मना तुझे मनोगत - २

Submitted by युनिकॉर्न on 28 May, 2015 - 13:46

****************
स्थळ : पुना कॉफी हाऊस -
वेळ : सायंकाळी ५.३०
****************

"मला ना तू खुप आवडतोस!"

"काय?"

उत्तरादाखल ती लाजुन खाली बघत छान हसली.

योगेशचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. "हे कसं शक्य आहे? काल तर ती एवढी चिडली होती. मघाशी फोनवर बोलताना पण असच वाटलं कि ती आता ....."

"मला तर वाटलं कि तू माझ्यावर खूप चिडली आहेस आणि मला सांगशील कि.... आय मीन.. काल दिवसभर तू डिस्टर्ब होतीस असं वाटलं म्हणून मी तुला आज फोन करणारच होतो पण तुझाच फोन आला आणि म्हणालीस भेटायचय. मग मला वाटलं कि तू ... म्हणजे काल लोकांनी जरा जास्तच चिडवाचिडवी केली सो मला वाटत होतं कि तुला त्याचा त्रास झाला असेल आणि त्यामुळे ती म्हणशील कि आपण आता ह्यापुढे ....."

त्याचं बोलणं अर्धवटच राहिलं कारण अबोली एकदम त्याच्या कडे बघुन म्हणाली, "नाही रे. मला खरं तर आधीच तुला हे सांगायचं होतं पण सगळ्या लोकांसमोर नाही. मला त्यांच्या चिडवण्याचा त्रास नव्हता होत रे. उलट मला वाटत होतं कि त्या चिडवण्यामुळे तुलाच माझ्याशी बोलायचं नव्हत. आणि त्याचं जास्त वाईट वाटत होतं."

पु.लं. नी कुठल्यातरी प्रसंगाबद्दल बोलताना म्हटलयं कि "आपल्या पोटात एक खड्डा आहे. आणि त्यात आपला छोटासा जीव पडला कि कसं शांत वाटत!" ह्याचा प्रचिती आज योगेशला येत होती.

आणि मग त्याच्या पोटात परत खड्डा पडला! कारण तिच्या 'तू मला खूप आवडतोस' चं उत्तरच त्यानी दिलं नव्हतं! इतके दिवस तिला हे कसं सांगावं हे त्याला सुधरत नव्हतं आणि आज आता तिनेच म्हटल्यावर...

"तू पण मला खुप आवडतेस..."

ती परत हसली आणि त्या हसण्याचा अर्थ "मला ते आधीपासुन माहिती आहे" असा होता हे योगेशला आपोआप कळालं. त्यावर आता काय बोलावं ते त्याला अजिबात सुचेना.

"घरी काय सांगुन आली आहेस?"

"हेच"

"म्हणजे?"

"म्हणजे तुला भेटायला येते आहे असं."

"म्हणजे तू घरी ऑलरेडी सांगितलं आहेस?"

"हो"

योगेशचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ही मुलगी घरी सांगुन आली आहे की एक मुलगा मला आवडतो आणि त्याला ते सांगायला जाते आहे! अबोली असं काही करू शकते?

"कोणाला सांगितलस?"

"आईला"

"काय म्हणाली ती?"

"तुला भेटायला बोलावलं आहे"

योगेशच्या पोटात परत गोळा आला.

"आज?"

"आज नाही रे. पण ये लवकरच कधीतरी."

आजपर्यंत त्यानी एकदाही तिच्या आईवडिलांना पाहिलंसुद्धा नव्हतं. जेव्हा जेव्हा तो तिच्या घरी गेला होता तेव्हा खालूनच परत फिरला होता. आणि एकुणच ग्रुप मधल्या इतर मंडळींचं पण तिच्या घरी जाणं झालं नव्हत कधीच.

"येईन ना."

"तू तुझ्या घरी काय सांगणार आहेस?"

"सांगेन मी पण"

काय सांगायच आणि कसं ह्यावर त्याला आता विचार करायची गरज होती.

"काय विचार करतो आहेस?" तिनी विचारलं तशी त्याची तंद्री मोडली.

"अं... कधीपासुन तुला मी असा...." तो ओशाळं हसत म्हणाला.

"झाले तसे काही दिवस."

"मला तर वाटायचं कि मी कोणत्याच मुलीला आवडणार नाही. यु नो.. म्हणजे माझं विनय, प्रकाशसारखं सगळ्या मुलींशी येता जाता बोलणं नसतं. फक्त तुझ्याशीच बोलायचो मी आणि तु मला आवडायचीस पण मी तुला..."

"आय नो. माझेही असे खुप मित्र माहियेत. तुझ्याशीच बोलते मी पण."

"मग एकदम मी असा कसा..." आवडायला लागलो असं त्याला म्हणायचं होतं पण म्हणता येत नव्हतं!

"एकदम नाही. असचं हळुहळु मला पण वाटायला लागलं. तु खुप काळजी घेतोस माझी."

मोहरून जाणं म्हणजे काय ह्याचा अनुभव आज पहिल्यांदाच घेत होता योगेश.

"मधे एकदा तर तु माझ्या स्वप्नात आला होतास. मी झोपेत तुझं नाव घेत होते असं मिता म्हणाली." अबोली लाजत म्हणाली.

मिता म्हणजे अबोलीची मावस बहिण. ती त्यांच्याच वयाची होती आणि ती बाहेरगावहुन इथे शिकायला आली आहे असं कधीतरी अबोलीनी सांगितलं होतं.

आता हे सगळं योगेशला स्वतःचं स्वप्न वाटायला लागलं होतं.

"म्हणजे तिला पण हे माहिती आहे?"

"हो"

ह्यावर योगेशला काय बोलावं सुचेना. तो नुसताच हसला. तशी ती पण हसली. बर्‍याच वेळापुर्वी आलेली कॉफी आता थंडगार झाली होती. केवळ समोर आहे म्हणुन त्यानी कप तोंडाला लावला. तो खाली परत ठेवतना त्याला जाणवलं कि अबोलीचे दोन्ही हात टेबलावरच पेपर टिश्युशी चाळा करत आहेत. न रहावुन त्यानी तिच्या हातावर हात ठेवला. आल्यापासुन पहिल्यांदाच त्याला अबोलीची थरथर जाणवली. तिने पटकन इकडे तिकडे बघितलं आणि हळुच हसली. कितीसा वेळ ते असे बसले होते? दोन चार मिनिटे फक्त. पण ते प्रत्येक मिनिट योगेशला तासासारखं वाटत होतं. आणि तिला? तिलापण कदाचित. दोघं एकमेकांकडे बघुन हळुच हसत होते, खाली बघत होते, परत समोर बघत होते. मधेच हसता हसता तिने घड्याळाकडे बघितलं.

"चल येते मी. लांब जायचय. घरी आई वाट बघत असेल"

अजुनही हात हातातच होते. योगेश सावरुन बसला आणि म्हणाला, "बरं". आपण जाऊ नको म्हणावं अशी तिची अपेक्षा आहे हे त्या वेड्याच्या लक्षातच आलं नाही. तिचं घर खरच जरा लांब होतं त्यामुळे तिनी वेळेत घरी पोचावं असं त्यालाही प्रामाणिकपणे वाटत होतं.

दोघही उठले, काउंटरवर जाऊन योगेशनी बील दिलं आणि दोघं बाहेर पार्किंग पाशी आले. तिनी स्कुटर काढली, तोंडाभोवती स्कार्फ गुंडाळला आणि म्हणाली, "कॉल कर नंतर."

"हो करतो." मग त्याला काहितरी लक्षात आल्यासारखं म्हणाला "आपण उद्या भेटुयात?"

"हो. चालेल"

"कधी?"

"फोन करशील तेव्हा ठरवू"

"ओके."

"बाय," ती म्हणाली आणि स्कुटर स्टार्ट करून निघालीसुद्धा. त्याचा "बाय" हवेतच राहिला.

ती गेली तसा तो तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिला. ती पुढच्या सिग्नलला वळली तसा तो जरा भानावर आला. जी गोष्ट फक्त स्वप्नात घडू शकते असं त्याला वाटायचं ती आज प्रत्यक्ष घडली होती.

जी मुलगी त्याला सर्वात जास्त आवडायची, तिलाही तो आवडतो आणि "तसा" आवडतो हे सत्य त्याला अजुनही खरं वाटत नव्हतं. आता काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. श्या... एवढा आनंद, एक्साईटमेंट घेऊन त्याला घरी जाणं शक्यच नव्हतं.

पलिकडच्या कॉईन बॉक्स वरून त्यानी राहुलच्या घरी फोन लावला. सुदैवानी तो घरीच सापडला.

"राहुल्या.."

"बोल रे"

"आज तुझ्याकडे रहायला येतो."

"ये कि.. पण एकदम काय?"

"आलो कि सांगतो. आत्ता संध्याकाळी कुठे जाणार आहेस का?"

"नाही."

"मग घरीच थांब. मी येतो ७ पर्यंत."

"ठिके ये."

फोन ठेवल्यावर त्याला जरा बरं वाटलं. राहुल त्याच्या सगळ्यात जिगरी दोस्त. एकदम भरवश्याचा. त्याच्याकडे रहायला जातो म्हटलं तर घरी काही बोलणार नाहीत आणि हे सगळं पचवायला जरा वेळ मिळेल असा विचार योगेशनी केला. अर्थात सगळी स्टोरी राहुलला सांगायचीच होती. कारण आता ह्यापुढे त्याच्या नावावर बरीच हिंडाहिंडी होणार होती. बाकि सगळ्या ग्रुपला हे लगेच सांगायचं नाही हे तर नक्कि होतं. त्यामुळे तो आणि अबोली एकाच वेळी गायब झाले तर राहुल ह्यापुढे अ‍ॅलबाय असणार होता.

अबोली... तिच्या विचारानी तो परत एकदा मोहरला.

"आमचं प्रेम वेगळं असेल. बॉयफ्रेंडला नोकरासारखं वागवणार्‍या, त्यांना सारखे पैसे खर्च करायला लावणार्‍या बाकी मुलींसारखी ती नाहिये. पण तिच्यासाठी लागेल ते मी करेन. तिचा शब्द खाली पडु देणार नाही. ती "माझी" अबोली आहे आता. माझी गर्लफ्रेंड!!"

************************
स्थळ : आनंदयात्री अपार्टमेंट्स ची गच्ची
वेळ : सायंकाळी ७.००
************************

"ए काला कौआ काट खायेगा.. ये... हे हे .. हे हे...."

राहुल्या अक्षरश: नाचत होता. योगेशनी त्याला एवढच सांगितलं कि मी आज अबोलीला भेटलो आणि ती म्हणाली कि मी तिला आवडतो. ते ऐकल्यावरच राहुलनी नाचायला सुरुवात केली. त्याच्या आनंदाची परिसीमा काला कौआ मधुन व्यक्त होत होती! शेवटी पाच मिनिट नाचुन झाल्यावर तो म्हणाला, "नक्कि काय काय झालं ते डीटेल मधे सांग"

मग योगेशनी अथपासुन इति पर्यंत सगळं सविस्तर सांगितलं.

"आयला! योग्या.. तू तर एकदम छुपा रुस्तम निघालास रे! कधीपसुन चाललय तुमचं हे प्रकरण?"

"प्रकरण वगैरे नाही रे. आम्ही आपले फोन वर गप्पा मारायचो इतके दिवस."

"ए गपे.. फोन वर गप्पा मारुन ती तुझ्या प्रेमात पडली हे दुसर्‍या कोणालातरी सांग."

"अरे म्हणजे, फक्त तेच एक नाही..."

"मग अजुन काय ते बोल ना."

"तुला आठवतय आपण सगळे डिस्को ला गेलो होतो?"

"हम्म तेव्हा काय.."

"अरे तेव्हा नाही का मी तिच्याबरोबर डान्स वगैरे केला?"

"तो डान्स होता?..हा हा हा. योग्या, आयुष्यात पहिल्यांदा आपण सगळे डिस्को मधे गेलो. तिथे जाऊन करायच काय हे पण माहिती नव्हतं. एका बाजुला चार टाळकी नाचत होती म्हणून कोणीतरी म्हणालं लेटस डान्स! म्हणुन मग सगळे डान्स फ्लोअर वर गेलो आणि सगळ्या मुली एका बाजुला आणि मुलं त्यांच्या समोर उभे राहुन जरा हात पाय हलवले. प्रेमात पडायला तो काय 'डर्टी डान्स' वाटला काय रे तुला?"

"नाही रे. पण मी डेअरिंग करुन तेव्हा तिचा हात हातात घेतला होता. ते तिला आवडलं. नंतर म्हणाली तसं."

"हम्म... आणि??"

"आणि असचं काय काय"

"योग्या, तुला आणि नक्कि काय वाटतं तिच्याबद्दल?"

"म्हणजे? मला पण आवडते ती."

"कधीपासुन? तिला तू आवडायला लागल्यापासुन?"

"नाही रे! आधीपासुनच आवडायची तशी. फक्त मी कधी कोणा मुलीला आवडेन असं मनातही आलं नाही माझ्या. म्हणून तुलासुद्धा तिच्याबद्दल कधी बोललो नाही. तशी कुहू तिला पहिल्यांदा ग्रुपमधे घेऊन आली ना तेव्हाच मला ती आवडली होती. तुला माहिती आहे राहुल्या, मला विन्या सारखं पोरींच्या मागे मागे करता येत नाही. पण तिच्याशी मी खूप बोलू शकतो रे. मतं जुळतात आमची खूप. ग्रुपमधल्या बाकिच्या मुलींसारशी नाहिये रे ती."

"म्हणजे?"

"म्हणजे एक कोणी राजकुमार येईल आणि मला हिर्‍याची अंगठी देईल वगैरे परीकल्पना नसतात तिच्या. बॉयफ्रेंड म्हणजे गावभर हिंडवायला ड्रायव्हर आणि केलेलं शॉपिंग उचलायला नोकर असले फंडे नाहीत तिचे. ती खूप प्रॅक्टीकल आहे. म्हणूनच ग्रुपमधे बाकिच्या पोरी तारे तोडत असतात तेव्हा ती गप्प असते. साधी आहे रे ती एकदम. फारसे मित्र मैत्रीणी नाहित तिचे आपला ग्रुप सोडला तर. खरं सांगु का? कधी गर्लफ्रेंड असली तर ती अशीच असावी असं मला वाटायचं."

"असली म्हणजे, फारसे मित्र मैत्रीणी नसणारी?"

"असली म्हणजे साधी सरळ. ह्या बाकिच्या नटमोगर्‍यांसारखी नाही. काहीतरी फालतू कारणावरून दर चार दिवसांनी भांडतात मग पंटर देतो काहीतरी गिफ्ट किंवा ट्रीट कि ह्या परत गुलुगुलु करायला लागतात! ती तशी नाहिये."

"बाकिच्या तसं करतात म्हणून ती चांगली का?"

"नाही रे! तसं नाही. बापाच्या पैशावर किंवा बॉयफ्रेंडच्या जीवावर उनाडक्या करणं तिला पटत नाही."

"म्हणजे अगदी सही सही तुझीच मतं कि रे!"

"मग? म्हणूनच पटतं आमचं इतरांपेक्षा जास्त."

"आणि तिला तुझं सगळं तत्वज्ञान आधीच सांगितलं असशील तू?"

"आता गप्पा मारताना बोलतो काय वाटतं ते. आपलं हे असं स्पष्ट असतं. तत्वज्ञान काय काय त्यात?"

"स्पष्ट वगैरे ठीक आहे रे. पण तीन चार ट्रेक मधे ती मागे पडलेली तेव्हा तिला ढकलत ढकलत चालताना जी काही बडबड केलीस, ती तिला नक्की कळाली का नुसतीच मान डोलवत होती ती?"

"राहुल्या, तुला नक्कि काय प्रॉब्लेम आहे? मी तुला हे सांगायला आलो कारण माझ्या आयुष्यातली ही महत्वाची गोष्ट आहे आणि तुला आनंद होईल म्हणून. आणि तू उलटी माझी शाळा काय घेतोयस?"

"असं काय म्हणतोस यार? मला आनंद आहेच रे. ती खुप चांगली मुलगी आहे. पण तिनी ऑलरेडी घरी पण सांगितलय. म्हणजे तिच्याकडुन कमिटमेंट आहे. योग्या, मी एवढच विचारतोय कि तू नीट विचार केला आहेस ना? तिच्याबद्दल तू सिरियस आहेस ना?"

"राहुल्या, तुला माहिती आहे ह्या बाबतीत मी टाईमपास नाही करणार कधी."

"मग तू पण घरी सांगणार आहेस का?"

"हो.. मी पण सांगेन उद्या परवा मधे. घरी माहिती असलं कि बरं असतं. उगाच बाहेरुन कोणीतरी सांगण्यापेक्षा आपणच सांगितलेलं बरं. आणि मी सिरियस आहे रे तिच्याबद्दल. "

"मग झालं. बाय द वे योग्या, तुम्ही दोघंही 'प्रॅक्टीकल नंबर एक' दिसताय! हे प्रेम बीम कसं जमायच राव तुम्हाला?"

"आय नो. मला तर किती वेळ विश्वासच बसत नव्हता रे हे असं काही झालय ह्याच्यावर. पण राहुल्या, आता तुझीच जबाबदारी वाढली."

"म्हणजे?"

"म्हणजे आता आम्ही हिंडायला वगैरे गेलो तर मी घरी आणि बाकि पब्लीकला तुझं नाव सांगणार!"

"एक मिनिट... एक मिनिट, म्हणजे तुम्ही ग्रुपला हे तुमचं सांगणार नाही?"

"नाही."

"का?"

"नाही सांगायचं आम्हाला दोघांनाही इतक्यात."

"लोक चिडवतील म्हणून? अरे तसेही आपण ग्रुपमधे रोज नव्या जोड्या जुळवतो आणि दिसेल त्याला चिडवत असतोच की!"

"पण लोक फार लेव्हल सोडून बोलतात रे. आम्हाला दोघांनाही नाही आवडत ते. आणि उगाच शंभर चौकश्या होतील. त्यापेक्षा आत्ता नकोच सांगायला."

"बरं बाबा, तुमची इच्छा. पण बघा. लोकांना लवकरच सांगितलत तर बरं होईल. उगाच सारखी खोटी कारणं सांगावी लागतील नाहीतर. नेहमी काय तुम्ही घरी सांगुन हिंडणार नाहीत?"

"म्हणूनच तर तुझी मदत मागतोय ना. सद्ध्यातरी नको सांगायला लोकांना. नंतर बघू."

"ओके. पण काय रे योग्या, तुझ्याकडे नाही स्वतःची गाडी. तु काय तिला बसमधे बसवून हिंडवणार आहेस का सायकल वर डबल सीट बसून हिंडणार आहात?"

"हे एकच वर्ष रे राहुल्या. पुढच्या वर्षी मी नवीन बाईक घेणार."

"ती कशी बाबा? इंजिनिअरिंगला पेमेंट सीट घेतलीस तेव्हाच काकांनी सांगितलं होतं नवीन बाईक मिळणार नाही म्हणून. आता हे ऐकून तयार होणारेत?"

"नाही. मी माझ्या पगारातून घेणार."

"ह्म्म .. योग्या, आत्ता लास्ट ईयर सुरु होतय आपलं. कँपसमधे चांगली नोकरी हवी असेल तर ह्या वर्षी डिस्टींक्शन काढायला लागेल. प्रोजेक्ट वगैरे तर सुरुही झालं नाहिये. आणि तुझं ते पुरुषोत्तम फिरोदिया असतच दर वर्षी. वर आता हे प्रेमाचं काढलं आहेस. योग्या, कसं जमणार सगळं तुला?" हसता हसता राहुल सिरियस झाला.

"हो रे राहुल्या. हे वर्ष लई कष्टाच जाणार म्हणजे. नाटक मंडळीला टाटा करावा लागणार कदाचित. डिस्टींक्शन तर मिळालच पाहिजे. तरच बरी नोकरी मिळेल."

दोन्ही मित्र एकदम शांत झाले. राहुलच्या आईच्या हाकेने त्यांची तंद्री भंगली.

"राहुल, अबोलीचा फोन आलाय रे. आणि खाली या दोघही आता."

दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि खाली धावत सुटले.

*** क्रमशः ********************************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users