तळणाशिवाय दहीवडे

Submitted by मृण्मयी on 6 July, 2015 - 10:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी (बिनसालांची) उडीद डाळ
(तिखटपणानुसार) हिरवी मिरची
पेरभर आल्याचा तुकडा
मीठ
भरपूर दही
साखर
भाजलेल्या जिर्‍याची पावडर
हिरवी मिर्ची आणि आलं वाटून त्याचं गाळलेलं पाणी
चिंच-खजूर गोड चटणी
कोथिंबिरीची चटणी
काश्मिरी तिखट पूड

क्रमवार पाककृती: 

-डाळ ६-८ तास भिजवून घ्यावी

- उपसून, पुन्हा स्वच्छ धुऊन, मिक्सरमधून बारीक वाटावी. वाटतानाच त्यात आलं, मिर्ची आणि मीठ घालावं. पीठ फार पातळ किंवा अती घट्टं असू नये.

-एकीकडे (झाकण असलेला) नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवावा.

-पिठात २ टेबलस्पून इनो फ्रूट सॉल्ट घालून हलक्या हातानां फेटून घ्यावं. पीठ २-५ मिनिटं बाजूला ठेवावं.

-गरम तव्यावर चमचाभर पीठ घालत जावं.

dahivade-1-maayboli.jpg

-तव्यावर मावतील एवढे वडे घालून झाल्यावर आच मध्यम करून झाकण ठेवावं.

-साधारण २ मिनिटांनी झाकण काढून किंचित तेल सोडून वडे उलटावे.

-दुसर्‍या बाजूनं सोनेरी रंगावर खरपूस करावे.

-कढत पाण्यात १-२ मिनिटं ठेवून, हलक्या हातांनी पिळून, मीठ-साखर-आलंमिर्ची वाटणाचं पाणी घातलेल्या दह्यात सोडावे.

-२-३ तास फ्रिजमध्ये गार करून, वरून चटण्या घालून खावे.

dahivade-2-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
साधारण ४-५ माणसांना, इतर पदार्थांबरोबर पुरेसे
अधिक टिपा: 

-आवडत असेल तर पिठात ओबडधोबड कुटलेले मिरे घालावे.

-वडे फार कोरडे आणि कडक वाटले तर पाणी भरपूर गरम करून जास्त वेळ बुडवून ठेवावे.

-पाककृतीला नाव सुचवल्याबद्दल शुगोल ह्यांचे आभार. Happy

माहितीचा स्रोत: 
तरला दलाल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनघा, काही कल्पना नाही. थोड्या पिठात घालून बघा. हवंतर लिंबाचा थेंबभर रस घालून, मग सोडा घालून बघता येईल.

वा!! मस्त दिसतायत!!
दुसर्‍या प्रकारे तळणीशिवाय म्हणजे अप्पेपात्रात लोकांनी शॅलो फ्राय केल्याचे मी पाहिले आहे.

अरे वा .. फोटो छानच Happy

पण सोडा घालून करायची आयडिया फारशी पसंत नाही पडली .. आणि घरचे मेम्बर्स पण म्हणतील दही वडे करणार तर तळून कर नाहीतर करू नको .. Happy

अरे वा, तव्यावर शॅलो फ्राय करायची आणि इनो घालायची आयडिया मस्त आहे.
मी मागे मफिन पॅनमध्ये बेक केले होते दहीवडे. इनो घातला होता पण गरम पाण्यात बुडवून ठेवायला विसरले त्यामुळे दडस वाटले. पण बाकी चांगले झाले होते. हा फोटो बराच जुना आहे. भारतात परतल्यापासून केलेले नाहीत.

Dahivada and capsicum rice.jpg

अगं तेच बेक केलेले वडे आहेत. उलट आणि सुलट अशा दोन्ही बाजूंनी मांडून ठेवले आहेत. दह्यात घातले की नजरानजर होत नाही म्हणून Lol

>>दह्यात घातले की नजरानजर होत नाही म्हणून Lol

अगो, फोटो सही आहे. भातपण भारी दिस्तो आहे. मसालेभात आहे का? कसला?

मो, आप्पेपात्राचा प्रयोग करून चुकलेय. नाही आवडला. एकतर प्रत्येक बॅचला वेळ फार लागला. माझं काही चुकलं असेल तर माहिती नाही, पण डाळीचे गोळे पाण्यातून काढून दाबल्यावर वेडेवाकडे तुटले.

इनो फ्रूट सॉल्ट म्हणजेच खायचा सोडा.
इनो कंपनीचा जो खाता सोडा निळ्या पाकिटात मिळतो, त्यात लिंबू, संत्रं, कोला इ. फ्लेवर मिळवलेले नसतात, त्याला 'फ्रूट सॉल्ट' म्हणतात.

मो, आप्पेपात्राचा प्रयोग करून चुकलेय. नाही आवडला. एकतर प्रत्येक बॅचला वेळ फार लागला. माझं काही चुकलं असेल तर माहिती नाही, पण डाळीचे गोळे पाण्यातून काढून दाबल्यावर वेडेवाकडे तुटले. >> हो का मृ? मी स्वतः कधी केले नाहीयेत आप्पेपात्रात म्हणून कल्पना नाही.

तर न तळलेल्या दहीवड्यांची कथा...

वाटलेल्या पिठात इनो घालून (२ मेजरींग कप पीठाला १ टीस्पून इनो) ५ मिनीटे बाजूला ठेवले. तव्यावर तेल लावून वडे टाकले तसे ते उत्तप्यासारखे पसरायला लागले. इनो कमी पडला का पीठ पातळ झालं माहित नाही. पण त्यामुळे मग आप्पेपात्रात अगदी थेंबभर तेल घालून त्यात पीठ घातलं. अगदी मस्त जाळीदार वडे (?) झाले. अगदी कोमट पाण्यात टाकून, पिळून घेऊन दह्यात टाकले. वडे तळलेले नाहीत हे अजिबात कळत नव्हतं. पण इनोची अगदी किंचीत 'आफ्टर टेस्ट' म्हणतात तशी चव लागत होती. म्हणून मग पुढचा घाणा बिना इनोचा केला. तर मृ म्हणते तसे थोडे दडदडीत लागले. पुढचे उरलेले वडे साधारण तीन तासानंतर केले. तेव्हा घाईत इनो घालायचीच विसरले. तरीही जाळीदार, हलके वडे झाले. शिवाय इनोची ती आफ्टर टेस्टही नव्हती. सासूबाईंशी बोलताना त्यांनी अजून दोन टिप्स दिल्या -

उडीद डाळ भरपूर पाण्यात जास्त वेळ भिजवा. ८-१० तास. वाटल्यावर साधारण तासभर तरी बाजूला ठेवा. तेव्हाच त्यात एका लहान कांद्याचे दोन तुकडे घाला. त्यानेही वडे हलके होतील. नंतर कांदा काढून टाकला तरी चालेल. तेव्हा मग इनो घालायची गरज नाही.

आप्पेपात्रात आणि तव्यावर करताना साधारण सारखाच वेळ लागला पण तव्याचा सरफेस मोठा असल्याने एका वेळेस जास्त वडे होत होते. ११-१२ आप्प्यांचं पात्र असेल तर पटापट होतील. शिवाय दह्यात मुरलेले वडे अगदी योग्य आकाराचे, गोल गरगरीत होते. पार्टीसाठी पर्फेक्ट. बिडाचं आप्पेपात्र असेल तर अगदी मस्त चव येईल.
वडे सांबार बरोबर खाताना मात्र थोडी आप्प्यांसारखीच चव लागत होती, मेदूवड्यांसारखी नव्हती.

तव्यावरचे वडे

आप्पेपात्रातले इनो घालून केलेले वडे

दह्यात मुरलेले

तर मृ, पाककृतीसाठी धन्यवाद! कुठलाही गिल्ट न येता मनसोक्त वडे खाल्ले Happy

दह्यात मुरलेले वडे (मृ आणि अंजली दोघींचेही) मस्त दिसत आहेत.... पण हे न तळलेले दहीवडे मेरे मन को ना भाएंगे!

सगळ्यांचे दहीवडे मस्त दिसत आहेत Happy

ज्या पाण्यात वडे बुडवून ठेवायचेत त्यात थोडे ताक घालावे. किंवा अगदी पातळ ताकात बुडवावेत आणि मग दाबून काढावेत. अजून चांगली चव येते.

मला द व विशेष आवडत नाहीत पण फोटो मस्त आहेत सगळेच. मृ ने टाकलेला शेवटचा फोटो म्हणजे गुबगुबीत बाळ वडे दह्याची नक्षीदार दुलई पांघरून गुरगटून झोपलेत असं वाटतंय. डू नॉट डिस्टर्ब! Happy

Pages