मोडलेल्या घरामध्ये एक वृद्ध बाबा बसून उपजीविका सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा व्यवसाय खडी विकणे हा होता आणि ते कंत्राटदारांकडे विकायचे. त्यांच्या घराचं छप्पर कोसळलं आहे. घरासाठी टर्पोलिनची गरज आहे. त्यांना पायवाटेचा रस्ता असल्यामुळे रेशन आहे. त्यांनी सुन्न करणा-या स्वरात नदीच्या पूराची "आँखों देखी" सांगितली. नदीने त्यांना एकदम उघड्यावर आणलं आहे. जाताना सरांनी कॅमेरामधून बाबांचा फोटो घेतला व त्यांना दाखवला. आपला फोटो बघून लगेच त्यांच्या चेह-यावर हसू आलं. दु:खाच्या वेळेसही कशा ना कशा प्रकारे पॉझिटिव्ह स्ट्रोक देणं आवश्यक असतं.


क्षतिग्रस्त घर

गांव छोटसंच होतं. पुढच्या गावामध्ये जाणा-या एक बाईसुद्धा आमच्यासोबत आल्या. अर्पणच्या तीन महिला सदस्या- तीन दिदी आमच्या सोबत आहेत. पायवाट गावातून पुढे जाऊन परत नदीजवळ आली. हुड़की गांव संपल्यानंतर वाट अगदी नदीला लागून सुरू झाली. अगदी बाजूला गोरी गंगेचं तांडव सुरू होतं. हळु हळु सामान्य पायवाट एका दुर्गम चढामध्ये बदलत गेली. आता तर पाय ठेवायलाही जागा मिळणं कठिण झालं. स्थानिक महिला मार्गदर्शिका बनल्या. त्यांच्या मागे सगळे निघाले. पायवाट वळणं- वळणं घेत नदीच्या अगदी वर असलेल्या डोंगरातून जाते आहे. त्या गावच्या दिदींनी समोर एक मोठा धबधबा दाखवला आणि सांगितलं की, आपल्याला तो ओलांडायचा आहे! त्यावर आता एक 'पुलिया' आहे, हेही त्या म्हणाल्या.

आकाशात ढग आहेत. हवामान अगदी गरम आहे. थंडी अजिबात नाही. त्यामुळे थकायला झालं. वाट सतत कठिण होत जाते आहे. एक मोठा चढ चढून थोडा वेळ थांबलो. आता पायवाटेवरचा घाटच सुरू झाला आहे. पायवाट आता एका वीटांच्या पाय-या असलेल्या वाटेमध्ये बदलली आणि ही पाय-यांची वाट अगदी नदीच्या वरून जाते आहे. इथे प्रचंड भिती वाटते आहे. सोबतचे साथीदार उत्साह वाढवत आहेत. आता थकवाही वाढला आहे. थोडा वेळ पाठीवरचं सामानसुद्धा एका दिदींनी घेतलं. स्थानिक लोक अगदी आरामात जात आहेत. आमचे टीम लीडर जोशी सर तर १९७८ पासून सतत पर्वतांमध्ये फिरत आहेत. त्यांना काहीच अडचण नाही किंबहुना त्यांच्यासाठी हा हमरस्ता आहे. टीमच्या अन्य सदस्य मित्रांसाठीही अडचण नाही. समस्या आहे फक्त मलाच... पायवाटेमधला सर्वोच्च बिंदू आला. इथे बसून जावं लागत आहे. कसं बसं मित्राचा हात पकडून तो बिंदू ओलांडला. खाली बघताना इतकी भिती वाटत आहे की, बघण्याची हिंमतच होत नाहीय.

मध्ये वाट सामान्य झाली. आता तो धबधबा अगदी समोर आहे. काही दगडांमधून रस्ता जातोय. जिथे जिथे बसण्यासाठी 'सुरक्षित' जमीन मिळाली; तिथे पाय थांबत आहेत. थकवा तर सतत वाढतो आहे. नदीची गर्जना आता किंचित कमी झालीय, कारण नदीपासून थोडं आतल्या बाजूला आलो आहोत. पण समोर एक भितीदायक धबधबा- पहाडी प्रपात आहे. आत त्याला ओलांडायचं आहे! जसं स्थानिक दिदींनी सांगितलं होतं, त्यावर एक पुलियासुद्धा आहे. हो, ही काय! पण ती फक्त दोन लाकडांची आहे. त्यावर बाकी काहीच नाही. पण सगळे निवांत जात आहेत. भिती फक्त एकालाच वाटत आहे...

थोडा वेळ थांबून पुढे निघायचं आहे. थकवा बघून अर्पणच्या दिदींनी बॅग घेतली. मन म्हणत होतं, त्यांना नको घेऊ देऊ. पण शरीराने ऐकलं नाही. पर्वतातून वाहून येणा-या थंड पाण्याने थोडावेळ ताजेपणा घेतला आणि निघालो. आता ती लाकडाची पुलिया... स्थानिक लोक आणि अर्पणच्या दिदी सहज गेले. सरही सहज गेले. मैत्रीमधल्या साथीदारालाही विशेष अडचण आली नाही. त्याला भिती वाटली नाही, पण त्याला बसून जावं लागलं. आता ह्या थकलेल्या शरीराची आणि भयग्रस्त मनाची पाळी. त्या 'पुलिया' जवळ येऊन पाय थांबले. चालणं कठिण झालं. पाण्यावरून फार तर पाच पावलं चालायची होती. पण पाण्याचा प्रपात आणि रौद्र रूप असं होतं की, पाय बधीरच झाले. बसून जाणंही अजून अवघड वाटलं. मदतीसाठी शेवटी अर्पण संस्थेतल्या एक दिदी परत इकडे आल्या आणि त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या मदतीमुळे मनाला भितीवर मात करता आली. डोळ्यांनी बघण्याचं काम थोडा वेळ थांबवलं. आणि पाय कसेबसे पाच पावलं चालून गेले. ती 'पुलिया' ओलांडल्यानंतर एकदम बरं वाटलं! धरती मातेच्या कृपेचा अनुभव अशाच जागी येतो...!


"आता तर पुलियासुद्धा आहे!"

जसा हा धबधबा ओलांडला, मुन्सियारी तालुका सुरू झाला. अर्थात त्या वेळी हे काहीच कळण्यासारखी स्थिती नाहीय. काहीही कळत नाहीय. फोटोसुद्धा घेण्याचं भान नाहीय. पुढचा रस्ताही चढाचाच आहे. पण इतका 'धोकादायक' नाही. अर्थात् 'सुरक्षित' किंवा 'धोकादायक' समजणं खूपच व्यक्ती सापेक्ष आहे. एखाद्याला जो अगदी सोपा असतो, तोच दुस-यासाठी 'भितीदायक' असतो!...

स्थानिक दिदी रस्ता दाखवत गेल्या आणि पुढे जात राहिलो. त्या दिदी सांगत आहेत की, त्यांना सात मुली आहेत आणि एकही मुलगा नाहीय. त्यांना त्याचं दु:ख होतं. अर्पणच्या दिदी त्यांना समजवत होत्या. थकलेले पाय चालत राहिले. त्या दिदी नदीला म्हणजे पाण्याला दोष देत होत्या. पाणी हेच सर्व समस्येच्या मुळाशी आहे, असं म्हणत राहिल्या. त्यांच्या बोलण्यातून हेसुद्धा कळालं की, जिथे काहीही न घेता चालणं अति कठिण आहे, तिथे घरूड़ी आणि पुढच्या गावांमधले लोक पंचवीस- तीस किलो सामान पाठीवरून नेतात...

शेवटी दुपारी एकदा घरूडी गावात पोहचलो. गावांमध्ये सुमारे वीस घरं आहेत. मध्ये मध्ये शेतीसुद्धा आहे. लोक येत- जात आहेत. नदी बाजूलाच. तिची गर्जना सतत ऐकू येते आहे. गोरी गंगा नावाची ही नदी! तिला म्हणावसं वाटतंय, 'गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मै तो गया मारा... आ के यहाँ रे...'

मार्गदर्शक दिदींच्या घरी पाणी पिऊन पुढे निघालो. घरूड़ीमध्ये अर्पणच्या दिदींनी बोलून ठेवलं आहे. तिथे एक मीटिंग घ्यायची आहे. ग्रामस्थ आलेही आहेत. पोहचल्यावर थोडा वेळ आराम आणि जेवण झालं. गावातल्या लोकांशी बोलणं झालं. ह्या गावामध्येही एक लोखंडी पूल होता. तो गावापासून जवळच असलेल्या जौलजिबी- मुन्सयारी रस्त्याला जोडत होता. पण तो पूल कोसळला. त्यामुळे इथे हुड़कीच्या तुलनेत परिस्थिती जास्त बिकट आहे.

लोक नदीच्या वर दोरखंडाने सामान पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजून ते जमलं नाहीय. आणि पाण्यामुळे गावात मोठं नुकसान झालं आहे. नदीच्या किना-यापासून जवळ असलेली घरं कोसळली. शेतांचं मोठं नुकसान झालं. गावातल्या लोकांवर आमच्या खाण्याचा बोजा पडू नये, म्हणून आम्ही मॅगी सोबत ठेवली आहे. इथे रेशनची टंचाई आहे, पण लोकांनी काही दिवसांचं रेशन गोळा केलेलं आहे. गावामध्येच धान्य व भात होतो. काही त्यांनी पूर्वीपासून साठवून ठेवलेलं आहे. शिवाय मध्ये मध्ये स्थानिक लोक जीवाची जोखीम घेऊन रेशन घेऊन येतात. इथून काही किलोमीटर दूर बंगापानीमध्ये हेलिकॉप्टरमधून रेशन दिलं जातं, असं ऐकण्यात आलं. दोरखंडाद्वारे सामान आणण्याविषयीसुद्धा बरीच चर्चा झाली. लोकांनी केलेले प्रयत्न सांगितले. इथे नदीच्या पात्राचा विस्तार सुमारे १४० मीटर आहे. त्यामुळे दोरखंड लोखंडाचा पाहिजे. पण तो सामानाच्या घर्षणामुळे गरम होईल. आत्ता तरी त्यावर ठोस मार्ग निघताना दिसत नाहीय.

लोकांशी बोलणं झाल्यानंतर सर आणि आम्ही इतर लोक पुढच्या गावात जायला निघालो. शरीरामध्ये प्रचंड थकवा आहे. सरांनीसुद्धा सांगितलं, की तू थकल्यामुळे इतर सर्वांनाही हळु हळु जावं लागेल. त्यापेक्षा इथेच थांब व आराम कर. मनामध्ये त्यांना विरोध करावा असं वाटत होतं, पण शरीरात थकवा फार होता. आणि जेवण केल्यानंतरही पुढे चालता येईल, असं वाटत नव्हतं. उत्तराखंडला येण्याआधी काही प्रमाणात सायकलिंगचा सराव केला होता, पण तो पुरेसा नव्हता, हे आता कळतंय. आणि ह्या पहाडी ट्रेकिंगसाठी थोड्या सरावाचा काहीच उपयोग नाहीय. हिमालयामध्ये कदाचित पहिल्यांदा येणा-या अन्य सदस्य मित्रांनाही इतकी अडचण येत नाहीय. कारण त्यांना ट्रेकिंगचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या शरीराला व मनाला त्याची सवय आहे. शरीरासोबत मनालाही सवय असणं आवश्यक आहे. आणि फक्त मेहनतीची सवय नाही, तर 'धोकादायक' स्थितीचीही सवय असणं गरजेचं आहे. जर एखाद्याने कधीच असा धोकादायक वाटेवरचा प्रवास केला नसेल, कधी दरीलगत किंवा एक्स्पोझर असलेल्या जागेतून प्रवास केला नसेल, तर त्याचे डोळे आणि मन अशा प्रसंगी अडचण ठरणारच...

थकवा इतका जास्त होतोय की, नीट आरामही करता येत नाहीय. बुद्धीने समजावलं तरी मन स्वत:ला दोष देतं आहे. पीडितांना सोबत देण्यासाठी येऊन ही अवस्था झाली. लोकांनाच माझं सामान उचलून माझी मदत करावी लागत आहे... घरूड़ी गावाच्या बरोबर समोर पक्का रस्ता दिसतोय. वाहनसुद्धा दिसत आहेत. पण मध्ये १४० मीटर रुंद प्रलयंकारी गोरी गंगा आहे... मन स्वत:वर नाराज होत गेलं. तसंच हळु हळु बातम्यांमधून कळणारी स्थिती आणि प्रत्यक्ष जमिनीवर असलेली परिस्थिती ह्यांच्यात किती फरक आहे, हेही स्पष्ट होत गेलं. इथे सगळंच वेगळं आहे. लोकसुद्धा वेगळे आहेत. इतक्या प्रचंड आपत्तीनंतरही वातावरण नेहमीसारखं सामान्य आहे. कुठे निराशा नाही- रडणं- निराशा नाही. लोक अडचणीत आहेत, नक्कीच, पण ते रिकामे बसलेले नाहीत. मोठी मेहनत करत आहेत. ती लाकडी पुलिया- ती 'पुलिया'सुद्धा घरूड़ीच्या ग्रामस्थांनी स्वत:च बनवली आहे व ते तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण पायवाटेवर त्यांचं लक्ष आहे. त्यांची हिंमत तगडी आहे. घरूड़ी गावात मुलं शाळेत जात आहेत. शिक्षकही येत आहेत.


ह्या हिरव्यागार शेतांमागे मोठं दु:ख लपलं आहे...

आराम झाल्यावर ज्यांच्याकडे थांबलो होतो, त्यांच्याशी बोलणं झालं. गावात एक चक्कर मारली. गावामध्ये बरंच नुकसान झालं आहे. विशेषत: नदीच्या किना-यालगत राहणा-या लोक. आणि असे लोक नेहमी तथाकथित कनिष्ठ जातीतले असतात. इथेही तीच स्थिती आहे. जे खाऊन- पिऊन सुखी असलेले लोक आहेत, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण ज्यांचं घर किंवा शेत नाहीय, त्यांची स्थिती बिकट आहे. अशा कुटुंबांना ओळखण्यासाठी गावांमध्ये ही असेसमेंट केली जात आहे. इथे उद्या दोन्ही डॉक्टर कँप घेतील. सर आणि समोर गेलेले सोबती मनकोट गावामध्येसुद्धा असेसमेंट करतील आणि डॉक्टर येणार आहेत हे गावातल्या लोकांना सांगतील.

ज्यांच्या घरी थांबलो होतो, त्यांनी- पुष्करजींनी गावाबद्दल बरीच माहिती दिली. इथला समाज मूळत: राजपूत आहे. हे त्यांचे वंशज आहेत जे लोक जोहार केल्यानंतर राजस्थानामधून निघून देशच्या अन्य भागांमध्ये गेले होते. नंतर पुढे कळालं की, हे अगदी राजपूत असेच आहेत असं नाही; पण त्यांच्याशी संबंधित समाज आहेत. हे समाज जोहारानंतर राजपूत परिवारांसह सुरक्षित ठिकाणांच्या शोधात दूर दूर गेले. हुड़की आणि घरूड़ी ही गावं इतकी दुर्गम असूनही मागासलेली वाटत नाहीत. गावांमध्ये जवळजवळ प्रत्येक घरी संडास- बाथरूम आहे. खाण्याच्या आधी लोक साबणाने हात धुतात. लोकांना बाहेरच्या जगाची व शहरांची चांगली माहिती आहे. स्वत:चा भूगोलही त्यांना चांगला माहिती आहे. पुष्करजींनी बरंच वाचलं आहे. तिबेटबद्दलही त्यांना चांगली माहिती आहे. त्यांच्या बोलण्यातून चीनचा प्रभाव जाणवला. लोकांच्या बोलण्यातून चिनची भिती दिसते. बोलता बोलता लोकांना हेही विचारलं की, इथून जाण्याचा दुसरा मार्ग आहे का, तर म्हणाले की, एक पायवाट इथून सरळ डीडीहाटकडे जाते. पण त्यासाठी फक्त दोन दिवस खड्या पहाडातून व जंगलातून चालावं लागेल. पायवाट अगदी सुनसान आहे आणि रस्त्यात फक्त वन विभागाचं एक कार्यालय आहे. बाकी काहीच अडचण नाही!

... ग्रामस्थ परत परत हेच म्हणत आहेत की, एकदा रस्ता सुरू झाला तर आम्ही आमची व्यवस्था स्वत: करू. नदीवर पूल बनणं हीच मोठी अडचण आहे. इथल्या तुटलेल्या पूलाचं सर्वेक्षण झालं आहे आणि प्रशासनाने नवीन पूल बनवण्यासाठी मान्यताही दिली आहे. पण अर्थातच त्याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत ग्रामस्थ जीवाची बाजी लावून आडवाटेने रेशन आणत राहतील. तोपर्यंत वाहतुक विस्कळीत राहील. आणि तसंही वाहन ह्या गावामध्ये कधीच यायचं नाही. तो लोखंडी पूल पायी जाणा-यांसाठीचाच होता. आणि लोकांना वाहनांची तशीही गरज इथे भासत नाही. फक्त येता- जाता यावं, हीच त्यांची गरज आहे. जिथून मदत मिळेल, ती येऊ द्या, येणं- जाणं हवं असं त्यांना वाटतं. इथे रेशनाचं वाटप करतानाही मोठी अडचण येणार आहे, कारण पन्नास किलोचं पोतं इथे आणणं अजिबात सोपं नाहीय...

हळु हळु संध्याकाळ झाली. अजून पुढे गेलेले सदस्य परत आलेले नाहीत. डोंगरामध्ये दिवे लागलेले दिसत आहेत. त्यांना यायला उशीर होतोय. रात्र पडली तरी ते रस्त्यात आहेत. तेव्हा कंदील घेऊन दोन जण निघाले- त्यांना रस्ता दाखवायला. नंतर रात्री साडेआठच्या सुमारास सर्व जण परत आले. त्यांचा पुढचा रस्ताही कठिण होता आणि सर्व प्रचंड थकले आहेत. मित्रांला भेटून बरं वाटलं. त्यांनी मनकोटची स्थिती सांगितली. तेसुद्धा असंच तुटलेलं आहे. पायवाट अडचणीची आहे. तिथेही मोठं नुकसान झालं आहे. त्यांना काही रुग्णसुद्धा भेटले. तिथल्या रेशनच्या स्थितीचं आकलन केलं. नदीवर दोरखंडाद्वारे रेशन आणण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. मित्राने सांगितलं की, तिथे एका जागी दोरखंडही लागला आहे आणि एका माणसाने नदी त्यावरून ओलांडलीही आहे.

गावामध्ये एकत्र कुटुंबात जेवण्याचा आनंद वेगळा होता. एका बाजूला मन अजूनही‌ स्वत:ला दोष देत आहे- तू मदत करायला आला आहेस, तुलाच लोकांना मदत करावी लागते आहे, ही दुर्दशा आहे.. तो दिवस मावळला. एकाने म्हंटले आहे की, जेव्हा कोणी आजारी असते, तेव्हा मदत करायला तर जायलाच हवं, पण भेटायलाही जायला हवं. औषधाला सोबतीची साथ हवी. बहुतेक असंच आमचं काम आहे. हानी इतकी प्रचंड आहे, नुकसान इतकं व्यापक आहे की, त्यामध्ये लोकांची खरी मदत करणं खूप कठिण आहे. आम्ही एकच गोष्ट करू शकतो- लोकांच्या जवळ जाऊन त्यांना थोडी सोबत देऊ शकतो. प्रतिकात्मक म्हणून थोडी मदत करू शकतो...
इतकी भीषण स्थिती बघूनही मनामधून स्वार्थ जात नाहीय- उद्या ह्याच वाटेने (?) परतही जायचं आहे. स्वार्थी मन असंच म्हणतंय की, असं कुठे येऊन फसलो! कसं बसं मनाला समजवतोय की, तू एकटा नाहीस; तुझ्यासोबत आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेले इतके जण आहेत, मित्र आहेत! ग्रामस्थही 'पार' जाण्याचा विश्वास देत आहेत.

 मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net maitri1997@gmail.com.

पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या सगळ्याच लेखमाला एकदम वाचनीय आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे होत नाहीये. पण आवर्जुन वाचल्या जात आहेत.

तुमच्या सगळ्याच लेखमाला एकदम वाचनीय आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे होत नाहीये. पण आवर्जुन वाचल्या जात आहेत.>>>>+१

मस्तच.

तुम्ही लिहिताय त्या भागात मी ही २०१४ मध्ये गेलो आहे. धारचुला, डीडीहाट इत्यादी इत्यादी त्यामुळे तो सगळा भाग डोळ्यासमोर उभा राहतोय.

गोरी गंगा / धौली गंगा / काली गंगा ह्या सगळ्याच अफाट आहेत.धारचुला ते नारायण आश्रम मधील प्रवासात २०१३ मधील पुराच्या खुना २०१४ मध्येही दिसत होत्या.

बाकी पहाडी लोकंच अफाट असतात. नेहमीच खेळकर आणि बरेच ओपन. हॅट्स ऑफ टू देम !

वाचन व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! Happy

@केदारजी, खूप धन्यवाद. पुढच्या भागांमध्ये नेमक्या त्याच भागात- धारचुला- तवाघाट- नारायण आश्रम परिसर केलेल्या कामाचं वर्णन येणार आहे! धन्यवाद.

>>तुमच्या सगळ्याच लेखमाला एकदम वाचनीय आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देणे होत नाहीये. पण आवर्जुन वाचल्या जात आहेत.>>>> +१

आपल्या मनाची दोलायमान अवस्था समजू शकते.
फोटो पाहून काय वाटलं ते शब्दात सांगणे अवघड आहे.
वाचते आहे.

पहाडी लोकांना साष्टांग नमस्कार. त्यांची वृत्ती, कष्ट आणि शक्ती (शारीरीक आणि आंतरीक) यांना सलाम.

If a man says he is not afraid of dying, he is either lying or he is a Gorkha - Field Marshal Sam Maneckshaw यांचे वचन नेहमी आठवते या संदर्भात.

केवढं कठीण आयुष्य आहे ह्या लोकांचं. आपल्याला कल्पनाही करवत नाही त्याची.
पुलिया खालच्या पाण्याला केवढा वेग आहे.

छान लिहिताय. पुलिया प्रकरण वाचुन कळले नाही. पण फोटो पाहिल्यावर पोटात गोळा आला.

तुम्ही आणि तुमच्यासारखे साथी आणि मैत्री, अर्पण या संस्था अफाट काम करत आहेत. या कामाची जितकी शक्य आहे तितकी प्रसिद्धी झाली पाहिजे. मरगळलेले, अनुत्साही आणि निराशेचे वातावरण अनुभवत असलेल्या तरुणांना हे प्रेरणादायी काम दाखवायला पाहिजे

वेगळाच अनुभव. अर्पण, मैत्री या संस्थांच्या सभासदांना आणि तुम्हालाही मनःपुर्वक धन्यवाद.

पुलिया पाहून धडकी भरली! हा पुलिया पार केलात? बापरे! >>++

आमचे टीम लीडर जोशी सर तर १९७८ पासून सतत पर्वतांमध्ये फिरत आहेत. >>>> हे पुणेस्थित श्री. शिरीष जोशी तर नाहीत ??? बहुतेक हेच असणार ....

तुम्ही आणि तुमच्यासारखे साथी आणि मैत्री, अर्पण या संस्था अफाट काम करत आहेत. या कामाची जितकी शक्य आहे तितकी प्रसिद्धी झाली पाहिजे. मरगळलेले, अनुत्साही आणि निराशेचे वातावरण अनुभवत असलेल्या तरुणांना हे प्रेरणादायी काम दाखवायला पाहिजे >>>>> +१०००