इंग्लिश मिडीअम मध्ये शिकणारी मराठमोळी मुलं

Submitted by पल्लवी अकोलकर on 11 July, 2015 - 09:00

नुकतेच मुलांच्या परीक्षेचे टाईम-टेबल मिळालेले आहे.
त्यामुळे सध्या घरात अभ्यासाचे वातावरण आहे.
अभ्यासाचे म्हणण्यापेक्षा, आभासाचे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
असो,
टाईम-टेबलवर नजर टाकल्यावर मी नकळतच निवांत झाले होते.
पहिलाच पेपर मराठी भाषेचा आहे.
म्हणलं, चला मराठीचा पेपर म्हणजे, सुरुवात तरी चांगली आहे.
निदान विषय तरी सोप्पा आहे.
कारण अर्थातच, इंग्लिश मिडीअमच्या विद्यार्थ्यांना, लोअर लेव्हलचे मराठी असते.

पण माझ्या, इयत्ता ५ वीच्या मुलाचा अभ्यास घेतांना लक्षात आले, प्रकरण फारच गंभीर आहे.
घरात जरी मातृभाषा बोलली जात असली तरी, इंग्लिश मिडीअमच्या मुलांचे, मराठीचे ज्ञान किती अगाध असू शकते, याची प्रचिती, मला मुलाचा अभ्यास घेतांना आली.
माझा मुलगा, आणि त्याचा मित्र दोघेही अभ्यासाला बसल्यावर, मी त्यांना समानार्थी शब्द विचारायला सुरूवात केली.
मी : वाढदिवस = ? त्यांचे उत्तर : बर्थ डे
मी : पाचोळा = ? त्यांचे उत्तर : वाळलेल्या झाडांचा कुस्करा (?)
मी : पक्षी = ? त्यांचे उत्तर : पशू
मी : तोंड = ? त्यांचे उत्तर : थोबाड
मी : रात्र = ? त्यांचे उत्तर : गगन
मी : निधन = ? त्यांचे उत्तर : डोळे
इतका वेळ संयमाने घेत असूनही, हळूहळू माझा पारा चढायला लागला.
मी म्हणाले, निधन म्हणजे डोळे?
तर ते आत्मविश्वासाने ’हो’ म्हणाले.
मी विचारले, काय संबध ? निधन म्हणजे मृत्यू!
तर ते म्हणाले, ओके ओके, आत्ता आठवलं, नयन म्हणजे डोळे...”आमचा थोडा(?) गोंधळ झाला.”
अशा रितीने त्यांना, बहर, मोहोर इत्यादी शब्दांचा अर्थ समजावून सांगूनही लक्षात येत नव्हते, या दोन्हीत नक्की काय फरक आहे.

माझा पुढचा प्रश्न होता :-
पुढील शब्दांचे अनेकवचन सांगा.
मी : आंबा? त्यांचे उत्तर : आंबेज
अशा रितीने आमच्यात, अभ्यास कमी आणि खडाजंगीच जास्त होवू लागली.
संतापाच्या भरात मला काहीही बोलता येत नव्हते.

मी मैत्रीणीला, माझे दू:ख सांगितल्यावर, तिने तिच्या दू:खाची त्यात भर टाकली.
तिच्या मुलाने, "पुढील शब्दांचे वाक्यात उपयोग करा" नावाचा प्रश्न पुढीलप्रमाणे सोडविला होता.
१. तुरुतुरु : मी तुरुतुरु जेवतो.
२. थूई थूई : पाऊस थूई थूई पडतो.
३. सळ सळ : नदी सळसळ वाजत होती.
४. मुळूमुळू : मोर मुळूमुळू चालत होता.
५. रिमझिम : मी रिमझिम नाचतो.
आता, यात नेमकं काय चूकलं आहे, हे त्याला समजावून सांगणे हे, माझ्यासारखेच माझ्या मैत्रीणीच्याही आवाक्याबाहेरचे होते.
कारण हसण्यातच आमचा बराच वेळ गेला.
परंतु, परिस्थिती अशी आहे, आपल्यास जे शब्द कानाला ऐकून सहज सोपे वाटतात, ते ह्या मुलांच्या डोक्यावरून गेलेले असतात.
आणि चूक त्यांचीही नाहीये, कारण मुळूमुळू, रिमझिम सारखे शब्द आपल्या बोली भाषेतही क्वचितच येतात.

पण त्यामुळे, मला अचानकच एक शोध लागला आहे, तो म्हणजे जगातील सगळ्यात आनंदी, आणि हसून गडाबडा लोळणारी व्यक्ती कोण असू शकते?
तर ती म्हणजे, इंग्रजी मिडीअमच्या शाळेतील, मराठी विषय शिकवणारी शिक्षिका.

निबंध लिहा,
"माझा आवडता प्राणी"
माझा आवडता प्राणी कुतरा आहे.
आता एखाद्या निबंधाची सुरूवातच अशी असेल, तर विचार करा, पुढे किती गमती जमती असतील.
”माझे आवडते फळ”
पहिलीच ओळ.....
माझे आवडते, फळ कलंगड आहे.
ते वाचून मी म्हणाले, अरे कलंगड काय ? ते कलिंगड असते.
माहीत नाही तर, एवढे अवघड फळ लिहावे कशाला परीक्षेत ? आंबा तरी लिहावे. सोप्पे आहे ना लिहायला...
झेपत नाही तर अवघड काहीतरी लिहू नये माणसाने.
त्यावर मुलाचे उत्तर असे होते, माझे आवडते फळ कलिंगडच आहे, आणि तसंही आंबा सगळ्याच मुलांनी लिहीले होते, मग काही तरी वेगळे म्हणून मी हे फळ लिहीले आहे.
मी म्हणलं, म्हणजे तुला मार्कही सगळ्यांपेक्षा वेगळेच पडणार आहेत, असं दिसतंय.

एकदा मुलाला, मी पोलीस आणि चोराची गोष्ट सांगत होते.
गोष्टीच्या शेवटी मी मुलाला म्हणाले, ”अशा रितीने, पोलीस त्या आरोपीला पकडतात.”
ते ऐकल्यावर त्याने थंड आवाजात प्रश्न विचारला, लॉँग-फॉर्म काय?
मी विचारले, कशाचा लॉँग-फॉर्म ?
त्याने विचारले, आरोपीचा ?
त्याला आरोपी म्हणजे R-O-P असे वाटले.
ऐकून माझ्यावर ढसाढसा रडण्याचीच वेळ आली.

कधी कधी विचार मनात येतो, का मी माझ्या मुलांना इंग्लिश मिडीअममध्ये घातलं?
मुलांनी पाढे म्हणावेत असे जेव्हा मला वाटते, तेव्हा त्यांना असे सांगावे लागते, ”मुलांनो, टेबल्स म्हणा रे..."
मग ते ओरडून, ”आम्ही टेबल्सही म्हणणार नाही आणि चेअर्सही..." असले फालतू विनोद करतात.
”बे एके बे’... ची लय आणि सर कुठूनही, ” टू वन्स आर टू..." ला काही केल्या येत नाही.
त्यामुळे मुलांकडून पाढे म्हणवून घेतांना, पाढे पाठ असूनही, नेहमी पाढ्यांचे पुस्तक आधी हातात घ्यावे लागते.

अभ्यासाचे पुस्तक वाचले का? विचारल्यावर, मुलगा म्हणतो, ”ते मी कधीच Mind मध्ये read केलंय..."
काय उत्तर आहे वा...ना धड इंग्रजी, ना धड मराठी.
हे असं असल्याने, शिवाजी महारांजाच्या थोर इतिहासातील, "गड आला पण, सिंह गेला" या वाक्यातील गंभीरता, मुलाला इंग्रजीत समजावून सांगतांना, मी निश्चितच कमी पडते.

मध्यंतरी शाळेतून फोन आला, तुम्ही तुमच्या मुलांशी घरी इंग्रजीतून बोलत जा.
कारण शाळेत आम्ही जे इंग्रजीत बोलतो, ते पूर्णपणे तुमच्या मुलीला समजत नाहीये.
मी म्हणाले, अहो, घरात कुठल्याही भाषेत बोलण्यापेक्षा, मुलांवर ओरडण्याचीच वेळ जास्त येते.
मग इंग्रजीतून परिणामकारक वाटेल असे, मी मुलांवर नेमके कसे ओरडू ज्यामुळे माझी, त्यांच्यावर (थोडी तरी) दहशत बसेल...?
म्हणजे, पु. लं नी विचारल्याप्रमाणे, इंग्रजीत कसे गहीवरतात हो ?
त्याप्रमाणे, इंग्रजीतून कसे खेकसतात हो? असे निदान मला तरी विचारावेसे वाटते.
आणि तसंही, मुलांशी मराठीत बोलूनही, त्यांच्या मराठीची ही अशी बिकट अवस्था आहे, तर इंग्लिशमध्ये बोलल्यावर काय होईल ? असाही प्रश्न आहेच.
या बिकट अवस्थेत, ही मुलं, कुसूमाग्रज, पु.ल. कधी वाचणार?
आणि कधी ती त्यांना समजणार व आवडणार असा विचार मला बर्‍याचदा अस्वस्थ करून जातो.

माझ्या, कॉन्व्हेंट-स्कूल मध्ये शिकणार्‍या, लहान मावस भावानेही, एकदा असाच दारूण विनोद केला होता.
आमची घरात, मराठी वाङ्मय या विषयावर चर्चा चालली असता, त्याने विचारले होते, वाङ्मय...? ”हे कोणाचे आडनाव आहे’?
मी म्हणाले, आडनाव नाही रे, वाङ्मय म्हणजे साहित्य.
त्यावर तो म्हणाला, ओके, You mean tools? त्यावर त्याला, tools नाही रे, वाङ्मय म्हणजे, साहित्य, आणि साहित्य म्हणजे लिटरेचर... आणि लिटरेचर म्हणजे काय, तर त्यासाठी तूला थोडे मोठे व्हावे लागेल असे समजावून सांगतांना, केलेली बोळवण मला अजुनही आठवते.
आमच्या लहानपणी, आम्ही किशोर, चांदोबा, विचित्र विश्व, भा.रा. भागवतांचे फास्टर फेणे इत्यादी बालसाहीत्य वाचले.
आज जेरोनिमो स्टील्टन, टीन-टीन, आस्क मी व्हाय? चा जमाना आहे.

मुलांचं आपल्यासारखे पुढे काही अडू नये म्हणून, त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा मी निवडली.
मात्र, मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने, आपलं नेमकं काय अडलं, याचा शोध मला अजुनही लागलेला नाही.
आणि जे काही अडलं, त्यात भाषेचा खरंच काही संबध होता का, असा प्रश्न जेव्हा मी स्वत:ला विचारते, तेव्हा त्यांचे उत्तर निश्चितच, ’नाही’ असे येते.
माझ्या आजूबाजूला कित्येक मंडळी मी अशी बघितली आहेत, जे आपापल्या मातृभाषेतून शिकूनही आयुष्यात प्रचंड यशस्वी झालेली आहेत.
ज्यांनी समाजात मोठं नाव आणि प्रतिष्ठा कमावलेली आहे.
थोर असे, धिरुभाई अंबानी यांनी तर विशेष असे कुठलेही शालेय शिक्षण न घेताही, आयुष्यात दैदीप्यमान असे यश प्राप्त केले आहे.

असो,
एकूणच, इंग्रजी माध्यमातल्या शाळेत घालून मराठीभाषेच्या सुधारणेसाठी, मी माझ्या मुलांकडून, कधी हतबल होवून, तर कधी जोमाने, प्रयत्न करत रहाते.
आणि आज ना उद्या, निदान या दोन्ही भाषेंवर तरी ते अधिपत्य गाजवतील अशी आशा करते.
बाकी, परदेशी भाषा जसे फ्रेंच, चायनीज, जपानी, किंवा जर्मन तर फारच लांबचा पल्ला आहे.
https://www.facebook.com/PallaviAnecdotes

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मात्र, मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने, आपलं नेमकं काय अडलं, याचा शोध मला अजुनही लागलेला नाही.<<<

खरोखर काहीही अडले नाही. अडत नाही. बर्‍यापैकी इंग्लिश बोलण्याचा सराव, बोलू शकणे हे प्रकार माझ्याबाबतीत नोकरीला लागल्यावरच झाले. इतकेच काय तर नोकरीतील पूर्ण कालावधीतीलही अनेक वर्षे इंग्लिश नीटसे न येत असतानाही व्यवस्थित गेली.

लेखातील अनेक पंचेस (काही दुर्दैवाने खरे घडलेले प्रसंग) वाचून प्रचंड हसू आले. अतिशय खुसखुशीत लेख! मोर मुळुमुळू चालत होता हे वाचून वाचन थांबवून पाठ मागे रेलून हसलो.

पण एकंदर सगळेच दुर्दैवी आहे.

मी येईल
तो व्यक्ती
खूप सारे
तू दिसलेला / मी आलेलो

हे असे प्रकार आणखी निराळेच!

मस्त लेख आहे.
त्यामुळे मुलांकडून पाढे म्हणवून घेतांना, पाढे पाठ असूनही, नेहमी पाढ्यांचे पुस्तक आधी हातात घ्यावे लागते>>>>>>>अक्षरशः!
तुमचा मुलगा लहान आहे.मराठी लिपी आणि शब्द आठवणे कठीण होत असावे.
बाकी बेफींनी म्हटल्याप्रमाणे तसाही सगळीकडेच आनंद आहे." मला पेन भेटल","मीनी(मी) पुस्तक वाचल",पेपरमध्ये किंवा टी.व्हीवरील बातम्यांच्यावेळी ज्या बातम्या दर्शवतात त्यांचे शुद्धलेखन हे सारे पाहून खेद वाटतो.आपलं चुकलं तर निदान काय बरोबर आहे हे जाणून पुढच्यावेळी चुका न होतील याची काळजी घेणे दूर राहिले.

मस्त लिहिलं आहे Happy
कंटेण्ट आणि स्टाईल दोन्ही कंटेण्ट करतात (लेन्ग्थ पण)

> "गड आला पण, सिंह गेला"

हे 'गड पण आला, सिंह पण गेला' असं हवं ना?

लेख खुसखुशीत आणि मस्त . विचार शैली आणि मांडणी तिन्ही मस्त. हसता हसता विचार करायला लावणारा.

हल्ल्ली मुळात इंग्लीश मिडीयमला का घालायचे तर इंग्लीश चांगलं यायला हवं म्हणून नाही तर त्यांना चागली कंपनी मिळावी म्हणून. हे लिहायला चांगल वाटत नाहीये तरी मराठी मिडीयमला मध्यम वर्गातली कोणी ही मुलं जात नाहीत. त्यामुळे काळाच्या प्रवाहा बरोबर आपल्याला ही जावेच लागते.

काळाच्या ओघात काही भाषा नामशेष होतील ही कदाचित. पण त्याला काय इलाज? संस्कृत , पाली अर्धमागधी भाषांचं काय झालयं? मोडी लिपी आज किती जणांना येते? काळाचा महिमा अगाध आहे तेव्हा जास्त वाईट वाटुन घेऊ नका. दोन दोन भाषांचा ताण त्याला देऊ नका. जेवढ पाहिजे तेवढच शिकवा त्याला. मराठी साहित्य ही त्यांने नाही वाचलं तरी काय बिघडणार आहे? शिवराम परांजपे वैगेरे मागील शतकातील किती जणाचे साहित्य तुम्ही स्वतः वाचले आहे हे स्वता:लाच विचारा. म्हणजे उत्तर आपोआप मिळेल.

चुकुन दोन धागे निघाले आहेत का ? एक डिलीट करायला सांगा अ‍ॅडमिन ना

लेख मजेदार आहे. मैत्रिणीचा पिल्लू बर्फी-४ चे टायटल साँग नक्की लिहीणार. सो क्यूट!

हे वाक्य "गड आला, पण सिंह गेला." असे लिहीतात (बहुतेक.). "गड आला पण, सिंह गेला" लिहील्याने अर्थछटा (नुआंस) बदलते. "गड आला" हा 'मेन क्लॉज' सिंहगड (कोंढाणा) जिंकला ह्या अर्थाने आहे. "पण सिंह गेला." हा सबॉर्डिनेट क्लॉज "पण सिंहासारखा तानाजी मालुसरे वारला." अशा निराशापूर्ण अर्थाने आहे. "गड आला पण," असे लिहीले की १) गड किती पटकन मिळाला असा अर्थ जाणवतो २) सबॉर्डिनेट क्लॉज "सिंह गेला" ह्यात निराशा जाणवत नाही.
जाणकार अनेक आहेत, ते सविस्तर लिहीतीलच.

लॉँग-फॉर्म काय?
त्याला आरोपी म्हणजे R-O-P असे वाटले. Lol

भारी लेख आहे.. विषय सुद्धा .. अन खरेचय.

मी मराठीत शिकलो आणि माझ्या चुलत बहिणी ईंग्लिश मिडीयमच्या होत्या. जेव्हा मी अर्ध्या चड्डीत शाळेत जायचो आणि त्या कॉलेजला होत्या, तेव्हा त्या सत्तेचाळीस म्हणजे किती, शहात्तर म्हणजे सेवंटीएट का, असे आकड्यांचे अगाध ज्ञान दाखवायचे, आणि या एवढ्या मोठ्या ताई आपल्या अश्या कश्या म्हणून मला हसायला यायचे, कारण मला दोन्ही भाषेत १ ते १०० आकडे यायचे.

अर्थात यात खरा दोष आपलाच आहे. कोणत्याही मिडीयमच्या शाळेत टाका पण मग दुसरी भाषा कच्ची राहणार नाही याची काळजी घरी घ्या.
@ धागाकर्ती, वैयक्तिक घेऊ नका, जनरल स्टेटमेंट करतो, पण ही स्थिती गंभीर आहे हे पाचवीत मुलाचा मराठीचा अभ्यास घेताना कळण्यापेक्षा हे असेच होणार हे लहानपणापासूनच ओळखून तेव्हापासूनच त्यांची मातृभाषा समृद्ध करायला घ्यायला हवे ..

लेख खुसखुशीत आणि मस्त +१
दुपारीच 'टू वन्स आर' म्हणुन झालयं भाच्यासोबत.. वन्झार वन्झार करुन वैताग आला !
त्यात त्याची भाषामिसळ वेगळीच! घरी मराठी, सोसातटीत हिंदी, शाळेत इंग्रजी.. 'मी गेम खेळुन जितुन आलो!!'...मला समजायला ५ मिनिट लागली Uhoh

माझ्या मित्राची मुलगी अमेरिकेत जन्मली, शिकली, वाढली, पण मराठी बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करते. एकदा तिला म्हणायचे होते माझ्या लहान मुलाला (विक्रमला) आंघोळ घालून येते. त्या ऐवजी ती म्हणाली, थांब जरा, मी विक्रमला विसळून येते.

पुढे एकदा विक्रमने टेबलावर ठेवलेली अ‍ॅपल पाय ची डिश उचलून खाली जमिनीवर ठेवली. अरे हे काय केलेस म्हंटल्यावर म्हणाला मॉम सेज नो पाय ऑन टेबल.

भारी चर्चा सुरु आहे ." नो पाय ऑन टेबल Happy "
माझ्या एका मैत्रिणीला मी म्हणाली कि तुझ्या मुलगा अगदी तुझ्यावर पडला आहे , तर बाळराजे म्हणतात कसे , "नाही नाही मी गुढग्यावर पडलो आहे ! Happy

मंडळी, तुमच्या माझ्या या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचून मलाही खुप छान वाटतेय.
मला हा लेख लिहीत असतांना, अजिबातच वाटले नव्हते, कि सगळीकडे(एवढ्या मोठ्या प्रमाणात) अशीच परिस्थिती असेल.
समदु:खी आहोत, म्हणल्यावर बरे वाटते माणसाला.
असो,
’मायबोली’चे खुप उशिराने, सभासदत्व घेतले आहे.
त्यामुळे..."कधीच नाही त्यापेक्षा उशिरा बरे..." या म्हणीनुसार ”देर आए, दुरूस्त आए...”अशी माझी परिस्थिती आहे.
पण छान वाटतंय, तुम्हा सगळ्यांना इथे भेटून.
नवीन सभासद असल्याने, माझ्याकडून लिहीण्यात, काही व्याकरणाच्या चुका/टायपो होण्याची शक्यता आहे, तेव्हा सांभाळून घेणे.
धन्यवाद,
पल्लवी अकोलकर

<त्यावर मुलाचे उत्तर असे होते, माझे आवडते फळ कलिंगडच आहे, आणि तसंही आंबा सगळ्याच मुलांनी लिहीले होते, मग काही तरी वेगळे म्हणून मी हे फळ लिहीले आहे.>

यासाठी खरं म्हणजे मुलाला १ गुण जास्तीचा मिळायला हवा.

<हल्ल्ली मुळात इंग्लीश मिडीयमला का घालायचे तर इंग्लीश चांगलं यायला हवं म्हणून नाही तर त्यांना चागली कंपनी मिळावी म्हणून. हे लिहायला चांगल वाटत नाहीये तरी मराठी मिडीयमला मध्यम वर्गातली कोणी ही मुलं जात नाहीत.> यावर लिहिण्यासारखं बरंच काही आहे. पाहू.

खुसखुशित लेख आवडला.

दोष मुलांचाही नाही आणि माध्यमाचाही. घरात मातृभाषा म्हणून मराठी बोलणे वेगळे आणि भाषेचा अभ्यास वेगळा. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे म्हणून इंग्रजीवर आपोआप प्रभुत्व येणार नाही तसेच मातृभाषा मराठी आहे म्हणून मराठीवर आपोआप प्रभुत्व येणार नाही.
मी एका लहान गावात मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. अवांतर वाचनासाठी बालसाहित्य वगैरे मोजक्या घरातून उपलब्ध होते. गावातील वाचनालयातूनही त्याच मोजक्या घरातील मुले बालसाहित्य आणून वाचत. शाळेच्या वाचनालयातली पुस्तके बंद कपाटात. कधीतरी ऑफ पिरीअडला त्यातले पुस्तक बाई वाचायला आणायच्या. शाळेत मराठीचा तास म्हणजे बरेचदा पुस्तकातला धडा पहिल्या बाकापासून क्रमाक्रमाने थोडा थोडा वाचणे आणि जड शब्दांचे अर्थ वहीत लिहून घेणे. धड्याखालील प्रश्नांची छापील उत्तरे लिहिणे अपेक्षित असे. कवितेचे रसग्रहण वगैरे एक विनोदच असायचा. निबंधात समुद्र झुळूझुळू वहात होता वगैरे सर्रास लिहिले जायचे. पहिली ते दहावी विचार करता एका हाताच्या बोटांपेक्षाही कमी शिक्षक भाषेचा अभ्यास म्हणून मराठी शिकवणारे, मराठीवर प्रेम करणारे लाभले. हिंदी, इंग्रजी वगैरेची परीस्थिती त्याहून वाईट होती. ३५ टक्क्याला पास असल्याने मुले वरच्या वर्गात जायची इतकेच.

R O P बेस्ट आहे ! Lol

माझा मुलगा तिसरीत आहे पण त्याच्या शाळेत मराठीची गाडी फारच संथ चाललीय. अजूनही मुळाक्षरं, व्यंजनं, गाणी असेच चालू आहे ( हिंदीचेही तेच ! ) त्यामुळे अशी खडाजंगी अनुभवायची वेळ अजून आली नाही. मात्र मध्ये मध्ये तो व्हॉट्सअ‍ॅपवरुन आजीशी मिंग्लिशमधून ( भाषा मराठी, लिपी रोमन ) गप्पा मारतो तेव्हा त्याने काही काही शब्दांचे स्पेलिंग खूप मजेशीर लिहिलेले दिसते.
बोलीभाषा आणि लिपीतला फरक आपण गृहित धरतो आणि लिहिताना आपसूक तो शब्द शुद्ध लिहितो पण तो जसा ऐकू येतो तसाच तो शब्द लिहितो ( उदा. 'मग' हा शब्द बोलतान 'म' असा उच्चारला जातो किंवा 'मला माहिती आहे' हे मला म्हाइतिये असं म्हणतो. ) किंवा काही शब्द त्याला वेगळेच 'दिसतात' हे मला त्याने लिहिल्यावर समजलं Happy


मायबोलीवरील प्रख्यात लेखक व कवी श्री बेफिकीर यांनी या लेखाची दखल घेत पैलाच प्रतिसाद नोंदविला हेच या लेखनाच्या यशाचे गमक म्हणावे लागेल. येरवी श्री बेफिकीर कुण्या ललित लेखनाची दखल घेताना (_फारसे_) दिसून येत नाहीत.

½
मराठी किंवा मातृभाषेतून शिक्षण चांगले, की आंग्लभाषेतून, या हातखंडा विषयावरील लेखन सुलभ व हलके म्हणून घेतले तर उत्तम आहे.

१½
जाताजाता,

१. तुरुतुरु : मी तुरुतुरु जेवतो.
२. थूई थूई : पाऊस थूई थूई पडतो.
३. सळ सळ : नदी सळसळ वाजत होती.
४. मुळूमुळू : मोर मुळूमुळू चालत होता.
५. रिमझिम : मी रिमझिम नाचतो.

या लिस्टीतल्या जोड्या ओढून-ताणून चुकवल्या आहेत असे मलाच एकट्याला वाटते आहे काय?

(रिमझिम पाऊस, थुईथुई मोर, सळसळ वाजणारी पाने, इ. ?)

<<<<काही व्याकरणाच्या चुका/टायपो होण्याची शक्यता आहे,>>>

हा, हा!

इथल्या अर्ध्या अधिक लोकांना कळणारपण नाहीत चुका झाल्या हे.
आता काही लोक आहेत इथे असे जे कमळे बघायची सोडून त्या खालचा चिखलच बघत असतात, त्यांना फक्त चुकाच कळतात, बाकीचे काही कळतच नाही. आणि दुसर्‍याच्या चुका आपण जाहीरपणे दा़खवून दिल्या की आपण किती हुषार असे त्यांना वाटते! तेव्हढीच अक्कल त्यांची !!

ही भारतात इंग्रजीतून सगळं शिकून आलेली मुले इथे आली की त्यांचे इंग्रजी उच्चार, शब्दप्रयोग, वाक्यरचना ऐकून बर्‍याच जणांची इथेहि करमणूक होते.

तसेहि भारतात जसे पूर्वी नागपुरी मराठी, पुणेरी मराठी, बेळगावी मराठी वेगळी तसे इथे सुद्धा निरनिराळ्या प्रांतात निरनिराळी इंग्रजी बोलतात - माझी मुले इथे जन्मली, वाढली, इंग्लिशमधे भरपूर मार्क मिळाले पण सहाशे मैल दूर कॉलेजात गेले तिथल्या लोकांना यांचे काही शब्द समजेनात. दक्षिणेकडील राज्यात गेलात तर झालेच. त्यांचे शब्दप्रयोग, उच्चार, हेल हे सगळे एव्हढे वेगळे असते की इथल्याच इतर ठिकाणच्या लोकांना समजणे कठीण.

साधे न्यू यॉर्क हून बॉस्टन (ज्याचा उच्चार तिथे बास्टन होतो) २१२ मैल गेलात नि तिथे त्यांनी विचारले का कुठे पाक केलीत तर त्याचा अर्थ कार कुठे पार्क केली असा होतो असली बोली कळायला वेळच लागतो.

तेंव्हा भारतात चांगले दहावी पर्यंत आपल्या भाषेतून शिकावे, विषय पक्का समजून घ्यावा मग नंतर इंग्रजी माध्यमातून फक्त शास्त्र, गणित इंजिनियरिंग, मेडिकल वगैरे शिकावे.
इंग्रजी (अमेरिकन, ब्रिटिश) पुस्तके भरपूर वाचावीत.
मग जिथे जाल नि रहायचे असेल तिथली बोली भाषा आपसूक येईल.

बेफी, झक्कीकाका,

आपले प्रतिसाद खरोखरच विचार करण्याजोगे आहेत.
बेफी म्हणतात त्या प्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने, आपले खरोखर काहीही अडत नाही. पुढील आयुष्यात इन्ग्रजी लिहिण्या-बोलण्याचा सराव व भरपुर वाचन ह्या ने खरोखरच खुप फायदा होतो.

वर झक्की काका म्हणाले आहेत की भारतात चांगले दहावी पर्यंत आपल्या भाषेतून शिकावे, विषय पक्का समजून घ्यावा मग नंतर इंग्रजी माध्यमातून फक्त शास्त्र, गणित इंजिनियरिंग, मेडिकल वगैरे शिकावे.

हे पण अगदी योग्य! परंतु आज आपल्या येथील मराठी माध्यमांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. शिक्षक स्वतः अत्यंत चुकीचे शिकवितात. बहुतांश शिक्षक न ला ण तर ण ला न शिकवितात. आम्हाला एक शेळके म्हणुन नागपूरला मॅडम होत्या मराठी ला इ. ७वी ला.[साल १९९७-९८] त्या ज्ञानेश्वरांना ग्याणेश्वर म्हणायच्या कुत्रा हा येक विमानी प्रानी [इमानी प्राणी] आहे असे म्हणायच्या. आता अशी परिस्थिती असल्यावर कुठल्या तोंडानी मराठी चा अभिमान बाळगायचा?
मला असे वाटते की हे महाराष्ट्रा चे दुर्दैव आहे पण आपण आपल्या भावी पिढ्यांचा मराठी भाषेचा अभ्यास घरीच भक्कम करुन घ्यावा, जसा माझ्या पिढीचा आमच्या आधीच्या पिढी ने करुन घेतला.

लेख चांगला आहे.
माझीही मुलगी पाचवीला आहे. पण परिस्थिती इतकी ही नाहीये. Happy
म्हणजे आंबा- आंबेज नाही बोलणार ती. मी घेते तिचं मराठी आणि हिंदी.

समानार्थी शब्द वाचुन पाठ करुनच शिकणार ना मुलं. आपोआप नयन आणि निधन असे शब्द कळावेत अशी अपेक्शा करणं चुकीच आहे.

कलंगड-कलिंगड, मानयता-मान्यता, पंतग-पतंग इइ. शुदधलेखनाच्या चुका ती ही करते. पण मी देते समजाउन.

मी : तोंड = ? त्यांचे उत्तर : थोबाड> हे तर भारीच वाटलं.

बाकी
१. तुरुतुरु : मी तुरुतुरु जेवतो.
२. थूई थूई : पाऊस थूई थूई पडतो.
३. सळ सळ : नदी सळसळ वाजत होती.
४. मुळूमुळू : मोर मुळूमुळू चालत होता.
५. रिमझिम : मी रिमझिम नाचतो.

हे जरा खटकलं. तरीही घरी जाउन तोंडीच विचारुन बघते. मला वाटतं रीझल्ट बरा असेल.

बाकी पाढे-टेबल्स बद्दल +१

थोडक्यात काय तर जर तुम्हाला वाटत असेल मराठी भाषा चांगली यावी तर तुमचा पारा चढु न देता मुलांना समजाउन सांगा.

पाचवीला एंग्रजीची सुरुवात झाल्यावर समानार्थी शब्द आपण पाठच करत होतो ना? वाक्यात प्रयोग वैगेरे अगदी इझीली करत होतो का ते आठवा

इथल्या अर्ध्या अधिक लोकांना कळणारपण नाहीत चुका झाल्या हे.
आता काही लोक आहेत इथे असे जे कमळे बघायची सोडून त्या खालचा चिखलच बघत असतात, त्यांना फक्त चुकाच कळतात, बाकीचे काही कळतच नाही. आणि दुसर्‍याच्या चुका आपण जाहीरपणे दा़खवून दिल्या की आपण किती हुषार असे त्यांना वाटते! >>> झक्क्की काका भावना पोचल्या . सकाळच्या काही घडांमोडींनंतर या धाग्याची आठवण झाली होती.

पल्लवी मस्त ! मज्जा वाटली एकेक किस्से ऐकुन .

>> मध्यंतरी शाळेतून फोन आला, तुम्ही तुमच्या मुलांशी घरी इंग्रजीतून बोलत जा.>>
इंग्रजी शाळांनी असा आग्रह धरणं पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं.
शिक्षणाचं माध्यम म्हणून इंग्रजी भाषा स्वीकारली आहे, तर घरीदारी त्याच भाषेत बोलायला हवं? आजूबाजूच्या समाजाशी जोडलं जाणं, भाषेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचणार्‍या संस्कृतीशी जोडलं जाणं याचं महत्व या शाळांना का वाटत नाही?

>> मध्यंतरी शाळेतून फोन आला, तुम्ही तुमच्या मुलांशी घरी इंग्रजीतून बोलत जा.>> असं अनेक शाळा सांगतात, आणि खुप पालक ते इमानेइतबारे ऐकतात. आईबाबा मराठी भाषिक पण मुलांशी इंग्रजीतुनच संवाद असे चित्र आजकाल सहज दिसतेय. Sad

हे फक्त मोठ्या शहरात की सगळ्या महाराष्ट्रात ते माहीत नाही. सगळीकडेच असेल तर आणखी १५/२० वर्षांनी मराठी शिकवायला ( महाराष्ट्रियन) शिक्षकही सापडणार नाहीत असं वाटतय.
( त्याच वेळेस कुणी इतर भाषिकांनी / देशिकांनी यातले फ्युचर प्रॉस्पेक्टस ओळखुन त्यांच्या मुलांना मराठी शिकवुन तयार केले तर असा एक विचार मनात येऊन गेला Wink )

माझा २ १/२ वर्षाचा मुलगा घ् रि येउन मन्तो हिन्दि मे बात करो हिन्दिहिन्दिहिन्दि. मि जेव्हा त्याला घ्याय् ला पाल् ना घरात जाते तेव्हा मन्तो go back go back

अचुक लेख व विषय. अगदी दुखर्‍या नसेला हात घातलात. (नाऊ प्लिज डोन्ट आस्क मी टू ट्रान्सलेट इन इन्ग्लिश "दुखर्‍या नसेला हात घातलात"... Proud )

Pages