इंग्लिश मिडीअम मध्ये शिकणारी मराठमोळी मुलं

Submitted by पल्लवी अकोलकर on 11 July, 2015 - 09:00

नुकतेच मुलांच्या परीक्षेचे टाईम-टेबल मिळालेले आहे.
त्यामुळे सध्या घरात अभ्यासाचे वातावरण आहे.
अभ्यासाचे म्हणण्यापेक्षा, आभासाचे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
असो,
टाईम-टेबलवर नजर टाकल्यावर मी नकळतच निवांत झाले होते.
पहिलाच पेपर मराठी भाषेचा आहे.
म्हणलं, चला मराठीचा पेपर म्हणजे, सुरुवात तरी चांगली आहे.
निदान विषय तरी सोप्पा आहे.
कारण अर्थातच, इंग्लिश मिडीअमच्या विद्यार्थ्यांना, लोअर लेव्हलचे मराठी असते.

पण माझ्या, इयत्ता ५ वीच्या मुलाचा अभ्यास घेतांना लक्षात आले, प्रकरण फारच गंभीर आहे.
घरात जरी मातृभाषा बोलली जात असली तरी, इंग्लिश मिडीअमच्या मुलांचे, मराठीचे ज्ञान किती अगाध असू शकते, याची प्रचिती, मला मुलाचा अभ्यास घेतांना आली.
माझा मुलगा, आणि त्याचा मित्र दोघेही अभ्यासाला बसल्यावर, मी त्यांना समानार्थी शब्द विचारायला सुरूवात केली.
मी : वाढदिवस = ? त्यांचे उत्तर : बर्थ डे
मी : पाचोळा = ? त्यांचे उत्तर : वाळलेल्या झाडांचा कुस्करा (?)
मी : पक्षी = ? त्यांचे उत्तर : पशू
मी : तोंड = ? त्यांचे उत्तर : थोबाड
मी : रात्र = ? त्यांचे उत्तर : गगन
मी : निधन = ? त्यांचे उत्तर : डोळे
इतका वेळ संयमाने घेत असूनही, हळूहळू माझा पारा चढायला लागला.
मी म्हणाले, निधन म्हणजे डोळे?
तर ते आत्मविश्वासाने ’हो’ म्हणाले.
मी विचारले, काय संबध ? निधन म्हणजे मृत्यू!
तर ते म्हणाले, ओके ओके, आत्ता आठवलं, नयन म्हणजे डोळे...”आमचा थोडा(?) गोंधळ झाला.”
अशा रितीने त्यांना, बहर, मोहोर इत्यादी शब्दांचा अर्थ समजावून सांगूनही लक्षात येत नव्हते, या दोन्हीत नक्की काय फरक आहे.

माझा पुढचा प्रश्न होता :-
पुढील शब्दांचे अनेकवचन सांगा.
मी : आंबा? त्यांचे उत्तर : आंबेज
अशा रितीने आमच्यात, अभ्यास कमी आणि खडाजंगीच जास्त होवू लागली.
संतापाच्या भरात मला काहीही बोलता येत नव्हते.

मी मैत्रीणीला, माझे दू:ख सांगितल्यावर, तिने तिच्या दू:खाची त्यात भर टाकली.
तिच्या मुलाने, "पुढील शब्दांचे वाक्यात उपयोग करा" नावाचा प्रश्न पुढीलप्रमाणे सोडविला होता.
१. तुरुतुरु : मी तुरुतुरु जेवतो.
२. थूई थूई : पाऊस थूई थूई पडतो.
३. सळ सळ : नदी सळसळ वाजत होती.
४. मुळूमुळू : मोर मुळूमुळू चालत होता.
५. रिमझिम : मी रिमझिम नाचतो.
आता, यात नेमकं काय चूकलं आहे, हे त्याला समजावून सांगणे हे, माझ्यासारखेच माझ्या मैत्रीणीच्याही आवाक्याबाहेरचे होते.
कारण हसण्यातच आमचा बराच वेळ गेला.
परंतु, परिस्थिती अशी आहे, आपल्यास जे शब्द कानाला ऐकून सहज सोपे वाटतात, ते ह्या मुलांच्या डोक्यावरून गेलेले असतात.
आणि चूक त्यांचीही नाहीये, कारण मुळूमुळू, रिमझिम सारखे शब्द आपल्या बोली भाषेतही क्वचितच येतात.

पण त्यामुळे, मला अचानकच एक शोध लागला आहे, तो म्हणजे जगातील सगळ्यात आनंदी, आणि हसून गडाबडा लोळणारी व्यक्ती कोण असू शकते?
तर ती म्हणजे, इंग्रजी मिडीअमच्या शाळेतील, मराठी विषय शिकवणारी शिक्षिका.

निबंध लिहा,
"माझा आवडता प्राणी"
माझा आवडता प्राणी कुतरा आहे.
आता एखाद्या निबंधाची सुरूवातच अशी असेल, तर विचार करा, पुढे किती गमती जमती असतील.
”माझे आवडते फळ”
पहिलीच ओळ.....
माझे आवडते, फळ कलंगड आहे.
ते वाचून मी म्हणाले, अरे कलंगड काय ? ते कलिंगड असते.
माहीत नाही तर, एवढे अवघड फळ लिहावे कशाला परीक्षेत ? आंबा तरी लिहावे. सोप्पे आहे ना लिहायला...
झेपत नाही तर अवघड काहीतरी लिहू नये माणसाने.
त्यावर मुलाचे उत्तर असे होते, माझे आवडते फळ कलिंगडच आहे, आणि तसंही आंबा सगळ्याच मुलांनी लिहीले होते, मग काही तरी वेगळे म्हणून मी हे फळ लिहीले आहे.
मी म्हणलं, म्हणजे तुला मार्कही सगळ्यांपेक्षा वेगळेच पडणार आहेत, असं दिसतंय.

एकदा मुलाला, मी पोलीस आणि चोराची गोष्ट सांगत होते.
गोष्टीच्या शेवटी मी मुलाला म्हणाले, ”अशा रितीने, पोलीस त्या आरोपीला पकडतात.”
ते ऐकल्यावर त्याने थंड आवाजात प्रश्न विचारला, लॉँग-फॉर्म काय?
मी विचारले, कशाचा लॉँग-फॉर्म ?
त्याने विचारले, आरोपीचा ?
त्याला आरोपी म्हणजे R-O-P असे वाटले.
ऐकून माझ्यावर ढसाढसा रडण्याचीच वेळ आली.

कधी कधी विचार मनात येतो, का मी माझ्या मुलांना इंग्लिश मिडीअममध्ये घातलं?
मुलांनी पाढे म्हणावेत असे जेव्हा मला वाटते, तेव्हा त्यांना असे सांगावे लागते, ”मुलांनो, टेबल्स म्हणा रे..."
मग ते ओरडून, ”आम्ही टेबल्सही म्हणणार नाही आणि चेअर्सही..." असले फालतू विनोद करतात.
”बे एके बे’... ची लय आणि सर कुठूनही, ” टू वन्स आर टू..." ला काही केल्या येत नाही.
त्यामुळे मुलांकडून पाढे म्हणवून घेतांना, पाढे पाठ असूनही, नेहमी पाढ्यांचे पुस्तक आधी हातात घ्यावे लागते.

अभ्यासाचे पुस्तक वाचले का? विचारल्यावर, मुलगा म्हणतो, ”ते मी कधीच Mind मध्ये read केलंय..."
काय उत्तर आहे वा...ना धड इंग्रजी, ना धड मराठी.
हे असं असल्याने, शिवाजी महारांजाच्या थोर इतिहासातील, "गड आला पण, सिंह गेला" या वाक्यातील गंभीरता, मुलाला इंग्रजीत समजावून सांगतांना, मी निश्चितच कमी पडते.

मध्यंतरी शाळेतून फोन आला, तुम्ही तुमच्या मुलांशी घरी इंग्रजीतून बोलत जा.
कारण शाळेत आम्ही जे इंग्रजीत बोलतो, ते पूर्णपणे तुमच्या मुलीला समजत नाहीये.
मी म्हणाले, अहो, घरात कुठल्याही भाषेत बोलण्यापेक्षा, मुलांवर ओरडण्याचीच वेळ जास्त येते.
मग इंग्रजीतून परिणामकारक वाटेल असे, मी मुलांवर नेमके कसे ओरडू ज्यामुळे माझी, त्यांच्यावर (थोडी तरी) दहशत बसेल...?
म्हणजे, पु. लं नी विचारल्याप्रमाणे, इंग्रजीत कसे गहीवरतात हो ?
त्याप्रमाणे, इंग्रजीतून कसे खेकसतात हो? असे निदान मला तरी विचारावेसे वाटते.
आणि तसंही, मुलांशी मराठीत बोलूनही, त्यांच्या मराठीची ही अशी बिकट अवस्था आहे, तर इंग्लिशमध्ये बोलल्यावर काय होईल ? असाही प्रश्न आहेच.
या बिकट अवस्थेत, ही मुलं, कुसूमाग्रज, पु.ल. कधी वाचणार?
आणि कधी ती त्यांना समजणार व आवडणार असा विचार मला बर्‍याचदा अस्वस्थ करून जातो.

माझ्या, कॉन्व्हेंट-स्कूल मध्ये शिकणार्‍या, लहान मावस भावानेही, एकदा असाच दारूण विनोद केला होता.
आमची घरात, मराठी वाङ्मय या विषयावर चर्चा चालली असता, त्याने विचारले होते, वाङ्मय...? ”हे कोणाचे आडनाव आहे’?
मी म्हणाले, आडनाव नाही रे, वाङ्मय म्हणजे साहित्य.
त्यावर तो म्हणाला, ओके, You mean tools? त्यावर त्याला, tools नाही रे, वाङ्मय म्हणजे, साहित्य, आणि साहित्य म्हणजे लिटरेचर... आणि लिटरेचर म्हणजे काय, तर त्यासाठी तूला थोडे मोठे व्हावे लागेल असे समजावून सांगतांना, केलेली बोळवण मला अजुनही आठवते.
आमच्या लहानपणी, आम्ही किशोर, चांदोबा, विचित्र विश्व, भा.रा. भागवतांचे फास्टर फेणे इत्यादी बालसाहीत्य वाचले.
आज जेरोनिमो स्टील्टन, टीन-टीन, आस्क मी व्हाय? चा जमाना आहे.

मुलांचं आपल्यासारखे पुढे काही अडू नये म्हणून, त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा मी निवडली.
मात्र, मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने, आपलं नेमकं काय अडलं, याचा शोध मला अजुनही लागलेला नाही.
आणि जे काही अडलं, त्यात भाषेचा खरंच काही संबध होता का, असा प्रश्न जेव्हा मी स्वत:ला विचारते, तेव्हा त्यांचे उत्तर निश्चितच, ’नाही’ असे येते.
माझ्या आजूबाजूला कित्येक मंडळी मी अशी बघितली आहेत, जे आपापल्या मातृभाषेतून शिकूनही आयुष्यात प्रचंड यशस्वी झालेली आहेत.
ज्यांनी समाजात मोठं नाव आणि प्रतिष्ठा कमावलेली आहे.
थोर असे, धिरुभाई अंबानी यांनी तर विशेष असे कुठलेही शालेय शिक्षण न घेताही, आयुष्यात दैदीप्यमान असे यश प्राप्त केले आहे.

असो,
एकूणच, इंग्रजी माध्यमातल्या शाळेत घालून मराठीभाषेच्या सुधारणेसाठी, मी माझ्या मुलांकडून, कधी हतबल होवून, तर कधी जोमाने, प्रयत्न करत रहाते.
आणि आज ना उद्या, निदान या दोन्ही भाषेंवर तरी ते अधिपत्य गाजवतील अशी आशा करते.
बाकी, परदेशी भाषा जसे फ्रेंच, चायनीज, जपानी, किंवा जर्मन तर फारच लांबचा पल्ला आहे.
https://www.facebook.com/PallaviAnecdotes

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोकीमीरा..मस्त पोस्ट्स.
प्राची छान कल्पना. मी हाच प्रयोग लेकी बरोबर केला. ( पण मीच अडखळले. ;))
तीचे तीने टिचर टिचर खेळातुन चांगलेच आत्मसात केले. ती टिचर आणि मी विद्यार्थी. क्लास मधे इंग्लिश च बोलायचे या अटि वर ख़ेळ चालु असायचा.
५वीत गेल्यावर मी तीला सांगीतले ' आपली मातृभाषा मराठी आहे. घरात आपण मराठीतुन बोलते. मग तु मला सत्तावन्न अथवा अठ्ठ्याहत्तर म्हणजे किती असे विचारले तर मला फ़ार वाईट वाटेल. जर मातृभाषाच येत नाही तर ही नवी भाषा काय शिकणार असा अर्थ होईल. आणि या साठी आईलाच दोषी धरले जाते.' हे तीला पटले असावे असे वाटते. कारण शाळेच्या लायब्ररीतुन मधे मधे बोक्या सातबन्डे घरी येत असतो. Happy

मस्त चर्चा चालु आहे...

हा वरच्या पोस्ट मधला "शिकवणी" ह्या प्रकाराने मुलांना खुप म्हणजे खुपच ताण येतो...... तो कसा कमी करता येइल ते पहा.......>>>+१

तिला खुप लहान वयात स्टेज वर उभी केली. त्यामुळे भाषेवर आपोआप प्रभुत्व आले. >>>+1000 . दर वर्षी मुलानी एकदा तरी स्टेज वर मराठी , हिंदी किंवा इग्रजी मध्ये बोलले तर त्या मुलाची काही वगळी तयारी करुन घ्यावी लागणार नाही किंवा १ तास बोलावे लागणार नाही. आम्ही घरी फक्त मराठी बोलतो पण मुलाना हिंदी किवा इग्रजी नाटक , स्पीच किंवा आणखी काही गोष्टीसाठी साठी एकदा तरी स्टेज वर पाठवतो त्यामुळे मुल भारता बाहेर राहुन पण हिंदी आणि इग्रजी भाषा आमच्या पेक्षा चांगल्या बोलतात. (मध्ये तर मुलगा सिंगापुर मध्ये ३ तास रेडेओ DJ बरोबर हिंदीमध्ये live गप्पा मारल्या होत्या, गप्पा बरोबर top 25 गाणी पण चालु होती )

मोकिमी.. मस्त पोस्टस!!
गाण्यांच भाषांतर सहीयं Lol

छान, खुसखुशीत आणि सद्य परिस्थितीचे आकलन करून देणारा लेख.

संशोधनातून सिध्द झाले आहे की मातृभाषेतून शिक्षण दिले असता ते मुलांसाठी फायद्याचे असते आणि अशी मुले इतर भाषासुध्दा लवकर आत्मसात करतात. पण आपल्या इथे आज कल पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला आहे. त्याचे मुख्य कारण आहे दहावी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झाल्यावर पुढील महाविद्यालयीन शिक्षण हे मुख्यत्वे इंग्रजी भाषेतून घ्यावे लागते. त्यामुळे असा समज रूढ झाला की, अकरावी-बारावीच्या परिक्षेला मराठी वा इतर तत्सम माध्यमातून शिक्षण घेणार्‍या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मुलांपेक्षा कमी कमी मार्क मिळतात. आणि ती मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मुलांच्या तुलनेत शिक्षणात मागे राहतात.

मी स्वतः मराठी माध्यमातून दहावी केली आणि पुढील शिक्षण हे इंग्रजीतून झाले. सुरवातीला थोडा त्रास झाला पण त्याने काहीच अडले नाही. माझ्या मुलाच्या शाळा प्रवेशावेळी माझे मत त्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा होता. पण घरातून या संकल्पनेला विरोध झाला आणि त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावे लागले. आता माझा मुलगा तिसरीला आहे आणि ज्या परिस्थितीविषयी लेखात लिहीले आहे ती परिस्थिती थोड्याफार फरकाने माझ्या घरी मी सुध्दा अनुभवत आहे. पण रोज थोडा मराठीचा सराव करून घेत असतो. त्यामुळे आता परिस्थितीत थोडाफार फरक जाणवतो आहे. सुलभ मराठी वाचनमाला या नावाने ८ पुस्तकांचा एक संच येतो तो आणलाय त्यातून रोज थोडे मराठी वाचन करून घेतो.

लेखाप्रमाणेच काही प्रतिसाद सुध्दा छान आहेत विशेषतः झक्की आणि मोहन की मीरा यांचे.

भाषा ही भाषा म्हणुन शिकली गेली तर ती लौकर समजते. तीचा जर "विषय" झाला तर गई भैंस पानी मे.....
>>>>>>>>

परफेक्ट .... मस्त पोस्ट मो की मी.

मस्त लेख!
फक्त ते ' मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने, आपलं नेमकं काय अडलं, याचा शोध मला अजुनही लागलेला नाही.' इत्यादी विचारमौक्तिक झेपले नाही. माझ्या वडीलांचे संगणक न वापरल्याने काहीच अडले नाही म्हणूनमाझेही अडू नये असे लॉजिक आहे का?
दुसरे असे की शालेय शिक्षणाचे माध्यम आणि त्यातून भाषेची गंमत कळणे, त्या भाषाजन्य संस्कृतीचा जिव्हाळा असणे याचा कसलाही संबंध नाही. अर्थात तो त्॑सा आहे हा उपभ्रम सर्वच गोष्टी शाळांनीच करायच्या असतात या महाभ्रमातून जन्माला येतो, ते एक असो.

हे पुण्यात घडतय? कठीण आहे!
परवा पुण्यातली एक मैत्रीण सांगत होती की त्यांच्या सोसायटीत 'पावसाची गाणी' असा कार्यक्रम झाला. त्यात तिच्या नऊ वर्षाच्या मुलीने 'ए आई मला..'हे गाण म्हटल.
मोकिमी, पोस्ट्स आवडल्या!

"काका मला ती कॅट इतकी आवडली, मी तिला टच केले तर ती बेबीसारखी माझ्याजवळ आली. मी तर तिची फ्रेंड बनून गेली"

माझ्या मानलेल्या मुलीने (वय वर्षे ७) टाकलेला हा डायलॉग! ती मला कितीही प्रिय असली तरी हा डायलॉग क्षणभर डोक्यात गेलाच.

आज हा लेख व्हॉट्सअ‍ॅप वरुन मिळाला.. लेखिकेचं नाव "एक व्यथित शिक्षिका" असे बदलून.
तो ज्या ग्रुपवर टाकला गेला तिथुन अजुन किमान २०० जणांना तो ढकलला जाणार हे नक्की म्हणुन लगेच मुळ लेखिकेचे आताचे अन पुर्वाश्रमीचे नाव कळवले. माहित नाही किती जण ते नाव डकवायचे कष्ट घेतील..

माझ्या मुलाचा मोठा आग्रह होता की मी ' त्याच्या ' दोन्ही मुलांशी ' इंग्रजीतूनच ' संभाषण करावे , जेणेकरून त्यांचे इंग्रजी उत्तम होईल. पण माझे म्हणणे होते की , इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला आहे तर तेथे इंग्रजीत बोलतीलच, पण मराठीत उत्तम बोलण्यासाठी कधी शिकतील ? ( नाहीतरी माझे अकरावी (जुनी ) पावेतोचे शिक्षण मराठी ' माध्यमातूनच ' झाले असल्याने , माझे इंग्रजी ' मध्यम ' च होते. इंजीनियरिंगला गेल्यानंतर इंग्रजीत सुधारणा झाली ही गोष्ट वेगळी ! !
मी माझ्या नातवांशी ( आता वय वर्षे सात ) मराठीतुनच संवाद साधला, मराठीतुनच त्यांना गोष्टी सांगितल्या. आज ते छान मराठीत बोलतात. मराठीतुन तोडीस तोड तर्क लावतात.याचा मला तरी अभिमान आहे. घरात मराठी, मित्रांबरोबर खेळतांना हिन्दी, सूनबाईच्या आई-वडिलांकडे गेल्यावर उत्तम गुजराथी भाषेत , आणि शाळेत हिन्दी व इंग्रजीत अशी चार ठिकाणी , चार वेगळ्या भाषेत त्यांची प्रगती होत आहे.
लेख व त्यावरील प्रतिक्रिया खुपच छान. हहपुवा.

आपल्या मुलांना दोन्ही भाषा व्यवस्थित येण्यासाठी आम्हाला ही पद्धत फारच सोयीची वाटली.
एका पालकानी फक्त मराठीत बोलायचं आणि दुसर्यानी फक्त इंग्रजीत. सहावी सातवीपर्यंत भाषांची गाडी व्यवस्थित रुळावर आली आणि असं करण्याची जरूर संपली.

ह्यात दोषारोपणाचे सर्वत्रिकरण होते आहे का??

मी स्वतः कॉन्व्हेंट मध्ये शिकलोय, अगदी बालवाडी (नर्सरी, लोवर केजी, अप्पर केजी) ते दहावी, १३ वर्ष, माझी अवस्था कधीच इतकी वाईट नव्हती, तुमच्या मुलांची का आहे ह्याचा शोध घ्या, ही कळकळीची विनंती. शिक्षण तेही भाषेचे त्यातही मातृभाषेचे देणारे शिक्षक किती जबाबदारीने शिकवतात ह्यावर बरेच काही अवलंबून असते, यच्चयावत मराठी माध्यमात शिकलेल्या मित्रांना सुद्धा मी मराठी लेखन/वाचनात अडखळताना पाहिले आहे. त्यामुळे नुसत्या माध्यमावर खापर फोडण्यात हशील नाही हे माझे वैयक्तिक मत आहे.

आमच्या शाळेत, इयत्ता ५वीलाच मराठी सुरु झाले शिकवायला, पण त्याच्या आधीपासून आईवडिलांनी घरी मेहनत घेतली होती आमच्यावर, नाही काही तर 'उडती सतरंजी' 'गुलबकावलीचं फुल' श्रीकांत गोवंडेंचे बालसाहित्य वगैरे आम्हाला दर सुट्ट्यात वाचायला मिळत असे. रस जागवला गेला होता, ५वी मध्ये मराठी सुरु झाले तेव्हा मुळाक्षरे अन बाराखडी शिकवायला आम्हाला सिस्टर एग्नेस डिकोस्टा नामे एक चक्क मल्याळी सिस्टर होती, ५वीच्या पोरांना मातृभाषा महत्व समजवून सांगायचे त्यांचे कौशल्य आज मागे वळून पाहता जाणवते, बाई कधी एखादी बालकथा सांगत कधी एखादी छोटी संस्कारक्षम कविता सांगत. हे बेस वर्क आमच्यावर (शाळेत) झाले होते. मिडल स्कुल ला (७वी) आल्यावर एक टीचर होत्या देशमुख म्हणुन, त्यांनी समजवलेले कवितेचे ससंदर्भ स्पष्टीकरण अन रसग्रहण आजही लख्ख आठवते, त्यात शाळा माध्यम वगैरे कधीच आडवे आले नाही, शाळेत वार्षिक पेरेंट्स डे (गॅदरिंग) आला की निव्वळ नाच गाणी नसत, नाचात/गाण्यात एक मराठी गाणे असलेच पाहिजे , एक मराठी एकांकिका असलीच पाहिजे,हा आमच्या मुख्याध्यापिका सिस्टर क्लेयर पिंटो ह्यांचा कटाक्ष असे (ह्या स्वतः बोरकरांच्या कविता घेऊन मेहफिली जमवत अन उत्तम कोकणी बोलत असत).

तुमच्या मुलाच्या शाळेत असे कार्यक्रम होतात का? नसल्यास पालक म्हणून तुम्ही पाठपुरावा केलाय का? अहो ती पोरे कोवळी आहेत त्यांना भाषेचे महत्व फक्त 'वार्षिक परीक्षा पास कारण्यापूरते' सांगितले तर ती त्याचे महत्व तितकेच समजणार. बरं मराठी (इंग्रजी माध्यमात) थर्ड लॅनग्वेज असूनही पाठयक्रम काही अगदीच टाकाऊ नसतो, आम्हाला तर (इयत्ता नववी मध्ये) चक्क एकच प्याला मधले सिंधू-सुधाकर ह्यांचे उतारे असत, गंगाधर पांतावण्यांचे लेख असत, लोकहितवादींची पत्रं असत, शाहीर अमर शेखांच्या कविता असत. अतिशय समृद्ध पाठयपुस्तक होते ते.

अश्या सगळ्या अनुभवामुळे एकंदरित, दोष माध्यमाला द्यायचा हे काही (मला तरी) पटण्यासारखे नाही.

असो.

पल्लवी तुमचा हा लेख व्हॉट्सऍपवर (तुमच्या नावाशिवाय) फॉरवर्ड होतो आहे. आज मला आला, मी तो तुमचे नाव घालून परत फॉरवर्ड करत आहे.
माबोवरचे आवडलेले लेख फॉरवर्ड करताना नावासहित करायला हवे.

चांगले लिहिले आहे, नेमकी वस्तुस्थिती मांडली आहे.
यावरुन हे नक्कीच होते की गेल्या पाचपंचवीस वर्षात लाखोंच्या संख्येने किती भारतीय मुले (सर्व भाषिक) आपापल्या मातृभाषांपासुन दुरावून आपल्याच संस्कृतीपासुन "परकी" बनली आहेत.

(आता लग्गेच येतिल काहीजण " आले संस्कृतीरक्षक - डब्बल ढोलकी - पालथे घडे" वगैरे टीका करायला, Proud तिकडे मी दुर्लक्ष करतो)

आगाऊ +१
मुलं ऐकून ऐकून मराठी शिकणार. आपणच जर धेडगुजरी (मराठी इंग्लिश मिसळून) बोलत असू तर ती तेच अनुकरण करणार. आपल्याला एरवी लक्षात येत नाही पण आपल्या बोलण्यात अनेक इंग्लिश शब्द येतात. किंवा मुलांना इंग्लिश कळावं, जास्त चांगलं यावं म्हणून अनेक घरांत मराठी क्रियापदे तशीच ठेवून इतर शब्दांना इंग्लिश समानार्थी शब्द वापरले जातात. मूल तसंच शिकणार की मग....
आणि तुमचं अडलं नाही असं जर वाटतं आहे तर मग मुलाला नका घालू इंग्लिश माध्यमात. कुणी जबरदस्ती केली आहे का? मराठी माध्यमांतील कितीतरी जणांचे शुद्धलेखन आणि व्याकरण निव्वळ भयंकर असते (आणि इंग्लिश माध्यमात शिकलेल्या लोकांचे इंग्लिश) हे अगदी जवळून बघितले आहे. अत्यंत खेदाने लिहिते आहे पण खुद्द धागाकर्तीनेच लिखाणात शुद्धलेखनाच्या चुका केल्या आहेत. कृपया निदान कुसुमाग्रजांचं नाव तरी शुद्ध लिहा....
आणि मुलांवर सतत ओरडणे, दहशत वाटावी अशी इच्छा इ. वर मला टिप्पणीही करायची नाही कारण माझ्या पालकत्वाच्या संकल्पनेत ते कदापिही बसत नाही
.... पण मुलाने इतरांपेक्षा वेगळं फळ आठवून लिहायचा प्रयत्न केला त्यासाठी त्याला कौतुक करायचं आणि फक्त एका वेलांटीची असलेली चूक सुधारून सांगायचं सोडून जर तुम्ही दिलात तसा प्रतिसाद दिला तर ते मूल पण मेंढरांच्या कळपाच्या मनोवृत्तीचं होणारच. स्वतःचं डोकं चालवून समोरून प्रोत्साहन मिळत नसेल तर काही दिवसांनी इतर लिहितात तेच घोकंपट्टी करून लिहिणार. मग आपणच मोठे झाल्यावर म्हणणार की हल्लीच्या मुलांना स्वतंत्र विचार करायला नको....

आणि इंग्लिशमधे (किंवा इतर कुठल्याही भाषेत) मस्तच गहिवरता, खेकसता येतं. आपली ती भाषा तेवढी सशक्त पाहिजे फक्त Wink

माझ्या मुलाच्या शर्ट/पँटला 'होक' पडतं. 'होक' काय असतं हे समजवण्यासाठी त्याला पॅंट आणुन दाखवावी लागली. मग कळल. होल + भोक या दोन मराठी आणि इंग्लिश शब्दांमधुन जन्माला आलेलं अपत्य 'होक'.

त्यांच्या स्कुलबसमधे असणार्या एका 'वेरी डिसगस्टींग' मुलाने याच्या मित्राच्या अंगावर 'थुंकी मारली' होती. Lol

गंमती होतात, हसु येतं, चुका सुधारतो, पण मला फ्रस्ट्रशेन वगैरे येत नाही. त्याचं इंग्लिश उत्कृष्ठ आहे. शेक्सपिअर, टॉल्स्टॉयपासुन नविन लेखकांपर्यंत तो भरपुर आणि समजुन वाचतो. त्यामधले कित्येक शब्द निबंधांमधे सहजतेने वापरल्या गेल्यामुळे त्याचं शाळेत अनेक वेळा कौतुक झालं आहे. मातृभाषेमधली पुस्तकं नाही वाचली जात, पण मला त्याचं वाईट नाही वाटत कारण कुसुमाग्रज आणि पुलं राहुन गेले तरी बाकी कित्येक लेखक वाचतो. साहित्य वाचलं जातंच आहे, आवड आहेच, तर पुढे मराठी सुद्धा वाचेल.

मस्त लेख ! आणि प्रतिसादही कित्येक भारी विनोदी आहेत.

भोक आणि होल = होक .. हे भारीय):) आपणही बरेचदा बोलून जातो असे. मी तरी बोलते. मराठीत बोलताना एखाद शब्द ईंग्रजीने सुरू करत मराठीने संपवतो वा व्हायसे वर्सा.

Pages