किल्ला: आहे मनोहर तरी........

Submitted by ए ए वाघमारे on 1 July, 2015 - 22:59

killa2.jpg

तर मराठीत सध्या ' वयात येता ' नाच्या गोष्टी सांगणार्‍या सिनेमांची लाट आली आहे. किशोरवयीन-कुमारवयीन मुलांचे भावविश्व कधी कलात्मकतेने तर कधी तद्द्न व्यावसायिक हेतूने मांडणारे अनेक चित्रपट मधल्या काळात येऊन गेले. उदा. विहीर , शाळा , बालक-पालक , टाईमपास , फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे ' किल्ला '. सिनेमाची तपशीलवार कथा सांगून समीक्षेने रसिकांच्या रसभंगाचं पाप करू नये असं मला वाटतं. म्हणून सरधोपटपणे कथा सांगणं इथे टाळलं आहे .

वडिलांचा इतक्यातच मृत्यू झालेला. त्यातच आईच्या(अमृता सुभाष) झालेल्या बदलीमुळे सातव्या वर्गात शिकणार्‍या आपल्या नायकाला म्हणजे , चिन्मय काळेला (अर्चित देवधर) पुण्यासारख्या मोठ्या शहरातून गुहागरसारख्या ग्रामीण भागात यावं लागतं. तो तिथल्या नव्या निसर्गाशी , नव्या वातावरणाशी , नव्या मित्रांशी जुळवून घेऊ शकतो का ; त्याच्यात या काळात काय बदल होतात ; तो सभोवतालशी कसा ' रिअ‍ॅक्ट ' करतो अशी या चित्रपटाची साधारण कथा आहे.

हल्ली मराठी सिनेमात ' महोत्सवी चित्रपट ' म्हणून सिनेमाची एक नवी जात फोफावलेली आहे. ' किल्ला ' ही त्याच सदरात मोडणारा आहे. त्यात वावगं काहीही नाही पण त्यामुळे रूढ अर्थाच्या मनोरंजनाची अपेक्षा असल्या सिनेमाकडून करू नये. बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये वाखाणल्या गेल्यानंतरच ' एस्सेल व्हीजन ' सारख्या व्यावसायिक कंपनीने तो वितरणासाठी घेतला हे नमूद करायला हवं. जागतिक सिनेमात चलनात असलेले सर्व घटक जसे उत्तम छायालेखन , कल्पक प्रकाशयोजना , संवादांपेक्षा मुद्राभिनयावरील भर , जवळपास सर्वच कलावंतांचा चोख अभिनय , आवश्यक तेथे क्लोज अप , लॉंग शॉट्स , जिम्मी जिब इत्यादी आधुनिक तंत्राचा वापर , ऋतुरंगांचं नैसर्गिक चित्रिकरण , आपण सिनेमात बनवतोय या पदोपदी असणार्‍या जाणीवेतून आलेल्या दृष्यचौकटी इ.इ. घटक या सिनेमात आहेतच . त्यामुळे तो नक्कीच एकदातरी ' प्रेक्षणीय ' झाला आहे. आई- मुलाच्या संबंधातली तरलता व सखोलता , अडनिड्या वयातला मनोव्यापार , दुनियादारीची हळुहळू होणारी ओळख हे तसे फार कठीण विषय हाताळण्याचा प्रयत्न पहिल्याच आणि एकाच चित्रपटात करणं खरोखरच कौतुकाचं आहे. असा थोडासा जड विषय सुसह्य करण्यात बालकलाकार पार्थ भालेरावचा सहजसुंदर , नैसर्गिक अभिनय आणि इतर बालकलाकारांची जोरदार साथ यांचा मोठा वाटा आहे. सिनेमाच्या एकंदर विषयवस्तूवर , मांडणीवर आणि सादरीकरणावर जी.ए. कुलकर्णी , मोकाशी स्कूलचा प्रभाव वाटतो. सिनेमा बघताना मला क्रांती कानडेने दिग्दर्शित केलेल्या जीएंच्या कथेवर आधारित ' चैत्र ' या अप्रतिम लघुपटाची आठवण येत राहिली.

दै. लोकसत्तामध्ये आलेल्या दिग्दर्शक अविनाश अरूण ह्याच्या [बहुधा सदिच्छाभेट-वृत्तांतरूपी-प्रायोजित] मुलाखतीत त्यानेच सांगितल्याप्रमाणे सिनेमाची कथा ही त्याच्याच बालपणीच्या अनुभवांवर आधारित आहे. अशा काही अनुभवांचीच मोट बांधून चित्रपटीय कथा-पटकथा बांधण्याचा प्रयत्न सिनेमाकारांनी केलेला आहे. परंतु या कथेचं सिनेमात रूपांतर किंवा माध्यमांतर करताना मात्र काही दुवे निसटल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे एक परिपूर्ण व एकसंध अनुभव देण्यात ' किल्ला ' कमी पडतो.

' किल्ला ' ला जागतिक सिनेमाचे परिमाण देत असताना पटकथेत मात्र सुसूत्रतेचा , सुस्पष्टतेचा अभाव जाणवतो. सिनेमाकर्त्याला नेमकं काय सांगायचं आहे याबाबत खुद्द सिनेमाकर्त्याच्या कल्पना स्पष्ट आहेत का अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण चित्रपट हे काही एखाद्या चित्रकाराने मूड असेल त्याप्रमाणे अ‍ॅबस्ट्रॅक्ट फटकारे मारून चित्र रंगवावं असा कलाप्रकार नाही , नेत्रसुखद , चित्ताकर्षक देखाव्यांचा पोर्टफोलिओ नाही तर सिनेमा हा अनेक कलांचा , तंत्रांचा एक बांधेसूद समुच्चय असतो. निदान व्यावसायिक सिनेमाबाबत तरी ही अपेक्षा असते. महोत्सवी आणि हौशी सिनेमाची गोष्ट वेगळी. ' किल्ला ' च्या बाबतीत नायकाच्या भावविश्वावर फोकस करायचं की प्रेक्षकांच्या ' नॉस्टाल्जिया ' ला चाळवायचं यामध्ये दिग्दर्शकाच्या मनात संभ्रम होता असं वाटतं. नसता तर सिनेमाच्या जाहिरातीत ' रिविजिट युअरसेल्फ ' असं आवाहन असतं ना. आता हे आवाहन मूळ संहितेतच होतं की नंतर व्यावसायिक वितरणावेळी कोणा ' बिजनेस हेड ' च्या हेडमधून निघालं हे समजण्यास वाव नाही. पण दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत . सध्या ह्या ' नॉस्टल्जिया ' ची फार चलती आहे , हे आपण वर उल्लेखलेल्या सिनेमांच्या यशावरून किंवा आपल्या व्हॉटस अ‍ॅप ग्रूपवर फिरणार्‍या मेसेजेसचा अभ्यास करून सहज सांगू शकतो. तशीही एकंदरीतच मराठी कलाविश्वात (नाट्य-सिनेमा-साहित्य सगळीकडेच) या नॉस्टल्जिया प्रकाराने उबग आणला आहे. मराठी अभिव्यक्तिचं यश आणि आवका सीमित राहण्यास या घटकाचा प्रादुर्भाव अधिक कारणीभूत आहे . हा एक स्वतंत्र विषय आहे.

सिनेमाची चित्रभाषा , लोकेशन्स वगैरे आधी ठरवून त्याभोवती प्रसंगांची , दृष्यांची गुंफण केली आहे असं वाटतं. किल्ला किंवा लाईटहाउस इत्यादी दाखावायचेच म्हणून प्रसंग आणि त्या अनुरूप संवाद रचले आहेत असं वाटतं. मुळात या कथेचा जीव एखाद्या लघुपटाचा असून त्याला ओढूनताणून पूर्ण लांबीचं केलं आहे की काय अशी शंका येते. उदा. नायक आणि एक दारूडा मच्छीमार यांच्यातले प्रसंग आता काही वेगळे घडेल का अशी उगाच आपली उत्सुकता चाळवतात. त्यामध्ये काही नाट्यमय होईल याची अपेक्षा सिनेमाचा एकंदर बाज पाहता तशीही नसतेच तरी त्यांच्या एका दृष्यात आपल्याला ' द ओल्ड मॅन अ‍ॅंड द सी ' चं काही तत्वज्ञान ऐकायला मिळेल का अशी सुखद शंका येते पण नंतर विरते. असे काही प्रसंग डिसकनेक्टेड वाटतात. संवादलेखनात , विशेषत: चिन्मयच्या आईच्या ऑफिसच्या उपकथानकात थोड्या अधिक ऑथेंटिसिटीची , अभ्यासाची गरज होती. ती नसल्याने तो कथाभाग कन्व्हिंसिंग वाटत नाही तर एखाद्या फिलरसारखा किंवा क्लायमॅक्सची सोय केल्यासारखा , टेकू दिल्यासारखा ओळखू येतो. त्यातल्या सरकारी बाबूंची भाषा ऐकून मला उगाच मराठी मालिकांमधल्या शुद्ध , प्रमाण भाषेत बोलणार्‍या गुंडांची आणि पोलिसांची आठवण आली. अशा गोष्टी मुख्य कथाविषयाचा प्रभाव नाहकच कमी करण्यास कारण होतात. संकलकाने या गोष्टी जरा गंभीरपणे घ्यायला हव्या होत्या. पण त्यामुळे सिनेमा काही टाकाऊ होत नाही. जाताजाता , नायकाच्या गळ्यातलं जानवं सिनेमाभर उगाच हायलाईट केल्यासारखं का दाखवलंय अशी एक ' पुरोगामी ' शंकाही मध्येच येऊन गेली पण आम्ही तिची लगेच ' घरवापसी ' केली. असो.

पूर्वीच्या काळी , आपण एखाद्या पर्यटनस्थळी फिरून आलो की तिथे काढलेले फोटो प्रत्येक आल्यागेल्याला दाखवण्याची पद्धत होती. तशी ती आताही आहे. फक्त अल्बमची जागा फेसबुक , पिकासा , इन्स्टाग्राम वगैरेंनी घेतली आहे. पण त्यातल्या त्यात सोय म्हणजे UNFOLLOW चे सेटींग़ करून आपण आपल्या फोटोपोस्ट्या मित्रांचा समावेश आपल्या ' शत्रुपक्षां ' मध्ये होण्यापासून टाळू शकतो. आपल्या या नेटमित्रांनी पोस्ट केलेले फोटो अनेकदा खरंच छान असतात , आपल्याला मनस्वी आवडतात. आपण नकळत (आणि मित्राला राग येऊ नये म्हणून) त्या फोटोंना लाईक करत , एखादी कमेंट करत पुढे जात असतो. आपला मित्रही तिकडे आपल्या लाईक्सची आणि कमेंट्सची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण त्या प्रत्येक फोटोमागे त्याची स्वत:ची अशी एक कहाणी असते , प्रत्येक लाईकगणिक तो सुखावत असतो. आपण मात्र काही काळाने ते फोटो विसरूनही जातो. कारण त्या फोटोंची ती कहाणी आपल्याला माहीत नसते. क्वचित माहीत असली तरी आपण तिच्याशी ' रिलेट ' करू शकत नाही. आणि का कोण जाणे पण ' किल्ला ' बघताना माझंही असंच झालं. सिनेमागृहातून परतताना कोकणातली नयनरम्य दृष्यांची मनोहर ' पोस्टकार्ड्स ' तर लक्षात राहिली पण मायना हातात पूर्णपणे न लागल्याची हुरहूरही लागून राहिली.

माझं हे आणि इतर लिखाण वाचण्यासाठी:aawaghmare.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, खूप मस्त मांडलंयस. मी सिनेमा अजून बघितला नाही, पण जेव्हा बघेन तेव्हा खूप खूपच "आपला" वाटेल. मनाला भिडणारा असेल. कारण मी जी काही घडले-बिघडले आहे, त्यात समुद्र (आणि आभाळ फाटून कोसळणारा माझ्या रत्नागिरीचा पाऊस) हे खूप महत्त्वाचे घटक आहेत.
असो.

पण जेव्हा बघेन तेव्हा खूप खूपच "आपला" वाटेल. मनाला भिडणारा असेल. कारण मी जी काही घडले-बिघडले आहे, त्यात समुद्र (आणि आभाळ फाटून कोसळणारा माझ्या रत्नागिरीचा पाऊस) हे खूप महत्त्वाचे घटक आहेत.<< एक्झाक्टली.

चित्रपटाच्या सुरूवातीलाच जी फ्रेम आहे, नारळी पोफळीच्या बागेतून जाणारी ती चिर्‍यांची वाट असलेली, ती मला फार ओळखीची वाटतेय. ते बघताक्षणीच मी मनातल्या मनात कोकणात पोचले होते. Happy

मी पूर्ण पाहिला नाही, काल फक्त एक झलक पहिली. नक्कीच सुंदर असावा, विशेषतः कॅमेरा. पण जरा कंटिन्यूटीकडे लक्ष दिल असतं तर बरं झालं असतं.

"प्रिन्स(ज्या मुलाचे बाबा दुबईवरून काहीबाही वस्तू घेऊन येतात) जेव्हा त्या प्रोटोगनीस्टला शाळेत भेटतो तेव्हा तो बाकावर उजव्या बाजूला बसतो, पण नेक्स्ट शॉट मध्ये डाव्या बाजूला बसलेला दाखवलाय"

इतके सुंदर चित्रपट(बाय कमेंट्स) बनवतात, मग अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे का लक्ष देत नाहीत.

(आधी कुणी ही गोष्ट नमूद केली आहे का माहीत नाही)

.

.

.

मी काय मनच सांगतोय का? जे आहे ते आहे. << अहो मग म्हणलं ना आहे म्हणून.

तुमच मत जाणून घ्यायला आवडेल.<< तो कंटिन्युटी जर्क नाही. एवढंच मत आहे माझं. पण मला फारसे ज्ञान नाही त्यामुळे ते चुकीचं असेल. तर असो.

.

.

कंटिन्युटी हा प्रकार फक्त गेटअप आणि प्रॉप. मध्येच असतो असे नाही. <<
हा टॉण्ट नाहीये? बर. तुमचंच बरोबर आहे.

पण तरीही किल्ला हा एक अस्सल दर्जाचा सिनेमा आहे.

------------------------------------------------------------------------------------
शाळा..............फॅन्ड्री........................ च्या तुलनेने सुमारच !..........

मी किल्ला पाहीलेला नाही. पण एके ठिकाणी वाचलेलं समीक्षण खूपच आवडलं. थोड्या वेळाने लेखाबद्दल अभिप्राय आणि ते समीक्षण दोन्ही देईन. संबंधित लेखिकेची त्याच वेळी परवानगी घेतलेली असल्याने प्रताधितार भंग होणार नाही अशी आशा आहे.

’किल्ला’ बाबतीत इतक्या उलटसुलट प्रतिक्रिया बघून आश्चर्य वाटलं! Happy
न समजण्यासारखं काहीच नाहीये सिनेमात. अतिशय सुंदर चित्रपट- दृश्यात्मकही आणि वैचारिकही. अर्थात, काही त्रुटी आहेत, पण त्या सहज कानामागे टाकू शकतो.

दीपगृह लाक्षणिक अर्थाने / रुपक म्हणून घ्यायचंय.
चिन्मय तिथला अनुभव त्याच्या आईला सांगतो तेव्हा तिला आपल्या आयुष्यातल्या चढ उतारांशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेले तत्त्वज्ञान नकळत त्याच्या मुखातून निघत असल्याचा साक्षात्कार तिला होतो.
मला मे बी नीट सांगता येत नाहीये. पण चिन्मय म्हणतो की आधी खूप भीती वाटते, दम लागतो पण नंतर मस्त वाटतं. खूप कठीण प्रसंगातून तावून सुलाखून बाहेर पडलं की वाटतं तसं काहीतरी.

पाहिला येता जाता ट्रेनमध्ये ..
मजा आली..
खिडकीबाहेर पाऊस कोसळत होता आणि मी आत कोकणात रमलो होतो ..
स्टेशन येत जात होती, खिडकीबाहेर नजर जात नव्हती हेच या "संथ" चित्रपटाचे यश Happy

कोकणाचे एवढे अप्रतिम चित्रण आजवर पाहिले नव्हते. ते मराठी चित्रपटात बघायला मिळावे हा कमालीचा सुखद धक्का. अगदी तिथे त्या पूलावर, त्या पायवाटेवर, त्या विहीरीकाठी, समुद्राच्या लाटा आणि पावसाच्या रिमझिमचे आवाज झेलत मी उभा आहे असेच पुर्ण चित्रपट पाहताना वाटत होते.

कथा काय किती आहे आणि ती किती परिणामकारक आत पोहोचली, तिथे तशीच रेंगाळली की बस्स स्पर्शून गेली या गोष्टींचा मग मला काहीही फरक पडत नव्हता.. जो अनुभवायचा भाग होता तो त्या क्षणांत अनुभवला Happy

काल किल्ला बघायला मुहुर्त मिळाला. अजिबात आवडला नाही. कशाचा कशाला संबंध नाही आणि पिक्चरमधेही मागच्या दृश्याचा पुढच्याशी संबंध नाही. पार गंडलेलं डायरेक्शन आणि कथानकही.
कोकणातलं निसर्गसौंदर्य तेवढं आवडलं. खासकरून मुलं सायकलची रेस लावत समुद्राच्या बाजूने जात असतात ते.

परवा रविवारी किल्ला पाहिला आणि मनात आलेले लिहून आधी फेसबुकवर आणि थोडे विस्तार करून रात्री मिसळपाव. कॉम वर पोस्ट केले. इथे कोणीतरी 'किल्ला' बद्दल लिहिले असेल तर आधी शोधू म्हणून माझा लेख पोस्ट करण्यापूर्वी सकाळीच शोध घेतला, तेव्हा हा तुमचा लेख सापडला. आता इथे पुन्हा लिहीत नाही.

तुम्ही छान लिहिले आहे. चित्रपटाचा सर्वांगीण विचार तुम्ही केला आहे. त्यामुळे तुमचे परीक्षण आवडले. यावर इथल्या प्रतिक्रिया वाचूनही बरे वाटले, की मला हा चित्रपट बराच कळला!

<< नेत्रसुखद , चित्ताकर्षक देखाव्यांचा पोर्टफोलिओ नाही तर सिनेमा हा अनेक कलांचा , तंत्रांचा एक बांधेसूद समुच्चय असतो. निदान व्यावसायिक सिनेमाबाबत तरी ही अपेक्षा असते >> यांत बरंच तथ्य असल्याचं सिनेमा पहाताना व पाहिल्यावरही जाणवलं, हें प्रामाणिकपणे सांगतो. सिनेमा पाहून झाल्यावर तुमच्या मनावर कशाचा ठसा उमटतो, हा निकष मानला तर तर 'किल्ला' मुख्यत्वें चित्तार्षक देखाव्यांसाठी लक्षात राहील असंच वाटतं. अभिनय, तपशीलाकडे पुरवलेलं लक्ष, तांत्रिक बाबी हें सर्वच उच्च प्रतिचं असूनही कुठेतरी ही कमतरता जाणवली, हें खरं.

Pages