सामोरी

Submitted by भारती.. on 6 April, 2015 - 07:19

सामोरी

नको वायदा नको उधारी नको भीक अन नकोच चोरी
हर्ष हवा उन्मुक्त नको तो खुंटा त्याची दावणदोरी

उधळत जाते आकाशाच्या कडेकडेने दूरदूरवर
येऊ नका मागावर आता सांभाळा तुमची चाकोरी

झाली म्हणून केली फसगत, केली म्हणून झाली नाही
नाही कळले ? कशी कळावी ही जन्माची दिवाळखोरी

वाटेमध्ये कुठे कधीसा सूर बावरा जुळला होता
वाऱ्याने वाऱ्यावर लिहिणे शिलालेख का ठरते पोरी

वैशाखाच्या ऐन दुपारी मधूर कूजन करतो कोकिळ
अशी नेहमी दाहावरती होते मोहाची शिरजोरी

बंद घराचे दार किलकिले होईलच थोड्या वेळाने
एक ‘भारती’ किरणशलाका येईल झळाळत सामोरी ..

-भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाळखोरी आणि शिरजोरी....खूपच आवडले.

शिलालेख मधला खयाल जाणवून अहाहा झाले, शिलालेख या शब्दाबद्दल थोडा विचार करतोय.
पण वाऱ्याने वाऱ्यावर लिहिणे......ही कल्पना भन्नाटच !

धन्यवाद अमेय , संतोष , गझलच्या वाटेला मी जात नाही , कधीकधी तीच मला भेटायला येते , दिमाखाची पर्शियन पाहुणी आहे ती :)( विंदा आणि विजयाबाई 'तो गझल ' म्हणतात ते आठवलं :))

वाह !!!

वाटेमध्ये कुठे कधीसा सूर बावरा जुळला होता
वाऱ्याने वाऱ्यावर लिहिणे शिलालेख का ठरते पोरी...
क्या बात है
... दिमाखाची पर्शियन पाहुणी...

उधळत जाते आकाशाच्या कडेकडेने दूरदूरवर
येऊ नका मागावर आता सांभाळा तुमची चाकोरी<<< सुंदर! (येऊ चे येउ करावे लागेल - मात्रांसाठी)

झाली म्हणून केली फसगत, केली म्हणून झाली नाही<<< मिसरा आवडला.

वाटेमध्ये कुठे कधीसा सूर बावरा जुळला होता
वाऱ्याने वाऱ्यावर लिहिणे शिलालेख का ठरते पोरी<<< व्वा व्वा

उधळत जाते आकाशाच्या कडेकडेने दूरदूरवर - ही ओळ फार सुंदर!

वाह! सुरेख!
झाली म्हणून केली फसगत, केली म्हणून झाली नाही आणि अशी नेहमी दाहावरती होते मोहाची शिरजोरी ह्या दोन्ही ओळी फार आवडल्या!

वाटेमध्ये कुठे कधीसा सूर बावरा जुळला होता वाऱ्याने वाऱ्यावर लिहिणे
शिलालेख का ठरते पोरी>>>>> भारी

एकुणात गझल मस्त आहे. तुझ्यामुळे गझल हा फॉर्म आवडत चाललाय भारतीताई

वाटेमध्ये कुठे कधीसा सूर बावरा जुळला होता
वाऱ्याने वाऱ्यावर लिहिणे शिलालेख का ठरते पोरी...>>>अहाहा !!! कशा सुचतं असतील अशा अद्बूत तरीही अर्थवाही ओळी ?….

गझल आवडलीच भारतीताई.

अशी नेहमी दाहावरती होते मोहाची
शिरजोरी << व्वाह.
'देहावरती' असंही वाचुन पाहिलं. (अर्थात फक्त स्वतंत्र मिसरा म्हणून )

वार्याने वार्यावर लिहिणे ...अहाहा ! क्या बात. Happy

नको वायदा नको उधारी नको भीक अन नकोच चोरी
हर्ष हवा उन्मुक्त नको तो खुंटा त्याची दावणदोरी

वाटेमध्ये कुठे कधीसा सूर बावरा जुळला होता
वाऱ्याने वाऱ्यावर लिहिणे शिलालेख का ठरते पोरी

मस्तच Happy

वाटेमध्ये कुठे कधीसा सूर बावरा जुळला होता
वाऱ्याने वाऱ्यावर लिहिणे शिलालेख का ठरते पोरी >>>>> क्लासिक भारतीताई .. मानल तुम्हाला ..
संपूर्ण गजल आवडली ... Happy

भारतीताई,

गझलेतल्या द्विपद्या आवडल्या. तुमच्या शब्दप्रतिभेचा अविष्कार ठायीठायी दिसतो. मात्र एक सलग अनुभूती म्हणून गझलेकडे कसं पाहावं ते समजत नाहीये. अर्थ जुळवण्यासाठी (की खुलवण्यासाठी) दिवाळखोरीच्या द्विपदीत लिहिल्यासारखी स्वत:ची (हवीहवीशी) फसगत करून घ्यावी लागतेय. Happy

आ.न.,
-गा.पै.

आभार लोक्स ! आधी लिहिलंय तशा अलिकडे अचानक या दोन गझला ''आल्या'' म्हणून लिहिल्या, त्यात अजिबात जुळवाजुळव नाही कारण नाहीतर मी या फॉर्मच्या वाट्यालाच जाणार नाही Happy
वास्तवात चमत्कृती, विरोधाभास , कथानक इतकं ठासून भरलेलं असतं की शब्दात जपूनच उतरवतो आपण ते रसायन, त्याला कुणी मेलोड्रामा म्हणेल म्हणून. अशा वेळी गझलचा नखरा , attitude , अचानक जवळचा वाटतो .>>मात्र एक सलग अनुभूती म्हणून गझलेकडे कसं पाहावं ते समजत नाहीये. >> असं तुम्ही म्हणता गापै म्हणून एक क्ल्यू ..
मानवी नातेसंबंध. ही थीम. नात्यांमधली घुसमट, फसगत ( जी झाली म्हणून आपणही करायला जावं जशास तसे न्यायाने तर हा हंत ! केली म्हणूनही होत नाही पुरेशी ), अचानक भेटून जाणारा गारवा अन गोडवाही , म्हणून दाहात मोहही हे या गझलच्या शेरांमधून वाहणारे सूत्र .. फक्त शेवटचा शेर जरासा वेगळा. जरासाच. बंद घराचं दार उघडावं अचानक आणि आत काळोख दिसण्याऐवजी आतून उलट एखादी तिरीप अनपेक्षितपणे बाहेर यावी, बाहेरून सहज उत्सुकतेने आत डोकावणाऱ्याचे डोळे दिपून जावेत , तसं काहीसं असतं या नातेसंबंधांचं, त्यातलं सत्य नेहमीच चकवून टाकतं ..
एकूण ही सुद्धा एक मुसलसल गझल असावी माझ्या प्रवृत्तीनुसार . अलिकडे विंदा वाचत होते तेव्हा एक सहस्पन्दन जाणवलं.. त्यांनी हा फॉर्म खूप हाताळलाय, पण आपल्याच तऱ्हेने .गझलबद्दल मर्यादित आकर्षण विंदांना आहे कारण कदाचित त्यांनी उर्दू फार वाचलेलं नाही. त्या मर्यादेत त्यांनी या फॉर्मचा एक वेगळा छान बाज असलेला वापर केला आहे. जातक मी वाचलेलं नाही, पण त्यांच्या प्रेम आणि स्त्रीविषयक कवितांचं एक संकलन आहे माझ्याकडे ‘आदिमाया ‘, त्यात अशा बऱ्याच आहेत, पण आता उघडून वाचलं तर त्या एकच थीम असलेल्या ,काहीशा चक्क भावगीत-प्रेमगीत याच्या जवळच्या, तरीही गझलचं बांधकाम असलेल्या अशा आहेत. आहेत मस्त वाचनीयच .