कणाकणानेे मी त्याच्या आहारी जाते

Submitted by सुप्रिया जाधव. on 11 May, 2015 - 08:22

पावत नाही व्यर्थ पुन्हा ही वारी जाते
हात जोडुनी उगाच त्याच्या दारी जाते

परस्परांना दोघेही अजमावत बसतो
निष्कर्षाविण हयात सारी सारी जाते

क्षणाक्षणाने व्यसनाधिनता वाढत जाते
कणाकणाने मी त्याच्या आहारी जाते

पहाटस्वप्नांमधे अचानक प्रवेशतो तो
वास्तवात शिरता शिरता माघारी जाते

'हो' ही नाही म्हणत कधी 'नाही' ही नाही
ऐक, अश्याने जगण्यातील ख़ुमारी जाते

विरह तुझा माझ्या गझलेचे निमित्त ठरतो
शेरामागे वाढत तुझी उधारी जाते

चल आता सगळ्या-सगळ्याच्या पल्याड जावू
तेथे जेथे संपुन दुनियादारी जाते

-सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझलेच्या तांत्रिकते बाबत काहीच माहिती नाही.पण गझल आवडली.
एकाच भावनेच्या अविष्काराच्या वेगवेगळ्या छटांचा सलग अनुभव.. गझल आवडली..

चल आता सगळ्या-सगळ्याच्या पल्याड जावू
तेथे जेथे संपुन दुनियादारी जाते

व्वा.

(निष्कर्षा)विण किंवा विना असा वापर प्रचलित आहे.