म्यानमा - ३

Submitted by arjun. on 20 June, 2015 - 12:01

भाग -१ http://www.maayboli.com/node/54353
भाग -२ http://www.maayboli.com/node/54354

दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी उठून ७ वाजता बाहेर पडलो. आधी ब्रेकफास्ट करून मग मन मानेल तसे फिरायचे असे ठरवलेले. रस्त्यावर सकाळी जास्त रहदारी नव्हती. थोड्या अंतरावर एक ईराणी किंवा उडुपी टाईप हॉटेल दिसले. गल्ल्यावर मालक बसलेला. शाळेतल्या वर्गातल्या सारखी लायनीत लाकडी टेबलं आणि बाकं मांडून ठेवलेली. मोहिंगा ही म्यानमारची नॅशनल डिश. एक प्रकारचे फीश आणि नूडल सूप जे ब्रेकफास्टला खाल्ले जाते. त्यामुळे तेच ऑर्डर केले. बरोबर चहा. समोर जे आले त्यात फीश आणि नूडल्स शिवाय आणखी पण बरेच काही असावे. पण मला नुसता ब्रॉथ आणि नूडल्स हेच त्यातल्या त्यात चविला ठीक वाटले. मासा जेमतेम शिजला होता आणि तो काही आणखी खावा वाटेना. कालच्या बेचव बिर्याणी नंतर आज पुन्हा पोपट झालेला. तेव्हड्यात चहा आला. संपूर्ण दुधाचा. गोडमीट्ट! साखरे ऐवजी त्यात कन्डेन्स्ड मिल्क ओतलेले. (हेच काल फालुद्यात घातले असते तर.) पण असो मोहिंग्यापेक्षा आपलासा वाटला.

ब्रेकफास्ट झाल्यावर कंडावजी लेकला (Kandawgyi Lake) जायला टॅक्सी केली. टॅक्सीवाला बडबड्या होता पण बडबडीचा सगळा फोकस इथे किती दिवस, एअरपोर्ट ड्रॉप लागेल का.. इथून बगॅनला जाणार तर तिथे माझा दोस्त (म्हणजे ट्रॅव्हल एजंट!) आहे वगैरे वगैरे. नंबर घेऊन ठेवला. नं जाणो खरच लागला तर.
कंडावजी लेक मधे एका तरंगत्या नौकेवर राजवाडा बांधला आहे. शेजारी लहान जॉगर्स पार्क आहे. उगाच दोन चार फोटो क्लिक केले. कालचा श्वेडगोन दिवसा पुन्हा बघायचा होता तेव्हा म्हटलं उन यायच्या आत तोच नीट बघून घेऊ.

श्वेडगोनमध्ये कालच्या भाविकांची जागा आता सकाळी प्रवाशांनी घेतलेली. अनेक बौद्ध सन्याशी दिसत होते. अगदी बालसन्याशी देखील. त्यापैकी दोन लहान मुले तर सावलीत मस्त पैकी लॉलीपॉप चघळत बसली होती. फोटो काढू का विचारले तर हसत हो म्हणाली. पॅगोडाच्या बाहेर कमळाच्या फुलांसारखी छत्र चामरे होती. त्या खालच्या बुद्धाच्या मुर्तींना लोक आता पाण्याचा दुधाचा अभिषेक करत होती. अनेक बायकांनी मुलांनी चेहर्‍यावर..गालावर..कपाळावर गंधासारखी पावडर लावलेली. पावडरीचे नाव थनका. त्याने उन्हापासून संरक्षण होते. उभ्या आडव्या सगळ्या म्यानमार मधे ती लावली जाते. मनाजोगा वेळ तिथे घालवून झाला होता. कालच्या अनुभवावरून शहाणपणा येऊन आज मी जोडे काढून बॅकपॅक मधे ठेवले होते त्यामुळे जिथून आलो तिथूनच परत जाणे वगैरे भानगड नव्हती. आता दुसरे काही बघू म्हणत खाली आलो.

टॅक्सीवाल्याला हॉटेलातून बर्मीज भाषेत लिहून घेतलेला गुगलने दिलेल्या बहादूरशहा जफरच्या कबरीचा पत्ता दाखवला. टॅक्सीवाले सहसा कुठेही जायला नाही म्हणत नव्हते हे मोठे सुख होते. त्याने दहा मिनिटांत एका तुरळक वस्तीच्या भागात गाडी वळवली. एका चौकापाशी दुसर्‍या एकाला माझा पत्ता दाखवला आणि त्यांचे आपापसात इथून खालती जावा मग डाव्या हाताला वळा वगैरे होऊन थेट नेमक्या ठिकाणी ड्रायव्हरने गाडी उभी केली.

ऐसपैस फाटका समोर फिकट हिरव्या रंगात रंगवलेला दर्गा समोर दिसत होता. समोरच्या अंगणात कोणीही नव्हतं. एक लहान मुलगी हातात चार पाच हार घेऊन उभी होती. मी आत गेल्यावर एक वयस्कर मुसलमान व्यक्ती बाहेर आली. त्यांनी लगेच मला कहासे आये आप? म्हणत उर्दू मधे चौकशी केली. इथे जास्त कोणी येत नाहीत म्हणाले. मुळात म्यानमार मधेच कोणी भारतीय लोक येत नाहीत तर इथेतरी कसे येणार. समोर एक व्हरांडा होता त्या पलिकडे बहादूरशाह जफरची कबर होती. डाव्या हाताला दर्गा होता. आत एका खोलीत बादशहाची बेगम आणि मुलगा यांच्या कबरी होत्या. एक केविलवाणे झुंबर लागले होते. खाली एकटा दुकटा गालीचा होता. भिंतीवर बादशहा आणि त्याच्या बेगमचे सालंकृत चित्र फ्रेम मधे लावली होती आणि त्या नंतर शेजारीच अंगाचे मुटकुळे होऊन खाटेवर जराजर्जर झालेल्या बहादूरशाहचा अतिशय दिनवाणा फोटो. तो निरखत असतांना केअरटेकर काका सांगू लागले कसे ब्रिटीशांनी त्यांचे हाल केले. राहायला झोपडी वजा घर दिले होते. परकीय मुलखात आल्यापासूनच राजाने हाय खाल्ली. कविमनाच्या बादशहाचे मन कधीही इथे लागले नाही. रंगूनला आणल्या नंतर चार पाच वर्षात बादशाहाचा मृत्यू झाला. ब्रिटीशांनी बादशहाला कुठे पुरले हेही अनेक वर्ष कोणाला माहित नव्हते. मग अचानक कधीतरी या ठिकाणी कसले खोदकाम करतांना त्याचा ठावठिकाणा लागला आणि या कबरी भोवती हे सगळे बांधकाम केले गेले. आता रंगून मधे भारत पाकिस्तानातले व्हिआयपी आले की इथे भेट देतात म्हणाले.

बाहेरच्या एका भिंतीवर माहितीचा दगड होता. "Bahadur Shah. ex king of Delhi, Died here in Rangoon on....." सगळ्या भारतभर सत्ता गाजवणार्‍या मुघल सल्तनतीचा हा शेवटचा वंशज फक्त "दिल्लीचा राजा" इतक्याच बिरुदाचा मानकरी म्हणून शिल्लक होता. लाल किल्ल्यावर अनेकदा बघितलेल्या साऊंड अँड लाईट शो चा क्लायमॅक्स आज इथे झाला होता.

लगता नही है दिल मेरा उजडे दयार में
किस कि बनी है आलम ए ना पायेदार में

केह दो इन हसरतोंसे कही और जा बसे
इतनी जगह कहा है दिल ए दागदार में

उम्र ए दराझ मांग के लाये थे चार दिन
दो आरझू मे कट गये दो इंतजार में

कितना है बदनसिब जफर दफ्न के लिये
दो गज जमिन भी ना मिली कुए यार में

कवि/गझलकार : बहादूरशाह जफर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.

छान आहे सफर.. अश्या हटके देशांबद्दल आधिक माहिती मिळावी अशी नेहमीच उत्सुकता असते..

बहादूर शहा यांची कबर .. वाह.. तिथला फोटो नाही काढला??खूप आवडला असता पाहायला...

मस्तं लिहीलंय.
लहानपणी भा रा भागवतांच्या एका कथेत वाचल्यापासून ब्रह्मदेशाचं आकर्षण आहे.
ब्रह्मदेशाच्या राजाला रत्नागिरीत स्थानबंद ठेवलं होतं , त्याचा राजवाडा - थिबापॅलेस आहे रत्नागिरीत.
त्यामुळेही.
त्या राजाची नात टुटु कधी कधी रस्त्यावर चालताना दिसायची.

हिरेमाणकांच्या देशांतून पकडून आणलेल्या या राजाच्या वंशजांची अवस्था बघून वाईट वाटायचं.

छानच झालेत लेख. आपला शेजारी असूनही आपल्याकडून थेट विमानसेवा नाही. कुणी पर्यटक जातही नाहीत सहसा. त्यामूळे फार उत्सुकता आहे. हे सगळे वाचून जावेसे वाटायलाही लागलेय.

त्या राजाची नात टुटु कधी कधी रस्त्यावर चालताना दिसायची.<<< हो. फार हलाखीमध्येच गेली.

मागच्यावेळी कुठल्यातरी चर्चेमध्ये रॉबिनहूड यांनी थिबा राजाची समाधी शिवाजी नगर जवळ असल्याचा उल्लेख केला होता.. इतकी वर्षे रत्नागिरीमध्ये राहून ही समाधी तिथे आहे हे माहित अन्व्हतं. यावेळी पर्यटकांसाठी माहिती असा बोर्ड दिसला म्हणून मुद्दाम जाऊन ही समाधी पाहून आलो. लहानपणी कित्येकदा खेळण्यासाठी या इमारतींमधून फिरलेले आहोत, पण तिथे तेव्हा या समाधी असल्याचं माहित नव्हतं. Sad

लेखमाला झक्कास चालू आहे. लव्कर पुढचे भाग लिहत रहा.

तिन्ही भाग फोटोंसकट आवडले...

पुढचे सगळे भाग लवकर लवकर येऊ द्या ही विनंती

धन्यवाद. तुमच्या कौतूकामुळे पुढे लिहायचा हुरूप आला. जमेल तसे लवकर लिहिण्याचा माझा प्रयत्न राहील.

साती या थिबा पॅलेस बद्दल विकीवर वाचले होते. अजूनही राजाचे वंशज रत्नागिरीत राहतात हे वाचून नवल वाटले. (कदाचित स्वातंत्र्यानंतर बर्मात आर्मीचे शासन असल्याने त्यांना परत जाता आले नसेल? माहिती काढायला हवी.)

वर्षू नील, स्पॉक, कबरीचे फोटो काढले नव्हते. माहितीच्या दगडाचा काढलेला. पण संपूर्ण सफरीत जे फोटो माझ्या मोबाईलफोनने काढले होते (खादाडीचे सगळे आणि येंगॉनच्या मोजक्या ठिकाणांचे) ते नंतर भारतात आल्यावर मोबाईल चोरीला गेल्याने गेले Sad

दिनेश आपल्याकडून एअर ईंडियाची कोलकात्याहून येंगॉनसाठी डायरेक्ट फ्लाईट आहे. पण फक्त आठवड्यातून एकदा.

बाकी येंगॉन पेक्षा नंतरच्या सफरीचे फोटो बघायला तुम्हा सर्वांना जास्त आवडतील अशी आशा आहे.

अर्जून, आता थोडा मोकळा होतोय हा देश असे वाटतेय. नेटवर काही जाहीराती दिसतात. लोकप्रभात एक लेखही होता. कधीकाळी हा भारताचाच भाग होता. अजूनही सीमा लागूनच असल्याने पायी पण जाता येते ( आपले सैन्य नव्हते का गेले ? Happy )

छान चालू आहे हे प्रवास वर्णन!

थिबा राजा बद्दल मायबोली वर रॉबिनहूड यांनी पण लिहिलेलं वाटतं!

छान लिहिताय. काहीच विशेष माहिती नव्हती ह्या देशाबद्दल. फोटो आणि वर्णन वाचून जायला हवे असे वाटले. उत्सुकतेपोटी नेटवर अजूनही माहिती आणि फोटो पाहिले तर अगदी एक्झॉटिक लोकेशन वाटले Happy

छानच!
खरंच, आपला शेजारी देश असूनही आपल्याला त्याबद्दल फारशी माहिती नाही.

नुकतंच, 'द ग्लास पॅलेस' या पुस्तकाबद्दल वाचनात आलं. लेखक अमिताव घोष. त्याचं कथानक रंगूनमधे घडतं. ब्रह्मदेशाबद्दल त्यात अगदी विस्तृत वर्णन आहे असं दिलं होतं.

सुंदर लेखमाला ! आजच नजरेला आणि तीनही भाग एका बैठकीत वाचून काढले ! फोटोही मस्त आहेत... जरा अजून जास्त फोटो टाकलेत तर अजून मजा येईल !

एका शेजारी पण बराचसा अनभिज्ञ असलेल्या या भारताशी सम्स्कृतीने जोडलेल्या देशाबद्दल खूप कुतुहल आहे. पूर्वीच्या राजवटीने स्वतःहून स्विकारलेल्या अज्ञातवासातून आता तो देश खूपसा बाहेर येत आहे. कधीकाळी भेट देण्यासाठीच्या यादीत त्याचा समावेश आहे. या लेखमालिकेच्या निमित्ताने त्याची चांगली ओळख होत आहे.

धन्यवाद !

माझ्या 'लेखा'चा उल्लेख आला म्हणून लिंक देतो. त्यातले फोटो फक्त मी काढलेले आहेत बाकी सर्व माहिती इकडून तिकडून ढापलेली आहे... ::फिदी:

http://www.maayboli.com/node/12736