बलात्कारांचं वाढतं प्रमाण आणि आपण

Submitted by योगी on 12 November, 2009 - 01:00

नमस्कार,

हल्ली वर्तमानपत्रातून सतत येत असणार्‍या बलात्कार, विनयभंग, लैंगिक शोषण यासारख्या बातम्या वाचून मनात खूप कालवाकालव होते. अगदी चारपाच वर्षांचं वय असणार्‍या कोवळ्या मुलींवर होणार्‍या बलात्कारांचं प्रमाणही हल्ली खूपच वाढलंय. खरंतर अशा निरागस वयातल्या या मुलींना पाहून त्यांच्याशी खूप खूप खेळावं, त्यांना कडेवर उचलून घेऊन त्यांचा पापा घ्यावा असं वाटायला हवं. पण त्याउलट स्वत:च्या शरीराची निर्लज्ज भूक भागवण्यासाठी या कोवळ्या मुलींच्या शरीराचे लचके तोडण्याचे पाशवी विचार एखाद्याच्या डोक्यात कसे येऊ शकतात हेच कळत नाही. कुठल्या मातीची बनलेली असतात ही माणसं? यांना माणसं तरी का म्हणावं? अशांना फाशीची शिक्षा दिली तरी ती कमीच आहे.

ज्या मुलींना या प्रसंगाला सामोरं जावं लागत असेल त्यांच्या मनावर किती खोलवर आघात होत असेल याची नुसती वर्तमानपत्रातली बातमी वाचून कल्पना येणं खूपच अवघड आहे. आणि मग त्या प्रसंगामुळे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना भोगाव्या लागणार्‍या दुष्परिणामांबद्दल विचार करणं तर खूपच दूरची गोष्ट आहे. कित्येकांची आयुष्य अशा प्रसंगांनंतर उद्ध्वस्त झालेली आहेत आणि होताहेत.

कोणत्याही वयात होणार्‍या बलात्कारांचं प्रमाण खरोखरच काळजी करण्याइतपत वाढलंय. कालच्या सकाळमधे तर ६५ वर्षाच्या एका महिलेवर बलात्कार झाल्याची बातमी वाचली..... बलात्कार, खून, अपहरण.... हल्ली वर्तमानपत्र हातात घ्यायचीच भिती वाटते.

पुण्यात काही दिवसांपुर्वीच नयना पुजारीच्या बाबतीत जे घडलं त्याने हेही लक्षात यायला हवं की या प्रकारांत बळी पडणार्‍या मुली, स्त्रिया अगदी तुमच्या आमच्या आजुबाजूला रहाणार्‍या असू शकतात, नात्यातल्या असू शकतात.... किंवा कदाचित घरातल्याही असू शकतात...

हा विषय थेट चर्चेसाठी नेमका कसा मांडावा हे न सुचल्यामुळे मी आघात या कथेच्या माध्यमातून तो मायबोलीच्या वाचकांसमोर मांडला होता. यावरचे प्रतिसाद मला फक्त एका कथेवरचे प्रतिसाद म्हणून अपेक्षित नव्हते, तर या विषयावर काहीतरी गंभीर चर्चा व्हावी असं वाटत होतं. पण मुळात जागाच चुकल्यामुळे (कथा म्हणून हा विषय समोर ठेवल्यामुळे) मला अपेक्षित अशी चर्चा व्हायच्या ऐवजी फक्त कथेविषयीचे प्रतिसादच आले. म्हणून nandini2911 यांनी सुचवल्याप्रमाणे हा बीबी उघडला आहे.

कथालेखन हा काही माझा प्रांत नाही. त्यामुळे कथेविषयीचे प्रतिसादही मला अपेक्षित नाहीत. पण या कथेच्या अनुषंगाने खालील मुद्द्यांवर चर्चा व्हावी असं मला वाटत होतं:

  • असे प्रकार पूर्णपणे थांबवणं तर आपल्या हातात नाही. पण तुम्ही स्वतः एक स्त्री असाल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे?
  • तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला काय करता येऊ शकतं?
  • गेल्या काही आठवड्यांत वाचनात आलेल्या बातम्यांमधे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे अगदी १२-१४ वर्षे वयाच्या मुलांचाही सहभाग असल्याचं दिसून आलं. एवढ्या लहान वयात या मुलांच्या मनात अशा भावना कशामुळे निर्माण झाल्या असतील? याबाबतीत आपण काही करु शकतो का?
  • अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे सहभागी असणार्‍यांना नेमक्या कशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद असायला हवी म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल?
  • प्रसारमाध्यमांची याबाबतीत काय भुमिका असावी?

याव्यतिरीक्त अजूनही काही मुद्दे चर्चेयोग्य वाटत असतील तर तेही इथे मांडावेत ही नम्र विनंती.

-योगेश

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या कॉलनीत रहणार्या एका मुलीवर तिच्या बॉ फ्रे आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला होता. तिच्या आईनी (वडील नव्हते) सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता केस केली. ती केस ही मुलगी हरली आणि त्यावर हाईट म्हणजे तो मुलगा आज जेलर म्हणुन काम करतो. हे पाहिलंकी न्यायसंस्थेवर विश्वास ठेवणं खरच कठीण वाटतं.

आज त्या मुलीचं लग्न (मुलापासुन काहिही लपवून न ठेवता) झालेलं आहे. लौकिक अर्थानी ती चारचौघींसारखं आयुष्य जगत आहे हीच काय ती जमेची बाजू.

लिम्बुटिम्बु यांच्याशी अगदी सहमत.
पण जोवर विक्रुत मनोवॄत्तीच्या लोकांवर काही अंकुश ठेवू शकत नाही, कडक शिक्षा होण्याची भिती त्यांच्या मनात येऊन त्यांना अशा कामांपासून पराव्रुत्त करु शकत नाही तोपर्यत बचावात्मक काही उपाय प्रत्येकाला स्वतःसाठी घ्यायलाच हवेत. वर बरीच चांगली यादी जमली आहे. त्याशिवाय आठ्वलेले काही:
१. लहान मुले, बर्‍यापैकी मोठ्याही मुली/स्त्रिया यांना एकटे टेरेस वर कधीही जाउ देऊ नये. तिथे एकच exit असल्याने आणि ते बन्द केल्यास बाहेर पळायला, कुणी सुटकेस याय्ला वेळ लागतो.
आश्चर्य म्हण्जे इतर बहुसंख्य गोष्टीना विशेष आड्काठी न घेणारे माझी आई-वडील याबाबतीत मात्र माझे अजिबात ऐकत नसत. कारण ही सांगत नसत ( बहुधा मला भिती वाटु नये म्हणून).. मला मात्र याचा फार राग येइ. काय होणार आहे, काही होत नाही, मी बघून घेइन, तुम्ही घराचे दार उघडे ठेवा आणि पाहीजे तर वर जाणार्‍यांकडे लक्श ठेवा वगैरे भांड्णे नेहमीचीच (मला वाटाय्चे की माझा कोणी सिक्रेट बॉय-फ्रेन्ड असेल, असे ह्यांना वाटते, माझाच मुर्खपणा अजून काय) . मात्र एकदा माझ्या मैत्रिणीला(वय १७) तिच्या शेजार्च्या flat मधल्या ५० वर्षाच्या माणसाने टेरेसवर एकटी गाठून गैरप्रकार केले. तिची बहीण ३-४ मिनिटातच पोचली म्हणून फार काही करू शकला नाही, मात्र मैत्रिणीला फार मोठा मानसिक धक्का बसला. बारावीच्या त्या वर्षाला depression आले. तेव्हा माझे डोळे खाड्कन उघड्ले. विशेष म्हणजे त्यावेळेला तिच्या पालकांनी शेजर्‍याला समजही देणे टाळले, वर तिलाच कुणाला सांगू नको म्हणून बजावले Sad
२. आजकाल मोबाइल असल्यामुळे बाहेर एकटे फिरताना सेफ वाट्ते. पण मोबाइल नेहमी चार्ज्ड ठेवण्याची काळजी घ्यावी. त्यात speed dial वर घरचा, १००, पोलिस स्टे चा नं असू द्यावा.
३. येण्याजाण्याच्या वेळा अगदी ठराविक असू नये. जर तुम्ही रोज रिक्शाने ऑफिसला जात असाल तर ठरविक ऑटो stand वरुन रोज ऑटो घेणे टाळावे. मलाही एकदा एकाने विचारले काय आज्काल ते अमुक अमुक ऑफिस सोडले का? मि चाटच पडले...
४. तुम्ही public transport/ ऑटो वापरत असाल तर जराही provocative कपडे घालणे टाळावे. एकटीने ऑटोने डिस्क/पब ला वगैरे जाणे म्हण़जे मला तरी आ बैल मुझे मार वाटते..अर्थात हे (माझ्यासारख्या) ज्यांना स्वसंरक्षणाची खात्री वाट्त नाही, त्यांच्यासाठी ..
५. लहान मुलांना सांभाळायला बाई ठेवली असेल तर अधेमधे अचानक घरी येऊन surprise audit करावे. दिवसातून ३-४ वेळा तरी फोन करावा (आइ-वडील, सासू-सासरे यांनाही सांगावे दुपारचे फोन कराय्ला) आणि किमान एकदा जरी मुलाशी बोलाय्ला मिळाले नाही तर पुन्हा थोड्या वेळाने फोन करुन सर्व ठीक असल्याची खात्री करावी.
६. communication is the key!! तुम्ही जितके मुलांशी बोलते रहाल तितके चांगले..शिवाय लहान मुलांना तर कराटे, किक बॉक्सिंग वगैरे स्वसंरक्षण शिकवणे आजकाल मस्ट च! ( आम्ही नाही शिकलो Sad )

छोट्या छोट्याच गोष्टी आहेत, पण लक्षात असु द्याव्यात..

बलात्कार करणारी व्यक्ती ही मनोरुग्ण आहे, मानसिक रोगी आहे हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. त्याला एकतर जरब बसवणारी शिक्षा व समुपदेशन -मानसोपचार, दोन्हीची गरज आहे. दुसर्‍याच्या असहायतेचा गैरफायदा घेणे, आपली लैंगिक भूक भागवायला कोणाही व्यक्तीचा तिच्या मर्जीविरुध्द वापर, मानसिक दहशत निर्माण करण्याची वृत्ती अशा अनेक भूमिकांतून बलात्कार केले जातात. मानसिक विकृतीवर जे उपाय असतात तेच बलात्कार करणार्‍यावर व्हायला हवेत. पण त्याचबरोबर त्याला कठोर शिक्षाही हवीच! अशी शिक्षा जी त्याला आयुष्यभर लक्षात राहील व ती व्यक्ती असा गुन्हा करायला परत धजावणार नाही!

मानसिक विकृती जेव्हा निर्माण होते तेव्हा शरीर-मनाचा कोठेतरी असमतोल निर्माण झालेला असतो. हा असमतोल गुन्हा घडवून आणण्यास कारणभूत होतो.
योगाभ्यास, ध्यान, खेळ, व्यायामाने हा असमतोल मिटवण्यास मदत होते. तसेच समूह-मंत्रोच्चार/प्रार्थना/प्रतिज्ञा/आवाहन यांच्यातही मनस्वास्थ्य राखण्याची विलक्षण ताकद असल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले आहे. ह्या सर्व ज्ञात उपायांचा सर्वदूर वापर व्हायला हवा. सशक्त शरीरे व सशक्त मने निर्माण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, नव्या पिढीशी खुला - मनमोकळा संवाद, त्यांना आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे ह्या गोष्टी तर करता येतीलच.... शिवाय आपल्या मुलामुलींना भरपूर नवे मित्रमैत्रिणी जोडायला शिकवणे, त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे, सरव्हायवल ट्रेनिंग देणे, निकोप दृष्टीकोन देणे हे तरी पालकांच्या हातात असते. शिवाय जर मुलांना उशीरा कोठे जायचे असले किंवा परत यायला उशीर होणार असला तर त्यांना घ्यायला जाणे, किंवा त्यांच्या सोबतीची व्यवस्था करणे याही गोष्टीत पालक दक्ष राहू शकतात.

बलात्कार, त्याची कारणे, मनोवृत्ती, लैंगिक शिक्षण, बलात्कारित व्यक्तीचे पुनर्वसन ह्याविषयी अजून खुल्या चर्चा होणे अपेक्षित आहे. हा समाजमनाला लागलेला रोग/कीड आहे हे गृहित धरून त्यावर सर्वंकष उपाय हवेत. ह्याविषयी अधिक जागृती व लोकशिक्षण हवे.

समाजात गुन्हेगारी वृत्तीला मुरड घालण्यासाठी व्यसने, बेकायदेशीर कृत्ये, बेकायदेशीर वास्तव्य व व्यवसाय ह्यांनाही आळा घालणे अनिवार्य आहे, परंतु ते तर कोठेच दृष्टीपथात येत नाही. स्त्री ही भोगवस्तू नसून माणूस आहे ही भावना प्रसिध्दीमाध्यमे अजूनही पुरस्कृत करत नाहीत. उलट भावना उद्दीपित होतील, कामवासना चाळवली जाईल असेच चित्रण वारंवार पाहावयास मिळते. मानसिक दृष्ट्या असंतुलित व्यक्तीस तेवढेही पुरेसे असते!!! त्यामुळे केवळ प्रतिबंधात्मक उपाय करणे व समाजमन निरोगी होण्यासाठी प्रयत्न एवढेच हाती उरते.

पुण्यातल्या घटनेतील ३ आरोपींपैकी एकावर १० गुन्हे नोंदलेले आहेत. तरीही तो मोकळा फिरत होता. त्याची तडिपारी त्याने कोणत्या तरी मंत्र्यामार्फत रद्द करून आणली होती. या ३ आरोपींबरोबरच, १० गुन्हे करणार्‍याला जामीनावर सोडून आणखी गुन्हे करण्याची मोक़ळीक देणार्‍या नालायक न्यायाधीशाला व त्याची तडिपारी रद्द करणार्‍या नालायक मंत्र्याला देखील या गुन्ह्यातील सहआरोपी ठरवून त्यांना अटक करावी.

अरे तुम्ही बलात्कारानंतरचे जिवन यावर विचारच का करता, बलात्कारासाठी दगडाने ठेचून मारण्याचीच शिक्षा हवी तेव्हा कुठे बलात्कारी नराधमांना आळा बसेल. अन असे गुन्हे करायला ते घाबरतील. फक्त एकचं मार्ग आहे हा.

पुण्याची केस मला तर जरा संशयास्पदच वाटतेय. ज्यापद्धतीने ते दिवसभर गाडीत फिरत होते. मध्ये ठिकठिकाणी खरेदी केल्या. मध्येच बीअर प्याले, वेगवेगळ्या गावाला गेले. वगैरे.

@गुरुजी : तुमचा संताप होणे साहजिक आहे, पण जिथे वर्तमानपत्रेही त्या मंत्र्याचे नाव घेण्यास धजवत नाहीत, तिथे त्याला सह-आरोपी करुन शिक्षा देणे फार फार दूरची गोष्ट आहे हो! उद्या-परवा मंत्र्याचा उल्लेख अचानक गायब होईल.... जणू त्यातील काही घडलेच नाही.... भ्रष्ट देशातील भ्रष्ट माणसांचा कारभार आहे हा! इथे लॅन्ड माफिया, खुनी लोक सर्रास नेते म्हणून वावरु शकतात. त्यामुळे मंत्रीमहोदयांना शिक्षाच काय, त्यांचे नाव जरी उघड झाले व त्यांनी आपला गुन्हा कबूल केला तरी खूप!

नालायक मंत्र्याला देखील या गुन्ह्यातील सहआरोपी ठरवून त्यांना अटक करावी.
--- कायदा सर्वांना समान असतो हे केवळ पुस्तकात... Angry

बलात्कार किंवा कुठलाही गंभीर गुन्हा ( जबरी चोरी, दरोडा, हत्या इ.) करावेसे वाटणे याच्या मागे काय कारणं असावीत ? कुठून सुरुवात करावी हे कळत नाही. थोडक्यात लिहीता आलं तर पाहीन.

थायलंड किंवा अन्य देशांना महायुद्धाचा फटका बसलेला नाही, किंवा तिथे स्त्रीचळवळीचे लढे मोठ्या प्रमाणावर लढले गेल्याचं ऐकीवात नाही. तरी तिथे इथल्या समस्या नाहीत हे खरंय. म्हणजेच भारतीय उपखंडात काहीतरी चुकीचं आहे. पूर्वेकडच्या राज्यांतही वातावरण बरं आहे. लद्दाखमधे चांगलं आहे. उलटपक्षी काही अनुभव असे आहेत ज्यामुळे सैन्याबद्दलच्या भावनांना धक्का बसू शकतो.

अनेक उदात्त समजल्या गेलेल्य संस्कारातून काय मेसेज जातो हे पहायला हवं. रक्षाबंधन किंवा भाऊबीज या सणांमधे भाऊ लहान असो की मोठा त्याला बहीणीने ओवाळणे आणि रक्षणाची मागणी करणे. भाऊ बहीणीच्या नात्यासाठी सण असायला हवा, पण बहीणीकडे कमीपणा का? दिवाळीच्या पाड्व्याला नव-याला ओवाळणे, लग्नात जावयाचे लाड पुरवण्याच्या रीतींम्धून संसारात त्या दोघात समानतेचं नातं कसं काय राहत असेल ?
आपल्या आईला घरात जी वागणूक मिळते ती मुलांच्या मनावर ठसणार नाही का ?

उप्र मधे काही वर्षांपूर्वी कनिष्ठ जातीच्या मुलासोबत उच्च जातीय मुलगी पळून गेली म्हणून पंचायतीने मुलाच्या अल्पवयीन बहीणीवर सामूहीक बलात्काराचा आदेश दिला होता. यातून कुठली मनं घडत असतील ? लांबचं सोडा, आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणं आहेत, फक्त आदेश नसतात.

हे बदलणार आहे का? अशा भिन्न मानसिकतेशी सामना होतच राहणार. इथे कायद्याचं भय हा इश्यूच राहत नाही. स्त्री आपली भोगदासी आहे, काही लोक आपल्या पायातली वहाण आहेत ही मानसिकता अद्याप टिकून आहे आणि ती रुजतच जात असते.

शहरीकरणामुळे अनेक गोष्टींमधे बदल होत जातील ही अपेक्षा आहे.

#अनिरुद्ध वैद्य

या धाग्याचं शीर्षसमर्मर्पक वाटल्याने इकडे हलवलीये पोस्ट. शिवाय इथे एखादा अजगर वेटोळे घालून बसलेला नाही धाग्याला हा ही एक लाभ.

आदिवासी वस्त्यांमधे बलात्कार होत नाहीत हे इथे वाचलेले आहे. मी जुन्नर, डहाणू, आंबेगाव, माळशेज घाट अशा ठिकाणच्या आदिवासी वस्त्यांमधे राहीलो आहे. काही ठिकाणी आजही भिन्न चालीरिती आहेत तर काही ठिकाणी शहराची हवा लागलेली आहे. पण दुर्गम भागातल्या आदिवासींबद्दल तिथे राहून आलेल्यांकडून हे ऐकलेले आहे आहे. तिथल्या जीवनाची फिल्म ज्यांच्याकडून बनवली जाते त्या युनिटबरोबर जाण्याचा योग आला होता. आनंद माडगूळकरांनी पूर्वी अशा फिल्म्स शासनासाठी बनवलेल्या आहेत. चारुदत्त दुखंडेंनी बनवलेल्या आहेत.

मुद्दा हा की स्त्री पुरूष संबंधांबाबत आपण कुठे चुकतो आहोत का याची फूटपट्टी म्हणून बाहेरच्या किंवा या आदीम संस्कृतींकडे पाहीले पाहीजे. साप साप म्हणून भुई धोपटत राहून समस्या संपणार नाहीत. समाजात आमूलाग्र बदल होण्यासाठी आजार काय आहे त्याचे निदान झाले तर कुठली लस द्यायची हे ठरवता येईल. आजार दूर झाल्याशिवाय बदल संभवत नाहीत आणि हे एका रात्रीत होणारे काम नाही.

Pages