विषय क्रमांक २ - प्रसिद्धीपराङ्मुख राजकारणी नेता - त्रिभुवनदास पटेल

Submitted by हर्पेन on 22 August, 2013 - 07:14

कोण बरे हे त्रिभुवनदास पटेल? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आला असेल. अगदी बरोबर! मलाही हे कोण आहेत हे माहित नव्हतेच. मलाही हे माहित झाले ते एका लांब, वळणावळणाच्या वाटेनेच.

मी शाळेत असताना एक गाणे कानावर पडले, जे नेहेमी ऐकू येणाऱ्या लता-आशा यांच्या आवाजापेक्षा एका वेगळ्याच गायिकेच्या, तश्याच गोड पण जराशा तीक्ष्ण आवाजात ते गाणे होते. सगळेच शब्द नीटसे लक्षात आले नाहीत पण त्याचे धृवपद मात्र (त्यात वर्णिलेल्या दुधाच्या नदीमुळे असेल कदाचित)लक्षात राहिले होते. ते गाणे होते ‘मेरो गाम कथा पारो, ज्याहा दुध की नादिया बाहो, म्हारे घरआंगण आणा भुलोणा’. पुढे कधीतरी मग कॉलेजात गेल्यावर समांतर चित्रपटांचा चस्का लागल्यावर असा शोध लागला, की हे आपल्या मराठमोळ्या स्मिता पाटील अभिनित मंथन नावाच्या हिंदी चित्रपटातले गाणे आहे हे. कधीतरी एकदा दूरदर्शन वर तो चित्रपट देखील पाहण्यात आला आणि त्या अनुषंगाने चर्चा चालू असताना सगळा भर; गिरीश-स्मिताचा अभिनय, सर्वोत्कृष्ट गायिकेचे राष्ट्रीय पारितोषिक मिळवणारी ही कोण प्रीती सागर? संगीतकार वनराज भाटीयांचे अजून काम कोणते? अशाच गोष्टीवर होता. आणि बोलताबोलता असे कळले की गुजरातमध्ये आनंद नावाचे एक गाव आहे आणि हा चित्रपट त्या गावा-परिसरात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित आहे. (ते आनंद नसून आणंद आहे हे कळायला अजूनही काही दिवस जावे लागले :)) माझी अमुलशी ओळख अशी बाजू बाजूने झाली. (आणि आज या घडीला पुन्हा एकदा जाणवते ते म्हणजे चित्रपट आणि चित्रपटसंगीत ह्या माध्यमांची ताकद)

पुण्यातच रहात असल्याने आणि लहानाचा मोठा झाल्याने बराच काळ ‘टेस्ट ऑफ पुणे’ अर्थात चितळे यांचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांना सोडून ‘टेस्ट ऑफ इंडिया’ ‘अमूल’ चे पदार्थ चाखायची संधी मिळाली नव्हती किंवा गरजही पडली नव्हती. मग कॉलेजात असताना किल्ल्यांवर जाणे चालू केल्यावर (तेव्हा असे गडा-किल्ल्यांवर, डोंगर दर्यांमधून भटकण्यालाच ट्रेकिंग म्हणतात हे पण माहित झाले नव्हते पण ते असो Happy ) अर्थातच बटर नामक पदार्थाबरोबर ओळख होउन त्याची किंचितशी खारट अशी चव, जी एकदा जिभेवर चढली, ती एकदम भिनलीच, पण तरीही रोजच्या जेवणाखाण्यात घरच्या दुधाचे, दह्याचे ताक घुसळून काढलेले किंवा चितळ्याकडूनच आणलेले लोणी खायची पद्धत असल्याने, बटर ही कधीकाळी खाण्याचीच गोष्ट होती. तेव्हा नुकत्याच घरी आलेल्या टीव्हीमुळे, अमूलच्या जाहिरातीतल्या पोल्काडॉट फ्रॉक घातलेल्या छानश्या मुलीमुळे आणि ‘अटरली बटरली डेलीश्यस अमूल’ ह्या स्लोगनमुळे अमूल हे नाव माहित आणि लाडके मात्र झाले होते. त्या काळात ‘अटरली बटरली डेलीश्यस अमूल’ हे घोषवाक्य (अर्थ माहीत नसताना सुद्धा) मी इंग्रजी वाक्य काय मस्तपैकी उच्चारू शकतोय अश्या जाणीवेतून मनाला गुदगुल्या करणारे होते. मग नंतर यथावकाश शिक्षण संपल्यावर मित्राच्या लग्नानिमित्त गुजरातमधल्या त्याच्या गावाला जायचा योग आला, तेव्हा वाटेत लागलेल्या आणंद गावावरून जाता-येताना, अमूलची इतरही, नुसतीच माहिती असलेली, बरीच उत्पादने चाखायला मिळाली आणि ती अत्यंत चांगली व दर्जेदार असतात असतात हाही अनुभव मिळाला. मग हळू हळू सावकाश वाचनाचा विस्तार वाढत गेल्यावर, आणंद मिल्क युनियन लिमिटेड, वर्गीस कुरीयन ई. ई. नावे कानावरून गेली. आणि नंतर नोकरी निमित्त अहमदाबाद येथे रहात असताना तर केवळ अमुलेच पदार्थ मिळणाऱ्या दुकानाला भेट दिल्याखेरीज दिवस संपत नसे.

मग एकदा हाती आले, वर्गीस कुरीयन यांचे ‘I too had a dream’ नावाचे चरित्रात्मक पुस्तक. सुरुवातीच्या काही पानातच त्यांनी त्रिभुवनदास पटेल यांचा, ते आपल्या गुरुस्थानी असल्याचा केलेला उल्लेख वाचायला मिळाला आणि पुढे केवळ या माणसामुळेच मी आणंद मध्ये राहिलो, टिकलो असा उल्लेख वाचून कोण बरे हे त्रिभुवनदास पटेल अशी उत्सुकता चाळवली गेली. ही तशी अगदी अलीकडची घटना. तसे पाहता त्या पुस्तकात त्यांचा उल्लेख अतीव आदराने असला तरी त्रिभुवनदास पटेलांच्या समग्र जीवन चरित्र कळण्याच्या दृष्टीने तसा त्रोटकच म्हणावा लागेल.

स्वतंत्र भारताची स्वावलंबनाच्या दिशेने केलेली आजवरची वाटचाल बघितली तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण संपूर्णत: स्वावलंबी होण्यात निर्विवादपणे यश मिळवले आहे, त्या वेगेवेगळ्या क्षेत्रांमध्ये बराच वरचा, अव्वल क्रमांक, धवल क्रांती मुळे मिळवलेल्या दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात मिळवलेल्या स्वयंपुर्णतेचाच असावा. अजून विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्या काळात भारतातून काही निर्यात होऊ शकते अशा शक्यतेचा विचार देखील आवाक्याबाहेरचा होता त्या काळात, भारताने, दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात अनेकानेक आव्हानांना पेलून आंतरराष्ट्रीय दबावाखाली न झुकता, ते दबाव झुगारून, अनेक आव्हानांचा निर्भयतेने सामना करून, निर्यातक्षमता देखील प्राप्त केली होती व आजवर केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ती निर्यातक्षमता अजूनही टिकवून आहोत.
धवल क्रांती हा शब्द उच्चारताच सर्वसाधारणपणे आपल्या डोळ्यासमोर येणारे नाव म्हणजे वर्गीस कुरीयन. त्यांची व्यवसाय-निष्ठा, सचोटी, शेतकऱ्याबद्दल असलेली कळकळ, नैतिक जबाबदारी निभावून नेण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी, ई अनेक गोष्टी आपल्याला अचंबित करतात.

आजही विचार करा, परदेशातून उच्चविद्या शिकून आलेला, दक्षिण भारतातल्या केरळ राज्यातला एक माणूस, पश्चिम भारतातल्या, गुजरातमधील एका अविकसित अशा ठार खेड्यात येउन राहतो. आजही जिथे परंपरेला धरून राहणारी, रूढीप्रिय, ‘शाकाहार हाच सदाचार’ अशी विचारधारा प्रामुख्याने मानणारी माणसे राहतात, अशा लोकांमध्ये, एक मांसाहारी, अविवाहित, ख्रिश्चन धर्माचा तरूण माणूस, ६० वर्षांपूर्वी येउन राहतो. वेगळा प्रांत, वेगळा धर्म, वेगळी भाषा, वेगळा वेश, वेगळे विचार असलेल्या त्या तरुणाला गुजरातेतील प्रामुख्याने हिंदू असलेला जास्त न शिकलेला शेतकरी समाज आपला मानतो, तो तरुण देखील त्या भूमीशी तादात्म्य पावून काम करतो, ती भूमी शेवटपर्यंत सोडून जात नाही, ही घटनाच किती अशक्य कोटीतील वाटते. आणि वाटले की त्रिभुवनदास पटेलांमधे अशी काय जादू असेल की त्यांनी वर्गीस कुरीयनना आणंद मध्ये राहण्यास भाग पाडले.

त्रिभुवनदास पटेल यांचा जन्म १९०३ साली त्याकाळी असलेल्या बॉम्बे इलाख्यात आणंद येथे झाला. गांधीजी व सरदार पटेल यांच्या प्रभावाखाली येउन त्यांनी आपल्या ऐन तारुण्यातच सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेउन तीन वेळा कारावास भोगला. ते एक सच्चे, प्रामाणिक आणि निष्ठावान गांधीवादी कार्यकर्ते होते. त्यांनी सरदार पटेलांसोबत बारडोली सत्याग्रहाताही भाग घेतला होता. सरदार पटेलांच्या संघटन कौशल्याच्या हातोटीने ते खूपच प्रभावित झाले होते. त्यांच्याच प्रेरणेने आणि मोरारजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, त्रिभुवनदास पटेल यांनी ‘कैरा जिल्हा दूध उत्पादक संघ’ स्थापन केला. तसेच कैरा जिल्हा खरेदी विक्री संघ, आणंद तालुका शेतीमाल विपणन (मार्केटिंग) समिती, लोकबंधू सहकारी प्रकाशन, नडियाद, आणंद बोरसाड श्रमजीवी सहकारी संस्था यासारख्या इतरही अनेक संस्था स्थापन केल्या आणि यशस्वीपणे चालवल्या. ‘कैरा जिल्हा दूध उत्पादक संघ’ हाच पुढे जाउन आणंद मिल्क युनियन लिमिटेड या नावाचा झाला आणि त्याच्या आद्याक्षरांपासून तयार झालेल्या अमूल या नावाने प्रसिध्द पावला, जनामनात रुजला.

जाचक अटी लादणाऱ्या खासगी व्यापाऱ्याला बाजूला सारून, स्थानिक-लोक-सहभागातून, सहकारी चळवळीच्या माध्यमातून, अमुलचे साम्राज्य, अक्षरश: शून्यातून कसे उभे झाले हे जाणून घेणे हा एका रोमांचक अनुभव ठरतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यापासून ह्या सर्व साम्राज्याचा समान मानकरी हा सर्व थरातील, सर्व जाती-जमातींचा स्थानिक शेतकरीच होता आणि आजही आहे. ह्या अमूल साम्राज्यात, परंपरेनुसार पशु-पालन म्हणजेच गायी म्हशींची देखभाल करणे हे काम कराव्या लागणाऱ्या त्यांच्या बायका ह्यादेखील खऱ्याखुऱ्या भागीदार होत्या/आहेतच, पण त्या अमूलच्या प्रत्यक्ष भागधारकही असल्याने, त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व समान हक्कदार कशा झाल्या व परिणामस्वरूप आणंद च्या पंचक्रोशीतील सगळ्या गावांची कळत न कळतपणे स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल कशी झाली हे वाचणे, पाहणे हे सर्व एका स्वप्नातल्या घटनेप्रमाणे अद्भुत भासते.
डेयरी चालवण्याकरता आवश्यक ते तांत्रिक ज्ञान माहित नसल्याने, त्रिभुवनदास पटेलांनी, त्यातले व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या वर्गीस कुरीयन यांना डेअरीचे काम बघावे यासाठी उद्युक्त केले. त्यांच्यासारख्या उच्च विद्या विभूषित माणसाने आणंद मध्ये राहून काम करत राहावे अशी वातावरण निर्मिती केली, त्यांना कामाचे स्वातंत्र्य दिले आणि त्यांच्या नवनवीन कल्पना व योजनांना पाठींबा आणि प्रोत्साहन दिले. ह्या सगळ्यामुळेच अमूल हा एक सक्षम ब्रँड तयार झाला. या आधी आख्या जगात कधीही कोणी केली नव्हती ती म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार केली गेली. भारताने दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त केली. यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या त्रिभुवनदास पटेलांचे हे ऋण स्वतंत्र भारताला मान्य करावेच लागेल.

अमुल हा ‘ब्रँड’ म्हणून विकसित होण्याकरता, त्याचे मार्केटिंग करण्यासंदर्भात, मुंबईस्थित जाहिरात कंपनीला काम देणे असो, त्या साठी लागणारा, त्यावेळी बऱ्याच जणांना अवाजवी वाटणारा खर्च मान्य करवून घेण्याकरता भागीदारांचे मन वळवणे असो, ‘ओपेरेशन फ्लड’वर डॉक्युमेंटरी काढणे असो अथवा मंथन सारखा चित्रपट तयार करण्याची कल्पना असो त्यानी नेहेमीच वर्गीस कुरीयनना पाठींबा दिला. ‘अमूल’ हे आणंद मिल्क युनियन लिमिटेड ह्या सहकारी संस्थेच्या इंग्रजी नावातील आद्याक्षरे घेऊन तयार करण्यात आलेले नाव आहे. एक ब्रँड म्हणून अमूल हे आज सर्वाधिक आठवल्याजाणाऱ्या (recall value) अस्सल भारतीय ब्रँडपैकी एक अव्वल नाव आहे.

आज आपल्याला अमूल म्हटल्यावर जरी फक्त वर्गीस कुरीयन आठवत असले तरी अशा तऱ्हेची समाजातील सर्व थरातील लोकांना सोबत घेउन सहकारी तत्वावर चालणारी संस्था उभी करणे हे त्रिभुवनदास पटेल यांचे स्वप्न होते. अमूलची स्थापना व वाटचाल हा एक चित्रपट म्हटले तर, माझ्यामते, वर्गीस कुरीयन हे (ज्यांनी पटकथेलाही हातभार लावला) असे चित्रपटाचे प्रमुख नायक होते, आणंद परिसरातील हजारो लाखो शेतकरी हे त्या चित्रपटाचे निर्माते होते तर त्रिभुवनदास पटेल हे नक्कीच त्या चित्रपटाचे लेखक, प्रमुख पटकथाकार आणि दिग्दर्शक (कप्तान) होते.

यासंदर्भात एक मजेशीर घटना सांगितली तर औचित्यभंग होणार नाही. ऑपरेशन फ्लडवर तयार केलेल्या काही डॉक्युमेंटरीजनंतर मोठ्या लांबीचा ‘मंथन’ नावाचा चित्रपट तयार करायचे ठरत होते तेव्हा त्यासाठी लागणारे भांडवल देउ करणारा निर्माता शोधणे ही एक मोठीच अडचण होती. त्या काळात या चित्रपट निर्मितीसाठी लागणारा अपेक्षित खर्च, सुमारे दहा लाखाच्या घरात जात होता. अशावेळी अमुलच्या सर्व भागीदारानी, प्रत्येकी दोन रुपये या प्रमाणे पैसे गोळा करून सहकारीतत्वावर या चित्रपटाची निर्मिती केली. अशा रीतीने हे सगळे सर्वसामान्य शेतकरी एका हिंदी चित्रपटाचे निर्माते झाले. सहकारीतत्वावर तयार झालेला हा पहिलाच हिंदी चित्रपट असावा. आणंदमध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून झालेले कार्य सर्वदूर पोहोचवण्याकरता चित्रपटासारखे प्रभावी माध्यम निवडण्यामागची दूरदृष्टी वाखाणण्याजोगीच! श्याम बेनेगल यांच्या मते त्यांनी दिग्दर्शित केलेला सर्वात प्रभावशाली चित्रपट हाच. (ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा (विजय तेण्डुलकर) व सर्वोत्कृष्ट गायिका (प्रिती सागर) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.)

एखाद्या सच्च्या, निरपेक्षपणे व निरलसपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याप्रमाणे त्रिभुवनदास पटेल हे नेहेमीच मुद्दामहून पडद्यापाठीमागे आणि प्रकाशझोतापासून दूर राहिले. त्यांना, खरेतर, कैरा दुध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी, दुग्धजन्य उत्पादने आणि डेअरीबद्दल नीट माहिती नसल्याने स्वीकारायची देखील नव्हती, पण त्यांना मिळालेला सरदार पटेलांचा आदेश त्यांनी एखाद्या सच्च्या सैनिकाप्रमाणे पाळला. तसे ते अनेक वर्षे प्रदेश कॉंग्रेस समितीचे सचिव आणि / अध्यक्षही होते. १९६३ मध्ये त्रिभुवनदास पटेल यांना कम्युनिटी लीडरशिप करता दारा खुरोडी व वर्गीस कुरीयन यांच्या बरोबरीने ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार मिळाला. बरेचदा होते तसे जगाने दखल घेतल्यानंतर(च) आपल्याला जाग येते. त्यांना भारत सरकारने १९६४ मध्ये ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरवले. त्यानंतर ते दोन वेळा राज्यसभेचे सदस्यदेखिल होते.

माहित नसलेले पण एकदा हाती घेतले आहे म्हटल्यावर ते काम नीटपणे पार पाडण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट प्रशंसनीय आहेत. जे काम आपल्याला नीटपणे येत नाहिये ते एका व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या सुयोग्य माणसाकडे देण्याचे शहाणपण त्यांच्याकडे होती. (हे शहाणपण आजही किती दुर्मिळ आहे हे खासगी क्षेत्रात कौटुंबिक व्यवसायाच्या पुढारीपणाचे हस्तांतरण कुटुंबाच्या आतच केले जाते हे पाहून अगदी नीटपणे कळते.) नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हवी असलेली मानसिक तयारी आणि लवचिकता त्यांच्यात होती. सचोटी, प्रामाणिकपणा, कामावरील निष्ठा व समानतेसारख्या शाश्वत मुल्यांवर असलेला त्यांचा विश्वास, उपजतच असणारे एक नैसर्गिक शहाणपण किंवा विवेक यांसारख्या अनेक चांगल्या गुणांचा त्यांच्याठायी समुच्चय होता. मूल्यांशी कुठेही तडजोड न करता केलेले अपार कार्य हे त्यांच्या मोठेपणाची ग्वाहीच देते. मला स्वतःला, पटेलांचे योगदान आजच्या काळात जास्तच महत्वपूर्ण वाटते कारण राजकारणी असून आर्थिक प्रलोभनांना बळी न पडता, अमूलच्या संदर्भात अनेक अवाजवी पक्षीय / राजकीय दडपणे झुगारून देउन केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचे हित जपण्याला प्राधान्य दिले. १९७०च्या आसपास, जेव्हा ते स्वत:हून अमूलच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले, त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी मिळून वर्गणी काढून त्यांना देउ केलेले ६००००० रुपये स्वतःकरता न ठेवता स्त्रिया व लहान मुले यांच्या आरोग्य संदर्भात काम करण्या करता देउन टाकले. आज या संदर्भातील योजनेचा लाभ ६०० खेड्यांपर्यंत पोहोचतो आहे.

त्यातल्या त्यात तुलनेने, वर्गीस कुरीयन सारखे, परदेशी जाउन शिकून आलेले, आपापल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले अनेकानेक भारतीय (त्यांना कामातले स्वातंत्र्य देउ केले असता) आजही आपल्याला भारतात काम करायला मिळू शकतील, मिळत आहेतही; पण आजच्या घडीला, भारताला जास्त गरज आहे, ती त्रिभुवनदास पटेलांसारख्या समाजकारणी नेत्याची. त्यांच्या सारखा दूरदृष्टी असणारा, आपल्या लोकांच्या विकासाचा ध्यास बाळगणारा, प्रायोगिकतेची वाट चोखाळण्यास न कचरणारा, गावात राहूनही आधुनिकतेची कास धरणारा, शहरी आणि ग्रामीण भागातल्या विकासाची दरी मिटवण्यासाठी प्रयत्न करणारा, इतरांच्या कामात ढवळाढवळ न करणारा, सत्तेची अभिलाषा नसलेला असा राजकारणी नेता भारतातल्या प्रत्येक राज्यात निर्माण होईल तर भारताचा विकास सार्वत्रिक, सर्वांगीण व सर्वसमावेशक असा होउन तो एक भक्कम पाया असलेली महासत्ता बनेल. अमुलच्या यशस्वी वाटचालीनंतर त्याचे अनुकरण करणारी अनेक प्रारूपे भारतभर व काही वेळा भारताबाहेरही राबवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण त्याला अमूल इतके तर नाहीच नाही पण म्हणावे तसेही यश कुठेच मिळू शकले नाही ही माझ्या मते, त्रिभुवनदास पटेलांच्या अमूलच्या यशस्वी होण्यामागच्या योगदानाची पावतीच होय.

वेगळी भाषा, वेगळा प्रांत, वेगळा धर्म, वेगळे आचार-विचार यापालेकडे जाउन आपल्या देशाच्या, समाजाच्या बांधिलकीपोटी एकत्र येणारी, त्रिभुवनदास पटेल आणि वर्गीस कुरीयन ही दोन माणसे आपल्यासमोर खरोखर किती मोठा आदर्श निर्माण करून गेली आहेत! आपण त्यांच्या पासून शिकण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत.

आजमितीला आपले, प्रांतीय, भाषिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व इतरही अनेक पातळ्यांवर धृवीकरण होत असताना, आपल्यामधुनच तयार झालेले, आपणच निवडलेले, आपलेच असलेले सध्याचे राजकारणी नेते सतत सवंग विधाने करताहेत हे बघताना, आपल्यातल्याच स्वतःपुरते बघण्याची सवय लागलेल्या शिकल्या सवरलेल्या माणसांना बघताना, ह्या जोडगोळीने केलेल्या कामाचे महत्व अधोरेखित होते. आज आपल्यामध्ये, आपल्या भारत देशाची प्रगती व्हावी, जगातल्या प्रबळ, शक्तीशाली आणि स्वावलंबी देशांमध्ये भारताचे नाव अग्रस्थानी असावे अशी आकांक्षा बाळगणारी माणसे भरपूर आहेत. पण माझ्यामते, आज आपण सर्व जण आपापले परीघ ओलांडून, आपल्या कोषातून बाहेर पडून, समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत, त्याच्या-आपल्यात असलेले भाषिक, प्रांतीय, धार्मिक, आर्थिक, मानसिक, वैचारिक ई. भेद किंवा वेगळेपण बाजूला ठेवून एखाद्या चांगल्या कामाकरता एकत्र येण्याकरता मोकळेपणा दाखवू तर आपण खऱ्या अर्थाने एक देश म्हणून यशस्वी ठरू आणि स्वतःला खऱ्या अर्थाने देशप्रेमी म्हणवून घेण्यास पात्र ठरू.

संदर्भ सूची:

पुस्तके -
‘I too had a dream’ – By Vergese Kurien as told to Gouri Salvi.

आंतर्जालावरील मजकूर -
http://en.wikipedia.org/wiki/Tribhuvandas_Kishibhai_Patel
http://www.rmaf.org.ph/newrmaf/main/awardees/awardee/profile/116
http://www.business-standard.com/article/companies/amul-india-s-most-tru...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लेख आणि "अमूल = डॉ.वर्गीस कुरीयन" हेच समीकरण ज्याना माहीत झाले आहे त्यांच्याकरीता सर्वार्थाने प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्व श्री.त्रिभुवनदास पटेल म्हणजे कोण व कशी व्यक्ती होती हे या स्पर्धेच्या निमित्ताने माहीत होईल.

पुरे ९० वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या त्रिभुवनदासांचे प्रत्येक आयुष्य हे खेडोपाड्यातील अनेकांच्या सेवेसाठी तसेच त्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी गेल्याचा दाखला आहे. डॉ.कुरिअन यानी आपल्या पुस्तकात त्यांच्या योगदानाचा सार्थ उल्लेख केला आहे. पटेल यानी रॅमन मॅगासेसे पुरस्कार मिळाल्यावर पुढील वर्षी पद्मभूषण मिळाला असला तरी त्याबद्दल तक्रार करण्यासारखे काही नाही. शेवटी ते अशा पुरस्कारांच्या पल्याड गेलेले व्यक्तिमत्व होते. सहा लाख रुपयांच्या देणगीच्या विनियोगाचा उल्लेख हर्पेन यानी केलेलाच आहे.

निबंधाच्या माध्यमातून शेवटच्या पॅरेग्राफमधून लेखकाने केलेले भाष्य विचार करण्यासारखे आहे.

अशोक पाटील

छान लिहीले आहे. लेख आटोपशीर, प्रवाही आहे.
इथे अक्शरवार्ता मध्ये चिनूक्सने "माझंही एक स्वप्न होतं..' वर लिहीलं होतं. अतिशय प्रेरणादायी पुस्तक.

हर्पेन,

लेख फार सुंदर जमला आहे. तुमच्यामुळे या अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली.
आटोपशीर आणि ओघवत्या भाषेतला लेख वाचून फार बरं वाटलं.

हर्पेन, अज्ञात अशा प्रेरणास्त्रोतांना सर्वांपर्यंत पोचवणे हा हेतू साध्य केलात, आभार या लेखासाठी. अशा समर्पित माणसांमुळेच प्रगतीची फळे सर्वसामान्यापर्यंत पोचतात.

पहिलाच प्रतिसाद किती उत्साहवर्धक असावा, धन्यवाद अशोक.:)

आशूडी, कौशिक, लेख प्रवाही ओघवता वाटल्याचे आवर्जून नमूद केलेत, धन्यवाद.

स्वाती२, विदे, चनस, कापो, प्रा-शि लेख आवडल्याचे कळवलेत, बरे वाटले

आणि भारती.. "अज्ञात अशा प्रेरणास्त्रोतांना सर्वांपर्यंत पोचवणे हा हेतू साध्य केलात" अगदी अगदी मला स्वतःला मनापासून हेच करायचे होते. धन्यवाद.

हर्पेन....

हिमालयासम समाजकार्य करूनही स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचे वृत्ती बाळगणारे काही मूठभरच लोक या समाजात असतात त्यापैकी श्री.त्रिभुवनदास पटेल. तुम्ही शीर्षकात जरूर 'राजकारणी नेता' असे विशेषण दिले आहे, पण त्यांची जरी राज्यसभेवर नियुक्ती होती तरी प्रत्यक्षात ते रमले समाजकार्यातच. मॅगेसेसे पारितोषिक स्वीकारताना त्यानी केलेल्या कृतज्ञता भाषणात आवर्जून केलेला भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांचा उल्लेख मला फार भावला होता. खुरोडी यांच्या मार्गदर्शनाखाली आरे मिल्क उद्योगसमुहाने केलेली नेत्रदीपक प्रगती म्हणजे 'अमूल' चे प्रेरणास्थानच होते.

विशेष म्हणजे मी कोल्हापूरातील कित्येक युवा गटांशी सहकार चळवळीविषयी बोललो असता त्यापैकी एकालाही [होय...अगदी एकालाही] 'अमूल' हे नाव एका संस्थेच्या नावातील आद्याक्षरे आहेत याची कसलीच कल्पना नाही. इतके जादूमय हे नाव झाले आहे. यात डॉ.कुरियन याना जितके श्रेय तितकेच त्रिभुवनदास पटेल यानाही. फरक इतकाच की हे दुसरे नाव काहीसे अंधारात राहिले.

पण अशी उदाहरणे अनेक असू शकतात. महात्मा गांधी यांचे सेक्रेटरी महादेव देसाई अशा अज्ञात कार्यकर्त्यांपैकी एक. असो...त्यांच्याविषयी इथे या धाग्यावर लिखाण नको.

धन्यवाद मी नताशा आणि के अश्विनी

अशोक. तुमचा निबंध कधी मिळेल वाचायला... दोनच दिवस उरलेत आता.

थॅन्क्स हर्पेन....

अहो तुमच्यासारखी युवा आणि सातत्याने नवनवीन क्षेत्रात काम करणारी पिढी या स्पर्धेत असताना माझ्यासारख्या सेवानिवृत्त व्यक्तीने त्या संदर्भात विचार करू नये असेच माझे मन सांगते. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशनमुळे कॉम्प्युटरसमोर किती वेळ बसायचे यालाही घरच्यांनी बंधन घातले आहेच.

त्यामुळेच तुम्ही निवडत असलेले विषय पाहून/वाचूनच मन भरून येते.

अशोक पाटील

खरेच अनोळखी व्यक्तीमत्व. छानच जमलाय लेख.~
अमूल चा आमचा संबंध तसा थेटच होता. पहिल्यांदा अमूलचे मार्केटींग व्होल्टास ने केले आणि माझे वडील त्यामधे होते. अगदी पहिल्यांदा अमूलला व्होल्टासने ओळख मिळवून दिली. त्यांची उत्पादने आम्ही पहिल्यापासून वापरत होतो. त्यामूळे विशेष जिव्हाळा आहे !

हर्पेन छान लेख , बरीच नवीन माहीती मिळाली , त्रिभुवनदास पटेलांसारख्या थोर नेत्याची ओळख करुन देण्याबद्दल धन्यवाद.
आणि हो अमुल हा शॉर्ट्फॉर्म आहे हे तुमचा लेख वाचुन कळलं.

धन्यवाद दिनेश, श्री, साती, कविन...

श्री - हो अमुल हा एक शॉर्ट्फॉर्म आहे. आणि हे नाव घेण्याची सुचना अमुलमधे काम करणार्‍या एका सर्वसामान्य (जाहिरात, ब्रँडींग ई. क्षेत्राशी निगडीत नसलेल्या) माणसाने दिली होती आणि आज 'अमुल' हा एक जगप्रसिद्ध ब्रँड आहे.

लेख फार सुंदर जमला आहे. तुमच्यामुळे या अनोख्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली.
आटोपशीर आणि ओघवत्या भाषेतला लेख वाचून फार बरं वाटलं. >>>> +१००...
- किती सुंदर लिहिलंय - प्रचंड आवडलाय हा लेख ....

श्री त्रिभुवनदास पटेल यांच्या स्मृतीस नम्र अभिवादन ..

या निमित्ताने हा लेख वर आणून नवीन माबो करांना वाचण्याची संधी दिलीत याबद्दल हर्पेन यांचे आभार ..

अत्तापर्येंत फक्त डॉ.वर्गीस कुरीयन यांच्याबद्दल माहिती होती. पटेल साहेबांचे कार्य आजीबात माहित नव्हते. या छान वाचनीय लेखाद्वारे ते आमच्यापर्येंत पोहोचले त्याबद्दलही खूप खूप आभार.
वर उल्लेखलेले 'I too had a dream' नक्की मिळवून वाचणार ..

धन्यवाद !

प्रकु नक्की वाच ते पुस्तक मूळ इंग्रजी बरोबरच मराठी अनुवाद देखिल उपलब्ध आहे.
अमितव, ह्या व्यक्तीची माहीती आणि महती अनेकानेक जणांपर्यंत पोहोचायला हवी असे खरोखरच वाटल्याने वर काढला हा लेख

लेख आवडल्याचे कळवल्याबद्दल दोघांचे आभार Happy

अतिशय छान लिहिले आहे हर्पेन.. लेख माहिती वजा असूनही त्यात ललितलेखनाची मिठास आहे..
वाचायचा राहून गेला असता तर एका चांगल्या लेख वाचनाला मुकलो असतो मी..

Pages