वारी (पुर्वार्ध-भाग २)

Submitted by टवणे सर on 29 February, 2008 - 15:10

सहा वाजुन गेले होते. आई अजुन घरी परतली नव्हती. ती मला सांगायची की मी लहान असताना, ती जोपर्यंत ऑफिसमध्ये आहे तोपर्यंत छान खेळत असायचो. आणि ज्याक्षणी ती घरात यायची त्याक्षणी रडायला सुरुवात करायचो. आणि कशावरुनही रडायचो. म्हणजे जर ती मला पेरु घेउन आली असेल तर मी संत्र का नाही आणलं म्हणुन रडायचो. तिला कामावरुन आल्याआल्या माझ्या रडारडीचा भयंकर त्रास व्हायचा. पण आता मी रडायचो नाही. आता मी त्रास देण्यासाठी वेगळ्याच खोड्या वापरायला सुरुवात केली होती.

आई आणि ताईला त्रास देण्याच्या नवीन नवीन युक्त्या मी शोधून काढत होतो. पण बाबांसमोर माझे काही चालायचे नाही. कारण मी पहिलेच वाक्य टाकल्यावर त्यांना मी काय करणार आहे ह्याचा अंदाज यायचा. ताईला मात्र मी सांगुन रडवू शकत होतो. ते सुद्धा आवाज न चढवता किंवा हातसुद्धा न लावता. जर तिच्या मैत्रिणी घरी आल्या असल्या तर मी घरात असा काही वागायचो की त्या थोड्याच वेळात वैतागुन निघुन जायच्या. ताई आतल्या खोलीत जाउन रडत बसायची. मग मला फार भारी वाटायचं. आईबरोबर मात्र हे सगळं थोडं आडवळणानं करायला लागायचं. तसही आजकाल तिच्या दम्यानं फारच उचल खाल्ली होती. ऑफिसमध्ये पण तिला खुप त्रास व्हायचा. आणि वर मी! मी कुणालाही त्रास देवू शकत होतो. फक्त जर कुणाला माझी पहिली चाल लक्षात आली, जसं बाबांना यायचं, तर मात्र मी बेकार होतो.

सात-सव्वा सातला शेवटी आई आली. तिने लुनाच्या दोन्ही हँडलना बगद्याच्या दोन मोठ्या पिशव्या लावल्या होत्या - बहुतेक दिवाळीची खरेदी होती. आणि लुनावर मध्ये दळपाचा मोठा डबा होता - चकलीच्या भाजणीचा. मी व्हरांड्यात बसून तिचीच वाट बघत बसलो होतो. ती गेटाशी आल्या आल्या मी धावत पुढे होवून दळपाचा डबा उचलला आणि आत ओट्यावर नेउन ठेवला. मी परत बाहेर येइतो तिने दोन्ही पिशव्या व्हरांड्याच्या कट्ट्यावर ठेवल्या होत्या आणि ओढणीचा बोळा तोंडात कोंबून ती गुढग्यावर हात दाबत हळुहळु पायर्‍या चढत होती. तिला चांगलाच दम लागला होता. आत येउन ते खुर्चीवर धाडदिशी दमून बसली आणि एका हाताने ओढणीचा वारा घ्यायला लागली. मी फॅन लावला आणि तिला पाणी आणुन दिलं. बराच वेळ तिने पाण्याचा ग्लास तसाच हातात धरला होता. दम लागल्यामुळे तिला पाणी पण पिववत नव्हतं.

आतल्या खोलीतनं ताई बाहेर आली आणि आईच्या खांद्यावर डोके टाकुन शेजारच्या खुर्चीत बसली. रडल्यामुळे तिचे डोळे लाल सुजले होते. ती काही न बोलताच आईच्या लक्षात आलं की मी तिला रडवलं आहे. आईने माझ्याकडे हताशपणे बघितले आणि तिने ताईला एक-दोनदा पाठीवर थोपटले. पण तेव्हड्यानेच बहुतेक ती दमली आणि फक्त ताईच्या पाठीवर हलकेच हात फिरवत बसली. मी उठुन व्हरांड्यात जाउन बसलो. आईने रागवायला सुरुवात केली तर कसे तोंड द्यायचे ह्याचा विचार मी सुरु केला. आत त्या दोघी एकमेकींशी एकही शब्द न बोलता बोलत बसल्या होत्या. मी बाहेर रस्त्यावरनं येणार्‍या जाणार्‍यांना बघत बसलो होतो.

तसं आई एव्हडी दमली होती की ती मला ओरडायचं चिन्ह दिसत नव्हतं. फक्त जर का बाबा चुकुन लवकर घरी आले आणि ताईने किंवा आईने बाबांना सांगितलं तरंच घोळ होणार होता. बाबांच्या समोर आजी पण माझी बाजु घ्यायची नाही. आई किंवा ताईशी भांडताना आजी माझ्या बाजुने असायची कारण त्यांच्या विरुद्धा ती मुळातच माझ्या बाजुने होती. पण बाबांच्या विरुद्ध ती मुळातच बाबांच्या बाजुने होती. आणि माझं काही चूक नव्हतच मुळी. मी एव्हडं उन्हा-तान्हात खपून किल्ला बांधला होता. लांब माळावर चालत जाउन माती आणली होती. किल्ला बांधताना झालेली घाण कुणीही न सांगता मी स्वच्छ केली होती. पण तिने ऑफिसमधून आल्यावर एका शब्दानेदेखील माझं कौतुक केलं नव्हतं. आणि ताईच्या मैत्रिणी. सगळ्या एकजात ढ आणि कुरुप होत्या. आणि त्या आमच्या घरात आल्यावर मी आमच्या घरात कसं वागायचं हे त्या कोण ठरवणार? मी काय त्यांच्याशी किंवा ताईशी एकही शब्द बोललो नव्हतो. माझी अजिबात कुठेच चूक नव्हती. आणि माझे मित्र जर घरी आले असते तर ताईने कसे वागावे हे मी मुळीच तिला सांगितलं नसतं. पण मी कुठल्या मित्राला घरी आणतच नव्हतो. माझी अजिबात चूक नव्हती. आज जर बाबांना हे कळले तर मी त्यांच्यासमोर एकदम ठामपणे उभा राहणार होतो. माझी अजिबात चूक नव्हती.

एक टम्मं फुगलेला डास बराच वेळ माझ्या पिंडरीवर बसून रक्त पीत होता. मी त्याला एक-दोन मिनीटं अजून थोडं रक्त पिउ दिलं. आणि मग हलकेच हात वर उचलुन फाडदिशी त्याला हाणला. सगळं रक्त माझ्या पायावर पसरलं.

कोपर्‍यावरच्या दिव्यात मला आजी घरी परतताना दिसली. आत आल्या आल्या आजीने टीव्हीचा चॅनल बदलून दूरदर्शन लावले. ताई आत ओट्याशी उभं राहुन कुठलातरी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम बघत आईला स्वैपाकात मदत करत होती. आजीने दूरदर्शन लावताच दोघींच्यात भांडण सुरु झाले. आजीने हिंदी चित्रपट, त्यातली गाणी, नाच, कपडे वगैरे वगैरेवर तोंड सोडले. इतरवेळी खरेतर मी आत जाउन आगीत अजुन थोडं तेल ओतलं असतं आजीच्या बाजुने बोलून. पण आज आई इतकी शांत होती की मी आत गेलोच नाही. ताई आधीच माझ्यामुळे वैतागली होती. तिने कंटाळून माघार घेतली. आजीनेपण मग "छे, आज काहीच नाहीये हं" असं म्हणत टीव्ही बंद केला. आजी थोडी माझ्यासारखी होती. तिला दूरदर्शनवरची मालिका बघायची होती असं काही नाही. तिचे तसेही मालिकेत फार लक्ष नसायचेच. अधुन मधुन बाकीच्यांना दाखवायला म्हणुन एखादा टकला माणुस जर टीव्हीवर दिसला तर "हा अगदी हलकट आहे" असं एखादं वाक्य टाकायची. मग तो टकल्या जरी कितीही चांगला असला तरीही. ताई काहितरी दुसरं बघत होती म्हणुन आजीला दूरदर्शन बघायचे होते इतकेच. मला कळायचं नाही की आजी यायच्या वेळेला ताई दूरदर्शनच का लावून ठेवत नाही. म्हणजे आजी आली की ते बदलेल आणि जे खरेतर ताईला हवे आहे, पण जे तिने लावले नाहीये, ते आजी बदलून लावेल. मी आणि भाउ क्रिकेटची मॅच बघायची असेल तर असेच करायचो. पण आता भाउ नव्हते.

थोड्या वेळानं मला आतनं पानं घेतल्याचा आवाज आला. मी आत जाउन पाणी भरुन तांबे टेबलावर ठेवले. सगळेजण एकही शब्द न बोलता जेवायला लागलो. बाबा अजुनही आले नव्हते. आई डोकं हातात गच्च पकडून एक-एक घास तोंडात सारत होती. अचानक ती पानावरून उठुन आत गेली. ताई दोन मिनीट शांत बसून मग आईचे ताट घेवून आत गेली. मी आणि आजीने आपापलं जेवण संपवले आणि मागचं आवरलं. मी आईला द्यायला आत पाणी घेवून गेलो. आई मांडीवर ताट ठेवून रडत बसली होती. तिच्या शेजारी बसून ताई तिला शांत करायचा प्रयत्न करत होती. मी पटकन ग्लास खिडकीत ठेवून खोलीच्या बाहेर पडलो. ग्लास ठेवून वळताना मात्र मला आईच्या डोळ्यात एकदम खूप भिती दिसली. काहितरी आपल्याला सोडून चालल्याची भिती. तिला श्वास घ्यायला खूपच त्रास होत होता.

-------------------------------------------------------------------------

बाबांच्या आवाजानं मला पहाटे तीनच्या सुमाराला जाग आली. आज दिवाळीचा पहिला दिवस होता. मागच्या आठवड्यात आईने रोज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर सगळा फराळ बनवला होता. ताईने पण तिला मदत केली होती. मी मात्र थोड्या चकल्या आणि शेव पाडण्याचं सोडल्यास काही केलं नव्हतं. आजीचा जुना गॅस खाली जमिनीवर मांडून आईने चकली, शेव, करंजी, चिरोटे असा सगळा तळणीचा घाट घातला होता. आजीन फक्त एके दिवशी दुपारी आई ऑफिसमध्ये असताना शंकरपाळ्या बनवून डब्यात भरून गुपचुप वर ठेवल्या होत्या. पण मला माहिती होते की डबा कुठे आहे ते आणि मी रोज येता जाता शंकळपाळ्या हादडत होतो. स्वैपाघरात सगळा तळणीचा वास भरुन राहिला होता.

पण मला कळेना की बाबा एव्हड्या पहाटेचं काय करताहेत. बाबा काय काकांसारखे दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठुन आंघोळ करणार्‍यातले नव्हते. तसा मी लहान असताना आजी-भाउंबरोबर राहायचो आणि फक्त रविवारी आणि दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आई-बाबांकडे यायचो, तेव्हा ते मला सकाळी लवकर उठवून आंघोळ घालायचे. पण तेव्हा खूप मजा यायची. एकतर बाबा बंबात खूप पाणी एकदम कढत कढत गरम करायचे. आणि मग खूप खूप साबण आणि उटणं लावून आंघोळ घालायचे. आणि आंघोळ घालता घालता काय वाट्टेल ते सांगायचे. एकदा मी त्यांना विचारले की दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठुन आंघोळ का करतात तर तर त्यांनी मला सांगितले, की आमच्या प्लॉटच्या पलिकडे जे शेत होतं त्या शेतामध्ये भल्या पहाटे कृष्ण आणि नरकासूराची लढाई झाली होती. एकदम मिट्ट अंधारात, कृष्ण आणि नरकासूर दोन्ही हातांना बॅटर्‍या बांधून एकमेकांशी कुस्ती खेळत होते. बराच वेळ दोघे एकमेकांना नुसते हुलकावत होते. मग नरकासूराची बॅटरी संपली आणि कृष्णाने त्याला पलटी घालुन त्याच्यावर विजय मिळवला. ते मला हे पण सांगायचे की भाउ शिवाजीच्या सैन्यात होते आणि बाजीप्रभुच्या लढाईत पण लढले होते. मग मी शाळा सुरु झाल्यावर परत आजी-भाउंकडे आल्यावर भाउंना विचारले की ते खरच बाजीप्रभुबरोबर खिंडीत लढले होते का? तर भाउ मला म्हाणले "हात् भोसडीच्या". आणि मग त्यांनी त्यांच्या कपातला दोन चमचे चहा माझ्या दुधात घातला. पण तेव्हा मी लहान होतो आणि दूध प्यायचो. आजकाल मी बरेचदा पूर्ण कप भरून चहाच प्यायचो. आणि आता मी आणि आजी नेहेमीच आई-बाबांकडे राहायचो.

बाबा ओट्यापाशी उभं राहुन एका पातेल्यात पाणी गरम करत होते. मी आई-बाबांच्या खोलीत गेलो तर सगळया खोलीत अमृतांजन आणि घामाचा एक कुबट वास बसला होता. आई आरामखुर्चीत बसली होती. गरम केलेलं पाणी शेकायच्या रबरी पिशवीत घालून बाबांनी ती पिशवी आईच्या हातात दिली. पण आईला ती पिशवीसुद्धा धरवत नव्हती. बाबांनीच ती पिशवी तिच्या छातीशी लावून वरुन परत पांघरुण घातलं. ते थोडा वेळ तसेच शांतपणे तिथे आईला 'अजुन काही हवय का?' असं विचारत कॉटवर बसून राहिले. ती प्रचंड कण्हत होती. काही वेळाने ती जोरजोराने रडायला लागली. बाबा उठुन बाहेर गेले. दोन-एक मिनीटांनी ते कुणाशीतरी हळु आवाजात फोनवर बोलत होते.

मी आईच्या शेजारी जाउन तिचा हात माझ्या हातात घेउन बसलो. ती रडतच होती. अधुन मधुन ती तिचा दम्याचा स्प्रे तोंडात मारायचा प्रयत्न करत होती. पण तो तोंडात पकडून दाबेपर्यंत तिचा श्वासच टिकत नव्हता. कंटाळून तिने स्प्रे तसाच हातातून सोडून दिला. खोलीत सगळा पसारा झाला होता. कॉटवर अंथरुणं पसरली होती. अधे मधे पुस्तकं लोळत होती. छतावर टांगलेल्या बांबुच्या टोपलीतुन बल्बच्या उजेडाच्या पट्ट्या खोलीतल्या सगळ्या वस्तुंवर पसरल्या होत्या. ती टोपली हलकेच हिंदकळत होती. आणि त्यामुळे आईच्या तोंडावरच्या पट्ट्यापण एकदा इकडे, एकदा तिकडे अश्या झोका घेत होत्या. आईचा श्वासाचा आवाज आता पॉलिश पेपरनं गंजकी सायकल घासल्यावर जसा आवाज येतो तसा येत होता. मिनीटागणिक तिला जास्त जास्तच त्रास होत होता. मग तिच्या घशात कफ अडकला. तिने सगळं शरीर आवळुन, खांदे बाहेर काढुन आणि छातीवर हात दाबून कफ बाहेर थुंकायचा प्रयत्न केला. पण तिच्या तोंडातून नुसती फुसकी हवाच आली. आणि मग एक पोकळ आवाज. ती एकदम घाबरी झाली. बाबा बाहेरच्या खोलीतून धावत आत आले. त्यांनी आईला सरळ बसवून आणि तिच्या पाठीवर धपके घालुन तिचा कफ थुंकवला. मी ते भांड एका बोटानं लांब धरुन बाहेरच्या नळावर जाउन रिकामं करुन आलो. मी आत आलो तर ती रडत होती पण आता रडताना अजिबात आवाज करत नव्हती. मी तिला थोपटायला तिच्या कपाळावर हात ठेवला, तर दुपारच्या उन्हातल्या मोटरसायकलच्या सीटसारखं तीचं कपाळ तापलं होतं. बाबा खोलीच्या दारात छातीवर हाताची घडी घालुन उभे राहिले.

दूर कुठेतरी मला फटाक्याचा आवाज ऐकु आला. पहिला फटाका फोडायच्या शर्यतीत कुणीतरी पहिला फटाका फोडून पहिले आले होते. रोगाची साथ पसरल्यासारखे मग हळुहळु सगळीकडून फटाक्यांचे आवाज ऐकु येउ लागले. आणि मग आमच्या कॉलनीत कुणीतरी सुतळी बाँब फोडला. दिवाळी आम्हाला तुडवत, पुढे निघुन गेली.

बाबा चहा घेउन आत आले. मी दोन-तीन उश्या आईच्या पाठीला लावून तिला बसते केले. बाबांनी तिला सांगितले की डॉक्टर थोड्याच वेळात पोचतील. आई कण्हुन कण्हुन एव्हडे दमली होती की आता तिला कण्हायला सुद्धा होत नव्हते. ती निमुटपणे चहा पीत राहिली.

डॉक्टर आपल्या पुराणकालीन लुनावरुन आणी त्याच्यापेक्षापण जुनी कातडी बॅग घेउन आत आले. आत येउन त्यांनी थेट आईला तपासायला सुरुवात केली. आणि मग तोंडाचा पट्टा सोडला. तळणी कशाला केली, विकत नाही का आणता येत, आणि करायचंच कशाला, अजुन मुल किती लहान आहेत वगैरे वगैरे. बोलता बोलता त्यांनी इंजेक्शन भरायला सुरुवात केली. मग मात्र मी बाहेरच्या खोलीत गेलो.

चहा पिउन डॉक्टर निघाले. त्यांना सोडायला मी गेटपर्यंत गेलो. मला उगीचच वाटले की त्यांना विचारावे, त्यांच्या लहानपणी कसले फटाके होते. पण भाउ गेल्यापासुन ते माझ्याशी पुर्वीसारखं बोलत नसत. भाउ असताना मात्र भाउ मला त्यांच्याकडे घेउन गेले की मी रोज किती सूर्यनमस्कार घालतो असं ते हमखास विचारायचे आणि मग एक खोकल्याची गोड गोळी द्यायचे. आज मात्र मी नुसतच त्यांना गेटपर्यंत सोडलं.

बाहेर ढळढळीत फटफटलं होतं. हवेत फटाक्याचा धूर भरुन राहिला होता आणि रस्त्यावर सगळा फटाक्याच्या कागदांचा कचरा. रस्त्यावर कुणीच नव्हतं. बहुतेक सगळे जण फटाके उडवून आपापल्या घरात फराळ करत होते. सत्याच्या आईने त्यांच्या घरासमोर भली-थोरली रांगोळी काढली होती. त्याच्या किल्ल्याच्या भोवती सुद्धा. सत्यानेपण मावळे मांडून, सगळा किल्ला सजवला होता. आणि सलाइनच्या बाटलीचं कारंजं केलं होतं. मी आत जायला वळलो तर माझ्या मगरीच्या तळ्याच्या प्लास्टिकमध्ये जळत्या फटाक्याचा तुकडा उडुन मोठं भोक पडलं होतं. किल्ल्यावर ह्यावर्षी जंगल मात्र मस्तच आलं होतं. एकुणात ह्यावेळी किल्ला बराच बरा झाला होता.

मी मात्र ह्यावेळी किल्ल्यावर मावळे मांडले नाहित.

-------------------------------पुर्वार्ध समाप्त----------------------------------------

गुलमोहर: 

त्या दोघी एकमेकींशी एकही शब्द न बोलता बोलत बसल्या होत्या.

खुप छान. आधीचा भाग पण हावरटपणे वाचला. छान झालाय.

टण्या,
दिवाळी अंकात येतात ना तशा दीर्घकथे सारखी वाटतेय एकदम. आवडतीये खुप.

त.टि. १ : पहिला भाग वाचुन झाल्यावर दुसर्‍या भागाची वाट बघत बसले होते मी. ताजे लेखन मध्ये दाखवत नाहीत
का हे लेखन पहिल्या पानावर?

त. टि. २ : आली आली ताजे लेखन मध्ये आली. मघाशी का दाखवली नव्हती माहित नाही.

टन्या तु जे डिटेल्स उभे करतोयस ते समोर दिसतात. भाऊ ला फार मिस करत असनार हे व सत्या सोबतची कॉम्पीटीशन ही अगदी सब कॉन्शश लेवल वर आहे हे फक्त दोन चार ओळीतुन जानवत. खरच मस्त लिहीतोयस. शिवाय त्यावेळच्या मी ला जे वाटले असते तेच फक्त येतय बाकी फाटपसारा नाही त्यामुळे अजुनच जमलीय.
अगदी ओळ ना ओळ निट जमलेली आहे.

मायबोलीवर पहील्यांद्याच पुढच्या भागाचा प्रतिक्षेत.

टण्या.... मस्त चालू आहे अगदी.

दिवाळी आम्हाला तुडवत, पुढे निघुन गेली............... सुरेख, अगदी सुंदर!!!!

अप्रतिम लिहितो आहेस शंतनू! 'त्याची' मानसिकता इतक्या सुरेख मांडली आहेस. कॅरक्टरायझेशनही छान जमतय. त्या त्या वयातल्या इनोसन्समधे जाउन लिहिणे सोपे नसते आणि तुला ते जमतय. लिहित रहा!!

शंतनु,
अगदी गुंतून जायला होतय कथेमध्ये. वातावरण निर्मिती फार सुरेख साधली आहे. लिहीत राहा.

काय सुरेख शैली आहे टण्या! फारच सुरेख लिहिलं आहेस!
उत्तरार्ध कधी?

खूपच नेमके शब्द वापरून छान लिहीले आहेस. कुठेही फापटपसारा नाही. मुख्य म्हणजे मेलोड्रामा नाही. उत्तरार्ध लवकर लिही.

पुर्वार्ध इतका सुंदर तर उत्तरार्ध काय छान असेल. व्वा! व्वा! काय लिहलं आहे. अप्रतिम. कादंबरीला समर्पक लिखाण.

पूर्वाध एकपेक्षा जास्त रंगलाय हा भाग.
पण एवढासाच पूर्वाध? उत्तरार्ध(अर्ध असला तरी यापेक्षा) मोठा असेल अशी अपेक्षा आहे. कांदंबरी मधे टाकलेय तर मस्त मोठ्ठी लिही आता.
बरं मग पुढे काय झालं?

खरे तर हा पुर्वार्ध म्हणण्यापेक्षा, भाग१ एव्हडेच म्हणायला पाहिजे होते. वेळ होइल तसे पुढे लिहीत राहीन.

तान्या... (जी?)
अतिशय वेधक झालेत दोन्ही भाग.... लवकर लवकर पुढले येऊद्यात.... त्या लहान वयाचं बेअरिंग कुठे म्हणजे कुठेच सुटलेलं नाही.... अमेझिंग आहे...
वाट बघतेय... पुढल्या भागाची.

दाद, थॅन्क्स.. मला टण्या म्हणा (तान्या नको आणि "जी" तर मुळीच लावु नका).. वेळ मिळाला की लगेचच पुढचे भाग टाकेन.. नक्की

बेडेकर दाद देण्या करता पण शब्द आठ्वत नाहियेत्,ग्रेट फक्त ग्रेट

सुरेख लिहिलं आहे टण्या, वाचताना सगळ्या व्यक्तिरेखांमधे गुंतून जायला होतं. उत्तरार्ध कधी लिहिणार?

पुढे कधी ??? झाले ना आता ३ ८वडे शेवटचं पोस्ट करुन Angry

एक टम्मं फुगलेला डास बराच वेळ माझ्या पिंडरीवर बसून रक्त पीत होता. मी त्याला एक-दोन मिनीटं अजून थोडं रक्त पिउ दिलं. आणि मग हलकेच हात वर उचलुन फाडदिशी त्याला हाणला. सगळं रक्त माझ्या पायावर पसरलं............................... किती छान वर्णन शैली.........

पुढचं येउ दे आता...

केदार,
मस्त वाटतय. पण पुढचं अजुन नाही लिहिलस? वाट पहातेय

मी चुकुन केदार लिहिलं. मला बेडेकर म्हणायच आहे. तेव्हा या वेंधळे पणा बद्दल sorry.
सहज म्हणुन आहे त्यामुळे लक्शात आला हा प्रकार.

लहान, मोठी- कशीही असली, तरी फॉर्म कादंबरीचाच आहे. छान व्यक्तिचित्र. असं लिहू शकणं फार मोठी गोष्ट आहे. त्यामूळे, लिहित रहा.. शुभेच्छा.

खूप उत्सुकता लागून राहिलीय पुढचा भाग वाचण्याची. मस्त!

शरद
.............................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
............................