तर मराठीत सध्या ' वयात येता ' नाच्या गोष्टी सांगणार्या सिनेमांची लाट आली आहे. किशोरवयीन-कुमारवयीन मुलांचे भावविश्व कधी कलात्मकतेने तर कधी तद्द्न व्यावसायिक हेतूने मांडणारे अनेक चित्रपट मधल्या काळात येऊन गेले. उदा. विहीर , शाळा , बालक-पालक , टाईमपास , फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे ' किल्ला '. सिनेमाची तपशीलवार कथा सांगून समीक्षेने रसिकांच्या रसभंगाचं पाप करू नये असं मला वाटतं. म्हणून सरधोपटपणे कथा सांगणं इथे टाळलं आहे .
वडिलांचा इतक्यातच मृत्यू झालेला. त्यातच आईच्या(अमृता सुभाष) झालेल्या बदलीमुळे सातव्या वर्गात शिकणार्या आपल्या नायकाला म्हणजे , चिन्मय काळेला (अर्चित देवधर) पुण्यासारख्या मोठ्या शहरातून गुहागरसारख्या ग्रामीण भागात यावं लागतं. तो तिथल्या नव्या निसर्गाशी , नव्या वातावरणाशी , नव्या मित्रांशी जुळवून घेऊ शकतो का ; त्याच्यात या काळात काय बदल होतात ; तो सभोवतालशी कसा ' रिअॅक्ट ' करतो अशी या चित्रपटाची साधारण कथा आहे.
हल्ली मराठी सिनेमात ' महोत्सवी चित्रपट ' म्हणून सिनेमाची एक नवी जात फोफावलेली आहे. ' किल्ला ' ही त्याच सदरात मोडणारा आहे. त्यात वावगं काहीही नाही पण त्यामुळे रूढ अर्थाच्या मनोरंजनाची अपेक्षा असल्या सिनेमाकडून करू नये. बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये वाखाणल्या गेल्यानंतरच ' एस्सेल व्हीजन ' सारख्या व्यावसायिक कंपनीने तो वितरणासाठी घेतला हे नमूद करायला हवं. जागतिक सिनेमात चलनात असलेले सर्व घटक जसे उत्तम छायालेखन , कल्पक प्रकाशयोजना , संवादांपेक्षा मुद्राभिनयावरील भर , जवळपास सर्वच कलावंतांचा चोख अभिनय , आवश्यक तेथे क्लोज अप , लॉंग शॉट्स , जिम्मी जिब इत्यादी आधुनिक तंत्राचा वापर , ऋतुरंगांचं नैसर्गिक चित्रिकरण , आपण सिनेमात बनवतोय या पदोपदी असणार्या जाणीवेतून आलेल्या दृष्यचौकटी इ.इ. घटक या सिनेमात आहेतच . त्यामुळे तो नक्कीच एकदातरी ' प्रेक्षणीय ' झाला आहे. आई- मुलाच्या संबंधातली तरलता व सखोलता , अडनिड्या वयातला मनोव्यापार , दुनियादारीची हळुहळू होणारी ओळख हे तसे फार कठीण विषय हाताळण्याचा प्रयत्न पहिल्याच आणि एकाच चित्रपटात करणं खरोखरच कौतुकाचं आहे. असा थोडासा जड विषय सुसह्य करण्यात बालकलाकार पार्थ भालेरावचा सहजसुंदर , नैसर्गिक अभिनय आणि इतर बालकलाकारांची जोरदार साथ यांचा मोठा वाटा आहे. सिनेमाच्या एकंदर विषयवस्तूवर , मांडणीवर आणि सादरीकरणावर जी.ए. कुलकर्णी , मोकाशी स्कूलचा प्रभाव वाटतो. सिनेमा बघताना मला क्रांती कानडेने दिग्दर्शित केलेल्या जीएंच्या कथेवर आधारित ' चैत्र ' या अप्रतिम लघुपटाची आठवण येत राहिली.
दै. लोकसत्तामध्ये आलेल्या दिग्दर्शक अविनाश अरूण ह्याच्या [बहुधा सदिच्छाभेट-वृत्तांतरूपी-प्रायोजित] मुलाखतीत त्यानेच सांगितल्याप्रमाणे सिनेमाची कथा ही त्याच्याच बालपणीच्या अनुभवांवर आधारित आहे. अशा काही अनुभवांचीच मोट बांधून चित्रपटीय कथा-पटकथा बांधण्याचा प्रयत्न सिनेमाकारांनी केलेला आहे. परंतु या कथेचं सिनेमात रूपांतर किंवा माध्यमांतर करताना मात्र काही दुवे निसटल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे एक परिपूर्ण व एकसंध अनुभव देण्यात ' किल्ला ' कमी पडतो.
' किल्ला ' ला जागतिक सिनेमाचे परिमाण देत असताना पटकथेत मात्र सुसूत्रतेचा , सुस्पष्टतेचा अभाव जाणवतो. सिनेमाकर्त्याला नेमकं काय सांगायचं आहे याबाबत खुद्द सिनेमाकर्त्याच्या कल्पना स्पष्ट आहेत का अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण चित्रपट हे काही एखाद्या चित्रकाराने मूड असेल त्याप्रमाणे अॅबस्ट्रॅक्ट फटकारे मारून चित्र रंगवावं असा कलाप्रकार नाही , नेत्रसुखद , चित्ताकर्षक देखाव्यांचा पोर्टफोलिओ नाही तर सिनेमा हा अनेक कलांचा , तंत्रांचा एक बांधेसूद समुच्चय असतो. निदान व्यावसायिक सिनेमाबाबत तरी ही अपेक्षा असते. महोत्सवी आणि हौशी सिनेमाची गोष्ट वेगळी. ' किल्ला ' च्या बाबतीत नायकाच्या भावविश्वावर फोकस करायचं की प्रेक्षकांच्या ' नॉस्टाल्जिया ' ला चाळवायचं यामध्ये दिग्दर्शकाच्या मनात संभ्रम होता असं वाटतं. नसता तर सिनेमाच्या जाहिरातीत ' रिविजिट युअरसेल्फ ' असं आवाहन असतं ना. आता हे आवाहन मूळ संहितेतच होतं की नंतर व्यावसायिक वितरणावेळी कोणा ' बिजनेस हेड ' च्या हेडमधून निघालं हे समजण्यास वाव नाही. पण दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत . सध्या ह्या ' नॉस्टल्जिया ' ची फार चलती आहे , हे आपण वर उल्लेखलेल्या सिनेमांच्या यशावरून किंवा आपल्या व्हॉटस अॅप ग्रूपवर फिरणार्या मेसेजेसचा अभ्यास करून सहज सांगू शकतो. तशीही एकंदरीतच मराठी कलाविश्वात (नाट्य-सिनेमा-साहित्य सगळीकडेच) या नॉस्टल्जिया प्रकाराने उबग आणला आहे. मराठी अभिव्यक्तिचं यश आणि आवका सीमित राहण्यास या घटकाचा प्रादुर्भाव अधिक कारणीभूत आहे . हा एक स्वतंत्र विषय आहे.
सिनेमाची चित्रभाषा , लोकेशन्स वगैरे आधी ठरवून त्याभोवती प्रसंगांची , दृष्यांची गुंफण केली आहे असं वाटतं. किल्ला किंवा लाईटहाउस इत्यादी दाखावायचेच म्हणून प्रसंग आणि त्या अनुरूप संवाद रचले आहेत असं वाटतं. मुळात या कथेचा जीव एखाद्या लघुपटाचा असून त्याला ओढूनताणून पूर्ण लांबीचं केलं आहे की काय अशी शंका येते. उदा. नायक आणि एक दारूडा मच्छीमार यांच्यातले प्रसंग आता काही वेगळे घडेल का अशी उगाच आपली उत्सुकता चाळवतात. त्यामध्ये काही नाट्यमय होईल याची अपेक्षा सिनेमाचा एकंदर बाज पाहता तशीही नसतेच तरी त्यांच्या एका दृष्यात आपल्याला ' द ओल्ड मॅन अॅंड द सी ' चं काही तत्वज्ञान ऐकायला मिळेल का अशी सुखद शंका येते पण नंतर विरते. असे काही प्रसंग डिसकनेक्टेड वाटतात. संवादलेखनात , विशेषत: चिन्मयच्या आईच्या ऑफिसच्या उपकथानकात थोड्या अधिक ऑथेंटिसिटीची , अभ्यासाची गरज होती. ती नसल्याने तो कथाभाग कन्व्हिंसिंग वाटत नाही तर एखाद्या फिलरसारखा किंवा क्लायमॅक्सची सोय केल्यासारखा , टेकू दिल्यासारखा ओळखू येतो. त्यातल्या सरकारी बाबूंची भाषा ऐकून मला उगाच मराठी मालिकांमधल्या शुद्ध , प्रमाण भाषेत बोलणार्या गुंडांची आणि पोलिसांची आठवण आली. अशा गोष्टी मुख्य कथाविषयाचा प्रभाव नाहकच कमी करण्यास कारण होतात. संकलकाने या गोष्टी जरा गंभीरपणे घ्यायला हव्या होत्या. पण त्यामुळे सिनेमा काही टाकाऊ होत नाही. जाताजाता , नायकाच्या गळ्यातलं जानवं सिनेमाभर उगाच हायलाईट केल्यासारखं का दाखवलंय अशी एक ' पुरोगामी ' शंकाही मध्येच येऊन गेली पण आम्ही तिची लगेच ' घरवापसी ' केली. असो.
पूर्वीच्या काळी , आपण एखाद्या पर्यटनस्थळी फिरून आलो की तिथे काढलेले फोटो प्रत्येक आल्यागेल्याला दाखवण्याची पद्धत होती. तशी ती आताही आहे. फक्त अल्बमची जागा फेसबुक , पिकासा , इन्स्टाग्राम वगैरेंनी घेतली आहे. पण त्यातल्या त्यात सोय म्हणजे UNFOLLOW चे सेटींग़ करून आपण आपल्या फोटोपोस्ट्या मित्रांचा समावेश आपल्या ' शत्रुपक्षां ' मध्ये होण्यापासून टाळू शकतो. आपल्या या नेटमित्रांनी पोस्ट केलेले फोटो अनेकदा खरंच छान असतात , आपल्याला मनस्वी आवडतात. आपण नकळत (आणि मित्राला राग येऊ नये म्हणून) त्या फोटोंना लाईक करत , एखादी कमेंट करत पुढे जात असतो. आपला मित्रही तिकडे आपल्या लाईक्सची आणि कमेंट्सची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण त्या प्रत्येक फोटोमागे त्याची स्वत:ची अशी एक कहाणी असते , प्रत्येक लाईकगणिक तो सुखावत असतो. आपण मात्र काही काळाने ते फोटो विसरूनही जातो. कारण त्या फोटोंची ती कहाणी आपल्याला माहीत नसते. क्वचित माहीत असली तरी आपण तिच्याशी ' रिलेट ' करू शकत नाही. आणि का कोण जाणे पण ' किल्ला ' बघताना माझंही असंच झालं. सिनेमागृहातून परतताना कोकणातली नयनरम्य दृष्यांची मनोहर ' पोस्टकार्ड्स ' तर लक्षात राहिली पण मायना हातात पूर्णपणे न लागल्याची हुरहूरही लागून राहिली.
माझं हे आणि इतर लिखाण वाचण्यासाठी:aawaghmare.blogspot.in
परागः पहिल्या मुद्द्याबद्दल
परागः
पहिल्या मुद्द्याबद्दल आधीच बोललो आहे.
दुसरा मुद्दा: ती फक्त प्रस्तावना आहे. कदाचित 'एकाच माळेचे मणी' या वाक्प्रचाराच्या प्रचलित अर्थामुळे काहींचा गैरसमज झाला असल्याची शक्यता आहे.
परीक्षण आवडले चित्रपट अजुन
परीक्षण आवडले
चित्रपट अजुन बघितला नसला तरी आतापर्यन्त या चित्रपटाची जी काही परीक्षणे वाचलीत त्यात हे सगळ्यात प्रामाणिक वाटले
सिनेमांच्या लाटेबद्दल अगदीच सहमत!
वाघमारे.. परीक्षण अगदीच
वाघमारे.. परीक्षण अगदीच पटले.
आतापर्यन्त या चित्रपटाची जी काही परीक्षणे वाचलीत त्यात हे सगळ्यात प्रामाणिक वाटले >> +१००
बुंदीच्या लाडवाची एकुण एक कळी अप्रतीम असावी.. पण तो लाडू बांधला जाऊ नये असं काहीसं वाटलं.
असो.. आम्ही नुस्ती बुंदी खाल्ली. चविष्ट होती.
अभिनय आणि दृष्ये अप्रतीम.
पण कथा, सीन्स आणि शेवट.. इथे काहीतरी गंडल्यासारखे वाटले.
प्रत्येक अॅबस्ट्रॅक्ट फटकारा बेस्ट होता. पण संपुर्ण चित्र सुसुत्र नव्हतं. (हेमावैम)
Spoiler Alert शेवटासाठी..
Spoiler Alert
शेवटासाठी.. मध्यंतरापूर्वी नायक किल्ल्यामधल्या खोलीत एका बाजूने उतरतो आणि त्याच बाजूने परत वर जातो (त्याला खोलीच्या दुसर्या बाजूच्या जिन्याने वर जायचे असते पण वीज कडाडते आणि तो घाबरून मागे वळून आला त्याच जिन्याने किल्ल्यावर जातो.)
शेवटच्या प्रसंगात तो किल्ल्यामधल्या खोलीत एका बाजूने उतरतो आणि दुसर्या बाजूने वर येतो (ज्या बाजूने त्याला आधी जाता आले नसते) . आणि तिथे त्याला त्याचे पाठमोरे बसलेले मित्र दिसतात.. त्याला फक्त तो जिना चढून जायचे होते ..मित्र त्या बाजूला आहेत..
हा चित्रपट youtube वर का दिसत आहे??
चित्रपट फारसा चालला नसावा.
चित्रपट फारसा चालला नसावा. लगेच आपली मराठीवरही दिसतोय..
आपली मराठी वर " किल्ला" आला
आपली मराठी वर " किल्ला" आला आहे . इच्छुकांनी लाभ घ्यावा.
मुग्धमानसीला मम. मला जे
मुग्धमानसीला मम. मला जे वाटलं 'किल्ला' बघुन ते असं शब्दात नसतं सांगता आलं. मला आवडला.
भाषेचा लहेजा मलापण खटकला. मी लगेच शेजारी बसलेल्या बहीणीला सांगितलं ते.
बुंदीच्या लाडवाची एकुण एक कळी
बुंदीच्या लाडवाची एकुण एक कळी अप्रतीम असावी.. पण तो लाडू बांधला जाऊ नये असं काहीसं वाटलं.
असो.. आम्ही नुस्ती बुंदी खाल्ली. चविष्ट होती. >>>> +१०००
मला हेच म्हणायचं होतं पण शब्द सुचत नव्हते. चित्रकरण खुप सुरेख, बच्चेमंडळींच काम छान, लोकेशन्स ची निवड मस्त, पण एकत्रितपणे या सगळ्याचा परिणाम एक चांगला चित्रपट होण्यात कुठेतरी कमतरता जाणवते.
बरेचसे प्रसंग (निदान मलातरी) तुटक वाटले. किंवा दिग्दर्शकाला अपे़क्षित असलेला मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला नाही.
निसर्ग संपन्न कोकण पाहुन फार
निसर्ग संपन्न कोकण पाहुन फार फ्रेश वाटलं.
समुद्रात बोटीत बसुन त्या मच्छीमार बरोबर चे संभाषण फार भावले, नंतर अमृता सुभाष बाहेर वाट बघत बसली आहे तो दृश्य ही आवडले.
नंतर माडी वर बसुन आई मुला मधलं संवाद ही आवडलं, जेव्हा मुलगा आईला सांगतो इकडचे पेपर्स तर पुण्याच्या पेपर्स पेक्षा सोपे आहे, तेव्हा नकळत तोंडातुन व्वाह निघालं
चित्रपट खरच अर्धवट रहिल्या
चित्रपट खरच अर्धवट रहिल्या सारखा वाट्ला
मला हाच अनुभव विहिर च्या वेळी हि आला
तान्त्रिक बाजुने छान असला तरिहि कथा / चित्र कथा समजली नाही
छान लिहिलंय. लोकेशन्स,
छान लिहिलंय.
लोकेशन्स, प्रतिमा (किल्ला, त्या काळोखी वाटेतून वर येणे, दीपगृह), पोरांचा अभिनय, दृश्य परिणाम सगळं आवडलं. सगळी पात्रं छान उभी केल्येत, पोरं, मास्तर इ. पण त्या मच्छिमाराबरोबरच्या दृश्यानंतर काहीतरी भारी घडेल असं वाटत होतं तोवर क्रेडिट्स आली. आणि मग वरचं सगळं भारी असून स्टोरी टेलिंग मध्ये गंडल्याचा फीलही. किल्ला कसा होता, त्यात नक्की काय होतं, हे कुणाला सांगायला गेलो तर मनाशी जुळवाजुळव करून शब्द जोडले तर पोकळ रिकामेपणा जाणवला.
अमृता सुभाषची बॉडी ल्यान्ग्वेज कधी त्या मुलाची आई म्हणून तर तर कधी काही घेणंदेणं नसलेली व्यक्ती म्हणून वाटत होती. तिच्या ऑफिसच्या उपकथानकाचं कारण, फक्त परत एकदा बदली घडवून आणणे, आणि नवे बदल आता पोरगा कसे पचवतो हे दाखवणे या व्यतिरिक्त काही होतं का? तिच्यात काही बदल झाला का? तिला कोणी मासेमार भेटला का?
चित्रकरण खुप सुरेख,
चित्रकरण खुप सुरेख, बच्चेमंडळींच काम छान, लोकेशन्स ची निवड मस्त, पण एकत्रितपणे या सगळ्याचा परिणाम एक चांगला चित्रपट होण्यात कुठेतरी कमतरता जाणवते. >> १००१
दिग्दर्शकाला अपे़क्षित असलेला मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला नाही.>> खरच. खूपच ताण दिल्यावर काही प्रसंगातले संकेत कळले. सामान्य प्रेक्षकापेक्षा खूपच हूशार प्रेक्षक असेल तरच काही गोष्टी पोचतील असे वाटले. तसेच चित्रपट अत्यंत संथगतीने आहे.
निगेटीव्ह सुर का लावलाय असे अनेक जण म्हणत आहेत. चित्रपट बघुन आल्यावर जो एक अपूर्णपणा जाणवतो त्यातुन असा सुर लागणे स्वाभावीक आहे असे मला वाटले.
बाकी सिनेमॅटोग्राफी अप्रतिम. फक्त मोठ्या पडद्यावर पावसातले हिरवेगार कोकण बघायचे असेल तर किल्ला जरूर बघावा. अत्यंत सुरेख चित्रीकरण!! त्याबद्दल कौतुक करावे तेव्हढे कमीच पडेल.
अमितव +१११
अमितव +१११
आपलं स्वत:चं असं एक भावविश्व
आपलं स्वत:चं असं एक भावविश्व असतं. त्या विश्वात व्यक्ती असतात, भावना असतात, जीवाशी जोडली गेलेली स्थळं असतात. मग अचानक कुठूनतरी एक क्षण अनामिकरीत्या येतो आणि आपण त्या भावविश्वामधून विस्थापित होतो.... सगळंच कोलमडतं. भावना बदलतात, स्थळं रंगरूप पालटतात, व्यक्ती तर पार पार बदलून जातात. आणि मग सुरू होतो या नवीन विश्वाशी जुळवून घेण्याचा संघर्ष. यात वाईट कुणीच नसतं, चांगलंही कुणी नसतं.. असतो तो फक्त घडत गेलेला बदल. याबदलाशी जुळवून घेण्याची प्रत्येकाची पद्धत फार वेगळी. कुणी दुर्मुखतं, कुणी खिदळ्तं, कुणी तणतणतं तर कुणी रडतं.
त्यातही हा बदल आपणहून अंगीकारला असेल, तर संघर्ष जरातरी सोपा जात असणार, पण मर्जीविरूद्ध विस्थापन... या घटकेत इथून तिथं विस्थापित होणं, इतर प्रत्येक जण तिथं घट्ट पाय रोवून उभं अस्ताना आपण मात्र गटांगळ्या खात आधार हुडकणं.... शिवाय हा लढा आपलाच असतो, इतर कुणीही त्यामध्ये कधीच नसतं.
पण अशाच कुठल्यातरी क्षणी हा बदल संपून जातो, एक वर्तुळ पूर्ण होतं. पण म्हणून चक्र थांबत नाही, ते फिरतच राहतं, नवीन बदल होतच जातात आणि त्या बदलांशी जुळवून घेण्याचा आपला संघर्ष देखील.
चिन्मय पुण्यातून कोकणात आलाय. त्याला इथलं काही म्हणजे काहीच आवडत नाही. इथं त्याच्या ओळखीचं कुणी नाही, मित्र नाही, भाऊ नाही. वडील गेलेले आहेत. आई नोकरीच्या व्यापात. ती आपल्याकडे लक्ष देत नसल्याची सूक्ष्म तक्रार. बदल केवळ परिसरामध्येच थोडी होत आहेत, भावनिक, शारीरिक, मानसिक हे बदलपण घडत आहेतच की. आणि सर्वात मुख्य म्हणजे या सर्वांची त्याला कल्पना आहे.
याचवेळी ज्या काय दोन चार ओळखी होतात, तेच त्याला मित्र वाटतात. पुढं मग एका पावसाळी दिवशी सुनसान एकाकी किल्ल्यामध्ये हे मित्र त्याला सोडून जातात. इतके दिवस एकटा असलेला चिन्मय आता एकाकी होतो. हे एकाकीपणाचं ओझं फार बेफाम असतं. पेलवता येत नाही, आणि फेकून देता येत नाही. बदललेल्या प्रत्येक गोष्टीशी जुळवायला बघत असलेला चिन्मय बिथरतो. आता त्याला आईच्या समस्या अथवा इतर कुठल्याही गोष्टीबद्दल विचार करत बसण्यापेक्षा त्याला या विस्थापनाचाच तिटकारा येऊ लागतो. ता त्याला इथं रहायचं नाही, परत जायचंय.. पण परत म्हणजे कुठं जाणार. जिथं जाणार तिथलंही सर्व बदललेलंच असणार!
आणि मग त्याला एके दिवशी आकळून येतं. भव्यदिव्य पण एकाकी समुद्राच्या खोल खोल पाण्याजवळ गेल्यावर त्याला जाणवतं, एकटं असणं म्हणजे काय, एकाकी असणं म्हणजे काय... जे आपलं आहे ते किती महत्त्वाचं आहे, आणि जे पाठी राहिलंय ते किती क्षुल्लक आहे... मासेमाराकडं तुझ्या घरी कोण आहेत, या प्रश्नाचं उत्तरच नाही, आपल्याकडे आहे हे त्याला शेकोटीच्या प्रकाशांत लख्ख जाणवतं आणि मग तो घरी येऊन आईच्या मिठीत धावत येतो.. आता आपण इथंच राहणार, हेच आपलं भावविश्व असा तो स्वत:लाच समजावतो.
पण चक्र फिरतच राहतं, परत नवीन भावविश्व, आता इथलं सर्व सोडून जायचं. नवीन ठिकाणी. पण तो आता समजूतदार झालाय, येणार्याप प्रत्येक बदलाला झेपवायची ताकद त्याच्यामध्ये आली आहे – म्हणजे त्याला तसं वाटतं तरी खरं. एकाकीपणाचा समुद्र मागे पडत जातो, नव्या अनुभवांचा रस्ता खुणवायला लागतो आणि मग भूतकाळाचा किल्ला एक एक बुरूज सजवत उभा रहायला लागतो.
अविनाश अरूणचा “किल्ला” हा गोष्ट सांगणारा सिनेमा नाहीच. तर हा आहे एक अनुभव. ज्यानं त्यानं आपापल्या सापेक्षतेच्या फूटपट्टीवर घ्यायचा. सिनेमाचे ट्रेलर पाहतानाच हा आपल्याला आतवर भिडणार आहे हे मला चांगलंच माहित होतं. बालपण कोकणात गेलेलं असल्यानं एक एक फ्रेम म्हणजे एक आठवण असल्यासारखी भासली. त्यात परत जयगडचा किल्ला म्हणजे काय बोलावं.... दगड न दगड ओळखीचा वाटायला लागला मला.
सिनेमा व्हिज्युअली खूप सुंदर झालाय, प्रश्नच नाही. पण केवळ सुंदर सुंदर फ्रेम्स एकापाठोपाठ लावत गेल्यास फोटोआल्बम तयार होइल. सिनेमा नव्हे! किल्ला केवळ सुंदर सिनेमॅटोग्राफीवर तरत नाही, तर त्या प्रत्येक फ्रेममागे असलेल्या आखीव पटकथेवर तरतो. त्यातला प्रत्येक अनुभव म्हणूनच सच्चा वाटायला लागतो.
किल्ला केवळ घटनांची जंत्री मांडत नाही, प्रेक्षकांच्या डोळ्यांत बोटं घालून “आता इकडे बघ, हे याचं प्रतीक, ते ऐक, हे पात्रं काय म्हणतंय ते ऐक” असला बालिशपणा करत नाही. किल्ला केवळ परीप्रेक्ष्य मांडत जातो, त्यातलं काय बघायचं, किती बघायचं हा प्रत्येकाचा प्रश्न. कथा केवळ चिन्मयचीच नाही तर, त्याच्या आईची पण आहे. पण तरीही किल्ला तिथं ड्रामा मांडत बसत नाही. अलगद तो पुढं पुढं जात राहतो, प्रेक्षकांनी त्याच्यामागोमाग केवळ जायचं नाही, तर त्याच्यासोबत ते अनुभव घ्यायचे आहेत.
दृश्यात्मकरीत्या इतका सुबक आणि रेखीव झालेला सिनेमा संवादांवर पार घसरलाय, हे मात्र सांगायलाच हवं. दामलेआज्जी सोडल्यास एकही पात्र कोकणातली बोली बोलत नाही, ती अगम्य फिल्मी गावठी भाषा ऐकताना माझा विरस झाला. हल्ली दृश्यमाध्यमांमधून बोलीभाषा हा विषय इतका असा ऑप्शनला टाकल्यासारखा का असतो? चिन्मयची शहरी बोली खटकत नाही, पण बंड्यांचं आणि युवराजचं “म्या, गेल्ता” वगैरे फार खटकतं. निवतेंची बायको घरामध्ये इरकली लुगडं नेसलेय हे सणकून जाणवतं. या अशा चुका खरंतर व्हायला नकोत.
पण तरीही किल्ला हा एक अस्सल दर्जाचा सिनेमा आहे.
नंदिनी मस्त लिहीले आहेस.
नंदिनी मस्त लिहीले आहेस. समुद्र, समुद्रातला एकाकीपणा, दिपगृह, आईचीसुध्दा परीस्थितीशी अॅडजस्ट करणासाठीची धडपड हे सगळे जाणवते, आत पर्यंत पोचते. हे सगळे असुनही एक प्रकारचा अपुर्णपणा वाटतोच. काहीतरी खटकते पण काय ते कळत नाही. भाषेबद्दल तर जास्तच जाणवते. असो.
नंदिनी, किती छान लिहिलेस
नंदिनी, किती छान लिहिलेस
सिनेमा बघितला नाही त्यामुळे सिनेमाबद्दल काहीच बोलण्यासारखे नाही
हा प्रतिसाद खास तुझ्यासाठी 
परीप्रेक्ष्य म्हणजे काय?
नंदिनी, मस्त पोस्ट. फार
नंदिनी, मस्त पोस्ट. फार सुंदर.
केपी, मी माझ्या पोस्टीत तरी
केपी, मी माझ्या पोस्टीत तरी चित्रपटाबद्दल नकारात्मक सुर असं म्हटलेलं नाही. इनजनरल लेखाची सुरुवात सध्याचे चित्रपट, महोत्सवातले चित्रपट वगैरे बाबतीत नकारात्मक दिसते. चित्रपट सर्वोत्तम नसला तरी उत्तम आहे असं एकंदरीत प्रतिक्रियांवरून वाटतं आहे. त्यामुळे थोडा सकारात्मक सुर मला आवडला असता इतकच. चित्रपट कोणाला आवडला नसेल तर प्रत्येकाची आवड आहेच. त्याबद्दल काही म्हणत नाहीये.
मस्तच लिहिलंयस नंदिनी...
मस्तच लिहिलंयस नंदिनी...
मला खूप आवडला. एक छान सलग
मला खूप आवडला. एक छान सलग धागा आहे कथेचा. कुठेही बटबटीत अथवा शब्दबंबाळ न होता सूचक दृश्ये आणि संवादाने विचार पोचवतो दिग्दर्शक.
स्थानिक पात्रांची भाषा हे मात्र मेजर ब्लंडर आहे आणि असे का झाले असावे याचे खूप नवल वाटते.
स्थानिक पात्रांची भाषा हे
स्थानिक पात्रांची भाषा हे मात्र मेजर ब्लंडर आहे आणि असे का झाले असावे याचे खूप नवल वाटते.>>>+१
नंदिनी, सुंदर लिहीलेस. फार
नंदिनी, सुंदर लिहीलेस. फार आवडलं.
इथल्या एकंदर चर्चेवरून मला
इथल्या एकंदर चर्चेवरून मला नंदिनीने लिहिलाय तसाच अर्थ वाटत होता.
हा भाषेचा मुद्दा मला अनेक चित्रपटात जाणवला. सध्या चित्रपटात बोलतात ती तर कोल्हापूरचीही धड भाषा नाही. कोल्हापूरची भाषाही गेल्या अनेक वर्षात बदलत गेलीय, पण तरी ती वेगळी आहेच. आणि आजही अगदी तरुण पिढीही त्या त्या शहराची भाषा बोलते मग चित्रपटाच्या संवाद लेखकांना का ती जमत नसावी ? का कलाकारांना ती जमत नसेल ?
नंदिनी, छान लिहिलंयस.
नंदिनी, छान लिहिलंयस. आवडलं.
चित्रपटात सगळ्या गोष्टी समजावून न सांगणे आवडलेले. पण तरी शेवटी काहीतरी अपूर्णता जाणवत होती.
अजुन किल्ला बघितला नाही पण
अजुन किल्ला बघितला नाही पण नंदिनीतै तुझा प्रतिसाद आवडला
नंदिनी, प्रतिसाद जबरीच. खुप
नंदिनी, प्रतिसाद जबरीच.
खुप आवडला.
हा चित्रपट मला आवडेल अस वाटतय.
बघणारच नक्की.
नंदिनी, खूपच सुंदर लिहिलयस.
नंदिनी, खूपच सुंदर लिहिलयस.
नंदिनीचा प्रतिसाद आवडला,
नंदिनीचा प्रतिसाद आवडला, चित्रपट कळायला मदत झाली
चित्रपट कळायला अश्या एखाद्या
चित्रपट कळायला अश्या एखाद्या पोस्टची आवश्यकता भासणे यातच सगळे आले!
स्थानिक पात्रांची भाषा हे
स्थानिक पात्रांची भाषा हे मात्र मेजर ब्लंडर आहे आणि असे का झाले असावे याचे खूप नवल वाटते.>>> याला मीही सहमत!
Pages