वारी - भाग ३ (पुर्वार्ध अंतिम)

Submitted by टवणे सर on 14 June, 2008 - 09:41

सगळे फुसके फटाके, पुठ्ठे, कागद वगैरे जाळुन झाल्यावर मी घरात आत आलो. व्हरांड्यात ह्या वर्षीचे न उडवलेले फटाके प्लास्टिकच्या पिशव्यात पडून होते. आई आजारी असल्याने मी आवाज करणारे फटाके उडवले नव्हते. त्यामुळे बाँब, लक्ष्मी तोटे तसेच राहिले होते. भाउबीजेच्या दिवशी आईला थोडं बरं वाटल्याने ती संध्याकाळी बाहेर व्हरांड्यात येउन बसली होती तेव्हा थोड्या फुलबाज्या, झाडं वगैरे मी आणि ताईने उडवले. बस. ह्या वर्षीची फटाक्यांची दिवाळी एव्हडीच. त्या प्लास्टिकच्या पिशव्या मी हवा काढुन, गाठ मारुन, वरती माळ्यावर ठेवून दिल्या.

दिवाळीचा अभ्यास कधीच उरकला होता. मला भाषा, इतिहास-भूगोल आवडायचं नाही कारण उगाचच पानच्या पानं भरून लिहायला लागायचं. म्हणुन मग मी त्यांचा अभ्यास दिवाळीच्या आधीच संपवला होता. गणित मात्र मला खूप आवडायचं. त्यात लिहायला लागायचं नाही. तसं आमच्या गणिताच्या बाई मला कधीच पैकीच्या पैकी मार्क द्यायच्या नाहीत कारण मी पायर्‍या-पायर्‍यांनी गणित न सोडवता थेट एकदम उत्तरच लिहायचो. मग उगाच पाच-दहा मार्कासाठी कोण एव्हडं लिहीत बसणार. उत्तर मात्र नेहेमी बरोबर असायचे. तसही आमच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना असली कलाकुसर असल्यावरच मार्क द्यायची सवय होती. अक्षर चांगलं पाहिजे, बॉर्डर आखली पाहिजे, ह्यंव आणि त्यंव. मला असलं सगळं करायला जाम भंपक वाटायचं. मग मी मराठीच्या निबंधात वगैरे काहिही लिहायचो. ह्या सहामाहीच्या मराठीच्या पेपरमध्ये 'मोठेपणी काय व्हायचे आहे' ह्या निबंधामध्ये मी वेड्यांचा डॉक्टर व्हायचे आहे आणि सगळ्या शिक्षकांना शहाणं करायचं आहे असे लिहिले होते. आणि ते खरेही होते. आमच्या शाळेतले सगळे शिक्षक भंपक होते. शाळाच भंकस होती. मला आजकाल शाळा आवडत नसल्याने मी बरेचदा मधल्या सुट्टीत, मैदानाच्या मागच्या भिंतीवरुन दप्तर टाकुन आणि मग त्यावर चढून पळून जायचो. मग पटकन गावाबाहेरच्या रस्त्याला लागून हिंडत बसायचो. कुणी ओळखीचे दिसत नाहिये ना एव्हडेच लक्ष ठेवायला लागायचे. आधी मात्र भाउ असताना हे शक्य नव्हते कारण भाउंनी मला कधी ना कधी पकडलंच असतं.

थोड्यावेळानं काका आले. सायकल गेटला लावत "आहेस का?" म्हणुन त्यांनी जोरात हाक मारली. काकांचा आवाज म्हणजे आमच्या इथे बोलले की तिकडे काकुला ऐकु जाईल एव्हडा मोठा होता. हातातल्या पिशवीतुन एक डबा काढुन त्यांनी आईला दिला. बहुतेक काकुने काहितरी खायला करुन पाठवलं असणार आईसाठी.
"चहा कर जरा. आणि तायडी कुठे आहे?" - काकांनी मला विचारलं.
मी उत्तर न देता चहा करायला लागलो. आतल्या खोलीतून ताई बारीक तोंड करुन बाहेर आली.
"ह्यानं परत त्रास दिला का तुला" असं तिला विचारत पण ती काय म्हणतीये ते न ऐकताच काकांनी मला भाषण द्यायला सुरुवात केली.
"तू आता लहान नाहियेस... घरात आई आजारी आहे.. ताईचं महत्त्वाचं वर्ष आहे शाळेचं तरी ती स्वयंपाकाचं बघतीये.. बाबा कामात असतात.. तू मदत करायचं तर दूरच राहिलं, पण सगळ्यांना त्रास देत असतोस........."
शेवटी एकदाचा चहा संपला आणि काका जायला उठले. त्यांच्या सगळ्या ओरड्याला मी एका शब्दानं पण उत्तर दिलं नव्हतं. आणि मी द्यावं तरी का? मला जसं वागायचं असेल तसं मी वागेन. जर कुणाला माझ्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर त्यांनी त्रास करुन घेउ नये. त्यात माझी चूक काय? त्रास होतो हा त्रास होणार्‍याचा प्रश्ण आहे, त्रास देणार्‍याचा नाही. आणि मला पण काय ह्या सगळ्यांबरोबर राहायची हौस नव्हती. मी इथे जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते. माझे शिक्षण पूर्ण करणे हे ह्यांचे कर्तव्यच होते. आणि तो पर्यंत इथे राहणे मला भाग होते. पण एकदा का मी इंजिनियर झालो की मी कायमचा निघुन जाणार होतो. एक दिवसपण इथे राहणार नव्हतो. मला जसं वागायचंय तस वागणार होतो, राहणार होतो.

मी माझ्या तंद्रीमध्ये विचार करत बसलो होतो. जाता जाता काकांचं शेवटचं वाक्य माझ्या कानावर पडलं.
"उद्या सकाळी तासगाव वेसच्या मारुतीला ये रे. मी निघालोय वारीला."
----------------------------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

"ह्यानं परत त्रास दिला का तुला" असं तिला विचारत पण ती काय म्हणतीये ते न ऐकताच काकांनी मला भाषण द्यायला सुरुवात केली. >>>>>>
टण्या व्यक्तीरेखा मस्तच जमतायत.
पुढे वाचायची उत्सुकता वाढतेय.

>>> आणि मी द्यावं तरी का? मला जसं वागायचं असेल तसं मी वागेन. जर कुणाला माझ्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर त्यांनी त्रास करुन घेउ नये. त्यात माझी चूक काय? त्रास होतो हा त्रास होणार्‍याचा प्रश्ण आहे, त्रास देणार्‍याचा नाही. आणि मला पण काय ह्या सगळ्यांबरोबर राहायची हौस नव्हती. मी इथे जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते. माझे शिक्षण पूर्ण करणे हे ह्यांचे कर्तव्यच होते. आणि तो पर्यंत इथे राहणे मला भाग होते. पण एकदा का मी इंजिनियर झालो की मी कायमचा निघुन जाणार होतो. एक दिवसपण इथे राहणार नव्हतो. मला जसं वागायचंय तस वागणार होतो, राहणार होतो.....
ह्म्म....
'वारी' प्रथम पुरूषी असूनसुद्धा एक अलिप्तपणा आलाय हे मला आवडतंय. स्वकेंद्रित विचार हेच फक्त कारण असतं का असा विचार करतोय.

  ***
  The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.

  रे बाबा टण्या.. जरा मोठे भाग टाक ना.
  जाम मस्त लिहितोयस.

  एकापेक्षा एक सुंदर भाग होत चाललेत. प्रत्येक व्यक्ती आता ओळखीची होत चाललीय. छान!
  शरद
  .............................
  "मैं क्यों उसको फोन करूं?
  उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
  ............................

  तू आज सहावा भाग टाकलेला पाहील्यावर एका फटक्यात आज पुर्वार्धाचे तीनही भाग वाचले. मस्तच लिहीतोस रे तू.. आता तू पुढचा (७ वा) भाग टाकल्यावर मी असेच झटक्यात उरलेले भाग वाचेन. Happy