ज्ञानयात्रा ३

Submitted by मंजूताई on 23 June, 2015 - 05:40

रोईंगपासून साधारण बारा किमीवर रिवॉच ('Research Institute of World's Ancient Traditions Cultures and Heritage' www.riwatch.org) ही एक दोनहजार नऊपासून कार्यरत असलेली एक बिनसरकारी संस्था आहे.

संपूर्ण प्रकल्प सौर ऊर्जेवर चालतो. आदिवासी लोकांकडे अनुभवातून व परंपरेतून आलेलं ज्ञानभांडार आहे. तिचं जतन करणं, त्याचा अभ्यास/संशोधन करणं व ते पुढच्या पिढीकडे सोपवण्याचं काम हा ह्या संस्थेचा मूळ उद्देश आहे. तिथे पोचेपर्यंत संध्याकाळ झाली त्यामुळे सगळा परिसर फिरता आला नाही व फोटोही काढता आले नाही. पण सरांनी हातात चाकू (मागच्या भागात सांगितला होता तो) घेतला अन पाच एकरातील शक्य होईल तितकी झाडं दाखवली व भरपूर माहिती सांगितली.
इथे औषधोपयोगी झाडांची प्रामुख्याने लागवड केली आहे. एक उंच झाडं दाखवलं त्या झाडापासून सूत काढलं जातं व त्याच्यापासून चिलखतवजा जाकीट तयार करतात.
चाकू, धनुष्य व चिलखत

एक विषारी झाडं दाखवलं त्याच्या मुळाशी बाण खुपसून काढायचा व त्या बाणाने पक्षी/ प्राण्याची शिकार करायची तरी पण तो प्राणी/पक्षी खाण्याजोगा असायचा. एक असंच मांसाहारी झाडं 'मसुंद्री' ची पानं हाताला चोळली तर अगदी माश्याच वास आला हे पोटाच्या विकारावर अतिशय उपयुक्त. खूप वेळ हाताचा वास जाईचना त्यावर उतारा म्हणून कढीलिंबाची पानं चोळावी लागली. हाडजोडी, ओवा, रामतुळस, आवळा, मेंदी, हिरडा, काल्मेघ, गवती चहा (ह्याच्या तेलाला खूप मागणी आहे), जास्वंद, निवडुंगाचे अनेक प्रकार, कॅन्सरवर उपयुक्त सदाफुली अशी अनेक झाडं होती. सुपीक जमिनीमुळे कापसाचं झाडं तरारून मोठं झालं होतं. छोट्या छोट्या रोगांकरिता उपचारासाठी शहराकडे धाव न घेता किंवा शहरात पोचेपर्यंत ह्या वनौषधीने प्राथमिक उपचार करता यावे, हा मुख्य हेतु आहे.

ऑफिससमोर अती प्रचंड उंबराचं झाड होतं. त्या उंबराची कथा ऐकली अन आश्चर्य व विश्वासही वाटला, असं काही अनाकलनीय घडू शकतं. उंबराचं झाडं खूप फळायचं... खूप घाण व्हायची.... त्यावर वटवाघूळ येऊन घाणीत भर घालायचे. फांद्या छाटल्या तर कमी पक्षी येतील, घाण कमी होईल ह्या विचाराने फांद्या कापल्या.. पक्षी येणं कमी झालं ... झाड फळेनासं झालं.... दोन मिनिट काय बोलावं सुचेनाच. खूप काही बघण्या, ऐकण्यासारखं होतं. खरं तर एखाद्या दिवसाचा मुक्काम करायचा होता तो ही कमी पडला असता. असो! लिचीचं सरबत पिऊन परतीची वाट धरली.

वाटेत खूप पुरातन टिपीकल पारंपरिक बांबूच घर बघायला गेलो. घरात प्रवेश करताच डाव्या हाताला शोपीस सारखी प्राण्यांची मुंडकी लावलेली होती. दिवाणखाना मुख्य पुरुषाचा व त्याच्या चौका (मागची खोली) खोली कसली हॉलच तो प्रथम पत्नीचा, दुसरं लग्न केलं तर त्याच्या मागे अजून एक खोली...लग्नापरत अश्या खोल्या वाढत जातात .... बहु पत्नित्वाची पद्धत इथे अजूनही आहे ...सध्या सोळा Happy चौकांच घर आहे... ज्यात पस्तीस माणसं राहतात. Happy

इथे जातीनुसार त्यांचे स्वतःचे स्वतंत्र कायदे आहेत. अजूनही जिल्ह्यामध्ये न्यायाधीश नाही. पूर्ण लोअर देबांग व्हॅलीत पोलिसखात्यातील कर्मचार्‍यांची संख्या शंभराच्या आत आहे. जात पंचायत गुन्हे झाल्यास इतिहासकालीन शिक्षा देतात. आजही उकळत्या तेलात हात घालणे वै.. शिक्षा दिल्या जातात त्यामुळे गुन्ह्यांची संख्या अगदी नगण्य आहे. मालमत्ता हक्काचे वाद जवळपास नाहीतच. वकिलांची उपासमारच होत असेल. :)( ज्योती, लोमी आयएलएस उत्तीर्ण व लोमीचा भावी पती तिघंही वकिली करत नाही अर्थात त्याची कारण वेगळी आहेत). निकीता अन अर्पिता कायद्याच्या विद्यार्थिनींचं कुतूहल चाळवलं ... खुन्याला शिक्षा काय? इथे खुन्याला पकडून आणायची गरज पडत नाही. खुनी स्वतः गुन्हा कबूल करतो.... वाद, प्रतिवादाने पंचायत शिक्षा ठरवते. (आपल्या दबंग नेत्याने गुन्हा कबूल केला असता तर एव्हाना तो सुटून आला असता आणि खरोखरच तो ह्युमन ठरला असता संस्था न काढता किंवा धुंद वकिलीणबाई गुन्हा कबूल करतील का? हे म्हणजे आत्याबाईंना मिशा असत्या तर Happy म्हणण्यासारखं झालं ) काही कारणाने एखाद्या 'अ'व्यक्तीला 'ब'चा अनावर राग आलाय पण तो त्याला मारू धजत नाही , तर तो काय करतो ? तो 'ब'चा 'मिथुन' मारतो त्याचा राग व्यक्त करायला. मिथूनचा खून म्हणजे 'ब' चा खुन! मिथुन मारल्या जाणं ही घटना तर अतिशय अपमानास्पद व लाजिरवाणी समजल्या जाते. आपल्याकडे गायीला जे महत्त्व व स्थान आहे तेच इथे मिथुनाला आहे. अश्या घटना अगदीच दुर्मिळ आहेत.
(जालावरुन साभार)

आम्ही ज्या घरात गेलो होतो त्या घराला कड्याच नाहीत कुलूप लावायला! तुम्ही केव्हाही कोणाच्या घरी जाऊ, राहू अथवा जेवू शकता. ह्याचा अनुभव कार्यशाळेच्या दरम्यान आला. चार पाच मुलांचे पालक घ्यायला आले नव्हते हे एका पालकाला कळले तर म्हणाला,"इन्को हमको दे दो हम अपने घर लेके जायेगा" काही मुलं तो घेऊन गेला तर काही ज्योती वो हमारा कझिन है म्हणत. यजमान यथाशक्ती तुमचं आदरातिथ्य करणारच. आम्ही पण स्वप्नाच्या घरात धडकलो होतो परवानगी न घेताच. त्यांना अतिथी देवो भव, मूल्यशिक्षण शाळेत शिकवायची गरज आहे का ? पण त्यांच्या पाठ्यपुस्तकात धडे आहेत. ह्या गोष्टी शिकवून येतात का? मनात आलं शिक्षणाने ते साक्षर होतील पण रक्तातच असलेला सुसंस्कृतपणा हरवून तर जाणार नाही ना? स्वच्छ, पारदर्शी, निष्कपट मनं, निःस्पृह वृत्ती गढुळणार तर नाही ना ?
क्रमशः
ज्ञानयात्रा भाग १: http://www.maayboli.com/node/54297
ज्ञानयत्रा भाग २: http://www.maayboli.com/node/54363

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूषा....

~ या भागात वनस्पती फुले फळे झाडे यांच्याविषयीची माहिती जितकी सुंदर तितकीच ती उपयुक्तही आहे असे दिसत्ये. "मांसाहारी झाड" ही संकल्पना खूपच मजेशीर वाटली, तसेच गवती चहापासून तेलही ते लोक तयार करतात याचे नवलही. कॅन्सर सदाफुलीचा उल्लेख वाचला. या सदाफुलींच्या साठ्यावर (स्टॉक) तिथे काही संशोधन चालते का? किंवा बाहेरचे कुणी येऊन तो स्टॉक त्या कारणासाठी घेऊन जाते का ? अर्थात तुमच्या तेथील अपुर्‍या मुक्कामाच्या काळात इतकी सखोल माहिती नोंदवून ठेवणे तुम्हाला शक्य नसणार हे तर उघडच आहे. तरीही कॅन्सरसारख्या काळजीच्या रोगावर असे काही (उपयुक्त ठरले असल्यास) उपाय तेथील जागेवर होत असतील आणि त्याला स्थानिक तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची रितसर परवानगी असेल तर या संदर्भात अधिकचीही चौकशी करता येईल....गरजवंतांसाठी.

लेखात तुमच्याकडून "...वनौषधीने प्राथमिक उपचार करता यावे..." असेही एक वाक्य आलेले आहेच या संदर्भात. म्हणजे रोग वा विकार अगदी सुरुवातीच्या कालावधीतच नोंदविला गेला तर तो आटोक्यात आणता येईल अशा फुलापानांपासून असा विश्वास दिसतो तिथे. चांगलेच आहे हेही.

बाकी जात पंचायतीचे अस्तित्व आणि त्यानुसार अगदी प्राचीन काळात अस्तित्वात असलेल्या (उकळत्या तेलात हात घालायला लावणे...इ.) शिक्षा जर आजही त्या भागात प्रचलित आहेत म्हणजे पंचायतीचा दाब स्थानिक पातळीवर प्रकर्षाने होत असणार हे तर उघडच आहे. "तुम्ही केव्हाही कोणाच्या घरी जाऊ, राहू अथवा जेवू शकता..." हे बाकी फार भावले. अशी परंपरा टिकून आहे म्हणजे तिची पाळेमुळे सर्वत्र गेली आहेत. अगदी स्वागतार्ह प्रथा पाळलेली दिसत्ये.

छान झाला आहे हा ज्ञानयात्रेचा तिसरा भाग.

अशोक, हे गवती चहा म्हणजे आपण करतो तो गवती चहा नसून लेमन ग्रास असावे. याचे तेल बेस म्हणून अनेक अत्तरांसाठी वापरतात. देवरुखला पुर्वी सप्तलिंगी फलोद्यान केंद्र होते तिथे मोठ्या प्रमाणावर याची लागवड बघितली होती. तिथेच तेलही काढत असत. मला तिथे जाऊन बरीच वर्षे झाली, सध्या ते तिथे आहे का याची कल्पना नाही.

मला आठवतेय त्याप्रमाणे त्याची पाने वेगळी होती.

हो दिनेश...मलाही तशीच काहीशी शंका आली होती, पण मंजूषाने नेमका "गवती चहा"च्या पात्यांचाच फोटो वर दिला नसल्याने निर्णयाप्रत काही येता आले नाही. कोल्हापूरात गेले तीन दिवस खूप पाऊस पडत असल्याने बाहेर पडता आले नसल्याने इथल्या कृषि महाविद्यालयाच्या फिल्ड कलेक्टरशीही संपर्क झाला नाही, सबब शंकेचे निरसनही करता आले नाहीच. मोबाईलची तर या वातावरणात रड चालू आहेच. असो. आता तुम्ही लेमन ग्रासचा उल्लेख केल्यामुळे कॅन्सर, किडनी ट्रबल्स आणि डास निर्मूलन मोहिमेतदेखील लेमन ग्रासचा कसा उपयोग केला जातो या विषयीचे व्याख्यान ऐकल्याचे पुसटसे स्मरत आहेच. तुम्ही म्हणता तसा लेमन ग्रासचा तेलासाठी उपयोग केल्याचे मी पाहिले आहे.

माझ्या मनात आलेली ती शंका दूर केल्याबद्दल धन्यवाद दिनेश.

औषधोपयोगी झाडांविषयी वाचून खूप आनंद झाला.

लग्नापरत अश्या खोल्या वाढत जातात .... बहु पत्नित्वाची पद्धत इथे अजूनही आहे ... >>>> काय म्हणावे कळत नाहीये इथे...

'मिथुन'चा खून करतो - >>>> हे मिथुन काय असते ??? (एक भा प्र)

घराला कड्याच नाहीत कुलूप लावायला! तुम्ही केव्हाही कोणाच्या घरी जाऊ, राहू अथवा जेवू शकता. >>>> हे सारे आपल्या कल्पनेच्याही पलिकडले आहे ...... एक मोठा विचारवंत - "थोरो" म्हणायचा की निसर्गाच्या जितके जवळ जाल, जितके नैसर्गिक पद्धतीने रहाल तितके तुम्ही सुखी, निरागस व्हाल - याची प्रचितीच आली.

तुम्ही खूप भाग्यवान आहात की अशा मंडळींचे सान्निध्य तुम्हाला मिळाले - आणि शब्दांकनही अतिशय सुंदर ...
ग्रेट अनुभव मिळाले तुम्हाला ....

शशांक पुरंदरे....

"..घराला कड्याच नाहीत कुलूप लावायला!...." ~ यावरून मला आठवत आहे की दूरदर्शनच्या त्या पूर्वीच्या जमान्यात "सुरभि" नामक एक अतिशय लोकप्रिय कार्यक्रम प्रसारित होत असे...साप्ताहिक होता. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सादरीकरणामुळेही सुरभिची चांगली चर्चा होत असे. तर अशा एका कार्यक्रमात त्यानी महाराष्ट्रातीलच एका गावाची (बहुधा पंढरपूर की नाशिक परिसरातील...आता नक्की नाही आठवत) "घराला कड्याच नाहीत कुलूप लावायला!..." अशी माहिती आणि तेथील स्थितीचे चित्रीकरणही दाखविले होते. बाहेर जाताना कुणी दरवाजा बंदही करीत नाही असे सांगितले गेले होते.

किती सुंदर आहे हे सगळे. पण शिक्षणाने किंवा यांना भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या धडपडीत ह्यांचा निर्मळपणा तर निसटुन जाणार नाही ना हा प्रश्न मलाही पडला.

मला स्वतःला व्यक्तीगतरित्या हेवा वाटावा इतके संपन्न जीवन हे लोक जगताहेत, निसर्गाच्या सानिध्यात राहताहेत. त्यांना आपल्या संपन्नतेच्या फुटपट्ट्या लावुन मोजावे आणि त्यांचा आपल्या नजरेतुन विकास करण्याची धडपड करावी का हाही प्रश्न पडला. खरे तर जे जिथे आहे ते तिथे तसेच ठेऊन आहे ते जीवन थोडे सुखकारक होण्याइतपत व्यवस्था, जसे सर्वसोयीयुक्त आरोग्य केंद्र, दळणवळणाच्या सोयी इत्यादी गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जाव्यात. बाकी त्यांची जी व्यवस्था चालु आहे ती तशीच चालु ठेवण्यात त्यांचे भले आहे असे मला तरी वाटते. उगीच आपल्या प्रगतीच्या कल्पना त्यांच्यावर लादुन त्यांच्या शांत आयुष्यात गढूळपणा निर्माण करणे योग्य नाही.

मिथुनः
https://en.wikipedia.org/wiki/Gayal

कड्या कुलुपे नसलेले गाव म्हणजे शनिशिंगणापूर.. ! अजूनही तसेच असावे. त्या गावात चोरी केली तर शनिचा प्रकोप होतो असे समजतात.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद! 'मिथुन"चा फोटो दिसत नाहीये कादिसतोय्तर दिसतोय. प्रत्यक्षात मात्र बघायला मिळाला नाही. इतिहासकालीन शिक्षेविषयी - आपण सगळ्यांनी लहानपणी मांजरीची गोष्ट खाल्ली 'बुडबुड घागरी मी खीर नाही खाल्ली' गुन्हा केला नसेल तर मला काही होणार नाही म्हणत अग्नीपरीक्षेला तयार होतो... आणि त्याला काही होत नाही, असा त्यांचा विश्वास आहे.
सच्चेपणाची एक गोष्ट विजयसरांनी सांगितली - नैसर्गिक आपत्ती झाली होती म्हणून कंबळ वाटप होतं. ट्रकमधून कंबळ घेऊन जाताना काही कंबळ पडले. वाटपाच्या ठिकाणी ट्रक पोचल्यावर लक्षात आले की कंबळ कमी आहेत. त्याच वाटेने कंबळ घ्यायला लोक येत होते त्यांना ते दिसले पण त्यांनी उचलले नाही... काय म्हणाल! गवती चहा म्हणजे तो लेमन ग्रासच. अंधार पडल्यामुळे प्रचि घेता नाही आले.
<<एक मोठा विचारवंत - "थोरो" म्हणायचा की निसर्गाच्या जितके जवळ जाल, जितके नैसर्गिक पद्धतीने रहाल तितके तुम्ही सुखी, निरागस व्हाल - याची प्रचितीच आली.>>>> अगदी खरंय!
मामा, इथली बाग बाल्यावस्थेत आहे संशोधन सुरु नाही झालंय.
साधना - अगदी माझ्या मनातलं लिहीलंय