तुझ्याबरोबर जो जो व्यतीत केला तो क्षण

Submitted by बेफ़िकीर on 20 April, 2015 - 10:56

नवीन गझल - तुझ्याबरोबर जो जो व्यतीत केला तो क्षण

तुझ्याबरोबर जो जो व्यतीत केला तो क्षण
पक्वान्नाच्या वाटीमधला शेवटचा कण

चिडचिड होते सदोदीत भलते बनण्याने
कधीच का नसतो समजेना आपण आपण

बाप जगवतो मला, जगवतो मी बापाला
दोघे मिळून 'लांबवतो' दोघांचे सरपण

कसे तुझ्याशी वागावे हे समजत नाही
तिसर्‍या दशकामध्येसुद्धा तसेच दडपण

तुझ्या घराची महती मी कोणाला सांगू
सारी दुनिया आहे तुझ्या घराचे अंगण

माझी तत्त्वे कुणालाच पटलेली नव्हती
माझी तत्त्वे अश्या सर्व वेड्यांना अर्पण

'बेफिकीर' ह्या उपनामाची निंदा म्हणजे
कैकेयी नसताना झालेले रामायण

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप जगवतो मला, जगवतो मी बापाला
दोघे मिळून 'लांबवतो' दोघांचे सरपण

व्वा व्वा.

कसे तुझ्याशी वागावे हे समजत नाही
तिसर्‍या दशकामध्येसुद्धा तसेच दडपण

हा शेरही आवडला.
एकूण छान.

माझी तत्त्वे कुणालाच पटलेली नव्हती
माझी तत्त्वे अश्या सर्व वेड्यांना अर्पण....
मस्त !

कैकेयी नसताना झालेले रामायण .....
बेफिजी , झालेले ऐवजी घडलेले छान वाटतंय !

चिडचिड होते सदोदीत भलते बनण्याने
कधीच का नसतो समजेना आपण आपण

कसे तुझ्याशी वागावे हे समजत नाही
तिसर्‍या दशकामध्येसुद्धा तसेच दडपण

<< हे शेर आवडले

तुझ्या घराची महती मी कोणाला सांगू
सारी दुनिया आहे तुझ्या घराचे अंगण << हा ही छान आहे, आध्यात्मिक वाटला Happy

बाप जगवतो मला, जगवतो मी बापाला
दोघे मिळून 'लांबवतो' दोघांचे सरपण

कसे तुझ्याशी वागावे हे समजत नाही
तिसर्‍या दशकामध्येसुद्धा तसेच दडपण

माझी तत्त्वे कुणालाच पटलेली नव्हती
माझी तत्त्वे अश्या सर्व वेड्यांना अर्पण

हे शेर खूप आवडले ! गझल छान !