उपनिषदांचा अभ्यास - भाग ४ - न तत्र चक्षुर् गच्छति

Submitted by पुरंदरे शशांक on 4 June, 2015 - 06:21

उपनिषदांचा अभ्यास - भाग ४ - न तत्र चक्षुर् गच्छति

केनोपनिषद
ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः ।
केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुः श्रोत्रं क उ देवो युनक्ति ॥ १ ॥
कुणाच्या इच्छेने आणि प्रेरणेने मन धाव घेते ? कुणी योजलेला प्रथम प्राण हालचाल करतो ? कुणाच्या इच्छेने प्रेरिलेली ही वाणी (लोक) बोलतात ? कोणता देव चक्षु आणि श्रोत्र यांना त्या-त्या कामी योजतो ?

श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत् वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राणः ।
चक्षुषश् चक्षु: अतिमुच्य धीराः प्रेत्यास्माल्लोकात् अमृता भवन्ति ॥ २ ॥
(श्रवणाचे जे श्रवण, मनाचे जे मन, वाणीची जी वाणी, प्राणाचा जो प्राण, चक्षुचा जो चक्षु, तोच तो देव. त्याला जाणून, देहभाव सोडून, धीर पुरुष या लोकातून निघून जाऊन अमर होतात.)

मागील भागात आपण या दोन ऋचांबद्दल पाहिले. आता यापुढील ज्या ऋचा आहेत त्यांबद्दल -

न तत्र चक्षुर् गच्छति न वाक् गच्छति नो मनः ।
न विद्मो न विजानीमो यथैतद् अनुशिष्यात् ॥ ३ ॥
(तेथे चक्षु जाऊ शकत नाही, वाणी आणि मनहि जाऊ शकत नाही. आम्ही स्वतः जाणत नाही. आम्हाला कळत नाही की, कसे हे शिकवावे ?)

हे जे (सत् ) तत्व आहे ज्यामुळे तो डोळा, ती वाणी, ते मन प्रेरीत होते ते तत्व तर फार विलक्षण आहे, कारण या आपल्या साध्या डोळ्यांनी, या वाणीने, या मनाने ते तत्व जाणले जाऊ शकत नाही. आता हे सारे सांगायचे तरी कसे कारण ज्याला कोणाला सांगायचे त्याला हे कळणार तरी कसे ? परमार्थात ही एक फारच मोठी अडचण आहे की हे तत्व ही काही दृष्य वस्तू नसल्याने हे सांगायचे कसे ? आपल्याला कोणी संगितले की ऐक हा अल्ट्रासाउंड - , तर आपण म्हणू पण मला तर काहीच ऐकू येत नाहीये !! माझा कान जर ती अल्ट्रासाउंड फ्रिक्वेन्सी पकडू शकत नसेल तर तो अल्ट्रासाउंड आपल्याला कसा काय समजणार ?? तसेच या तत्वाबद्दल आहे - ना डोळ्याने हे पहाता येते, ना वाणीने सांगता येते, ना मनाने हे तत्व जाणता येते...
यामुळे ज्या ऋषिंनी हे तत्व अनुभवले आहे त्याचे वर्णन करताना ते म्हणतात - जर ते तत्व शब्दात मांडता येण्यासारखे नाहीये ते सांगावे तरी कसे ?

मात्र श्री समर्थ यापुढे एक पायरी जाऊन म्हणतात - अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते | परि बोलता बोलता कळो येते |

अशा या शब्दातीत तत्वाबद्दल श्री ज्ञानेश्वर माऊली जेव्हा अतिशय विश्वासाने "तेणें कारणें मी बोलेन| बोलीं अरूपाचें रूप दावीन| अतींद्रिय परी भोगवीन| इंद्रियांकरवीं ||अ. ६-३६||" असे म्हणतात - तेव्हा तर आपण केवळ चकितच होतो.
माऊली म्हणताहेत - ते तत्व असूदेत अतींद्रिय पण माझे शब्द असे सामर्थ्यवान आहेत की या इंद्रिंयाकरवीच तुम्हा श्रोत्यांना त्याचा अनुभव देईनच देईन.
(काय सार्थ अभिमान आहे पहा माऊलींना आपल्या प्रतिभेचा, शब्द सामर्थ्याचा .. या संतांनी आपल्या सारख्या सर्वसामान्यांवर किती उपकार केले आहेत हे कळणेदेखील खूप अवघड आहे.)

अकराव्या अध्यायात जेव्हा श्री भगवान अर्जुनाला म्हणतात की - पहा हे माझे विश्वरुप - तेव्हा त्या भगवानांच्या अतिसामर्थ्यशाली शब्दांचे वर्णन करताना माऊली लिहितात -
तीं अक्षरें नव्हती देखा | ब्रह्मसाम्राज्यदीपिका | अर्जुनालागीं चित्कळिका | उजळलिया श्रीकृष्णें ||अ. ११- १७८||
(जर कधी दाट अंधारात विमान लँड होताना कोणी अनुभवले असेल की - जमिनीवर कितीही काळोख असला तरी ते रनवेच्या/धावपट्टीवच्या दोन्ही बाजूंनी तळपणारे दिवे जसे त्या वैमानिकाला विमान उतरवण्यासाठी नेमके दिग्दर्शन करतात तसेच हे भगवंतांचे तेजोमय शब्द - ते शब्द नाहीतच, तर ते आता ब्रह्मसाम्राज्य दाखवणारे दिवेच झालेत जणू ...)
श्रीभगवंतांनाही मान डोलवायला भाग पाडेल अशी ही माऊलींची अगदी लखलखीत ओवी...
इथे अजून एक गंमत आहे - आपण जर माऊली, समर्थ, तुकोबा आदि संतांच्या वाणीचे सामर्थ्य पाहू लागलो तर लक्षात येईल की याच ओवीने संतवाणीचेही सामर्थ्य प्रकट करुन दाखवले आहे की ... किती वर्षे झाली आहेत हे सारे शब्द उच्चारून - पण त्यातील सामर्थ्य अजूनही तितकेच प्रभावी आहे. उपनिषदांचा, संतसाहित्याचा अभ्यास आपण जितक्या उत्कटतेने करु, तितकी त्याची गोडी आपल्याला लागेल आणि भाग्यवशात तितके त्याचे सामर्थ्य आपल्याला जाणवू लागेल. ( इथे सामर्थ्य याचा साधा सरळ अर्थ आहे भगवंताविषयी अकारण, कामनारहित प्रेम निर्माण होणे आणि ऐहिकाविषयी मनातून कमालीची निरासक्ति निर्माण होणे)

अन्यदेव तद् विदितात् अथो अविदितादधि ।
इति शुश्रुम पूर्वेषां ये नस्तद् व्याचचक्षिरे ॥ ४ ॥
ते विदिताहून वेगळेच आहे. तसेच ते अविदिताहून पलीकडे आहे. असे आम्ही पूर्वाचार्यांकडून ऐकले आहे, ज्यांनी आम्हाला ते समजावले.

हा सारा प्रांत केवळ अनुभूतिचा असल्याने हे सारे ( त्या तत्वासंबंधी) सांगण्याच्या पलिकडले आहे असे हे ऋषि म्हणत आहेत. एक साधे उदाहरण घेऊ - सूर्योदयाचे, हिमालयाचे, सागराचे कोणी कितीही शब्दामधे वर्णन केले तरी अनुभवाच्या कसोटीवर ते वर्णन कायम अपूर्णच वाटणार (शब्दात न मावणारे असणार). तसेच नेमके या ऋषिंना म्हणायचे आहे.
दुसरे असे की हे तत्व शब्दात, विचारात पकडता येणे शक्य नसल्याने इथे कोणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे आवर्जून सांगितले आहे. पूर्वाचार्य याचा अर्थ अनुभवी मार्गदर्शक.
इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की साध्या व्यावहारिक गोष्टी शिकण्यासाठी जर एखादा अनुभवी मार्गदर्शक लागतो तर या परम-अर्थाची गोष्ट जिथे करतो आहोत तिथे तर गुरुंच्या मार्गदर्शनाची फार मोठी गरज आहे.
सद्यस्थितीत बुवाबाजीमुळे खरे संत, सद्गुरु ओळखणे जरी खूप अवघड झाले असले तरी संतसाहित्यात या गोष्टीचेही स्पष्टीकरण केलेले आढळते.
याबाबत श्रीसमर्थ, तुकोबा यांसारखे परखड संत फारच उपयोगी पडतात -

खरे सद्गुरु कोण हे सांगण्याआधी समर्थांनी असद्गुरु / भोंदू गुरु यांबद्दल विस्ताराने लिहिले आहे.

समर्थ म्हणतात - या जगात कोट्यावधी मंडळी आपण गुरु आहोत असा फोल दावा करतात. निरनिराळ्या संसारिक अडचणींवर मात करण्यासाठी हे गुरु वेगवेगळे पॉवरफुल मंत्र सांगतात. पण या गुरुंच्या मनातच अनेक कामना दडून असल्याने हे मुक्तिदाते गुरु नव्हेतच !! चेटूक करणारे (ऐहिक गोष्टींसाठी लोकांना भुलवणारे), काहीतरी चमत्कारिक, कल्पित गोष्टी सांगून फसवणारे हे सद्गुरु कसे असू शकतील ??
गुरु पाहत पाहता लक्ष कोटी
बहुसाल मंत्रावळी शक्ति मोठी
मनी कामना चेटके धातमाता
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ||मनोबोध १८०||

चेटक्या (पैसे, स्त्रीसंग इ. ऐहिक कामनांसाठी लोकांना भुलवणारा), लबाड (भोंदू), पैशाच्या मागे लागलेला, सतत निंदा-मत्सर करणारा, भक्तिसाधनेत कसलीही गति नसलेला, अनेक व्यसनांनी ग्रस्त, उन्मत्त वर्तन असलेला, ज्याची संगत लोकांसाठी बाधक ठरते असा कोणीही सद्गुरु असू शकत नाही. जो आत्मज्ञानी आहे तोच तो विरळा साधु, तोच सद्गुरु.
नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु।
नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू।
जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू॥१८१॥

परमार्थ ही नुसती बोलण्याची गोष्ट नसून आचरण्याची गोष्ट आहे हे पुरेपूर माहित असल्याने जो स्वतः भक्तिसाधने, पूजाअर्चा, ध्यान-धारणा, नामस्मरण इ. गोष्टी अतिशय निष्ठेने, प्रेमपूर्वक करतो व नंतरच तसे करण्याविषयी शिष्यांना उपदेश करतो तोच सद्गुरु. अशा सद्गुरुंच्या अंतःकरणात कोणत्याही कामनेला, वासनेला थारा नसतो. त्याचे अंतःकरण कायमच भगवत् - प्रेमाने भरलेले असते.
नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी।
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥
मुखे बोलिल्यासारिखे चालताहे।
मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे॥१८२॥

ऐहिक गोष्टींविषयी ज्याच्या मनात पूर्ण वैराग्य उत्पन्न झाले आहे असा जो परमेश्वराचा एकनिष्ठ भक्त असतो तो परमार्थ जगून दाखवतो (विज्ञान - अ‍ॅप्लिकेशन), ज्याच्या ठिकाणी केवळ आणि केवळ (निश्चयपूर्वक) आत्मभावच स्थापन झालेला असतो तो सद्गुरु. अशा सद्गुरुंच्या दर्शनाने, स्पर्शाने कोणाही भाविकाला पुण्य लाभते (भगवत्-प्रेमाची ओढ निर्माण होते). या सद्गुरुंच्या केवळ शब्दांनी त्या भाविकाच्या मनातील संदेह नष्ट होतात (भगवंत आहेच आहे ही भावना निर्माण होते)
हरीभक्त वीरक्त विज्ञान राशी ।
जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ॥
तया दर्शने स्पर्शते पुण्य जोडे ।
तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥

अशा या महापुरुषाच्या ठिकाणी अगर्वता(नम्रता) , विरक्ति, शांति, क्षमा, दया अशा दैवी गुणांचा वास असतो. हा योगीराज सदैव सावध असतो. कुठल्याही ऐहिक गोष्टींविषयी मनात लोभ नसल्याने तो महात्मा कधीही क्षुब्ध होत नाही वा कधी दीनवाणाही होत नाही.
नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥
नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।
इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥

अनेक दैवी गुणांनी युक्त अशा साधुचे मुख्य लक्षण म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारे पूर्ण समाधान. कोणाही भाविकाला त्या समाधानाची झलक मिळते. हा साधुपुरुष भक्त असतो, ज्ञानी असतो, विवेकी असतो, पूर्ण विरक्त असतो, कृपाळु असतो, मन जिंकलेला असतो, क्षमाशील असतो, योगी असतो, सावध असतो, शास्त्रनिपुण असतो, आणि लोकव्यवहारासाठी उपयुक्त असलेले व्यवहारचातुर्यही बाळगून असतो.
जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥
प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे।
तयाचेनि योगे समाधान बाणे॥१८३॥

श्रीमत् दासबोधात समर्थांनी या सद्गुरु लक्षणावर समासच्या समास लिहिले आहेत.
दशक पहिला - समास चवथा : सद्गुरुस्तवन, समास पांचवा : संतस्तवन
दशक दुसरा - समास नववा : विरक्त लक्षण
दशक पाचवा - समास दुसरा : गुरुलक्षण, समास दहावा : सिद्धलक्षण
दशक आठवा - समास नववा : सिद्धलक्षण
दशक अकरा - समास सहावा : महंत लक्षण, समास दहावा : निस्पृह वर्तणूक
दशक बारा - समास दहावा : उत्तमपुरुषनिरूपण
दशक पंधरा - समास पहिला : चातुर्य लक्षण, समास दुसरा : निःस्पृह
दशक अठरा - समास दुसरा : सर्वज्ञसंगनिरूपण, समास तिसरा : निस्पृहशिकवण
(जो जाणेल भगवंत | तया नाम बोलिजे संत | जो शाश्वत आणि अशाश्वत | निवाडा करी ||
म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन | स्वधर्म कर्म आणि साधन | कथा निरुपण श्रवण मनन | नीती न्याये मर्यादा || ५-२-५२ ||
यामधे एक उणे असे | तेणे ते विलक्षण दिसे | म्हणोनि सर्वहि विलसे | सद्गुरुपासी ||५-२-५३||)

तुकोबांनीही खालील शब्दात बुवाबाजीवर प्रहार केले आहेत.
ऐसे संत झाले कली | तोंडी तमाखुची नळी |
पुढे भांग वोढविली | स्नान संध्या बुडविली ||
भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान ॥
तुका ह्मणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥२८४७||

पुढे बुवा म्हणतात -
नव्हती ते संत करितां कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥१॥
येथें नाहीं वेश सरतें आडनांवें । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ध्रु.॥
नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रावरण ॥२॥
नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ॥३॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥४॥
नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती संत ॥५॥
नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥६॥
तुका ह्मणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ॥७॥२२९५||

ज्याने देहभाव पूर्णपणे टाकला आहे (म्हणजेच भगवत भाव हाच ज्याचा स्थायिभाव झाला आहे) तोच खरा संत. आणि अशा संतसंगतीचे महात्म्य गाताना बुवा म्हणतात -

हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाइन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥
न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देइ सदा ॥२॥
तुका ह्मणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥३॥२२९६|| (अशा संतसंगतीपुढे बुवांना धनसंपदा तर सोडाच, मुक्तिही गौण वाटते आहे)

थोडक्यात सांगायचे तर - ज्याच्या संगतीत परमेश्वराबद्दल प्रेम उत्पन्न होते आणि वाढीसही लागते तो संत किंवा सद्गुरु. जो स्वतः परमेश्वर प्रेमात न्हाऊन निघालेला असतो त्याच्या संगतीत विषयांचे प्रेम कसे वाढीला लागेल ?

पण असे सद्गुरु कुठे भेटणार ? कुठल्याही भोंदू बुवाकडून आपण फसवले जाणार नाही याकरता आपण फार सावधगिरीने शोध घ्यायला पाहिजे. मात्र इथे कोणा संतांची परीक्षा घेणे अपेक्षित नाहीये तर आपल्याला नक्की काय पाहिजे याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. ज्याला संसाराचीच डागडुजी करायची आहे तो तशीच मंत्रतंत्र, यज्ञयाग सांगणारी व्यक्ति शोधणार. याउलट ज्याच्या चित्तात भगवंताकरता थोडे तरी प्रेम असले (निदान भगवंतच हवा अशी तळमळ असली) तरच त्याला अशा भगवतप्रेमी (किंवा भगवद्रुप) संतांची भेट होणार हे लक्षात आले तरी पुरे.

सद्गुरु शोधाबाबतची एक मार्मिक गोष्ट आठवते. कोणी एक तरुण सद्गुरुंच्या शोधात असतो. अनेक बुवा, महाराजांना भेटूनही त्याच्या नेमके लक्षात येत नाही की नक्की सद्गुरु कोणाला म्हणावे. त्याचा एक मित्र म्हणतो - अरे, आपल्या गावाबाहेरच जंगलात एक साधुपुरुष आहे त्यांना तू का भेटत नाहीस ? हा तरुण त्या साधुपुरुषाला भेटून विचारतो - सद्गुरुंचे लक्षण काय ? ते सर्व वर्णन करुन सांगतात - आत्मज्ञानी, क्षमाशील, शांतस्वरुप, समाधानी, इ. त्यावर तो तरुण म्हणतो - ते काही मला कळत नाहीये, मला ओळखण्याजोगे एखादे दृष्य लक्षण नाहीये का ? त्यावर जरा विचार करुन हसत हसत ते साधुपुरुष त्याला म्हणतात - तुझी अडचण माझ्या लक्षात आलीये. असे पहा की ज्याच्या चेहर्‍यामागे दृष्य तेजोवलय तुला दिसेल ते तुझे सद्गुरु. आता आहे कि नाही अगदी सोपे ओळखायला ? तो तरुण अतिशय समाधान पावून त्यांचे आभार मानतो व अशी व्यक्ति शोधायला बाहेर पडतो. मात्र चहू दिशांना केलेली हजारो मैलांची त्याची पायपिटी अगदी व्यर्थ ठरते. अनेक साधुपुरुषांना भेटूनही त्याला कोणी अशी तेजोवलयधारी व्यक्ति काही दृष्टीस पडत नाही. या सद्गुरु शोधात त्याचे तरुणपण संपून तो चांगला प्रौढही होतो, पार म्हातारपणाच्या उंबरठ्यावर पोहोचतो. या सगळ्या शोधात आपले आयुष्य केवळ व्यर्थ गेले म्हणून तो अतिशय निराश होऊन आता आत्महत्या करावी अशा निर्णयाप्रत येतो. त्यावेळेस तो ज्यांच्याबरोबर भटकत असतो त्यांना हा विचार सांगतो. ती मंडळी म्हणतात - आम्ही तुला थोपवत नाही, पण इथे जवळच एक महापुरुष आहे त्याचे दर्शन घेऊन तू तुला वाटेल ते कर. आम्हा सगळ्यांना फार आशा आहे की इथे तुझ्या समस्येचे नक्की निराकरण होईल, तू आमच्याकरता एवढे करच. तो जेव्हा त्या महापुरुषाच्या आश्रमात जातो तेव्हा अगदी लांबूनही त्याला ते तेजोवलय दिसू लागते, धावतच तो जवळ जातो आणि केवळ आश्चर्यचकित होऊन पहात रहातो की ज्याने त्याला ही (तेजोवलयाची) खूण सांगितली तोच तो महात्मा असतो. त्यांच्या पायावर कोसळत तो रडू लागतो -म्हणतो माझी अशी जीवघेणी थट्टा का केलीत, त्या पहिल्या भेटीतच मला हे का नाही सांगितलेत - आता तर माझे सगळे आयुष्यही संपत आले .. त्यावर तो महापुरुष म्हणतो - अरे वेड्या, मी तर तेव्हाही तोच होतो आणि आताही तोच आहे, मात्र या शोधाशोधीत तुझ्यात आंतरिक बदल झालाय (त्या तळमळीने तुझे अंतःकरण शुद्ध झाले) आणि त्यामुळेच तुला "ते" तेजोवलय "आता" दिसू लागलंय.. गतजीवनाबद्दल अजिबात निराश होऊ नकोस - तुझे सगळे तरुणपण व्यर्थ गेले नाहीये तर तुला त्याबदल्यात ही अनमोल गोष्ट प्राप्त झालीये..

अशी जगावेगळी तळमळ असेल तर माऊली म्हणतात तसे - सद्गुरु आपैसा भेटेचि गा ...

आपलेही अंत:करण अतिशय निर्मळ होउन त्यात फक्त भगवत्प्रेमाचीच आस निर्माण व्हावी अशी यासाठी ऋषिमुनींच्याचरणी, संतांचरणी, सद्गुरुंचरणी मनोभावे प्रार्थना.

----------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१] श्री ज्ञानेश्वरी
२] श्री दासबोध
३] मनोबोध
४] श्री अभंगगाथा (श्री तुकोबाराय)
५] अष्टादशी - आ. विनोबा, परंधाम प्रकाशन.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
१] http://www.maayboli.com/node/52366 उत्तिष्ठत् जाग्रत् - उपनिषदांचा अभ्यास - भाग १

२] http://www.maayboli.com/node/52840 - उपनिषदांचा अभ्यास - भाग २

३] http://www.maayboli.com/node/53971- उपनिषदांचा अभ्यास - भाग ३

------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users