वरदा यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधन कार्याची माहिती

Submitted by किंकर on 10 May, 2015 - 17:50

वाळवा तालुक्‍याला चार हजार वर्षांचा वारसा!
अशी बातमी दिनांक १०मे २०१५ रोजी सकाळ मध्ये प्रकाशित झाली आहे. माझा जन्म वाळवा तालुक्यातील 'बहे' या गावी झाला असल्याने व माझे बालपण उरुण - इस्लामपूर येथे गेले असल्याने सदर बातमी मी थोडी उत्सुकतेने वाचली . माझ्या जन्म गावाबाबत एकूण दोन दंत कथा प्रसिद्ध आहेत .
बहे या गावी इस्लामपूर येथून जाण्याचा जो मार्ग आहे त्यावर बहे हे गाव येण्यापूर्वी अगोदर एक टेकडी लागते. त्या टेकडीस 'तुकाई' ची टेकडी असे म्हणतात .
प्रभू रामचंद्र जेंव्हा वनवासात दंडकारण्यात प्रवास करीत होते तेंव्हा राम आता आपल्याला विसरला तर नाही ना ! अशी शंका रामाच्या मातेच्या मनात आली.
त्या शंकेचे निरसन करण्यासाठी तिने रामाची परीक्षा घेण्याचे ठरवले. मग या टेकडी वर येवून ती तेथे सीतेचे रूप घेवून बसली. अर्थात प्रभू रामचंद्र यांनी आपली माता ओळखण्यात कसलीच चूक केली नाही. आणि सीतेच्या रूपातील मातेस त्यांनी विचारले , तू का आई येथे ? आणि या प्रश्नामुळे सदर टेकडी हि तू का आई = तुकाई म्हणून ओळखली जावू लागली .
त्यानंतर पुढे थोड्या अंतरावर कृष्णा नदी आहे. त्या नदीत एक नैसर्गिक बेट तयार झाले आहे. त्या बेटावर एक राम मंदिर आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे रामाचा परम भक्त हनुमान हा रामाच्या समोर एक गुढगा टेकून व दोन हात जोडून असा बसेलेला नाही तर रामाच्या पाठीमागे उभा आहे. तसेच या ठिकाणी हनुमान रामाच्या मागे उभा राहताना त्याचे दोन्ही बाहू सरळ आणि तळवे पाठीमागे असा तो उभा आहे.
या बाबत जी कथा आहे ती अशी कि , कृष्णा नदीतील या रमणीय परिसरात श्रीराम जेंव्हा ध्यानस्थ बसले होते तेंव्हा अचानक जोरदार पाऊस सुरु झाला. नदीने रौद्र रूप धारण केले . पाणी वाढत वाढत रामचंद्र जिथे बसले होते त्याच्या वर येवू लागले. ते पाहून हनुमान प्रभू रामचंद्र यांच्या पाठीमागे गेला आणि आपल्या दोन्ही बाहूंनी नदीस आडवले. त्यामुळे प्रभू रामचंद्र यांच्या ध्यानात बाधा आली नाही.
पण नदीची वाट अडल्याने नदीच्या पात्रात पाणी इतके वाढले कि मागे आठ मैल लांबीचा डोह तयार झाला. शेवटी नदीने हनुमानास पुढे वाट देण्याची विनंती केली. तेंव्हा हनुमानाने प्रभू रामचंद्र यांच्या ध्यानात अडथळा न आणण्याचा अटीवर नदीस दोन्ही बाजूनी वाट करून दिली . तर रामचंद्र यांच्या ध्यानात बाधा येवू नये म्हणून आपल्या बाहूंनी जे बेट तयार केले ते बाहे म्हणजेच बहे होय.
आता या दोन दंत कथा या खऱ्या कि आख्यायिका हा वाद बाजूला ठेवला तरी तो परिसर मानवी वस्तीच्या खूप जुन्या खुणा आजही जपत आहे. आणि …
आपल्या मायबोली वरील संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर या विभागात कार्यरत असलेल्या वरदा यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधन कार्याची माहिती देणारी बातमी दिनांक ९ मे २०१५ रोजी सकाळ मध्ये प्रकाशित झाली आहे. त्या बातमीतून अगदी त्या गावातील नाही पण त्या तालुक्यातील पूर्व वस्तीच्या खुणा आणि वरदा आणि त्यांच्या गटाने घेतलेल्या अथक परिश्रमाची माहिती त्यातून मिळत आहे.
तर या साठी वरदा यांचे मनपूर्वक अभिनंदन. आपला हा संशोधनाचा अनुभव त्यांनी मायबोलीकरांच्या साठी जरूर सविस्तर प्रकाशित करावा अशी त्यांना खास विनंती आहे.
सोबत बातमी -
पुण्याच्या संशोधकांचे सर्वेक्षण; गावांत ताम्रपाषाणयुगीन खापरे
मुंबई - सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील पुरातत्त्वीय संशोधनामुळे या प्रदेशाचा इतिहास सुमारे चार हजार वर्षे जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याच्या वरदा खळदकर, मंजिरी भालेराव, अंबरीश खरे, आनंद कानिटकर व कल्पना रायरीकर या संशोधकांनी चिकुर्डे व आसपासच्या परिसरात पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून हे निष्कर्ष काढले आहेत.

वारणा- मोरणेच्या संगमाजवळील चिकुर्डे हे स्थळ 1907 मध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांनी वाचन केलेल्या चिकुर्डे ताम्रपटामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे. ताम्रपटातील स्थळवर्णने व इतर बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, थानापुडे, मांगले व करंजवडे या गावांचा यात समावेश होता. या अभ्यासाअंती असे लक्षात आले, की या सर्व गावांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत म्हणजे दोन हजार वर्षे मागे जातोच; परंतु चिकुर्डे, देवर्डे व मांगले या गावांचा इतिहास त्याही आधी म्हणजे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीपर्यंत मागे जातो. या तीनही गावांमधून डेक्कन चाल्कोलिथिक म्हणजेच ताम्रपाषाणयुगीन काळातील खापरे मिळाली आहेत.

मांगले येथील पुरावा डेक्कन चाल्कोलिथिकच्या सुरवातीच्या काळातील, माळवा कालखंडातील आहे. असाच पुरावा पूर्वी कऱ्हाड येथील भारत इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या उत्खननातही नोंदवला गेला होता. मात्र, चिकुर्डे व देवर्डे येथील खापरे उत्तरजोर्वे कालखंडाची म्हणजेच ताम्रपाषाणयुगीन काळाच्या शेवटच्या कालखंडातील आहेत.

महाराष्ट्रातील सर्वांत आद्य शेतकऱ्यांच्या वसाहती सुमारे चार हजार वर्षांपूर्वी उदयाला आल्या. फक्त तांबे हा धातू माहीत असलेली आणि शेती, पशुपालन, शिकार यावर अवलंबून असणारी छोटी गावे खानदेश ते कर्नाटक सीमेपर्यंत सर्वत्र आढळतात. तांबड्या गेरू रंगावर काळी नक्षी असलेली किंवा काळी-लाल/करडी अशी दुरंगी मातीची भांडी हे लोक वापरत असत. त्या काळी लेखनकला अस्तित्वात नसल्याने केवळ त्यांनी वापरलेल्या मातीच्या मडक्‍यांचे तुकडे हाच त्यांच्या वसाहतींचा एकमेव पुरावा असतो. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी ही गावे अचानक उजाड झालेली आढळतात. प्रतिकूल पर्यावरण आणि वारंवार पडणारे दुष्काळ हे यामागचे कारण असावे, असे मानले जाते. भीमेच्या खोऱ्यातील इनामगाव या एकमेव उत्खननातून मिळालेल्या माहितीशिवाय उत्तरजोर्वे या ताम्रपाषाणयुगीन अंतकाळाविषयी फारशी काहीच ठोस माहिती नाही. वैशिष्ट्यपूर्ण मडकी वापरणाऱ्या उत्तरजोर्वे काळातील गावांचा पुरावाही भीमा खोऱ्याबाहेर आजवर अद्याप मिळाला नव्हता.

मात्र, आता अतिशय सुपीक आणि उत्तम पाऊस असणाऱ्या कृष्णेच्या खोऱ्यातही अशा खापरांचा पुरावा मिळाल्याने या वसाहती केवळ अर्धदुष्काळी भीमेच्या खोऱ्यापुरत्या मर्यादित नव्हत्या; तर इतर प्रदेशांतही ताम्रपाषाण युगातल्या शेवटच्या कालखंडात या वसाहती होत्या, हे दिसून आले आहे. त्यामुळे या कालखंडाचा परत साकल्याने फेरविचार करण्याची गरज आहे, तसेच महाराष्ट्रातील इतर प्रदेशांतही सर्वेक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे, हे या संशोधनातून अधोरेखित झाले आहे.

या सर्वेक्षणामध्ये अभिजित नाईक (शिराळा) व शहाजी पाटील (चिकुर्डे) आणि कुटुंबीय यांची बहुमोल मदत झाली.

चिकुर्डे, देवर्डे व मांगले येथील पुरातत्त्वीय अवशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला एक नवे वळण देणारा अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच, ही तीनही गावे तीन ते चार हजार वर्षांपासून अस्तित्वात असून, या प्रदेशातील ती सर्वांत जुनी गावे आहेत.
- वरदा खळदकर, संशोधक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन वरदा! तुझ्या ह्या कामाबद्दल वाचायला आवडेल!
किंकर, तुम्ही लिहिलेल्या दंतकथा interesting आहेत

वरदा आणि टीमचे अभिनंदन!

किंकरनी लिहिलेली माहितीही रंजक आहे.

अरे वा!! ग्रेट जॉब वरदा.. मनापासून अभिनंदन तुझं !!!

.. तुकाई टेकडी, अनयुज्वल पोझिशन मधला हनुमान..

किंकर, तुम्ही सांगितलेल्या कथा अगदी खर्‍या वाटाव्यात इतक्या इंटरेस्टिंग आहेत

अरे ग्रेट वरदा. बहे बोरगाव नृसिंगपूर वगैरे आमची लहानपणीची ट्रिपची ठिकाणे. तीस इतका इतिहास असेल हे तुझ्यामुळेच कळले.

अभिनंदन वरदा आनि टीम, आभार किंकर

आणि सीतेच्या रूपातील मातेस त्यांनी विचारले , तू का आई येथे ? आणि या प्रश्नामुळे सदर टेकडी हि तू का आई = तुकाई म्हणून ओळखली जावू लागली .>>> हे आवडले Happy

वरदाचे अभिनंदन.

अशा जागी जाऊन तिथला इतिहास खणुन काढणे हे किती चिकाटीचे काम असु शकते याचा अंदाज वरदाचे लिखाण वाचुन आलाय. त्यामुळे ह्या संशोधनाचे जास्त कौतुक वाटतेय.

वरदाचे अभिनंदन.

अशा जागी जाऊन तिथला इतिहास खणुन काढणे हे किती चिकाटीचे काम असु शकते याचा अंदाज वरदाचे लिखाण वाचुन आलाय. त्यामुळे ह्या संशोधनाचे जास्त कौतुक वाटतेय.>> +१

खुप खुप अभिनंदन

Pages