ब्रिटनचे ऋतुमान

Submitted by सुमुक्ता on 11 May, 2015 - 04:07

ब्रिटनचे हवामान निराशाजनक आहे असे सांगणारे अनेक लोक भेटतील. वर्षभर कधीही पडणारा पाऊस, थंडी, वारे, क्वचितच घडणारे सूर्यदर्शन अशा प्रकारचे निराशाजनक चित्र आम्ही ब्रिटनमध्ये येण्याआधी खूप लोकांनी रंगवून सांगितले होते. त्यात आम्ही स्कॉटलंडला राहणार म्हणजे अजूनच उत्तरेकडे त्यामुळे अजूनच वाईट. आम्ही मनातून खूप घाबरलो होतो. ठरवले होते की एकच वर्ष राहू आणि मग दुसरीकडे जाऊ. पण जसेजसे आम्ही इथल्या लोकांशी, इथल्या संस्कृतीशी जुळवून घेऊ लागलो तसे इथल्या हवामानाशी पण जुळवून घेऊ लागलो . आणि आता तर इतकी वर्षे झाली; आम्ही स्कॉटलंडच्या प्रेमात आहोत. ब्रिटनमध्ये चार ऋतु आहेत उन्हाळा (जून ते ऑगस्ट), शिशिर (सप्टेंबर ते नोव्हेंबर), हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी) आणि वसंत (मार्च ते मे). पावसाळा असा वेगळा ऋतु येथे नाही. वर्षभरात पाऊस कधीही पडतो. पण त्यातल्या त्यात एप्रिल आणि ऑक्टोबर ह्या महिन्यांमध्ये अधिक पाऊस असतो.

सुरुवातीला आम्ही येथे आलो तेव्हा जून महिना होता. येथील उन्हाळा असला तरी मला मात्र खूप थंडी वाजायची. येथे उन्हाळ्यात साधारण १५ ते २० डिग्री तापमान असते. अगदी क्वचित २२ पर्यंत जाते. एवढ्या वर्षात एक दिवस २७ पर्यंत गेले होते. बरे असेही नाही की तापमान एकदा १८ डिग्री असले की अनेक दिवस १८ डिग्रीच रहाते. इथले तापमान आहे लहरी; आज १८, तर उद्या १५, परवा २०, तर नंतर एकदम १३. पण येथे आल्यावर एक जाणवले "क्वचितच घडणारे सूर्यदर्शन " असे सांगणारे लोक धडधडीत खोटे बोलत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर "सनी" दिवस आम्हाला मिळतात. उन्हाळ्यात सकाळी चार वाजताच उजाडते आणि रात्री अकरापर्यंत लक्ख उजेड असतो. त्यामुळे हवा तेवढा वेळ उन्हात हिंडायला मोकळीक असते. सूर्य मावळला तरी गुडूप अंधार तसा कधीच होत नाही. अर्थात कधीही ढग येउन पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण इतक्या "सनी" दिवसांसाठी एखाद-दुसरा पाऊस चालून जातो. आतातर येथील उन्हाळ्याची इतकी सवय झाली आहे कि तापमान १५ डिग्रीच्या वर गेले की आम्हाला उकडायला लागते.

उन्हाळ्यात थोडेसे गावाबाहेर गेले तर हिंडायला खूप मजा येते. चारी बाजूला पसरलेली हिरवळ, त्यावर चरणाऱ्या गायी आणि मेंढ्या, जवळच कुठेतरी खळाळत वाहणारी स्वच्छ नदी, शांत निश्चल (tranquil किंवा serene ह्याअर्थी) निसर्ग आणि सूर्यदेवाची झालेली कृपा. स्वर्गीय सुख कदाचित ह्यालाच म्हणतात. अशातच दूरवर कुठेतरी झोपडीवजा घर दिसते आणि वाटते हेच ते आपल्या स्वप्नातले घर. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याऱ्या तेथील माणसांचा क्षणभर प्रचंड हेवा वाटतो. असे कितीतरी उन्हाळे आम्ही कितीतरी वेगवेगळ्या ठिकाणी भटकलो आहोत. प्रत्येक वेळी एक नवाच आनंद मिळाला आहे.

Summer.jpg

उन्हाळा संपल्यानंतर ऑटम म्हणजे शिशिर ऋतु येतो. माझ्या इतक्या वर्षाचा अनुभव असा आहे की शिशिर ऋतु संपेपर्यंत तापमान कमी कमी होत गेले तरी हिवाळा सुरु होईपर्यंत अगदी उबदार वाटते. हिवाळ्याची चाहूल देणाऱ्या शिशिर ऋतुचे सौंदर्यसुद्धा काही कमी नसते. हिरव्यागार झाडांची पाने रंग बदलायला लागतात पिवळ्या, लाल आणि केशरी रंगांचे साम्राज्य सगळीकडे पसरते. निसर्गाचे रूप पूर्णपणे बदलेले असते. हे सौंदर्य वेगळेच असते. येथे ऑटम कलर्स बघायला म्हणून मुद्दाम सहली केल्या जातात. आता लवकरच हिवाळा येणार आहे तेव्हा जेवढे उन्ह मिळते तेवढे घ्या, भटकून घ्या, हिंडून घ्या असाही एक दृष्टीकोन असतो. अशा वेळी पुढचे तीन महिने हिवाळ्याशी सामना करायला उत्साह येतो. हळूहळू ऑटम कलर्स विटत जाऊन झाडांची पाने गळून पडतात. एकही पान नसलेली झाडे पहिली की हिवाळ्याची पहिली जाणीव होते.

Autumn.jpg

येथे आल्यानंतर पहिल्या वर्षीची थंडी मला फारच कठीण गेली. उन्हाळ्याच्या अगदी उलट येथील थंडी. सूर्य सकाळी आठ वाजता उगवणार आणि तीन वाजताच मावळणार. सूर्य मावळला की गुडूप अंधार. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण दिवस अंधारातच काढायला लागतो. दिवसभर जर ढगाळ वातावरण असले तर मग विचारूच नका. नोकरी करणारे लोक तर अंधारातच ऑफिसला जाणार आणि अंधारातच परत येणार. प्रचंड बोचरी थंडी, अधेमधे पडणारा बर्फ, आणि बाहेर पडायचे झाले तर कमीतकमी २-३ लेयर कपडे अंगावर चढवावे लागतात. (इथे एकच एक जाड कोट घालण्यापेक्षा कपड्यांच्या २-३ लेयर घातल्या की अधिक उष्णता मिळते. आणि चुकूनमाकून उकडायला लागलेच तर एखादी लेयर कमी करता येते.) एकेकटे राहणाऱ्या लोकाना इथला हिवाळा फारच निराशाजनक आहे. पण ह्यावरही उपाय आहे. तो म्हणजे थंडीतसुद्धा येथे उन्ह पडते हे लक्षात ठेवणे, जेव्हा जेव्हा बाहेर सूर्य आहे तेव्हा तेव्हा थंडी असली तरीही आळस न करता बाहेर जाणे आणि मिळेल तेवढे उन्ह खाणे. सूर्यदर्शन आणि उन्हाचे महत्व मला येथे येऊनच पटले. हिवाळ्यातले सूर्यदर्शन येथे फारच मोहक असते. वातावरणात थंडी असते पण सूर्य दिसल्यामुळे अगदी किंचित का होईना उब जाणवत असते. उन्हात काहीच दम नसतो पण मानसिक आधार असतो कि उन्ह पडले आहे!!! त्यात जर बर्फ पडलेला असेल तर शुभ्र बर्फावर चमकणारे उन्ह मला कायमच मोहित करते. ते दर्शन एकदा मिळावे म्हणून असे किमान दहातरी हिवाळे सहन करायला मी तयार आहे.

Winter.jpg

वर्षभरामध्ये सर्वात जास्त आनंद घेऊन येणारा ऋतु म्हणजे वसंत (स्प्रिंग). दिवस मोठा होतो, तापमान वाढायला लागते, नियमितपणे उन्ह पडायला लागते. पाने गळून पडलेल्या झाडांवर सुरुवातीला कोवळे कोंब दिसायला लागतात आणि आठेक दिवसांत कोवळी पालवी फुटायला लागते. उन्हाळा येईपर्यंत झाडे पुन्हा हिरवीगार होऊन जातात. चेरीची झाडे बहरू लागतात. गुलाबी पांढऱ्या रंगाच्या फुलांनी भरलेली चेरीची झाडे हे वसंत ऋतुचे प्रमुख आकर्षण आहे. बोचरी थंडी संपली आता उन्हाळा येणार सूर्य आपल्यावर कृपा करणार ह्या नुसत्या जाणिवेनेच मनाची मरगळ झटकली जाते. कोणतेही काम करण्यासाठी अभूतपूर्व उत्साह येतो. हळूहळू भटकंती पुन्हा सुरु होते. उन्हाळ्यात कुठेकुठे भटकायचे ह्याचे बेत सुरु होतात. वसंत ऋतु कायमच येथे एक नवीन उत्साह आणि एक नवी सुरुवात घेऊन येतो.

Spring.jpg

स्कॉटलंडमध्ये आल्यावर येथील निसर्गाकडून मी खूप काही शिकले. घाबरवणारे लोक मला खूप भेटले पण हेच लोक सूर्य दर्शन देत असताना त्याच्याकडे पाठ करून झोप काढणारे होते, उन्हे पडलेली असताना आळस करून घरात बसणारे होते. निसर्गावर प्रेम करणारा माणूस येथे कधीच दु:खी राहणार नाही, त्याला कसलीही भीती वाटणार नाही. येथील निसर्गाने मला अनिश्चिततेवर प्रेम करायला शिकवले. आयुष्याचे साधेसोपे तत्वज्ञान येथील निसर्ग शिकवतो. डोळे उघडे आणि मन मोकळे ठेवले तर आनंदाचे क्षण अनंत असतात. आजचा क्षण महत्वाचा आहे. काल काय घडले उद्या काय घडणार ह्याच्या विचारात वेळ घालवण्यापेक्षा आज कोणता आनंद मिळतो आहे तो भरभरून घ्यायला आणि आज आनंद नसेल तर उद्या नक्की मिळेल अशी आशा ठेवायला येथील निसर्गच शिकवतो.

* लोकरंग १० मे (लोकसत्ता रविवार पुरवणी) मध्ये पूर्वप्रकाशित
http://www.loksatta.com/lokrang-news/britain-climate-1100873/?nopagi=1

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमले आहे ललित. ऋतु ह्या विषयावर वाचायला केंव्हाही माझे मन तयार असते.

एकही पान नसलेली झाडे पहिली की हिवाळ्याची पहिली जाणीव होते.>> मला तर हिवाळ्याचे हे रुप म्हणजे कमालिच भावनिक वाटते. खूप संवेदनशील होऊन जातो मी हे दृष्य पाहिले की.

आणि हो निसर्गावर प्रेम करायला जमले की आपल्या जगण्यातला आनंद वाढतो. जसे की काल की एक चिमणी बघतो होतो. आणि तिला बघण्यात माझा अर्धा तास गेला.

वॉव!

मला फोटोंमधून पण ते वातावरण अनुभवता येतंय
फील होतंय

मला आवडतं असं मळभ भरलेलं वातावरण Happy

येथील निसर्गाने मला अनिश्चिततेवर प्रेम करायला शिकवले..>>> अगदीच रिलेट करू शकले.
बाकी लेख आवडलाच. Happy

फारच सुंदर लेख. फोटो आणि विचार दोन्ही सुंदर.

>>निसर्गावर प्रेम करणारा माणूस येथे कधीच दु:खी राहणार नाही

हे वाक्य खूप आवडलं.

नविन प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!! सायो ऑटमचा फोटो टाकला आहे. इथे नीट दिसत नसेल तर नविन फोटो शोधून टाकेन.

छान लिहिला आहे लेख.

यावरुन सहज एक गंमत आठवली
Aqua चं एक गाणं आहे Good morning sunshine..
When the sun is up,
on a clear blue sky,
you will act like a lover.
When the sky is grey,
and the rain comes down,
you will run for cover.
पहिल्यांदा हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला फार गंमत वाटली. कारण भारतात याचा उलट परिस्थिती.
आणि या गाण्यावरुन तुम्ही सुरवातीला जे लिहिले आहे, तसेच वाटले होते, की तिकडे सूर्यदर्शन फारच दुर्मिळ असावे आणि पावसाला लोक जाम वैतागलेले असावेत.
पण नंतर कळलं अशी काही गंभीर परिस्थिती नसते, आणि या लेखामुळेतर सविस्तर माहिती मिळाली .

लेखातील "डोळे उघडे आणि मन मोकळे ठेवले तर आनंदाचे क्षण अनंत असतात" हे वाक्य विशेष आवडलं.

छान झालाय लेख ..
उन्हाळ्यात थोडेसे गावाबाहेर गेले तर... हे खरेच स्वर्गीय सुख आहे..
फोटो नेमकेच आणि मस्त !

सुमुक्ता, लेख खूपच आवडला. विशेषतः कारण याच लेखात फक्त ब्रिटन च्या जागी सिअ‍ॅटल टाकले तरी हा लेख फिट्ट आहे म्हणून आणखीन भावला. माझा एक मित्र ब्रिटन मध्ये रहातो आणि त्याच्याबरोबर बरेचदा बोलून लंडन आणि सिअ‍ॅटल चे हवामान अगदी सारखे आहे हा निश्कर्ष मी काढलेला आहे.
प्रत्यक्षात मला सिअ‍ॅटलच्या पावसाचा कधीच कंटाळा येत नाही. सिअ‍ॅटलच्या हिरवेगार पणाचं कारण तो आहे - मग ही हिरवाई हवी असेल तर पावसाला कंटाळून कसं चालेल?
सिअ‍ॅटलच्या पावसाला सिअ‍ॅट ल बाहेरचे लोकच शिव्या जास्त घालतात (पु. ल. नी म्हटलं आहे तसं - मुंबईत गर्दी आहे याची तक्रार मुंबईबाहेरचे अधिक करतात - कोणी मुंबईला एक भिकार म्हटले की आपण सात भिकार म्हणावे!) तसं कोणी सिअ‍ॅटल मध्ये फार पाऊस पडतो म्हटलं, की हो ना - खूप पाउस म्हणून मोकळं व्हावं! ) Happy
हा, हिवाळ्यात ४ वाजता पडणारा अंधार अंगावर येतो खरा - पण नंतर येणार्‍या वसंताच्या विचाराने तो सुसह्य होतो . आणि ईकॉनॉमीला हातभार म्हणून एखादी द क्षिणेची ट्रीप या काळात करून घ्यायची! हाकानाका!

छान सोपे पण सुंदर लिहीले आहे .. लेख आवडला .. Happy

जुन्या मायबोलीत एक वसंत ऋतूवर फार सुंदर लेख होता .. त्याची लेखाची आठवण झाली वाचून ..

निसर्गावर प्रेम करणारा माणूस येथे कधीच दु:खी राहणार नाही, त्याला कसलीही भीती वाटणार नाही. येथील निसर्गाने मला अनिश्चिततेवर प्रेम करायला शिकवले. आयुष्याचे साधेसोपे तत्वज्ञान येथील निसर्ग शिकवतो. डोळे उघडे आणि मन मोकळे ठेवले तर आनंदाचे क्षण अनंत असतात. >>>>> अग्दी खरे आहे ...

शब्दांकन सुंदरच ....

हिरवाई हवी असेल तर पावसाला कंटाळून कसं चालेल? >>> सहमत अगदी. अधूनमधून जसा पाऊस पडतो तसा सूर्यसुद्धा दिसतोच की!!! पण सूर्य दिसला की त्याचं स्वागत करण्याऐवजी पाऊस आला की रडणारे लोकच मी इथे जास्त पाहिलेत.

सूर्यदर्शन फारच दुर्मिळ असावे आणि पावसाला लोक जाम वैतागलेले असावेत.>>> भारताच्या हवामानाशी तुलना केली तर हे खरे आहे. पण सूर्यदर्शन इतकेही दुर्मिळ नाही की सतत तीच तक्रार करत रहावी. पण नकळत लोक इथल्या हवामानाची इतर ठिकाणच्या हवामानाशी तुलना करत बसतात जे मुळातच चूक आहे.

पुन्हा एकदा सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!