"गट्टु" भाग-२

Submitted by संतोष वाटपाडे on 28 May, 2015 - 00:24

काळ्या पाठीच्या उडदाचे वरण दर शनिवारी बनवायचे असा ठरलेला नियम असायचा. इंद्रायणी तांदळाचा पांढराशुभ्र भात ...बारीक उभ्या फ़ोडी केलेला ताजा कांदा...बागेतून नुकत्याच तोडून आणलेल्या तळलेल्या हिरव्यागार मिरच्या आणि माझी आवडती भजी.... गट्टुचा फ़्रॉक खराब केल्याचा राग अजुन गेलेला नव्हता त्यामुळे माधवी मुद्दाम आग्रह करुन करुन वाढत होती..गालातल्या गालात हसत होती...ताटात उष्टे राहिलेले नानांना अजिबात आवडत नव्हते ही गोष्ट तिला चांगलीच ठाऊक होती. अशा वेळी तिचा खोडकरपणा उफ़ाळून येतोच बहुधा. जागेवरुन हलणंही मुश्किल झालं एवढा जेवलो होतो मी...

वाटीतला भात संपवून गट्टु आईच्या मांडीवर चिडीचूप जाऊन बसली होती..आईच्या गळ्यातल्या मंगळसुत्राशी खेळायला तिला फ़ार आवडायचे...कुणाचे लक्ष नसले कि मंगळसुत्राच्या गुळगुळीत वाट्या हळूच तोंडात घ्यायची....कुणाचे लक्ष गेले कि साळसुदपणे सोडून द्यायची आणि गोड हसायची...राग आलेला असेल तरी तिचं लाडिक हसणं बघून एका क्षणात मावळून जायचा..

आईला आणि माधवीला जेवायचं होतं त्यामुळे गट्टुला मी कडेवर घेऊन किचनमधुन बाहेर आलो...नाना हॉलमधल्या सोफ़्यावर बडिशोप हातावर घेऊन निवडत होते...बाईसाहेबांचे लक्ष गेलेच...अं अं अं करत तिने मला खुणावले....मला कळले होते हिलाही बडिसोप हवीय..दोन दाणे का होईना पण हवेच ...मी नसताना सतत आईनानांच्याच अंगावर जास्त असल्याने तिला त्यांच्या सवयी माहित झाल्या होत्या. दोन दाणे बडिशोपचे तिच्या जीभेवर ठेवून आम्ही वरच्या खोलीत गेलो.

तोंडात लिंबू पिळल्यानंतर जसे तोंड आपोआप वाकडे होते डोळा बारिक होतो तसेच अगदी गट्टु करायची जेव्हा मी तिच्या गालावर नाकावर पप्पी घ्यायचो...माझी मिशी टोचायची खुप,पण पर्याय नव्हता...मला तिच्या गालाला स्पर्श केल्यावाचून करमत नव्हते आणि तिने दरवेळेला नाक गोळा केल्यावर झालेला तोंडांचा चंबु बघताना खुप हसूही यायचे. कपाटातून फ़िक्कट केसरी रंगाचा बाबा सुट काढून मी तिच्या हातात दिला. ती कसली पकडते!! टाकून दिला लगेच कॉटवर...एक नंबरची भामटू आहे...लाडात आल्यावर तर विचारायलाच नको....चिखल लागलेला तिचा गुलाबी फ़्रॉक काढल्यावर ढब्बु पोटावर फ़ुर्रर्रर्र करायचा मोह मला आवरता आला नाही. दोन्ही हात पोटावरुन ठेवून मला दुर लोटताना खळखळून हसत होती गट्टु...खुप छान वाटायचे तिचा तो हसण्याचा आवाज ऐकून...बाबा सुटात खुप गोंडस दिसायची ती...

आज भरपूर वेळ होता माझ्याकडे त्यामुळे गट्टुसोबत मस्ती करायला जाम मजा येणार होती. सायंकाळी शेजारच्या गल्लीतल्या टिचर येणार होत्या घरी. गट्टुला काही वेळ त्यांच्या किलबिल शाळेत सोडा म्हणत होत्या. इवढीशी चिमुरडी पोर घरापासून दूर दोन मिनिटही ठेवायची माझी मानसिक तयारी नव्हती. पण माधवी आणि आई-नाना सर्वांचाच हट्ट होता म्हणून मीही स्वतःला तयार करत होतो.

दोन्ही हातावर मुटकुळा करुन गट्टुला मी उचलून घेतले आणि जिना उतरुन हॉलमधे आलो. जेवणं उरकून माधवी किचनओटा पुसत होती म्हणून मी गट्टुला किचनकडे न नेता खाली कारपेटवर सोडले आणि तिच्या आवडत्या रंगीत गारगोट्या आणायला पुन्हा वरच्या खोलीत गेलो. सोबत तिला घाबरवणारे झुपकेदार कुरळ्या केसांचे माकडही घेतले. तिला समजायला लागले तेव्हापासून या माकडाला ती खुप घाबरते. नुसते समोर पकडले तरी आरडाओरड गोंगाट सुरु व्हायचा तिचा.

मी पायर्‍या उतरत असताना मला गट्टु देवघरात जाताना दिसली. तिचा आवडता उद्द्योग होता तो. कुणी आजुबाजुला नसले कि देवघरात जाऊन देवांना हळदी-कुंकू-बुक्का काय असेल नसेल त्याने आंघोळ घालायची. मांडीचा फ़तकल मारुन बसली होती देव्हार्‍यासमोर. चांदीचा करंडा नेमका उघडाच होता. प्रत्येक खाण्यात वेगवेगळ्या रंगाचे दिसणारे पदार्थ तिला आवडत असावेत कदाचित.

इवल्या इवल्या नाजुक बोटांच्या चिमटीत एक एक रंग घेऊन ती देवाना चोपडत होती. खुप हसु येत होते मला. हळू आवाजात तिची एकटीचीच काहीतरी न समजणार्‍या भाषेत बडबडही चालू होती. तांदुळ देवांवर फ़ेकताना मात्र तारांबळ उडत होती. समोर फ़ेकताना अर्धे तांदूळ तिच्याच अंगावर पडत होते. रोज सकाळी आंघोळ झाल्यावर नाना अर्धा तास देवपुजा करतात..हरिपाठ म्हणतात मोठ्या आवाजात... तेव्हा गट्टु नित्यनियमाने जवळ बसलेली असते. तिने या सर्व गोष्टी अगदी बारकाईने बघून ठेवल्यात हे माझ्या ध्यानात आले होते.

कंटाळली गट्टु....डोक्यात तांदुळ अडकलेले होते...हाताला पायांना हळदी-कुंकू लागले होते. जमिनीवर हात टेकवून ती उठली पण येताना आईचा भजनाचा टाळ उचलायला विसरली नाही. सायंकाळी आईचे बोट धरुन शेजारच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजनाला जायला ती तयारच असते रोज. तिथे भजनाला आलेल्या आईच्या मैत्रिणी खुप लाड करतात गट्टुचे त्यामुळे स्वारी तिथे जायला उत्सुक असते नेहमी. एक तास मृदुंग-टाळाच्या आवाजात ती अगदी रमून जाते म्हणून आईपण तिला घेतल्याशिवाय जात नाही.

गळ्यात अडकवलेला टाळ..चेहर्‍याला लागलेले हळदी-कुंकू-बुक्का...वाह! सुंदर ते ध्यान ! छोटा वारकरी म्हणावे कि साक्षात विठोबा म्हणावे कळेना... माझ्या हातात लपवलेले माकड तिला दिसल्याबरोबर म्माsssssअशी आरोळी तिने तिच्या माऊलीला दिली...काय झालं ते पहायला माऊली हजर लगेच...! मायलेकीचं नातं किती विलक्षण असते नाही !! नुसत्या आवाजाच्या बदलातून आई लगेच ओळखते लेकीच्या मनातले भाव..."अहोsss फ़ेका ते अगोदर....माकड आणलेच कशाला तुम्ही खाली....नानाssssss!!!"....मेलो...नानांना हाक मारायची खरं तर काही गरज नव्हती इथे. असाही मी माकड फ़ेकणारंच होतो. पण तिने हाक मारल्याबरोबर माझ्या हातातले माकड गायब झाले होते. नाना पेपर वाचण्यात तल्लीन झालेले होते झोक्यावर त्यामुळे हाक त्यांना ऐकू गेली नसावी. मला वाकुल्या दाखवून माधवी पुन्हा किचनमधे गेली.

माझ्या हातातल्या गारगोट्या पाहून गट्टु जरा स्थिरावली होती. जवळ येऊन तिने माझ्या हातातून शक्य होतील तेवढया गारगोट्या काढून घेतला. एव्हाना गळ्यातला टाळ बाजुला पडला असेलच हे वेगळे सांगायची गरज नसावी. या गारगोट्यांवर फ़क्त माझ्या एकटीचाच अधिकार आहे या आविर्भावात ती माझ्या हातातून काढून घेत होती. उरलेल्या गारगोट्या मी कारपेटवर ठेवून खाली बसलो. तीही समोर येऊन बसली. गोट्या रांगेत लावायचा असफ़ल प्रयत्न नेहमीप्रमाणे....मी हात लावायचा नसतो अशावेळी. नाहीतर व्हसक्कन ओरडतात आमच्या गट्टुसाहिबा....सारख्या रंगाच्या गोट्या एका रांगेत....छोट्या आकाराच्या गोट्या दुसर्‍या रांगेत असे काहीतरी ती करत होती. मला आज पुर्ण दिवस तिच्या सर्व लीला बघायच्या होत्या.

एरवी मी ऑफ़िसहून आल्यावर माधवी एकामागे एक दिवसभरातले तिचे सारे पराक्रम आणि गमतीजमती सांगायला सुरुवात करतेच. मात्र आज हे सर्व पराक्रम "याचि डोळा" बघणार होतो मी. गट्टुला जर पुर्ण बोलता आले असते तर गोट्या रांगेत मांडतानाच्या तिच्या मनातल्या सगळ्या शंका-कुशंका मलाही कळल्या असत्या. एकटं एकटं काहीतरी फ़ुसफ़ुसत तीचं चालू होतं रांगा बनवणं आणि मोडणं....(क्रमश:)
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोटा वारकरी म्हणावे कि साक्षात विठोबा म्हणावे कळेना >>> मस्त. जरा मोठे भाग टाका जमल्यास.