६५ क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु, हायगेट, लंडन.

Submitted by पद्मावति on 14 August, 2015 - 16:31

लंडन च्या आर्चवे ट्यूब स्टेशन च्या बाहेर येताच हायगेट हिल रोड ने सरळ सरळ चालत आलं की उजव्या हाताला एक रस्ता वळतो. हा रस्ता आहे क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु. एका मध्यमवर्गीय वसाहतीतला हा साधारणसा रस्ता. मुख्य रहदारीपासून जरा आतल्या भागाला असल्यामुळे इथे ट्रॅफिक सुद्धा कमीच असतो. या रस्त्याला वळून उजवीकडे आठ-दहा घरे सोडली की आपण उभे राहतो अगदी साध्या सुध्या रूपाच्या एका विक्टोरियन पद्धतीच्या घरासमोर. हे सर्वसामान्य दिसणारे घर मात्र इथल्या बाकीच्या घरांपेक्षा फार वेगळं आहे. या घराला इतिहास आहे तो भारतीय स्वातंत्र्य लढयाचा. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं एकेकाळचं भारताबाहेरील प्रमुख केन्द्र--पत्ता ६५ क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु, हायगेट, लंडन आणि ओळख -एकेकाळचं इंडिया हाउस.

विसाव्या शतकाचा सुरुवातीचा काळ. कधीही अस्त न होणारा इंग्रजी सत्तेचा सूर्य भारतात अगदी ऐन भरात होता. स्वराज्य आणि स्वदेशीची चळवळ देशभरात मोठ्या जोमात चालली होती. लाल, बाल आणि पाल या त्रिमुर्तींनी देशभरात जनजागृती करून लोकांमधे परकीय सत्तेविरूद्ध असंतोष निर्माण करण्याचे काम जोरात चालविले होते.
एकोणीसशे पाच ला लॉर्ड कर्झन ने फोडा आणि झोडा या जगप्रसिद्ध ब्रिटीश नीतीला जागुन बंगालची फाळणी घडवून आणली. अशातच इंडियन नॅशनल कॉंग्रेस मधे जहाल आणि मवाळ असे सरळ सरळ दोन गट पडले. सशस्त्र प्रतिकाराशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही असा एक विचार जोर पकडू लागला होता आणि त्याला अनुसरून बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, तामीळनाडू मधे अनेक क्रांतिकारक संघटना निर्माण होऊ लागल्या.

आपल्या देशामधे ही धामधूम चालली असतानाच एक समांतर चळवळ आकार घेऊ लागली होती ती मात्र भारताच्या बाहेर, थेट वाघाच्या गुहेत--लंडन मधे.
श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकोणीसशे पाचच्या फेब्रुवारीत इंडियन होम रूल सोसायटी ची लंडन मधे स्थापना केली. मॅडम भिकाजी कामा, दादाभाई नवरोजी सारखे दिग्गज या संस्थेंचे आधारस्तंभ होते. या संस्थेने हिंदुस्थानासाठी सेल्फ रुल अर्थात स्वराज्य या संकल्पनेची मांडणी केली. याचे उद्दिष्ट होते खुद्द लंडनमधून या स्वराज्याच्या कल्पनेचा पाठपुरावा करणे, या कामासाठी जनजागृती करणे आणि त्यासाठी पैसा उभारणे. या काळात मोठ्या प्रमाणावर भारतीय मुले शिकण्यासाठी लंडन मधे येऊ लागली होती. या मुलांना लंडन मधे साहजिकच वंशभेदाचा, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागे.
श्यामजी कृष्ण वर्मांनी या भारतीय विद्यार्थांसाठी एका वसतीगृहाची एकोणीसशे पाच मधे स्थापना केली. ह्या घराचे नाव ठेवले--इंडिया हाउस.

हे इंडिया हाउस पुढच्या पाच वर्षांसाठी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील इंग्लंडमधील एक प्रमुख केन्द्र बनले. येथील सदस्यांनी द इंडियन सोशियलोजीस्ट नावाचे ब्रिटीश सरकारविरोधी वृत्तपत्र चालविले होते. या वृत्तपत्राने भारतात चाललेल्या इंग्रजी दडपशाही विरुद्ध वेळोवेळी आवाज उठविण्याचे काम केले.
अनेक भारतीय विचारवंत, नेते, क्रांतिकारक देशभक्तांचे इंडिया हाऊस हे लंडन मधील हक्काचे घर बनले. इथे त्यांच्या बैठकी चालायच्या, अनेक नवे विचार, नव्या कल्पना इथे मांडल्या जायच्या. जहाल-मवाळ अशा सर्व विचारांना या घराने एकत्र आणले.
सगळयांचे मार्ग वेगळे होते पण धर्म एकच--राष्ट्रभक्ति आणि उद्दिष्ट----स्वराज्य.
या इंडिया हाउस च्या सभासदांपैकी प्रमुख नावे होती--- बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, मदन लाल धिंग्रा, लाला हरदयाल, वी. एन. चटर्जी, सेनापती बापट इत्यादी. महात्मा गांधी सुद्धा त्यांच्या ब्रिटन दौर्यात इथे काही दिवस राहायला होते.

इथल्या स्वातंत्र्य चळवळीची कुणकुण स्कॉटलॅंड यार्ड ला लागली नाही तरच नवल होते. हळूहळू ब्रिटीश सरकारने इंडिया हाउस वर नजर ठेवायला सुरूवात केलीच होती. एकोणीसशे नऊ मधे इंडिया हाऊस च्या मदन लाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा लंडन मधे भर सभेत वध केला. त्याच्या नंतर मात्र या इंडिया हाउस वर इंग्रजी सत्तेचा झपाट्याने वरवंटा फिरू लागला. मदन लाल धिंग्रांना फाशी देण्यात आली. इंडिया हाउस चे बरेच सभासद भूमिगत झाले.

१९०५ ते १९१० या काळात या इंडिया हाउस ने अनेक तरुण भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र आणले. या उच्चविद्यभूषित तरुणांच्या मनात ब्रिटीश राज्यसत्तेविरुद्ध असंतोष जागा केला. त्यांच्या विचारांना हक्काचं व्यासपीठ दिले. बॉम्ब, पिस्तुले बनविण्याची माहिती पत्रके भारतात क्रांतिकारकांसाठी इथून पाठविली जात. येथील सदस्यांनी पुढे जाऊन देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले. या इंडिया हाउस ने बलाढ्य आणि अजिंक्य ब्रिटीश साम्राज्याला जाब विचारायचं धाडस दाखवलं ते थेट त्यांच्या घरात शिरून.

आज या वास्तुची नाही चिरा नाही पणती अशी अवस्था आहे. फक्त हे घर मात्र जसंच्या तसं उभं आहे आणि सावरकर इथे वास्तव्यास होते अशा उल्लेखाची घरावर एक निळ्या रंगातली पाटी, बस इतकंच. या घराकडे बघतांना राहून राहून वाटत होतं की आत काहीतरी संग्रहालय, नाहीतर घरासमोर काही माहितीचा फलक तरी, काहीतरी हवं होतं. पण काहीही नाही.

VS-2.jpg
क्रॉमवेल अ‍ॅवेन्यु

VS-3.jpg
डावीकडचे घर.

VS-4.jpg

या घराकडे आम्ही बाहेरूनच बघत होतो. इथे या देशात काहीतरी खूप आपलसं वाटणारं समोर दिसत होतं. इथपर्यंत येतांना डोक्यावरचं उन, लंडन मधली गर्दी, मॅप नीट बघता येत नाही का म्हणून एकमेकांवर केलेली चिडचिड सारं काही एका क्षणात विसरलो होतो. आम्ही दोघे, बरोबर माझा भाऊ आणि वाहिनी. चौघेही निशब्द.... काही बोलण्यासारखं नव्ह्तच. फक्त कधी घरासमोर तर कधी रस्त्याच्या पलीकडे जाऊन या इंडिया हाऊस कडे आम्ही एकसारखे पाहात होतो. उगाचच घराच्या आजूबाजूला घुटमळत होतो. खरोखर येथून पायच निघत नव्हता. पण मग शेवटी थोडेफार फोटो काढले आणि जरा वेळाने तेथून निघालो.

india house.jpg
हा फोटो जालावरून साभार.

गॉड सेव द किंग आळवत अवघ्या हिंदुस्थानाला त्राही माम करून सोडणार्या ब्रिटीशांच्या राजधानीत वंदेमातरम् चा मंत्रघोष करण्याची हिंमत या घराने दाखविली.
देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत आपला वाटा उचलून काही काळासाठी का होईना पण इंग्रज सरकारला भयंकर अस्वस्थ करणार्या या इंडिया हाऊस ला देशाच्या स्वातंत्र्यदिनानीमित्त विनम्र अभिवादन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान झालाय लेख ! इंग्रजांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या राजधानीत भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष करणार्या इंडिया हाऊस आणि क्रांतिकारकानां अभिवादन !
अवांतर, श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जन्मगावी गुजराथमध्ये इंडिया हाऊस ची मोठी प्रतिक्रुती उभारली आहे.

समयोचित लेख!

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

खूप छान लेख! सावरकरांविषयीच्या पाटीचा फोटो बघताना मी विचार करु लागले की मी त्या घरासमोर उभी असेन तर काय येईल मनात ... आणि जे वाटलं तेच तुमच्या पुढच्या परिच्छेदात वाचायला मिळालं!!

छान लेख लिहिलाय.

ज्या देशासाठी सावरकर लढले त्या देशात त्यांच्या कवितेतल्या ओळी शहीद स्मारकातुन काढल्या जातात
आणि
ज्या देशाविरुद्ध ते लढले तिथल्या घरावर मात्र "Indian Patriot and Philosopher lived here" अशी पाटी अजुनही लावली आहे.

काय हा विरोधाभास! Sad

खूप छान लेख! सावरकरांविषयीच्या पाटीचा फोटो बघताना मी विचार करु लागले की मी त्या घरासमोर उभी असेन तर काय येईल मनात ... आणि जे वाटलं तेच तुमच्या पुढच्या परिच्छेदात वाचायला मिळालं!!
>>>
+ १

.

ज्या देशाविरुद्ध ते लढले तिथल्या घरावर मात्र "Indian Patriot and Philosopher lived here" अशी पाटी अजुनही लावली आहे.
>>>
+७८६
क्षणभर ईंग्लंडचेही कौतुक वाटले.

.

बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, मदन लाल धिंग्रा, लाला हरदयाल, वी. एन. चटर्जी, सेनापती बापट इत्यादी. महात्मा गांधी सुद्धा त्यांच्या ब्रिटन दौर्यात इथे काही दिवस राहायला होते.
>>>
सर्व देशभक्तांना अन स्वात्रंत्र्यवीरांना सामावून घेणारे ईंडिया हाऊस ! वा ..
देशावरचे गाणे ऐकताना अंगावर काटा उभा राहणारे आपण सारे, या वास्तूसमोर तिची महती जाणून घेतल्यावर स्तब्ध आणि निशब्द न झालो तर नवलच, लेखाबद्दल धन्यवाद

ऋन्मेऽऽष,

बाबासाहेब आंबेडकरही तिथे येऊन गेले आहेत. लेनिन सुद्धा तिथे वादविवाद करण्यासाठी येत असे.

आ.न.,
-गा.पै.

बाबासाहेब आंबेडकर पण लंडनलाच राहत होते ना काही काळ? त्यांनी निवास केलेले घर आता महाराष्ट्र सरकारने विकत घेतले आहे, अशी मध्ये बातमी आली होती.

ते घर देखील याच घराच्या जवळपास आहे का?

छान लेख.
अमेरिकेला फिरायला जाण्याऐवजी मुलांना इंग्लंड दाखवले तर या इतिहासाची त्यांना जी ओळख होईल ती कधीच पुसली जाणार नाही असा विचार चमकून गेला क्षणभर..

सर्वांचे मन:पूर्वक आभार.
राहुल, बाबासाहेब आंबेडकरांचे इथे घर आहे मला ह्याची माहिती नव्हती. धन्यवाद. त्याची माहिती, पत्ता मिळवून नक्कीच तिथे जाईन.

गापै, माहितीबद्दल धन्यवाद.
राहुल, येस्स त्या बाबासाहेबांच्या घराबद्दलची बातमी देखील मध्यंतरी ऐकली होती.