समर कुलर - थंडगार मिंट लेमनग्रास सरबत

Submitted by सावली on 24 April, 2015 - 13:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

नुकतेच बोर्डीवरुन येताना मैत्रिणीने भरपुर गवती चहा दिला. आता भर उन्हाळ्यात त्याचे काय करावे असा विचार करत असतानाच याचे काही थंड पेय करता येईल का असे गुगलले. थायलंड मधे गवती चहाचे असे पेय बनवतात. त्यात काही जण लिंबु घालतात, काहीजण घालत नाहीत. मी करुन बघताना लिंबाबरोबर पुदिनाही घालुन पाहिला आणि उन्हाळ्यासाठी एक मस्त थंडगार समर कुलर पेय तयार झालं.

पाच सहा ( कमी जास्त चालतील) गवती चहाची लांब पाती
थोडी पुदिना पाने,
अर्ध लिंबु व अर्ध्या लिंबाच्या चकत्या.
साखर ( चवीनुसार )
पाणी

क्रमवार पाककृती: 

गवती चहाची पाती चांगली धुवुन बोटबर लांबीचे तुकडे करा. शक्य असेल तर थोडे थोडे ठेचुन घ्या
दोन ग्लास पाण्यात हे तुकडे घालुन दहा पंधरा मिनीटे पाणी उकळवुन घ्या.
गरम असतानाच त्यातच चवीनुसार साखर टाकुन साखर विरघळवुन घ्या. हे निवले की फ्रिज मधे गार करायला ठेवा.
प्यायला घेताना -
ग्लासात पुदिनाची पाने चुरडुन घाला. हे गवती चहाचे द्रावण ओतुन त्यात थोडे लिंबु पिळा. लिंबाची एक चकती आणि बर्फ घालुन मस्त गारेगार प्या.

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना
अधिक टिपा: 

- गवतीचहाचे मिश्रण जास्त उकळवुन आटवले आणि देताना त्यात पुदिना, लिंबु व सोडा मिसळुन दिले तरी छान लागेल बहुधा. पण अजुन करुन पाहिले नाही.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, पुदिना पाने हा माझा प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग. पुदिना, लिंबु व सोडा हे काँबो करून बघेन एकदा.

रच्याकने, गवती चहा घालून उकळून निवलेल्या पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्यायलं की घशाची खवखव एकदम बरी होते.

याचं जास्त साखर घालून कॉन्सन्ट्रेटही करून ठेवता येईल का? आठवड्याभराचं असेल तरी लगेचच प्यायला द्यायला एक नवीन पर्याय होईल.

मार्गारिटाला असा फ्लेवर कसा वाटेल विचार करतेय >>> अगदी अगदी! पुदीना म्हटल्यावर आधी मला मोहितो आठवली मात्र Happy

इथे सध्या मिळत नाहीये मला गवती चहा. मिळाला की ट्राय करणेत येईल.